श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२८ एप्रिल

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

२८ एप्रिल

खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो.


असंताची आवड नाहीशी होईल तेव्हाच संत हवासा वाटेल. विषय आपल्याला त्रास देतात, पण ते सोडावे कसे हे समजत नाही. जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे. आपली वाट चुकली आहे असे ज्याला वाटेल तोच जंगलातून बाहेर पडण्याची वाट विचारतो. 'आता वय फार झाले, काळाच्या स्वाधीन होण्याची वेळ आली, रामा तूच आता तार,' अशी तळमळ लागली, तरच संतसहवास लाभेल. सत्संगत हवी असे आपण नेहमी म्हणतो खरे, पण मागतो मात्र ' असत्‌ ' ; मग आपल्याला सत्संगत मिळेल कशी ? स्वतःला कसे विसरावे हे कळण्याकरताच संताला शरण जावे. आपले विस्मरण म्हणजे भगवंताचे स्मरण. वडील दूर आहेत, त्यांचे पत्र नाही, म्हणून काळजी करतो; पण जन्मापासून भगवंत दूर आहे, त्याची तळमळ का लागू नये ? आपण नामस्मरण करतो, पण ज्याचे नाम घेतो तो कोण, असा विचार करतो का ? विषय सोडल्याशिवाय राम कसा भेटणार ? रामही हवा आणि विषयही हवा, हे जुळणार कसे ?

मला जोपर्यंत चिमटा घेतलेला कळतो तोपर्यंत कर्म मार्गानेच जाणे जरूर आहे. कर्ममार्ग सांभाळताना, 'कर्ता मी नव्हे' ही भावना सांभाळणे जरूर आहे. जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही, आणि बोललाच तर तो अगदी थोडे बोलेल; तो उत्तम होय. अनुभवी खरा, पण नाइलाज म्हणून जो बोलतो तो त्याच्यापेक्षा थोडा कमी समजावा. कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे, म्हणून हे लोक कमीपणा पत्करूनही पुष्कळ बोलतात. परंतु अनुभव नसताना उगीच शब्दपांडित्य करणारे हे अगदी खालच्या दर्जाचे होत. ज्याला अनुभव कमी त्याला शब्दपांडित्य फार असते. जो जगाला फसविणार नाही आणि स्वतःही फसणार नाही, असाच मनुष्य जगाला मार्गाला लावू शकेल.

कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात, तरी लोक त्यांच्या मागे लागतात, कारण त्यांच्या शिव्यादेखील आशीर्वादाप्रमाणे असतात. हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही. एखादा मुलगा बापाला म्हणू लागला की, 'मी इतका जवळचा, पण मला मिळतो मार; आणि तो लांबचा पोर, त्याचे मात्र लाड !' पण तो मारच आपल्या हितासाठी असतो, हे त्याला नाही समजत ! साधूच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्येसुद्धा दुष्ट बुद्धी नसते. संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असते. संत निःस्वार्थी असतात. ते तळमळीने सांगतात. त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. संताच्या सांगण्याचा खरा अर्थ आचरणानेच कळेल.


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg