पान:अमेरिका पथदर्शक.pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३६
अमेरिका-पथ-दर्शक

आपल्या देशांतील शेतीमध्यें योग्य त्या सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत. ह्याशिवाय फळांच्या व्यवसायासंबंधीचे (Fruit Industry)शिक्षण संपादन केल्यास आपल्या देशाचा कोट्यावधि रुपयांचा फायदा करून देतां येईल. कारण फळांचा धंदा अमेरिकेंत ब-याच पक्व दशेप्रत पोहोंचला असून, हा धंदा हिंदुस्थानांत फार मोठ्या प्रमाणांत करतां येण्यासारखा आहे. अमेरिकन लोक ह्या धंद्याच्या बळावर हजारों कोटी रुपये मिळवितात. आपले लोकहि कलाकौशल्य, कृषि, फळाचा धंदा इत्यादि विषयांचें शिक्षण मिळवून व आपल्या ज्ञानाचा उपयोग करून, आपल्या देशाचें दारिद्रय घालवून देऊं शकतील.
 यंत्रांचा उपयोग समजून घेण्याकरितां आमच्या विद्यार्थ्यांना अमेरिकन कारखान्यांत जाऊन काम करावयास पाहिजे. त्यांना यंत्रांच्या भागांचा उपयोग कसा करावा, हें माहित करून घ्यायला पाहिजे. केवळ यांत्रिक शिक्षण घेण्याकरतां शेंकडों विद्यार्थी अमेरिकेंत गेलें पाहिजेत.
 प्रश्न ३०--खर्चण्याकरितां कोणतें नाणें बरोबर घेणें योग्य होईल ? नोटा, पौंड, हुंडी ह्यांमधून कोणत्या स्वरुपांत नाणें घेणें सोईस्कर आहे?
 उ०--इंग्रजी पौंड सर्व ठिकाणी चालतात. कांहीं नाणें बरोबर घ्यावयाचें असेल तर तें पौंडाचेंच घ्यावे. आपल्याबरोबर बरीच रक्कम घ्यावयाची असल्यास एखाद्या बँकेंतर्फे न्यूयार्कच्या एखाद्या बँकेच्या नांवानें हुंडी लिहवून घ्यावी. हिंदुस्थानांतील रुपये आपल्या बरोबर घेऊं नयेंत, कारण, चांदीच्या भावांत नेहमी चढउतार होत असतो. परंतु सोन्याचा भाव साधारणत: सारखाच राहातो. ह्याकरितां इंग्रजी पौंड बरोबर घेणें चांगलें असतें. शिवाय इंग्रजी पौंड जगाच्या कोणत्याहि भागांत गेले तरी चालू शकतात.
युरोप मार्गानें प्रवास करणा-यांनी इटली किंवा फ्रान्सचें नाणें आपलें जवळ फारसें बाळगू नये. एखाद्या देशाच्या बंदरावर जहाज उभे राहिलें व तेथे नाण्याची आवश्यकता भासली तर होतां होईतों मौल्यवान नाणें मोडूं नये. लहान नाणें मोडून काम भागवावें; कारण, ह्या देशांतील नाणी पुढें अमेरिकेंत मुळीच चालत नाहीत. हीच स्थिति जपान व चीनच्या नाण्यांची आहे.
 प्रश्न ३१--अमेरिकेंत वर्ण, जाति वगैरे संबंधीं निर्बंध आहेत काय ?
 उ०--अमेरिकेंत हिंदुस्थानांतल्याप्रमाणें जाति वगैरे नाहीत. रंगाचा मात्र पक्षपात तेथें फार दिसून येतो. पश्चिम भागांतील संस्थानांत मजूर लोक