श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२९ ऑक्टोबर

विकिस्रोत कडून

२९ ऑक्टोबर भगवंताचे होण्यास आपण निर्दोष असणे जरूर आहे.


भगवंताचे समाधान आपण्यास न मिळण्याचे कारण, आम्ही ज्याचे आहोत असे वाटते ते आम्हाला सोडता येत नाही; प्रपंच आम्हाला हवासा वाटतो. जगाच्या तोंडाकडे पाहून समाधान मिळेल असे आपल्याला वाटते. ही प्रपंचाची आणि जगाची आस सोडून भगवंताचे दास झाल्याशिवाय आम्हाला समाधान मिळणे कठीण आहे. हे दास्यत्व येण्यासाठी भगवंताच्या प्राप्तीची उत्कंठा आम्हाला लागणे जरूर आहे. ही उत्कंठा यावी तरी कशी ? भगवंताचे होण्यासाठी, आम्ही अगदी निर्दोष असणे अवश्य आहे. हे निर्दोषपण येण्यासाठी, आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दिसू नये. मनाने नेहमी शुद्ध असावे. आपण खरोखर चांगले नाही असे आपल्याला कळत असतानासुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात, याची आम्हाला खंत वाटणे जरूर आहे. जगात आपले वागणे असे असावे की, आपल्याविषयी दुसर्‍या कुणाला शंकाही येता कामा नये. ढोंग मुळीच करू नका. आचारविचाराने इतके पवित्र झाल्यानंतर मग आम्हाला भगवंताचे का बरे होता येणार नाही ?

भगवंताचे झाल्यावर आम्हाला काळजीचे काही कारण आहे का ? आपण सर्वजण 'आम्ही भगवंताचे आहोत' असे म्हणतो आणि काळजी करतो, हे किती विपरीत आहे ! ही प्रपंचाची काळजी नाहीशी होण्यासाठी, प्रपंचातले सर्व वैभव, धनदौलत ही आपली कर्तबगारी नसून, ती रामाच्या इच्छेने आली आहे असे आम्ही म्हटले पाहिजे. 'माझा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे, तू ठेवशील त्यात मी समाधानात राहीन,' अशी आमची वृत्ती बनायला पाहिजे. यासाठी मोठे वैराग्य पाहिजे असे नाही. खरोखर, वैराग्य, त्याग वगैरेंच्या भानगडीत पडू नका. भगवंत ठेवील त्या परिस्थितीमध्ये समाधानात राहणे यासारखे दुसरे वैराग्य कोणतेही नाही. ज्याच्यामधे भगवंताचा विसर पडेल, त्याच्यावर वैराग्य करा. ज्याच्यामध्ये भगवंताची आठवण राहील, तो विवेक समजून आचरणात आणा. प्रपंच उत्तम करा, पण त्याच्या आधीन होऊ नका. आधीन होणे हे पाप आहे, प्रपंच करणे हे पाप नाही. शक्य तितके धर्माचे पालन करा; नीति प्राणाबरोबर सांभाळा. गोंदवल्याला तुम्ही इतकी मंडळी येता, मला संकोच असा वाटतो की, इतका पैसा खर्च करून, इतक्या अडचणी सोसून, इतके कष्ट करून तुम्ही येता, तर बरोबर काय घेऊन जाता ? काहीतरी बरोबर घेऊन जाऊन आचरणात आणा. नामस्मरणात तुम्ही सगळ्यांनी राहा. नामाकरिता नाम घ्या. नाम घेऊन काही मागू नका, राम कल्याण केल्याखेरीज राहणार नाही.

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.