Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ७ )
नारो महादेव.

वेळीं त्यांचें वय पांच चार वर्षांचेंच असावें. पण तितक्याही वयांत त्यांच्या भावि ऊर्जितावस्थेला प्रारंभ करून देणारी एक गोष्ट सहजासहजीं घडून आली ! त्या वयांत पोरे खेळ खेळतात ते नोरोपंतांस आवडत नसत ! त्यांचें नेहमीं बसणें, उठणें पागेंत होऊं लागलें. शिपाईगिरीच्या व शस्त्रकौशल्याच्या गोष्टी ऐकाव्या, शिपाई लोकांनीं स्वारीशिकारीमधले नानाप्रकारचे अनुभव स्वमुखानें वर्णिलेले ऐकावे, पागेंत कारभार व कामें चालत तीं पहावी, हा नारोपंतास ध्यास लागला. एके दिवशी पागेंतला एक गडी एक मोठें पाठाळ घोडें पाण्यावर नेत होता. त्या घोड्यावर आपणांस बसविण्याविषयीं नारोपंतांनीं गडयास सांगितले व त्या गडयानेही विचार न करितां त्यांस घोड्यावर बसविलें. इतकें होतांच नारोपंताची स्वारी भरधांव घोडें सोडून नदीकडे निघाली ! म्हाळोजी घोरपडे यांचे पुत्र संताजीराव हे त्या वेळीं कापशीं मुक्कामी होते. एवढया मोठ्या घोड्यावर ब्राह्मणाचें निराश्रित लहान पोर बसून बेलाशक घोडा पळवीत आहे, हें पाहून संताजीरावांस फार आश्चर्य वाटले. ज्या अविचारी नोकरानें त्या मुलास घोडयावर बसविलें त्याला ते रागें भरले. हें मूल घोड्यावर बसण्याविषयीं असाच नेहमीं हट्ट धरितें, असें त्याच्या तोंडून कळल्यावर संताजीरावांनीं कौतुकानें मुलास घोडयावर बसावयास शिकवावें, अशी चाबूकस्वारास ताकीद दिली. नारोपंतास संताजीरावांनीं जवळ बोलावून आणून त्याची विचारपूस केली, तेव्हां हा धीट व हुशार होतकरू मुलगा आहे असें त्यांस दिसून आलें. त्या दिवसापासून नारोपंतांस लिहिणें वाचणें, घोड्यावर बसणें, निशाण मारणें इत्यादि त्या काळची सर्व विद्या शिकविण्याची संताजीरावांनीं व्यवस्था