येथपर्यंत कापशीकर घोरपडयांची हकीगत निरनिराळ्या बखरी व टिपणें यांतील तात्पर्यायी एकवाक्यता करून लिहिली आहे. हिचा उपयोग पुढील कथेचें अनुसंधान समजण्याकरितां होण्याजोगा आहे. यापुढची या घराण्यची हकीकत इचलकरंजीकरांच्या वृत्तांतांत जेथें जेथें संबंध येईल तेथे तेथे सांगण्यांत येईल.
इचलकरंजीकर घोरपडयांचें उपनाम जोशी. कोंकणस्थ ब्राह्मणांत ज्यांचें जोशी आडनांव आहे त्यांचीं वरवडेंकर व संगमेश्वरकर अशी दोन खुंटें फार प्रसिद्ध आहेत. त्यांतले त्यांत वरवडेंकरांचा विस्तार फारच मोठा आहे. कदाचित् संगमेश्वरकर व दुसरेही कित्येक किरकोळ जोशी मूळचे वरवड्यांचेच असावे असा तर्क संभवतो. हें वरवडें गांव रत्नागिरी जिल्ह्यांत आहे. तेथल्या जोशांपैकीं एक घराणें सोळाव्या शतकांत वरवडें सोडून सावंतवाडी संस्थानांत ह्मापण येथें जाऊन राहिलें. या घराण्यांतला विश्वनाथपंत नांवाचा एक गृहस्थ होता. त्यास नारोपंत व महादजीपंत असे दोन पुत्र होते. पैकीं नारोपंत यांचे वंशज हुपरीकर या नांवानें प्रसिद्ध आहेत. हे पेशवाईत मोठे सावकार असून सुभेदाऱ्या वगैरे महत्वाची कामें करणारे होते. दुसरा पुत्र महादजीपंत. त्याच्या स्त्रीचें नांव गंगाबाई असें होतें.