श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१ जानेवारी
१ जानेवारी
नाम हे परमात्मस्वरूप आहे.
नाम म्हणजे भगवंताचे नांव. साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळया नांवांत फरक नाही. नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे. नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे. नामाचा आरंभ सगुणात आहे तर शेवट निर्गुणात आहे. आरंभ सगुणात आहे असे म्हणण्याचे कारण हे की भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हाच त्याला नामरूप लागले आणि सगुणरूप नाहीसे झाले तरी नाम शिल्लकच राहिले म्हणून ते निर्गुणही आहे. तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचाच आहे. नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे. नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे. लग्न झाल्यावर स्त्री जशी नवर्याशी एकरूप होऊन जाते त्याप्रमाणे वृत्तिचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे. नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्तिसुध्दा सूक्ष्म आहे म्हणून नाम घेण्याने वृत्ती सुधारेल, वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल, चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होईल. सगळयांचा भावार्थ एकच आहे.
अन्नाला स्वत:ची चव असते त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून नंतर ते खातो. पण नामाला स्वत:ची अशी चव नाही. त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून ते घेतले पाहिजे. आपण जितकी जास्त गोडी त्यात घालू तितके ते अधिक गोड वाटेल. पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत परंतु सर्वांना शेवटी बारीतून जाऊनच दर्शन घ्यावे लागते त्याप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी स्वत:ला विसरून जावे हाच नामसाधनेतला आनंदाचा मार्ग आहे.
जसे आपले आपलेपण आपल्या नांवात आहे तसे देवाचे देवपण त्याच्या नामात आहे. आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते परंतु देहबुध्दी जसजशी कमी होत जाईल तसतसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मस्वरूपच आहे असा अनुभव येतो. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे. नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबर ते बाहेर पडावे. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे.
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |