Jump to content

श्रीमद्‌भगवद्‌गीता : दहावा अध्याय (विभूतियोग)

विकिस्रोत कडून

मूळ दहाव्या अध्यायाचा प्रारंभ

   अथ दशमोऽध्यायः

अर्थ

दहावा अध्याय सुरु होतो.

मूळ श्लोक

   श्रीभगवानुवाच
   भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः ।
   यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १०-१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, महाबाहो = हे महाबाहो अर्जुना, प्रीयमाणाय = माझ्याबद्दल अत्यधिक प्रेम बाळगणाऱ्या, ते = तुझ्यासाठी, मे परमम्‌ वचः = माझे परम रहस्य व प्रभाव युक्त वचन, यत्‌ = जे, अहम्‌ = मी, हितकाम्यया = तुझ्या हिताच्या दृष्टीने, भूयः एव = पुन्हा एकदा, वक्ष्यामि = सांगतो, शृणु = ते तू ऐक ॥ १०-१ ॥

अर्थ

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, आणखीही माझे परम रहस्यमय आणि प्रभावयुक्त म्हणणे ऐक, जे मी अतिशय प्रेमी अशा तुला तुझ्या हितासाठी सांगणार आहे. ॥ १०-१ ॥

मूळ श्लोक

   न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः ।
   अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥ १०-२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

मे = माझी, प्रभवम्‌ = उत्पत्ती म्हणजे लीलेने प्रकट होणे हे, सुरगणाः न (विदुः) = देवतालोक जाणत नाहीत, (तथा) = तसेच, महर्षयः न विदुः = महर्षिजनसुद्धा जाणत नाहीत, हि = कारण, अहम्‌ = मी, सर्वशः = सर्व प्रकारांनी, देवानाम्‌ = देवतांचा, = आणि, महर्षीणाम्‌ = महर्षींचा (सुद्धा), आदिः = आदिकारण आहे ॥ १०-२ ॥

अर्थ

माझी उत्पत्ती अर्थात लीलेने प्रकट होणे ना देव जाणतात ना महर्षी. कारण मी सर्व प्रकारे देवांचे व महर्षींचे आदिकारण आहे. ॥ १०-२ ॥

मूळ श्लोक

   यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम्‌ ।
   असम्मूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ १०-३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अजम्‌ = अजन्मा म्हणजे वास्तवात जन्मरहित, अनादिम्‌ = अनादी, = आणि, लोकमहेश्वरम्‌ = लोकांचा महान ईश्वर अशा, माम्‌ = मला, यः = जो, वेत्ति = तत्त्वतः जाणतो, सः = तो, मर्त्येषु = मनुष्यांमधील, असम्मूढः = ज्ञानवान पुरुष, सर्वपापैः = संपूर्ण पापांतून, प्रमुच्यते = मुक्त होऊन जातो ॥ १०-३ ॥

अर्थ

जो मला वास्तविक जन्मरहित, अनादी आणि लोकांचा महान ईश्वर असे तत्त्वतः जाणतो, तो मनुष्यांत ज्ञानी असणारा सर्व पापांपासून मुक्त होतो. ॥ १०-३ ॥

मूळ श्लोक

   बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः ।
   सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ १०-४ ॥
   अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः ।
   भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ १०-५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

बुद्धिः = निश्चय करण्याची शक्ती, ज्ञानम्‌ = यथार्थ ज्ञान, असम्मोहः = असंमूढता, क्षमा = क्षमा, सत्यम्‌ = सत्य, दमः = इंद्रियांना वश करून घेणे, शमः = मनाचा निग्रह, एव = तसेच, सुखम्‌ दुःखम्‌ = सुख-दुःख, भवः अभावः = उत्पत्ति-प्रलय, = आणि, भयम्‌ अभयम्‌ = भय-अभय. = तसेच, अहिंसा = अहिंसा, समता = समता, तुष्टिः = संतोष, तपः = तप, दानम्‌ = दान, यशः = कीर्ती, (च) = आणि, अयशः = अपकीर्ती, (इति ये) = असे जे, भूतानाम्‌ = भूतांचे, पृथग्विधाः = नाना प्रकारचे, भावाः = भाव हे, मत्तः एव = माझ्यापासूनच, भवन्ति = होतात ॥ १०-४, १०-५ ॥

अर्थ

निर्णयशक्ती, यथार्थ ज्ञान, असंमूढता, क्षमा, सत्य, इंद्रियनिग्रह, मनोनिग्रह, सुख-दुःख, उत्पत्ति-प्रलय, भय-अभय, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, कीर्ती-अपकीर्ती, असे हे भूतांचे अनेक प्रकारचे भाव माझ्यापासूनच होतात. ॥ १०-४, १०-५ ॥

मूळ श्लोक

   महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा ।
   मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ १०-६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

येषाम्‌ इमाः = ज्यांची ही, प्रजाः = संपूर्ण प्रजा, लोके = संसारात, (सन्ति) = आहे, (ते) = ते, सप्त = सात, महर्षयः = महर्षी जन, पूर्वे = त्याच्यापासून असणारे सनक इत्यादी, चत्वारः = चौघे जण, तथा = तसेच, मनवः = स्वायंभुव इत्यादी चौदा मनू हे, मद्भावाः = माझ्या ठिकाणी भाव असणारे हे सर्वच्या सर्व, मानसाः = माझ्या संकल्पाने, जाताः = उत्पन्न झाले आहेत ॥ १०-६ ॥

अर्थ

सात महर्षी, त्यांच्याही पूर्वी असणारे चार सनकादिक, तसेच स्वायंभुव इत्यादी चौदा मनू हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वच माझ्या संकल्पाने उत्पन्न झाले आहेत. या जगातील सर्व प्रजा त्यांचीच आहे. ॥ १०-६ ॥

मूळ श्लोक

   एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः ।
   सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥ १०-७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

मम = माझ्या, एताम्‌ = या, विभूतिम्‌ = परमैश्वर्यरूप विभूतीला, = आणि, योगम्‌ = योगशक्तीला, यः = जो पुरुष, तत्त्वतः = तत्त्वतः, वेत्ति = जाणतो, सः = तो, अविकम्पेन = निश्चल, योगेन = भक्तियोगाने, युज्यते = युक्त होऊन जातो, अत्र = याबाबतीत, संशयः न = कोणताही संशय नाही ॥ १०-७ ॥

अर्थ

जो पुरुष माझ्या या परमैश्वर्यरूप विभूतीला आणि योगशक्तीला तत्त्वतः जाणतो, तो स्थिर भक्तियोगाने युक्त होतो, यात मुळीच शंका नाही. ॥ १०-७ ॥

मूळ श्लोक

   अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते ।
   इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥ १०-८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अहम्‌ = मी वासुदेवच, सर्वस्य = संपूर्ण जगताच्या, प्रभवः = उत्पत्तीचे कारण आहे, (च) = आणि, मत्तः = माझ्यामुळेच, सर्वम्‌ = सर्व जग, प्रवर्तते = सक्रिय होते, इति = अशाप्रकारे, मत्वा = जाणून, भावसमन्विताः = श्रद्धा व भक्ती यांनी युक्त असणारे, बुधाः = बुद्धिमान भक्तजन, माम्‌ = मज परमेश्वराला, भजन्ते = निरंतर भजतात ॥ १०-८ ॥

अर्थ

मी वासुदेवच सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्व जग क्रियाशील होत आहे, असे जाणून श्रद्धा व भक्ती यांनी युक्त असलेले बुद्धिमान भक्त मज परमेश्वराला नेहमी भजतात. ॥ १०-८ ॥

मूळ श्लोक

   मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम्‌ ।
   कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥ १०-९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

मच्चिताः = माझ्या ठिकाणी निरंतर मन लावलेले, मद्गतप्राणाः = माझ्या ठायी प्राण अर्पण करणारे भक्तजन (माझ्या भक्तीच्या चर्चेच्या द्वारा), परस्परम्‌ = एकमेकांना (माझ्या प्रभावाचा), बोधयन्तः = बोध करवीत, = आणि (गुण व प्रभाव यांच्यासह माझेच), कथयन्तः च = कथन करीतच, नित्यम्‌ = निरंतर, तुष्यन्ति = संतुष्ट होतात, = आणि, माम्‌ = मज वासुदेवामध्येच निरंतर, रमन्ति = रमतात ॥ १०-९ ॥

अर्थ

निरंतर माझ्यात मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे माझे भक्तजन माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परांत माझ्या प्रभावाचा बोध करीत तसेच गुण व प्रभावासह माझे कीर्तन करीत निरंतर संतुष्ट होतात आणि मज वासुदेवातच नेहमी रममाण होत असतात. ॥ १०-९ ॥

मूळ श्लोक

   तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्‌ ।
   ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १०-१० ॥

संदर्भित अन्वयार्थ

सततयुक्तानाम्‌ = माझे ध्यान इत्यादींमध्ये निरंतर लागलेल्या, तेषाम्‌ = त्या, प्रीतिपूर्वकम्‌ = प्रेमपूर्वक, भजताम्‌ = भजणाऱ्या भक्तांना, (अहम्‌) = मी, तम्‌ = तो, बुद्धियोगम्‌ = तत्त्वज्ञानरूपी योग, ददामि = देतो, येन = की ज्यामुळे, ते = ते, माम्‌ = मलाच, उपयान्ति = प्राप्त करून घेतात ॥ १०-१० ॥

अर्थ

त्या नेहमी माझे ध्यान वगैरेमध्ये मग्न झालेल्या आणि प्रेमाने भजणाऱ्या भक्तांना मी तो तत्त्वज्ञानरूप योग देतो, ज्यामुळे ते मलाच प्राप्त होतात. ॥ १०-१० ॥

मूळ श्लोक

   तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः ।
   नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥ १०-११ ॥

संदर्भित अन्वयार्थ

तेषाम्‌ = त्यांच्यावर, अनुकम्पार्थम्‌ = अनुग्रह करण्यासाठी, आत्मभावस्थः = त्यांच्या अंतःकरणात वसलेला, अहम्‌ एव = मी स्वतःच, (तेषाम्‌) = त्यांचा, अज्ञानजम्‌ = अज्ञान-जनित, तमः = अंधकार, भास्वता = प्रकाशमय, ज्ञानदीपेन = तत्त्वज्ञानरूपी दिव्याचे द्वारा, नाशयामि = नष्ट करून टाकतो ॥ १०-११ ॥

अर्थ

त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्त्वज्ञानरूप दिव्याने नाहीसा करतो. ॥ १०-११ ॥

मूळ श्लोक

   अर्जुन उवाच
   परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान्‌ ।
   पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम्‌ ॥ १०-१२ ॥
   आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा ।
   असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥ १०-१३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, परम्‌ = परम, ब्रह्म = ब्रह्म, परम्‌ = परम, धाम = धाम, (च) = आणि, परमम्‌ = परम, पवित्रम्‌ = पवित्र, भवान्‌ = आपण आहात (कारण), शाश्वतम्‌ = सनातन, दिव्यम्‌ = दिव्य, पुरुषम्‌ = पुरुष, (तथा) = तसेच, आदिदेवम्‌ = देवांचाही आदिदेव, अजम्‌ = अजन्मा, (च) = आणि, विभुम्‌ = सर्वव्यापी, त्वाम्‌ = आपण आहात, (इति) = असे, सर्वे ऋषयः = सर्व ऋषिगण, आहुः = म्हणतात, तथा = तसेच, देवर्षिः = देवर्षी, नारदः = नारद, (तथा) = तसेच, असितः = असित, (च) = आणि, देवलः = देवल ऋषि, (तथा) = तसेच, व्यासः = महर्षि व्यास सुद्धा म्हणतात, = आणि, स्वयम्‌ एव = आपण स्वतःसुद्धा, मे = मला, ब्रवीषि = सांगता ॥ १०-१२, १०-१३ ॥

अर्थ

अर्जुन म्हणाला, आपण परम ब्रह्म, परम धाम, आणि परम पवित्र आहात. कारण आपल्याला सर्व ऋषिगण सनातन, दिव्य पुरुष, तसेच देवांचाही आदिदेव, अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात. देवर्षी नारद, असित, देवल व महर्षी व्यासही तसेच सांगतात आणि आपणही मला तसेच सांगता. ॥ १०-१२, १०-१३ ॥

मूळ श्लोक

   सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।
   न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥ १०-१४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

केशव = हे केशवा, यत्‌ = जे काही, माम्‌ = मला, वदसि = तुम्ही सांगता, एतत्‌ = हे, सर्वम्‌ = सर्व, ऋतम्‌ = सत्य (आहे असे), मन्ये = मी मानतो, भगवन्‌ = हे भगवन्‌, ते = तुमच्या, व्यक्तिम्‌ = लीलामय स्वरूपाला, न दानवाः विदुः = दानव जाणत नाहीत (आणि), न देवाः हि = देवसुद्धा जाणत नाहीत ॥ १०-१४ ॥

अर्थ

हे केशवा (अर्थात श्रीकृष्णा), जे काही मला आपण सांगत आहात, ते सर्व मी सत्य मानतो. हे भगवन्‌ आपल्या लीलामय स्वरूपाला ना दानव जाणतात ना देव. ॥ १०-१४ ॥

मूळ श्लोक

   स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।
   भूतभावन भूतेष देवदेव जगत्पते ॥ १०-१५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

भूतभावन = हे भूतांना उत्पन्न करणाऱ्या, भूतेश = हे भूतांच्या ईश्वरा, देवदेव = हे देवांच्या देवा, जगत्पते = हे जगाचे स्वामी, पुरुषोत्तम = हे पुरुषोत्तमा, त्वम्‌ स्वयम्‌ एव = आपण स्वतःच, आत्मना = स्वतः, आत्मानम्‌ = स्वतःला, वेत्थ = जाणता ॥ १०-१५ ॥

अर्थ

हे भूतांना उत्पन्न करणारे, हे भूतांचे ईश्वर, हे देवांचे देव, हे जगाचे स्वामी, हे पुरुषोत्तमा, तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात. ॥ १०-१५ ॥

मूळ श्लोक

   वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः ।
   याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥ १०-१६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

याभिः = ज्या, विभूतिभिः = विभूतींच्या द्वारा, (त्वम्‌) = तुम्ही, इमान्‌ = या सर्व, लोकान्‌ = लोकांना, व्याप्य = व्यापून, तिष्ठसि = स्थित आहात (त्या), दिव्याः आत्मविभूतयः = आपल्या दिव्य विभूती, अशेषेण = संपूर्णपणे, वक्तुम्‌ = सांगण्यास, त्वम्‌ हि = तुम्हीच, अर्हसि = समर्थ आहात ॥ १०-१६ ॥

अर्थ

म्हणून ज्या विभूतींच्या योगाने आपण या सर्व लोकांना व्यापून राहिला आहात, त्या आपल्या दिव्य विभूती पूर्णपणे सांगायला आपणच समर्थ आहात. ॥ १०-१६ ॥

मूळ श्लोक

   कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन्‌ ।
   केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १०-१७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

योगिन्‌ = हे योगेश्वरा, अहम्‌ = मी, सदा = निरंतर, परिचिन्तयन्‌ = चिंतन करताना, कथम्‌ = कोणत्या प्रकारे, त्वाम्‌ = तुम्हांला, विद्याम्‌ = जाणू, = आणि, भगवन्‌ = हे भगवन्‌, केषु केषु = कोणत्या कोणत्या, भावेषु = भावांमध्ये, मया = माझ्याकडून, चिन्त्यः असि = चिंतन करण्यास योग्य आहात ॥ १०-१७ ॥

अर्थ

हे योगेश्वरा, मी कशाप्रकारे निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे आणि हे भगवन्‌, आपण कोणकोणत्या भावांत माझ्याकडून चिंतन करण्यास योग्य आहात? ॥ १०-१७ ॥

मूळ श्लोक

   विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन ।
   भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मेऽमृतम्‌ ॥ १०-१८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

जनार्दन = हे जनार्दना (अर्थात श्रीकृष्णा), आत्मनः = आपली, योगम्‌ = योगशक्ती, = आणि, विभूतिम्‌ = विभूती, भूयः = आणखी, विस्तरेण = विस्तारपूर्वक, कथय = सांगा, हि = कारण (तुमची), अमृतम्‌ = अमृतमय वचने, शृण्वतः = कितीही ऐकताना, मे = माझी, तृप्तिः = तृप्ती, न अस्ति = होत नाही म्हणजे ऐकण्याची उत्कंठा वाढते ॥ १०-१८ ॥

अर्थ

हे जनार्दना (अर्थात श्रीकृष्णा), आपली योगशक्ती आणि विभूती पुन्हाही विस्ताराने सांगा. कारण आपली अमृतमय वचने ऐकत असता माझी तृप्ती होत नाही. अर्थात ऐकण्याची उत्कंठा अधिकच वाढत राहाते. ॥ १०-१८ ॥

मूळ श्लोक

   श्रीभगवानुवाच
   हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः ।
   प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥ १०-१९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, कुरुश्रेष्ठ = हे कुरुश्रेष्ठा (अर्थात कुरुवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना), हन्त = आता, दिव्याः आत्मविभूतयः = ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत (त्या), ते = तुझ्यासाठी, प्राधान्यतः = प्राधान्यपूर्वक, कथयिष्यामि = मी सांगेन, हि = कारण, मे = माझ्या, विस्तरस्य = विस्ताराचा, अन्तः = अंत, न अस्ति = नाही ॥ १०-१९ ॥

अर्थ

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे कुरुश्रेष्ठा (अर्थात कुरुवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना), आता मी ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत, त्या मुख्य मुख्य अशा तुला सांगेन. कारण माझ्या विस्ताराला शेवट नाही. ॥ १०-१९ ॥

मूळ श्लोक

   अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।
   अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥ १०-२० ॥

संदर्भित अन्वयार्थ

गुडाकेश = हे अर्जुना, सर्वभूताशयस्थितः = सर्व भूतांच्या हृदयांमध्ये स्थित असणारा, आत्मा = सर्वांचा आत्मा, अहम्‌ = मी आहे, = तसेच, भूतानाम्‌ = सर्व भूतांचा, आदिः = आदी, मध्यम्‌ = मध्य, = आणि, अन्तः च = अंतसुद्धा, अहम्‌ एव = मीच, (अस्मि) = आहे ॥ १०-२० ॥

अर्थ

हे गुडाकेशा (अर्थात अर्जुना), मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे. तसेच सर्व भूतांचा आदी, मध्य आणि अंतही मीच आहे. ॥ १०-२० ॥

मूळ श्लोक

   आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान्‌ ।
   मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥ १०-२१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

आदित्यानाम्‌ = अदितीच्या बारा पुत्रांमध्ये, विष्णुः = विष्णू, (च) = आणि, ज्योतिषाम्‌ = ज्योतींमध्ये, अंशुमान्‌ = किरण असणारा, रविः = सूर्य, अहम्‌ = मी, अस्मि = आहे, (तथा) = तसेच, मरुताम्‌ = एकोणपन्नास वायुदेवतांचे, मरीचिः = तेज, (तथा) = तसेच, नक्षत्राणाम्‌ = नक्षत्रांचा, शशी = अधिपती चंद्रमा, अहम्‌ = मी, (अस्मि) = आहे ॥ १०-२१ ॥

अर्थ

अदितीच्या बारा पुत्रांपैकी विष्णू मी आणि ज्योतींमध्ये किरणांनी युक्त सूर्य मी आहे. एकोणपन्नास वायुदेवतांचे तेज आणि नक्षत्रांचा अधिपती चंद्र मी आहे. ॥ १०-२१ ॥

मूळ श्लोक

   वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः ।
   इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥ १०-२२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

वेदानाम्‌ = वेदांमध्ये, सामवेदः = सामवेद, अस्मि = मी आहे, देवानाम्‌ = देवांमध्ये, वासवः = इंद्र, अस्मि = मी आहे, इन्द्रियाणाम्‌ = इंद्रियांमध्ये, मनः = मन, अस्मि = मी आहे, = आणि, भूतानाम्‌ = भूतांची, चेतना = चेतना म्हणने जीवनशक्ती, अस्मि = मी आहे ॥ १०-२२ ॥

अर्थ

वेदांत सामवेद मी आहे, देवांत इंद्र मी आहे. इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि भूतांमधील चेतना म्हणजे जीवनशक्ती मी आहे. ॥ १०-२२ ॥

मूळ श्लोक

   रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम्‌ ।
   वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम्‌ ॥ १०-२३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

रुद्राणाम्‌ = अकरा रुद्रांमध्ये, शङ्करः = शंकर, अस्मि = मी आहे, = तसेच, यक्षरक्षसाम्‌ = यक्ष आणि राक्षस यांमध्ये, वित्तेशः = धनाचा स्वामी कुबेर (मी आहे), वसूनाम्‌ = आठ वसूंमध्ये, पावकः = अग्नी, अहम्‌ अस्मि = मी आहे, = आणि, शिखरिणाम्‌ = पर्वतांमध्ये, मेरुः = मेरु पर्वत (मी आहे) ॥ १०-२३ ॥

अर्थ

अकरा रुद्रांमध्ये शंकर मी आहे आणि यक्ष व राक्षस यांमध्ये धनाचा स्वामी कुबेर आहे. मी आठ वसूंमधला अग्नी आहे आणि शिखरे असणाऱ्या पर्वतांमध्ये सुमेरु पर्वत आहे. ॥ १०-२३ ॥

मूळ श्लोक

   पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम्‌ ।
   सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥ १०-२४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

पुरोधसाम्‌ = पुरोहितांमध्ये, मुख्यम्‌ = मुख्य असा, बृहस्पतिम्‌ = बृहस्पती, माम्‌ = मी आहे (असे), विद्धि = तू जाण, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), सेनानीनाम्‌ = सेनापतींमध्ये, स्कन्दः = स्कंद, अहम्‌ = मी आहे, = आणि, सरसाम्‌ = जलाशयांमध्ये, सागरः = समुद्र, अस्मि = मी आहे ॥ १०-२४ ॥

अर्थ

पुरोहितांमध्ये मुख्य बृहस्पती मला समज. हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), मी सेनापतींमधला स्कंद आणि जलाशयांमध्ये समुद्र आहे. ॥ १०-२४ ॥

मूळ श्लोक

   महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्‌ ।
   यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥ १०-२५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

महर्षीणाम्‌ = महर्षींमध्ये, भृगुः = भृगू, अहम्‌ = मी आहे, (च) = आणि, गिराम्‌ = शब्दांमध्ये, एकम्‌ अक्षरम्‌ = एक अक्षर म्हणजे ॐ कार, अस्मि = मी आहे, यज्ञानाम्‌ = सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये, जपयज्ञः = जपयज्ञ, (तथा) = तसेच, स्थावराणाम्‌ = स्थिर राहाणाऱ्यांमध्ये, हिमालयः = हिमालय पर्वत, अस्मि = मी आहे ॥ १०-२५ ॥

अर्थ

मी महर्षींमध्ये भृगू आणि शब्दांमध्ये एक अक्षर अर्थात ॐ कार आहे. सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये जपयज्ञ आणि स्थिर राहाणाऱ्यांमध्ये हिमालय पर्वत मी आहे. ॥ १०-२५ ॥

मूळ श्लोक

   अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः ।
   गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ॥ १०-२६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

सर्ववृक्षाणाम्‌ = सर्व वृक्षांमध्ये, अश्वत्थः = पिंपळ वृक्ष, देवर्षीणाम्‌ = देवर्षींमध्ये, नारदः = नारद मुनी, गन्धर्वाणाम्‌ = गंधर्वांमध्ये, चित्ररथः = चित्ररथ, = आणि, सिद्धानाम्‌ = सिद्धांमध्ये, कपिलः = कपिल, मुनिः = मुनी (मी आहे) ॥ १०-२६ ॥

अर्थ

सर्व वृक्षांत पिंपळ आणि देवर्षींमध्ये नारद मुनी, गंधर्वांमध्ये चित्ररथ आणि सिद्धांमध्ये कपिल मुनी मी आहे. ॥ १०-२६ ॥

मूळ श्लोक

   उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम्‌ ।
   ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम्‌ ॥ १०-२७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अश्वानाम्‌ = घोड्यांमध्ये, अमृतोद्भवम्‌ = अमृताच्यासह उत्पन्न होणारा, उच्चैःश्रवसम्‌ = उच्चैःश्रवा नावाचा घोडा, गजेन्द्राणाम्‌ = श्रेष्ठ हत्तींमध्ये, ऐरावतम्‌ = ऐरावत नावाचा हत्ती, = तसेच, नराणाम्‌ = मनुष्यांमध्ये, नराधिपम्‌ = राजा, माम्‌ = मी आहे असे, विद्धि = तू जाण ॥ १०-२७ ॥

अर्थ

घोड्यांमध्ये अमृताबरोबर उत्पन्न झालेला उच्चैःश्रवा नावाचा घोडा, श्रेष्ठ हत्तींमध्ये ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यांमध्ये राजा मला समज. ॥ १०-२७ ॥

मूळ श्लोक

   आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक्‌ ।
   प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥ १०-२८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

आयुधानाम्‌ = शस्त्रांमध्ये, वज्रम्‌ = वज्रायुध, (च) = आणि, धेनूनाम्‌ = गाईंमध्ये, कामधुक्‌ = कामधेनू, अहम्‌ = मी, अस्मि = आहे, प्रजनः = शास्त्रोक्त रीतीने संतानाच्या उत्पत्तीचा हेतू असा, कन्दर्पः = कामदेव, अस्मि = मी आहे, = तसेच, सर्पाणाम्‌ = सर्पांमध्ये, वासुकिः = सर्पराज वासुकी, अस्मि = मी आहे ॥ १०-२८ ॥

अर्थ

मी शस्त्रांमध्ये वज्र आणि गाईंमध्ये कामधेनू आहे. शास्त्रोक्त रीतीने प्रजोत्पत्तीचे कारण कामदेव आहे आणि सर्पांमध्ये सर्पराज वासुकी मी आहे. ॥ १०-२८ ॥

मूळ श्लोक

   अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम्‌ ।
   पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम्‌ ॥ १०-२९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

नागानाम्‌ = नागांमध्ये, अनन्तः = शेष नाग, = आणि, यादसाम्‌ = जलचर प्राण्यांचा अधिपती, वरुणः = वरुण देवता, अहम्‌ = मी, अस्मि = आहे, = तसेच, पितॄणाम्‌ = पितरांमध्ये, अर्यमा = अर्यमा नावाचा पितर, (तथा) = आणि, संयमताम्‌ = शासन करणाऱ्यामध्ये, यमः = यमराज, अहम्‌ अस्मि = मी आहे ॥ १०-२९ ॥

अर्थ

मी नागांमध्ये शेषनाग आणि जलचरांचा अधिपती वरुणदेव आहे आणि पितरांमध्ये अर्यमा नावाचा पितर आणि शासन करणाऱ्यांमध्ये यमराज मी आहे. ॥ १०-२९ ॥

मूळ श्लोक

   प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम्‌ ।
   मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम्‌ ॥ १०-३० ॥

संदर्भित अन्वयार्थ

दैत्यानाम्‌ = दैत्यांमध्ये, प्रह्लादः = प्रह्लाद, = आणि, कलयताम्‌ = गणना करणाऱ्यांमध्ये, कालः = समय, अहम्‌ = मी, अस्मि = आहे, = तसेच, मृगाणाम्‌ = पशूंमध्ये, मृगेन्द्रः = मृगराज सिंह, = आणि, पक्षिणाम्‌ = पक्ष्यांमध्ये, वैनतेयः = विनितापुत्र गरुड, अहम्‌ = मी, (अस्मि) = आहे ॥ १०-३० ॥

अर्थ

मी दैत्यांमध्ये प्रह्लाद आणि गणना करणाऱ्यांमध्ये समय आहे. तसेच पशूंमध्ये मृगराज सिंह आणि पक्ष्यांमध्ये मी विनितापुत्र गरुड आहे. ॥ १०-३० ॥

मूळ श्लोक

   पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम्‌ ।
   झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी ॥ १०-३१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

पवताम्‌ = पवित्र करणाऱ्यांमध्ये, पवनः = वायू, (च) = आणि, शस्त्रभृताम्‌ = शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये, रामः = श्रीराम, अहम्‌ = मी, अस्मि = आहे, झषाणाम्‌ = माशांमध्ये, मकरः = मगर, अस्मि = मी आहे, = तसेच, स्रोतसाम्‌ = नद्यांमध्ये, जाह्नवी = भागीरथी गंगा, अस्मि = मी आहे ॥ १०-३१ ॥

अर्थ

मी पवित्र करणाऱ्यांत वायू आणि शस्त्रधाऱ्यांत श्रीराम आहे. तसेच माशांत मगर आहे आणि नद्यांत भागीरथी गंगा आहे. ॥ १०-३१ ॥

मूळ श्लोक

   सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।
   अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्‌ ॥ १०-३२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अर्जुन = हे अर्जुना, सर्गाणाम्‌ = सृष्टीचा, आदिः = आदी, = आणि, अन्तः = अंत, = तसेच, मध्यम्‌ = मध्यसुद्धा, अहम्‌ एव = मीच आहे, विद्यानाम्‌ = विद्यांमध्ये, अध्यात्मविद्या = अध्यात्मविद्या म्हणजे ब्रह्मविद्या, (च) = आणि, प्रवदताम्‌ = परस्पर वाद करणाऱ्यांकडून, वादः = तत्त्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद, अहम्‌ = मी, (अस्मि) = आहे ॥ १०-३२ ॥

अर्थ

हे अर्जुना, सृष्टीचा आदी आणि अंत तसेच मध्यही मी आहे. मी विद्यांतील अध्यात्मविद्या म्हणजे ब्रह्मविद्या आणि परस्पर वाद करणाऱ्यांमध्ये तत्त्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद आहे. ॥ १०-३२ ॥

मूळ श्लोक

   अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च ।
   अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥ १०-३३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अक्षराणाम्‌ = अक्षरांमध्ये, अकारः = अकार, अहम्‌ = मी आहे, = आणि, सामासिकस्य = समासांमध्ये, द्वन्द्वः = द्वंद्व नावाचा समास, अस्मि = मी आहे, अक्षयः कालः = अक्षय असा काल, (तथा) = तसेच, विश्वतोमुखः = सर्व बाजूंनी तोंडे असणारा विराट-स्वरूप असा, (च) = आणि, धाता = सर्वांचे धारण-पोषण करणारा, अहम्‌ एव = मीच आहे ॥ १०-३३ ॥

अर्थ

मी अक्षरांतील अकार आणि समासांपैकी द्वंद्व समास आहे. अक्षय काल तसेच सर्व बाजूंनी तोंडे असलेला विराटस्वरूप, सर्वांचे धारण-पोषण करणाराही मीच आहे. ॥ १०-३३ ॥

मूळ श्लोक

   मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम्‌ ।
   कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥ १०-३४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

सर्वहरः = सर्वांचा नाश करणारा, मृत्युः = मृत्यू, = आणि, भविष्यताम्‌ = उत्पन्न होणाऱ्यांचा, उद्भवः = उत्पत्तीचा हेतू, अहम्‌ = मी आहे, = तसेच, नारीणाम्‌ = स्त्रियांमध्ये, कीर्तिः = कीर्ती, श्रीः = श्री, वाक्‌ = वाणी, स्मृतिः = स्मृती, मेधा = मेधा, धृतिः = धृती, = आणि, क्षमा = क्षमा, (अहम्‌ अस्मि) = मी आहे ॥ १०-३४ ॥

अर्थ

सर्वांचा नाश करणारा मृत्यू आणि उत्पन्न होणाऱ्यांच्या उत्पत्तीचे कारण मी आहे. तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती, लक्ष्मी, वाणी, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा मी आहे. ॥ १०-३४ ॥

मूळ श्लोक

   बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्‌ ।
   मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥ १०-३५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

तथा = तसेच, साम्नाम्‌ = गायन करण्यास योग्य अशा श्रुतींमध्ये, बृहत्साम = बृहत्साम, अहम्‌ = मी आहे, (च) = आणि, छन्दसाम्‌ = छंदांमध्ये, गायत्री = गायत्री छंद, (अहम्‌) = मी आहे, मासानाम्‌ = महिन्यांमध्ये, मार्गशीर्षः = मार्गशीर्ष महिना, (च) = आणि, ऋतूनाम्‌ = ऋतूंमध्ये, कुसुमाकरः = वसंत, अहम्‌ = मी, (अस्मि) = आहे ॥ १०-३५ ॥

अर्थ

तसेच गायन करण्याजोग्या वेदांमध्ये मी बृहत्साम आणि छंदांमध्ये गायत्री छंद आहे. त्याचप्रमाणे महिन्यांतील मार्गशीर्ष महिना आणि ऋतूंतील वसंत ऋतू मी आहे. ॥ १०-३५ ॥

मूळ श्लोक

   द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्‌ ।
   जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम्‌ ॥ १०-३६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

छलयताम्‌ = छल करणाऱ्या खेळांमध्ये, द्यूतम्‌ = द्यूत, (च) = आणि, तेजस्विनाम्‌ = प्रभावशाली पुरुषांचा, तेजः = प्रभाव, अहम्‌ = मी, अस्मि = आहे, (जेतॄणाम्‌) = जिंकणाऱ्यांचा, जयः = विजय, अहम्‌ = मी, अस्मि = आहे, (व्यवसायिनाम्‌) = निश्चय करणाऱ्यांची, व्यवसायः = निश्चयात्मिका बुद्धी, (च) = आणि, सत्त्ववताम्‌ = सात्त्विक पुरुषांचा, सत्त्वम्‌ = सात्त्विक भाव, अस्मि = मी आहे ॥ १०-३६ ॥

अर्थ

मी छल करणाऱ्यांतील द्यूत आणि प्रभावशाली पुरुषांचा प्रभाव आहे. मी जिंकणाऱ्यांचा विजय आहे. निश्चयी लोकांचा निश्चय आणि सात्त्विक पुरुषांचा सात्त्विक भाव मी आहे. ॥ १०-३६ ॥

मूळ श्लोक

   वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः ।
   मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥ १०-३७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

वृष्णीनाम्‌ = वृष्णिवंशामध्ये, वासुदेवः = वासुदेव म्हणजे मी स्वतः तुझा मित्र, पाण्डवानाम्‌ = पांडवांमध्ये, धनञ्जयः = धनंजय म्हणजे तू, मुनीनाम्‌ = मुनींमध्ये, व्यासः = वेदव्यास मुनी, (च) = आणि, कवीनाम्‌ = कवींमध्ये, उशना = शुक्राचार्य, कविः = कवी, अपि = सुद्धा, अहम्‌ = मीच, अस्मि = आहे ॥ १०-३७ ॥

अर्थ

वृष्णिवंशीयांमध्ये वासुदेव अर्थात मी स्वतः तुझा मित्र, पांडवांमध्ये धनंजय म्हणजे तू, मुनींमध्ये वेदव्यास मुनी आणि कवींमध्ये शुक्राचार्य कवीही मीच आहे. ॥ १०-३७ ॥

मूळ श्लोक

   दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम्‌ ।
   मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्‌ ॥ १०-३८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

दमयताम्‌ = दंड करणाऱ्यांचा, दण्डः = दंड म्हणजे दमन करण्याची शक्ती, (अहम्‌) अस्मि = मी आहे, जिगीषताम्‌ = जिंकण्याची इच्छा करणाऱ्यांची, नीतिः = नीती, अस्मि = मी आहे, गुह्यानाम्‌ = गुप्त ठेवण्यास योग्य अशा भावांचे रक्षक असणारे, मौनम्‌ = मौन, अस्मि = मी आहे, = आणि, ज्ञानवताम्‌ = ज्ञानी पुरुषांचे, ज्ञानम्‌ = तत्त्वज्ञान, अहम्‌ एव = मीच, (अस्मि) = आहे ॥ १०-३८ ॥

अर्थ

दंड करणाऱ्यांचा दंड म्हणजे दमन करण्याची शक्ती मी आहे, विजयाची इच्छा करणाऱ्यांची नीती मी आहे. गुप्त ठेवण्यासारख्या भावांचा रक्षक मौन आणि ज्ञानवानांचे तत्त्वज्ञान मीच आहे. ॥ १०-३८ ॥

मूळ श्लोक

   यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन ।
   न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम्‌ ॥ १०-३९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

= आणि, अर्जुन = हे अर्जुना, सर्वभूतानाम्‌ = सर्व भूतांचे, यत्‌ = जे, बीजम्‌ = उत्पत्तीचे कारण आहे, तत्‌ अपि = ते सुद्धा, अहम्‌ एव = मीच आहे, (यतः) = कारण, मया विना = माझ्याशिवाय, यत्‌ = जे, स्यात्‌ = असेल, असे, तत्‌ = ते, चराचरम्‌ = चर आणि अचर (असे कोणतेही), भूतम्‌ न अस्ति = भूत नाही ॥ १०-३९ ॥

अर्थ

आणि हे अर्जुना, जे सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण तेही मीच आहे. कारण असे चराचरातील एकही भूत नाही की, जे माझ्याशिवाय असेल. ॥ १०-३९ ॥

मूळ श्लोक

   नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप ।
   एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥ १०-४० ॥

संदर्भित अन्वयार्थ

परन्तप = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना अर्जुना), मम = माझ्या, दिव्यानाम्‌ = दिव्य, विभूतीनाम्‌ = विभूतींना, अन्तः न अस्ति = अंत नाही, विभूतेः = (माझ्या स्वतःच्या) विभूतींचा, एषः = हा, विस्तरः = विस्तार, तु = तर (तुझ्यासाठी), मया = मी, उद्देशतः = एकदेशाने म्हणजे फार संक्षेपाने, प्रोक्तः = सांगितला आहे ॥ १०-४० ॥

अर्थ

हे परंतपा (अर्थात शत्रुतापना अर्जुना), माझ्या विभूतींचा अंत नाही. हा विस्तार तर तुझ्यासाठी थोडक्यात सांगितला. ॥ १०-४० ॥

मूळ श्लोक

   यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
   तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसम्भवम्‌ ॥ १०-४१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

यत्‌ यत्‌ एव = जी जी सुद्धा, विभूतिमत्‌ = विभूतीने युक्त म्हणजे ऐश्वर्याने युक्त, श्रीमत्‌ = कांतीने युक्त, वा = आणि, ऊर्जितम्‌ = शक्तियुक्त अशी, सत्त्वम्‌ = वस्तू आहे, तत्‌ तत्‌ = ती ती, मम = माझ्या, तेजोंऽशसम्भवम्‌ एव = तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती आहे असे, त्वम्‌ = तू, अवगच्छ = जाणून घे ॥ १०-४१ ॥

अर्थ

जी जी ऐश्वर्ययुक्त, कांतियुक्त आणि शक्तियुक्त वस्तू आहे, ती ती तू माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती समज. ॥ १०-४१ ॥

मूळ श्लोक

   अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।
   विष्टभ्याहमिदं कॄत्स्नमेकांशेन स्थितो जगत्‌ ॥ १०-४२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अथवा = अथवा, अर्जुन = हे अर्जुना, एतेन = हे, बहुना = पुष्कळ, ज्ञातेन = जाणून, तव = तुला, किम्‌ = काय प्रयोजन आहे, इदम्‌ = हे, कृत्स्नम्‌ = संपूर्ण, जगत्‌ = जग, एकांशेन = फक्त एका अंशाने, विष्टभ्य = धारण करून, अहम्‌ = मी, स्थितः = स्थित आहे ॥ १०-४२ ॥

अर्थ

किंवा हे अर्जुना, हे फार फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे? मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून राहिलो आहे. ॥ १०-४२ ॥

मूळ दहाव्या अध्यायाची समाप्ती

   ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
   विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥

अर्थ

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील विभूतियोग नावाचा हा दहावा अध्याय समाप्त झाला. ॥ १० ॥