Jump to content

हैदराबाद विमोचन आणि विसर्जन/अध्यात्मवादी स्वातंत्र्याचे उपासक-स्वामी रामानंद तीर्थ

विकिस्रोत कडून






अध्यात्मवादी स्वातंत्र्याचे उपासक - स्वामी रामानंद तीर्थ

 कै. पूज्य स्वामी रामानंद तीर्थ हे स्वामी म्हणजे संन्यासी होते व हैदराबाद संस्थानचे राजकीय नेते होते. संन्यासी हा त्याग, वैराग्य, अनासक्ती यांचा प्रतिनिधी असतो. राजकारणाचे स्वरूप याहून भिन्न असते. काहीजणांना यात विसंवाद वाटतो. संन्याशाने प्रपंचात मन कशाला घालावे? प्रपंचातील प्रश्नांचा मोह सुटत नसेल तर संन्यास तरी कशाला घ्यावा? संन्याशाचे जीवन तपस्वी, क्षमाशील व भोगातीत असले पाहिजे. या जीवनदीक्षेला राजकारण ही वाव विसंगतच मानणे भाग आहे. कारण परलोकातील मोक्षाचा पाठपुरावा करणारा संन्यासी आणि इहलोकातील प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी झटणारा राजकारणी यांचे रस्तेच भिन्न असले पाहिजेत. एका व्यक्तीच्या जीवनात जर या दोन बाबी एकत्र दिसत असतील तर तो विसंवाद आहे, असे काहीजणांना वाटते. आणि या वाटण्यात अर्थ आहे. माणसांना एक विशिष्ट बाब विशिष्ट त-हेने जाणवत असेल तर त्यामागे परंपरा असते. फार मोठी परंपरा अशी आहे की, साधुसंत प्रपंचाच्या प्रश्नांच्या बाबतीत उदासीन राहिले. आम्हाला व्यवहार हा परमार्थाहून निराळा आणि परमार्थ व्यवहाराहून निराळा समजण्याची सवय लावली आहे.

 गृहस्थाश्रम हा व्यवहारधर्माचा आधार आहे. हा आश्रम वैराग्याचा नव्हे. कारण पत्नी आहे. तिच्याविषयीची कर्तव्ये आहेत. परंपरेत पत्नीच्या संख्येला बंधन नाही, परंपरेनुसार पत्नीखेरीज उपपत्नीही विहित आहेत. मुलेबाळे आहेत. त्यांच्या संगोपनाचा, जपणुकीचा प्रश्न आहे. म्हणून जायदाद व संपत्ती मिळविणे आले. मित्रांना जोडणे, सांभाळणे आहे तसे शत्रूचा पराभव करणे आले. म्हणून गृहस्थाश्रमाचे पुरुषार्थ काम व अर्थ असतात. या अर्थकामाची सोय सर्वसामान्य प्रतिष्ठित असावी म्हणून योग्य काय व अयोग्य काय याचे नियम असतात. म्हणून अर्थ व काम धर्माशी सुसंगत हवे. धर्म, अर्थ, काम यांचा तोल व संगती हे गृहस्थाश्रम धर्माचे वैशिष्ट्य आहे. यालाच व्यवहार, त्रिवर्ग-प्रतिपत्ती असे म्हणतात. म्हणून गृहस्थाश्रमात भोग असतो, अहिंसेसह हिंसा असते. सत्यासह असत्य असते व न्यायनीतीसह सोय असते. राजकारण हा या आश्रमाचा भाग आहे. मग जर हे खरे असेल तर संन्याशाने राजकारण का करावे? संत, संन्याशी, योगी, फकीर, वली, ऋषी, मुनी, ब्रह्मचारी यांचा राजकारणाशी संबंधच काय?

