Jump to content

सप्तशती (मोरोपंत)/तृतीय चरित्र - अध्याय तिसरा

विकिस्रोत कडून

ते चंडमुंड तेथुनि गेले घेवूनि कटक चतुरंग, ज्याचे, रजें मळविती दिगिभकटहि, न स्वभटकचं, तुरंग. १


‘ जें प्रिय, वाहुनि चरणीं फ़ळ, जळ, दळ, एक सुमहि, मागा तें; ’ ऐसें जी माय म्हणे, जीचा कविवृंद सुमहिमा गातें; २


तीतें तुहिननगाच्या कांचनशृंगीं सलील वसलीतें ते खळ देखति, सिंही कांहींसें हास्य करित बसलीतें. ३


पाहुनि सिद्ध धराया झाले दुर्गेसि बहुत पामर ते, नच शकते, जरि शतदा, नियमें साधूनि बहु तपा, मरते. ४


कोपे त्यांवरि देवी, तों जें शरदिंदुकान्तिचें सदन झालें कज्जळवर्ण क्रोधें तत्काळ तें तिचें वदन. ५


झालें ललाट तीचें सहसा क्रोधेंकरूनि जें कुटिल, तेथुनि काळी प्रकटे वाटे काळादिकांसि ती कुटिल. ६


ती खड्गपाशहस्ता अत्युग्रा त्या सुरारिकटकांत सिरली, सशांत जैसी व्याघ्री, श्येनीहि जेंवि चटकांत. ७


वीरासह कवळ जसा हय, रथहि तसाचि, ती करी सगळा, जीचा, न चविला जो, त्याहि सुखें वाट दे करीस, गळा. ८


तीच्या दशनांसि कठिन परशस्त्रांचे न राशि पापडसे; तद्देहा अस्त्र, जसें न ब्रह्मज्ञा नरासि पाप डसे. ९


सर्वत्र पाविजेला क्षणमात्रें नाश चंडसेनाहीं, करिती परांसि चरणहि काळीचे काळदंडसे नाहीं. १०


जे प्रबळां असुरांतें काळीचे चूर्ण करिति दंत, कसे ते न म्हणावे चंडें, मुंडें, अत्युग्र मूर्त अंतकसे ? ११


ज्यातें अवलंबुनि ज्या निजशत्रुबळासि न हरि खपवी, तें खपवुनि काळी कां त्या देईल न लाज, न हरिख, पवीतें ? १२


चंडाच्या शस्त्रांचा, न करि तिचें, गरळकटु निकर, कांहीं, मुंडायुधवृष्टिहि; नग भग्न न केलाचि झटुनि करकांही. १३


मुंडें सहस्त्रश; क्षय त्या काळीचा करावया, चक्रें, शकें ज्यां जोडावे कर, ऐसीं सोडिलीं महावक्रें. १४


सुबहु दिवाकरबिंबें जैसीं मेघोदरीं तसीं सिरलीं, काळीमुखांत चक्रें, जेंवि अपकृतें महाशयीं जिरलीं. १५


चक्रें गिळोनि काळी, त्रिभुवनभयकारका महास्यातें पसरुनि, करी, धरुनियां सुररिपुवधसारकाम, हास्यातें. १६


जेणें हरिली होतीं अमर - नरांचीं किरीट - मुंडासीं, काळी खवळुनि, कवळुनि कटक, भिडे सुरजयार्थ मुंडासीं. १७


काळीनें धरिला तो प्राशाया परतमासि असितरणी, प्रसवे धवळयश, जरिहि आपण वर्णेंकरूनि असित, रणीं. १८


धांवे वेगें, परमक्षुधिता धृष्टाखुवरि जसी व्याळी; त्या पुंडा मुंडाचें मस्तक खंडी महासिनें काळी. १९


त्या चंडमस्तकातें खंडी, त्याच्या कचांसि कवळून; खवळून रणीं सुखवी विश्वास, यशें अशेष धवळून. २०


त्यांचें हतशेष बळ न टिकलें काळीपुढें भयें पळ, तें सर्व पळालें, जैसें तिमिर दिनकरप्रभोदयें पळतें. २१


जें चंडमुंडमस्तकयुग, काळी दे तिला उपायन तें, केले पुरुषार्थांचे सफ़ळ जिच्या सर्वही उपाय नतें. २२


काळी म्हणे, " महापशु दिधले म्यां चंडमुंड तुज आधीं; शुंभनिशुंभ शिवे ! तूं वधुनि रणमखीं यश स्वयें साधीं. " २३


देवी म्हणे, " मजकडे तूं घेउनि चंडमुंड, आलीस, यास्तव तुज ’ चामुंडा ’ हें दिधलें ख्यात नाम आलीस. " २४


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.