श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३१ मे

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

३१ मे

भगवंताला शरण जावे.मी जे जे करतो ते ते भगवंताकरता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भगवंतप्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे, हे भक्ताचे लक्षण आहे. चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते. याकरिता, कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे. भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसे म्हणावे ? जो काळ भगवंत स्मरणात जातो, तोच काळ सुखात जातो. विषयासाठी आपण स्वतःला विसरतो. मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू ? मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते, तो पर्यंत सगुणभक्ति करावी. गुरूच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो, म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली ? यामध्ये अभिमान अनायासे मारला जातो. मीपणा टाकल्याशिवाय गुरुआज्ञा नाही पाळता येत. गुरुआज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरीसुद्धा ती आपले डोके मधून मधून वर काढतेच. पण तिला एकदा कळले की हा ऐकत नाही, की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते. देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली, तरी गुरुआज्ञा मोडू नये. देहातीत व्हायला, गुरुआज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे ? 'मी देही नाही' असे म्हणत राहिला, तर माणूस केव्हातरी देहातीत होईल.

आपला धर्म आणि नीति सांभाळावी, आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्‍न करावा. संत आणि प्रापंचिक, दोघेही प्रपंच करतात; पण प्रापंचिक, कर्तेपणा आपल्याकडे घेतात, तर संत 'राम कर्ता' असे म्हणून प्रपंच करतात. कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतलेत तर सुखदुःख भोगावे लागेल. बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो, मग भगवंताकरिता नाही का तसे करता येणार ? तळमळ असली पाहिजे मग सर्व काही होते. 'किती दिवसात मुक्ति मिळेल ?' याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे. 'ज्या क्षणी भगवंतस्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ति मिळेल.' स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे. कृती करणार्‍याचाच वेदांत खरा असतो. मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते. याकरिता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा, सहवासाने माणसाचेसुद्धा प्रेम जर वाढते, तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचे प्रेम नाही का येणार ? भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे, यातच सर्व धर्माचे आणि शास्त्रांचे सार आहे.


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg