श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२४ जानेवारी

विकिस्रोत कडून

२४ जानेवारी

नामसाधन कसे करावे ?

नामाचे साधन कसे करावे ? एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल. पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोक पडेल, आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल; त्याप्रमाणे, केव्हातरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनेमाने, ठराविक वेळी, आणि शक्य तर ठराविक स्थळी, जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते. जात्याला दोन पेठी असतात; त्यातले एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते. पण जर दोन्ही पेठी फिरत राहिली तर दळण दळले न जाता फुकट श्रम मात्र होतात. माणसाचे शरीर आणि मन अशा दोन पेठी आहेत. त्यांतले मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पेठे आहे. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे, आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो. प्रारब्धरूपी खुंटा देहरूपी पेठयात बसून तो त्याला फिरवतो, आणि मनरूपी पेठे स्थिर असते. देह प्रारब्धावर सोडावा, आणि मन भगवंताच्या स्मरणात स्थिर ठेवावे, याहून नामाचे साधन दुसरे काय ? हे साधन अमक्यालाच साधेल असे नाही, तर ते कोणालाही साधेल. गरिबाला गरिबीचे दु:ख होते म्हणून साधत नाही, तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ असतो म्हणून साधत नाही; विद्वानाला विद्येचा अभिमान होतो म्हणून साधत नाही, तर अडाण्याला काय करावे हे समजत नाही म्हणून साधत नाही. साशंक वृत्तीने कितीही साधन केले, कितीही नामस्मरण केले, तरी कधी समाधान होणार नाही.


नीतिधर्माचे आचरण, शास्त्रशुध्द वर्तन, शुद्ध अंतःकरण, आणि भगवंताचे स्मरण, इतक्या गोष्टी असतील तरच साधक शेवटपर्यंत पोहोचेल; आणि शेवटपर्यंत तो पोहोचला तरच फायदा. 'घरी पोहोचल्यावर पत्र लिहा' असे म्हणतात, याचा अर्थ हाच आहे. प्रपंच करीत असताना वाईट विचार मनात येतात, त्याचप्रमाणे परमार्थ करीत असतानाही वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचे कारण नाही. ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाम घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही. दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे. जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृति आहे तिथेच समाधानाची प्राप्ती होते. 'भगवंता, मी तुझा आहे' असे रात्रंदिवस म्हणत गेल्याने भगवंत प्रकट होत जाईल; आणि भगवंत जितका प्रकट होत जाईल तितके 'मी' पणाचे दडपण आपोआप कमी होत जाईल.



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.