पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ६ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

महादाजीपंतास एक पुत्र झाला, त्याचें नांव नारोपंत. नारोपंतांचा जन्म श. १५८५ म्हणजे इ. स. १६६३ या वर्षी झाला असें एका टिपणांत लिहिलें आहे. हा नारोपंत इचलकरंजी संस्थानाचा मूळ स्थापक होय.
 महादाजीपंत हे ह्मापणच्या कुलकर्ण्याचें काम करून निर्वाह करीत असत. तें कुलकर्ण तरी त्याचें स्वतःचें नव्हतेंच. अर्थात् गहाणदार अथवा गुमास्ता या दोहोंपैकी कोणत्या तरी संबंधाने ते काम त्यांजकडे असून त्यावर ते कसाबसा निर्वाह चालवीत. नारोपंत पांच चार वर्षांचे झाले नाहींत तोंच त्यांचे वडील महादाजीपंत वारले. त्यामुळे गंगाबाईस निर्वाह कसा चालवावा ही पंचाईत येऊन पडली. तेव्हां नारोपंतास बरोबर घेऊन ही गंगाबाई पोट भरण्यासाठीं ह्यापण सोडून घांटावर आली.
 नारोपंतास बरोबर घेऊन गंगाबाई घांटावर आली ती निर्वाहाची सोंय पहात पहात यदृच्छेनें कापशीस आली. तेथें म्हाळोजी घोरपडे यांनी त्या बाईस आश्रय दिला. घोरपडयांचे कुलदैवत श्रीरामचंद्र आहे. रामचंद्राचा पुजारी होता त्याच्या घरी गंगाबाईची राहण्याची सोय झाली व देवाकरितां नैवेद्य तयार होत त्यांवर तिचा व मुलाचा निर्वाह होऊं लागला. ' बापाने कुलकर्ण्याचा गुमास्ता होऊन खर्डे घांसून जन्म घालविला, तर त्याच्या या मुलानें तरी पुढे कोणचा पराक्रम करावयाचा आहे ? पुढेमागें पुजाऱ्याचा गुमास्ता होऊन घंटा बडवून यानें पोट भरावे असाच योग जगाच्या नेहमीच्या रहाटीवरून दिसतो; ' असें जर कोणी त्यावेळीं म्हटलें असतें तर त्याची काय चूक होती ? परंतु " पुरुषाचें भाग्य देवास कळत नाहीं तें मनुष्यास कोठून कळणार !!! " नारोपंत कापशीस आले त्या