Jump to content

श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/६ मे

विकिस्रोत कडून

६ मे

स्वार्थ आवरल्याने परस्परप्रेम वाढते.


परस्परांत प्रेम वाढविण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. एक, बारीकसारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी; म्हणजे द्वेष वाटणार नाही. दुसरी, सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी. तिसरी, कोणतीही सूचना सांगायची झाली, तर त्या व्यक्तीविषयक न बोलता, नम्रतेने आणि गोड शब्दांत सांगावी. चौथी, अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जीमध्ये या सर्वांचा बर्‍याच प्रमाणात अंतर्भाव होतो अशी बाब, म्हणजे स्वार्थाला आळा घालणे. म्हणजे मी स्वतः जितका माझ्याकरिता आहे असे वाटते, त्याच्याहीपेक्षा जास्त मी दुसर्‍याकरिता आहे असे वाटणे हे होय. आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणे हेच प्रेम वाढवायला मदत करते. ज्या माणसाला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही. जिथे निःस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे.

आता स्वार्थाचा विचार करताना असे सहज वाटते की, मी कुठे स्वार्थी आहे ? मी कुठे कुणाजवळ काय मागतो ? पण एवढ्याने 'स्वार्थदृष्टी नाही' असे म्हणता येणार नाही. अहंकारा इतकाच स्वार्थ जबरदस्त आहे. त्याच्या मुळ्या इतक्या खोल आणि सूक्ष्म असतात की त्यांचा पत्ताच लागत नाही. स्वार्थ तीन प्रकारचा असू शकतो; कायिक वाचिक व मानसिक. देहाला दुसर्‍यानिमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणे, हा कायिक स्वार्थ म्हणतात. माझ्या बोलण्याला सर्वांनी मान डोलवावी, मी काही कोणाला कमीजास्त बोललो तरी ते त्याने निमूटपणे सहन करावे, अशा तर्‍हेच्या वृत्तीला वाचिक स्वार्थ म्हणतात. आणि माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे, माझे विचार बरोबर आहेत अशी जाणीव इतरांनी ठेवावी, अशा तर्‍हेची आपली इच्छा, त्याला मानसिक स्वार्थ म्हणता येईल. आता, मी माझ्याकरिता जितका असेन त्याहून जास्त मी दुसर्‍याकरिता आहे, असा विचार केला तर असे दिसून येईल की, मी जेवढी मला स्वतःला सवड ठेवतो, तेवढीच किंवा त्याच्याहून थोडी जास्त सवड दुसर्‍याला ठेवणे जरूर आहे. म्हणजेच, जे दुसर्‍याने आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरे वाटत नाही, ते आपण दुसर्‍याच्या बाबतीत न करणे; आणि त्याच्याच उलट, जे दुसर्‍याने आपल्याला केले तर बरे वाटते तेच आपण दुसर्‍याच्या बाबतीत करावे. हेच सर्वाचे सार आहे आणि हाच खरा धर्म आहे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. आपण पुष्कळांच्यावर प्रेम केले तर आपण एकटेच त्यांचे करतो, पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात. जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असे समजावे.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.