 हा प्रश्न फार मोठा आहे. त्याचे उत्तरही तेवढेच मोठे दिले पाहिजे. मी या प्रश्नांचे उत्तर संक्षेपाने देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे त्या संदर्भात आपण स्वामीजींकडे पाहू शकू. त्यापूर्वी त्यांच्या चरित्राचे प्रमुख टप्पे लक्षात घेतले पाहिजेत. स्वामीजींचा जन्म १९०३ सालचा. त्यांनी संन्यास घेतला १४ जानेवारी १९३१ ला, म्हणजे २८ वे वर्षी. या संन्यासापूर्वीच्या काळात ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठात (शासनमान्य शिक्षणावर बहिष्कार टाकून) शिकले व हिप्परग्याच्या राष्ट्रीय शाळेत त्यांनी अध्यापकाचे कार्य केले. स्वामी रामतीर्थ यांच्या परंपरेचा त्यांचा संन्यास, त्यामुळे फार मोठे विधिविधानांचे अवडंवर कधीच नव्हते. राजकारणात वेगाने खेचले जाऊन ज्येष्ठ राजकीय नेते होण्याचा काळ इ.स. १९३३ ते १९४८. लोकसभेत इ.स. १९४८ ते १९६२ - सुमारे १४ वर्षे. भूदान, खादी इत्यादी कार्यांत शेवटपर्यंत. २२ जानेवारी १९७२ मृत्यू. असा हा सत्तर वर्षांचा काळ होता. या कालखंडात त्यांना हैदराबादचे मुख्यमंत्री होण्याचा योग होता पण त्यांना सत्तापद नको होते. केंद्र शासनात मंत्री हाण्यासही ते तयार नव्हते. सत्तेचा मोह न होणे हा त्यांचा कायम स्वभावविशेष होता. ज्यांना प्रयत्न करूनही काही मिळू शकले नाही, मिळवता आले नाही अशा कार्यकर्त्यांचे मन जसे कडवटपणे भरलेले असते तसे स्वामीजींचे नव्हते. हैदराबाद भारतात येणे व या संस्थानाचे तुकडे होऊन, महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक अस्तित्वात येणे या बावी घडताच स्वामीजी कृतकृत्य व कृतार्थ झाले. त्यांच्याशी बोलणाऱ्याला जाणवत असे ते समाधान व वृत्तीची कृतार्थता.

 आता आपण पुन्हा मूळच्या प्रश्राकडे वळू. या संन्याशाचा राजकारणाशी संबंध काय? आपल्या जगभरच्या इतिहासात साधुसंतांच्या व संन्याशांच्या दोन परंपरा दिसतात. एक परंपरा समाज आणि त्याची दुःखे यांच्याविषयी पूर्णपणे उदासीन असते. आपण आपले जीवन परमेश्वराला समर्पित करून आपली परमेश्वराची भक्ती जगात वाढवावी याविना आपले दुसरे काही काम आहे असे या संतांना वाटत नाही. जगातील नानाविध प्रकारची दुःखे त्यांना जगाचा मोह दूर करण्याचे शिक्षण देतात. दुःखी माणसांना दुःखमुक्त व्हावयाचे असेल तर त्यांनी ईश्वरावर प्रेम करून स्वार्थ, मोह, अहंकार सोडवावा असे या परंपरेला वाटते. या परंपरेचे खंडन अगर तिची अवहेलना करण्याचा माझा हेतू नाही. कारण याही परंपरेत फार मोठी माणसे होऊन गेलेली आहेत. स्वतः संपूर्णपणे निर्मोही, निरिच्छ आणि निर्भय होणे ही असामान्य शक्ती आहे. पण याखेरीज साधुसंतांची दुसरी परंपरा आहे. या मंडळींचा ईश्वरावर दृढ विश्वास असतोच. स्वार्थातून मुक्त होण्याची त्यांची तपस्याही चालू असतेच. पण त्यांना असे वाटते की, आपण समाजाचे काही देणे लागतो. हे जगच परमेश्वरस्वरूप असल्यामुळे जगातील मानवाची सेवा करतानाच आपण ईश्वराची अधिक चांगली सेवा करू शकतो. या परंपरेचे संतही असेच मानतात की, स्वार्थातच अहंता, लोभ, मत्सर, द्वेष व दु:ख यांचे मूळ साठविलेले आहे. म्हणून स्वार्थाचा होम पेटविला पाहिजे. आपल्या वैयक्तिक जीवनाची उभारणी वैराग्यावरच असली पाहिजे. पण याबाबतची आपली साधना माणसाच्या सेवेत सफल झाली पाहिजे. लोकयात्रेचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी भगवद्गीतेतच कृष्णाने अर्जुनावर टाकलेली आहे. जनी जनार्दन समजून लोकसेवा करण्याची संतपरंपरा आता नाही म्हटले तरी अडीच हजार वर्षे जुनी आहे. या परंपरेचे संत कोणती तरी लोकसेवेची कामगिरी आपल्या अंगावर घेऊन समाजाच्या प्रत्यक्ष उपयोगी पडण्याचा प्रयत्न करीत असतात. या दोन प्रेरणेतूनच बौद्धांनी शाळा, अनाथालये, दवाखाने चालविले. बौद्धांच्या या कार्याचा प्रभावच ख्रिश्चनांवर पडलेला आहे. जगभर मिशनरी सेवा म्हणून शाळा, अनाथालये, दवाखाने चालवितात. यामागचे ध्येय हे आहे.

