सौंदर्यरस/सौंदर्याचे विश्लेषण
Appearance
२
सौंदर्याचे विश्लेषण
कादंबरी, नाटक, लघुकथा, काव्य या साहित्यातील ललितकृतींना फुलाची उपमा नेहमी दिली जाते. फुलाच्या सौंदर्याचा आनंद अनुभविताना आपण त्याच्या सौंदर्याच्या घटकांचे विश्लेषण करीत नाही. त्याचा रंग, त्याचा गंध, त्याच्या पाकळ्यांची रचना, त्याची मृदुता, त्याचा ताजेपणा हे सर्व सौंदर्याचे घटक होत, पण आपण फूल पाहतो त्या वेळी या घटकांचा निरनिराळा विचार करीत नाही. सर्व समग्र फूल आपण एकदम पाहतो, एकसमयावच्छेदेकरून पाहतो. आणि म्हणूनच त्याचे सौंदर्य आपल्याला प्रतीत होते. त्या सौंदर्याचे वर सांगिलेले घटक आपण वेगळे करू लागलो तर त्याचे सौंदर्यच लोपेल. आणि आपल्या हाती जड द्रव्यांचा एक पुंज तेवढा उरेल. साहित्यकृतीचे सौंदर्य आस्वादिताना हीच जाणीव ठेवून आपण तिच्या सौंदर्याचे विश्लेषण न करता, सामग्ऱ्याने तिचे दर्शन घेतले पाहिजे, तरच आपल्याला तिचे खरे मर्म कळेल, असे आजवर अनेक टीकाकारांनी सांगितले आहे आणि ते बहुमान्यही झाले आहे.
पण साहित्य सौंदर्याचा आस्वाद घेणे निराळे आणि त्याचे परीक्षण करणे निराळे. फुलाचेच उदाहरण घेतले तरी हा फरक आपल्या ध्यानात येईल. झाडावरचे एखादे गुलाबाचे फूल आपण पाहतो, किंवा तळ्यातील कमळ पाहतो आणि त्या सौंदर्यदर्शनाने आपल्याला अतिशय आनंद होतो, त्या वेळी आपण त्या सौंदर्याचे घटक वेगळे करीत नाही हे खरे आहे. पण त्या सौंदर्याची चिकित्सा करताना त्याचे पृथक्करण करणे आवश्यक आहे हे कोणालाही मान्य करावेच लागेल. कण्हेरीच्या फुलाकडे पाहून आपल्याला इतका आनंद होत नाही, गुलाबाकडे पाहून होतो, प्राजक्ताकडे पाहून होतो; याचे कारण शोधताना सृष्टीच्या त्या ललितकृतीचा आपणास अवयवशः विचार करणे प्राप्तच आहे. कण्हेरीच्या फुलाला इतका सुवास नाही, त्याच्या पाकळ्या गलाबाइतक्या नाजुक नाहीत, त्यांची रचना जरा बोजडच असते, गुलाबा इतकी मनोहारी नसते, असे विश्लेषणच आपल्याला करावे लागते. सौंदर्याचा स्वाद घेताना हे करावे लागत नाही, करणे चुकीचे होईल, हे खरे. पण त्याचे परीक्षण करताना घटकांचे पृथक्करण, विश्लेषण अपरिहार्यच असते. साहित्याच्या समीक्षेतही असेच आहे. कादंबरी वाचताना, नाटक पाहताना आपण केवळ आस्वाद घेत असतो. त्या वेळी हे कथानक, हे स्वभावलेखन, ही वर्णनशैली, हे मनोविश्लेषण, ही भाषा, हा शृंगाररस, हा वीररस, हे औचित्य असा विचार आपण करीत नाही. आपल्या मनातही तो येत नाही. त्या ललितकृतीपासून आपल्याला आनंद होत असतो व आपण त्यातच तन्मय झालेले असतो. या आनंदाचे कारण काय, याची चिकित्सा करावी असे आपल्या स्वप्नातही येत नाही. पण ज्या वेळी तसे येते, म्हणजे आस्वादकाची भूमिका सोडून आपण समीक्षकाची भूमिका घेतो, त्या कादंबरीचे वा नाटकाचे टीकाकार म्हणून परीक्षण करू लागतो, त्या वेळी त्याच्या सौंदर्याचे वरील घटक पृथक् करूनच त्यांकडे आपण पाहतो. त्यावाचून गत्यंतरच नसते.
आस्वादकांनी विश्लेषण करू नये हे जितके सर्वमान्य आहे तितकेच समीक्षकांनी विश्लेषण, पृथक्करण केलेच पाहिजे हेही सर्वमान्य आहे.- निदान आजपर्यंत तरी होते. पण अलीकडे नवसाहित्याबरोबर निर्माण झालेली जी नवटीका तिच्या पुरस्कर्त्यांचे मत निराळे आहे असे दिसते. त्याचाच येथे विचार करावयाचा आहे.
नवसाहित्याप्रमाणेच नवटीकेचेही प्रा. वा. ल. कुलकर्णी हे एक प्रमुख पुरस्कर्ते आहेत. 'टीका : काल, आज आणि उद्या' या आपल्या लेखात, 'ललितकृतीच्या समग्र रूपाचा एकदम, एकसमयावच्छेदेकरून विचार करणे, तिचे अवयवशः परीक्षण न करणे,' नव्या टीकेचे एक प्रमुख लक्षण म्हणून त्यांनी सांगितले आहे. प्रथम त्यांनी प्रा. वा. म. जोशी, श्री. कृ. कोल्हटकर यांच्या, त्यांच्या मते जुन्या झालेल्या, टीकेचे स्वरूप सांगितले आहे. हे जुने टीकाकार प्रथम कादंबरीचे कथानक सांगतात. मग त्याच्या संभाव्य- असंभाव्यतेची चर्चा करतात, मग ते स्वभावपरिपोषाची पाहणी करतात. नंतर त्या कादंबरीचा विषय समाजहिताच्या दृष्टीने कितपत उपयुक्त आहे, याची चिकित्सा करतात. असे परीक्षण करताना 'असे असले तरी या कादंबरीची भाषा चांगली आहे', 'या नाटकाची भाषा वाईट आहे', असल्या पुस्त्याही ते जोडतात व 'या कादंबरीतील निसर्गवर्णने मोठी बहारदार उतरली आहेत' असेही मोठ्या अगत्याने ते नमूद करतात. प्रा. कुलकर्णी यांचा भावार्थ असा की, हे जुने टीकाकार ललितकृतीचे असे अवयवशः परीक्षण करतात, पण हल्लीचा नवा जबाबदार टीकाकार असे करणार नाही. प्रत्येक वाङ्मयप्रकार हा एकसंध आहे, त्यात आशय आणि अभिव्यक्ती यांची एक प्रकारे अभिन्नता आहे व त्याचे परीक्षण करताना त्याचे हे एकसंघत्व दृष्टीआड करून भागणार नाही. एवढेच नव्हे तर ते दृष्टीआड केल्यास आपले तत्संबंधीचे मूल्यमापन सपशेल चुकीचे ठरण्याचा संभव आहे, हे अलीकडील परीक्षणकारांच्या विशेषत्वाने लक्षात येऊ लागले आहे, असे प्रा. कुलकर्णी यांना वाटते. आणि हे मत मांडतानाच त्यांनी फुलाचा दृष्टान्त दिला आहे. फुलाचा रंग, सुवास, आकार, पाकळ्या यांची मोजदाद करून आपणास त्या फुलाची कल्पना येणार नाही. याचे सौंदर्य लक्षात घेताना आपण त्याचा अवयवशः विचार करून भागणार नाही. त्याच्या समग्र रूपाचा विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे ललितवाङ्मयाचे आहे भाषा, निसर्गवर्णने ही कादंबरीशी एकजीव झालेली असतात. ती ठिगळवजा नसतात. ह्याची जाणीव जशी परीक्षणकारांना अधिकाधिक होऊ लागली तसातसा त्यांचा स्वतंत्र उल्लेख आपल्या परीक्षणात करण्याची आवश्यकता नाही, हे त्यांना पटू लागले. वेगळया उल्लेखाने, झाला तर त्या वाङ्मयप्रकाराच्या घडणीबद्दल गैरसमजच होण्याचा संभव आहे (व तसा गैरसमज कित्येक कादंबरीकारांचा झाला, असा आपल्याकडील इतिहास आहे) हे त्यांच्या लक्षात आले व हा उल्लेख करण्याचे ते बहुधा टाळू लागले.
मर्ढेकर हे मराठीतले आधुनिक काळातले प्रमुख सौंदर्यशास्त्रज्ञ मानले जातात. सध्याचे बरेचसे समीक्षक हे त्यांचे शिष्य आहेत. त्यांनी याच तऱ्हेचे विचार आपल्या 'ललित वाङ्मयकृतीचा घाट' या लेखात मांडले आहेत. ललितकृती ही एकसमयावच्छेदेकरून आपणास प्रतीत होत असते. तिचे परीक्षण, कथानक, भाषाशैली, कल्पनासौंदर्य असे घटक पृथक्करणाने करणे योग्य नाही. एखाद्या चित्राचे परीक्षण करताना ते एकदम न पाहता त्याच्या एका बाजूने सरकत सरकत दुसऱ्या बाजूपर्यंत जाण्यासारखीच ती साहित्य- समीक्षा होते. मर्ढेकर म्हणतात की, पूर्वीच्या परंपरेत समीक्षणशास्त्राची सारी मदार कथानक, स्वभावलेखन यांच्या विश्लेषणावरच असे. पण त्यांच्या मते हे खरे समीक्षण नव्हे. कलाकृतीचा आपल्याला एकदम साक्षात्कार होत असतो तिची एकसंध अशी जाणीव आपल्याला होत असते. समीक्षणातही हे अवधान आपण ठेविले पाहिजे.
साहित्यकृतीचे परीक्षण अवयवशः करणे योग्य नाही, तिचे समग्र स्वरूप एकदम पाहिले पाहिजे, या नवटीकेने मांडलेल्या मताचा आता विचार करावयाचा आहे. काही तार्किक पद्धतीने तो विचार करण्यापूर्वी, सध्याचे जे प्रथितयश टीकाकार आहेत त्यांनी ललितकृतींची जी परीक्षणे केली आहेत ती तपासून पाहून नव्या जबाबदार टीकाकारांच्या समीक्षणाविषयी प्रा. कुलकर्णी यांनी जी ग्वाही दिली आहे ती कितपत सत्य आहे याचा पडताळा बघू.
'साहित्याचे मानदंड' ही प्रा. गंगाधर गाडगीळ यांची लेखमाला प्रसिद्ध आहे. अनेक श्रेष्ठ ललितकृतींची त्या मालेत त्यांनी परीक्षणे केली आहेत. त्यांतील अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे 'सौभद्र' हे नाटक व र. वा. दिघे यांची 'सराई' ही कादंबरी या दोन मानदंडांचे परीक्षण उदाहरणार्थ आपण घेऊ. ही परीक्षणे वाचताना असे दिसते की, नव्या जबाबदार टीकाकाराने जे करू नये तेच गाडगीळांनी केले आहे. त्यांनी या कृतीचे अवयवशः परीक्षण केले आहे. 'सौभद्र'च्या कथानकाचे प्रथम ते परीक्षण करतात. मूळ महाभारतातील कथानकाशी त्याची तुलना करतात व त्या तुलनेने पाहता सौभद्र हे एक भाबडे नाटक आहे, असे मत देतात. मूळच्या भव्य घटनेला अण्णासाहेबांनी सांगली-मिरजेकडच्या एखाद्या संयुक्त कुटुंबातील मुलीच्या लग्नाच्या प्रसंगाचे रूप दिले आहे असे गाडगीळांचे मत आहे. कथानकाचा विचार झाल्यावर मग गाडगीळांनी पात्रांचा विचार केला आहे व महाभारतातील पात्रांचा मनस्वीपणा किर्लोस्करांनी अगदी बोथट करून टाकला आहे. ही पात्रे मवाळ आहेत, बावळी आहेत, बालबोध आहेत, कोमट प्रकृतीची आहेत, असा अभिप्राय दिला आहे. येथून पुढे क्रमाने नाटकाचे वातावरण, त्याची रचना, त्यातील नैतिक कल्पना, त्यांतील संगीत, त्यांतील रसपरिपोष, त्यातील विनोद, त्यांचे परीक्षण गाडगीळांनी अगदी विश्लेषणात्मक पद्धतीने केले आहे.
'सराई' या कादंबरीची समीक्षा त्यांनी अशीच केली आहे. ही कादंबरी स्वप्नरंजनात्मक आहे असे त्यांचे मत आहे. म्हणून प्रथम स्वप्नरंजनात्मक साहित्याचे त्यांनी विवेचन केले आहे. मग कथानक, त्यातील वास्तवता व स्वप्नमयता यांचे मिश्रण करण्यातील लेखकाचे कसब, यांचे वर्णन करून कादंबरीतील निसर्गवर्णनांकडे ते वळले आहेत. या निसर्गाचा कादंबरीतील घटनांशी अगदी एकजीव झाला आहे, असे गाडगीळांचे मत आहे आणि कादंबरी वाचताना वाचकाला त्याचा पदोपदी प्रत्यय येत असतो. कादंबरी वाचताना, तिचा आस्वाद घेताना, हा निसर्ग व त्याच्या अंकावर खेळणारी माणसे यांना वाचक अलग करू शकणार नाही. पण समीक्षण करताना समीक्षकाने मात्र त्यांचा पृथकपणेच विचार केला आहे. निसर्गाच्या विविध रूपांचा एक चित्रपटच आपल्या डोळयांपुढून कसा सरकतो ते सांगून मग त्यांतील माणसे (बाप्पाजी, केसूतात्या, लाडी, सयाजी- पात्रे) यांचे व्यक्तिदर्शन कसे झाले आहे ते गाडगीळ सांगतात. दोन्ही एकजीव असूनही सचेतन व अचेतन यांचे अतूट नाते आहे, हे पाहूनही त्याचे परीक्षण ते एकसमयावच्छेदेकरून करीत नाहीत. कथानक, निसर्ग, पात्रे यांचा विचार झाल्यावर गाडगीळांनी वातावरणाचा स्वतंत्रपणे विचार केला आहे.
ही कादंबरी स्वप्नरंजनात्मक आहे हे वाचकांना परोपरीने गाडगीळ पटवून देत आहेत. पण तसे करताना त्यातील घटकांचा अवयवशःच विचार त्यांनी केला आहे. कादंबरी ही एक एकसंध कलाकृती आहे हे अवधान गाडगीळांनी केव्हाही सुटू दिलेले नाही. रसिकांच्या मनावर तोच परिणाम व्हावा असा त्यांचा प्रयत्न आहे. पण हे करताना प्रत्येक घटक निराळा करून तो या स्वप्नरंजनाला कसा पोषक आहे हे दाखवावे अशीच पद्धत त्यांनी अवलंबिलेली आहे. मला वाटते, इतर कोणत्याच पद्धतीने हे करता आले नसते.
'लिलीचे फूल' या गंगाधर गाडगीळांच्या कादंबरीची समीक्षा- प्रा. गं. ब. ग्रामोपाध्ये यांनी केली आहे. (महाराष्ट्र साहित्य पत्रिका, ऑक्टो. डिसेंबर १९५५) तीही अशी विश्लेषणात्मकच आहे. प्रथम ग्रामोपाध्ये कादंबरीचा विषय सांगतात. एखाद्या मुलीवर अल्पवयात बलात्कार झाला तर रतिक्रीडेविषयी तिच्या मनात घृणा निर्माण होऊन रतिसुखाला ती पारखी होते, हे मानसशास्त्रीय प्रमेय हा तो विषय. मग हा विषय ज्या पात्रांच्याद्वारे गाडगीळांनी मूर्त केला आहे- करण्याचा प्रयत्न केला आहे- ती नीला व मुकुंद ही पत्रे, त्यांचे स्वभावविशेष, त्यांची भेट, सहवास, प्रेम इत्यादी यानंतर गाडगीळांनी कथानकाला अचानक कलाटणी देऊन कादंबरीला सनसनाटी बलात्कार-कथेचे स्वरूप दिल्यामुळे ती पूर्ण अपयशी कशी झाली आहे, हे ग्रामोपाध्यांनी दाखवून दिले आहे. हे परीक्षण करीत असताना मुळात शोकांतिकेची बीजे कथानकात असूनही, काही काळ शोककथेचा कलात्मक विकास झाला असूनही पुढे तिचा विचका कसा झाला हे ग्रामोपाध्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजे कादंबरीचे एकसंधत्व, एकजीवित्व त्यांना मान्य आहे. मूळ बीज वा त्याचा विकास अशी कादंबरी ही एक सजीव कलाकृती असते, याबद्दल त्यांचा मतभेद नाही. तो विकास प्रथम साधत कसा गेला व नंतर बिघडत कसा गेला हेच त्यांना परीक्षणात दाखवावयाचे आहे. पण असे करताना विषय, पात्रे, वातावरण, कथानक, पात्रांचे स्वभाव व कथानकातील घटना यातील सुसंगती- विसंगती, याच पद्धतीने त्यांनी परीक्षण केले आहे. आणि असे अवयवशः परीक्षण केल्यामुळेच कादंबरीचे समग्र रूप आपल्या डोळ्यांपुढे उभे राहते. हे रूप उभे करताना लेखकाच्या मनातील गोंधळाचेहीं ग्रामोपाध्यांनी विवरण केले आहे. साहित्याचे परीक्षण करताना साहित्यिकाचेही परीक्षण करणे अवश्य असते, असा अलीकडे दंडक आहे. त्याप्रमाणे टीकाकारांनी माणसाच्या सगळ्या मनोरचनेच्या बुडाशी कामविकार असतो, या विचारामुळे कादंबरीकाराच्या कलेचा बिघाड झाला हे दाखवून दिले आहे. पण हे सर्व विश्लेषणात्मक पद्धतीने.
धों. वि. देशपांडे हे सध्याच्या काळचे एक नाणावलेले टीकाकार माहेत. त्यांनी मर्ढेकरांच्या कवितेचे तीन लेखांत परीक्षण केले आहे. (सत्यकथा, १९५४ जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर.) देशपांडे हे मर्ढेकरांचे चाहते आहेत त्यांच्या कवितेचा या लेखात त्यांनी विपुल गौरव केला आहे. पण त्यांनी ही समीक्षा विश्लेषणात्मक पद्धतीने केली आहे. त्यांना सर्व काव्यात मर्ढेकरांचे व्यक्तित्वच शोधावयाचे आहे. म्हणजे त्यांच्या प्रतिभेचे समग्र रूपच पहावयाचे आहे. तरीही ते अवयवशः समीक्षा करतात. प्रथम ते मर्ढेकरांच्या भाषेची पाहणी करतात. तिच्यावर जुन्या संतवाङ्मयातील भाषेचा, संस्कृत साहित्याचा, इंग्रजी वाङ्मयाचा, त्यातही बायबलचा कसा संस्कार झाला आहे, हे देशपांडे उदाहरणे देऊन स्पष्ट करतात आणि मग मर्ढेकरांच्या विषयप्रतिपादनाच्या शैलीचा अभ्यास करतात. मर्ढेकरांच्या शैलीत तर्कसंगतीला प्राधान्य नाही, तिच्यात भावसंगतीला महत्व आहे, आणि यामुळेच केव्हा केव्हा त्यांचे काव्य दुर्बोध होते, असे देशपांडे म्हणतात. दुसऱ्या लेखात मर्ढेकरांच्या विचारधनाचा देशपांडे वाचकांना परिचय करून देतात. भाषा, निवेदनशैली व विचार या सर्वांचा एकजीव झालेला असतो हे देशपांडे यांना अमान्य नाही. पण म्हणून त्यांचे निरनिराळे परीक्षण करू नये, असे त्यांना वाटत नाही. स्त्री-पुरुष संबंध, परमेश्वर, युद्धानंतरचे मांगल्यहीन जीवन अशा भिन्न विषयांवरचे मर्ढेकरांचे विचार काय होते ते या लेखात समीक्षकांनी सांगितले आहे. आणि तसे करताना रस, अलंकार, शब्दचित्रे या गुणांमुळे मर्ढेकरांचे काव्य रम्य कसे झाले आहे हे ते दाखवून देतात. रस हाच काव्याचा आत्मा असे देशपांडे यांचे मत आहे. नवे संकेत, नव्या कल्पना, मर्ढेकरांची भावनानिष्ठ समतानता हा सर्व त्यांना फापटपसारा वाटतो. ही काव्याची साधने होत. त्यांनाच काव्य म्हणणे म्हणजे नरोटी पाहून आतील गरावर अभिप्राय देण्यासारखे आहे, असे ते म्हणतात.
तिसऱ्या लेखात तर देशपांडे यांनी मर्ढेकरांच्या व्यक्तित्वाचेच विश्लेषण केले आहे. काव्य किंवा कोणतीही ललितकृती एकसंध असते. त्यामुळे तिचे परीक्षण करताना भाषा, प्रतिपादनशैली, रस, अलंकार, कथानक, स्वभावपरिपोष असे पृथक्करण करू नये, असे ज्यांचे मत त्यांना हे फारच विचित्र वाटेल. मनुष्याचे व्यक्तित्व हे तर एकसंध असलेच पाहिजे. त्याचे विचार, श्रद्धा, आशा, आकांक्षा, त्याचे तत्त्वज्ञान, त्याची प्रतिभा इत्यादी सर्व मिळून त्याचे व्यक्तित्व बनते. मानवाच्या सर्व अभ्यासकांना हे मान्य आहे. पण त्यांचे परीक्षण करताना त्याचे विश्लेषण केलेच पाहिजे, हेही सर्वांना व देशपांडे यांना मान्य आहे. तसे विश्लेषण त्यांनी तिसऱ्या लेखाच्या प्रारंभी केले आहे. ते म्हणतात, 'मर्ढेकरांच्या व्यक्तित्वाला वेगवेगळे पैलू आहेत. त्यात तत्त्वज्ञ, कवी आणि माकड यांचा एक मनोज्ञ संगम आढळतो. वाचकाला त्या तिघांचे विश्लेषण करता येत नाही, आणि म्हणूनच त्यांच्याविषयी पुष्कळ गैरसमज पसरले आहेत. तेव्हा कवीचे चांगले आकलन व्हावयास हवे असेल तर विश्लेषण केले पाहिजे, असे देशपांडे यांचे मत उघड दिसते. पण यामुळे प्रा. वा. ल. कुलकर्णी त्यांना जबाबदार टीकाकार म्हणतील की नाही याची शंका येते.
तत्वज्ञ, कवी व माकड हे मर्ढेकरांच्या व्यक्तित्वाचे घटक सांगून देशपांडे यांनी त्यातील माकड प्रवृत्तीने जे उपरोधिक काव्य लिहिले त्याचे प्रथम परीक्षण केले आहे. यातून निर्माण होणारा विनोद अतिभेसूर आहे, पण त्यानेच जगाचे सत्यदर्शन घडते, असे समीक्षक म्हणतात. मग मर्ढेकरांतील कवीने 'हया गंगेमधि गगन वितळले,' 'बोंड कपाशीचे फुटे.' 'दवात आलिस भल्या पहाटे' या भावरम्य मधुर कविता आपल्याला दिल्या आहेत, असे सांगून त्यांच्यातील तत्त्वज्ञान लिहिलेल्या कवितांचे परीक्षण करून देशपांडे यांनी ही समीक्षा संपविली ताहे.
या सर्वांचा अर्थ असा की, ज्या कोणाला ललितकृती समजावून घ्यावयाची आहे त्याने विश्लेषणपद्धतीचा अंगीकार केला पाहिजे. अवयवशःच परीक्षण केले पाहिजे. समीक्षेची दुसरी काही पद्धती असू शकते ही अगदी भ्रान्त कल्पना आहे. स्वतः प्रा. वा. ल. कुलकर्णी यांनी केलेली एक दोन परीक्षणे पाहिल्यावर तर याविषयी कोणालाही शंका उरणार नाही.
'जिप्सी' या पाडगावकरांच्या कवितासंग्रहाला कुलकर्णी यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्या प्रस्तावनेत त्यांनी त्यांच्या प्रतिभेच्या स्वरूपाचे परीक्षण करताना तिचे भिन्न घटक अलग करूनच विवेचन केले आहे. प्रथम त्यांनी बालकवींप्रमाणेच पाडगावकर निसर्गात सहजतया कसे रंगून गेले आहेत, ते सांगितले. नंतर त्यांच्या काव्यातील शब्दचित्रांचा विचार केला, व ती शब्दचित्रे ज्या प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे निर्माण करतात त्या निसर्गविभ्रमाच्या व त्याचप्रमाणे कविमनाच्याही प्रतिमा आहेत, हे दाखवून दिले. मग पाडगावकर विविध भाववृत्तींची चित्रे काढण्यात कसे निपुण आहेत, हे सांगण्यासाठी 'क्षणपुष्पांच्या सरी', 'संथ निळे पाणी', 'शांत किनारा', 'रात्र भिजली' इत्यादी कवितांचा त्यांनी निर्देश केला. हे झाल्यावर पाडगावकरांच्या प्रेमकवितांचे कुलकर्ण्यांनी परीक्षण केले आहे. प्रेमभावनेतील जोश, तिने निर्माण होणारी हुरहूर, तिची अबोधता, मुग्ध आणि विमुक्त या दोन्ही वृत्तीचा या भावनेच्या अधिराज्यात येणारा सुखद अनुभव, या सर्वांत सामावलेलं भावसौंदर्य पाडगावकरांची कविता व्यक्त करू शकले, असे वा. ल. कुलकर्णी यांचे मत आहे. शेवटी, पाडगावकरांच्या प्रतिभेला भावजीवनाच्या पलीकडे असणाऱ्या अनंत अनुभव-विश्वाचे दर्शन अद्याप व्हावयाचे आहे, तसे झाल्यावर श्रेष्ठ, श्रेष्ठतर विचारानुभवांचे दर्शनही ती आपणांस निश्चित घडवील असा आशावाद प्रकट करून समीक्षकांनी हे परीक्षण संपविले आहे.
ऑक्टोबर १९५४ च्या 'सत्यकथे' च्या अंकात प्रा. वा. ल. कुलकर्णी यांनी सदानंद रेगे यांच्या 'काळोखाची पिसे' या लघुकथा- संग्रहाचे परीक्षण केले आहे त्यात रेगे यांचे वातावरणनिर्मितीचे कौशल्य, लोकविलक्षणाचे त्यांना असलेले आकर्षण, त्यांची कल्पकता, त्यांच्या लेखणीतला उपरोध, त्यांच्या प्रतिभेत असलेली मिस्किलपणाची छटा इत्यादी गुणांचे त्यांनी क्रमवार वर्णन केले आहे. त्या कथांचे अवयवशः परीक्षण केले आहे. वास्तविक हे सर्व गुण कथेशी एकजीव झालेले असतात कारण ते गुण मूळ कविप्रवृत्तीतले असतात. रंग, सुवास, आकार हे गुण म्हणजे फूल नव्हे. त्याचप्रमाणे कल्पकता, उपरोध, मिस्किलपणा हे गुण म्हणजे कथा नव्हे. म्हणून फुलाचे सौंदर्य लक्षात घेताना त्याच्या गुणांचा पृथक् विचार करणे जसे अयुक्त, तसेच कथेच्याही बाबतीत असले पाहिजे. समग्र रूपाचा एकदम विचार केला पाहिजे पण तसा कुलकर्णी यांनी केलेला नाही. 'टीका : काल, आज व उद्या' या लेखात तसे मत मांडूनही प्रत्यक्ष परीक्षण करताना त्यांनी दर ठिकाणी अवयवशःच परीक्षण केले आहे.
असे का व्हावे ? याचे कारण अगदी उघड आहे. कलाकृती एकसंध असते म्हणून तिचे परीक्षण एकसंध व्हावे, ही कल्पनाच मुळी भ्रान्त आहे. तसे परीक्षण करणे केव्हाही शक्य नाही. समीक्षकांना कलाकृतीच्या एकसंधपणाची जाणीव असली पाहिजे. ते ध्यानात ठेवूनच तिच्या आत्म्याशी सर्व घटक सुसंगत कसे आहेत हे त्यांनी दाखविले पाहिजे. वाचकांच्या मनापुढे, रसिकाच्या दृष्टीपुढे परीक्षण वाचल्यानंतर त्या ललित कृतीचे समग्ररूप उभे राहिले पाहिजे, त्यांना सकलदर्शन झाले पाहिजे, हा आग्रह युक्त आहे. वामनराव जोशी, तात्यासाहेब केळकर, ना. सी. फडके या साहित्यसमीक्षकांना हा आग्रह सर्वस्वी मान्य होता. त्यांनी जी समीक्षा केली ती याच धोरणाने केली. आजचा परीक्षणकार कोणत्याही ललितकृतीकडे पाहताना प्रथम ती ललितकृती जे रूप घेऊ पहात आहे ते रूप घेणे व ती जे व्यक्त करू पहात आहे ते व्यक्त करणे तिला कितपत साधले आहे हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असे वा. ल. कुलकर्णी म्हणतात. पण यात नवीन काही नाही. जुन्या टीकाकारांनी हेच केले आहे. तात्यासाहेब केळकर यांनी केलेले 'मतिविकार' या श्री. कृ. कोल्हटकरांच्या नाटकाचे परीक्षण पहा. हे नाटक लिहिण्यात कोल्हटकरांचा जो हेतू होता तो त्यातून सिद्ध होत नाही, असा आक्षेप घेऊनच केळकरांनी समीक्षेला प्रारंभ केला आहे. विधवाविवाहाचे समर्थन करणे, हा कोल्हटकरांनी हेतू म्हणून सांगितला आहे. पण नाटकात त्यांनी विरोधी पक्षाची बाजू अत्यंत हीन करून मांडली आहे. त्या पक्षाचे सर्व लोक नीच, अधम असे दाखविले आहेत. हरिहरशास्त्री हे जे मुख्य विरोधक त्यांनी विरोधी पक्षाचा म्हणून जो युक्तिवाद मांडला आहे, तो सनातन्यांनाही किळसवाणा व हिडीस वाटेल असा आहे त्यामुळे त्यांच्या प्रतिकूलतेस काहीच किंमत नाही. त्यानंतर विहार, तरंगिणी, चंद्रिका या व्यक्तिरेखांचा विचार तात्यासाहेबांनी केला आहे. विहार हा पुनर्विवाहाचा विरोधक. त्याची बहीण चंद्रिका ही विधवा होती. तिच्या पुनर्विवाहास त्याचा विरोध होता. पण, 'मी विधुर झालो आणि मी पुनर्विवाह केला तर मी चंद्रिकेच्या विवाहास परवानगी देईन,' असे तो म्हणतो. पुढे काही अकल्पित घटना घडवून कोल्हटकरांनी तो विधुर होतो, पुनर्विवाह करतो व बहिणीला परवानगी देतो, असे दाखविले आहे. त्यावर तात्यासाहेब म्हणतात, 'विहारची फजिती हा पुनर्विवाह-पक्षाचा आधार योग्य नाही. समाज वश करण्याचे चेष्टा हे साधन नव्हे. अशाने समाज वळत नाही. त्याच्या न्यायबुद्धीला, करुणाबुद्धीला आवाहन करावयास हवे.'
सबंध ललितकृती ही एकसंध आहे, तिचा काही हेतू आहे व त्याचे अनुसंधान समीक्षा करताना सुटता कामा नये हे तात्यासाहेब चांगले जाणतात हे, मतिविकाराचे परीक्षण वाचताना सारखे प्रत्ययास येत असते. येवढेच नव्हे तर कोल्हटकरांची एकंदर नाट्यसृष्टी त्यांच्या डोळ्यांसमोर आहे, आणि त्या नाटककाराचे व्यक्तित्व, त्याची प्रतिभा, त्याची नाट्यकला या सर्वांच्या संदर्भात या नाटकाचे परीक्षण तात्यासाहेब करीत आहेत हेही प्रारंभापासून दिसते. 'गुप्तमंजूष' या नाटकात स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार आहे, 'वीरतनया'त विधुरविवाह आहे. 'मूकनायका'त मद्यपान निषेध आहे. यांपैकी कुठल्याच नाटकात मूळचा हेतू नीटसा साधलेला नाही, असे केळकरांनी म्हटले आहे. तेव्हा समीक्षेमध्ये सर्व नाट्यकृती डोळ्यापुढे उभी रहावी, इतकेच नव्हे तर तो नाटककारही दिसावा, असेच धोरण समीक्षकांचे होते हे स्पष्ट आहे. पण हे दर्शन घडविताना तात्यासाहेबांनी अवयवशः परीक्षण केले आहे त्याचे विवेचन करण्याची अर्थातच येथे जरूर नाही. कारण ते तसे परीक्षण करतात हा तर त्यांच्यावर 'आरोप' आहे. तसे करूनही कलाकृतीचे एकसंध दर्शन ते घडवू शकले, हे ध्यानात घेतले पाहिजे.
ना. सी. फडके यांनी खाडिलकर, देवल, गडकरी यांच्या नाट्यकृतींची परीक्षणे केली आहेत. तीही अशीच आहेत. त्यात नाटककाराच्या व्यक्तित्वाचा अभ्यास आहे, त्याच्या कलाकृतीचे समग्र दर्शन आहे, आणि हे सर्व कलागुणांचे पृथक्करण करून साधले आहे. 'जे आपल्याला आवडते त्याचा पुरस्कार करण्याची व जे नावडते त्याचा धिक्कार करण्याची जबर इच्छा ज्याला असते व या अंतःप्रेरणेने प्रवृत्त होऊन जो लिहितो तोच खरा जिवंत साहित्यिक' असे म्हणून देवलांच्या 'शारदेचा जन्म' या प्रेरणेतूनच कसा झाला आहे, ते पुढच्या समीक्षेत फडक्यांनी दाखविले आहे आणि 'स्त्री'वरचा जो अन्याय पाहून देवलांना हो नाट्यकृती स्फुरली त्याच्या मूर्तीकरणाच्या दृष्टीने नाट्याचे व्यक्तिदर्शन, कथानक, संवाद, संगीत हे प्रत्येक अंग कसे अनुकूल आहे, पोषक आहे याचे सोदाहरण विवेचन केले आहे.
गडकऱ्यांवरील व्याख्यानांत त्यांनी याचप्रमाणे गडकऱ्यांच्या नाट्यसृष्टीचे 'सकलदर्शन' घडविले आहे. आणि त्याचबरोबर गडकऱ्यांच्या व्यक्तित्वातून ही नाट्यसृष्टी कशी निर्माण झाली तेही विवरून सांगितले आहे. चमत्कृतीची हौस, अद्भुताची आवड, हा गडकऱ्यांच्या प्रकृतीचा स्थायीभाव आहे हे सांगून, त्यांच्या नाटकांची कथानके, त्यांतील स्त्री पुरुष व्यक्तिरेखा, त्यांतील भाषा या आवडीतून कशी निर्माण झाली ते फडके यांनी दाखवून दिले आहे. संभाव्य- असंभाव्यतेचा विचार गडकरी केव्हाही करीत नाहीत प्रत्येक ठिकाणी अतिरेक, अत्युक्ती हेच त्यांचे लक्षण ! सर्व अतिरंजित. त्यांच्या नाटकात कमालीचे शोककारक प्रसंग आहेत आणि फडक्यांच्या मते शोक ही गडकऱ्यांची खरी शक्ती आहे. पण तरीही त्यांच्या शोकपर्यवसायी नाटकांना शोकांतिकेची भीषण नाट्याची प्रतिष्ठा प्राप्त होत नाही कारण त्यातील घटनांत अपरिहार्यता मुळीच नाही.
फडके म्हणतात, लेखकाच्या लेखामागे त्याची अंतःप्रवृत्ती त्याचे मनोधर्म, त्याचे विशिष्ट मनोव्यापार त्याच्या मनाची बैठक, त्याचे अनुभव, त्याचा दृष्टिकोन ही सर्व असतात, आणि यांतूनच त्याची साहित्यसृष्टी निर्माण होते. या तत्त्वाला अनुसरून फडक्यांनी गडकऱ्यांच्या नाटकांचे परीक्षण करून, विश्लेषणात्मक पद्धतीने त्या कल्पित सृष्टीचे समग्र दर्शन रसिकांना घडविले आहे.
'भंगलेले देऊळ' या माडखोलकरांच्या कादंबरीचे परीक्षण वामनराव जोशी यांनी केवळ कलामूल्यांच्या दृष्टीने केले आहे. अनूच्या मनःस्थितीचे व स्वभावविशेषांचे चित्रण हा या कादंबरीचा, त्यांच्या मते उद्देश आहे व तो चांगला सफल झाला आहे, असा त्यांचा अभिप्राय आहे. हे परीक्षण कथानक, स्वभावचित्रण, भाषाशैली अशा क्रमाने व जुनाट पद्धतीनेच केलेले आहे. त्यानंतर पात्रांच्या स्वभावातील दोष दाखविले आहेत. अनूच्या शेवटी व्याख्यानबाजीवर टीका केली आहे. आणि तरीही त्या ललितकृतीचे एकसंध दर्शन आपल्याला घडत नाही, असे कोणालाही म्हणता येणार नाही.
येथपर्यंत जुन्या-नव्या अनेक टीकाकारांच्या समीक्षांची उदाहरणे दिली आहेत. नवे टीकाकार कोणचे त्याचा उल्लेख वा. ल. कुलकर्णी यांनी केलेला नाही पण गंगाधर गाडगीळ, गं. ब. ग्रामोपाध्ये, धों. वि. देशपांडे हे नवे टीकाकार आहेत हे त्यांना मान्य होईल असे वाटते. या मालिकेत मी प्रा. वा. ल. कुलकर्णी यांचाही समावेश केला आहे. त्यालाही त्यांची संमती मिळेल अशी आशा आहे. त्याचप्रमाणे तात्यासाहेब केळकर, ना. सी. फडके व वा. म. जोशी हे जुन्या युगाचे टीकाकार आहेत याविषयीही दुमत होईल असे वाटत नाही. केळकर व जोशी यांचा कुळकर्ण्यांनी जुन्यांच्या यादीत नामनिर्देश केला आहे. या टीकाकारांच्या वर निर्देशिलेल्या ज्या समीक्षा आहे त्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, ललितकृतीचे समग्र दर्शन एकसमयावच्छेदे करून घडवावयाचे हा त्यांचा हेतू होता, (तसा असतो असे कुलकर्णी म्हणतात.) तरी नव्यांना अवयवशःच परीक्षण करावे लागले, आणि जुन्या टीकाकारांनी अवयवशः परीक्षण केले तरी समग्र दर्शन घडविण्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले आहेत.
माझ्या मते, ललितकृती एकसंध असते म्हणून तिचे परीक्षणही तसेच एकसंधपद्धतीने झाले पाहिजे, हा आग्रह अगदी चुकीचा आहे. परीक्षण याचा एकच अर्थ असू शकतो. आणि अवयवांचे विश्लेषण, घटकांचे पृथक्करण हाच तो अर्थ. याशिवाय दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने परीक्षण करणे शक्यच होणार नाही. ती कल्पनाच भ्रांतिष्ट आहे. ललितकृती एकसंध असते तशा सृष्टीतल्या अनंत वस्तू एकसंध असतात त्यांचेही परीक्षण एकसंधपद्धतीने, घटकांचे पृथक्करण न करता करावयाचे म्हटले तर अनर्थच होईल. मानवी संसारात आजपर्यंत जी शास्त्रे निर्माण झाली त्यांचा पाया पृथक्करण हाच आहे. मानवाचा देह हा तर एकसंध आहे ना ? ती सृष्टीची सर्वश्रेष्ठ ललितकृती मानली जाते. पण त्या देहाची चिरफाड करून त्याचे घटक घटक व त्यांचेही उपघटक पृथक् केले नव्हते तोपर्यंत या श्रेष्ठ कलाकृतीचे रहस्य कोणालाच उमगले नव्हते. मायकेल एंजलो हा जगद्विख्यात चित्रकार व शिल्पकार होता. त्याच्या कलाकृती अद्वितीय मानल्या जातात. पण हे अलौकिक यश त्याला कशामुळे प्राप्त झाले ? स्मशानभूमीतून चोरून प्रेते आणून त्यांची चीरफाड करून मानवी देहाच्या घटकांचा त्याने सूक्ष्म अभ्यास केला म्हणून त्याला निर्मिती करावयाची होती ती एकसंध कलाकृतीची. मानवाच्या चित्राची, मूर्तीची ! पण त्यासाठी त्याला घटक-पृथक्करण करावे लागले. अशा पृथक्करणावाचून समग्र दर्शन होणे शक्य नाही, असाच याचा अर्थ होतो. वैद्यकशास्त्राला देहाचे पृथक्करण करावे लागतेच, पण कलाकारालाही करावे लागते. हे यावरून कोणालाही मान्य करावे लागेल सृष्टीत अनंत वस्तू आहेत. धान्याचे दाणे आहेत. वृक्षांची फळे आहेत, फुले आहेत, लता आहेत, निर्झर आहेत, हिरवळ आहे, चंद्र-सूर्य-तारे आहेत शास्त्रज्ञांना यांचे ज्ञान हवे असते. ते ज्ञान पृथक्करणावाचून कधीही मिळत नसते रसायन पदार्थविज्ञान, यांची उभारणी पृथक्करणावाचून होणे शक्यच नाही पृथक्करण हा त्या शास्त्रांचा आत्मा आहे. आणि मायकेल एंजलोच्या कलाकृतींचे रहस्य ध्यानात आले असेल, तर कलावंतालाही या ज्ञानाची आवश्यकता आहे हे आपल्याला सहज पटेल. त्यालाही सृष्टीचे वर्णन करावयाचे असते. त्याचे वर्णन भावनात्मक, कल्पनात्मक असते, हे खरे. पण सृष्टीच्या सूक्ष्म अवलोकनावाचून त्याला हे करता येणार नाही. मराठीतल्या पंडित कवींनी असे अवलोकन न करता सृष्टिवर्णने केली. त्यामुळे त्यांची सृष्टी कशी झाली, हे साहित्याच्या अभ्यासकांना माहीतच आहे. तेव्हा अवलोकन, सूक्ष्म निरीक्षण, अभ्यास हे कलाकारालाही अवश्य आहे आणि अवलोकन आले की पृथक्करण, विश्लेषण, विच्छेदन हे अटळ आहे.
टीकाकारालाही ललितकृतीचे अवलोकन करावयाचे असते. समीक्षा हे शास्त्र आहे. आज टीका ही नवनिर्मिती आहे, असे एक मत रूढ आहे. त्याला अर्थ आहे, पण तो फार मर्यादित. प्रामुख्याने समीक्षा हे शास्त्रच आहे. रसिकाने केवळ आस्वाद घेणे, कलाकृतीचा आनंद अनुभणे हे शास्त्र नव्हे त्यामुळे तेथे पृथक्करणाचा संबंध येत नाही. पण टीका समीक्षा हे कलाकृतीच्या रहस्याचे विवेचन आहे. ते शास्त्राच्या कक्षेतच येणार. नाही तर वैयक्तिक मतापलीकडे साहित्यसमीक्षेला कसलीच प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. म्हणून काही मूल्ये, काही निकष निश्चित करून शास्त्रीय दृष्टीने साहित्याकडे पाहणे हेच समीक्षकाचे कार्य आहे. आणि शास्त्रीय दृष्टी म्हटल्याबरोबर घटकपृथक्करण हे अनिवार्य आहे. त्यावाचून अवलोकन, निरीक्षण, अभ्यास याला कसलाही अर्थ नाही.
तेव्हा ललितकृती ही एकसंध आहे म्हणून परीक्षणही एकसंध असावे ही कल्पना भ्रान्त आहे.
आणि ती नुसती भ्रान्त आहे एवढेच नव्हे, तर समाजविघातक आहे. पृथक्करण करण्याची शक्ती ही मानवी मनाची फार मोठी शक्ती आहे. प्रत्येक मनुष्याला ती थोड्याफार प्रमाणात अवश्यच असते. शास्त्रज्ञाला तिची फारच जरूर असते. आणि माझ्या मते तिची तितकीच जरूर कलाकाराला असते. मानवी जीवन पाहून, अवलोकून, त्याला काव्य, कादंबरी लिहावयाची असते. हे जीवन पाहताना मानवी मनाचा त्याला सखोल अभ्यास करावयाचा असतो हा अभ्यास त्या मनाचे विश्लेषण केल्याशिवाय कसा शक्य आहे? चित्रकार, शिल्पकार, मूर्तिकार यांना देहाचे विश्लेषण करणे जितके अवश्य, तितकेच साहित्यिकाला मनाचे पृथक्करण अवश्य आहे. अर्थ असा की, पृथक्करणाचे सामर्थ्य हे एक संस्कृतीचे लक्षण आहे. आणि नवटीकेचे पुरस्कर्ते त्याच्यावरच आघात करीत आहेत.
आणि नवसाहित्यात ज्या अनेक अपप्रवृत्ती, समाजविघातक कल्पना निर्माण झाल्या आहेत त्यांशी हे सुसंगतच आहे. समाजाच्या सर्व महत्त्वाच्या व श्रेष्ठ शक्तींची चेष्टा करावी, विटंबना करावी, अशीच साहित्याची प्रवृत्ती होत आहे. मनुष्याच्या शब्दांना अर्थ असावा ही समाजाची पहिली गरज, पण हेच या साहित्यिकांना मान्य नाही. भाषा हा समाजजीवनाचा पाया आहे. एकाचे मनोगत दुसऱ्याला कळविणे यावर सर्व मानवी संस्कृती उभी आहे. पण या पायाभूत शक्तीवरच साहित्यिक घाव घालीत आहेत आणि नवी टीका त्याचे समर्थन करीत आहे; दुर्बोधत्व हेच आमचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून भूषण मिरवीत आहे कविवर्य कुसुमाग्रज यांनी 'साहित्यातील आग्रह आणि दुराग्रह' या आपल्या भाषणात असल्या अनेक अपप्रवृत्तींवर टीका केली आहे. एका कवीने त्यांना आपली कविता वाचावयास दिली. ती वाचून त्यांनी तिच्यावर बरा अभिप्राय दिला चांगल्या काव्यलेखनाची शक्यता यातून दिसते, असे त्याला सांगितले, यावर तो अगदी भकास हसला. या कविता अगदी टाकाऊ आहेत असे, तोच म्हणाला. कारण काय ? तर आपल्या प्रत्येक काव्याच्या प्रत्येक ओळीतून काही अर्थ निष्पन्न होतो, याचे त्याला दुःख होत होते ! काव्याला अर्थ असणे हा महादोष, तसाच सामाजिक जीवनाशी त्याचा संबंध असणे हा दुसरा दोष ! कारण मग ती कविता प्रचारक आहे, असे होईल. कुसुमाग्रज म्हणतात, आजच्या सोवळ्या साहित्यात प्रचार ही वस्तू फारच भयानक मानली जाते. समाजजीवनापासून अलिप्त राहण्याच्या या वृत्तीतूनच साहित्यिक हा नीतिबाह्य आहे हे मत निर्माण झाले आहे. कुसुमाग्रज या अलिप्ततेला कबरस्तान म्हणतात साहित्यिक स्वतःला या कबरस्तानात कोंडून घेत आहेत. प्रा. वा. ल. कुलकर्णी यांनी 'आजची मराठी कविता' या आपल्या भाषणात, श्रेष्ठ विचारानुभवातून प्रकट झालेली कविता आज क्वचितच पहावयास मिळते अशी तक्रार केली आहे. त्याचप्रमाणे खऱ्याखुऱ्या चिंतनशील प्रतिमेचा आज अभावच दिसतो असेही ते म्हणतात. म्हणजे आजच्या साहित्याचा ओघ कोणीकडे चालला आहे ? शब्दांना अर्थ असणे वाईट, आपले मनोगत दुसऱ्यांना कळणे निषिद्ध, समाजजीवनाशी संबंध असणे हे महापाप, नीति-अनीतीचा विचार वर्ज्य, श्रेष्ठ विचारानुभवाचे महत्त्व नाही व चिंतनशीलतेचा अभाव आहे !
याच्याच जोडीला पृथक्करणशक्तीची निर्भर्त्सना- ही वृत्ती आणून ठेविली की समाजाच्या सर्व जीवनशक्तींना पोखरून टाकण्याचे आजच्या साहित्याचे उद्दिष्ट पुरे होईल, असे वाटते.
कलाकृतीच्या एकसंधत्वावर, एकजीवित्वावर हा आक्षेप नाही. ते एकजीवित्व रसिकांच्या मनापुढे उभे करणे हेच टीकाकाराचे कार्य, याबद्दल वाद नाही हे एकसंधत्व प्रतीत करून देण्यासाठी समीक्षाही तशीच एकसंध- पद्धतीने केली पाहिजे, हा जो नवटीकेचा आग्रह त्यावर हा आक्षेप आहे. मर्ढेकरांनी म्हटले आहे की, 'वाङ्मयकृती ही संभवनीय घटनांची सरळ माळ नसते. माळेतील एक-एक मण्याची जशी आपल्याला जाणीव होते तशी वाङ्मयकृतीतील आशयाची होत नाही. तर भावनात्मक लयांची ही आकृती एकमयावच्छेदेकरून आपणांस प्रतीत होत असते.' साहित्यकृती रसिकास या प्रकारे प्रतीत होते, याबद्दल वाद नाही. तशी ती झाली तरच तिचे खरे सौंदर्य त्यांना समजेल हे खरे. पण प्रतीती निराळी आणि परीक्षण निराळे. वाङ्मयकृती ही भावनात्मक लयांची केंद्रपूर्ण आकृती असते, हे जरी खरे असले तरी तिचे परीक्षण 'प्लॉट, कॅरॅक्टर, डिक्शन, इमेजरी' यांचे विच्छेदन करूनच होणे अवश्य आहे. याच लेखात मर्ढेकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, याच प्लॉट, कॅरेक्टर वगैरेच्या कल्पना जर थोड्या अधिक सयुक्तिक अशा तत्त्वांना अनुसरून वापरल्या तर त्यांच्यातील परंपरागत दोष टाळता येणे शक्य आहे ही अधिक सयुक्तिक तत्त्वे कोणती व त्यांना अनुसरून या कल्पना कशा वापरावयाच्या, याचा खुलासा मर्ढेकरांनी केलेला नाही. खरे म्हणजे मर्ढेकरांनी कसलाच खुलासा केलेला नाही. ललितकृतींच्या घाटासंबंधीच्या ॲरिस्टॉटलपासून परंपरेने चालत आलेल्या कल्पना रद्द ठरवून 'भावनात्मक लयाची' आपली कल्पना मांडताना दहा-पाच कादबऱ्या, काही नाटके, काही भावगीते यांची उदाहरणे घेऊन त्यांना ती लावून दाखविणे अवश्य होते. पण उदाहरणे देण्याची मर्ढेकरांची रीतच नाही. प्रा. वा. ल. कुलकर्ण्यांचीही नाही फ्रॅन्सिस बेकनच्या पूर्वीच्या जुनाट काळात हे दोघे वावरत आहेत, असे त्यांचे लिखाण वाचीत असताना वाटते. प्रत्यक्ष जीवनाशी संबंध न येऊ देता तर्कावरून तर्क लढवीत बसणे, ही त्या वेळची रीत होती. मर्ढेकरांनी तीच अवलंबिलेली आहे. लेखनपूर्व आत्मनिष्ठा, लेखनगर्भ आत्मनिष्ठा, भावनानिष्ठ समतानता या आपल्या कल्पना त्यांनी अशाच मांडल्या आहेत. आत्मनिष्ठेचा विचार सर्वस्वी नवीन असा त्यांना मांडावयाचा होता. तेव्हा नाटक, कादंबरी, लघुकथा या सर्व प्रकारची उदाहरणे घेऊन त्यांनी तो सिद्ध करावयास हवा होता. पण त्यांनी एक-दोन भावगीतांच्या उदाहरणावर भागविले. आणि तेही त्यांच्या रचनेचा पुरा शोध न घेता ! माझी अशी खात्री आहे की, आपल्या नवीन साहित्यविषयक सिद्धान्तांची मांडणी करताना मर्ढेकरांनी सर्व वाङ्मयप्रकाराची विपुल उदाहरणे देऊन लेख लिहिण्याची पद्धत ठेवली असती तर निम्म्याच्यावर लेख त्यांनी लिहिलेच नसते. त्या कल्पनांचा साहित्याच्या टीकेत विनियोग करू लागताच त्यातला भ्रांतिष्टपणा त्यांच्या ध्यानात आला असता. पण दुर्दैवाने तसे झाले नाही आणि त्यांनी हवेत सोडून दिलेल्या कल्पनांवरच आजचे मराठी टीकाशास्त्र तरंगत आहे. मर्ढेकरांनी आधारप्रमाणांनी अर्वाचीन पद्धतीने, विवेचन केले असते तर 'भावनात्मक लयांची केन्द्रपूर्ण आकृती' म्हणजे काय ते स्पष्ट झाले असते. मग तिचे परीक्षण एकसंध करावयाचे की अवयवशः, त्यातील अधिक उद्बोधक कोणते, ते निश्चित ठरविता आले असते. परंपरागत टीकासंप्रदाय, ते कोणाला म्हणतात तेही मग कळले असते. प्लॉट, कॅरॅक्टर, इमेजरी हे इंग्रजी शब्द त्यांनी वापरले आहेत. त्यावरून अर्वाचीन पाश्चात्त्य टीकाकारही रोमँटिसिझमच्या उदयानंतरचे टीकाकारही समीक्षा करताना ललितकृतीचा एकसंधपणा ध्यानात घेत नव्हते, असे त्यांना म्हणावयाचे आहे की काय अशी शंका येते. तसे ते म्हणतील असे वाटत नाही. वा. ल कुलकर्णी यांनीही आजच्या नव्या जबाबदार टीकाकारांची लक्षणे सांगताना एकाही टीकाकाराचा उल्लेख केला नाही. त्याच्या टीकेच्या नव्या लक्षणांची उदाहरणे देऊन चर्चा केली नाही. प्रत्यक्ष साहित्याशी संबंध येऊ न देता बेकनपूर्व जुनाट पद्धतीने केलेले हे विवेचन हवेतून जमिनीवर उतरतच नाही. ते उतरावे म्हणून त्यांनी स्वतः केलेल्या टीका पहाव्या तर त्या विश्लेषण- पद्धतीनेच केलेल्या आहेत, असे दिसते.
म्हणून पुन्हा एकदा खुलासा करावासा वाटतो की, ललितकृतीचे एकसंधत्व कोणीही अमान्य केलेले नाही. टीकाकारांनी परीक्षण करताना याचा कधीही विसर पडू देता कामा नये हे खरेच आहे. पण म्हणून समीक्षाही एकसमयावच्छेदेकरून करावी ही कल्पना प्रान्त आहे. या बाबतीत प्रा. श्री. के. क्षीरसागर यांनी 'टीका : जुनी व नवी ' या आपल्या भाषणात मांडलेले विचार सयुक्तिक आहेत, असे वाटते. कलाकृतीच्या एकजीवित्वाचे महत्त्व त्यांनीही प्रतिपादिले आहे, आणि समीक्षेमध्ये त्याकडे दुर्लक्ष करणे यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. वाङ्मय लिहिताना कवीच्या डोळ्यांसमोर एक सुस्पष्ट जीवनाकृती असते. जीवनाची विशिष्ट कल्पना उमटविणे हा महाकवींच्या कलेचा हेतू असतो, आणि ती जीवनाकृती रसिकांना दाखविणे हा समीक्षकांचा हेतू असला पाहिजे, हे क्षीरसागरांचे मत केव्हाही ग्राह्यच आहे. समीक्षेचे हे उद्दिष्ट मनात ठेवूनच त्यांनी जुन्या टीकापद्धतीतील दोष दाखविले आहेत. पण ती जुनी टीकापद्धती म्हणजे प्रामुख्याने संस्कृत टीका- पद्धती होय. ते मल्लिनाथादी टीकाकार रस, ध्वनी, अलंकार यापलीकडे जातच नसत. क्षीरसागरांचे म्हणणे असे की, हे केवळ काव्याचे अवयव झाले. संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी कलाकृतीच्या सर्वांगांना व्यापणारे बीज न मानल्यामुळे, औचित्य आणि ध्वनी या व्यापकतर तत्त्वांचाही विनियोग जुन्या टीकालेखनात फुटकळ व जुजबी असाच होतो. जुन्या संस्कृत टीकेबरोबरच कलेचा मूळ आत्मा न ओळखणाऱ्या पाश्चात्य पौर्वात्य समीक्षाकारांवरही क्षीरसागरांनी आक्षेप घेतला आहे. पण त्यांचा सगळा आक्षेप मूळ आत्मा, म्हणजेच कलाकृतीचे एकजीवित्व विसरून पृथक् काव्यगुणांचा- रस, ध्वनी, अलंकार यांचाच विचार करणाऱ्या समीक्षेवर आहे. आणि तो सयुक्तिक आहे यांत शंकाच नाही.
गेल्या शंभर वर्षांतील पाश्चात्त्य टीकाकारांच्या समीक्षापद्धतीचे स्वरूप पाहिले तर असेच दिसेल की, त्यातील नामांकित टीकाकारांनी पृथक्करण- पद्धतीचाच अवलंब केला आहे. कलेचे एकसंधत्व, एकजीवित्व कोणालाच अमान्य नाही. क्षीरसागर म्हणतात त्याप्रमाणे कवीच्या डोळ्यांपुढची जीवनाकृती टीकाकाराने सुस्पष्ट केली पाहिजे याबद्दलही दुमत नाही. पण टीका अवयवशः करू नये, नवा जबाबदार टीकाकार, कथानक, स्वभावलेखन, निवेदनशैली असे विश्लेषण करीत नाही, हे कोणालाच मान्य नाही असे दिसते. ए. सी. ब्रँडले यांचा 'शेक्स्पीरियन ट्रॅजिडी' हा या शतकाच्या प्रारंभी प्रसिद्ध झालेला ग्रंथ पहा. प्रथम ब्रँडले यांची शेक्सपीयरच्या शोकां तिकेचे स्वरूप स्पष्ट केले आहे आणि नंतर हॅम्लेट, आथेल्लो, लियर, मॅक्बेथ या नाटकांचे त्या दृष्टीने परीक्षण केले आहे. हॅम्लेट या शोकांतिकेची बीजे हॅम्लेटच्या स्वभावातच आहेत, हे प्रारंभी सांगून नंतर ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी कथानकाचे परीक्षण केले आहे व प्रत्येक घटनेला हॅम्लेटच्या अति विवेकी, दोलाचल वृत्तीमुळे कसे वळण मिळाले आहे ते दाखविले आहे. त्यानंतर याच दृष्टीने हॅम्लेट व ऑफेलिया यांच्या प्रेमाचा विचार केला आहे व शेवटी राजा, राणी, प्रधान पोलोनियस, हॅम्लेटचा मित्र होरॅशियो यांच्या स्वभावाचे परीक्षण करून हे सर्व घटक या शोकांतिकेत कोठे कसे बसतात ते स्पष्ट केले आहे. पुढील सर्व शोकांतिकांची ब्रँडले यांनी अशीच समीक्षा केली आहे. प्रत्येक नाट्यकृतीत मूळ बीज कोठे आहे, ते प्रथम दाखवून नंतर कथानक, व्यक्तिरेखा, प्रेमभावना, अहंभावना यांतून त्याचा वृक्ष कसा झाला हे स्पष्ट करावे, हीच पद्धत त्यांनी अवलंबिली आहे. ब्रँडले यांचा ग्रंथ १९०४ सालचा आहे.
