स्फूर्ती

विकिस्रोत कडून



काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !
प्राशन करिता रंग जगाचे कणोकणी ते बदलू द्या !

अमुच्या भाळी कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची,
म्हणेल जग आम्हांस मद्यपि पर्वा कसली मग याची !
जिव्हेची बंधने तर ढिली करा तीव्र या पेयाने,
यदुष्णतेने द्यावापृथ्वी द्रवुनि मिसळती वेगाने !
होउनिया मग दंग मनी,
व्हावे ते आणा ध्यानी,
गा मग सुचतिल ती गाणी,
परिसुनी त्यांचे शब्द, रुढीचे द्यास झणी ते खवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

सोमाचा रस वेदकाळच्या ऋषिवर्यांनी उकळीला,
शेष तयाचा द्या तर लौकर पिपासु जे त्या आम्हाला !
औचित्याच्या फोल विवेका, जा निघ त्या दुरवस्थेने
अम्हा घेरिले म्हणुनी घेतो झिंगुनिया या पानाने !
क्लृप्तीची मग करुनी नौका व्योमसागरावरी जाऊ
उडुरत्ने ती गरीब धरेला तेथुन फेकुनिया देऊ !
अडवतील जर देव, तरी
झगडू त्यांच्याशी निकरी
हार न खाऊ रतीभरी !
देवदानवा नरे निर्मीले हे मत लोकां कवळू द्या !
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

पद्यपंक्तीची तरफ आमुच्या की विधीने दिली असे,
टेकुनि ती जनताशीर्षावरी जग उलथुन या देउ कसे !
बंडाचा तो झेंडा उभवुनी धामधूम जिकडे तिकडे.
उडवुनि देऊनि जुलुमाचे या करु पहा तुकडे तुकडे !
महादेव ! हरहर ! समराचा गर्जत तो वाऱ्यावरती
येउनि घुमतो अमुच्या कर्णी ..निजती ते ठारची मरती !
उठा उठा बांधा कमरा
मारा किंवा लढत मरा
सत्वाचा उदयोस्तु करा !
छंद फंद उच्छृंखल अमुचे स्तीमित जगाला ढवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.