हैदराबाद विमोचन आणि विसर्जन/कै. स्वामी रामानंदतीर्थ - एक पत्र व चर्चा
पू. स्वामीजींच्या चरणी शि. सा. न.
आपले आत्मवृत्त वाचले. आपण ह्या हैदराबाद संस्थानातील जनतेचे मुक्तिदाते म्हणून आम्हाला चिरवंदनीय आणि प्रातःस्मरणीय आहात ह्यात शंकाच नाही. त्याबरोबरच आपण स्वार्थरहित आणि अहंकाररहित संन्यासीही आहात. जीवनाचे काही दिवस आपल्या नेतृत्वाखाली एका भव्य लढ्यात अतिशय धुंदीत मी काढू शकलो, ह्याबद्दल मला नेहमीच धन्यता वाटली. ज्यांच्या पायावर डोके ठेवताना मला तृप्ती लाभली, त्यांपैकी आपण एक आहात.
हे आणि यासारखे मी पुष्कळच लिहू शकेन. एक तर अशा प्रकारच्या स्तुतिस्तोत्रांची तुम्हाला सवय नाही व तुम्हाला ‘एम्ब्रेस' करण्याची माझी इच्छा नाही. आणि दुसरे जिथे सध्या पोटपाणी सुरक्षितपणे चालू आहे, त्या संस्थेचे तुम्ही अध्यक्ष असल्यामुळे मला तुमची स्तुती जपून करण्याची इच्छा आहे. आपण नोकरीमुळे भाटगिरी करतो आहो, असे मला वाटायला नको आणि तुम्हालाही वाटायला नको. आदर हा मौनात असावा. श्रद्धा ही कृतीतून दिसावी हे बरे.
आत्मवृत्त लिहिण्यापूर्वी तुमचे-माझे दीर्घ बोलणे झाले होते. ह्या बोलण्यात आत्मवृत्तकाराकडून दुहेरी अपेक्षा कोणत्या असतात याची आपणास कल्पना दिली होती. एक तर व्यक्तिजीवनाचे चित्र त्यात तपशिलाने असावे आणि दुसरे म्हणजे ज्या सामाजिक परिवर्तनाचे आपण कर्णधार होतो, त्याचे महत्त्वपूर्ण तपशील आपण मोकळेपणाने सांगावे, अशी माझी आग्रहपूर्वक प्रार्थना होती. मी शून्य झालो. जिथे मीच शून्य झालो तिथे इतरांच्याविषयी ओलावा आणू कुठून? तुमची सारवासारव आहे. तुम्हाला कुणाविषयी वाईट लिहावयाचे नव्हते, त्याशिवाय सहकाऱ्यांविषयी जिव्हाळ्याने लिहिणे शक्य नव्हते, हे सत्य एकदा तरी कबूल करा... (नो कॉमेंट)
आपण संन्यासी आहात पण धार्मिक आणि आध्यात्मिक प्रेरणा आपल्या . जीवनात कधीच प्रबल दिसत नाहीत. स्वार्थरहित समाजसेवेचा मार्ग म्हणूनच आपण संन्यास स्वीकारलेला दिसतो. प्राचीन भारताविषयी फारशी गौरवबुद्धी आपल्या मनात नाही. स्वामी विवेकानंद आणि स्वामी रामतीर्थ ह्यांच्या मनातं प्राचीन भारताविषयी महान गौरव होता. आपल्या मनाचे हे परिवर्तन मूळचेच की उत्तरकालीन अभ्यासाचा परिणाम हे आपण आत्मवृत्तात सांगितलेले नाही. खरे म्हणजे स्वतःच्या वैचारिक, विकासाचाच त्यात आढावा घेतलेला नाही. ही एक उणीव म्हटली पाहिजे.
(स्वार्थरहित समाजसेवा आपल्याला आध्यात्मिक प्रेरणा वाटत नाही, ही विचारांची अपक्वता आहे.)
आपणाकडून अनेक बाबींच्यावर प्रकाश पडणे अपेक्षित होते. संस्थानविषयक प्रश्नांच्याकडे काँग्रेस १९२७ नंतर अधिक लक्ष देऊ लागली. संस्थानांच्यासाठी एक अखिल भारतीय संघटना जन्माला घालण्याचा अतोनात प्रयत्न काँग्रेसने केला. ह्यामागची भूमिका नेमकी कोणती होती? 'डोमिनियन स्टेट्स' हे जोपर्यंत ध्येय होते, तोपर्यंत संस्थानांचा विचार फार गंभीरपणे करण्याची गरज नव्हती. पण संपूर्ण स्वातंत्र्य हे ध्येय ठरले की संस्थानांचा विचार करणे भाग पडले हे खरे आहे का? की....
संस्थाने हा गमावलेल्या स्वातंत्र्याचा अवशेष आहे, ही भूमिका अनुभवांनी बदलली व संस्थाने हा गुलामगिरीचा संरक्षक किल्ला आहे, ही नवी भूमिका स्वीकारावी लागली म्हणून स्टेट्स पीपल्स कॉन्फरन्सचा उदय झाला? संस्थाने संपली पाहिजेत ह्या निर्णयावर गांधीजी व सरदार केव्हा आणि का आले?
(शिपायाकडून इतिहासकाराची अपेक्षा नसावी.)
हैदराबाद स्टेट्स् काँग्रेसच्या स्थापनेला एकोणीसशे अडतीसपर्यंत गांधीजींनी आशीर्वाद दिलेला नव्हता. त्यांनी १९३८ साली आशीर्वाद का दिला? १९३५ च्या कायद्यात चेंबर ऑफ प्रिन्सेसची स्वतंत्र सोय होती. फेडरेशनमध्ये येण्यासाठी संस्थानिकांना स्वतःच्या अटी घालण्याचे स्वातंत्र्य होते. ही घटना भारताच्या अखंडत्वाला धोक्याची आहे म्हणून भारताच्या प्रादेशिक सलगतेसाठी हैदरावादेत प्रबल व संघटित जनमत आवश्यक आहे हा निर्णय गांधीनी घेतला काय?
(ते महात्माजी जाणोत, बलिदानाची तयारी ठेवणारा भेटला. त्याला आशीर्वाद मिळाला इतके मी जाणतो.)
स्टेट काँग्रेसवर जन्मापासून बंदी होती. आंध्र महासभा, कर्नाटक महासभा, महाराष्ट्र परिषद ह्यांद्वारे काही काम चालू होते. अचानक १९४५ ला महाराष्ट्र परिषदेने असा ठराव केला की, जनतेला जवाबदार राज्यपद्धती संस्थानात निर्माण करणे हे महाराष्ट्र परिषदेचे ध्येय आहे. हा ठराव करणे म्हणजे महाराष्ट्र परिषदेवर बंदी बोलावून घेणे होते. मग असा ठराव का केला गेला? भारतीय स्वातंत्र्य जवळ आले आहे, ह्यावेळी गप्प बसणे योग्य नव्हे ह्या जाणिवेने की हा ठराव स्टेट काँग्रेसवरील बंदी उठण्यास उपकारक ठरेल, ह्या कुणाच्या तरी चतुर सूचनेमुळे ? मला दुसरा संभव जास्त दिसतो. कारण ह्यानंतर लवकरच स्टेट काँग्रेसवरील बंदी इंग्रजांच्या दडपणाने उठविण्यात आली. पण हा माझा अंदाज झाला; सत्य काय आहे?
(गप्प बसणे योग्य नाही असे वाटले.)
१९४६ सालच्या हैदराबादच्या निवडणुकीविरूद्ध सत्याग्रह करण्याची घोषणा मागे घेऊन फक्त बहिष्कार घालावा, हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय अतिशय योग्य होता, ह्यात शंकाच नाही. निर्णायक लढा जवळ येत असताना गौण प्रश्नांवर शक्ती खर्चण्यात अर्थ नव्हता हे खरेच आहे. स्वातंत्र्य जवळ येत आहे. निर्णायक लढा देण्याची वेळ येत आहे. अशा वेळी शक्ती खर्चू नका, हा सल्ला कुणी दिला? कार्यकर्तेच विचारांती ह्या निर्णयावर आले, की नेहरूंचा हा सल्ला होता? तुमचे मित्र शेख अब्दुल्ला यांनी जबाबदार राज्यपद्धतींसाठी लढा सुरू केला. त्यांना परवानगी मिळाली. शेख अब्दुल्लांनी सल्ला न ऐकता लढा दिला काय? भारतात विलीन व्हा, ह्या मुद्दयावर लढा देणे अब्दुल्लांना अशक्य होते म्हणून त्यांना परवानगी देण्यात आली होती का? की तो फक्त सामर्थ्य (!) प्रदर्शनाचा कार्यक्रम होता? नेहरूंनी त्या लढ्यात भाग घेतला आहे.