 ज्यांच्या धडपडीमागे अनेक स्वार्थी हेतू असतात अशी सामान्य माणसे आपण सोडून देऊ, पण आजही भारतात मदर टेरेसांचे प्रचंड कार्य चालू आहे. मदर टेरेसा कुणाला ख्रिश्चन करीत नाहीत. धर्मप्रसार करणे, ख्रिस्ताच्या कळपात नवनवी कोकरे सत्पुरुषांची नावे आपणास सहज घेता येतील. विद्यारण्य, गुरू गोविंदसिंह आणि रामदास. ही तीन नावे इतिहासात प्रसिद्ध आहेत. विद्यारण्य माधवाचार्य हे आपल्या काळातले महापंडित होऊन गेले. अनेक शास्त्रांच्यावर त्यांची ग्रंथरचना आहे. सर्वदर्शन-संग्रह त्यांच्या चौरस व्यासंगाचा पुरावा आहे. विद्यारण्य संन्यासी होते. पुढे ते शृंगेरी पीठाचे शंकराचार्य झाले. त्यांच्या डोळ्यांसमोर अल्लाउद्दिन खिलजीने सारा दक्षिण भारत जिंकला. हे प्रसिद्धच आहे की हरिहर आणि बुक्कराय यांना प्रेरणा स्वामींची होती. ज्याला आपण विजयानगर म्हणून ओळखतो तो मूळचे विद्यारण्यनगर होते. हिंदूंना सन्मानाने आणि प्रतिष्ठेने जगता आले पाहिजे यासाठी राजकारणात रस घेऊन राज्यनिर्मिती घडवून आणणारा हा एक प्रसिद्ध संन्यासी. समर्थ रामदासस्वामींचे चरित्रसुद्धा असेच आहे. खरे म्हणजे वैराग्यशाली रामदासांना काही नको होते. घरदार, संसार सोडून टाकळीला जाऊन स्वामी तप करीत वसले. त्यांना ईश्वरदर्शनही घडले. पण या निरिच्छ संतांना राजकारणात रस होता. हिंदूंचे एक स्वतंत्र सार्वभौम राज्य असले पाहिजे अशी जबर इच्छा होती. हिंदुराज्य निर्माण झाले असते तर रामदासाला काय मिळणार होते? त्याला काहीच नको होते. स्नानसंध्या करण्यासाठी गंगेत उदंड पाणी होतेच. पण ती संध्याही निर्वेध चालावयाची असेल तर गंगेच्या दोन्ही काठांवर आपले राज्य हवे म्हणून रामदासाने शिवाजी महाराजांच्या मागे आपले पुण्य उभे केले व छत्रपती ईश्वरी अवतार आहेत अशी घोषणा केली. दशमेश गुरु गोविंदसिंह हे तर धर्मगुरूच होते, पण त्यांना हातात शस्त्र घेऊन लढावे लागले. ज्या ज्या वेळी राष्ट्र गुलाम व परतंत्र होतात त्या त्या वेळी संत-संन्याशांना राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा विचार करणे भाग पडते असे दिसून येईल.

 आधुनिक भारतात समाजांचे दायित्व पत्करणाऱ्या व स्वातंत्र्याचा विचार करणाऱ्या संन्याशांची एक परंपराच आहे. या स्वातंत्र्यवादी असणाऱ्या आधुनिक भारतातील संन्यासी नेत्यांना फार मोठे महत्त्व आहे. हजारो कार्यकर्त्यांना राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी जीवित समर्पण करण्याची प्रेरणा या तीन संन्याशांनी दिली. कालक्रमानुसार ही नावे म्हणजे स्वामी दयानंद, स्वामी विवेकानंद व स्वामी रामतीर्थ. स्वामी दयानंद हे राजकीय नेते नव्हते. वेदावर कठोर निष्ठा असणारे संन्याशी होते, पण जातिभेद निवारण, अस्पृश्यता निवारण, आधुनिक शिक्षण यात तर त्यांनी रस घेतलाच पण त्याबरोबर राष्ट्रीय स्वातंत्र्याची प्रेरणाही त्यांनी दिली. स्वामी श्रद्धानंद व लाला लजपतराय याच प्रेरणेतून पुढे आले. स्वामी विवेकानंद असेच संन्यासी होते. पण भारताच्या स्वातंत्र्यावर त्यांची गाढ श्रद्धा होती. स्वामी रामतीर्थ तर स्वतःला भारतरुपच समजत असत. मीच भारतवर्ष आहे. पंजाब व बंगाल माझे बाहु, काश्मीर माझे डोके, कन्याकुमारी माझे पाय आहेत. एक हृदय, एकात्मा असणारा भारतच मी आहे. असे ते म्हणत. स्वामी रामानंद तीर्थांच्या रूपाने रामतीर्थांची प्रेरणा कार्यरत होती.

 खरे म्हणजे या यादीतच आपण महात्मा गांधी आणि संत विनोबा भावे यांचाही समावेश केला पाहिजे. गांधीजी हे रूढ अर्थाने संन्यासी नव्हते. त्यांनी दीक्षापूर्वक भगवी वस्त्रे धारण केलेली नव्हती, हे खरेच आहे, पण ते धर्मपुरुषच होते. ईश्वरावर त्यांची गाढ श्रद्धा होती. परमेश्वराच्या इच्छेशिवाय गवताचे एक पातेही हलत नाही असे ते म्हणत. नानाविध प्रकारची व्रते आणि भजने, सकाळ-संध्याकाळच्या प्रार्थना, मौन आणि ध्यानचिंतन हा सगळा गांधीजींचाही प्रकार होता. ते आत्म्याचा शोध घेणारे प्रवासी होते. शंकराचार्य म्हणत ब्रह्म तेवढे सत्य आहे. या सत्यस्वरूपी ब्रह्माचा शोध घेण्यासाठी गांधीजी जन्मभर अहिंसेची साधना करीत होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी तू सर्वस्व पणाला लाव असे त्यांना त्यांच्या आतल्या आवाजाने सांगितले होते. हा आत्म्याचा म्हणजे ईश्वराचाच आदेश होता. गांधींचे शिष्य विनोबा म्हणजे तर चालते बोलते तपच. विनोबांचे मन गीता, उपनिषदे यातच गुंतलेले होते. एकदा एकजणाने विनोबांना विचारले, 'हा समोरचा कंदील खरा आहे. यावर जितकी दृढ़ श्रद्धा आहे तशी ईश्वराच्या अस्तित्वाविषयी तुम्हाला खात्री व श्रद्धा आहे का?' विनोबा म्हणाले, 'मी ईश्वराविषयी निःशंक आहे. समोरच्या कंदिलाची मात्र खात्री देता येत नाही'. या देशातले कोटी कोटी लोक गांधी-विनोबांना संतच मानतात आणि दोघांनाही राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा, राजकारणाचा विचार करणे भाग पडत गेले. ज्याला तुम्ही आम्ही राजकारण म्हणतो तो गांधी-विनोबांसाठी परमेश्वराच्या उपासनेचा मार्ग होता, त्यांची ती अध्यात्मसेवा होती.

 कै. स्वामी रामानंद तीर्थांच्या जीवनावर आत्यंतिक प्रभाव टाकणाऱ्या या तीन विभूती होत. स्वामी रामानंद हे पहिले. त्यांच्या परंपरेचे ते संन्यासी होते. महात्मा गांधी हे दुसरे आणि विनोबा तिसरे. यांचे स्वामी अनुयायी होते. स्वामीजी हे अहिंसेचे थोर उपासक होते व निर्भयपणे सशस्त्र आंदोलनाचे दायित्व स्वीकारणारे आणि त्या लढ्याचे मार्गदर्शन करणारेही होते. ज्यांची उपासना इहलोकासाठी चालू आहे असेही लोक धर्माची, देवळाची नावे घेऊन उभे असतात आणि काहीजणांसाठी राजकारण हाही उपासनेचा भाग असतो असे हे चित्र आहे. मी स्वतः या प्रश्नावर अनेकदा स्वामीजींशी बोललो आहे. एका मर्यादेपर्यंत ते चर्चा करीत व मी मर्यादा संपल्यावर मोकळेपणाने हसून सांगत 'हे मला माहीत नाही, पण हे घडले मात्र खरे.' बुद्धिवाद करून एखादा मुद्दा समर्पकपणे पटवून द्यावा यात त्यांना रस नव्हता. ते म्हणत माझ्यापुरता या मुद्द्यावरील विचार संपलेला आहे. श्रद्धापूर्वक मी निर्णय घेतलेला आहे.

 स्वामीजींनी मला एकदा एक गोष्ट सांगितली होती. त्यांच्या मनोवृत्तीवर प्रकाश टाकणारी अशी ती गोष्ट आहे. एका तुरुंगात एक कैदी होता. आपण या तुरुंगात कधी व कुठून आलो हे त्या कैद्याला आठवत नव्हते. इथून बाहेर सुटावयाचे म्हणजे कुठे जायचे हे कैद्याला माहीत नव्हते. तो कैदी अशक्तही होता. त्याच्या शेजारी एक हातोडा होता. कैदी मधून मधून उठे व भिंतीवर घाव घालू लागे. पहिले दिवशी अज्ञात आवाजाने विचारले, 'भिंत फुटेपर्यंत तुझी शक्ती टिकेल असे तुला वाटते का?' कैदी म्हणाला, 'ते मला माहीत नाही. ठोकीत राहा हा माझा मंत्र आहे.' तिसरे दिवशी अज्ञात आवाजाने विचारले, 'अरे या भिंतीनंतर दुसरी भिंत असेल. तुरुंगाबाहेर पडण्याची ही दिशा बरोबर आहे इतकी तरी तुला खात्री आहे काय?' कैदी म्हणाला, 'तेही मला माहीत नाही. ठोकीत राहा हा माझा मंत्र आहे.' इथे स्वामीजी थांबले. मी विचारले, 'चौथे दिवशी काय झाले?' स्वामीजी म्हणाले, 'तुम्ही नास्तिक आहात. चौथे दिवशी काय झाले हा गौण मुद्दा आहे. गोष्टीचा शेवट तुम्ही कसाही करा. मला दोन शेवट दिसतात. पहिला शेवट असा, चौथे दिवशी भिंत पडली व कैदी स्वतंत्र झाला. दुसरा शेवट असा, कैदी वर्षानुवर्षे ठोकीत राहिला. एक दिवस मरून गेला. भिंत काही पडली नाही. मला दोन्ही शेवट पवित्र वाटतात कारण महत्त्व ठोकीत राहायला आहे. कर्म महत्त्वाचे, निष्कामता महत्त्वाची, फळ गौण.

