श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/६ जुलै
६ जुलै
आपल्याला सद्गुरूचा आधार वाटावा.
वेळप्रसंग येईल तसे वागणे उचित आहे, आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये. परमात्म्याच्या चिंतनात मन गुंतले असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही. जेवढे झेपेल तेवढेच करावे. अभ्यास करावा पण काळजी न करता. सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून निवांत असावे. आपल्या मनाचे स्वास्थ्य बिघडू न देता आनंदात रहावे. वृत्ती आवरून आवरत नाही; ती परमात्म्याकडे लावली म्हणजे आवरते. रामइच्छेने सर्व चालते असे लक्षात ठेवावे. संकट, आनंद, दोन्ही भगवंताला सांगावीत. ज्या स्थितीत भगवंताने ठेवले त्या स्थितीत समाधान मानावे.
अंतःकरणात सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागते. तीर्थयात्रा आणि साधुसंतांची भेट हेच ते निमित्त होय. श्रीरामचंद्रही तीर्थयात्रेला जाऊन अनेक संतांची दर्शने घेऊन आले. संतांच्या अहंकाराला जिवंत राहताच येणार नाही. कारण 'परोपकार' करायला लावणार 'पर'च ठिकाणावर नाही, तर मग 'दुसर्याकरिता मी काही केले' ही भावना व्हायला आधारच कुठे राहिला ? विषयाच्या लालसेने सत्समागम करणे हा खरा सत्समागम नव्हे. संत कधीकधी आपल्याला विषय देतात खरे, पण एकंदरीत आपल्याला विषयाचा वीट आणण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो. संताच्या घरी नुसते पडून राहिल्यानेही शुद्ध भाव येईल. भगवंताच्या नामातच संतसंगती आहे, कारण नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे. विषयाची ऊर्मी हे मायेचे स्मरण होय, आणि नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय. तपश्चर्येचे सर्वांत शेवटचे फळ काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्यभावाने शरण जाण्याची बुद्धी होय. ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे. एकदा शरण गेल्यावर आपण उरूच शकत नाही; त्यालाच शरणागती म्हणतात; आणि हीच परमार्थातली अत्यंत श्रेष्ठ गती आहे. आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छातीठोकपणे सांगत चला. काही नाही केलेत तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागेपुढे आहेत अशी दृढ भावना असावी. मला सुखदुःख दोन्ही नाहीत. पण तुम्ही दुःखी झालात तर मला दुःख होते. तेव्हा तुम्ही मनाला दुःखच होऊ नये असे वागा. प्रपंची माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे. ती जाणीव ठेवूनच 'भगवंताचे नाम घ्या' असे मी सांगतो. जे मी सुरुवातीला सांगितले तेच शेवटी सांगतो; तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका.
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |