हैदराबाद विमोचन आणि विसर्जन/माळरानावरील कवडसे

विकिस्रोत कडून





२.
माळरानावरील कवडसे

 इ. स. १९५२ पर्यंतचा काळ हा स्वप्नाळूपणाचाच काळ म्हटला पाहिजे. या वेळेपर्यंत माझे वयही फारसे नव्हते. वास्तवाचा फारसा विचारही केलेला नव्हता. वास्तवात ज्याला आधार नाही अशा भोळ्या स्वप्नवादाचा काळ माझ्या जीवनात ५२ सालपर्यंत म्हणजे विशीपर्यंत होता. या नंतरच्या काळात मी पुरा पालटून गेलो. याही नंतरच्या काळात मी स्वप्ने पाहिलेलीच आहेत. स्वप्ने पाहण्याचा माझा नांद कधी संपला नाही. आता यापुढे तो कधी संपेल असे वाटतही नाही. पण आता स्वप्ने पाहताना ती स्वप्ने आहेत याचे भानही मला असते आणि वास्तवाचे भानही पुरेसे जागृत असते. खरा स्वप्नाळू माणूस तो की जो स्वप्नाळू असतो पण आपण स्वप्नाळू आहोत याची जाणीव मात्र त्याला नसते. आपल्या स्वप्नांच्यावरील उत्कट प्रेमापोटी स्वप्नांनाच वास्तवता समजण्याची भोळीभाबडी चूक जे करू शकत नाहीत त्यांना स्वप्ने पाहणारे असे आपण फार तर म्हणू. पण स्वप्नाळू म्हणता येणार नाही. माझ्या जीवनातील भाबड्या स्वप्नाळूपणाचा कालखंड विसावं वर्ष संपत असताना संपला.

 १९५२ साल हे माझ्यासाठी प्रचंड यातनांचे आणि भ्रमनिरासाचे वर्ष होते. माझ्या जीवनात इतका दुःखमय काळ पुन्हा कधी आला नाही. इ.स. १९४७ साली मी हैदराबादच्या मुक्ती आंदोलनात सहभागी झालो. त्याचवेळी जून महिन्यात मी मॅट्रीक पास झालो. पोलिस अॅक्शन होईपावेतो ते चौदा महिने गेले त्या १४ महिन्यांत लोकविलक्षण धुंदीत मी वावरत होतो. मरणाची भीती ज्या काळात फारशी कधी वाटलीच नाही असा तो काळ होता. पोलिस अॅक्शन झाल्यानंतर हा धुंदीचा काळ टिकणे शक्य नव्हते. तो ओसरून गेला यात काही नवलही नव्हते. शिक्षणावरून माझे लक्ष उडालेलेच होते. तसा मी नाममात्र विद्यार्थी होतो. अभ्यासाची कोणतीही चिंता न करता परीक्षेला बसत होतो. या परीक्षांच्या मध्ये नापास होण्याचीही फारशी क्षिती नव्हती. तसा मी प्रथमच इ.स. १९४९ साली इन्टरला नापास झालो. पण या नापास होण्याचे थोडेसुद्धा दुःख मला वाटलेले आठवत नाही. आपण नापास होणार याची मला खात्री होती. तसे मी सर्वांना सांगितलेलेही होते. निकाल पाहण्याची उत्सुकता नव्हती. उलट जे पास झाले त्यांनाच आपले काही चुकले की काय अशी लाज वाटावी इतका मी आनंदात होतो, हसत खेळत होतो. माझे सर्व नातेवाईक आणि मित्र मला बुद्धिमानच समजत. त्यामुळे मी नापास झाल्याने त्यांना वाईट वाटे. माझ्या आईवडिलांनाही या माझ्या अपयशाची जबर खंत होती. ज्याला नापास होण्याचा विषाद नव्हता असा मीच होतो.

 इन्टरची परीक्षा पास होणे यात मला काही कठीण होते असे नाही. पण मला परीक्षा पास होण्यात रस उरलेला नव्हता. अभ्यासाचे क्रमिक पुस्तक वाचायचेच नाही असे ठरल्यानंतर परीक्षा नापास होणे कठीण नसते. अनेकजण भरपूर अभ्यास करून नापास होत. नापास होण्यासाठी इतके कष्ट करावे लागतात हे मला मान्य नव्हते. आणि पास व्हायचेच ठरवले तर परीक्षा पास होण्यात काही अवघड आहे असे मला वाटत नव्हते. गणितात शंभरापैकी शंभर गुण मिळवणारा कुशाग्र विद्यार्थी मी नव्हतो. पण ९२ ते ९५ गुण मला गणितात मिळत असत. अशा प्रकारची पर्वपीठिका असणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेची फारशी भीती वाटत नसते तसेच माझेही होते. या नापास होण्यात आपण आयुष्याचा अपव्यय करतो आहोत असेही मला कधी वाटले नाही. पास होण्यात काही अर्थ आहे असेही मी मानले नाही. माझ्या आवडीच्या विषयात-वक्तृत्व स्पर्धेत-बक्षिसे मिळवीत होतो. माझ्या भोवती मित्रांचा एक मोठा गट होता. हे पास होणारे मित्र मला आपला नेता समजत. राजकारणी थोडीफार लुडबूड करणारा मी तरुण होतकरू कार्यकर्ता होतो. अशा त्या अवस्थेत पास-नापास होणे याला माझ्यासाठी कोणतेही महत्त्व नव्हते. बावन्न सालपर्यंत मनाची हीच अवस्था होती.

 या सगळ्या सार्वजनिक जीवनाला एक वैयक्तिक कडाही होती. वयाच्या सतराव्या, अठराव्या वर्षापासून आपली इच्छा असो वा नसो, आपण तरुण होतो आहोत याची जाणीव निर्माण होणे अपरिहार्यच असते. तसा मी लहान वयापासून कथा-कादंबऱ्या वाचीतच होतो. त्यामुळे जिथपर्यन्त शब्दज्ञानाचा संबंध आहे. तिथपर्यंत मी १६-१७ वर्षांचा झालो. यामुळे काही विशेष नवे ज्ञान झाले असे समजण्याचे कारण नाही. स्वामी शिवानंदांची पुस्तके आणि ज्याला अश्लील वाङ्मय म्हणतात असे पुष्कळसे वाङ्मय वयाच्या बाराव्या वर्षीच मी वाचून टाकले होते. पण हे सारे शब्दज्ञान होते. त्या शब्दज्ञानाचे पाठांतर, शृंगार या शब्दाचा अर्थ किंवा वासना या शब्दाचा अर्थ थोडाफार कळू लागला ही अवस्था सतराव्या-अठराव्या वर्षी प्राप्त झाली. मराठवाड्यासारख्या प्रदेशातील संक्रमणावस्थेतील पिढीत मीही होतो. बालविवाह नसावेत, लग्नाच्या वेळी मुलगी किमान चौदा वर्षांची असावी हे मत विलक्षण क्रांतिकारक आणि सुधारकी वाटावे असे वातावरण माझ्या भोवताली होते. माझे वडील त्यामानाने सुधारलेले, त्यांचा कल नव्या विचाराकडे झुकलेला. यामुळे सोळा वर्षांचा झाल्याखेरीज मी माझ्या मुलाचे लग्न करणार नाही असे विचार माझे वडील गंभीरपणे मांडताना मी ऐकलेले होते. यामुळे जेव्हा मी १७-१८ वर्षांचा झालो त्यावेळी आपण आता पुरेसे प्रौढ व तरुण झालो आहोत असे मला वाटू लागले. आणि पाहता पाहता मी एका मुलीच्या प्रेमातही पडलो. आपण फक्त मॅट्रिक पास, त्यानंतरच्या काळात सतत नापास होतो आहोत: आपल्याला नोकरी नाही, आपण बेकार आहोत असे मला मुळी जाणवतच नव्हते. आपण तडफदार पुरोगामी कार्यकर्ते आहोत, तरुण आहोत, तेव्हा प्रेम करण्याचा आपला हक्क आहे, असे निश्चितपणे मला वाटत होते. जिच्यावर आपण प्रेम करतो आहोत तिची आकलनशक्ती किती याचाही पोच मला नव्हता आणि प्रेम करणे म्हणजे नेमके काय हेही मला कळत नव्हते. माझी पत्नी असणारी व्यक्ती त्यावेळी अजून वयात न आलेली केवळ लहान मुलगी होती. तिला काही कळत होते की नाही याचाही पत्ता नव्हता. ही आमची प्रेयसी आणि चोरून भेटण्याचा प्रयत्न करणे, चोरून बोलणे, अगर पत्र लिहिणे हे सगळेच थिल्लरपणाचे प्रकार आहेत, सबब ते वर्ज्य समजावेत असे आमचे या क्षेत्रातील अफाट व्यवहारज्ञान ! न भेटता, न बोलता, पत्र न पाठवता आमचे प्रेम चालू होते. प्रेयसीला ते प्रेम कळाले की नाही आणि तिने ते स्वीकारले की नाही या दोन्ही बाबी गौण समजाव्यात असे मानणारे गडकऱ्यांच्या कवितेत रमणारे असे अव्यवहारी मन मजजवळ होते. न बोलता, न भेटता मी प्रेमात पडलो होतो. या प्रेमाचे रूपांतर लग्नात होईल काय? या  तुच्छ प्रश्नाचा विचार करणे मला आवश्यक वाटत नव्हते. येऊन जाऊन एक प्रश्न समोर होता, तो म्हणजे राजकीय क्रांती झाली पण अजून समाजवाद आलेला नाही तेव्हा आपल्या प्रेयसीला 'माझे तुझ्यावर प्रेम आहे' हे समाजवादी क्रांती होण्याच्या आधी सांगणे योग्य ठरेल की ती क्रांती होईपावेतो वाट पाहणे योग्य ठरेल!

 व्यक्तिगत जीवनात माझे मन एका अल्लड मुलीला देऊन मी बसलो होतो. ती अजून वयात आलेली नव्हती, अजून लुगडे नेसत नव्हती, शाळेत जाताना परकर आणि घरी तर चक्क भावाचे कुडतेच घालून वावरत असे. (याच मुलीने पुढे सर्व सुखदुःखात अपार कष्ट उचलून अत्यंत खंबीरपणे माझा संसार सांभाळला.) या मुलीला आपण काय जिंकले आहे याचा पत्ता असण्याचे कारण नव्हते आणि सार्वजनिक जीवनात माझे मन समाजवाद या कल्पनेला वाहिलेले होते. समाजवादी क्रांतीच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत, चार-दोन वर्षांत तीही होऊन जाईल याची पुरेपूर खात्री मला पटलेली होती. व्यवहाराचा कोणताच पोच नसलेल्या स्वप्नात आम्ही वावरत होतो. त्या स्वप्नातून बावन्न साली बाहेर पडणे हा योग आमच्या वाट्याला येणे अपरिहार्य होते.

 इ.स. १९५२ सालाची निवडणूक ही प्रौढ मतदानावर आधारलेली स्वतंत्र भारतातील पहिलीच निगडणूक. आमच्यासारख्या तरुण मुलांना निवडणूक हे काय प्रकरण असते हे फारसे कळतच नसे. आम्ही ज्यांना आमचे ज्येष्ठ नेते मानत होतो त्यांना तरी निवडणूक म्हणजे काय हे किती प्रमाणात समजत होते याविषयी मला शंकाच आहे. काँग्रेसची लोकप्रियता झपाट्याने घसरत जात आहे आणि आता काँग्रेसपक्ष सावरण्याची शक्यताच नाही असे आम्ही समजत होतो. लोकप्रियता म्हणजे काय? याबावतची आमची समजूत ही भोळीभाबडीच हाती. माझा ओढा समाजवादी पक्षाकडे होता आणि आमच्या नेत्यांच्या व्याख्यानांना जी प्रचंड गर्दी होत असे तो आमच्यासाठी आमच्या पक्षाच्या लोकप्रियतेचा निर्विवाद पुरावा होता. सर्व वर्तमानपत्रे काँग्रेस पक्षाच्या घसरत्या लोकप्रियतेबाबत बोलत होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांना संघटना निर्माणही करता येत नाही, त्यांना संघटना सांभाळताही येत नाही. महात्मा गांधी वारलेले आहेत. अशा अवस्थेत सरदार पटेल किती प्रमाणात संघटना सांभाळू शकतील याची वानवाच आहे, असे आमचे लोक बोलत असत. इ.स. १९५० साल अखेर सरदार पटेल वारले.  सरदारांच्या शोकसभेत मी काय बोललो याची आजही मला स्वच्छपणे आठवण आहे. हैदराबाद संस्थानातील रहिवासी असल्यामुळे सरदारांच्याविषयी माझ्या मनात कृतज्ञता आणि आदरभावना होतीच. सरदार पटेल यांच्याविषयी समाजवाद्यांच्या मनात फारसा राग कधीच नव्हता. सरदार समाजवादी नाहीत. आपण समाजवादी असल्याचा त्यांचा दावा नाही. शिवाय ते जनतेचे लोकप्रिय पुढारी नाहीत. सत्तरी ओलांडलेला हा आजारी वृद्ध कणखर व दृढनिश्चयी आहे. पण तो फार काळ जगणारा नाही. सरदार हे समाजवादाचे खरे शत्रूच नव्हते. पाच-चार वर्षांत ते मरूनही जातील. . समाजवादाला खरा विरोध नेहरूंचा आहे असे आमची मंडळी खाजगीत बोलत.. विशिष्ट दिवशी सरदारांचा मृत्यू होईल असे आम्हालाही माहीत नव्हते. पण ते फार दिवसांचे सोबती नाहीत याची सर्वांनाच जाणीव होती. सरदारांच्या शोकसभेत मी त्यांचे गुणगान केले, आणि समारोप करताना असे मी भाकित वर्तविले की, काँग्रेस संघटना सांभाळणारा आता कुणी जेष्ठ नेता उरलेला नाही. या अप्रिय होत जाणाऱ्या आणि ढासळत जाणाऱ्या संघटनेला फारसे भविष्य नाही. काँग्रेस या देशात स्थिर सरकारही देऊ शकणार नाही, जनतेचे दारिद्र्यही दूर करू शकणार नाही. गोरगरीब जनता आपले दारिद्र्य सहन करून काँग्रेसला मते देईल याची शक्यता फार कमी आहे. म्हणून भारतात लोकशाही टिकली तर काँग्रेसला भविष्य नाही.

 खाजगीत आम्ही त्या काळी नेहरूंचा चेंग कै शेक होणार याबाबत निःशंक होतो. खाजगी बैठकीत आम्ही असे म्हणतच असू की ध्येयवादाच्या प्रेमापोटी जर नेहरूंनी लोकशाही टिकविण्याचा अट्टाहास धरला तर लोकच काँग्रेसचा पराभव करतील. आणि सत्तेत टिकून राहण्यासाठी जर नेहरूंनी लोकशाही गुंडाळली तर मग आम्ही सशस्त्र क्रांतीला मोकळे आहोत. त्यानंतर नेहरूचे भवितव्य चेंंग कै शेकपेशा निराळे असणार नाही. आम्हाला कोणत्याच बाबतीत वास्तववादाचे भान कसे नव्हते हा मुद्दा स्पष्ट होण्यासाठी ही माहिती पुरेशी ठरते. १९५१ साल मध्यावर आले आणि निवडणुकीचे नगारे वाजू लागले. त्यावेळी आम्ही अजून भ्रमातच होतो.

 ५२ सालच्या निवडणुकीत भारतात दोन प्रमुख पक्ष निवडून येतील. या दोन प्रमुख पक्षांपैकी एक समाजवादी पक्ष असेल असे अशोक मेहतांनी जाहीर रीतीने सांगितलेले होते. त्यावेळी मी हैदराबाद शहरातील सर्वात बुद्धिमान मानल्या गेले तरुण समाजवादी कार्यकर्त्याला मुद्दाम भेटण्यास गेलो. आपण कुठून उभे राहणार या कार्यकर्त्याने आधीच जाहीर केलेले असल्यामुळे त्या मतदारसंघात उभे राहण्यास काँग्रेसचा कुणी कार्यकर्ता तयारच नाही असे आमच्या गोटात सार्वत्रिक मत. या कार्यकर्त्याला मी जाऊन भेटलो आणि हैदराबाद संस्थानमधील निवडणुकांची मी त्यांच्याशी चर्चा केली. आमचे नेते अतिशयोक्ती न करता अतिशय मोजके अनुमान करण्याबद्दल प्रसिद्ध होते. त्यांनी मला सांगितले लोकसभेत या निवडणुकीत आपल्या पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता अजिबात नाही. कमीत कमी दीडशे आणि जास्तीत जास्त पावणेदोनशे जागा मिळतील. केंद्रीय शासन निवडणुकीच्या मार्गाने जर आपल्या हाती यायचे असेल तर ५-१० वर्षे वाट पाहणे आवश्यक आहे. काँग्रेसने इंग्रज राजवटीच्या विरूद्ध वर्षानुवर्षे वाट पाहिली. आपण स्वतंत्रपणे पक्ष म्हणून अस्तित्वात येऊन अजून पाच वर्षे झालेली नाहीत. तेव्हा आपण वाट पाहणे शिकले पाहिजे. अशोक मेहता जेव्हा दोन पक्षांपैकी आपला पक्ष एक राहील म्हणतात त्यावेळी आपण क्रमांक दोनचा पक्ष राहू असा त्याचा अर्थ असतो. या नेत्यांनी मला सांगितले हैदराबाद संस्थानात आपला पक्ष फार दुर्बळ आहे. तेव्हा ४० पेक्षा जास्त जागा या प्रांतात आपल्याला मिळणार नाहीत. भारताच्या तीन प्रांतात आपली सरकारे येतील. तीन प्रांतांत फार थोड्या फरकाने आपले बहुमत जाईल. उरलेल्या प्रांतात आपण प्रमुख विरोधी पक्ष असू.

 ही सगळी मीमांसा आमच्या समोर असणाऱ्या अत्यंत मान्यवर तरुण नेत्यांची. कधीकाळी समाजवादी सरकार अस्तित्वात आले तर हा आमचा तरुण नेता त्या सरकारात अर्थ आणि नियोजन ही दोन्ही खाती सांभाळणारा मंत्री असणार. यावावत आम्हा पोरासोरांना खात्री होती. आज हे लक्षात येते की ज्यांना मी जेष्ठ नेते समजत होतो तेही अधांतरी हवेतच तरंगत होते. पण त्यावेळी मात्र असे वाटे की हा आमचा नेता अतिशय अचूक भविष्यवेध घेणारा, अतिशय मार्मिक विवेचन करणारा आहे.

 ५२ सालच्या निवडणुकीत माझे मन चमत्कारिकपणे द्विधा झालेले होते. सर्व भारतभर समाजवादी पक्ष निवडून यावा असे मला जरूर वाटत होते. पण हैदराबाद संस्थानात मात्र हैदराबाद मुक्ती आंदोलनातील काही ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाच्या वतीने उभे होते. या ज्येष्ठ नेत्यांच्याविषयी मला प्रेम आणि आदर असे. ते पडावेत असे मला वाटत नव्हते. आमच्या मुक्ती आंदोलनातील आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मुख्य संच 'जनता लोकशाही आघाडी' या नावाने मराठवाड्यात निवडणुका लढवीत होता. त्याचे ज्येष्ठ नेते मला बोलताना म्हणाले, ४२ पैकी आम्ही फक्त २७ जागांच्यापैकी क्वचितच एखादी जागा पडेल. पण निवडणूक म्हणजे जुगार. त्यामुळे आमची किमान वीस माणसे निवडून येतील असे आम्ही मानतो. हे जे २७ जण उभे होते त्यांच्याविषयी तर माझ्या मनात इतके गाढ प्रेम होते की ती सगळीच माणसे निवडून यावीत असे मला वाटत असे. सर्व भारतभर समाजवादी पक्ष निवडून यावा. हैदराबादेत मात्र स्वातंत्र्य लढ्यातील कार्यकर्ते - मग ते कोणत्याही पक्षातील असोत, निवडून यावेत हे वाटणे मुळातच चुकीचे आहे. हे काही त्यावेळेला मला जाणवले नाही.

 हैदराबाद संस्थानात ही पहिली निवडणूक म्हणजे एक चमत्कारिकच बाब होती. पुष्कळ वेळेला निवडणुकीला उभे राहिलेल्या प्रतिस्पर्धी उमदेवाराचा प्रचार करण्यासाठी विरोधी पक्षातील आपला लाडका नेता येतो आहे. म्हणून एक उमेदवार दुसऱ्या उमेदवाराची सभा सुद्धा जातीने हजर राहून निर्विघ्नपणे पार पडावी याची काळजी घेत असे. गोविंदभाई श्रॉफांच्याबाबत तर हे नेहमीच घडे. ते काँग्रेसविरोधी प्रचार करण्याच्या दौऱ्यावर असत आणि पुष्कळदा काँग्रेसचाच उमेदवार त्यांचे जेवणखाण आपल्या घरी आग्रहाने करी, त्यांच्या सभेची व्यवस्था करी. काही लोकप्रिय इतर उमेदवारांच्या बाबतीतसुद्धा असा प्रकार घडलेला मधून मधून दिसत असे. मी स्वतः अशा सभा पाहिलेल्या आहेत की, जिथे एकाच सभेत विधानसभेचे दोन परस्परविरोधी उमेदवार येऊन बोलले. ही निवडणूक जसजशी रंगात आली तसतसा माझा भ्रमनिरास होऊ लागला.

 पहिली गोष्ट म्हणजे दोन आदरणीय नेते जाहीर सभेत परस्परांच्या उखाळ्या पाखाळ्या काढताना आणि खाजगी बैठकीत एकमेकांच्या विषयी अत्यंत तुच्छतेने बोलताना मी प्रथमच पाहात होतो. ही नेते मंडळी आपल्या वैयक्तिक जीवनात गरजेनुसार लबाड्या करणारी क्षुद्र माणसेच आहेत हे पाहिले म्हणजे प्रचंड दुःख वाटत असे. जाहीर सभेत बोलल्या जाणाऱ्या अनेक बाबी आणि खाजगी बैठकीत होणाऱ्या चर्चा यांचा परस्परांशी काही ताळमेळच नसे. एकाच पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा एकमेकांशी ज्या दुष्टाव्याने वागत ती बाब पाहताना अतिशय वेदना होत असत. लढ्यांच्या काळात सर्व उदात्तपणा उसळून वर आलेला मी पाहिलेला आहे. ती भव्यता, दिव्यता हेच या व्यक्तीचे स्वाभाविक रूप आहे असे मी उगीचच गृहीत धरून चाललो. भव्य, दिव्य घटना घडत असतात. ज्या व्यक्ती सर्वार्थाने उजळलेल्या दिसल्या त्या व्यक्ती खरोखरी फार सामान्य आणि क्षुद्र आहेत हे या निवडणुकीत अतिशय दुःखाने जाणून घेणे मला भाग पडले. याला अपवाद नव्हते असं नाही. काही माणसे खरोखर उदात्तच होती. उरलेली माणसे सर्वांच्या सारखी. स्वप्नात आम्ही होतो. माणसे माणसासारखी वागत होती हा दोष त्यांचा नव्हताच, आमचा होता.

 काही मतदार संघात राजकीय पक्ष अतिशय बेजबाबदारपणे वागे. एका मतदार संघात आमच्या पक्षाचा उमेदवार उभा होता. मी त्याला विचारले, “या मतदार संघात आपल्या पक्षाचे सभासद किती?" तो म्हणाला, “माझ्या गावात शंभर आहेत उरलेल्या मतदार संघात सभासद नोंदणी नाही". मी विचारले, “ज्या मतदार संघात आपले कार्य नाही, कार्यकर्ते नाहीत तिथे निवडणूक लढवायची कशाला? ही हमखास पडणारी जागा नाही काय?" आमचा विधानसभेचा उमेदवार म्हणाला, “लोकांना लाज असेल तर ते मला मते देतील. शेवटी बहुसंख्यांक मतदार गरीब असतात. ते माझ्याशिवाय इतर कुणाला मत देणार?" अजून एका मतदारसंघात आमच्या पक्षाच्या वतीने जुना रझाकार नेताच उभा होता. मी ज्येष्ठ मंडळींना विचारले, “याला तुम्ही तिकीट कसे दिले?" ज्येष्ठांचे म्हणणे असे पडले की, “निवडणुका जिंकण्यासाठी असे डावपेच आवश्यकच असतात. मी उदाहरणं समाजवाद्यांचीच देतो आहे कारण तो मी माझा पक्ष मानतो. इतर पक्षांच्या वतीने सर्रास गणंग, गुंड आणि भ्रष्ट लोक उभे राहिलेले दिसत होते. पण त्याचे फारसे वाईट वाटत नव्हते कारण ते पक्षच भ्रष्ट मंडळींचे आहेत, असे आम्ही समजत होतो. प्रत्यक्षात निवडणुकीच्या निकालांचे चित्र आम्हाला अगदी अनपेक्षित होते.

 मराठवाड्यातून हैदराबाद मुक्ती आंदोलनातील सर्व तरुण तडफदार आणि जिद्दीचे कार्यकर्ते व यशस्वी क्रांतिवीर ज्या जनता आघाडीच्या वतीने उभे होते तिची सर्व माणसे पडली. गोविंदभाईंच्या नेतृत्वाखाली असणारे २७ जण गोविंदभाईसह पडले. यांतील निम्म्याहून अधिक मंडळींची अनामत रक्कम जप्त झाली. समाजवादी पक्ष सर्व देशभर मोठ्या प्रमाणात पडला. त्यांचे लोकसभेत २५ खासदारसुद्धा निवडून आले नाहीत. वर हैदराबादेतील ज्या तरुण नेत्यांचा उल्लेख आलेला आहे, त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. हैदराबाद संस्थानात समाजवाद्यांचे कसेबसे दहा लोक निवडून आले. यात सर्व मोठे नेते पडले.

 इ.स. १९५२ सालच्या मार्चमध्ये जेव्हा मी आलो त्यावेळी मला हे प्रथम लक्षात आले की काँग्रेस प्रचंड प्रमाणात निवडून आली आहे. ती पाच वर्षे काँग्रेसचे राज्य राहणारच. पण पाच वर्षानंतरसुद्धा काँग्रेसचा पाडाव करणे कठीण आहे. समाजवादी पक्षाचा सर्व देशभर नुसता पाडाव झालेला नाही; त्यांची मानसिक शक्तीच इतकी खच्ची झालेली आहे की यापुढे नजिकच्या भविष्यकाळात काँग्रेसला प्रतिस्पर्धी संघटना म्हणून पक्ष उभा राहण्याची शक्यता नाही. लोकशाही मार्गाने आपल्या देशात समाजवादाचा विजय हाईल हे तर फार दूर आहे. पण सशस्त्र क्रांतीचा उठाव करण्याची शक्तीसुद्धा कुठे शिल्लक नाही. गोरगरीब जनता प्रतिष्ठित आणि श्रीमंत यांच्याविरुद्ध गरिबांच्या पक्षाला मतदान करीत नसते. धर्म, जाती, अंधश्रद्धा, पैसा यांचा वापर करून , समाजातील प्रस्थापितांचे वर्ग जितक्या सहजतेने निवडणुका जिंकतात तितके समाजवाद्यांना निवडणुकीत विजयी होणे सोपे नसते. भारताच्या ग्रामीण भागात जमीनदार आणि संस्थाने पुरेशी प्रभावी आहेत हे तर खरेच आहे. पण प्रमुख शहरांतही कामगारांच्या पक्षांना निवडणुका जिंकणे फारसे जमलेले नाही.

 क्रांती लोकशाही मार्गाने की हुकूमशाही मार्गाने हा प्रश्नच गौण आहे. कोणत्याच मार्गाने क्रांती होण्यासाठी अजून पूर्वतयारीच झालेली नाही. हे मला जाणवू लागले, तिथून क्रमाने माझा स्वप्नाळूपणा संपत आला व राजकारणाच्या डोळस, वास्तववादी अभ्यासाला आरंभ झाला. एकाएकी मला जाणवले की शिक्षणाची गाडी पूर्णपणे हुकलेली आहे. अनेकदा नापास झालेला, पास होण्याची शक्यता नसलेला बेकार तरुण आपण. पदवी नाही, ती मिळवण्याची शक्यता नाही. नोकरीही नाही. राजकारणात तर आपण पराभूत आहोतच. पण व्यक्तिगत जीवनातसुद्धा आपण पराभूत. एखाद्या मुलीच्या आयुष्याचा नाश करण्याचा आपल्याला हक्क नाही. खरे म्हणजे कुणावर प्रेम करण्याच्या लायकीचेच नाही. आपले सगळेच आयुष्य वाया गेले. प्रचंड निराशा, वैफल्य आणि व्यर्थपणा याची उत्कट जाणीव यावेळी मला सर्वप्रथम झाली. ५२ सालचे सगळे वर्ष असे निराशेने, काळोखाने व्यापलेले गेले.

 यानंतरच्या काळात मी निराशेतून बाहेरही पडलो. पदवीही मिळवली. उशिरा का होईना प्राध्यापक झालो. हे सगळे खरे असले तरी ५२ साली मी जे नैराश्य भोगले ते त्यामुळे खोटे ठरत नाही. या नंतरच्या काळात फारसे खोटे भ्रम माझ्या मनात कधीच निर्माण झाले नाहीत. आज बावन्न सालची निराशा मला पुन्हा पुन्हा एक आठवण म्हणून जाणवते आहे. ज्या पद्धतीने जनता पक्षाचा विजय झाला, आणि ज्या पद्धतीने जनता पक्षाच्या ठिकऱ्या उडाल्या ते सगळे मी पाहतोच आहे. पण बावन्न सालचा भ्रम आणि भ्रमनिरास आज नाही. स्वप्नाळूपणाची धुंदी आणि स्वप्नभंगाच्या व्यथा या दोन्हीही पासून दूर असलेल्या माझ्या मनाला आज पुनः पुन्हा इ.स. १९५२ सालचा मार्च आठवतोय. आपण वेडे त्यावेळी होतो की आज आहो, अगर नेहमीच आपण असे वेडे राहत आलो; व्यवहार आपल्याला कधी कळलाच नाही असे समजावे की आता आपण पुरेसे शहाणे झालेले आहोत असे समजावे, हे मात्र मला आजही ठरवता येत नाही.

***

(प्रसिद्धी : नागपूर पत्रिका, दिवाळी १९७९)