Jump to content

श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१ नोव्हेंबर

विकिस्रोत कडून

१ नोव्हेंबर

गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे.


गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. वेद हे देवाच्या निःश्वासातून निघाले, तर गीता ही त्याच्या मुखातून निघाली. गीतेचा विषय कोणता ? गीतेचा विषय म्हणजे मोहाचा नाश करण्याचे तत्त्वदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या विवेचन, हा होय. गीतेची सुरुवात म्हणजे अर्जुनाला मोह झाला; याचा अर्थ असा की, त्याला कर्तेपणाच्या अभिमानाने असमाधान उत्पन्न झाले, आणि त्यामुळे काय करावे आणि काय न करावे याची शंका त्याला उत्पन्न झाली. गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाचा मोह नाश पावला. याचा अर्थ असा की, कर्ता परमात्मा आहे हे निश्चित झाल्यामुळे जीवाच्या कर्माचे सुखदुःख संपले. खरोखर, गीतेचे रहस्य सांगावे ज्ञानेश्वरमहाराजांनीच. भारतीय युद्धामध्ये परमात्मा पीतांबर नेसून, अर्जुनाच्या रथावर बसून, रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झाले. पुढे हजारो वर्षांनी, भगवंत कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाणी होय. त्यात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करावे. ' मी मागे आहे, तू पुढे चल.' हेच भगवंतांनी आपणा सर्वांना सांगितले आहे.

एखादी उपवर झालेली मुलगी जर आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली, तर तो समारंभ पाहून तिच्या मनामध्ये स्वतःच्या लग्नाचे आणि त्यातल्या सोहळ्याचे विचार येतील; त्याचप्रमाणे, आपण पोथी ऐकत असताना त्यामध्ये वर्णन केलेल्या अवस्था आपल्याला कशा येतील याचा विचार करावा. आत्मनिवेदन म्हणजे मी कोण आहे हे कळणे होय. प्रारब्धाच्या गतीने देहाला जी सुखदुःखे भोगावी लागतात, त्यांमध्ये आपण असल्यासारखे दिसावे, पण खरे मात्र नसावे. अशिलाचा खटला स्वतःचाच आहे असे समजून वकील कोर्टामध्ये भांडतो, पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी त्याचे सुखदुःख मानीत नाही, वरून मात्र अशिलाजवळ दुःख दाखवितो; अगदी असाच व्यवहार मी करतो. व्यवहार सत्य मानणार्या लोकांत वावरायचे असेल, तर बाहेरून त्यांच्यासारखे वागणे जरूर आहे. असे वागत असताना आपले भगवंताचे अनुसंधान चुकू न दिले की व्यवहार हा खेळ बनतो. कधी हार तर कधी जीत. खेळात आपण हरलो काय आणि जिंकलो काय, खर्या जीवनाच्या दृष्टीने सारखेच. तरी खेळ खेळतांना मात्र तो जिंकण्याचा चांगला प्रयत्न करावा. भगवंताचे नाम घेतले की ही युक्ती आपोआप साधते. म्हणून रात्रंदिवस माझ्या माणसांना मी सांगतो की, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.