पान:अस्पृश्य -विचार.pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ११ )

स्पर्शयोग्यसुद्धा समजत नाही तोपर्यंत या लोकांत स्वदेशाभिमान उत्पन्न होणे अशक्य आहे. अभिमान कशासाठी बाळगावयाचा ? आणि कोणाचा बाळगावयाचा? तुमच्या देशाचा ? तुमच्या देशाचा अभिमान म्हणजे काय देशांतल्या दगडमातीचा अभिमान ? अभिमान दगडमातीसाठी वाटेल, पण ती तरी अभिमानास्पद असावी लागते ! तिच्यावर आपले प्रतापी पुरुष वावरलेले असावे लागतात. तिच्यावर आपल्या संस्कृतीची पैदास झालेली असावी लागते. ही भूमि माझी आहे या आवेशाने लढता लढतां मेलेल्या आपल्या शूरांचे पुतळे मधून मधून तिच्यावर दिसावे लागतात. तिच्यांतील शेतवाडीवर खंडोगणीत गल्ला मालकीचा म्हणून गोळा करतां आला पाहिजे. परमेश्वरी इच्छेच्या प्रतिकूलतेची हद्द पायाला लागेपर्यंत तेथें सुखसंपत्ति व वैभव संपादितां यावे. बापाकडून कांहीं वारसा हटकून मिळणार या कल्पनेने तेथे पिढ्या अनुस्यूत होत असाव्यात. पुत्रपौत्रांना आपली कमाई खास जाऊन पोचणार या भावनेने तेथे प्रयत्नवाद बळास लागलेला असावा. त्या ठिकाणी आपल्या कर्तबगारीमुळे घरीदारी समाधानवृत्ति नांदल्याने स्त्रियांचा आपल्या ठिकाणचा प्रेमभाव द्विगुणित होत असावा. तेथें जीव कदरल्यामुळे नव्हे तर इहलोकच्या उपभोगानंतर भूतकाळांत पोहरा टाकण्याची आणि भविष्यकाळांत पतंग उडविण्याची बुद्धि होत असावी. अशी जर दगडमातीची भूमि असेल तर तिचा अभिमान. तुमच्या समाजाचा तरी महाराला कसला अभिमान ? त्याने तुमच्यासाठी कां झटावे व मरावें ? असे कोणते लागतेपण त्याच्याशी तुम्हीं राखले आहे की , तुम्हांला दंश झाला तर त्याला घेरी यावी आणि तुमच्या अवमानाबद्दल त्याला संताप चढावा ? इतकेहि असून आज जर विचारावयास गेलांत तर मी तुमचाच आहे असे म्हणावयास तो लाजणार नाही ! ही त्याची थोरवी आहे पण खरी गोष्ट अशी आहे की, तो