Jump to content

श्रीमद्‌भगवद्‌गीता : पहिला अध्याय (अर्जुनविषादयोग)

विकिस्रोत कडून

मूळ पहिल्या अध्यायाचा प्रारंभ

   अथ प्रथमोऽध्यायः

अर्थ

पहिला अध्याय सुरु होतो.

मूळ श्लोक

   धृतराष्ट्र उवाच
   धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
   मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ॥ १-१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

धृतराष्ट्र = धृतराष्ट्र, उवाच = म्हणाले, सञ्जय = हे संजया, धर्मक्षेत्रे = धर्मभूमी असणाऱ्या, कुरुक्षेत्रे = कुरुक्षेत्रावर, समवेताः = एकत्र जमलेल्या, युयुत्सवः = युद्धाची इच्छा करणाऱ्या, मामकाः = माझ्या मुलांनी, = आणि, एव = तसेच, पाण्डवाः = पांडूच्या मुलांनी, किम्‌ = काय, अकुर्वत = केले ॥ १-१ ॥

अर्थ

धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले? ॥ १-१ ॥

मूळ श्लोक

   सञ्जय उवाच
   दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
   आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत्‌ ॥ १-२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, तदा = त्यावेळी, व्यूढम्‌ = व्यूहरचनेने युक्त, पाण्डवानीकम्‌ = पांडवांचे सैन्य, दृष्ट्वा = पाहून, तु = आणि, आचार्यम्‌ = द्रोणाचार्यांच्या, उपसङ्गम्य = जवळ जाऊन, राजा = राजा, दुर्योधनः = दुर्योधन, वचनम्‌ = असे वचन, अब्रवीत = बोलला ॥ १-२ ॥

अर्थ

संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचर्यांजवळ जाऊन असे म्हणाला ॥ १-२ ॥

मूळ श्लोक

   पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम्‌ ।
   व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥ १-३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

आचार्य = अहो आचार्य, तव = तुमच्या, धीमता = बुद्धिमान, शिष्येण = शिष्याने, द्रुपदपुत्रेण = द्रुपदपुत्र धष्टद्युम्नाने, व्युढाम्‌ = व्युहरचना करून सिद्ध केलेली, एताम्‌ = ही, पाण्डुपुत्राणाम्‌ = पांडूच्या पुत्रांची, महतीम्‌ = विशाल, चमूम्‌ = सेना, पश्य = पाहा ॥ १-३ ॥

अर्थ

अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने-द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने-व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पाहा. ॥ १-३ ॥

मूळ श्लोक

   अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
   युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥ १-४ ॥
   धृष्टकेतुश्‍चेकितानः काशिराजश्च वीर्यवान्‌ ।
   पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः ॥ १-५ ॥
   युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान्‌ ।
   सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥ १-६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अत्र = येथे, महेष्वासाः = मोठीमोठी धनुष्ये धारण केलेले, = आणि, युधि = युद्धात, भीमार्जुनसमाः = भीम व अर्जुन याप्रमाणे असणारे, शूराः = शूर-वीर, युयुधानः = सात्यकी, = आणि, विराटः = विराट, = तसेच, महारथः = महारथी, द्रुपदः = द्रुपद, धृष्टकेतुः = धृष्टकेतू, चेकितानः = चेकितान, = आणि, वीर्यवान्‌ = बलवान, काशिराजः = काशिराज, पुरुजित्‌ = पुरुजित, कुन्तिभोजः = कुन्तिभोज, = आणि, नरपुङ्गवः = नरश्रेष्ठ, शैब्यः = शैब्य, = आणि, विक्रान्तः = पराक्रमी, युधामन्युः = युधामन्यू, = तसेच, वीर्यवान्‌ = शक्तिमान, उत्तमौजाः = उत्तमौजा, सौभद्रः = सुभद्रेचा पुत्र, = आणि, द्रौपदेयाः = द्रौपदीचे पाच पुत्र, सर्व एव = हे सर्वच, महारथाः = महारथी, (सन्ति) = आहेत ॥ १-४, १-५, १-६ ॥

अर्थ

या सैन्यात मोठीमोठी धनुष्ये घेतलेले भीम, अर्जुन यांसारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान, बलवान काशिराज, पुरुजित, कुंतिभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत. ॥ १-४, १-५, १-६ ॥

मूळ श्लोक

   अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
   नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥ १-७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

द्विजोत्तम = हे ब्राह्मणश्रेष्ठ, अस्माकम्‌ = आमच्या पक्षात, तु = सुद्धा, ये = जे, विशिष्टाः = महत्त्वाचे, (सन्ति) = आहेत, तान्‌ = त्यांना, निबोध = आपण जाणून घ्या, मम = माझ्या, सैन्यस्य = सैन्याचे, नायकाः = जे सेनापती आहेत, तान्‌ = ते, ते = तुमच्या, संज्ञार्थम्‌ = माहितीसाठी, ब्रविमी = मी सांगतो ॥ १-७ ॥

अर्थ

हे ब्राह्मणश्रेष्ठ, आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत, ते जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत, ते मी आपल्याला सांगतो. ॥ १-७ ॥

मूळ श्लोक

   भवान्‌ भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः ।
   अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥ १-८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

भवान्‌ = तुम्ही द्रोणाचार्य, = आणि, भीष्मः = भीष्म, = तसेच, कर्णः = कर्ण, = आणि, समितिञ्जयः = युद्धात विजयी होणारे, कृपः = कृपाचार्य, = तसेच, अश्वत्थामा = अश्वत्थामा, = तसेच, विकर्णः = विकर्ण, तथैव च = आणि त्याचप्रमाणे, सौमदत्तिः = सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा ॥ १-८ ॥

अर्थ

आपण-द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा. ॥ १-८ ॥

मूळ श्लोक

   अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।
   नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥ १-९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अन्ये = इतर, = सुद्धा, मदर्थे = माझ्यासाठी, त्यक्तजीविताः = जीवावर उदार झालेले, बहवः = पुष्कळ, शूराः = शूरवीर, (सन्ति) = आहेत, सर्वे = ते सर्व, नानाशस्त्रप्रहरणाः = निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज, युद्धविशारदाः = युद्धात पारंगत, (सन्ति) = आहेत ॥ १-९ ॥

अर्थ

इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत. ॥ १-९ ॥

मूळ श्लोक

   अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम्‌ ।
   पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्‌ ॥ १-१० ॥

संदर्भित अन्वयार्थ

भीष्माभिरक्षितम्‌ = भीष्म-पितामहांकडून रक्षिले गेलेले, अस्माकम्‌ = आमचे, तत्‌ = ते, बलम्‌ = सैन्य, अपर्याप्तम्‌ = सर्व प्रकारांनी अजिंक्य आहे, तु = आणि, भीमाभिरक्षितम्‌ = भीमाकडून रक्षिले गेलेले, एतेषाम्‌ = या पांडवांचे, इदम्‌ = हे, बलम्‌ = सैन्य, पर्याप्तम्‌ = जिंकण्यास सोपे आहे ॥ १-१० ॥

अर्थ

भीष्मपितामहांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे; तर भीमाने रक्षण केलेले यांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे. ॥ १-१० ॥

मूळ श्लोक

   अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।
   भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥ १-११ ॥

संदर्भित अन्वयार्थ

= म्हणून, सर्वेषु = सर्व, अयनेषु = व्यूहद्वारात, यथाभागम्‌ = आपापल्या जागेवर, अवस्थिताः = राहून, भवन्तः = आपण, सर्वे एव = सर्वांनीच, हि = निःसंदेहपणे, भीष्मम्‌ एव = भीष्म पितामहांचेच, अभिरक्षन्तु = सर्व बाजूंनी रक्षण करावे ॥ १-११ ॥

अर्थ

म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निःसंदेह भीष्मपितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे. ॥ १-११ ॥

मूळ श्लोक

   तस्य सञ्जनयन्‌ हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।
   सिंहनादं विनद्यौच्चै: शङ्खं दध्मौ प्रतापवान्‌ ॥ १-१२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

तस्य = त्या(दुर्योधना)चा(च्या हृदयात), हर्षम्‌ = आनंद, सञ्जनयन्‌ = निर्माण करीत, कुरुवृद्धः = कौरवातील वृद्ध, प्रतापवान्‌ = महापराक्रमी(अशा), पितामहः = पितामह भीष्मांनी, उच्चैः = मोठ्या सुरात, सिंहनादम्‌ = सिंहाच्या आरोळीप्रमाणे, विनद्य = गर्जना करून, शङ्खम्‌ = शंख, दध्मौ = वाजविला ॥ १-१२ ॥

अर्थ

कौरवांतील वृद्ध, महापराक्रमी, पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला. ॥ १-१२ ॥

मूळ श्लोक

   ततः शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः ।
   सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत्‌ ॥ १-१३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

ततः = त्यानंतर, शङ्खाः = शंख, = आणि, भेर्यः = नगारे, = तसेच, पणवानकगोमुखाः = ढोल, मृदंग व शिंगे (इत्यादी रणवाद्ये), सहसा एव = एकदमच, अभ्यहन्यन्त = वाजू लागली, (तेषां) = (त्यांचा), सः = तो, शब्दः = आवाज, तुमुलः = फार भयंकर, अभवत्‌ = झाला ॥ १-१३ ॥

अर्थ

त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग, शिंगे इत्यादी रणवाद्ये एकदम वाजू लागली. त्यांचा तो आवाज प्रचंड झाला. ॥ १-१३ ॥

मूळ श्लोक

   ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
   माधवः पाण्डवाश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ॥ १-१४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

ततः = त्यानंतर, श्वेतैः = पांढऱ्या, हयैः = घोड्यांनी, युक्ते = युक्त अशा, महति = उत्तम, स्यन्दने = रथात, स्थितौ = बसलेल्या, माधवः = श्रीकृष्ण महाराजांनी, = आणि, पाण्डवः = पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने), एव = सुद्धा, दिव्यौ = अलौकिक, शङ्खौ = शंख, प्रदध्मतुः = वाजविले ॥ १-१४ ॥

अर्थ

यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने) ही दिव्य शंख वाजविले. ॥ १-१४ ॥

मूळ श्लोक

   पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।
   पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ॥ १-१५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

हृषीकेशः = श्रीकृष्ण महाराजांनी, पाञ्चजन्यम्‌ = पांचजन्य नावाचा, धनञ्जयः = अर्जुनाने, देवदत्तम्‌ = देवदत्त नावाचा, (च) = आणि, भीमकर्मा = भयानक कर्मे करणाऱ्या, वृकोदरः = भीमसेनाने, पौण्ड्रम्‌ = पौण्ड्र नावाचा, महाशङ्खम्‌ = मोठा शंख, दध्मौ = वाजविला ॥ १-१५ ॥

अर्थ

श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्ये करणाऱ्या भीमाने पौण्ड्र नावाचा मोठा शंख फुंकला. ॥ १-१५ ॥

मूळ श्लोक

   अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।
   नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ॥ १-१६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कुन्तीपुत्रः = कुन्तीपुत्र, राजा = राजा, युधिष्ठिरः = युधिष्ठिराने, अनन्तविजयम्‌ = अनंतविजय नावाचा, (च) = आणि, नकुलः = नकुलाने, = व, सहदेवः = सहदेवाने, सुघोष-मणिपुष्पकौ = सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंङ्ख, (दध्मौ) = वाजविले ॥ १-१६ ॥

अर्थ

कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंतविजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले. ॥ १-१६ ॥

मूळ श्लोक

   काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।
   धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥ १-१७ ॥
   द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते ।
   सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान्दध्मुः पृथक्पृथक्‌ ॥ १-१८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

परमेष्वासः = श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा, काश्यः = काशिराज, = आणि, महारथः = महारथी, शिखण्डी = शिखंडी, = व, धृष्टद्युम्नः = धृष्टद्युम्न, = तसेच, विराटः = राजा विराट, = आणि, अपराजितः = अजिंक्य, सात्यकिः = सात्यकी, द्रुपदः = राजा द्रुपद, = आणि, द्रौपदेयाः = द्रौपदीचे पाच पुत्र, = तसेच, महाबाहुः = मोठ्या भुजा असणारा, सौभद्रः = सुभद्रापुत्र(अभिमन्यू), (एते, सर्वे) = या सर्वांनी, पृथिवीपते = हे राजन्‌, सर्वशः = सर्व बाजूंनी, पृथक्‌-पृथक्‌ = वेगवेगळे, शङ्खान्‌ = शंख, दध्मुः = वाजविले ॥ १-१७, १-१८ ॥

अर्थ

श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशिराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, राजा विराट, अजिंक्य सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे पाचही पुत्र, महाबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यू, या सर्वांनी, हे राजा, सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजविले. ॥ १-१७, १-१८ ॥

मूळ श्लोक

   स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्‌ ।
   नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्‌ ॥ १-१९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

(च) = आणि, नभः = आकाशाला, = तसेच, पृथिवीं = पृथ्वीला, एव = सुद्धा, व्यनुनादयन्‌ = दुमदुमून टाकीत, सः = त्या, तुमुलः = भयानक, घोषः = आवाजाने, धार्तराष्ट्राणाम्‌ = धार्तराष्ट्रांची म्हणजे आपल्या पक्षातील लोकांची, हृदयानि = हृदये, व्यदारयत्‌ = विदीर्ण करून टाकली ॥ १-१९ ॥

अर्थ

आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली. ॥ १-१९ ॥

मूळ श्लोक

   अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान्‌ कपिध्वजः ।
   प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥ १-२० ॥
   हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।
   अर्जुन उवाच
   सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ १-२१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

महीपते = हे राजा, अथ = त्यानंतर, कपिध्वजः = ज्याच्या ध्वजावर हनुमान आहे (अशा), पाण्डवः = पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने), व्यवस्थितान्‌ = मोर्चा बांधून उभ्या असलेल्या, धार्तराष्ट्रान्‌ = धृतराष्ट्राशी संबंधित लोकांना, दृष्ट्वा = पाहून, तदा = तेव्हा, शस्त्रसम्पाते प्रवृत्ते = शस्त्र चालविण्याच्या तयारीचे वेळी, धनुः = धनुष्य, उद्यम्य = उचलून, हृषीकेशम्‌ = हृषीकेश श्रीकृष्णांना उद्देशून, इदम्‌ = हे, वाक्यम्‌ = वाक्य, आह = उच्चारले, अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, अच्युत = हे अच्युता, मे = माझा, रथम्‌ = रथ, उभयोः = दोन्ही, सेनयोः = सैन्यांच्या, मध्ये = मध्यभागी, स्थापय = उभा करा ॥ १-२०, १-२१ ॥

अर्थ

महाराज, त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने) युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून, शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून, हृषीकेश श्रीकृष्णांना असे म्हटले, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा. ॥ १-२०, १-२१ ॥

मूळ श्लोक

   यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान्‌ ।
   कैर्मया सह योद्धव्यमस्मिन्‌ रणसमुद्यमे ॥ १-२२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अस्मिन्‌ = या, रणसमुद्यमे = युद्धाच्या उद्योगात, कैः सह = (ज्या) कोणाकोणाबरोबर, मया = मला, योद्धव्यम्‌ = लढणे योग्य आहे, योद्धुकामान्‌ = (त्या) युद्ध करण्याच्या इच्छेने, अवस्थितान्‌ = रणांगणात सज्ज झालेल्या, एतान्‌ = या (शत्रुपक्षातील योद्ध्यां) ना, यावत्‌ अहम्‌ निरीक्षे = (मी) जोपर्यंत नीट पाहून घेत आहे (तोपर्यंत रथ उभा करा.) ॥ १-२२ ॥

अर्थ

मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईन की, मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे, तोवर रथ उभा करा. ॥ १-२२ ॥

मूळ श्लोक

   योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः ।
   धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥ १-२३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

दुर्बुद्धेः = दुष्टबुद्धी अशा, धार्तराष्ट्रस्य = दुर्योधनाचे, युद्धे = युद्धात, प्रियचिकीर्षवः = हित करू इच्छिणारे, ये = जे जे, एते = हे (राजेलोक), अत्र = या सैन्यात, समागताः = एकत्र आले आहेत (त्या), योत्स्यमानान्‌ = युद्ध करणाऱ्या योद्ध्यांना, अहम्‌ = मी, अवेक्षे = पाहीन ॥ १-२३ ॥

अर्थ

दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात हित करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत, त्या योद्ध्यांना मी पाहातो. ॥ १-२३ ॥

मूळ श्लोक

   सञ्जय उवाच
   एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
   सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्‌ ॥ १-२४ ॥
   भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्‌ ।
   उवाच पार्थ पश्यैतान्‌ समवेतान्‌ कुरुनिति ॥ १-२५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, भारत = हे धृतराष्ट्र, गुडाकेशेन = अर्जुनाने, एवम्‌ = असे, उक्तः = म्हटले असता, हृषीकेशः = श्रीकृष्णांनी, उभयोः = दोन्ही, सेनयोः = सैन्यांच्या, मध्ये = मध्ये, भीष्मद्रोणप्रमुखतः = भीष्म व द्रोण यांच्या समोर, = तसेच, सर्वेषाम्‌ = सर्व, महीक्षिताम्‌ = राजांच्या समोर, रथोत्तमम्‌ = उत्तम रथ, स्थापयित्वा = उभा करून, इति = असे, उवाच = म्हटले, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथपुत्र अर्जुना), समवेतान्‌ = युद्धासाठी एकत्र जमलेल्या, एतान्‌ = या, कुरून्‌ = कौरवांना, पश्य = पाहा ॥ १-२४, १-२५ ॥

अर्थ

संजय म्हणाले, धृतराष्ट्र महाराज, अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांच्या समोर तो उत्तम रथ उभा करून म्हटले, हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पाहा. ॥ १-२४, १-२५ ॥

मूळ श्लोक

   तत्रापश्यत्स्थितान्‌ पार्थः पितॄनथ पितामहान्‌ ।
   आचार्यान्मातुलान्‌ भ्रातॄन्‌ पुत्रान्‌ पौत्रान्‌ सखींस्तथा ॥ १-२६ ॥
   श्वशुरान्‌ सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।

संदर्भित अन्वयार्थ

अथ = त्यानंतर, पार्थः = पार्थाने (अर्थात पृथापुत्र अर्जुनाने), तत्र उभयोः अपि = त्या दोन्हीही, सेनयोः = सैन्यांमध्ये, स्थितान्‌ = उभे असलेले, पितॄन्‌ = काका, पितामहान्‌ = आजे, पणजे, आचार्यान्‌ = गुरू, मातुलान्‌ = मामे, भ्रातॄन्‌ = भाऊ, पुत्रान्‌ = मुलगे, पौत्रान्‌ = नातू, तथा = तसेच, सखीन्‌ = मित्र, श्वशुरान्‌ = सासरे, = आणि, सुहृदः = सुहृद (यांना), एव = च, अपश्यत्‌ = पाहिले ॥ १-२६, १-२७(पूर्वार्ध) ॥

अर्थ

त्यानंतर पार्थाने (अर्थात पृथापुत्र अर्जुनाने) त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका, आजे-पणजे, गुरू, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांनाच पाहिले. ॥ १-२६, १-२७(पूर्वार्ध) ॥

मूळ श्लोक

   तान्‌ समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्‌ बन्धूनवस्थितान्‌ ॥ १-२७ ॥
   कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्‌ ।

संदर्भित अन्वयार्थ

अवस्थितान्‌ = उपस्थित असलेल्या, तान्‌ सर्वान्‌ बन्धून्‌ = त्या सर्व बंधूंना, समीक्ष्य = पाहून, परया = आत्यंतिक, कृपया = करुणेने, आविष्टः = परवश झालेला, सः = तो, कौन्तेयः = कुन्तीपुत्र अर्जुन, विषीदन्‌ = शोक करीत, इदम्‌ = हे(वचन), अब्रवीत्‌ = बोलला ॥ १-२७(उत्तरार्ध), १-२८(पूर्वार्ध) ॥

अर्थ

तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला ॥ १-२७(उत्तरार्ध), १-२८(पूर्वार्ध) ॥

मूळ श्लोक

   अर्जुन उवाच
   दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्‌ ॥ १-२८ ॥
   सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
   वेपुथश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ १-२९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, कृष्ण = हे कृष्णा, युयुत्सुम्‌ = युद्धाची इच्छा धरून, समुपस्थितम्‌ = रणांगणावर उपस्थित असणाऱ्या, इमम्‌ स्वजनम्‌ = या स्वजन समुदायाला, दृष्ट्वा = पाहिल्यावर, मम = माझे, गात्राणि = अवयव, सीदन्ति = गळून जात आहेत, = आणि, मुखम्‌ = तोंड, परिशुष्यति = कोरडे पडत आहे, = तसेच, मे = माझ्या, शरीरे = शरीरांच्या ठिकाणी, वेपुथः = कंप, = व, रोमहर्षः = रोमांच, जायते = निर्माण झाले आहेत ॥ १-२८(उत्तरार्ध), १-२९ ॥

अर्थ

अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत; तोंडाला कोरड पडली आहे; शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत. ॥ १-२८(उत्तरार्ध), १-२९ ॥

मूळ श्लोक

   गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते ।
   न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमवतीव च मे मनः ॥ १-३० ॥

संदर्भित अन्वयार्थ

हस्तात्‌ = हातातून, गाण्डीवम्‌ = गांडीव धनुष्य, स्रंसते = गळून पडत आहे, = व, त्वक्‌ = त्वचा, एव = सुद्धा, परिदह्यते = फार जळजळत आहे, = तसेच, मे = माझे, मनः = मन, भ्रमति इव = भरकटल्यासारखे होत आहे, (अतः) = त्यामुळे मी, अवस्थातुम्‌ = उभा राहाण्यास, = सुद्धा, न शक्नोमि = समर्थ नाही ॥ १-३० ॥

अर्थ

हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे, अंगाचा दाह होत आहे. तसेच माझे मन भ्रमिष्टासारखे झाले आहे. त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही. ॥ १-३० ॥

मूळ श्लोक

   निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
   न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ १-३१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

केशव = हे केशवा, निमित्तानि = चिन्हे, = सुद्धा, (अहम्‌) = मी, विपरीतानि = विपरीतच, पश्यामि = पाहात आहे, (च) = तसेच, आहवे = युद्धामध्ये, स्वजनम्‌ = स्वजन-समुदायाला, हत्वा = ठार मारून, श्रेयः च = कल्याण सुद्धा (होईल असे), न अनुपश्यामि = मला दिसत नाही ॥ १-३१ ॥

अर्थ

हे केशवा, मला विपरीत चिन्हे दिसत आहेत. युद्धात आप्तांना मारून कल्याण होईल, असे मला वाटत नाही. ॥ १-३१ ॥

मूळ श्लोक

   न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
   किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥ १-३२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कृष्ण = हे कृष्णा, विजयम्‌ = विजयाची, न काङ्क्षे = मला इच्छा नाही, = तसेच, न राज्यम्‌ = राज्याची (इच्छा) नाही, = आणि, सुखानि = सुखांचीही (इच्छा नाही), गोविन्द = हे गोविंदा, नः = आम्हाला, राज्येन = राज्याचे, किम्‌ = काय प्रयोजन आहे, वा = अथवा, भोगैः = भोगांचा, (च) = आणि, जीवितेन = जगण्याचा, किम्‌ = काय उपयोग आहे ॥ १-३२ ॥

अर्थ

हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखांचीही नाही. हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे? ॥ १-३२ ॥

मूळ श्लोक

   येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
   त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥ १-३३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

येषाम्‌ = ज्यांच्या, अर्थे = साठी, नः = आम्हाला, राज्यम्‌ = राज्य, भोगाः = भोग, = आणि, सुखानि = सुखे (इत्यादी), काङ्क्षितम्‌ = अभीष्ट आहेत, ते = ते, इमे = हे (सर्वजण), धनानि = धन, = आणि, प्राणान्‌ = प्राण (यांची आशा), त्यक्त्वा = सोडून, युद्धे = युद्धात, अवस्थिताः = उभे आहेत ॥ १-३३ ॥

अर्थ

आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत, तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत. ॥ १-३३ ॥

मूळ श्लोक

   आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ।
   मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ॥ १-३४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

आचार्याः = गुरुजन, पितरः = काका, पुत्राः = मुलगे, = आणि, तथा एव = त्याचप्रमाणे, पितामहाः = आजे, मातुलाः = मामे, श्वशुराः = सासरे, पौत्राः = नातू, श्यालाः = मेहुणे, तथा = तसेच, सम्बन्धिनः = आप्त लोक, (सन्ति) = आहेत ॥ १-३४ ॥

अर्थ

गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे, त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत. ॥ १-३४ ॥

मूळ श्लोक

   एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
   अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥ १-३५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

मधुसूदन = हे मधुसूदना, घ्नतः अपि = (मला) मारले तरी सुद्धा, (अथवा) = किंवा, त्रैलोक्यराज्यस्य = तीन लोकांच्या राज्याच्या, हेतोः = साठी, अपि = सुद्धा, एतान्‌ = या सर्वांना, हन्तुम्‌ = ठार मारण्याची, न इच्छामि = मला इच्छा नाही (मग), महीकृते = (या) पृथ्वीसाठी (तर), नु किम्‌ = काय सांगावे ॥ १-३५ ॥

अर्थ

हे मधुसूदना, हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारु शकत नाही. मग या पृथ्वीची काय कथा? ॥ १-३५ ॥

मूळ श्लोक

   निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन ।
   पापमेवाश्रयेदस्मान्‌ हत्वैतानाततायिनः ॥ १-३६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

जनार्दन = हे जनार्दना, धार्तराष्ट्रान्‌ = धृतराष्ट्राच्या मुलांना, निहत्य = मारून, नः = आम्हाला, का = कोणते, प्रीतिः = सुख, स्यात्‌ = मिळणार, एतान्‌ = या, आततायिनः = आततायींना, हत्वा = मारल्यावर, अस्मान्‌ = आम्हाला, पापम्‌ एव = पापच, आश्रयेत्‌ = लागेल ॥ १-३६ ॥

अर्थ

हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार? या आततायींना मारून आम्हाला पापच लागणार. ॥ १-३६ ॥

मूळ श्लोक

   तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्‌ स्वबान्धवान्‌ ।
   स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ १-३७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

तस्मात्‌ = म्हणून, माधव = हे माधवा, स्वबान्धवान्‌ = आपल्याच बांधवांना (म्हणजे), धार्तराष्ट्रान्‌ = धृतराष्ट्राच्या मुलांना, हन्तुम्‌ = मारण्यास, वयम्‌ = आम्ही, न अर्हाः = योग्य नाही, हि = कारण, स्वजनम्‌ = आपल्याच कुटुंबाला, हत्वा = मारून, कथम्‌ = कसे (बरे), सुखिनः = आम्ही सुखी, स्याम = होऊ ॥ १-३७ ॥

अर्थ

म्हणूनच हे माधवा, आपल्या बांधवांना, धृतराष्ट्रपुत्रांना, आम्ही मारणे योग्य नाही. कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार? ॥ १-३७ ॥

मूळ श्लोक

   यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः ।
   कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्‌ ॥ १-३८ ॥
   कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम्‌ ।
   कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥ १-३९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

यद्यपि = जरी, लोभोपहतचेतसः = लोभाने बुद्धिभ्रष्ट झालेले, एते = हे (लोक), कुलक्षयकृतम्‌ = कुळाच्या नाशाने उत्पन्न झालेला, दोषम्‌ = दोष, = तसेच, मित्रद्रोहे = मित्राशी द्रोह करण्यातील, पातकम्‌ = पाप, न पश्यन्ति = पाहात नाहीत, (तथापि) = तरी, जनार्दन = हे जनार्दना, कुलक्षयकृतम्‌ = कुळाच्या नाशामुळे उत्पन्न होणाऱ्या, दोषम्‌ = दोषाला, प्रपश्यद्भिः = जाणणाऱ्या, अस्माभिः = आम्ही, अस्मात्‌ पापात्‌ = या पापापासून, निवर्तितुम्‌ = परावृत्त होण्यासाठी, कथम्‌ = का (बरे), न ज्ञेयम्‌ = विचार करू नये ॥ १-३८, १-३९ ॥

अर्थ

जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्राशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना, कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये? ॥ १-३८, १-३९ ॥

मूळ श्लोक

   कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।
   धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥ १-४० ॥

संदर्भित अन्वयार्थ

कुलक्षये = कुळाचा नाशामुळे, सनातनाः = सनातन (असे), कुलधर्माः = कुळधर्म, प्रणश्यन्ति = नष्ट होऊन जातात, धर्मे नष्टे = धर्माचा नाश झाल्यावर, कृत्स्नम्‌ = संपूर्ण, कुलम्‌ = कुळात, अधर्मः उत = पापसुद्धा, अभिभवति = मोठ्या प्रमाणात पसरते ॥ १-४० ॥

अर्थ

कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते. ॥ १-४० ॥

मूळ श्लोक

   अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।
   स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः ॥ १-४१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कृष्ण = हे कृष्णा, अधर्माभिभवात्‌ = पाप अधिक वाढल्याने, कुलस्त्रियः = कुळातील स्त्रिया, प्रदुष्यन्ति = अतिशय दूषित होतात, = (आणि), वार्ष्णेय = हे वार्ष्णेया, स्त्रीषु दुष्टासु = स्त्रिया दूषित झाल्या असताना, वर्णसङ्करः = वर्णसंकर, जायते = उत्पन्न होतो ॥ १-४१ ॥

अर्थ

हे कृष्णा, पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वार्ष्णेया, स्त्रिया बिघडल्या असता वर्णसंकर उत्पन्न होतो. ॥ १-४१ ॥

मूळ श्लोक

   सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
   पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥ १-४२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कुलघ्नानाम्‌ = कुळाचा नाश करणाऱ्यांना, = आणि, कुलस्य = कुळाला, सङ्करः = संकर (हा), नरकाय एव = नरकालाच घेऊन जाण्यासाठी (असतो), लुप्तपिण्डोदकक्रियाः = पिंड व पाणी यांच्या क्रियांना म्हणजे श्राद्ध व तर्पण यांना मुकलेले (असे), एषाम्‌ = यांचे, पितरः हि = पितरसुद्धा, पतन्ति = अधोगतीस प्राप्त होतात ॥ १-४२ ॥

अर्थ

वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो. कारण श्राद्ध, जलतर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात. ॥ १-४२ ॥

मूळ श्लोक

   दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः ।
   उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ॥ १-४३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

वर्णसङ्करकारकैः = वर्णसंकर करणाऱ्या, एतैः दोषैः = या दोषांमुळे, कुलघ्नानाम्‌ = कुलघाती लोकांचे, शाश्वताः = सनातन (असे), कुलधर्माः = कुळधर्म, = आणि, जातिधर्माः = जातिधर्म, उत्साद्यन्ते = नष्ट होऊन जातात ॥ १-४३ ॥

अर्थ

या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जातिधर्म व कुळधर्म उध्वस्त होतात. ॥ १-४३ ॥

मूळ श्लोक

   उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
   नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥ १-४४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

जनार्दन= हे जनार्दना, उत्सन्नकुलधर्माणाम्‌ = ज्यांचा कुळधर्म नष्ट झाला आहे अशा, मनुष्याणाम्‌ = मनुष्यांचा, नरके = नरकातील, वासः = निवास (हा), अनियतम्‌ = अनिश्चित काळापर्यंत, भवति = होतो, इति = असे, अनुशुश्रुम = आम्ही ऎकत आलो आहोत ॥ १-४४ ॥

अर्थ

हे जनार्दना, ज्यांचा कुळधर्म नाहीसा झाला आहे, अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते, असे आम्ही ऎकत आलो आहोत. ॥ १-४४ ॥

मूळ श्लोक

   अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम्‌ ।
   यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥ १-४५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अहो = अरेरे, बत = किती वाईट, राज्यसुखलोभेन = राज्य व सुख यांच्या लोभाने, वयम्‌ = आम्ही (बुद्धिमान असूनही), यत्‌ = जे, स्वजनम्‌ = स्वजनांना, हन्तुम्‌ = मारण्यास, उद्यताः = तयार झालो आहोत, (तत्‌) = (ते म्हणजे), महत्‌ = मोठे, पापम्‌ = पाप, कर्तुम्‌ = करण्यास, व्यवसिताः = आम्ही तयार झालो आहोत ॥ १-४५ ॥

अर्थ

अरेरे! किती खेदाची गोष्ट आहे! आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वजनांना ठार मारायला तयार झालो, हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे! ॥ १-४५ ॥

मूळ श्लोक

   यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।
   धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्‌ ॥ १-४६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

यदि = जरी, अशस्त्रम्‌ = शस्त्ररहित, अप्रतिकारम्‌ = प्रतिकार न करणाऱ्या (अशा), माम्‌ = मला, शस्त्रपाणयः = हातात शस्त्र घेतलेले, धार्तराष्ट्राः = धृतराष्ट्राचे पुत्र, रणे = युद्धामध्ये, हन्युः = मारतील, (तथापि) = तरी, तत्‌ = ते (मारणे), मे = माझ्यासाठी, क्षेमतरम्‌ = अधिक कल्याणकारक, भवेत्‌ = होईल ॥ १-४६ ॥

अर्थ

जरी शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले, तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल. ॥ १-४६ ॥

मूळ श्लोक

   सञ्जय उवाच
   एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत्‌ ।
   विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥ १-४७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, सङ्ख्ये = रणांगणावर, शोकसंविग्नमानसः = शोकामुळे मन उद्विग्न झालेला, अर्जुनः = अर्जुन, एवम्‌ = असे, उक्त्वा = बोलून, सशरम्‌ = बाणासह, चापम्‌ = धनुष्य, विसृज्य = टाकून, रथोपस्थे = रथाच्या मागील भागी, उपाविशत्‌ = बसला ॥ १-४७ ॥

अर्थ

संजय म्हणाले, रणांगणावर दुःखाने मन उद्विग्न झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात बसला. ॥ १-४७ ॥

मूळ पहिल्या अध्यायाची समाप्ती

   ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
   अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥

अर्थ

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील अर्जुनविषादयोग नावाचा हा पहिला अध्याय समाप्त झाला. ॥ १ ॥