हैदराबाद विमोचन आणि विसर्जन/नांदेडचे झेंडा प्रकरण

विकिस्रोत कडून






८.
नांदेडचे झेंडा प्रकरण -
रझाकार नेत्याचा तिरंग्याला प्रणाम

 नांदेड जिल्ह्यातील स्टेट काँग्रेसची चळवळ आधीच जास्त वळकट अशी होती. गोविंदराव पानसरे ह्यांच्या बलिदानानंतर तर वातावरण तापलेले असेच होते. जीवनमरणाचा निर्णायक लढा जवळ येत आहे आणि हा लढा केवळ निःशस्त्र राहणार नाही ह्याची तीव्र जाणीव नांदेडच्या कार्यकर्त्यांना फार आधीपासून होती. जणू उपजतच होती असे म्हणायला हरकत नाही. लढ्याला आरंभ झाला तेव्हा नांदेडचा गट अगदीच निःशस्त्र नव्हता. पण शस्त्रांच्यापेक्षा हिंमत हाच खरा आधार सर्वांना होता. ज्येष्ठ पिढीत शामराव बोधनकर. भगवानराव गांजवे, गोपाळशास्त्री देव आणि तरुण मंडळीत अनंत भालेराव, नागनाथ परांजपे, रघुनाथ रांजणीकर, जीवनराव बोधनकर असा कडव्या कार्यकर्त्यांचा व अमर्याद मनोधैर्याचा गट नांदेडला होता. ह्या सर्वांच्या जिद्दीतूनच नांदेडचे प्रसिद्ध झेंडा प्रकरण निर्माण झाले.

 ७ ऑगस्ट १९४७ ला स्टेट काँग्रेसचा लढा सुरू झाला; 'भारतात बिनशर्त सामील व्हा' ही लढ्याची प्रमुख घोषणा होती. ह्यानंतर बरोबर एक आठवड्याने म्हणजे भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी झेंडा प्रकरणाला आरंभ झाला. सराफ्यातील शामराव बोधनकरांच्या तीन मजली इमारतीत वरच्या मजल्यावर काँग्रेसचे ऑफिस होते. भर सडकेवर असणाऱ्या ह्या ऑफिसवर स्वातंत्र्यदिनी भारताचा राष्ट्रध्वज लावावा आणि तो प्रयत्नपूर्वक जतन करावा असा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला. हा निर्णय घेणे सोपे मुळीच नव्हते. राष्ट्रध्वज लावताच वातावरण तप्त होणार याची जाणीव होती. प्रचंड दंगल होण्याचा संभव दिसत होता. जाळपोळ, लुटालूट, अत्याचार असे अनन्वित प्रकार सुरू होतील हेही दिसत होते. विरोधी शक्ती म्हणजे पोलिस, रझाकार, गावातील अरब, रोहिले व पठाण ह्यांची शक्ती एवढी मोठी होती की, लढ्याला नामशेष व्हावे लागेल ह्याची सर्वांनाच जाणीव होती. तरीही ध्वज उभारायचाच असे ठरले.

 जिल्ह्याचे सेक्रेटरी गांजवे होते. त्यांनी १५ ऑगस्टला सकाळीच काँग्रेस ऑफिसवर राष्ट्रध्वज फडकावला. भगवानराव गांजवे हे सौजन्य व कणखरपणा यांचे एक नमुनेदार उदाहरण. त्यांनी काँग्रेस ऑफिसवर ध्वज लावला. ऑफिसला कुलूप लावले व स्वतःजवळ किल्ल्या ठेवल्या. निःशस्त्रपणे अत्याचारी नेतृत्वाला सामोरे जाणे व सर्वांसमोर उभे राहणे हा त्यांचा योग होता. उरलेले कार्यकर्ते वेळ आलीच तर सर्व होळी विभाग आक्रमणाविरुद्ध कसा लढवायचा या योजनेची सिद्धता ठेवण्यात गुंतले होते. शामराव बोधनकरांचे राहते घर हे कार्यकर्त्यांचे ठाणे होते.

 सकाळपासूनच हा ध्वज डौलाने फडकत होता. पुढे काय होणार याची चर्चा हिंदू मंडळी गटागटाने करीत होती. मुसलमानांच्या सशस्त्र टोळ्या धमक्या देत दहशत निर्माण करीत गावातून हिंडत होत्या. ध्वज काढून टाका, याचे परिणाम फार गंभीर होतील असे परस्पर निरोप येणे चालूच होते. हिंदूमधील ज्येष्ठ मंडळींना हे आततायी वर्तन नापसंत होते. त्यांच्याकडूनही सूचना येत होत्या. गांजवे यांचे दैनंदिन काम शांतपणे चालू होते. सर्वांना ते हसून शांतपणे सांगत, पोलिस काय म्हणतात ते पाहू नंतर सर्वानुमते निर्णय घेऊ. माझा हट्ट नाही. आमचे सगळे लोक म्हणाले ध्वज काढा तर काढू. ज्या सगळ्या लोकांचा गांजवे हवाला देत ती माणसे रस्त्यावरून हिंडत नव्हती. एखादा लोकांना भेटला तर गांजवे सेक्रेटरी आहेत, त्यांना विचारा, असे सांगत असे. आमचे काही म्हणणे नाही. म्हणणे व हट्ट तर कुणाचाच नाही, झेंडा तर निघत नाही हे पाहून शेवटी मुस्लिम नेत्यांनी पोलिसांना हस्तक्षेप करण्याची सूचना दिली.

 दुपारी चार वाजता सुमारे पन्नास पोलिस एक इन्स्पेक्टर यांच्यासह डी.वाय.एस.पी. नरसिंग प्रसाद घटनास्थळी हजर झाले. गांजवे यांचा शोध घेतला. ते स्वतःच्या घरी होते. तेथून त्यांना बोलाविण्यात आले. त्यांना पोलिसांनी विचारले, हा झेंडा कुणी लावला? गांजवे एखादी सामान्य गोष्ट सांगावी तसे म्हणाले - मी लावला. संतप्त होऊन इन्स्पेक्टरने विचारले, हा परदेशी झेंडा लावण्याचे परिणाम काय होतील याची कल्पना आहे काय? जेलमध्ये जावे लागेल.

 गांजवे यांनी अतिशय शांतपणे सांगितले की, ध्वज परदेशी नाही. आपल्या राष्ट्राचा ध्वज आहे. पोलिस म्हणाले, तुम्ही देशद्रोही आहात. हैदराबाद हे स्वतंत्र राष्ट्र आहे. हा हिंदुस्थानचा भाग नव्हे. गांजवे म्हणाले, आम्ही तर हैदराबाद भारताचा अविभाज्य भाग मानतो. ह्यानंतर शिवीगाळ, धमक्यांना आरंभ झाला. काही जण समजूत घालू लागले. समजूत घालण्यासाठी डी.वाय.एस.पी. नरसिंग प्रसाद यांनी बाजूला नेऊन गांजवे यांना सांगितले, भारतीय ध्वज लावणे हा गुन्हा असल्याच्या आज्ञा आमच्याकडे नाहीत. यामुळे आम्ही कायद्याप्रमाणे तुम्हाला ध्वज काढण्याची आज्ञा देऊ शकणार नाही, पण एकूण विचार करता तुम्ही ध्वज काढावा हे बरे.

 गांजवे यांचे म्हणणे असे की, ध्वज काँग्रेस ऑफिसवर आहे. काँग्रेसच्या आज्ञेनुसार लावलेला आहे. त्यामुळे आमच्या अध्यक्षांच्या आज्ञेशिवाय आम्ही ध्वज काढू शकत नाही. तुम्ही वाटल्यास मला अटक करा. मी जेलमध्ये बसण्यास तयार आहे. बरे, ध्वज काढायचा असेल तर उपाय सोपा आहे. ह्या किल्ल्या घ्या. वर जाऊन ऑफिस उघडा, ध्वज काढा, जप्त करा. रीतसर पंचनामा करा. किल्ल्या मला परत करा. माझी काहीच तक्रार नाही. मी मात्र ध्वज काढणार नाही. गांजवे जो उपाय सांंगत होते तो सर्वांत कठीण होता, समोरून त्या इमारतीत जाण्याची एक चिंचोळी वाट होती. तिच्या पायरीवर पाय ठेवताच आतून गोळीबार झाला असता. घराकडे मागून जाण्याचे सर्व रस्ते रोखण्यात आले होते. ते प्रतिकाराविना मोकळे होणार नव्हते. शे-दीडशे माणसे मरू द्यावी एवढ्याची तयारी, त्याच्या परिणामाची तयारी ठेवल्याशिवाय पोलिसांना त्या इमारतीत जाणे शक्य नव्हते. शासनाच्या आज्ञा आटोकाट प्रयत्न करून शांतता टिकवा अशा होत्या. नांदेडला त्या क्षणी भीषण दंगल शासनाला नको होती. रात्री आठपर्यंत विविध प्रकारचे इलाज वापरून संपले. शेवटी उद्या वाईट पारणाम भोगावे लागतील असे सांगून पोलिस परतले. ध्वज मात्र तसाच होता.

 दुसऱ्या दिवशी सकाळपासून ध्वज काढण्याविषयी नानाप्रकारचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले. हिंदूंना गांजवे सांगत, सर्वांचा विचार घेऊन ठरवतो. माझा काही हट्ट नाही. मुसलमानाना सांगून पोलिसांनी ध्वज जप्त करावा, माझी हरकत नाही. ध्वज मात्र डौलाने फडकत होता. सतरा तारखेला मुसलमानांची ईद आली. अठरा तारखेला त्यांची मिरवणूक होती. अठरा तारखेला मुसलमानांनी आणि रजाकारांनी शासनाला अल्टिमेटम दिले, ध्वजाखालून मिरवणूक जाणार नाही, ध्वज निघाला पाहिजे. नाही तर गावात जाळपोळ होईल, रक्तपात होईल. त्या इमारतीसमोर मिरवणूक चार वाजता येईल. तोपर्यंत ध्वज निघाला नाही तर सराफा लुटण्यापासून दंगलींना आरंभ होईल. आणि ताबडतोब सारे नांदेड भयग्रस्त झाले. आज मरण आहे याची जाणीव एकदम सर्वांना झाली. नित्याप्रमाणे सडकेवरून निःशस्त्र गांजवे नम्रपणे चर्चा करीत हिंडत होते. त्यांच्या बोलण्यातला संथपणा व चेहऱ्यावरचे हसू कायम होते. दंगलींना आरंभ झाला तर समोर पहिला बळी गांजवेच होते. त्यानंतर उभयपक्षी युद्ध सुरू झाले असते. या दिवशी हिंदूंना दुकाने उघडण्याची हिंमत नव्हती. सडकेवरून हिंडण्याची भीती वाटे.

 सकाळपासून गांजवे यांच्याकडे शिष्टमंडळे येण्यास आरंभ झाला. प्रथम रावसाहेब मुळावेकरांच्या नेतृत्वाखाली वकिलांचे शिष्टमंडळ आले. होळीवरील शंभरसव्वाशे घरे प्रतिकाराचा प्रयत्न करतील पण उरलेल्या नांदेड शहराचा बचाव कोण करील? आपल्या हट्टापायी गावाची राखरांगोळी करू नका, अशी त्यांनी मागणी केली. गांजवे यांनी नम्रपणे सांगितले की, आम्ही तर तळहातावर शिरच घेतलेले आहे. आता जगाचे काय होईल या चिंतेचे ओझे आमच्यावर नको. आम्हाला शूरासारखे मरू द्या, पाय मागे ओढू नका. नंतर काही तासांनी श्री.संधी यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ आले. आमचे सर्वस्व लुटले जाईल, आमचे रक्षण करा, अशी विनंती त्यांनी केली. व्यापाऱ्यांना गांजवे यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा ध्वज स्वातंत्र्य मिळेपर्यंत हजारोंच्या रक्ताने रंगला आहे. अजून थोडेसे रक्त खर्ची पडले तर मी पर्वा करणार नाही. नंतर नांदेडचे कलेक्टर शहाबुद्दीन आले. ते म्हणाले. गुंडांच्या हाती गाव देऊ नका, तुमच्यासमोर पदर पसरतो. मला शांततेची भीक वाढा. कलेक्टर खरोखरच पदर पसरून उभे राहिले. क्षणभर गांजवे यांचे मनही विचलित झाले.

 दुसऱ्या क्षणी गांजवे भानावर आले. हा प्रश्न एकट्याचा नव्हता. सर्वांचे नेते म्हणून गांजवे चर्चेला समोर होते, पण मागे शेकडो कार्यकर्ते तळहातात प्राण घेऊन उभे होते. बायका, मुले, जायदाद, अब्रु पणाला लावलेल्या ह्या शूर कार्यकर्त्यांनी जागूनच दोन दिवस काढले होते. राष्ट्रध्वजाच्या प्रतिष्ठेसाठी सर्वस्व पणाला लावलेल्या आप्तांचा घात करणे गांजवे ह्यांना शक्य नव्हते. कारण आता माघार म्हणजे पुढच्या सर्व कार्याचा नाश होता. गांजवे शांतपणे म्हणाले, कलेक्टरसाहेब मी काय करू? माझ्या हाती काही नाही. आपण पोलिसांकरवी ध्वज उतरवा, मी किल्ल्या तुमच्याजवळ देतो. शांततेचा भंग होऊ नये. गाव गुंडांच्या हाती जाऊ नये या व्यवस्थेची जबाबदारी माझी नाही. आपण योग्य ती व्यवस्था करा. शेवटी कलेक्टर परत गेले. शामराव बोधनकरांच्या घरी गांजवे आले. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली व विचारले, काय करावे? कार्यकर्ते म्हणाले, आपण प्रतिकार करीत मरू पण आता माघार नाही. चर्चा चालू असताना इत्तेहादुल मुसलमीनचे जिल्हाध्यक्ष, रझाकारप्रमुख, आमदार अखलाक हुसेन धैर्याने एकटेच बोधनकरांच्या घरी आले. ते गांजवे यांना म्हणाले, मी तुमच्या भेटीसाठी रझाकारांचा नेता म्हणून आलेलो नाही, मित्र म्हणून आलेलो आहे. आमचे लोक गुंड आहेत. ते जाळपोळीसाठी संधी पाहात आहेत. मला शांतता हवी आहे. मला साह्य करा. आपण ह्यातून मार्ग काढू. अखलाक हुसेन म्हणाले राष्ट्रध्वज तुमचा एकट्याचा नाही, आमचाही आहे. त्यातील हिरवा रंग आमच्यासाठीच आहे. गांजवे म्हणाले, आपल्या मनात राष्ट्रध्वजाविषयी आदर आहे ह्याचे मला समाधान आहे. ह्या किल्ल्या घ्या, आपण ध्वज काढा. माझी हरकत नाही. अखलाक हुसेन म्हणाले, मी ध्वज काढणार नाही. तुम्ही मला रस्ता सांगा. तुम्ही एक तास ध्वज काढता काय? तासाच्या आत मी माणसे पुढे घेऊन जातो. गांजवे म्हणाले, आम्ही ध्वज एक मिनिटही काढणार नाही.

