श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/९ डिसेंबर

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

९ डिसेंबर

अभिमान बाळगू नये, निंदा करू नये.


खरे पाहिले असता, देहबुद्धीचा जोर व्हायला कारण म्हणजे आमचा अभिमान होय. अभिमानाने सद्‌गुण जाऊ लागले तर काय उपयोग ? ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात मुख्य फरक म्हणजे, ज्ञानी अभिमान टाकतात तर अज्ञानी लोक तो वाढवतात. अभिमानासारखा मोठा शत्रू नाही. अंतरंगातल्या या शत्रूचा आपण शोध घ्यावा आणि त्याचा योग्य बंदोबस्त करावा. नुसत्या सत्कर्माने अभिमान जात नसतो. सापाला दूध घातले तरी त्याचे विषच होते, तसे अभिमानाला कोणतेही कृत्य घाला तो वाढतच जातो. आता याकरिता सत्कर्मे करायचे सोडावे असे नाही, परंतु अभिमान न बाळगता ती करावीत. 'मी कर्ता' ही भावना सोडावी. अभिमान हा बारशाला आपल्याबरोबर येतो, आणि बाराव्यापर्यंत आपल्याजवळच राहण्याचा प्रयत्‍न करतो. म्हणून नामरूपी अंकुशाच्या योगाने त्याला वेळीच हुसकून लावणे आवश्यक आहे.

आपल्या अंतःकरणामध्ये निंदेची घाण आहे; म्हणजे आपल्या विहिरीमध्ये खारट पाणी आहे. समजा वरचे खारट पाणी काढून टाकले आणि जास्त खोल खणले, तर एखादे वेळी गोड्या पाण्याचा झरा लागण्याचा संभव असतो. मग त्या विहिरीचे पाणी गोड होईल. तसे, आपण जर अभिमान टाकला, निंदा बंद केली, आणि अंतर्मुख होऊन भगवंताला शोधला, तर त्याच्या प्रेमाचा झरा लागून आपले अंतःकरण त्या प्रेमाने भरून जाईल. आपल्याकडे अशी म्हण आहे की, जे आडात आहे तेच पोहऱ्यात येते. विहिरीमध्ये जर खारट पाणी असेल तर तेच पोहऱ्यामध्ये येणार हे जसे खरे, त्याचप्रमाणे आपल्या मनात जे असते तेच बोलण्याच्या रूपाने बाहेर पडते. बोलण्यावरून माणसाच्या अंतःकरणाची परीक्षा होते. ज्याला निंदा आवडते त्याच्या पोटात घाण असलीच पाहिजे. काही लोक दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे त्याची निंदा करतात; दुसऱ्याचे चांगले त्यांना पाहवत नाही. काही लोक दोष आपल्यावर येऊ नये म्हणून दुसऱ्यांची निंदा करतात. काही लोकांची दृष्टीच अशी वाईट असते की, दुसऱ्यामध्ये दोष असो वा नसो, त्यांना दुसऱ्यांत दोष दिसायचाच.

भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने, दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे. त्याने दुसऱ्याची निंदा करू नये, आणि आपल्या सामर्थ्याचा वा गुणाचा अभिमानही बाळगू नये. लोकांनी जे करू नये असे आपल्याला वाटते, ते आपण स्वतः करू नये. प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा; त्याचा वास आत नसावा. आत वास भगवंताचाच असावा. त्यामुळे आतल्या सर्व दोषांचे उच्चाटन होऊन मनाला शाश्वत शांतीचा आस्वाद घेता येईल.PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg