श्रीमद्भगवद्गीता : सहावा अध्याय (आत्मसंयमयोग)
मूळ सहाव्या अध्यायाचा प्रारंभ
अथ षष्ठोऽध्यायः
अर्थ
सहावा अध्याय सुरु होतो.
मूळ श्लोक
श्रीभगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः । स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥ ६-१ ॥
संदर्भित अन्वयार्थ
श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, यः = जो पुरुष, कर्मफलम् = कर्मफळाचा, अनाश्रितः = आश्रय न घेता, कार्यम् = कर्तव्य, कर्म = कर्म, करोति = करतो, सः = तो, संन्यासी = संन्यासी, च = आणि, योगी = योगी आहे, च = परंतु, निरग्निः न = फक्त अग्नीचा त्याग करतो तो संन्यासी नव्हे, च = तसेच, अक्रियः न = फक्त क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे ॥ ६-१ ॥
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जो पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो, तो संन्यासी व योगी होय. आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे; तसेच केवळ क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे. ॥ ६-१ ॥
मूळ श्लोक
न संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव । न ह्यसंन्यस्तसङ्कल्पो योगी भवति कश्चन ॥ ६-२ ॥
संदर्भित अन्वयार्थ
पाण्डव = हे पांडवा (अर्थात पांडुपुत्र अर्जुना), यम् = ज्याला, संन्यासम् = संन्यास, इति = असे, प्राहुः = म्हणतात, तम् = त्यालाच, योगम् = योग (असे), विद्धि = तू जाण, हि = कारण, असंन्यस्तसङ्कल्पः = संकल्पांचा त्याग न करणारा, कश्चन = कोणताही पुरुष, योगी = योगी, न भवति = होऊ शकत नाही ॥ ६-२ ॥
अर्थ
हे पांडवा (अर्थात पांडुपुत्र अर्जुना), ज्याला संन्यास असे म्हणतात, तोच योग आहे, असे तू समज. कारण संकल्पांचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही. ॥ ६-२ ॥
मूळ श्लोक
आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते । योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥ ६-३ ॥
संदर्भित अन्वयार्थ
योगम् = कर्मयोगावर, आरुरुक्षोः = आरुढ होण्याची इच्छा असणाऱ्या, मुनेः = मननशील पुरुषाला, कर्म = (योगाच्या प्राप्तीसाठी) निष्काम भावनेने कर्म करणे हाच, कारणम् = हेतू, उच्यते = सांगितला आहे (नंतर योगारुढ झाल्यावर), तस्य = त्या, योगारूढस्य = योगारूढ पुरुषाचा, (यः) = जो, शमः एव = सर्व संकल्पांचा अभाव हाच, कारणम् = कारण, उच्यते = म्हटला जातो ॥ ६-३ ॥
अर्थ
योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मननशील पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी निष्काम कर्म करणे हाच हेतू सांगितला आहे आणि योगारूढ झाल्यावर त्या योगारूढ पुरुषाचा जो सर्व संकल्पांचा अभाव असतो, तोच कल्याणाला कारण सांगितला आहे. ॥ ६-३ ॥
मूळ श्लोक
यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते । सर्वसङ्कल्पसंन्यासी योगारूढस्तदोच्यते ॥ ६-४ ॥
संदर्भित अन्वयार्थ
यदा = ज्या वेळी (साधक), इन्द्रियार्थेषु = इंद्रियांच्या भोगांमध्ये, (तथा) = तसेच, कर्मसु हि = कर्मांमध्येही, न अनुषज्जते = आसक्त होत नाही, तदा = त्यावेळी, सर्वसङ्कल्पसंन्यासी = सर्व संकल्पांचा त्याग करणारा तो पुरुष, योगारूढः = योगारूढ, उच्यते = म्हटला जातो ॥ ६-४ ॥
अर्थ
ज्यावेळी इंद्रियांच्या भोगांत आणि कर्मातही पुरुष आसक्त होत नाही, त्यावेळी सर्व संकल्पांचा त्याग करणाऱ्या पुरुषाला योगारूढ म्हटले जाते. ॥ ६-४ ॥
मूळ श्लोक
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् । आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥ ६-५ ॥
संदर्भित अन्वयार्थ
आत्मना = आपणच (संसारसागरातून), आत्मानम् = आपला, उद्धरेत् = उद्धार करावा, (च) = आणि, आत्मानम् = आपणाला, न अवसादयेत् = अधोगतीला नेऊ नये, हि = कारण (हा मनुष्यच), आत्मा एव = आपण स्वतःच, आत्मनः = आपला, बन्धुः = मित्र आहे (तसेच), आत्मा एव = आपण स्वतःच, आत्मनः = आपला, रिपुः = शत्रू आहे ॥ ६-५ ॥
अर्थ
स्वतःच स्वतःचा संसारसमुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण हा मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे. ॥ ६-५ ॥
मूळ श्लोक
बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः । अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ॥ ६-६ ॥
संदर्भित अन्वयार्थ
येन = ज्या, आत्मना = जीवात्म्याच्या द्वारे, आत्मा = मन व इंद्रिये यांच्यासहित शरीर, जितः = जिंकले गेले आहे, तस्य आत्मनः = त्या जीवात्म्याचा (तर तो), आत्मा एव = आपण स्वतःच, बन्धुः = मित्र आहे, तु = आणि, अनात्मनः = ज्याने मन व इंद्रिये यांसह शरीर जिंकलेले नाही, त्याच्यासाठी तो, आत्मा एव = आपण स्वतःच, शत्रुवत् = शत्रूसमान, शत्रुत्वे वर्तेत = शत्रुतेचा व्यवहार करतो ॥ ६-६ ॥
अर्थ
ज्या जीवात्म्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले, त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे आणि ज्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले नाही, त्याचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो. ॥ ६-६ ॥
मूळ श्लोक
जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः । शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥ ६-७ ॥
संदर्भित अन्वयार्थ
शीतोष्णसुखदुःखेषु = शीत-उष्ण, सुख-दुःख इत्यादींमध्ये, तथा = तसेच, मानापमानयोः = मान आणि अपमान यांमध्ये, प्रशान्तस्य = ज्याच्या अंतःकरणाच्या वृत्ती चांगल्याप्रकारे शांत असतात, जितात्मनः = मन, बुद्धी, शरीर व इंद्रिये ही ज्याच्या ताब्यात असतात अशा पुरुषाच्या ज्ञानामध्ये, परमात्मा = सच्चिदानंदघन परमात्मा, समाहितः = योग्य प्रकाराने स्थित असतो म्हणजे त्याच्या ज्ञानामध्ये परमात्म्याशिवाय इतर काहीच असत नाही ॥ ६-७ ॥
अर्थ
थंड-उष्ण, सुख-दुःख इत्यादी तसेच मान-अपमान यांमध्ये ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते, अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सच्चिदानंदघन परमात्मा उत्तमप्रकारे अधिष्ठित असतो; म्हणजेच त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काही नसतेच. ॥ ६-७ ॥
मूळ श्लोक
ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः । युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः ॥ ६-८ ॥
संदर्भित अन्वयार्थ
ज्ञानविज्ञानतृप्तात्मा = ज्याचे अंतःकरण ज्ञान व विज्ञान यांनी तृप्त झाले आहे, कूटस्थः = ज्याची स्थिती विकाररहित आहे, विजितेंद्रियः = ज्याने चांगल्याप्रकारे इंद्रियांना जिंकले आहे, (च) = आणि, समलोष्टाश्मकाञ्चनः = ज्याच्या बाबतीत माती, दगड व सोने हे समान आहेत, असा, (सः) = तो, योगी = योगी, युक्तः = युक्त म्हणजे भगवंताप्रत पोहोंचलेला आहे, इति = असे, उच्यते = म्हटले जाते ॥ ६-८ ॥
अर्थ
ज्याचे अंतःकरण ज्ञान-विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला दगड, माती व सोने समान आहे, तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे, असे म्हटले जाते. ॥ ६-८ ॥
मूळ श्लोक
सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु । साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥ ६-९ ॥
संदर्भित अन्वयार्थ
सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु = सुहृद, मित्र, वैरी, उदासीन, मध्यस्थ, द्वेष्य आणि बंधु गणांच्या ठिकाणी, साधुषु = धर्मात्मा पुरुषांच्या ठिकाणी, च = आणि, पापेषु = पापी पुरुषांच्या ठिकाणी, अपि = सुद्धा, समबुद्धिः = समान भाव ठेवणारा पुरुष, विशिष्यते = अत्यंत श्रेष्ठ आहे ॥ ६-९ ॥
अर्थ
सुहृद, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करण्याजोगा, बांधव, सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत श्रेष्ठ आहे. ॥ ६-९ ॥
मूळ श्लोक
योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः । एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥ ६-१० ॥
संदर्भित अन्वयार्थ
यतचित्तात्मा = मन, इंद्रिये यांसहित शरीराला वश करून घेणाऱ्या, निराशीः = आशारहित, (च) = आणि, अपरिग्रहः = संग्रहरहित, योगी = (अशा) ध्यानयोग्याने, एकाकी = एकटेच, रहसि = एकान्त स्थानी, स्थितः = स्थित होऊन, आत्मानम् = आत्म्याला, सततम् = निरंतर, युञ्जीत = परमात्म्यामध्ये लावावे ॥ ६-१० ॥
अर्थ
मन व इंद्रिय यांसह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या निरिच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लावावे. ॥ ६-१० ॥
मूळ श्लोक
शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः । नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥ ६-११ ॥
संदर्भित अन्वयार्थ
शुचौ देशे = शुद्ध भूमीवर, चैलाजिनकुशोत्तरम् = कुश, मृगचर्म व वस्त्र पसरलेले, न अत्युच्छ्रितम् = जे फार उंच नाही, (तथा) = तसेच, न अतिनीचम् = जे फार खाली नाही असे, आत्मनः = स्वतःचे, आसनम् = आसन, स्थिरम् = स्थिरपणे, प्रतिष्ठाप्य = स्थापन करून ॥ ६-११ ॥
अर्थ
शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ, मृगाजिन आणि वस्त्र अंथरून तयार केलेले, जे फार उंच नाही व जे फार सखल नाही, असे आपले आसन स्थिर मांडून ॥ ६-११ ॥
मूळ श्लोक
तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः । उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये ॥ ६-१२ ॥
संदर्भित अन्वयार्थ
तत्र = त्या, आसने = आसनावर, उपविश्य = बसून, यतचित्तेन्द्रियक्रियः = इंद्रिये व चित्त यांच्या क्रियांना वश करून, मनः = मनाला, एकाग्रम् = एकाग्र, कृत्वा = करून, आत्मविशुद्धये = अंतःकरणाच्या शुद्धीसाठी, योगम् = योगाचा, युञ्ज्यात् = अभ्यास करावा ॥ ६-१२ ॥
अर्थ
त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिय यांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा. ॥ ६-१२ ॥
मूळ श्लोक
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः । सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ॥ ६-१३ ॥
संदर्भित अन्वयार्थ
कायशिरोग्रीवम् = काया, मस्तक आणि मान, समम् = समान, (च) = तसेच, अचलम् = अचल, धारयन् = धारण करून, च = आणि, स्थिरः = स्थिर होऊन, स्वम् = आपल्या, नासिकाग्रम् = नासिकेच्या अग्रभागावर, सम्प्रेक्ष्य = दृष्टी ठेवून (व), दिशः = अन्य दिशांकडे, अनवलोकयन् = न पाहता ॥ ६-१३ ॥
अर्थ
शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर व्हावे. आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता ॥ ६-१३ ॥
मूळ श्लोक
प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः । मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥ ६-१४ ॥
संदर्भित अन्वयार्थ
ब्रह्मचारिव्रते = ब्रह्मचाऱ्याच्या व्रतामध्ये, स्थितः = स्थित, विगतभीः = भयरहित, (तथा) = तसेच, प्रशान्तात्मा = चांगल्याप्रकारे अंतःकरण शांत असणाऱ्या, युक्तः = सावधान ध्यानयोग्याने, मनः = मनाचा, संयम्य = संयम करून, मच्चित्तः = माझ्या ठिकाणी मन लावून, (च) = आणि, मत्परः = मत्परायण होऊन, आसीत = स्थित असावे ॥ ६-१४ ॥
अर्थ
ब्रह्मचर्यव्रतात राहणाऱ्या निर्भय तसेच अत्यंत शांत अंतःकरण असणाऱ्या सावध योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे. ॥ ६-१४ ॥
मूळ श्लोक
युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः । शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥ ६-१५ ॥
संदर्भित अन्वयार्थ
नियतमानसः = ज्याचे मन स्वाधीन आहे असा, योगी = योगी, एवम् = अशाप्रकारे, आत्मानम् = आत्म्याला, सदा = निरंतर, युञ्जन् = मज परमेश्वराच्या स्वरूपामध्ये लावून, मत्संस्थाम् = माझ्यामध्ये असणारी, निर्वाणपरमाम् = परमानंदाची पराकाष्ठारूप, शान्तिम् = शांती, अधिगच्छति = प्राप्त करून घेतो ॥ ६-१५ ॥
अर्थ
मन ताब्यात ठेवलेला योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी मज परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची पराकाष्ठा अशी शांती मिळवतो. ॥ ६-१५ ॥
मूळ श्लोक
नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः । न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥ ६-१६ ॥
संदर्भित अन्वयार्थ
अर्जुन = हे अर्जुना, योगः = हा ध्यानयोग, अति अश्नतः = पुष्कळ खाणाऱ्याला, तु न = सिद्ध होत नाही, च = तसेच, एकान्तम् = संपूर्णपणे, अनश्नतः = न खाणाऱ्यालाही, न = सिद्ध होत नाही, च = आणि, अतिस्वप्नशीलस्य = अतिशय निद्रा करण्याचा स्वभाव असणाऱ्यालाही, न = सिद्ध होत नाही, च = तसेच, जाग्रतः एवः = सदा जाग्रण करणाऱ्यालाही, (योगः) = हा योग, न अस्ति = सिद्ध होत नाही ॥ ६-१६ ॥
अर्थ
हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला तसेच अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपाळूला तसेच सदा जाग्रण करणाऱ्याला साध्य होत नाही. ॥ ६-१६ ॥
मूळ श्लोक
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु । युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥ ६-१७ ॥
संदर्भित अन्वयार्थ
युक्ताहारविहारस्य = यथायोग्य आहार व विहार करणाऱ्याला, कर्मसु = कर्मांमध्ये, युक्तचेष्टस्य = यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला, (च) = तसेच, युक्तस्वप्नावबोधस्य = यथायोग्य निद्रा व जागरण करणाऱ्याला, (अयम्) = हा, दुःखहा = दुःखांचा नाश करणारा, योगः = योग, भवति = सिद्ध होतो ॥ ६-१७ ॥
अर्थ
दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्य आहार-विहार करणाऱ्याला, कर्मांमध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा-जाग्रण करणाऱ्याला साध्य होतो. ॥ ६-१७ ॥
मूळ श्लोक
यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते । निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥ ६-१८ ॥
संदर्भित अन्वयार्थ
विनियतम् = अत्यंत वश केले गेलेले, चित्तम् = चित्त, यदा = ज्यावेळी, आत्मनि एव = परमात्म्यामध्येच, अवतिष्ठते = चांगल्याप्रकारे स्थित होऊन राहाते, तदा = त्यावेळी, सर्वकामेभ्यः = संपूर्ण भोगांची, निःस्पृहः = इच्छा नसणारा पुरुष, युक्तः = योगयुक्त आहे, इति = असे, उच्यते = म्हटले जाते ॥ ६-१८ ॥
अर्थ
पूर्णपणे ताब्यात आणलेले चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होते, तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगयुक्त म्हटला जातो. ॥ ६-१८ ॥
मूळ श्लोक
यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता । योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥ ६-१९ ॥
संदर्भित अन्वयार्थ
यथा = ज्याप्रमाणे, निवातस्थः = वायुरहित स्थानात असणारा, दीपः = दिवा, न इङ्गते = चंचल होत नाही, सा = तीच, उपमा = उपमा, आत्मनः = परमात्म्याच्या, योगम् = ध्यानात, युञ्जतः = लागलेल्या, योगिनः = योग्याच्या, यतचित्तस्य = जिंकलेल्या चित्ताला, स्मृता = सांगितली गेली आहे ॥ ६-१९ ॥
अर्थ
ज्याप्रमाणे वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हलत नाही, तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या जिंकलेल्या चित्ताला दिली गेली आहे. ॥ ६-१९ ॥
मूळ श्लोक
यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया । यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥ ६-२० ॥
संदर्भित अन्वयार्थ
योगसेवया = योगाच्या अभ्यासाने, निरुद्धम् = निरुद्ध झालेले, चित्तम् = चित्त, यत्र = ज्या अवस्थेमध्ये, उपरमते = उपरत होऊन जाते, च = आणि, यत्र = ज्या अवस्थेमध्ये, आत्मना = परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्मबुद्धीच्या द्वारे, आत्मानम् = परमात्म्याचा, पश्यन् = साक्षात्कार करून घेत, आत्मनि एव = सच्चिदानंदघन परमात्म्यामध्येच, तुष्यति = संतुष्ट होऊन राहाते ॥ ६-२० ॥
अर्थ
योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते आणि ज्या स्थितीत परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सच्चिदानंदघन परमात्म्यातच संतुष्ट राहाते ॥ ६-२० ॥
मूळ श्लोक
सुखमात्यन्तिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् । वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥ ६-२१ ॥
संदर्भित अन्वयार्थ
अतीन्द्रियम् = इंद्रियांच्या अतीत, बुद्धिग्राह्यम् = फक्त शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीच्या द्वारे ग्रहण करण्यास योग्य असा, यत् = जो, आत्यन्तिकम् = अनन्त, सुखम् = आनंद आहे, तत् = त्याचा, यत्र = ज्या अवस्थेमध्ये, वेत्ति = अनुभव येतो, च = आणि, (यत्र) = ज्या अवस्थेत, स्थितः = राहिला असता, अयम् = हा योगी, तत्त्वतः = परमात्म्याच्या स्वरूपापासून, न एव चलति = मुळीच विचलित होत नाही ॥ ६-२१ ॥
अर्थ
इंद्रियातीत, केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा जो अनंत आनंद आहे, तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो आणि ज्या अवस्थेत असलेला हा योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही ॥ ६-२१ ॥
मूळ श्लोक
यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः । यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥ ६-२२ ॥
संदर्भित अन्वयार्थ
यम् = जो, लाभम् = लाभ, लब्ध्वा = प्राप्त झाल्यावर, ततः = त्याच्यापेक्षा, अधिकम् = अधिक, अपरम् = दुसरा (कोणताही लाभ), न मन्यते = (तो योगी) मानीत नाही, च = आणि (परमात्म-प्राप्ति-रूप), यस्मिन् = ज्या अवस्थेमध्ये, स्थितः = स्थित असणारा योगी, गुरुणा = फार मोठ्या, दुःखेन = दुःखाने, अपि = सुद्धा, न विचाल्यते = विचलित होत नाही ॥ ६-२२ ॥
अर्थ
परमात्मप्राप्तिरूप जो लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानीत नाही; आणि परमात्मप्राप्तिरूप ज्या अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही ॥ ६-२२ ॥
मूळ श्लोक
तं विद्याद् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् । स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥ ६-२३ ॥
संदर्भित अन्वयार्थ
(यः) = जो, दुःखसंयोगवियोगम् = दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे म्हणजे जन्म-मरणरूप संसारातून कायम मुक्त करणारा आहे, योगसंज्ञितम् = ज्याला योग हे नाव आहे, तम् = त्या योगाला, विद्यात् = जाणले पाहिजे, सः = तो, योगः = योग, अनिर्विण्णचेतसा = उबग न आलेल्या म्हणजे धैर्य व उत्साह यांनी युक्त अशा चित्ताने, निश्चयेन = निश्चयपूर्वक, योक्तव्यः = करणे हे कर्तव्य आहे ॥ ६-२३ ॥
अर्थ
जो दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे, तसेच ज्याचे नाव योग आहे, तो जाणला पाहिजे. तो योग न कंटाळता अर्थात धैर्य व उत्साह यांनी युक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे. ॥ ६-२३ ॥
मूळ श्लोक
सङ्कल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः । मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥ ६-२४ ॥
संदर्भित अन्वयार्थ
सङ्कल्पप्रभवान् = संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या, सर्वान् = सर्व, कामान् = कामनांचा, अशेषतः = निःशेषरूपाने, त्यक्त्वा = त्याग करून, मनसा = मनानेच, इन्द्रियग्रामम् = सर्व इंद्रियांना, समन्ततः एव = सर्व बाजूंनीच, विनियम्य = चांगल्याप्रकारे संयमित करून ॥ ६-२४ ॥
अर्थ
संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रियसमुदायाला सर्व बाजूंनी पूर्णतया आवरून ॥ ६-२४ ॥
मूळ श्लोक
शनैः शनैरुपरमेद्बुद्ध्या धृतिगृहीतया । आत्मसंस्थं मनःकृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत् ॥ ६-२५ ॥
संदर्भित अन्वयार्थ
शनैः शनैः = क्रमाक्रमाने (अभ्यास करीत असताना), उपरमेत् = उपरती प्राप्त करून घ्यावी, (च) = तसेच, धृतिगृहीतया = धैर्याने युक्त अशा, बुद्ध्या = बुद्धीच्या मार्फत, मनः = मनाला, आत्मसंस्थम् = परमात्म्यामध्ये स्थित, कृत्वा = करून, किञ्चित् अपि = परमात्म्याशिवाय अन्य कशाचा, न चिन्तयेत् = विचारही करू नये ॥ ६-२५ ॥
अर्थ
क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे; तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचारही करू नये. ॥ ६-२५ ॥
मूळ श्लोक
यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् । ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥ ६-२६ ॥
संदर्भित अन्वयार्थ
एतद् = हे, अस्थिरम् = स्थिर न राहाणारे, (च) = आणि, चञ्चलम् = चंचल असणारे, मनः = मन, यतः यतः = ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने, निश्चरति = संसारात संचार करीत असते, ततः ततः = त्या त्या विषयातून, नियम्य = रोखून म्हणजे बाजूला नेऊन, आत्मनि एव = पुन्हा पुन्हा परमात्म्यामध्येच, वशम् = निरुद्ध, नयेत् = करावे ॥ ६-२६ ॥
अर्थ
हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने संसारात भरकटत असते, त्या त्या विषयांपासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यात स्थिर करावे. ॥ ६-२६ ॥
मूळ श्लोक
प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् । उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ॥ ६-२७ ॥
संदर्भित अन्वयार्थ
हि = कारण, प्रशान्तमनसम् = ज्याचे मन चांगल्याप्रकारे शांत झाले आहे, अकल्मषम् = जो पापाने रहित आहे, (च) = आणि, शान्तरजसम् = ज्याचा रजोगुण शांत होऊन गेलेला आहे अशा, ब्रह्मभूतम् = सच्चिदानंदघन ब्रह्माशी एकीभाव प्राप्त झालेल्या, एनम् = या, योगिनम् = योग्याला, उत्तमम् = उत्तम, सुखम् = आनंद, उपैति = प्राप्त होतो ॥ ६-२७ ॥
अर्थ
कारण ज्याचे मन पूर्ण शांत आहे, जो पापरहित आहे आणि ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे, अशा या सच्चिदानंदघन ब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योग्याला उत्तम आनंद मिळतो. ॥ ६-२७ ॥
मूळ श्लोक
युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः । सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥ ६-२८ ॥
संदर्भित अन्वयार्थ
विगतकल्मषः = पापरहित, योगी = योगी हा, एवम् = अशाप्रकारे, सदा = निरंतर, आत्मानम् = आत्म्याला (परमात्म्यामध्ये), युञ्जन् = लावीत, सुखेन = सुखाने, ब्रह्मसंस्पर्शम् = परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती हे स्वरूप असणारा, अत्यंतम् = अनंत, सुखम् = आनंद, अश्नुते = अनुभवतो ॥ ६-२८ ॥
अर्थ
तो निष्पाप योगी अशा प्रकारे सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीच्या अपार आनंदाचा अनुभव घेतो. ॥ ६-२८ ॥
मूळ श्लोक
सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि । ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥ ६-२९ ॥
संदर्भित अन्वयार्थ
योगयुक्तात्मा = सर्वव्यापी अनंत चैतन्यात एकीभावाने स्थितिरूप अशा योगाने युक्त असा आत्मवान् (तसेच), सर्वत्र = सर्व ठिकाणी, समदर्शनः = समभावाने पाहणारा योगी, आत्मानम् = आत्म्याला, सर्वभूतस्थम् = सर्व सजीवांमध्ये स्थित, च = आणि, सर्वभूतानि = सर्व सजीवांना, आत्मनि = आत्म्यामध्ये (कल्पित असे), ईक्षते = पाहातो ॥ ६-२९ ॥
अर्थ
ज्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्यस्थितिरूप योगाने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणारा आहे, असा योगी आत्मा सर्व सजीवमात्रात स्थित व सजीवमात्र आत्म्यात कल्पिलेले पाहातो. ॥ ६-२९ ॥
मूळ श्लोक
यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति । तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥ ६-३० ॥
संदर्भित अन्वयार्थ
यः = जो पुरुष, सर्वत्र = सर्व सजीवांमध्ये, माम् = सर्वांचा आत्मा अशा मज परमात्म्यालाच व्यापक असे, पश्यति = पाहतो, च = आणि, सर्वम् = सर्व सजीवांना, मयि = मज वासुदेवाचे अंतर्गत, पश्यति = पाहतो, तस्य = त्याच्या बाबतीत, अहम् = मी, न प्रणश्यामि = अदृश्य होत नाही, च = तसेच, सः = तो, मे = माझ्यासाठी, न प्रणश्यति = अदृश्य होत नाही ॥ ६-३० ॥
अर्थ
जो पुरुष सर्व सजीवांमध्ये सर्वांचा आत्मा असलेल्या मला वासुदेवालाच व्यापक असलेला पाहतो आणि सर्व सजीवांना मज वासुदेवात पाहतो, त्याला मी अदृश्य असत नाही आणि मला तो अदृश्य असत नाही. ॥ ६-३० ॥