 चर्चा करताना अखलाक हुसेन म्हणाले, तुम्ही ध्वज एक फूट खाली घेऊ शकता काय? गांजवे म्हणाले, फूटभर ध्वज खाली आणून काय होणार? ध्वज तिथेच राहील. मिरवणुकीला ध्वजाखालूनच जावे लागेल. शिवाय ध्वज असा फूटभर खाली घेणे म्हणजे शोक व्यक्त करणे. या उद्योगात काय अर्थ? पण अखलाक हुसेन म्हणाले, ध्वज काढणार नाही हा तुमचा आग्रह कायम राहील. मला माझ्या लोकांना सांगण्यासाठी काही तरी शिल्लक राहील. आपण दोघे ध्वजाशेजारी उभे राहू. माझ्या लोकांनी शांतपणे जावे असे मी सांगेन. तुमच्या मंडळींना शांत राहण्यासाठी तुम्ही सांगा. गांजवे यांनी आपल्या सहकाऱ्यांशी विचारविनिमय केला व मूळ मुद्दा म्हणजे ध्वज काढणार नाही हा शिल्लक राहून तडजोड होणार असेल तर ती मान्य करावा असे आपले मत दिले. सर्वानुमते ही तडजोड स्वीकारली गेली.

 आक्रमक मनोवृत्तीच्या जात्यंध मंडळींना ही तडजोड कुठवर पचेल याबाबत रांजणीकर, अनंत भालेराव, नागनाथ परांजपे यांना शंका होती. म्हणून तडजोड झाली तरी युद्धाची सिद्धता असू द्या, असा निर्णय त्यांनी घेतला. शामराव बोधनकरांचे राहते घर, काँग्रेस ऑफिस असणारे घर, यावर जिथून हल्ला होण्याचा संभव आहे त्या सर्व जागा रोखण्याची व्यवस्था करण्यात आली. अखलाक हुसेन व गांजवे दोघेच वर असणार म्हणून गांजवे यांच्या नकळत त्यांच्या संरक्षणाची सोय करण्यात आली. शेवटी येणार येणार म्हणून गाजत असलेला रझाकार व मुसलमानांचा सशस्त्र जुलूस सायंकाळी चार वाजता सराफ्यातील पहिल्या चौकापर्यंत आला. सुमारे चार-पाच हजार लोक घोषणा करीत, नाचत, हवेत फैरी झाडत त्या मिरवणुकीत होते. रझाकारांचे उपनेते नजीर अली मिरवणुकीसोबत होते. गांजवे व अखलाक हुसेन तिसऱ्या मजल्यावर ध्वजाच्या दोन बाजूस होते. सर्व रझाकारांचे प्रमुख नेते आता तडजोड झाली आहे, शांतपणे जा हे समजावून सांगत होते. आणि झेंडा खाली घेऊन चालणार नाही, तो काढलाच पाहिजे, नसता सारा गाव जाळू, असे अनुयायी ओरडत होते.

 शांततेची ही तहान अखलाक हुसेन आणि नजीरअली यांना का लागावी? याचे कारण असे की, मिरवणूक रस्त्यावर दुतर्फा हिंदूंची उंच घरे व चांगली मजबूत. गावात तंग वातावरण असल्यामुळे रस्त्यावर हिंदू असणारच नाहीत. म्हणून मुसलमानांचे समूह सरळ गोळ्या व बॉम्बच्या टप्प्यात येतील. एखादा हॅन्डग्रेनेड शे-दीडशे मुसलमानांचा घात करील व मुसलमान कायमचे घाबरतील. शासनाला शांतता पाळण्याचे वरून कडक आदेश असताना स्वतःच्या सामर्थ्याच्या जोरावर पुढे जाण्यास रझाकार नेते घाबरत होते. अनुयायांना इतका विचार करण्याची क्षमता कधी नव्हतीच. सडकेवरून निःशस्त्र हिंडणाऱ्या हिंदू प्रजेला अगर व्यापाऱ्यांना त्रास देणे जसे सोपे असते तसे सिद्धता असलेल्या गटावर हल्ला करणे सोपे नसते. नेत्यांना हे कळत असल्यामुळे शांततेची तहान अखलाक हुसेन ह्यांना लागलेली होती.

