पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३७ )
व्यंकटराव नारायण.

नव्हतें. अशा स्थितींत दिल्लीच्या बादशहाकडून दक्षिणच्या सहा सुभ्यांच्या मुख्य अधिकारावर निजाम उल्मुलुक याची नेमणूक झाली. तो निजाम दक्षिणेंत येतांच शाहू-संभाजीचें युद्ध पुनः जोरानें सुरू झालें !
 जे संभाजीमहाराज स्वप्रवृत्तीनें एखादी मसलत उभारून तडीस नेण्यास असमर्थ होते, तेच परक्यानें बाहुलें म्हणून हातीं धरून नाचवूं लागतांच शाहूमहाराजांस भयप्रद झाले! शाहूमहाराजांनीं बाळाजी विश्वनाथ पेशवे यांस दिल्लीस पाठवून बादशहाकडून दक्षिणच्या सहा सुभ्यांवर चौथ सरदेशमुखीचे हक्क वसूल करण्याच्या सनदा मिळविल्या होत्या ती गोष्ट निजामास फार असह्य झाली होती. या सनदांनीं मोंगलांच्या ११० रुपये उत्पन्नांतून मराठ्यांस ३५ रुपये घेण्याचा हक्क प्राप्त झाला होता. तो हक्क ते मोंगलाई सहा सुभ्यांपैकी प्रत्येक खेडयांतून स्वतंत्रपणें वसूल करूं लागले, तेव्हां मोंगलाई राज्य आपल्या हातीं असून सुद्धां नसल्यासारखेंच आहे असें निजामास वाटूं लागलें यांत नवल नाहीं. मराठ्यांचे हे हक्क बुडवावे म्हणून त्यांच्या घरांत कलागती उत्पन्न करण्याची योजना निजामानें मनांत आणिली, तों संभाजीमहाराजांचे आयतेंच खूळ त्याच्या हातीं लागलें! शाहू व संभाजी यांमध्यें राज्याचा खरा वारस कोण हें कळल्याखेरीज आपण चौथ सरदेशमुखीचे हक्क कोणासच वसूल करूं देणार नाहीं असें मिष करून त्यानें ते हक्क जप्त केले,आणी वादी प्रतिवादींनीं आपणांकडे स. १७२७ येऊन स्वपक्षाचें समर्थन करावें,तें ऐकून आम्ही जो वाजवी दिसेल तो निकाल करूं, त्याप्रमाणें उभयतांनीं चालावें; असा न्यायाधीशाचा डौल निजामानें आणिला.