(शेख साहेब माझे मित्र नव्हते. भारतीय स्वातंत्र्याच्या वाटाघाटीत त्यांना संस्थानांना स्वतंत्र प्रतिनिधित्व हवे वाटे. मला त्याची गरज नसे. नेहरू त्यांचे सावधपणे मित्र होते. माझ्या तोंडचा 'मित्र' हा शब्द उच्चारवजा होता.) १९४७ च्या सात ऑगस्टला आपला लढा सुरू झाला. यापूर्वी सरदारांनी तुम्हाला नेमके काय सांगितले होते? असे म्हणतात की, सरदारांनी अखंडपणे लढा चालू ठेवा, संघर्ष जिवंत राहू द्या, जेल भरलेले असू द्या, माऊंटबॅटन परतल्यानंतरच हा प्रश्न सोडविता येईल असे सांगितले होते हे खरे आहे का? माऊंटबॅटन गव्हर्नर जनरल असणे अनेक कारणांसाठी सोयीचे होते. पण हैदराबाद प्रश्नासाठी ती अडचण आहे, असे सरदारांचे मत होते का? हा संदर्भ मनात ठेवूनच तुम्ही लढ्याचा ठराव स्वीकारताना हा संघर्ष टर्मपुरता नसून पूर्ण वर्षाचा आहे, असे सूचक बोलला होता का? (स्थूलपणे हे बरोबर आहे. शब्दशः चूक.)
इत्तेहादुल मुसलमीन निजामाला सार्वभौम मानीत नव्हती. हैदराबाद संस्थानातील मुसलमान जनता सार्वभौम असून निजाम त्या सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे, असे मानी. त्या भूमिकेचा प्रतिवाद काँग्रेसच्या राजकारणात नाही. हे सहजच घडले की जाणीवपूर्वक घडले?
(जबाबदार राज्यपद्धतीचा आग्रह ह्या सर्वच भूमिकांचा विधायक प्रतिवाद होता.)
हे आणि असे शेकडो प्रश्न आमच्यासमोर उभे आहेत आणि तुमचे आत्मवृत्त सर्व ठिकाणी गप्प आहे. आपण मोकळेपणाने सर्व प्रश्नांची उत्तरे का दिली नाहीत, हे तुम्हाला विचारण्यातही अर्थ नाही. मुन्शींनी जर विपर्यास केला नसता तर तुम्ही हे जे लिहिले तेही लिहिले नसते, हेच खरे. शेवटी आभार के. एम. मुन्शींचेच मानायला हवेत.
पत्राबद्दल सविस्तर उत्तराची अपेक्षा नाही. पण हे पत्र समोर ठेवून आपण काही बोलावे, काही सांगावे ही मात्र अपेक्षा आहे. आपला आशीर्वाद हे माझे भाग्य आहे. खरोखरी मला त्याहून निराळे काहीच नको आहे.
आपला नम्र,
नरहर कुरुंदकर
टीप : कै. स्वामी रामानंद तीर्थ यांना माझे हे पत्र होते. त्यांनी पत्र परत केले. तोंडी पुष्कळ चर्चा केली. कंसामध्ये असलेली वाक्ये मी लिहून घेतलेली आहेत. वाक्ये स्वामीजींची. चर्चा लगेच लिहून ठेवण्याचे अवधान राहिले नाही. ते इतक्यात लवकर जातील असे वाटले नव्हते.
***
(प्रकाशन : 'ललित' दिवाळी १९७२)