मूळ श्लोक
सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः । सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥ ६-३१ ॥
संदर्भित अन्वयार्थ
एकत्वम् आस्थितः = एकीभावात स्थित होऊन, यः = जो पुरुष, सर्वभूतस्थितम् = सर्व सजीवात आत्मस्वरूपाने स्थित असणाऱ्या, माम् = मज सच्चिदानंदघन वासुदेवाला, भजति = भजतो, सः = तो, योगी = योगी, सर्वथा = सर्व प्रकारांनी, वर्तमानः = व्यवहार करीत असताना, अपि = सुद्धा, (सः) = तो, मयि = माझ्यामध्येच, वर्तते = व्यवहार करतो ॥ ६-३१ ॥
अर्थ
जो पुरुष ऐक्यभावाला प्राप्त होऊन सर्व सजीवमात्रात आत्मरूपाने असलेल्या मला सच्चिदानंदघन वासुदेवाला भजतो, तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात. ॥ ६-३१ ॥
मूळ श्लोक
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन । सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥ ६-३२ ॥
संदर्भित अन्वयार्थ
अर्जुन = हे अर्जुना, यः = जो योगी, आत्मौपम्येन = आपल्याप्रमाणेच, सर्वत्र = सर्व सजीवांमध्ये, समम् = सम, पश्यति = पाहतो, वा = तसेच, सुखम् = सर्वांचे सुख, यदि वा = अथवा, दुःखम् = दुःखसुद्धा आपल्याप्रमाणे सम पाहतो, सः = तो, योगी = योगी, परमः = परम श्रेष्ठ, मतः = मानला गेला आहे ॥ ६-३२ ॥
अर्थ
हे अर्जुना, जो योगी आपल्याप्रमाणे सर्व सजीवमात्रांना समभावाने पाहतो, तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो, तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे. ॥ ६-३२ ॥
मूळ श्लोक
अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन । एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात्स्थितिं स्थिराम् ॥ ६-३३ ॥
संदर्भित अन्वयार्थ
अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, मधुसूदन = हे मधुसूदना (श्रीकृष्णा), अयम् = हा, यः = जो, साम्येन = समभावाच्या बाबतीत, योगः = योग, त्वया = तुम्ही, प्रोक्तः = सांगितला, (मनसः) = मनाच्या, चञ्चलत्वात् = चंचलपणामुळे, एतस्य = याची, स्थिराम् = नित्य स्थिर, स्थितिम् = स्थिती, अहम् न पश्यामि = मला दिसत नाही ॥ ६-३३ ॥
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना (श्रीकृष्णा), जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितलात, तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील, असे मला वाटत नाही. ॥ ६-३३ ॥
मूळ श्लोक
चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् । तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥ ६-३४ ॥
संदर्भित अन्वयार्थ
हि = कारण, कृष्ण = हे श्रीकृष्णा, मनः = मन, चञ्चलम् = फार चंचल, प्रमाथि = घुसळून काढण्याचा स्वभाव असणारे, दृढम् = अत्यंत बळकट, (च) = आणि, बलवत् = बलवान आहे, (अतः) = म्हणून, तस्य = त्याचा, निग्रहम् = निग्रह करणे हे, वायोः इव = वायूला रोखण्याप्रमाणे, सुदुष्करम् = अत्यंत दुष्कर आहे असे, अहम् = मला, मन्ये = वाटते ॥ ६-३४ ॥
अर्थ
कारण हे श्रीकृष्णा, हे मन मोठे चंचल, क्षोभविणारे, मोठे दृढ आणि बलवान आहे. त्यामुळे त्याला वश करणे मी वाऱ्याला अडविण्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो. ॥ ६-३४ ॥
मूळ श्लोक
श्रीभगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् । अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥ ६-३५ ॥
संदर्भित अन्वयार्थ
श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, महाबाहो = हे महाबाहो अर्जुना, असंशयम् = निःसंशयपणे, मनः = मन हे, चलम् = चंचल, (च) = आणि, दुर्निग्रहम् = वश करून घेण्यास कठीण आहे, तु = परंतु, कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, (इदम् मनः) = हे मन, अभ्यासेन = अभ्यासाने, च = आणि, वैराग्येण = वैराग्याने, गृह्यते = वश करून घेता येते ॥ ६-३५ ॥
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे, यात शंका नाही. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, हे मन अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते. ॥ ६-३५ ॥
मूळ श्लोक
असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः । वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥ ६-३६ ॥
संदर्भित अन्वयार्थ
असंयतात्मना = ज्याने मन वश करून घेतले नाही अशा पुरुषाला, योगः = योग, दुष्प्रापः = प्राप्त होण्यास कठीण आहे, तु = परंतु, (सः योगः) = तो योग, वश्यात्मना = ज्याने मन वश करून घेतले आहे अशा, यतता = प्रयत्न करणाऱ्या पुरुषाला, उपायतः = साधनाच्या द्वारे, अवाप्तुम् = प्राप्त करून घेणे, शक्यः = सहज शक्य आहे, इति = असे, मे = माझे, मतिः = मत आहे ॥ ६-३६ ॥
अर्थ
ज्याने मनावर ताबा मिळविला नाही अशा पुरुषाला योग साधणे कठीण आहे आणि ज्याने मन ताब्यात ठेवले आहे अशा प्रयत्नशील पुरुषाला साधनेने तो प्राप्त होणे शक्य आहे, असे माझे मत आहे. ॥ ६-३६ ॥
मूळ श्लोक
अर्जुन उवाच अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः । अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥ ६-३७ ॥
संदर्भित अन्वयार्थ
अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, कृष्ण = हे श्रीकृष्णा, श्रद्धया उपेतः = जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे, (किंतु यः) = परंतु जो, अयतिः = संयमी नाही (या कारणाने), योगात् = योगापासून, चलितमानसः = ज्याचे मन अंतकाळी विचलित झाले आहे (अशा साधक योग्याला), योगसंसिद्धिम् = योगाची सिद्धी म्हणजे भगवत्साक्षात्कार, अप्राप्य = प्राप्त होणार नाही, (सः) = तो, काम् = कोणती, गतिम् = गती, गच्छति = प्राप्त करून घेतो ॥ ६-३७ ॥
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे; परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले, असा साधक योगसिद्धीला म्हणजे भगवत्साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो? ॥ ६-३७ ॥
मूळ श्लोक
कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति । अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥ ६-३८ ॥
संदर्भित अन्वयार्थ
महाबाहो = हे महाबाहो श्रीकृष्णा, (सः) = तो, ब्रह्मणः = भगवत्प्राप्तीच्या, पथि = मार्गावर, विमूढः = मोहित, (च) = व, अप्रतिष्ठः = आश्रयरहित असा पुरुष, छिन्नाभ्रम् इव = छिन्न भिन्न झालेल्या ढगाप्रमाणे, उभयविभ्रष्टः = दोन्हींकडून भ्रष्ट होऊन, कच्चित् न नश्यति = नष्ट तर होऊन जात नाही ना ॥ ६-३८ ॥
अर्थ
हे महाबाहो श्रीकृष्णा, भगवत्प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रयरहित असलेला पुरुष छिन्न-विच्छिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत? ॥ ६-३८ ॥
मूळ श्लोक
एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः । त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥ ६-३९ ॥
संदर्भित अन्वयार्थ
कृष्ण = हे श्रीकृष्णा, मे = माझा, एतत् = हा, संशयम् = संशय, अशेषतः = संपूर्णरूपाने, छेत्तुम् = नष्ट करण्यासाठी, अर्हसि = तुम्ही समर्थ आहात, हि = कारण, अस्य = या, संशयस्य = संशयाला, छेत्ता = तोडून टाकणारा, त्वदन्यः = तुमच्याशिवाय दुसरा कोणी, न उपपद्यते = मिळणे संभवत नाही ॥ ६-३९ ॥
अर्थ
हे श्रीकृष्णा, हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकाल. कारण तुमच्याशिवाय दुसरा कोणी हा संशय दूर करणारा मिळण्याचा संभव नाही. ॥ ६-३९ ॥
मूळ श्लोक
श्रीभगवानुवाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते । न हि कल्याणकृत्कश्चिद्दुर्गतिं तात गच्छति ॥ ६-४० ॥
संदर्भित अन्वयार्थ
श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), तस्य = त्या पुरुषाला, इह = या लोकात, विनाशः न विद्यते = विनाश होत नाही, अमुत्र एव न = (तसेच) परलोकातही (त्याचा विनाश) होत नाही, हि = कारण, तात = अरे बाबा, कल्याणकृत् = आत्मोद्धारासाठी म्हणजे भगवत्प्राप्तीसाठी कर्म करणारा, कश्चित् = कोणीही पुरुष, दुर्गतिम् = दुर्गती, न गच्छति = प्राप्त करून घेत नाही ॥ ६-४० ॥
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), त्या पुरुषाचा इहलोकातही नाश होत नाही व परलोकातही नाही. कारण बाबा रे, आत्मोद्धारासाठी अर्थात भगवत्प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही पुरुष अधोगतीला जात नाही. ॥ ६-४० ॥
मूळ श्लोक
प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः । शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥ ६-४१ ॥
संदर्भित अन्वयार्थ
योगभ्रष्टः = योगभ्रष्ट पुरुष हा, पुण्यकृताम् = पुण्यवान माणसांचे, लोकान् = लोक म्हणजे स्वर्गादी उत्तम लोक, प्राप्य = प्राप्त करून घेऊन, (तत्र) = तेथे, शाश्वतीः = पुष्कळ, समाः = वर्षांपर्यंत, उषित्वा = निवास करून (नंतर), शुचीनाम् = शुद्ध आचरण असणाऱ्या, श्रीमताम् = श्रीमान् पुरुषांच्या, गेहे = घरामध्ये, अभिजायते = जन्म घेतो ॥ ६-४१ ॥
अर्थ
योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्षे राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंतांच्या घरात जन्म घेतो. ॥ ६-४१ ॥
मूळ श्लोक
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् । एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् ॥ ६-४२ ॥
संदर्भित अन्वयार्थ
अथवा = किंवा (वैराग्यवान पुरुष त्या स्वर्गादी लोकांत न जाता), धीमताम् = ज्ञानवान, योगिनाम् = योग्यांच्या, कुले एव = कुळामध्येच, भवति = जन्म घेतो, (किंतु) = परंतु, ईदृशम् = अशा प्रकारचा, यत् एतत् = जो हा, जन्म = जन्म आहे, (तद्) = तो, लोके = या संसारात, हि = निःसंशयपणे, दुर्लभतरम् = अत्यंत दुर्लभ आहे ॥ ६-४२ ॥
अर्थ
किंवा वैराग्यशील पुरुष त्या लोकांत न जाता ज्ञानी योग्यांच्या कुळात जन्म घेतो. परंतु या प्रकारचा जो हा जन्म आहे, तो या जगात निःसंशयपणे अत्यंत दुर्मिळ आहे. ॥ ६-४२ ॥
मूळ श्लोक
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् । यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥ ६-४३ ॥
संदर्भित अन्वयार्थ
(सः) = तो, तत्र = तेथे, पौर्वदेहिकम् = पूर्वीच्या शरीरात संपादन केलेला, तम् = तो, बुद्धिसंयोगम् = बुद्धीचा संयोग म्हणजे समबुद्धीरूप योगाचा संस्कार, लभते = अनायासे मिळवितो, च = आणि, कुरुनन्दन = हे कुरुवंशीय अर्जुना, ततः = त्याच्या प्रभावामुळे, (सः) = तो, संसिद्धौ = परमात्म्याच्या प्राप्तीरूप सिद्धीच्यासाठी, भूयः = पूर्वीपेक्षाही अधिक, यतते = प्रयत्न करतो ॥ ६-४३ ॥
अर्थ
तेथे त्या पहिल्या शरीरात संग्रह केलेल्या बुद्धिसंयोगाला म्हणजे समत्वबुद्धिरूप योगाच्या संस्कारांना अनायासे प्राप्त होतो आणि हे कुरुवंशीय अर्जुना, त्याच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्मप्राप्तिरूप सिद्धीसाठी पूर्वीपेक्षाही अधिक प्रयत्न करतो. ॥ ६-४३ ॥
मूळ श्लोक
पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः । जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥ ६-४४ ॥
संदर्भित अन्वयार्थ
सः = श्रीमंताच्या घरात जन्मलेला तो योगभ्रष्ट योगी, तेन पूर्वाभ्यासेन एव = त्या पूर्वीच्या अभ्यासामुळेच, अवशः = पराधीन होऊन, हि = निःसंशयपणे, ह्रियते = भगवंतांकडून आकर्षित केला जातो, (तथा) = तसेच, योगस्य = समबुद्धिरूप योगाचा, जिज्ञासुः अपि = जिज्ञासूसुद्धा, शब्दब्रह्म = वेदात सांगितलेल्या सकाम कर्मांचे फळ, अतिवर्तते = उल्लंघन करून जातो ॥ ६-४४ ॥
अर्थ
तो श्रीमंतांच्या घरात जन्म घेणारा योगभ्रष्ट पराधीन असला तरी त्या पहिल्या जन्मीच्या अभ्यासामुळेच निःसंशयपणे भगवंतांकडे आकर्षिला जातो. तसेच समबुद्धिरूप योगाचा जिज्ञासूदेखील वेदाने सांगितलेल्या सकाम कर्मांच्या फळांना ओलांडून जातो. ॥ ६-४४ ॥
मूळ श्लोक
प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः । अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥ ६-४५ ॥
संदर्भित अन्वयार्थ
तु = परंतु, प्रयत्नात् = प्रयत्नपूर्वक, यतमानः = अभ्यास करणारा, योगी = योगी (हा तर), अनेकजन्मसंसिद्धः = मागील अनेक जन्मांच्या संस्कारांच्या सामर्थ्यामुळे याच जन्मात संसिद्ध होऊन, संशुद्धकिल्बिषः = संपूर्ण पापांनी रहित होऊन, ततः = नंतर तत्काळ, पराम् गतिम् = परम गती, याति = प्राप्त करून घेतो ॥ ६-४५ ॥
अर्थ
परंतु प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर मागील अनेक जन्मांच्या संस्कारांच्या जोरावर याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळवून सर्व पापांपासून मुक्त होऊन तत्काळ परमगतीला प्राप्त होतो. ॥ ६-४५ ॥
मूळ श्लोक
तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः । कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥ ६-४६ ॥
संदर्भित अन्वयार्थ
योगी = योगी, तपस्विभ्यः = तपस्वी लोकांपेक्षा, अधिकः = श्रेष्ठ आहे, ज्ञानिभ्यः अपि = शास्त्रज्ञानी पुरुषांपेक्षा सुद्धा (तो), अधिकः = श्रेष्ठ, मतः = मानला गेला आहे, च = आणि, कर्मिभ्यः = सकाम कर्मे करणाऱ्या माणसांपेक्षा सुद्धा, योगी = योगी, अधिकः = श्रेष्ठ आहे, तस्मात् = म्हणून, अर्जुन = हे अर्जुना, योगी भव = योगी हो ॥ ६-४६ ॥
अर्थ
तपस्वी लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. शास्त्रज्ञानी पुरुषांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानला गेला आहे. आणि सकाम कर्मे करणाऱ्या माणसांपेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो. ॥ ६-४६ ॥
मूळ श्लोक
योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना । श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥ ६-४७ ॥
संदर्भित अन्वयार्थ
सर्वेषाम् योगीनाम् अपि = सर्व योग्यांच्यामध्ये सुद्धा, यः = जो, श्रद्धावान् = श्रद्धावान योगी, मद्गतेन = माझ्या ठिकाणी लावलेल्या, अन्तरात्मना = अंतरात्म्याने, माम् = मला, भजते = निरंतर भजतो, सः = तो योगी, मे = मला, युक्ततमः मतः = परमश्रेष्ठ म्हणून मान्य आहे ॥ ६-४७ ॥
अर्थ
सर्व योग्यांच्यामध्ये सुद्धा जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी लावलेल्या अंतरात्म्याने मला निरंतर भजतो, तो योगी मला परमश्रेष्ठ म्हणून मान्य आहे. ॥ ६-४७ ॥
मूळ सहाव्या अध्यायाची समाप्ती
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
अर्थ
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील आत्मसंयमयोग नावाचा हा सहावा अध्याय समाप्त झाला. ॥ ६ ॥