पान:गांव-गाडा.pdf/105

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४      गांव-गाडा.


नांवाला जरी ३५ तर्फबार पाटील आहेत, तरी कामाला तिघे चौघेच जबाबदार आहेत. नगर जिल्ह्यांत पारनेर गांवाला चार पाटील असत. ते सुमारें पांच सहा वर्षांपूर्वी वरील कारणासाठी तीन ठरवून टाकले. पूर्वीच्या अंधेरनगरीत पाटील-कुळकर्ण्यांनी जी चंगळ व कमाई केली आणि लोकांवर जो अधिकार गाजविला, ते दिवस गेले. आतां नांव घेण्यासारखे कोणतेही मुलकी, फौजदारी, दिवाणी अधिकार त्यांना कायद्याने ठेवले नाहीत, आणि वरिष्ठ हुकूम करतील तितकंच काम त्यांनी केले पाहिजे. वसुलाची सूट, तहकुबी, तगाई, अतिक्रमण वगैरेसंबंधाने सरकारने कायदेकानु केले आहेत, त्याबरहकुम काम चालते. त्यांत त्यांच्या कृपेनें अगर अवकृपेनें कमजास्त होतें अशांतला भाग मुळीच नाही. तेव्हां आतां लोकांच्या अज्ञानाचा व नडीचा जो काय फायदा घेतां येईल, तेवढ्यावर त्यांना आपली भूक भागवावी लागते. हल्लीच्या पाटील-कुळकर्ण्यांच्या वाडवडिलांनी वतन पतकरले तेव्हां गांवकीचे काम हसत खेळत सांभाळून घरची शेतीपोती, व्यापारहुन्नर पाहण्याला त्यांस मुबलक सवड मिळे. दिवस स्वस्ताईचे असून त्यांना घरचा पुरवठा चांगला असे, आणि लोकही भजून होते. व्यापारांत इकडील लोकांपेक्षा हुषार असे परप्रांतीय मारवाडी गुजराती इकडे आले, आणि त्यांनी सर्व व्यापार आपल्याकडे ओढला. ज्या कारणांनी इकडील बहुतेक कुणबी कर्जबाजारी झाले, त्यांनी पाटील-कुळकर्ण्यांना वगळलें असें नाही. दोन पैसे बाळगून असणारे पाटील-कुळकर्णी नमुन्यासाठी सुद्धां बाराबारा कोसांत दुष्काळी टापूत तरी दिसत नाहीत. पंचवीस वर्षांपूर्वी पाटील-कुळकर्ण्यांची घोडी तालुका कचेरीच्या आजूबाजूला दिसत. आतां बहुतेक पाटील-कुळकर्णी पादचारी दिसतात. पाटील-कुळकर्ण्यांना चारचौघांप्रमाणे प्रपंच चालवावयाचा असून आतिथ्याच्या कामांत जमेदारी पेशा राखावयाचा असतो. पूर्वी त्यांना आडमाप पैका मिळत असल्यामुळे त्यांना भडंग खर्च करण्याची ढब पडून गेली; नव्हे- त्यांच्या बोकांडी अनेक वायफट खर्चाच्या बाबी-सणवार, यात्रा,