श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१८ मे

विकिस्रोत कडून

१८ मे

वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी.


माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणे खरे नाही. तो मदत करतो किंवा आड येतो, या दोन्हीत विशेष तथ्य मानू नये. माझी वृत्ती कुठे गुंतते ते पाहावे. भगवद्‌भजनात दिवस घालवावा असे वाटू लागले, पण संगत मिळाली खेळ खेळणार्‍याची. तेव्हा त्याचे मन कशाला मोडा असे म्हणून खेळ खेळू लागाला, भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून ढळू लागला, तर कसे होणार ? आईने आजवर खस्ता खाल्ल्या, लहानाचे मोठे केले, तीच आई लग्न झाल्यावर विषयाच्या आड येऊ लागली आणि म्हणून वैर्‍यासारखी वाटू लागली ! वास्तविक, दोघांच्याही देहांत फरक होण्यासारखे असे काहीच झाले नाही; पण वृत्तीत बदल झाला. विषयातच मी गुंतून राहू लागलो, याला काय करावे ?

'मी सुखी कशाने होईन' हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवले; पण या जगात पूर्ण सुख किंवा पूर्ण दुःख असे काही आहे का ? जे खरे असेल किंवा खोटे असेल याची आपल्याला खात्री नाही, त्या बाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करीत बसतो. दुसरा मनुष्य ज्या वेळी आपल्याला त्रास देतो, त्या वेळी त्यामध्ये पन्नास टक्के आपली कल्पना असते. बाकी उरले पन्नास टक्के; त्याबद्दल 'त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही' ही वृत्ती असावी, म्हणजे संपले ! आपली वृत्ती सारखी बदलते आहे, आणि जगही सारखे बदलते आहे. त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दुःख होते हे वाटणे खरे नव्हे, कारण सुखदुःख अस्थिर असते. शास्त्रांचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात. भजन, पोथ्यावाचन, मंदिर बांधणे वगैरे गोष्टी जर वृती सुधारण्यासाठी न केल्या तर ती नुसती करमणूक होते, त्यापासून खरा फायदा होत नाही. आगगाडी रोज काशीला जाते, पण तिला काही काशीयात्रा घडत नाही. यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना. गंगास्नान, विश्वेश्वराचे दर्शन वगैरे आतल्या लोकांना घडते. त्याचप्रमाणे, देहाने नुसता पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही.. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. भगवंताचे रूप सारखे समोर ठेवता येणार नाही, पण त्याचे रूप लक्षात आले नाही तरी आपण त्याचे नाम घेतो हे लक्षात राहिले तर वृत्ती सुधारेल. आपल्या डोळ्यात अगदी बारीक कण गेला तरी तो खुपतो. त्याहीपेक्षा वृत्ती सूक्ष्म असते. ती भगवंताला कळते, म्हणजे त्याच्यापाशी लबाडी चालत नाही. विषयाचा भोग आला असता जो त्यामध्येच गुंतत नाही, त्याच्यावर भगवंताची खरी कृपा झाली असे समजावे. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे, यांत खरे समाधान, शांती आणि सुख आहे.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.