हैदराबाद विमोचन आणि विसर्जन/मलपृष्ठ

विकिस्रोत कडून

  हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामाचा तो काळ म्हणजे आमच्या जीवनातील चैतन्यमय क्रांतीपर्व होते. आमची संपूर्ण पिढी त्या लढ्याने भारावलेली होती. कितीतरी स्वातंत्र्यसैनिक आहेत, त्यांच्या कार्याची, धाडसाची आठवण झाली तरी संपूर्ण मुक्तिलढ्याचा चित्रपटच जणू नजरेसमोर तरळून जातो. यावर्षाच्या १७ सप्टेंबरला हैदराबाद मुक्तिलढ्याचा सुवर्णमहोत्सव सुरू होत आहे. त्यानिमित्त औरंगाबादच्या रजत प्रकाशनच्या सौ. अनिता अ. कुमठेकर ह्यांनी कै. प्रा. नरहर कुरुंदकर यांचा "हैदराबाद विमोचन आणि विसर्जन" हा ग्रंथ पुनःप्रकाशित करून औचित्य साधले आहे. त्यांच्या या कार्याला, योजनेला शुभेच्छा देतांना मला आनंद होत आहे.

 कै. नरहर कुरूंदकरांबद्दल काय सांगणार? सांगावे तेवढे कमीच आहे. "हैदराबाद : विमोचन आणि विसर्जन" हा त्यांच्या भाषणांचा संग्रह म्हणजे कुरूंदकरांच्या वाक्चातुर्याचा आणि चिकित्सक दृष्टीचा परिपाक आहे. कुरूंदकरांच्या मृत्यूनंतर १९८५ साली हा संग्रह प्रथम हैदराबादच्या श्री. द. पं. जोशी यांनी संपादित करून प्रकाशित केला. तोच संग्रह रजत प्रकाशनने जसाच्या तसा पुन्हा प्रकाशित केला आहे.

 हैदराबाद मुक्तिलढ्यावर गेल्या वीस-पंचेवीस वर्षात विपुल लेखन झालेले आहे. या ग्रंथात कुरूंदकरांनी व्यक्त केलेल्या मताशी अन्य लेखक, विचारवंत सहमत होतीलच, असे सांगता येत नसले तरी त्यामुळे कुरूंदकरांनी व्यक्तविलेले मत गैरलागू होईल, असे म्हणता येणार नाही. नवनवीन मतप्रवाह, विचार पुढे येत असले तरी जुन्याचे महत्त्व घटत नसते, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. कुरुंदकरांसारख्या विचारवंताने त्याकाळी मांडलेला विचार जशाच्या तसा वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न प्रकाशिकेने केला आहे आणि कुरूंदकरांबद्दलच्या आदरभावना व्यक्त केल्या आहेत. तसेच वाचकांसाठी कुरूंदकरांच्या दृष्टीकोनातून मुक्तिलढ्याचा अर्थ उलगडून दाखविला आहे, म्हणून त्यांना शुभेच्छा देतो व भावी काळासाठी सुयश चिंतितो.