पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३६ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

झाले. कापशीकर यजमान व इचलकरंजीकर नोकर हा संबंध आतां राहिला नव्हता. तथापि कापशीकरांच्या दौलतीविषयीं व्यंकटरावांची अनास्था होती असें नाही. जेव्हां जेव्हां राणोजी घोरपड्यांचे काम शाहू महाराजांच्या दरबारी पडत असे तेव्हां तेव्हां तें व्यंकटरावांच्या वशिल्यानें सिद्धीस जात असे. कापशीकरही पूर्वी झालेल्या गोष्टी कधीं विसरले नाहींत. यामुळें या दोन्ही घराण्यांत परस्परांविषयी प्रेमभाव व घरोबा पुढेंही कायम राहिला. पिराजीराव मरण पावल्यावर कापशीकरांच्या दौलतींत पुष्कळ अव्यवस्था होऊन ती दौलत अगदीं नातवानीस आली. संभाजीमहाराजांच्या मनांतून सबंध कापशी संस्थानच खालसा करावयाचे आलें. त्यांचा तो बेत पाहून संताजीराव घोरपडे यांची थोरली स्त्री द्वारकाबाई अद्यापि हयात होती ती आपल्या नातवास म्हणजे राणोजीस बरोबर घेऊन साताऱ्यास शाहूमहाराजांच्या आश्रयास जाऊन राहिली.
 सातारा व करवीर येथील छत्रपतींमध्यें राज्याच्या मालकीबद्दल जो तंटा लागला होता त्यांत प्रथम प्रथम करवीरकरांची सरशी होती. राज्यांतले बहुतेक प्रबळ सरदार करवीरच्या बाजूस होते. अशा स्थितींत सातारच्या छत्रपतींनीं बाळाजी विश्वनाथ यांस पेशवाईचें पद दिलें त्या दिवसापासून त्या बुद्धिमान् पेशव्यानीं शाहूमहाराजांचा पक्ष प्रबळ केला व त्यांच्या कारस्थानांस तेज आणून प्रतिपक्षावर दरारा बसविला. या अवधींत ताराबाई कैदेंत पडल्यामुळें व मागून रामचंद्रपंत अमात्य वारल्यामुळें करवीरकरांच्या उत्कर्षाचें पारडें अगदींच फिरलें. रामचंद्रपंतांनीं वाढविलेला सरदार उदाजी चव्हाण हा मोठा बलाढ्य व पुंड होता. त्याच्याच आधारावर करवीरकरांनीं शाहूमहाराजांविरुद्ध कांहीं धडपड चालविली होती तेवढीच. एरवीं करवीरकरांकडून शाहूमहाराजांस फारसा उपद्रव होण्याचें भय राहिलें