श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२१ एप्रिल

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

२१ एप्रिल

सत्समागम म्हणजे संत सांगतील त्याप्रमाणे वागणे.कोणत्याही मंगल कार्यात सर्वाआधी गणपतीचे आवाहन करतात, आणि सगळे कार्य संपले की सर्वांचे शेवटी त्याचे विसर्जन करतात. त्याचप्रमाणे अनुसंधानानेच पोथीला सुरुवात करावी आणि अनुसंधानानेच पोथीची समाप्ती करावी. लौकिक कार्यामध्ये गणपतीचे विसर्जन झाल्यावर आपण शिल्लक उरतो, पण अनुसंधानाचे विसर्जन करताना आपणही त्यात नाहीसे व्हावे. "जसे ठेवायचे असेल तसे ठेवा, पण आपला विसर पडू देऊ नका, एवढी भीक घालावी, " अशी गुरूच्या चरणी प्रार्थना करावी.

भगवंताला विसरून भजन करू नका. भगवंताची आठवण ठेवून भाजी जरी आणली तरी त्याचे श्रेय जास्त आहे. जगाच्या लाजेला भिऊन भगवंताला अंतर देऊ नये. 'मी कोण' याचा विचार करावा, आणि तो करण्यासाठी, 'मी नाही कोणाचा' हे बघावे. मी आप्तेष्टांचा, बायको-मुलांचा, आईबापांचा तर नाहीच, पण मी देहाचा आणि मनाचाही नाही; असे करता करता जो राहील तो मी. खरे समाधान एकपणात आहे, अद्वैतात आहे. म्हणून, द्वैताचा जनक जो अभिमान तो कमी कसा होईल ते बघावे. याकरिता, मी कर्ता नसून देव कर्ता आहे असे मानावे. सर्वांभूती भगवद्‌भाव पाहावा, सत्समागम करावा. सत्समागम म्हणजे सत्याचा समागम. सत्पुरुषाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनविणे हा खरा सत्समागम आहे. संतांवर अनन्य श्रद्धा ठेवा. त्यांच्या चालीने चाला. त्यांच्या समागमात दैन्य मानू नका, जे तुमची एकसारखी विषयातली नडच भागवतील ते संत नव्हेत. खरे संत विषयाची आसक्ति कमी करतात; अशा संताला शरण जावे. निर्विषय चित्त संतांनाच करता येते. संत हे ईश्वरदर्शनाची तळमळ उत्पन्न करतात. तळमळ उत्पन्न करून देणे हीच संतांची कामगिरी. संतांची भाषा तळमळीची असते, म्हणून ती तळमळ उत्पन्न करते. संत सांगतील त्याप्रमाणे वागावे. जग संतांशिवाय असणेच शक्य नाही. जे देहात दिसले पण वस्तुतः देहातीत राहिले ते संतच होत. आम्हाला त्यांना ओळखता येत नाही याला काय करावे ? नामाच्या योगानेच संत ओळखता येतात आणि टिकवता येतात. जो भगवंताचे नाम घेईल त्याला संत भेटेल, आणि तो त्याला भगवंताची प्राप्ती करून देईल. त्याचे कुठे अडणार नाही. पण जो नुसत्या शब्दज्ञानाच्या मागे लागेल त्याला आसक्ति सुटणार नाही, आणि त्याचे जीवन सार्थकी लागणार नाही.PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg