पान:अमेरिका पथदर्शक.pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४२
अमेरिका-पथ-दर्शक

परंतु सर्वच देशप्रेमी संन्यासी नसतात. कांहीं संन्यासी असें असतात कीं, त्यांस आपल्या देशबांघवांसहि भेटावेसें वाटत नाही व भेटले तरी ते आपला मोठेपणाचा तोरा सोडीत नाहींत. दोन विभूति मात्र अमेरिकेत अशा आहेत की, ज्या आपल्या हिंदी बांधवांचें सदैव हित चिंतीत असतात व त्यांच्याकरितां अनेक कष्ट सहन करावयास तयार असतात.
 संन्यासी मिळो अगर न मिळो, परंतु ज्या अमेरिकन लोकांस वेदांताची चटक लागलेली असते, ते हिंदुस्थानावर प्रेम करीत असतात. ते आपल्या शक्तिनुसार हिंदी विद्यार्थ्यांस विद्यार्जनाकरितां मदत करण्यास सदैव तत्पर असतात. मला केवळ वेदांतामुळे ज्यांनी आपलेसें करून घेतलें, असे माझे तेथें कित्येक मित्र आहेत.
 प्रश्न ४१--अमेरिकेंतील थिआसफिकल सोसायटयांचा भारतीय विद्यार्थांशीं कशा प्रकारचा संबंध आहे?
 उ०--थिआसफिकल सभाहि हिंदुस्थानचें नेहमीं हित चिंतीत असतात. ह्या सभांकडून विद्यार्थ्यांना थोडीबहुत मदत होते. माझी अशी समजूत आहे की, थिआसफिकल सभांनी हिंदुस्थानच्या बाहेर आमच्याविषयीं बरीच सहानुभूति उत्पन्न केली आहे. सॅनफ्रांसिस्कोच्या शेजारीं ओकलँड नांवाचें शहर आहे. ह्या शहरांतील थिआसफिकल सोसायटीनें आमच्या हिंदी मजूरांना फार मदत केली होती. शिकागोमध्यें मॅडम हावर्ड म्हणून एक फार धर्मशील विदुषी आहे. तिनें ३० वर्षांपासून मांस खावयाचें सोडून दिलें आहे. ही बाई हिंदी विद्यार्थ्यांस नेहमीं मदत करीत असते.
 सांगावयाचें तात्पर्य हें कीं, अमेरिकेंतील, थिआसफिकल सोसायट्यांकडून हिंदी विद्यार्थ्यांस बरीच मदत होऊं शकतें. परंतु इतके अवश्य लक्षात ठेवावयास पाहिजे कीं, आमच्या कित्येक मूर्ख बंधूंनी ह्या सोसायट्यांच्या मदतीचा अयोग्य फायदा घेतल्यामुळे, अमेरिकन सद्गृहस्थांना मदत करतांना फार सावधगिरी बाळगावी लागते. ह्याकरितां येथून अमेरिकेस जाणा-यांनीं येथल्या थिआसफिस्ट सद्गृहस्थाचें शिफारस-पत्र घेऊन जावें व शिफारस पत्र देणा-यांनींहि आपली जबाबदारी ओळखून शिफारस पत्र द्यावें; कारण, बाहेर जाणाऱ्या इसमांच्या चालचालणुकीवरूनच परदेशस्थ लोक अखिल हिंदु समाजाविषयीं आपली मतें बनवीत असतात.