श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३ जून

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

३ जून

परमार्थ कसा साधेल ?

ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली, त्याला शरण जावे. त्याला शरण जाण्याच्या आड काय येते ते पाहावे. कर्तेपण टाका म्हणजे शरण जाता येते. माझेपणाने मिरविता आणि अभिमान कायम ठेवता, मग भगवंताला शरण कसे जाता येईल ? आपण संतांच्या दर्शनाला जातो, आणि बायकोचे दुखणे बरे व्हावे असे म्हणतो; मग ते दर्शन खरे झाले म्हणायचे का ? पोराबाळांकरता, बायकोकरता, संतांकडे नाही जाऊ. संतांनी नामस्मरण करायला सांगितले, परंतु मुलगा वाचत नाही असे पाहिले की आपली रामावरची, नामस्मरणावरची, श्रद्धा उडते. म्हणजे मी विषयाकरता नाम घेतो असेच झाले ! विषय सुटावेत असे वाटते, पण ते सुटतच नाहीत. याचे कारण आमची अशी बलवत्तर इच्छाच नसते. संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोर घेऊन आडवी येते; तिला दूर सारून निघाला, पण पुढे मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते ! माणूस व्यसनाकरतां हे सर्व करतो, परंतु परमार्थाकरिता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटले, तर निरनिराळ्या सबबी आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. चोवीस वर्षे अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही, मग परमार्थ मात्र दोन वर्षात साध्य व्हावा असे कसे म्हणावे ?

शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही. त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्यानेच जास्त फायदा होईल. काही खेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात, तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे. तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. खेळात काही बाह्य साधन तरी लागते, पण या अभ्यासात त्याचीही जरूरी नसते. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल, तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे, हा तर मोठा घात आहे. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्‍न करणे, याचेच नाव परमार्थ. 'जग काय म्हणेल' म्हणून वागणे याचे नाव व्यवहार, आणि 'भगवंत काय म्हणेल' म्हणून वागणे हाच परमार्थ.PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg