श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२२ जानेवारी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

२२ जानेवारी

भवसागर तरून जाण्यासाठी नाम हेच साधन.


नाम हे स्वत:सिद्ध आहे म्हणूनच ते अत्यंत उपाधिरहित आहे. नाम घेताना आपण पुष्कळदा त्याच्या मागे उपाधी लावतो; उदाहरणार्थ आपण ऐहिक सुखाच्या प्राप्तीकरिता नाम घेतो; किंवा मी नाम घेतो ही अहंकाराची भावना बाळगतो. या उपाधीमुळे आपल्या प्रगतीला बरेच अडथळे येतात. म्हणून नामाकरिताच नामस्मरण करावे आणि तेही सदगुरूच आपल्याकडून करवून घेतात या भावनेने करावे. त्या योगाने अहंकार नष्ट होऊन शरणागती येईल. शरणागती यायला रामनाम हाच रामबाण उपाय आहे. तो आपण करावा. नामाचा महिमा वाचेने सांगणे अशक्य आहे पण हे सांगण्याकरिता तरी बोलावे लागते इतकेच. मनुष्यप्राणी भवसागरात गटांगळया खातो आहे; समुद्रातून तरून जाण्यासाठी जशी नाव तसे भवसागरातून तरून जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे. फक्त एकच दक्षता घेणे जरूर आहे ती ही की नावेत समुद्राचे पाणी येऊ देऊ नये नाहीतर नावेसकट आपण बुडून जाऊ; त्याप्रमाणे संसाररूपी समुद्राचे पाणी नामरूपी नावेत येऊ देऊ नये. म्हणजे कोणत्याही प्रापंचिक अडचणीमुळे नामात व्यत्यय येऊ देऊ नये. तसेच नामाचा उपयोग संसारातल्या अडचणी दूर होण्याकरिता व्हावा ही बुद्धी न ठेवता नामाकरिताच नाम घ्यावे म्हणजे नावेत पाणी न शिरता सुखरूपपणे पैलतीराला म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचता येते. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते.


देह केव्हा जाईल याचा नेम नाही मग म्हणून म्हातारपणी नामस्मरण करू असे म्हणू नये. अगदी उद्यापासून नामस्मरण करू म्हटले तर उद्याची खात्री आहे का ? आयुष्य क्षणभंगुर आहे ही खात्री प्रत्येकाला आहे म्हणून तर प्रत्येकजण आयुष्याचा विमा उतरवतो. लग्नाला आलेल्या पाहुण्याला लग्न कसे पार पडेल ही काळजी नसते पण घरातल्या माणसाला फार काळजी वाटते. आपल्या प्रपंचात आपण पाहुण्यासारखे वागू या. देहादिक सर्व रामाला अर्पण करून निश्चिंत होऊ या.


सोन्यामोत्याचे दागिने घालणारी श्रीमंताची बाई असू द्या बेताचे लहान दागिने घालणारी मध्यम स्थितीतली बाई असू द्या किंवा चांदीची जोडवी आणि नुसते मंगळसूत्र घालणारी अगदी गरिबाची बाई असू द्या त्या सर्वांना कुंकू ज्याप्रमाणे सारखेच असते त्याप्रमाणे कसलाही भेद न ठेवता नाम हे सर्वांना सारखेच साधन आहे. सूर्य हा फक्त प्रकाश देतो पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो. तसेच नाम हे भगवंताचे प्रेम वाढविते; मग आपले दोष आपोआपच नाहीसे होतात. भगवंताचे अस्तित्व आपल्याला जास्त पटत चालले किंवा भगवंताच्या कर्तृत्वाची साक्ष जास्त जास्त अनुभवास येऊ लागली की परमार्थामध्ये आपली प्रगती झाली असे समजावे.PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg