Jump to content

श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/४ नोव्हेंबर

विकिस्रोत कडून

४ नोव्हेंबर

भगवंत सगुणात आले म्हणजे काय ?



एक गृहस्थ मला भेटले. ते म्हणाले, "हिंदू धर्मासारखा धर्म नाही; पण देव सगुणात आले हे नाही मला कबूल. म्हणे निरनिराळ्या उपासना सांगितल्या ! देव जर निर्गुण निराकार, तर राम, कृष्ण, शिव, दत्त अशा या एवढ्या निरनिराळ्या उपासना कशाला ?" पुढे एक दिवस त्यांच्याविषयी एका गृहस्थाने त्यांच्या घरी चौकशी केली, तेव्हां प्रत्येकजण निरनिराळे नाव घेऊन सांगू लागले. कोणी 'दादा' घरी नाहीत असे म्हणाले, तर कोणी 'दामोदर' घरी नाही म्हणाले, कोणी 'रावसाहेब' नाहीत म्हणाले. हे सर्व जरी म्हटले तरी त्या योगे भेटणारा मनुष्य ज्याप्रमाणे तो गृहस्थ एकच, त्याप्रमाणे हे भगवंताच्या निर्गुणाचे सगुणात आले. भगवंत सगुणामध्ये आला की, जे नियम आपल्याला लागू असतात तेच नियम त्यालाही लागू होतात. सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो म्हणतो, त्याला त्याचे मर्मच नाही कळले. खरी तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याला नाही ते कळत. आपले वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, आणि त्यावरची भाष्ये यांनी निर्गुण स्वरूपाची रूपरेषा काढून दिली. संतांनी तिच्यामध्ये रंग भरला आणि भगवंताचे सुंदर चित्र तयार केले; ही सगुणभक्ति होय. सगुणोपासनेवाचून मोक्ष मिळणार नाही.

उपासना याचा अर्थ अगदी निकट असणे, उपास्याचा गुण अंगी आणणे. तुळशीदासांनी रामोपासना अशी केली की ते स्वतः रामरूप बनले. तुळशीदासांचे रामायण ऐकत असता मनुष्य तल्लीन होऊन जातो. रामरूप होण्यासाठी रामासारखे निःस्वार्थी बनले पाहिजे. रामाने 'जग माझ्याकरिता आहे' असे न म्हणता, 'मी जगाकरिता आहे' असे म्हटले. हा खरा परमार्थ. एकपत्‍नीव्रत, सत्यभाषण हे रामाचे दोन प्रमुख गुण होते. इतर अवतारातही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, परंतु सर्वांत रामचरित्र प्रापंचिकांना अत्यंत आदर्शरूप आहे. रामचरित्र सर्वांना सर्वकाळी आदरणीय आणि अनुकरणीय होय. रामचरित्र वाचताना, सांगताना अथवा ऐकताना, आपण रामप्रेमात स्वतःला विसरून जाणे ही फार उच्च अवस्था होय.

भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंत हवासा वाटणे किंवा त्याची तळमळ उत्पन्न करणे हे भगवंताच्या हाती नाही, ते संतांच्या हाती आहे; म्हणून सत्संगतीने ते साधते. 'साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा' असे आपण म्हणतो. संत दसरा आणतात, मग दिवाळी आपोआप मागे येते. आमची वृत्ती विषयाकार झालेली आहे, ती काढून संत सन्मार्गाला लावतात, तोच खरा मुहूर्त की ज्या दिवशी आमची वृत्ती भगवंताकडे होऊ लागली.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.