श्रीमद्भगवद्गीता : तिसरा अध्याय (कर्मयोग)
मूळ तिसऱ्या अध्यायाचा प्रारंभ
अथ तृतीयोऽध्यायः
अर्थ
तिसरा अध्याय सुरु होतो.
मूळ श्लोक
अर्जुन उवाच ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ ३-१ ॥
संदर्भित अन्वयार्थ
अर्जुन= अर्जुन, उवाच = म्हणाला, जनार्दन = हे जनार्दन श्रीकृष्णा, चेत् = जर, कर्मणः = कर्माच्या अपेक्षेने, बुद्धिः = ज्ञान, ज्यायसी = श्रेष्ठ (आहे), ते मता = असे तुम्हाला मान्य असेल, तत् = तर मग, केशव = हे केशवा (श्रीकृष्णा), माम् = माझी, घोरे = भयंकर, कर्मणि = कर्म करण्यात, किम् = का बरे, नियोजयसि = तुम्ही योजना करीत आहात ॥ ३-१ ॥
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे जनार्दन श्रीकृष्णा, जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते, तर मग हे केशवा (श्रीकृष्णा), मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात? ॥ ३-१ ॥
मूळ श्लोक
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे । तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥ ३-२ ॥
संदर्भित अन्वयार्थ
व्यामिश्रेण इव = जणू मिश्रित अशा, वाक्येन = वाक्यांनी, मे = माझ्या, बुद्धिम् = बुद्धीला, मोहयसि इव = तुम्ही जणू मोहित करीत आहात, (अतः) = म्हणून, येन = ज्यामुळे, अहम् = मी, श्रेयः = कल्याण, आप्नुयाम् = प्राप्त करून घेईन, तत् एकम् = अशी ती एक गोष्ट, निश्चित्य = निश्चित करून, वद = सांगा ॥ ३-२ ॥
अर्थ
तुम्ही मिश्रितशा भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात. म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल. ॥ ३-२ ॥
मूळ श्लोक
श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ । ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ॥ ३-३ ॥
संदर्भित अन्वयार्थ
श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, अनघ = हे निष्पापा, अस्मिन् लोके = या जगात, मया = मी, द्विविधा = दोन प्रकारची, निष्ठा = निष्ठा, पुरा = पूर्वी, प्रोक्ता = सांगितली आहे, साङ्ख्यानाम् = सांख्ययोग्यांची, (निष्ठा) = निष्ठा, ज्ञानयोगेन = ज्ञानयोगाद्वारे (होते), (च) = आणि, योगिनाम् = योग्यांची, (निष्ठा) = निष्ठा, कर्मयोगेन = कर्मयोगाद्वारे होते ॥ ३-३ ॥
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे निष्पापा, या जगात दोन प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे. त्यातील सांख्ययोग्यांची निष्ठा ज्ञानयोगाने आणि योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते. ॥ ३-३ ॥
मूळ श्लोक
न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते । न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ ३-४ ॥
संदर्भित अन्वयार्थ
कर्मणाम् = कर्मांचे, अनारम्भात् = आचरण केल्याशिवाय, पुरुषः = मनुष्य, नैष्कर्म्यम् = निष्कर्मता म्हणजे योगनिष्ठा, न अश्नुते = प्राप्त करून घेत नाही, च = तसेच, संन्यसनात् एव = कर्मांचा केवळ त्याग केल्यामुळे, सिद्धिम् = सिद्धी म्हणजे सांख्यनिष्ठा, न समधिगच्छति = प्राप्त करून घेत नाही ॥ ३-४ ॥
अर्थ
मनुष्य कर्मे केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही आणि फक्त कर्मांचा त्याग केल्याने सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही. ॥ ३-४ ॥
मूळ श्लोक
न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् । कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिर्जैगुणैः ॥ ३-५ ॥
संदर्भित अन्वयार्थ
कश्चित् = कोणीही मनुष्य, जातु = कोणत्याही वेळी, हि = निःसंदेहपणे, क्षणम् अपि = क्षणमात्र सुद्धा, अकर्मकृत् = कर्म न करता, न तिष्ठति = राहात नाही, हि = कारण, प्रकृतिजैः = प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या, गुणैः = गुणांनी, अवशः = परतंत्र झालेला, सर्वः = सर्व मनुष्यसमुदाय हा, कर्म कार्यते = कर्म करण्यास भाग पाडला जातो ॥ ३-५ ॥
अर्थ
निःसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभरसुद्धा काम न करता राहात नाही. कारण सर्व मनुष्यसमुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो. ॥ ३-५ ॥
मूळ श्लोक
कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् । इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥ ३-६ ॥
संदर्भित अन्वयार्थ
विमूढात्मा = मूढ बुद्धीचा मनुष्य, कर्मेन्द्रियाणि = सर्व इंद्रियांना, संयम्य = जबरदस्तीने वरवर रोखून, यः = जो, मनसा = मनाने, इन्द्रियार्थान् = त्या इंद्रियांच्या विषयांचे, स्मरन् आस्ते = चिंतन करीत असतो, सः = तो, मिथ्याचारः = मिथ्याचारी म्हणजे दांभिक, उच्यते = म्हटला जातो ॥ ३-६ ॥
अर्थ
जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळेच वरवर आवरून मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो. ॥ ३-६ ॥
मूळ श्लोक
यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन । कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ३-७ ॥
संदर्भित अन्वयार्थ
तु = परंतु, अर्जुन = हे अर्जुना, यः = जो मनुष्य, मनसा = मनाच्या योगे, इन्द्रियाणि = इंद्रियांना, नियम्य = वश करून घेऊन, असक्तः = अनासक्त होऊन, कर्मेन्द्रियैः = सर्व इंद्रियांच्या द्वारा, कर्मयोगम् = कर्मयोगाचे, आरभते = आचरण करतो, सः = तो मनुष्य, विशिष्यते = श्रेष्ठ होय ॥ ३-७ ॥
अर्थ
परंतु हे अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारे कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ होय. ॥ ३-७ ॥
मूळ श्लोक
नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः । शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ॥ ३-८ ॥
संदर्भित अन्वयार्थ
त्वम् = तू, नियतम् = शास्त्रविहित, कर्म = कर्तव्यकर्म, कुरु = कर, हि = कारण, अकर्मणः = कर्म न करण्याच्या अपेक्षेने, कर्म = कर्म करणे, ज्यायः = श्रेष्ठ आहे, च = तसेच, अकर्मणः = कर्म न केल्यास, ते = तुझा, शरीरयात्रा अपि = शरीरनिर्वाहसुद्धा, न प्रसिद्ध्येत् = सिद्ध होणार नाही ॥ ३-८ ॥
अर्थ
तू शास्त्रविहित कर्तव्यकर्म कर. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीरव्यवहारही चालणार नाहीत. ॥ ३-८ ॥
मूळ श्लोक
यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः । तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥ ३-९ ॥
संदर्भित अन्वयार्थ
यज्ञार्थात् = यज्ञाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या, कर्मणः = कर्मांव्यतिरिक्त, अन्यत्र = दुसऱ्या कर्मांमध्ये (गुंतलेला), अयम् = हा, लोकः = मनुष्यांचा समुदाय, कर्मबन्धनः = कर्मांनी बांधला जातो, (अतः) = म्हणून, कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, (त्वम्) = तू, मुक्तसङ्गः = आसक्तिरहित होऊन म्हणजे फळाची अपेक्षा सोडून, तदर्थम् = त्या यज्ञासाठी, कर्म समाचर = कर्तव्यकर्म चांगल्याप्रकारे कर ॥ ३-९ ॥
अर्थ
यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्मांशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्यसमुदाय कर्मांनी बांधला जातो. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्यकर्म कर. ॥ ३-९ ॥
मूळ श्लोक
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः । अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥ ३-१० ॥
संदर्भित अन्वयार्थ
पुरा = कल्पाच्या पूर्वी, सहयज्ञाः = यज्ञाच्या बरोबर, प्रजाः = प्रजा, सृष्ट्वा = निर्माण करून, प्रजापतिः = प्रजापती ब्रह्मदेव, उवाच = (त्यांना) म्हणाले, (यूयम्) = तुम्ही लोक, अनेन = या यज्ञाच्या द्वारे, प्रसविष्यध्वम् = उत्कर्ष प्राप्त करून घ्या, (च) = आणि, एषः = हा यज्ञ, वः = तुम्हा लोकांचे, इष्टकामधुक् = इष्ट भोग देणारा, अस्तु = होवो ॥ ३-१० ॥
अर्थ
प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की, तुम्ही या यज्ञाच्या द्वारे उत्कर्ष प्राप्त करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा होवो. ॥ ३-१० ॥
मूळ श्लोक
देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः । परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ॥ ३-११ ॥
संदर्भित अन्वयार्थ
अनेन = या यज्ञाच्या द्वारे, देवान् = देवतांना, भावयत = तुम्ही उन्नत करा, (च) = आणि, ते देवाः = त्या देवता, वः = तुम्हा लोकांना, भावयन्तु = उन्नत करोत, (एवम्) = अशाप्रकारे निःस्वार्थ भावनेने, परस्परम् = एकमेकांना, भावयन्तः = उन्नत करीत, परम् = परम, श्रेयः = कल्याण, अवाप्स्यथ = तुम्ही प्राप्त करून घ्याल ॥ ३-११ ॥
अर्थ
तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हाला पुष्ट करावे. अशा प्रकारे निःस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल. ॥ ३-११ ॥
मूळ श्लोक
इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः । तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः ॥ ३-१२ ॥
संदर्भित अन्वयार्थ
यज्ञभाविताः = यज्ञाने पुष्ट झालेल्या, देवाः = देवता, वः = तुम्हा लोकांना (न मागता), इष्टान् = इष्ट, भोगान् = भोग, हि दास्यन्ते = निश्चितपणे देत राहातील (अशाप्रकारे), तैः = त्या देवतांनी, दत्तान् = दिलेले भोग, यः = जो मनुष्य, एभ्यः = त्यांना, अप्रदाय = न देता (स्वतःच), भुङ्क्ते = भोगतो, सः = तो, स्तेनः एव = चोरच आहे ॥ ३-१२ ॥
अर्थ
यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहातील. अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो स्वतःच उपभोगतो, तो चोरच आहे. ॥ ३-१२ ॥
मूळ श्लोक
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः । भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ॥ ३-१३ ॥
संदर्भित अन्वयार्थ
यज्ञशिष्टाशिनः = यज्ञ झाल्यावर शिल्लक राहिलेले अन्न खाणारे, सन्तः = श्रेष्ठ मनुष्य, सर्वकिल्बिषैः = सर्व पापांतून, मुच्यन्ते = मुक्त होऊन जातात (परंतु), ये पापाः = जे पापी लोक, आत्मकारणात् = स्वतःच्या शरीर पोषणासाठीच (अन्न), पचन्ति = शिजवितात, ते तु = ते तर, अघम् = पापच, भुञ्जते = खातात ॥ ३-१३ ॥
अर्थ
यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतात. पण जे पापी लोक केवळ स्वतःच्या शरीरपोषणासाठी अन्न शिजवितात, ते तर पापच खातात. ॥ ३-१३ ॥
मूळ श्लोक
अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः । यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ ३-१४ ॥ कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् । तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ॥ ३-१५ ॥
संदर्भित अन्वयार्थ
अन्नात् = अन्नापासून, भूतानि = संपूर्ण प्राणी, भवन्ति = उत्पन्न होतात, पर्जन्यात् = पर्जन्यवृष्टीपासून, अन्नसम्भवः = अन्नाची उत्पत्ती होते, यज्ञात् = यज्ञापासून, पर्जन्यः = पर्जन्यवृष्टी, भवति = होते, यज्ञः = यज्ञ, कर्मसमुद्भवः = विहित कर्मांपासून उत्पन्न होणारा आहे, कर्म = कर्मसमुदाय हा, ब्रह्मोद्भवम् = वेदांपासून उत्पन्न होणारा (आणि), ब्रह्म = वेद हे, अक्षरसमुद्भवम् = अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न होणारे आहेत (असे), विद्धि = तू जाण, तस्मात् = म्हणून (यावरून सिद्ध होते की), सर्वगतम् = सर्वव्यापी, ब्रह्म = परम अक्षर परमात्मा, नित्यम् = नेहमीच, यज्ञे = यज्ञामध्ये, प्रतिष्ठितम् = प्रतिष्ठित आहे ॥ ३-१४, ३-१५ ॥
अर्थ
सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्ननिर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो. आणि यज्ञ विहित कर्मांमुळे घडतो. कर्मसमुदाय वेदांपासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत, असे समज. यावरून हेच सिद्ध होते की, सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. ॥ ३-१४, ३-१५ ॥
मूळ श्लोक
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः । अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥ ३-१६ ॥
संदर्भित अन्वयार्थ
पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), इह = या जगामध्ये, एवम् = अशा प्रकारे, प्रवर्तितम् = परंपरेने प्रचलित असणाऱ्या, चक्रम् = सृष्टिचक्राला अनुकूल, यः = जो मनुष्य, न अनुवर्तयति = असे वर्तन करीत नाही म्हणजे आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, सः = तो मनुष्य, इन्द्रियारामः = इंद्रियांच्या द्वारे भोगांमध्ये रमणारा, अघायुः = पापी आयुष्याचा (असून), मोघम् = व्यर्थच, जीवति = जिवंत राहातो ॥ ३-१६ ॥
अर्थ
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जो मनुष्य या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टिचक्राला अनुसरून वागत नाही म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, तो इंद्रियांच्या द्वारे भोगांत रमणारा पापी आयुष्य असलेला मनुष्य व्यर्थच जगतो. ॥ ३-१६ ॥
मूळ श्लोक
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः । आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥ ३-१७ ॥
संदर्भित अन्वयार्थ
तु = परंतु, यः = जो, मानवः = मनुष्य, आत्मरतिः एव = आत्म्यामध्येच रमणारा, च = आणि, आत्मतृप्तः = आत्म्यामध्येच तृप्त, च = तसेच, आत्मनि एव = आत्म्यामध्येच, सन्तुष्टः = संतुष्ट, स्यात् = असतो, तस्य = त्याच्यासाठी, कार्यम् = कोणतेही कर्तव्य, न विद्यते = नसते ॥ ३-१७ ॥
अर्थ
परंतु जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा आणि आत्म्यामध्येच तृप्त तसेच आत्म्यामध्येच संतुष्ट असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही. ॥ ३-१७ ॥
मूळ श्लोक
नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन । न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥ ३-१८ ॥
संदर्भित अन्वयार्थ
तस्य = त्या महामनुष्याचे, इह = या विश्वामध्ये, कृतेन = कर्म करण्यात, कश्चन = कोणतेही, अर्थः न = प्रयोजन असत नाही, (च) = तसेच, अकृतेन एव च = कर्म न करण्यातही कोणतेही प्रयोजन असत नाही, च = तसेच, सर्वभूतेषु = संपूर्ण प्राणिमात्रात सुद्धा, अस्य = याचा, कश्चित् = किंचितही, अर्थव्यपाश्रयः = स्वार्थाचा संबंध, न = राहात नाही ॥ ३-१८ ॥
अर्थ
त्या महामनुष्याला या विश्वात कर्मे करण्याचे काही प्रयोजन असत नाही. तसेच कर्मे न करण्याचेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणिमात्रातही त्याचा जरादेखील स्वार्थाचा संबंध असत नाही. ॥ ३-१८ ॥
मूळ श्लोक
तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर । असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ ३-१९ ॥
संदर्भित अन्वयार्थ
तस्मात् = म्हणून, सततम् = निरंतरपणे, असक्तः = आसक्तीने रहित होऊन, कार्यम् कर्म = कर्तव्य कर्म, समाचर = नीटपणे तू करीत राहा, हि = कारण, असक्तः = आसक्तीने रहित होऊन, कर्म = कर्म, आचरन् = करणारा, पूरुषः = मनुष्य, परम् = परमात्म्याला, आप्नोति = प्राप्त करून घेतो ॥ ३-१९ ॥
अर्थ
म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करीत राहा. कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. ॥ ३-१९ ॥
मूळ श्लोक
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः । लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि ॥ ३-२० ॥
संदर्भित अन्वयार्थ
कर्मणा एव = (आसक्तिरहित) कर्माचरणाद्वारेच, जनकादयः = जनक इत्यादी ज्ञानीजन सुद्धा, संसिद्धिम् = परमसिद्धीला, आस्थिताः = प्राप्त झाले होते, हि = म्हणून, (तथा) = तसेच, लोकसङ्ग्रहम् = लोकसंग्रहाकडे, सम्पश्यन् अपि = दृष्टी ठेवून सुद्धा, कर्तुम् एव = कर्म करण्यासच, अर्हसि = तू योग्य आहेस म्हणजे तुला कर्म करणे हेच उचित आहे ॥ ३-२० ॥
अर्थ
जनकादी ज्ञानी लोकही आसक्तिरहित कर्मांनीच परमसिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊनदेखील तू कर्म करणेच योग्य आहे. ॥ ३-२० ॥
मूळ श्लोक
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः । स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ ३-२१ ॥
संदर्भित अन्वयार्थ
श्रेष्ठः = श्रेष्ठ मनुष्य, यत् यत् = जे जे, आचरति = आचरण करतो, इतरः जनः = अन्य लोकसुद्धा, तत् तत् एव = त्या त्या प्रमाणे (आचरण करतात), सः = तो, यत् = ज्या गोष्टी, प्रमाणम् = प्रमाण (म्हणून मान्य), कुरुते = करतो, लोकः = सर्व मनुष्यसमुदाय, तत् = त्यालाच, अनुवर्तते = अनुसरून वागतो ॥ ३-२१ ॥
अर्थ
श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो, त्या त्या प्रमाणेच इतर लोकही आचरण करतात; तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो, त्याप्रमाणेच सर्व मनुष्यसमुदाय वागू लागतो. ॥ ३-२१ ॥
मूळ श्लोक
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन । नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ ३-२२ ॥
संदर्भित अन्वयार्थ
पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), त्रिषु लोकेषु = तिन्ही लोकांत, मे = मला, किञ्चन कर्तव्यम् = कोणतेही कर्तव्य, न अस्ति = नाही, च = तसेच, अवाप्तव्यम् = प्राप्त करून घेण्यास योग्य वस्तू, अनवाप्तम् न = मिळालेली नाही असेही नाही, (तथापि) = तरीसुद्धा, कर्मणि एव = कर्मांचे आचरण, वर्ते = मी करीतच आहे ॥ ३-२२ ॥
अर्थ
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), मला या तिन्ही लोकांत काहीही कर्तव्य नाही आणि मिळविण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही, असे नाही. तरीही मी कर्तव्य कर्म करीतच असतो. ॥ ३-२२ ॥
मूळ श्लोक
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः । मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ३-२३ ॥
संदर्भित अन्वयार्थ
हि = कारण, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), यदि = जर, जातु = कदाचित, अहम् = मी, अतन्द्रितः = सावध राहून, कर्मणि = कर्मे, न वर्तेयम् = केली नाहीत (तर मोठी हानी होईल, कारण), मनुष्याः = सर्व माणसे, सर्वशः = सर्व प्रकारांनी, मम = माझ्याच, वर्त्म = मार्गाचे, अनुवर्तन्ते = अनुकरण करतात ॥ ३-२३ ॥
अर्थ
कारण हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जर का मी सावध राहून कर्मे केली नाहीत, तर मोठे नुकसान होईल, कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतात. ॥ ३-२३ ॥
मूळ श्लोक
उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् । सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ ३-२४ ॥
संदर्भित अन्वयार्थ
(अतः) = म्हणून, चेत् = जर, अहम् = मी, कर्म = कर्मे, न कुर्याम् = केली नाहीत (तर), इमे = ही, लोकाः = सर्व माणसे, उत्सीदेयुः = नष्ट-भ्रष्ट होऊन जातील, च = आणि, सङ्करस्य = संकराचा, कर्ता = कर्ता, स्याम् = मी होईन, (तथा) = तसेच, इमाः = या, प्रजाः = सर्व प्रजांचा, उपहन्याम् = मी घात करणारा होईन ॥ ३-२४ ॥
अर्थ
म्हणून जर मी कर्मे केली नाहीत, तर ही सर्व माणसे नष्ट-भ्रष्ट होतील आणि मी संकरतेचे कारण होईन, तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईन. ॥ ३-२४ ॥
मूळ श्लोक
सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत । कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम् ॥ ३-२५ ॥
संदर्भित अन्वयार्थ
भारत = हे भारता (भरतवंशी अर्जुना), कर्मणि = कर्मांमध्ये, सक्ताः = आसक्त असणारे, अविद्वांसः = अज्ञानी लोक, यथा = ज्याप्रमाणे, (कर्म) = कर्मे, कुर्वन्ति = करतात, तथा = त्याचप्रमाणे, असक्तः = आसक्तिरहित (अशा), विद्वान् = विद्वानाने सुद्धा, लोकसङ्ग्रहम् = लोकसंग्रह, चिकीर्षुः = करण्याच्या इच्छेने, (कर्म) = कर्मे, कुर्यात = करावीत ॥ ३-२५ ॥
अर्थ
हे भारता(भरतवंशी अर्जुना), कर्मांत आसक्त असणारे अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्मे करतात, त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करावीत. ॥ ३-२५ ॥
मूळ श्लोक
न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् । जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन् ॥ ३-२६ ॥
संदर्भित अन्वयार्थ
युक्तः = परमात्म्याच्या स्वरूपात अढळपणे स्थित असणाऱ्या, विद्वान् = ज्ञानी मनुष्याने, कर्मसङ्गिनाम् = शास्त्रविहित कर्मांमध्ये आसक्ती असणाऱ्या, अज्ञानाम् = अज्ञानी मनुष्यांचा, बुद्धिभेदम् = बुद्धिभ्रम म्हणजेच कर्मांमध्ये अश्रद्धा, न जनयेत् = उत्पन्न करू नये (या उलट), सर्वकर्माणि = शास्त्रविहित सर्व कर्मे, समाचरन् = नीटपणे (स्वतःच) आचरण करावीत (तशीच त्यांच्याकडूनही कर्मे), जोषयेत् = करवून घ्यावीत ॥ ३-२६ ॥
अर्थ
परमात्मस्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी मनुष्याने शास्त्रविहित कर्मांत आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्मांविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तमप्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावीत. ॥ ३-२६ ॥
मूळ श्लोक
प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः । अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ॥ ३-२७ ॥
संदर्भित अन्वयार्थ
कर्माणि = सर्व कर्मे (खरे पाहाता), सर्वशः = सर्व प्रकारांनी, प्रकृतेः = प्रकृतीच्या, गुणैः = गुणांच्या द्वारे, क्रियमाणानि = केली जातात, (तथापि) = तरीसुद्धा, अहङ्कारविमूढात्मा = अहंकारामुळे ज्याचे अंतःकरण मोहित झाले आहे असा अज्ञानी मनुष्य, अहम् कर्ता = मी कर्ता आहे, इति = असे, मन्यते = मानतो ॥ ३-२७ ॥
अर्थ
वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात. तरीही ज्याचे अंतःकरण अहंकारामुळे मोहित झाले आहे, असा अज्ञानी मनुष्य मी कर्ता आहे, असे मानतो. ॥ ३-२७ ॥
मूळ श्लोक
तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः । गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ ३-२८ ॥
संदर्भित अन्वयार्थ
तु = परंतु, महाबाहो = हे महाबाहो(अर्जुना), गुणकर्मविभागयोः = गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे, तत्त्ववित् = तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी हा, गुणाः = सर्व गुण हेच, गुणेषु = गुणांमध्ये, वर्तन्ते = वावरतात, इति = असे, मत्वा = जाणून (त्यामध्ये), न सज्जते = अडकत नाही ॥ ३-२८ ॥
अर्थ
पण हे महाबाहो (अर्जुना), गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणांत वावरत असतात, हे लक्षात घेऊन त्यांमध्ये आसक्त होत नाही. ॥ ३-२८ ॥
मूळ श्लोक
प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु । तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत् ॥ ३-२९ ॥
संदर्भित अन्वयार्थ
प्रकृतेः = प्रकृतीच्या, गुणसम्मूढाः = गुणांनी अत्यंत मूढ झालेली माणसे, गुणकर्मसु = गुणांमध्ये आणि कर्मांमध्ये, सज्जन्ते = आसक्त होतात, अकृत्स्नविदः = पूर्णपणे न जाणणाऱ्या, मन्दान् = मंदबुद्धी अज्ञानी अशा, तान् = त्या माणसांना, कृत्स्नवित् = संपूर्णपणे जाणणाऱ्या ज्ञानी मनुष्याने, न विचालयेत् = विचलित करू नये ॥ ३-२९ ॥
अर्थ
प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणांत आणि कर्मांत आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या मंदबुद्धीच्या अज्ञानी मनुष्यांचा पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानी मनुष्याने बुद्धिभेद करू नये. ॥ ३-२९ ॥
मूळ श्लोक
मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा । निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥ ३-३० ॥
संदर्भित अन्वयार्थ
अध्यात्मचेतसा = अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताच्या द्वारे, सर्वाणि = सर्व, कर्माणि = कर्मे, मयि = मला, सन्यस्य = अर्पण करून, निराशीः = आशारहित, निर्ममः = ममतारहित, (च) = आणि, विगतज्वरः = संतापरहित, भूत्वा = होऊन, युध्यस्व = तू युद्ध कर ॥ ३-३० ॥
अर्थ
अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा, ममता व संताप रहित होऊन तू युद्ध कर. ॥ ३-३० ॥
मूळ श्लोक
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः । श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ ३-३१ ॥
संदर्भित अन्वयार्थ
ये = जे कोणी, मानवाः = मानव, अनसूयन्तः = दोषदृष्टीने रहित, (च) = आणि, श्रद्धावन्तः = श्रद्धायुक्त होऊन, मे = माझ्या, इदम् = या, मतम् = मताचे, नित्यम् = नेहमी, अनुतिष्ठन्ति = अनुसरण करतात, ते अपि = तेसुद्धा, कर्मभिः = संपूर्ण कर्मांतून, मुच्यन्ते = सुटून जातात ॥ ३-३१ ॥
अर्थ
जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात, तेही सर्व कर्मांपासून मुक्त होतात. ॥ ३-३१ ॥
मूळ श्लोक
ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् । सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः ॥ ३-३२ ॥
संदर्भित अन्वयार्थ
तु = परंतु, ये = जे मानव, अभ्यसूयन्तः = माझ्यावर दोषारोपण करीत, मे = माझ्या, एतत् = या, मतम् = मताला, न अनुतिष्ठन्ति = अनुसरून आचरण करीत नाहीत, सर्वज्ञानविमूढान् = संपूर्ण ज्ञानाच्या बाबतीत मोहित झालेल्या अशा, तान् = त्या, अचेतसः = मूर्खांना, नष्टान् = नष्ट झालेले असेच, विद्धि = समज ॥ ३-३२ ॥
अर्थ
परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत, त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेलेच समज. ॥ ३-३२ ॥
मूळ श्लोक
सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि । प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥ ३-३३ ॥
संदर्भित अन्वयार्थ
भूतानि = सर्वच प्राणी, प्रकृतिम् यान्ति = प्रकृतीप्रत जातात म्हणजे आपल्या स्वभावाला परवश होऊन कर्मे करतात, ज्ञानवान्, अपि = ज्ञानी माणूस सुद्धा, स्वस्याः = आपल्या, प्रकृतेः = प्रकृतीला, सदृशम् = अनुसरून, चेष्टते = क्रिया करीत राहातो (मग अशा स्थितीत स्वभावापुढे), निग्रहः = हट्ट, किम् = काय, करिष्यति = करणार ॥ ३-३३ ॥
अर्थ
सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानीसुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयांत कोणाचाही हट्टीपणा काय करील? ॥ ३-३३ ॥
मूळ श्लोक
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ । तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥ ३-३४ ॥
संदर्भित अन्वयार्थ
इन्द्रियस्य इन्द्रियस्य अर्थे = इंद्रिय-इंद्रियाच्या म्हणजे प्रत्येक इंद्रियाच्या विषयांमध्ये, रागद्वेषौ = राग आणि द्वेष, व्यवस्थितौ = लपून राहिलेले असतात, तयोः = त्या दोघांच्या, वशम् = ताब्यात, (मनुष्यः) = माणसाने, न आगच्छेत् = येता कामा नये, हि = कारण, तौ = ते दोघेही, अस्य = या(माणसा)चे, परिपन्थिनौ = (कल्याणमार्गात) विघ्न करणारे महान शत्रू आहेत ॥ ३-३४ ॥
अर्थ
प्रत्येक इंद्रियाचे इंद्रियाच्या विषयात राग व द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोहोंच्या आहारी जाता कामा नये. कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याणमार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत. ॥ ३-३४ ॥
मूळ श्लोक
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् । स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३-३५ ॥
संदर्भित अन्वयार्थ
स्वनुष्ठितात् = चांगल्याप्रकारे आचरणात आणलेल्या, परधर्मात् = दुसऱ्याच्या धर्मापेक्षा, विगुणः = गुणरहित असासुद्धा, स्वधर्मः = स्वतःचा धर्म, श्रेयान् = अति उत्तम आहे, स्वधर्मे = आपल्या धर्मात, निधनम् = मरणे हे सुद्धा, श्रेयः = कल्याणकारक आहे, (च) = आणि, परधर्मः = दुसऱ्याचा धर्म, भयावहः = भय निर्माण करणारा आहे ॥ ३-३५ ॥
अर्थ
चांगल्याप्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे. पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे. ॥ ३-३५ ॥
मूळ श्लोक
अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः । अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ ३-३६ ॥
संदर्भित अन्वयार्थ
अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, वार्ष्णेय = हे वार्ष्णेया(श्रीकृष्णा), अथ = तर मग, अयम् = हा, पूरुषः = मनुष्य, अनिच्छन् अपि = स्वतःची इच्छा नसताना सुद्धा, बलात् = बळजबरीने, नियोजितः इव = जणू भाग पाडल्यामुळे, केन = कोणाकडून, प्रयुक्तः = प्रेरित होऊन, पापम् = पापाचे, चरति = आचरण करतो ॥ ३-३६ ॥
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे वार्ष्णेया(श्रीकृष्णा), तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो? ॥ ३-३६ ॥
मूळ श्लोक
श्रीभगवानुवाच काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः । महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥ ३-३७ ॥
संदर्भित अन्वयार्थ
श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, रजोगुणसमुद्भवः = रजोगुणापासून उत्पन्न झालेला, एषः = हा, कामः = कामच, क्रोधः = क्रोध आहे, एषः = हा, महाशनः = पुष्कळ खाणारा म्हणजे भोगांनी कधीही तृप्त न होणारा, (च) = तसेच, महापाप्मा = महापापी आहे, इह = या विषयात, एनम् वैरिणम् विद्धि = काम हाच खरोखर वैरी आहे असे तू जाण ॥ ३-३७ ॥
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे, असे तू जाण. ॥ ३-३७ ॥
मूळ श्लोक
धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च । यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥ ३-३८ ॥
संदर्भित अन्वयार्थ
यथा = ज्या प्रकारे, धूमेन = धुराने, वह्निः = अग्नी, च = आणि, मलेन = धुळीने, आदर्शः = आरसा, आव्रियते = झाकला जातो, (तथा) = तसेच, यथा = ज्या प्रकारे, उल्बेन = वारेने, गर्भः = गर्भ, आवृतः = झाकलेला असतो, तथा = त्या प्रकारे, तेन = त्या कामाचे द्वारा, इदम् = हे ज्ञान, आवृतम् = झाकले जाते ॥ ३-३८ ॥
अर्थ
ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहाते. ॥ ३-३८ ॥
मूळ श्लोक
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा । कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥ ३-३९ ॥
संदर्भित अन्वयार्थ
च = आणि, कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, अनलेन = अग्नीप्रमाणे, दुष्पूरेण = कधीही पूर्ण न होणाऱ्या, (च) = आणि, एतेन = या, कामरूपेण = कामरूपी, ज्ञानिनः = ज्ञानी लोकांच्या, नित्यवैरिणा = नित्य शत्रूच्या द्वारा, ज्ञानम् = (मनुष्याचे) ज्ञान, आवृतम् = झाकून टाकलेले असते ॥ ३-३९ ॥
अर्थ
आणि हे कुंतीपुत्र अर्जुना, कधीही तृप्त न होणारा हा कामरूपी अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्याने मनुष्यांचे ज्ञान झाकले आहे. ॥ ३-३९ ॥
मूळ श्लोक
इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते । एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥ ३-४० ॥
संदर्भित अन्वयार्थ
इन्द्रियाणि = इंद्रिये, मनः = मन, (च) = आणि, बुद्धिः = बुद्धी (हे सर्व), अस्य = या कामाचे, अधिष्ठानम् = निवासस्थान, उच्यते = म्हटले जातात, एषः = हा काम, एतैः = या मन, बुद्धी व इंद्रिये यांच्या द्वारेच, ज्ञानम् = ज्ञानाला, आवृत्य = झाकून टाकून, देहिनम् = जीवात्म्याला, विमोहयति = मोहित करतो ॥ ३-४० ॥
अर्थ
इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाचे निवासस्थान म्हटली जातात. हा काम या मन, बुद्धी व इंद्रियांच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो. ॥ ३-४० ॥
मूळ श्लोक
तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ । पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ॥ ३-४१ ॥
संदर्भित अन्वयार्थ
तस्मात् = म्हणून, भरतर्षभ = हे अर्जुना, त्वम् = तू, आदौ = प्रथम, इन्द्रियाणि = इंद्रियांना, नियम्य = वश करून घेऊन, ज्ञानविज्ञाननाशनम् = ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या, एनम् = या, पाप्मानम् = महान पापी अशा कामाला, हि = निश्चितपणे, प्रजहि = बळ वापरून मारून टाक ॥ ३-४१ ॥
अर्थ
म्हणून हे अर्जुना, तू प्रथम इंद्रियांवर ताबा ठेवून, या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या, मोठ्या पापी कामाला अवश्य बळेच मारून टाक. ॥ ३-४१ ॥
मूळ श्लोक
इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः । मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥ ३-४२ ॥
संदर्भित अन्वयार्थ
इन्द्रियाणि = इंद्रिये ही (स्थूलशरीरापेक्षा), पराणि = पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म आहेत, आहुः = असे म्हणतात, इन्द्रियेभ्यः = इंद्रियांपेक्षा, मनः = मन हे, परम् = पर आहे, मनसः तु = मनापेक्षा, बुद्धिः = बुद्धी ही, परा = पर आहे, तु = आणि, यः = जो, बुद्धेः = बुद्धीच्यासुद्धा, परतः = अत्यंत पर, सः = तो (आत्मा) आहे ॥ ३-४२ ॥
अर्थ
इंद्रियांना स्थूलशरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते. या इंद्रियांहून मन पर आहे. मनाहून बुद्धी पर आहे. आणि जो बुद्धीहूनही अत्यंत पर आहे, तो आत्मा होय. ॥ ३-४२ ॥
मूळ श्लोक
एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना । जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॥ ३-४३ ॥
संदर्भित अन्वयार्थ
एवम् = अशा प्रकारे, बुद्धेः = बुद्धीपेक्षा, परम् = पर म्हणजे सूक्ष्म, बलवान आणि अत्यंत श्रेष्ठ अशा आत्म्याला, बुद्ध्वा = जाणून, (च) = आणि, आत्मना = बुद्धीच्या द्वारा, आत्मानम् = मनाला, संस्तभ्य = वश करून घेऊन, महाबाहो = हे महाबाहो, कामरूपम् = (या) कामरूपी, दुरासदम् = दुर्जय, शत्रुम् = शत्रूला, जहि = तू ठार कर ॥ ३-४३ ॥
अर्थ
अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म, बलवान व अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे, हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून, हे महाबाहो, तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक. ॥ ३-४३ ॥
मूळ तिसऱ्या अध्यायाची समाप्ती
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
अर्थ
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील कर्मयोग नावाचा हा तिसरा अध्याय समाप्त झाला. ॥ ३ ॥