पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/४८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३८ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

 निजामाचें हें वर्तन पाहून शाहूमहाराज क्रोधाविष्ट झाले व बाजीराव पेशव्यांस निजामावर स्वारीं करण्याविषयीं त्यानीं एकदम हुकूम दिला. तेव्हां निजामानेंही लढाईच्या इराद्यानें आपली फौज तयार करून संभाजीमहाराजांस आपल्या कुमकेस बोलावून आणिलें. तो त्यांचेंच भांडण भांडत असल्यामुळें त्यांजकडून फौजेची व मसलतीची पुष्कळ मदत होईल अशी अपेक्षा करीत होता. परंतु बाजीराव पेशव्यांशीं लढाई सुरू झाली तेव्हां संभाजीमहाराजांच्या हातून कांहींच पराक्रम न स. १७२८ झाल्यामुळें निजाम लौकरच जेरीस येऊन पेशव्यांशी तह करण्यास कबूल झाला. पेशव्यांनीं तहाच्या शर्ती फार जबर घातल्या होत्या त्या सर्व त्यानें मान्य केल्या. परंतु संभाजीमहाराजांस आपले स्वाधीन करण्याविषयीं पेशव्यांची शर्त होती तेवढी मात्र त्याच्यानें मान्य करवली नाही. तेव्हां उभयपक्षी असें ठरलें कीं, निजामाने संभाजी महाराजांस पन्हाळ्यास पोंचतें करून द्यावें, तिकडे ते गेल्यावर त्यांनी व शाहूमहाराजांनीं आपल्या घरगुती भांडणाचा वाटेल तसा निकाल करावा! निजामानें त्या भांडणांत पडूं नये व शाहूमहाराज हेच मराठी राज्याचे खरे वारस आहेंत असें कबूल करावें व त्यांच्या चौथ-सरदेशमुखीच्या हक्कांस केव्हांही अडथळा आणूं नये.
 याप्रमाणें तह होऊन संभाजीमहाराज परत आले तेव्हां ते फार उदासीन झाले होते. परंतु उदाजी चव्हाणानें त्यांस हिंमत देऊन आपल्याच बळावर शाहूमहाराजांशीं लढण्याविषयीं प्रवृत्त केलें! त्यांनीं आपले अष्टप्रधान व सर्व सरदार यांस आज्ञापत्रें पाठविली कीं, तुम्हीं आपापली फौज तयार करून स्वारींत लौकर हजर व्हावें. त्याप्रमाणें ते लोक आले व उदाजी चव्हाणही येऊन मिळाला. तेव्हां संभाजीमहाराजांजवळ बरीच फौज जमा झाली. या फौजेंत व्यंकटराव