हैदराबाद विमोचन आणि विसर्जन/शेवटचा निझाम

विकिस्रोत कडून






१०.
शेवटचा निझाम

 हैदराबाद संस्थानचे शेवटचे राजे व अधिपती मीर उस्मान अलीखाँ हे त्या संस्थानचे सातवे राजे होते. निझाम उस्मान अली श्रीमंती आणि चिक्कूपणा ह्यासाठी सर्वत्र अतिशय प्रसिद्ध आहेत. संस्थानाचे वार्षिक उत्पन्न २५ कोटी रुपये होते. पण त्याखेरीज उस्मान अलीचे खाजगी उत्पन्न निराळे असे दीड कोटी रुपयांचे असे. निझामची खाजगी इस्टेटही दोन अब्ज रुपयांच्या आसपास असे. जगातील अत्यंत श्रीमंत माणूस असा त्यांचा उल्लेख होई. उस्मानअली नानाविध मार्गांनी पैसा सावडीत, एकत्र करीत. पण स्वतः अतिशय साधे राहात. कमालीचा कद्रूपणा ह्याहीसाठी ते प्रसिद्ध होते. आख्यायिकांनी एखाद्याचे व्यक्तिमत्त्व असे काही झाकोळून जाते की त्यामुळे सत्याकडे डोळेझाक होऊ लागते.

 उस्मानअलीकडे कद्रू व श्रीमंत, लहरी व अफूवाज संस्थानिक म्हणून पाहणे धोक्याचे आहे. अत्यंत महत्त्वाकांक्षी, दूरदृष्टीचा, चतुर व पाताळयंत्री मुत्सद्दी म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. निझाम हा जनतेचा शत्रू हे जरी मान्य केले आणि त्याचा विजय हा दीड कोटी प्रजेच्या कायम गुलामीचा ताम्रपट झाला असता हे जरी मान्य केले तरी प्रतिस्पर्ध्याची कुवत व त्यांचा दर्जा आपण विसरू नये. चिवटपणा, सावधपणा, धूर्तता ह्याबाबत उस्मान अली सर्वांना पुरून उरणारे गृहस्थ होते. शस्त्रसामर्थ्यात त्यांचा निभाव लागला नाही म्हणूनच ते पराभूत झाले.

 निझाम उस्मान अली हा मूलतः महत्त्वाकांक्षी माणूस. पहिला निझाम मीर कमरुद्दीन (हा आसफजहा अव्वल म्हणून ओळखला जातो) ज्याप्रमाणे महत्त्वाकांक्षी व सावध तोच प्रकार ह्या सातव्या वारसाचा आहे. मुळात निझाम हे मोगल सम्राटांच्या वतीने दक्षिणेचे सुभेदार, पण मोगल साम्राज्याच्या ऱ्हासाचा फायदा घेऊन त्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केले. मराठ्यांच्या सामर्थ्यासमोर टिकाव लागेना म्हणून इंग्रजांशी सख्य जोडून हे राज्य त्यांनी टिकविले, उस्मान अली ह्याच मार्गाने जात होते. भारत स्वतंत्र होत आहे ह्या प्रसंगी केन्द्रसत्तेत जे शैथिल्य व विस्कळीतपणा येईल त्याचा लाभ घ्यावा आणि पुन्हा एकदा स्वतंत्र राज्य (राष्ट्र) निर्माण करावे हा उस्मान अलीचा प्रयत्न होता. हैदराबादचे स्वतंत्र राष्ट्रात रूपांतर ही उस्मान अलीची प्रबळ व चिवट महत्त्वाकांक्षा होती.

 इ. स. १९११ मध्ये उस्मान अली गादीवर आले. (जन्म १८८५ इ. स.) त्यावेळी अजून भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्रही नव्हता. पण उस्मान अलीच्या डोक्यात मात्र हैदराबादच्या स्वातंत्र्याचा प्रश्न घोळत होता. गादीवर येऊन आपले आसन स्थिर झाले आहे ह्याची खात्री पटताच निझामाने स्वातंत्र्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. हे त्याचे प्रयत्न तीन भिन्न दिशांनी सुरू झाले. ह्या दिशांचा विचार आपण करू लागलो म्हणजे निजाम हे किती दूरचा विचार करीत होते यावर प्रकाश पडतो. शंभर वर्षांपूर्वी वऱ्हाड इंग्रजांना कर्जफेडीसाठी दिलेला होता. वऱ्हाडवर ताबा इंग्रजांचा असला तरी तत्त्वतः तो निझामचा भाग आहे, हे इंग्रजांनी मान्य केलेले होते. निझामाचे म्हणणे असे की कर्ज परत घ्यावे व वऱ्हाड परत करावा. एका बाजूने हा प्रदेश वाढविण्याचा प्रयत्न होता, दुसऱ्या बाजूने आपण इंग्रजांचे मांडलिक नसून त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने करार करणारे आहोत हे दाखविण्याचाही प्रयत्न होता. निजामाने पद्धतशीरपणे प्रयत्न करून आपल्याला हैदराबाद संस्थानात घालण्यात यावे अशी मागणी करणारा व त्यासाठी चळवळ करणारा एक प्रभावी हिंदू नेत्याचा गट वऱ्हाडात अस्तित्वात आणला होता. ह्या धर्मपिसाट जातीय राजेशाही पंखाखाली आम्हाला जाऊ द्या. अशी मागणी करणारा, हिंदूंचा गट अस्तित्वात आणणारा निजाम चतुर व दूरदृष्टीचा नाही असे कोण म्हणेल?

 निजामाचा दुसरा दावा असा की, निजाम आणि इंग्रज यांच्यात जे करारमदार झाले ते सर्व दोन सार्वभौम शक्तींतील करार आहेत. निझामाचे इंग्रजांशी नाते बरोबरीच्या मित्राचे असायला हवे म्हणून त्याला हिज मॅजेस्टी ही उपाधी वापरता आली पाहिजे व अंतर्गत कारभारात पूर्णपणे स्वातंत्र्य असले पाहिजे त्या दृष्टीने व्हाइसरॉयशी निजामाचा पत्रव्यवहार झालेला आहे. (इ.स. १९२६) ह्या स्वातंत्र्याच्या आकांक्षेमुळेच निझाम चेंबर ऑफ प्रिन्सेसचे सभासद कधी झाले नाहीत. (इ.स. १९३८).

 निजामाला ह्या गोष्टीची जाणीव होती की स्वतंत्र राष्ट्र सिद्ध करणे ही सोपी गोष्ट नसून अवघड बाब आहे. त्यासाठी नानाविध प्रकारची पूर्वतयारी करावी लागेल. निझामाने ह्या दृष्टीने नाणेव्यवस्थेपासून आरंभ केला. हैदराबाद संस्थानने स्वतःची नाणी पाडली. नोटा छापल्या. त्यांना भारतीय नाण्यांशी विनिमय दर ठरविला. स्वतःच्या बँका निर्माण केल्या. हैदराबाद बँकेचा पौंडाशी विनिमय दर ठराविक असे. बँक ऑफ लंडनमध्ये ह्या बँकेच्या व्यवहारात पत होती. एका स्वतंत्र राष्ट्राप्रमाणे निझामाने अर्थव्यवस्था आखलेली होती. त्याने स्वतःचे विद्यापीठ निर्माण केले. (इ. स. १९१८) भारतात देशी भाषेतून मेडिकल, इंजिनियरिंग सायन्सचे उच्च शिक्षण देणारे हे एकमेव विद्यापीठ होते. हैदराबादच्या स्वतःच्या पदव्या, नोकऱ्या होत्या. भारतातील I.C.S. प्रमाणे हैदराबाद सिव्हिल सर्व्हिस होती. छोटेसे स्वतःचे लष्कर होते. पगाराचे मानही बरे होते. संस्थानची स्वतःची स्वतंत्र रेल्वे, पोस्ट व तारयंत्रणा होती आणि स्वतंत्र विमान व्यवस्थेचा विचार चालू होता.

 स्वतंत्र राष्ट्र होण्यासाठी निझामाने अजून तीन प्रकारची तयारी केली होती. एकतर त्याने औद्योगिक विकासाच्या दृष्टीने कारखानदारीला आरंभ केला. अनेक धरणे बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्यात निजामसागर धरण हे मोठे धरण होते. साखर कारखाने काढण्याचा उपक्रम केला. कापड गिरण्या काढल्या. कोळशाच्या खाणी सिद्ध केल्या. इतरही औद्योगीकरणाचा अव्याहत प्रयत्न चालू होता. स्वतंत्र राष्ट्राला औद्योगिक समृद्धी आवश्यक आहे ह्याची उस्मान अलीना जाणीव होती. त्यांनी सीनियर केंब्रिज माध्यमाची एक शाळा चालवून केंब्रिज इंग्रजी बोलणाऱ्या मुत्सद्दयांची एक पिढी जन्माला घातली. जागतिक व्यासपीठावर मुत्सद्देगिरी कौशल्याने पार पाडू शकणाऱ्या ह्या पिढीतूनच नबाब अलीयावर जंग यांचा उदय झाला. ह्यासह जगभर सहानुभूती असणारे वर्तुळ निर्माण केले. हैदराबाद एक स्वतंत्र राष्ट्र व्हावे या कल्पनेला अरब राष्ट्र, इराण व पाकिस्तानमध्ये पाठिंबा असला तर नवल नाही, पण इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल येथेही निजामाला फार मोठा पाठिंबा होता. हैदराबाद संस्थानात लहानमोठ्या हिंदू वतनदार जागीरदारांचा असा एक मोठा वर्ग तर निझामाच्या पाठीशी होताच, पण दलित समाजही त्याने आपल्या बाजूने घेतला होता.

 आधुनिक जगात खऱ्या अर्थाने एका माणसाचे राज्य नसते. त्या राज्याला मनापासून पाठिंबा देणारा एक गट हवा असतो. असा गट कायम करण्यासाठी निझामाने इत्तेहादुल मुसलमीन ह्या संघटनेची स्थापना करून घेतली. (इ.स.१९२६) निजामाला हैदराबाद संस्थानात मुस्लिम लीग नको होती. ब्रिटिश इंडिया हे वेगळे राष्ट्र, हैदराबाद हे वेगळे राष्ट्र. तेव्हा या पृथक राष्ट्राला पृथक संघटना हवी ही तर निझामाची दृष्टी होतीच, पण त्याला स्वतःला जीनाचे नेतृत्व स्वीकारणारा अनुयायी व्हायचे नव्हते. त्याला स्वतःच्या इशाऱ्यावर नाचणारी संघटना हवी होती. सोळा लक्ष मुसलमानांना हे आपले राज्य आहे, त्याचे स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रात रूपांतर करणे व हे राष्ट्र जतन करणे आपले कर्तत्व आहे असे स्वप्न निझामाने दिले व ह्या संघटनेमार्फत त्याने सुमारे दीड लक्षाची अनधिकृत फौजही रझाकार या नावाने तयार केली.

 वर जागोजागी इसवी सन दिलेले आहेत. त्यांचा काळजीपूर्वक विचार केला तर हे दिसून येईल की निजामाने स्वतंत्र होण्याची तयारी इ.स. १९४७ च्या आगेमागे केलेली नाही. तो सतत तीस वर्षे स्वातंत्र्याची टप्प्याटप्प्याने तयारी करीत होता. आणि ह्या तयारीसाठी त्याने अक्षरशः कोट्यावधी रुपयांचा खर्च केलेला होता. केवळ कद्रू व कंजूष म्हणून मीर उस्मान अलीखाँचा विचार करणे बरोबर नाही. निजामाच्या डोक्यात मध्ययुगीन स्वप्ने होती. इराणची राजकुमारी दुर्रेशहरवर त्याने आपल्या मुलाला सून म्हणून आणली होती. तुर्कस्तान आणि सौदी अरेबियाच्या राजकुमारिका आपल्या स्नुषा होतील का ह्याचाही प्रयत्न तो करीत होता.

 आपण विस्तवाशी खेळत आहो याची त्याला जाणीव होती. त्या दृष्टीने गरजच पडली व परांगदा व्हावे लागले तर उपयोगी पडावे म्हणून जगभर त्याने पैसा पेरलेला होता. इराणमधील तेलाच्या खाणी, दक्षिण अमेरिकेतील खाणी, स्वित्झर्लंड आणि बँकऑफ लंडनमध्ये ठेवी असा त्याचा भारताबाहेर सुमारे ५० कोटी रुपयांचा व्यवहार होता.

 शेवटची गोष्ट ही की निझामाला दम होता. त्याच्या पूर्वजांचाही गुण शौर्य नव्हता. चिवटपणे टिकून राहणे व प्रतिकूल परिस्थितीत तग धरणे हेच निझामाचे घराणे करीत आले. तेच निझाम करीत होता. त्याच्या धूर्तपणाला अर्थ होता. १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत निझाम भारतात सामील झालाच नाही. वाटाघाटी नंतर सुरू झाल्या. व्यवहारतः सोळा ऑगस्ट हा दिवस असा होता की इंग्रज राज्य संपलेले होते. भारत स्वतंत्र होता. त्यात हैदराबाद नव्हते, म्हणजे हैदराबाद स्वतंत्र राष्ट्रच झाले होते. हैदराबाद भारताशी मैत्री व शांततेने राहू इच्छिते, फक्त भारताने हैदराबादचे स्वातंत्र्य मान्य करावे ही निझामाची मागणी होती.

 निझामाने वाटाघाटी लांबवीत पुढे जैसे थे करार केला. पुन्हा वाटाघाटीचे गुऱ्हाळ सुरू झाले. निझामाला वाटाघाटी लांबतील तितक्या हव्या होत्या. हैदराबाद प्रश्न युनोकडे नेण्याची त्याची तयारी होती. हा घोळ जर असाच काही वर्षे लांबत राहिला असता तर वहिवाटीनेच हैदराबादचे स्वातंत्र्य सिद्ध झाले असते. ह्याचा आरंभ म्हणून युनोत हा प्रश्न नेण्यात निझामाने यशही मिळविले होते.

 हैदराबादचा प्रश्न हा भारताच्या प्रादेशिक अखंडत्वाचाच प्रश्न होता. हैदराबाद जर भारतात विलीन झाले नसते. तर एकात्म भारतही शक्य नव्हता. भाषावार प्रांतरचनाही शक्य नव्हती, भारतीय संविधानच आहे तसे दिसले नसते. हैदराबाद प्रश्न संपल्यावरच संविधानाची चर्चा खरोखरी सुरू झाली. तोवर आराखडाच चालू होता. निझाम हा जनतेच्या स्वातंत्र्याचाही शत्रू होता. भारतीय राष्ट्रवादाचाही शत्रू होता. हिंदू तर त्यांच्या राज्यात गुलाम होतेच, पण मुसलमानही दरिद्री व अशिक्षितच होते. लोककल्याण हा निझामाचा हेतू नव्हता. म्हणून निझाम संपला, निझामी राज्य संपले, भारताच्या नकाशावरसुद्धा हैदराबाद उरले नाही, याचे दुःख मानण्याचे कारण नाही. उलट हैदराबाद संपल्याचा आम्हाला अतोनात आनंद आहे, पण जो शत्रू संपला त्याचे सत्यरूपही आपण समजून घेतले पाहिजे. श्रीमंत पण कद्रू असे हास्यास्पद विदूषकाचे रूप नव्हे, ते पाताळयंत्री धूर्त असुराचे रूप आहे.

***

(प्रकाशन : ‘रुद्रवाणी' जानेवारी १९७७)