 वरून अखलाक हुसेन व खाली नजीरअली शांतपणे जा म्हणून अनुयायांना विनवीत आहेत. खाली हजार लोक पिसाटपणे झेंडा खाली ओढा म्हणून ओरडत आहेत, हवेत फैरी झाडत आहेत. शेजारी गांजवे शांतपणे उभे आहेत, असा प्रकार जवळजवळ तासभर चालू होता. कुणी तरी खालून गोळी झाडली. ती गांजव्यांच्या समोरून सूं ऽऽऽ आवाज करीत गेली. हिंदूंना वाटले गोळी गांजव्यांवर झाडली गेली. त्यांचा प्राण संकटात आहे. लगेच होळी भागातील अनेक घाटांवर एक एक माणूस बंदूक घेऊन उभा असल्याचे दृश्य दिसले. रझाकारांना प्रथमच आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे ह्याचा काही अंदाज आला आणि त्यांच्यात चलबिचल वाढली.

 सुमारे वीस तरुण हातात पिस्तुले घेऊन तिसऱ्या मजल्यावर गांजवे यांच्या रक्षणासाठी आले. त्यात बळवंतराव बोधनकर, विनायकराव डोईफोडे, गणपतराव सरसर ही माणसे प्रमुख होती. अखलाक हुसेन ह्यांचा समज असा झाला की, झेंडा झाकला तर लोक शांतपणे जातील, म्हणून त्यांनी ध्वजावर आपली शेरवानी काढून टाकली व ध्वज झाकण्याचा प्रयत्न केला. तरी खालून ध्वज दिसत होताच. ध्वजावर शेरवानी पाहताच ह्या वीस मंडळींनी अखलाक हुसेनचा गळा धरला आणि त्याच्याशी झटण्यास आरंभ केला. पण गांजवे म्हणाले, आज ते माझे पाहुणे आहेत. मला तिसऱ्या मजल्यावरून खाली ढकला आणि नंतर काय करायचे ते करा. त्यामुळे अखलाक हुसेनची सुटका झाली पण वीस सशस्त्र लोकांचे कडे त्यांच्याभोवती राहिले. आपण शांततेसाठी झटलो हेच योग्य केले याचा नवा प्रत्यय रझाकार नेत्याला आला होता. आता येथून जिवंत कसे परतावे याचीच तो चिंता करीत होता.

 तिकडे मुसलमान लोक अखलाक हुसेनचे काय झाले या चिंतेत होते. एक शूर पोलिस इन्स्पेक्टर शहानवाज खान एकटाच हातात रिव्हॉल्व्हर घेऊन शेजारच्या घराच्या गच्चीवर गेला. तिथे जाऊन पाहतो तो अनेक पिस्तुले त्याच्यावर रोखलेली त्याला दिसली. त्याने रिव्हॉल्व्हर आपल्या पट्ट्यात बंद करून खाली यावे असे या वीस मंडळींनी फर्मावले. परिस्थितीचे गांभीर्य जाणून शहानवाज खानने आपले रिव्हॉल्व्हर पट्ट्यात बंद केले व उडी मारून तो जवळ आला. अखलाक हुसेनने त्याला सांगितले, मी सुरक्षित आहे. मला धोका नाही. पण लोकांना शांतपणे जाण्यास सांगा. नाही तर फुकट शेकडो लोक मरतील. तुम्ही मला निष्कारण गुंडांचा सरदार केले आहे. मला आता रक्तपात नको आहे. गांजवे माझे भाऊ आहेत. शहानवाज खान म्हणाला, तुम्ही तशी चिठ्ठी द्या. मी लोकांची समजूत घालतो. पण मला सुरक्षितपणे परत जाता येईल याची हमी हवी. वीस बेभान तरुण आता शहानवाजला सोडण्यास तयार नव्हते. पण गांजवे यांनी त्याला सुरक्षित परतू देण्याचे आश्वासन दिले. गांजवे म्हणाले ही वेळ आम्ही आणली नाही. रझाकारांनी आणली. आम्ही झेंडा काढणार नाही. बाकी दंगल, रक्तपात मलाही नकोच आहे. शहानवाज खान शेवटी अखलाक हुसेनची चिठ्ठी घेऊन परतला.