 राजकारणात अध्यात्मप्रवासी म्हणून कोण येतात हे ओळखणे कठीण नसते. तसे ते सोपे असते. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात तुम्ही असा. तुमच्या प्रयास-प्रयत्नामुळे स्वार्थ कमी होत जात संपतो आहे काय? जगाविषयी निष्काम प्रेमभावना वाढत जात आहे काय? तुमच्या खटपटीमुळे, धडपडीमुळे मन कर्तव्यच्युत न होताही आसक्त व तृप्त होते आहे काय? जर हे घडत असेल तर सेवेचे क्षेत्र कोणतेही असो, माणूस परमार्थमार्गाचा प्रवासी असतो. तुम्ही त्रिकाळ पूजा, जप व भजन करीत असा पण परिणाम जर स्वार्थ, लोभ अहंता कमी होण्यात होत नसेल तर ती देवपूजा नव्हे. देवाचे निमित्त करून आरंभ झालेली देहपूजाच आहे. मी स्वामीजींची कृतार्थता पाहिली आहे. त्यांच्यासाठी राजकारण हा अध्यात्माचा प्रांत होता हेच खरे.

 मानवी मनातच परस्परविरोधी अशा दोन प्रेरणा आहेत. स्वतःचा स्वार्थ जपायचा, बलवान करायचा आणि त्या स्वार्थाचे समर्थन करण्यासाठी युक्तिवाद शोधायचे अशी एक प्रेरणा आहे. देवळातील पुजारी जेव्हा रिकाम्या हाताने देवदर्शन घेऊ नये म्हणून सांगतो त्यावेळी देवाचा महिमा ही पुजाऱ्याच्या स्वार्थाची सोयच असते. पण याच मानवी मनात स्वार्थाच्या परिघाबाहेर स्वतःला खेचून नेण्याचीही प्रेरणा आहे. ही जी स्वार्थाचा निरास करणारी प्रेरणा जीवनाला आकार देत असते तिला अध्यात्माची प्रेरणा असे म्हणतात. अध्यात्माची सार्वकालिक अमर गाथाच ही आहे. माणूस स्वतःचे प्रश्न सोडविण्यासाठी झटतच असतो. स्वतःचा स्वार्थ आणि समाजाचा स्वार्थ एकमेकांशी सुसंगत करून टाकणे हाही माणसाचा प्रयत्न असतो, पण माणूस स्वार्थाबाहेर जाण्यासाठी तपही करतो. स्वामीजींसारख्या संन्याशाचे राजकारण हा अशा तपाचा भाग असतो. तुमच्या माझ्या मोजपट्ट्या त्याला लावणे योग्य नव्हे. गेल्या उन्हाळ्यात पुण्याला आम्ही अच्युतराव पटवर्धनांची भेट घेतली. सहज गप्पांतून गप्पा निघाल्या आणि आम्ही स्वातंत्र्य म्हणजे काय या विषयावर बोलू लागलो. क्रांतिवीर अच्युतराव पटवर्धन म्हणाले, “बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य. ही व्याख्या भांडवलशाहीच्या समाजात प्रमाण व आधार राहिली. सर्वांना स्वातंत्र्य देण्यात ही व्याख्या निरुपयोगी ठरली. सर्वांना समान संधी, सर्वांना संरक्षणाची समान हमी ही समाजवाद्यांची, स्वातंत्र्याची व्याख्या व्यवहारात सर्वांना समानपणे गुलाम करणारी ठरते. आपण स्वातंत्र्याची निर्दोष कल्पना केली पाहिजे."

 मी म्हटले, “स्वातंत्र्याची निर्दोष व्याख्या करण्यासाठी आपण अध्यात्मात जायचे काय?" सर्वांविषयी असणाऱ्या उत्कट प्रेमाखातर स्वेच्छेने स्वतःच्या स्वार्थाला घातलेला आवर ही कल्पना स्वातंत्र्यात कुठेतरी आली पाहिजे असे अच्युतराव पटवर्धनांचे मत पडले. मी म्हटले, 'तुमची स्वातंत्र्याची कल्पना मान्य केली तर फक्त खरे अध्यात्मवादीच स्वातंत्र्याचे उपासक होऊ शकतील.' मला वाटते स्वर्गीय स्वामी रामानंद तीर्थ या व्याख्येत बसतात.

***

(प्रकाशन : दैनिक पुढारी २८-३-१९७६)