आता १९३० ते ४० या दरम्यानचे एक-दोन टीकाकार पाहू ई. डब्यू टिलियार्ड हे केंब्रिज विद्यापीठातील इंग्लिश साहित्याचे प्राध्यापक. त्यांचा 'मिल्टन' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यातील 'पॅराडाइज् लॉस्ट' या मिल्टनच्या महाकाव्याची समीक्षा पाहा. प्रथम टिलियार्ड यांनी एका प्रकरणात कथानकाची रूपरेषा सांगितली आहे आणि मग ते काव्याचा विषय व ते रचण्यातला मिल्टनचा हेतू याकडे वळले आहेत. त्यांच्या मते सद्-असद्विवेकाचा संघर्ष हा या काव्याचा विषय आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाकांक्षा व सत्तामोह व बुद्धी व विषयवासना यांचाही संघर्ष यात चित्रिलेला आहे. या सिद्धान्ताचे विवेचन त्यांनी ॲडम, इव्ह, सेटन यांच्या स्वभावातील घटक, त्यांचे वेळोवेळीचे उद्गार यांच्या आधारे केले आहे. दर वेळी प्रत्येक व्यक्ती कोणत्या विकार-विचारांची प्रतीक आहे, हे दाखवीत दाखवीत त्यांनी हे विवरण केले माहे. 'पॅराडाइज् रीगेन्ड' याच्या समीक्षणात तर प्रकरणांची नावेच विषय, स्वभावरेखा, शली, रचना अशी आहेत. तेव्हा हे परीक्षण अवयवशः केलेले आहे, यात वादच नाही. मर्ढेकरांनी असल्या परीक्षणाचीच हेटाळणी केली आहे. पण मिल्टनच्या महाकाव्याचे मर्म उकलून दाखविण्यात टिलियार्ड यांना जितके यश आले आहे, तितके दुसऱ्या कोणाला व दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने येईल असे वाटत नाही. 'वाङ्मयकृती म्हणजे भावनेची लयबद्ध आकृती असते,' असे मर्ढेकर म्हणतात. या शब्दसंहतीचा कोणताही अर्थ केला तरी टिलियार्ड यांचे समीक्षण तो प्रत्यक्षात उतरवील यात शंका वाटत नाही.
डेव्हिड सेसिल हे ऑक्स्फर्ड विद्यापीठातील इंग्रजीचे प्राध्यापक. 'अर्ली हिक्टोरियन नॉव्हेलिस्टस्' हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात डिकन्सच्या 'कादंबरी'चे मूल्यमापन त्यांनी त्यातील अद्भुत घटना करुण- रसपरिपोष, वर्णनशैली, वातावरणनिर्मिती व्यक्तिरेखा, विनोद, रचना, त्यातील नीतीचा संदेश, बोधवाद अशा क्रमाने विश्लेषणपद्धतीनेच केले आहे. या परीक्षणात डिकन्सच्या सर्व गुणदोषांची चर्चा सेसिल यांनी केली आहे, आणि अनेक दोष असूनही डिकन्सला लाभलेल्या चिरंतन यशाचे रहस्य कशात आहे ते सांगितले आहे. इंग्लिशांना सामान्य मानवाच्या अगदी साध्या प्राथमिक सद्गुणांचा फार लोभ आहे. दया, सद्भावना, प्रेम, परोपकार या कौटुंबिक सद्गुणांचे आवाहन या समाजाच्या चित्ताला चटकन् पोचते. आपल्या या मनोभावनांचा त्यांना डिकन्समध्ये आविष्कार झालेला दिसतो. त्या मूर्त झालेल्या दिसतात. म्हणून त्याच्यावर इंग्लिशांचा जितका लोभ जडला आहे तितका दुसऱ्या कोणत्याही कादंबरीकारावर नाही.
आता अगदी अर्वाचीन काळचे एक परीक्षण पाहून हे विवेचन संपवू. 'दि पेलिकन गाइड टु इंग्लिश लिटरेचर' या मालेच्या सहाव्या खंडात कोलंबिया विद्यापीठातील इंग्लिशचे प्राध्यापक क्वेंटिन अंडरसन यांनी जॉर्ज इलियटच्या 'मिडल मार्च' या कादंबरीचे परीक्षण केलेले आहे. १८३२ च्या सुमाराचे इंग्लंडमधल्या एका परगण्यातील लोकजीवनाचे दर्शन घडविणे हा लेखिकेचा हेतू प्रथम सांगून लगेच अंडरसन यांनी कथानकाचे परीक्षण केले आहे. या कादंबरीत डोरोथी ब्रूक, लिडगेट, वलस्ट्रोड व गार्थ असे चार कथानकाचे धागे असून हे सर्व एकजीव करण्यात लेखिकेला कसे यश आले आहे त्याचे परीक्षकांनी जरा सविस्तर वर्णन केलेले आहे. नंतर त्यांनी कादंबरीतील व्यक्तिचित्रणाचा विचार केला आहे. असे करताना या व्यक्तींच्या मागची वैचारिक पार्श्वभूमी कोणती होती व प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगाचे दर्शन घडवून लेखिकेने प्रादेशिक जीवनाचे दर्शन घडविण्याचा आपला हेतू कसा साधला आहे तेही अंडरसन यांनी विवरून दाखविले आहे. लेखिकेचे वैयक्तिक चरित्र सामाजिक नीतीच्या दृष्टीने आक्षेपार्ह होते. त्याचा या कादंबरीतील घटना, व्यक्ती यांवर कसा परिणाम झाला आहे, काही ठिकाणी आत्मसमर्थनाचा हेतू कसा स्पष्ट दिसून येतो, तेही समीक्षकांनी या समीक्षेत स्पष्ट केले आहे. (फ्रॉम डिकन्स टु हार्डी- पेलिकन गाइड टु इंग्लिश लिटरेचर- १९५८) या मालेतील शेले, जॉर्ज मेरिडिथ यांच्या साहित्याचे समीक्षण पाहिले तरी ते अशाच विश्लेषणात्मक पद्धतीने केलेले आहे असे आढळून येईल.
सौंदर्याचे विश्लेषण, लालित्याचे पृथक्करण हे शब्द आपल्या कानाला चमत्कारिक लागतात. पण सौंदर्याचा आस्वाद व सौंदर्याचे परीक्षण यातील भेद जर आपण जाणू शकलो तर यात चमत्कारिक काहीच नाही असे आपल्या ध्यानात येईल व मग ललितकृती एकसंध असते म्हणून तिचे परीक्षणही एकसंध पद्धतीने केले पाहिजे हा भाबडा, भोळा युक्तिवाद आपण क्षणमात्रही करणार नाही. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, सौंदर्याच्या किंवा लालित्याच्या निर्मितीलाही पृथक्करणशक्तीची आवश्यकता असते. मायकेल एंजलोचे उदाहरण वर दिलेच आहे. पण कोणाचेही उदाहरण घेतले तरी हेच दिसून येईल. निग्रो गुलामांच्या जीवनाचे दर्शन सौ. स्टोवे यांना अमेरिकन जनतेला घडवावयाचे होते. त्या वेळी प्रथम त्या जीवनाचे मनात त्यांनी पृथक्करण केले असलेच पाहिजे. त्या जीवनाचे भिन्नभिन्न घटक ध्यानात घेऊन त्यांनी तशा तशा प्रातिनिधिक व्यक्ती निर्माण केल्या आणि 'अंकल टॉम्स केबिन' या कादंबरीत एक एकसंध जीवनाकृती निर्माण केली. आपल्या काळच्या स्त्रीजीवनाची आकृती हरिभाऊंना निर्माण करावयाची होती. त्यासाठी बालविवाह, बालावृद्ध-विवाह, स्त्रीचे अज्ञान, तिची परतंत्रता, सासुरवास, या स्त्रीजीवनाच्या भिन्न समस्या डोळयांपुढे ठेवूनच तशा तशा स्त्री रेखा त्यांनी उभ्या केल्या व स्त्रीजीवनाचे समग्र दर्शन घडविले. ललित लेखकाला मनाचे विश्लेषण करावे हे सर्वमान्यच आहे. गहू, तांदूळ इत्यादी धान्यांची पिके जोपासण्यासाठी शास्त्रज्ञ खते तयार करतात. त्या वेळी प्रथम ते या धान्यांच्या घटकांचे पृथक्करण करतात व त्यात काय द्रव्ये आहेत हे ध्यानात आल्यावर ती एकत्र मिसळून खत तयार करतात याचा अर्थच असा की की, पृथक्करणावाचून नवनिर्मिती अशक्य आहे ती निर्मिती झाल्यावर तिचा आस्वाद घेणाऱ्यांनी तिचे एकसंध रूप पहावे, समग्राचा अनुभव एकसमयावच्छेदेकरून घ्यावा, हे ठीक. पण तिचे रहस्य जाणून घेण्यासाठी तिचे विश्लेषण करण्यावाचून गत्यंतर नाही. यावरून हे दिसून येईल की, ललितकृती एकसंध असते म्हणून तिचे परीक्षणही एकसंध पद्धतीनेच झाले पाहिजे, अवयवशः करू नये, सौंदर्याचे विश्लेषण करता येत नाही, ही मर्ढेकर-कुलकर्णी या पंडितांची कल्पना अगदी भ्रान्त व सौंदर्यनिर्मितीच्या प्रक्रियेला मारक अशी आहे.
●