 अजून रझाकार उपप्रमुख नजीरअली आपल्या मंडळींची समजूत काढीत होता, मनधरणी करीत होता. इतक्यात एक उत्साही टोळके - सुमारे दीडशें मुसलमानांचे - अचानक कामधेनू जवळच्या चौकातून होळीकडे, शामराव बोधनकरांच्या घराकडे जाण्यास वळले. तेही सशस्त्र होते. नजीरअली लाऊडस्पीकरवरून ओरडून सांगत होता कुत्र्याच्या मरणाने मराल, तिकडे जाऊ नका. पण ऐकण्याच्या मनःस्थितीत रझाकार नव्हते. गल्लीच्या तोंडाजवळ हे टोळके येताच इशारा म्हणून रांजणीकरांच्या नेतृत्वाखालील गटाने कोरडे बार काढले. हा इशारा रझाकारांना पटला नसता तर गोळ्या झाडल्या गेल्याच असत्या. तिथे रक्षणार्थ १५-२० तरुण सज्ज होते. पण बंदुकांचे आवाज ऐकताच एकदम कळप उधळावा तसे रझाकार उधळले आणि जीव मुठीत धरून पळत सुटले व मुख्य मिरवणुकीत दाखल झाले. आता सर्वांनाच सत्य साक्षात प्रत्ययाला आले होते. आता लढण्याची कुणाची इच्छा नव्हती. आमचे नेते नजीरअली व अखलाक हुसेन सांगतील तसे वागणे आमचे कसे कर्तव्य आहे, हे गर्दीत अनेक जण समजावून सांगू लागले. तोच शहानवाझखान अखलाक हुसेनची चिठ्ठी घेऊन आला.

 ह्यानंतर शांतपणे सारा जुलूस झेंड्याखालून घोषणा देत गेला. प्रथमच रझाकारांना हिंदूंच्या सामर्थ्यापुढे निमूटपणे झुकावे लागत होते. पण ह्यामुळे भीषण रक्तपात मात्र टळला. अशक्यतेची जाण आली, की रझाकार व त्यांचे नेते एकदम सुजाण झाले. मुख्य नाटक संपले होते. पण अजून समारोप व्हावयाचा होता. राष्ट्रध्वजावर अखलाक हुसेनची शेरवानी होती. ती काढताना ध्वज खाली आला. आता काय करावे? गांजव्यांनी किरकोळ गोष्ट सांगितल्याप्रमाणे सांगितले. तुम्ही तुमच्या हाताने ध्वज पुन्हा लावा व आपण दोघे मिळून ध्वजाला अभिवादन करू. शेजारी वीस पिस्तुले अजून होती. तेव्हा अखलाक हुसेन म्हणाले, हा तर फारच योग्य उपाय आहे. त्यांनी ध्वज उभारला. गांजवे व अखलाक हुसेन ह्यांनी ध्वजाला वंदन केले. शेजारच्या गच्चीवरून कलेक्टरांनी ह्या घटनेचा फोटो घेतला. पोलिस अॅक्शनपूर्वी इत्तेहादुल मुसलमीनच्या अध्यक्षांनी उभा करून वंदिलेला हा पहिला राष्ट्रध्वज !

 ह्यानंतर गांजवे यांनी सुरक्षितपणे अखलाक हुसेनला खालच्या सडकेवर आणले. जिवंतपणे आपण सडकेवर पोचलो, आता भीती नाही याची खात्री पटताच रझाकार नेत्याचे धैर्याचे उसने अवसान गळून पडले. त्याने गांजवे यांना मिठी मारली व त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याचे रडे थांबावयास दोन-तीन मिनिटे लागली. अशा प्रकारे बलिदानाची जिद्द विजयी झाली. ह्यानंतर दोन-चार दिवसांत कार्यकर्ते भूमिगत झाले.

***

(प्रकाशन : दैनिक 'मराठवाडा' १५-८-१९७२)