Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १० )

आहे ते स्वतःच्या वैभवाची जपणूक करण्यांत कर्मशूर असल्यामुळे काल त्यांना वश होऊन जिवंत ठेवील व आम्हांला प्रतिकूल होऊनच ठार मारील!
 दुसऱ्याही एका बारीक मुद्याचा जातां जातां विचार करणे जरूर आहे. या अस्पृश्यतेचे स्वरूप आणि तिचे परिणाम लक्षात घेतले पाहिजेत. निरनिराळ्या शिवता-शिवतींची भेसळ होऊ देतां उपयोगी नाही. अस्पृश्येतर लोकांचे परस्पर संबंध पाहतां त्यांच्यांतहि मंद मंद छटा टाकणारी अस्पृश्यता असते असें दिसेल. हे लोक एकमेकांना शिवतात, पण त्यांचे घरगुती आणि वैयक्तिक व्यवहार प्राप्त झाले म्हणजे एकमेकांपासून दूर सरतात. आहाराच्या तीव्र भेदामुळे ही बारीक आणि पातळ स्वरूपाची अस्पृश्यता सर्व म्हणजे अस्पृश्येतर लोकांत आढळून येते. आहारविहाराची शुचिता जो जों जास्त तों तो इतरांपासून अलग राहण्याची प्रवृत्ति जास्त. पण या असल्या अस्पृश्यतेची महाराच्या देहाला चिकटलेल्या अस्पृश्यतेशी गल्लत करता कामा नये. ही अस्पृश्यता ऐहिक वैभवसंपादनाच्या आड येत नाही. मी या ठिकाणी कर्माच्या वांटणीसंबंधाने बोलत नसून फक्त 'विटाळा' संबंधाने बोलत आहे हे ध्यानात ठेवावे. तिच्यामुळे कोणाच्या सार्वजनिक चारित्र्याला आळा बसला आहे असे नाही. प्रस्तुत ठिकाणी मात्र माणसांत येण्याचीच चोरी म्हणजे बंदी असा अस्पृश्यतेचा परिणाम झाला आहे. तर अशा या रूढीचा ऱ्हास होणे जरूर आहे. आतां वर एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे या रूढीचा उच्छेद करणे कां जरूर आहे याचा विचार करावयास लागू.
 राजकारण हा आपणा सर्वांचा आवडता विषय आहे म्हणून त्याचाच थोडासा विचार प्रथम करावा हे योग्य होईल. पहिली अगदी ढळढळीत गोष्ट म्हणजे ही की, आम्ही जोपर्यंत त्यांना