Jump to content

पांडुरंगाष्टकम्

विकिस्रोत कडून
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतार  ·नारायण
वेदांग
शिक्षा · चंड
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
इतिहास
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत


विठोबाअर्चित आदि शंकराचार्यरचित श्रीपांडुरंगाष्टकम्
महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै ।
समागत्य तिष्टंतमानंदकंदं परब्रंह्मलिंगं भजे पांडुरंगम्‌ ॥ १ ॥

भीमा नदीच्या तीरावर महायोगाचे अधिष्ठान असलेल्या पंढरपूर क्षेत्रात, पुंडलीकास वर देण्याकरता श्रेष्ठ मुनींसह येऊन राहणाऱ्या आनंदकंद परब्रह्मरूप पांडुरंगास मी भजतो. ॥ १ ॥

तडीद्वाससं नीलमेघावभासंरमामंदिरं सुंदरं चित्प्रकाशम्‌ ।
वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादंपरब्रंह्मलिंगं भजे पांडुरंगम्‌ ॥ २ ॥

ज्याची वस्त्रे विद्युल्लतेप्रमाणे पिवळ्या रंगाची आहेत. ज्याची अंगकांती नीलवर्ण मेघाप्रमाणे शोभत आहे, जो लक्ष्मीचे निवासस्थान आहे, जो परम सुंदर चित्प्रकाश आहे, जो सर्वश्रेष्ठ व जणुं काय भक्तांना दर्शन देण्यासाठी विटेवर सारखी पाऊलें ठेवून उभा आहे अशा त्या परब्रह्मरूपी पांडुंरंगाला मी नमस्कार करतो. ॥ २ ॥

प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानांनितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात ।
विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रंह्मलिंगं भजे पांडुरंगम्‌ ॥ ३ ॥

मला अनन्यप्रेमाने शरण येणाऱ्या भक्तांना, "भवसागर हा फक्त कमरेइतकाच खोल आहे. तो सहज पार करता येतो" हे सांगण्याकरता ज्याने कमरेवर हात ठेवलेले आहेत, माझ्या भक्तांसाठी, ब्रहादेवाचा सत्यलोक हा कमरेपासून नाभिस्थान जितके उंच आहे त्यापेक्षा अधिक दूर नाही हे दाखविण्यासाठी ज्याने आपली बोटे नाभिस्थानाकडे वळवली आहेत अशा परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी नमस्कार करतो. ॥ ३ ॥

स्फुरत्कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम्‌ ।
शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालंपरब्रंह्मलिंगं भजे पांडुरंगम्‌ ॥ ४ ॥

आपल्या गळ्यात दैदीप्यमान कौस्तुभमणी धारण केल्याने जो अतिशय शोभायमान आहे, ज्याच्या बाहूंवर केयूर म्हणजे बाजुबंद शोभत आहेत, ज्याच्याजवळ श्री म्हणजे लक्ष्मी निवास करीत आहे, जो लोकांचा पालनकर्ता आहे अशा त्या परमशांत मंगलमय, शिवस्वरुप, सर्वश्रेष्ठ व स्तुति करण्यास योग्य आसलेल्या परब्रह्मरूप पांडुरंगाला मी भक्तिपूर्वक भजतो. ॥ ४ ॥

शरच्चंद्रबिंबाननं चारुहासंलसत्कुंडलक्रान्तगंडस्थलांगम्‌ ।
जपारागबिंबाधरं कंजनेत्रम्‌ परब्रंह्मलिंगं भजे पांडुरंगम्‌ ॥ ५ ॥

शरदऋतूतील चंद्रबिंबाप्रमाणे अत्यन्त रमणीय मुख असलेल्या, ज्याचे मुखावर सुन्दर हास्य विलसत आहे, कानात कुंडले शोभत आहेत, त्या कुंडलांची कांती गालावर झळकते आहे, ज्याचे ओठ जास्वंदीच्या फुलाप्रमाणे आरक्त वर्ण आहेत, नेत्र कमलाप्रमाणें सुंदर आहेत अशा त्या परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी भक्तिपुर्वक भजतो. ॥ ५ ॥

किरिटोज्ज्वलत्सर्वदिक्‌ प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घ्यैः ।
त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रंह्मलिंगं भजे पांडुरंगम्‌ ॥ ६ ॥

ज्याच्या मस्तकावर असलेल्या मुकुटाच्या कांतीने मुखाभोवतालच्या सर्व दिशा उजळून निघाल्यासारख्या वाटतात, दिव्य व अमुल्य रत्नें अर्पण करून देव ज्याची पूजा करतात, बालकृष्णरूपाने जो तीन ठिकाणी (पाय, कंबर, व मान) वाकून उभा आहे, ज्याच्या गळ्यात वनमाला व मस्तकावर मोरपिसांचा तुरा शोभत आहे अशा त्या परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी भक्तिपूर्वक भजतो. ॥ ६ ॥

विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेषं दधानम्‌ ।
गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रंह्मलिंगं भजे पांडुरंगम्‌ ॥ ७ ॥

विभु म्हणजे सर्व विश्व व्यापून राहणाऱ्या, वेणू वाजवीत वृंदावनात फिरणाऱ्या, जो दुरंत आहे ज्याचा कोणालाही अंत लागत नाही, लीलेने गोपवेष धारण केलेल्या, गायींच्या कळपाला आनंद देणाऱ्या, मधुर हास्य करणाऱ्या अशा परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी भक्तिपूर्वक भजतो. ॥७॥

अजं रुक्मिणीप्राणसंजीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्‌ ।
प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रंह्मलिंगं भजे पांडुरंगम्‌ ॥ ८ ॥

ज्याला जन्म नाही असा, रुक्मिणींचा प्राणाधार असलेल्या, भक्तांचा परमविश्रामधाम, शुध्द कैवल्य असलेल्या, जागृति, स्वप्न व सुषुप्ति (अथवा बाल्य, तारूण्य व वार्धक्य) ह्या तिनही अवस्थांच्या पलीकडचा, निरन्तर प्रसन्न,शरणागतांचे दुःख हरण करणारा व देवांचाही देव असलेल्या अशा परब्रह्मरूप पांडुरंगाला मी भक्तिपूर्वक भजतो. ॥ ८ ॥

स्तवं पांडुरंगस्य वै पुण्यदं येपठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यम्‌ ।
भवांभोनिधिं तेऽपि तीर्त्वाऽन्तकालेहरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति ॥ ९ ॥

अत्यंत पुण्यदायक असलेले, पांडुरंगाचे हे स्तोस्त्र जे कोणी एकाग्र चित्ताने प्रेमपूर्वक नित्य पठण करतील ते सर्वजण अंतकाळी भवसागर सहजपणे तरून जातील आणि त्यांना परब्रह्मस्वरूप श्रीहरीच्या-पांडुरंगाच्या शाश्वत स्वरूपाची प्राप्ति होईल. ॥ ९ ॥