श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१७ एप्रिल

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

१७ एप्रिल

संत 'तू भगवंताचा आहेस' ही जाणीव देतात.

आपण कोणतेही कृत्य करीत असताना, ज्याकरिता ते कृत्य आरंभिले ते जसे आपल्या डोळ्यासमोर असते, त्याप्रमाणे नाम घेताना, आपण नाम कशाकरिता घेतले त्याची अखंड जाणीव असावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे, याचे नाव अनुसंधान ठेवणे. वास्तविक आपण भगवंताचे आहोतच, पण मी विषयाचा आहे असे भ्रमाने वाटू लागले. संत 'तू विषयाचा नाहीस, भगवंताचा आहेस' असे सांगतात. हीच संतांची खरी कामगिरी, आणि याकरिता ते नाम घ्यायला सांगतात. नाम घेणे म्हणजे 'मी विषयाचा नाही, भगवंताचा आहे' असे मनाला सांगणे आणि मनात तशी जाणीव उत्पन्न करणे; आणि ही जाणीव टिकविण्याकरिता पुनः पुनः मनाला तेच सांगणे, म्हणजे तेच नाम सतत घेणे.

तुम्हाला रामदर्शन पाहिजे म्हणता, पण राम तुम्हाला ओळखता कसा येणार ? रामदर्शन व्हायला रामाचे अंतर काटता आले पाहिजे; रामाला पक्के ओळखता आले पाहिजे. याकरिता अंतःकरणाची पवित्रता पहिजे; शुद्ध भाव पाहिजे. सर्व काही साधने केली, पण भाव नसेल तर ती व्यर्थ होतात. कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न होईल हे खरे, पण भाव ठेवून साधने केली म्हणजे प्राप्ती लवकर होते. नवविधा भक्तीमध्ये सोपी आणि मुख्य भक्ती म्हणजे अर्पण करणे ही होय. आपण सर्वस्वी देवाचे होऊन राहावे म्हणजे आपण जे काही करतो ते सर्व अर्पणच होते.

ज्याने त्याने आपले हित ओळखून वागणे हे जरूर आहे. कल्याणाचा मार्ग कुणीही दाखवील, पण त्याप्रमाणे वागणे हे ज्याचे त्याच्याकडे आहे. बंधनाला खरे कारण परिस्थिती नसून आपल्याच मनाची ठेवण ही आहे. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखे एक भगवंताचे नाम तेवढे आहे. आहे त्या परिस्थितीत पूर्ण समाधान राहणे ही देवाची पूर्ण कृपा होय.

अग्नीचा उपयोग तो करून घेणार्‍यावर आहे; तसा देवाचा उपयोग जसा करावा तसा होतो. परमेश्वराच्या ध्यानाने सिद्धी येतात आणि सिद्धी तर त्याज्य; मग परमेश्वराचे ध्यान करूच नये की काय ? तर ध्यान हे सिद्धी मिळविण्यासाठी करू नये. परमेश्वर-प्राप्तीकरिता निष्कामबुद्धीने ध्यान करावे, म्हणजे परमेश्वर सिद्धीचे अडथळे दूर करतो. साधू सिद्धींचा उपयोग कधीही करीत नाहीत; ते परमात्मस्वरूपात मिळून गेलेले असतात. सर्व गोष्टी ते परमात्म्यावर सोपवितात आणि त्याच्या इच्छेनेच केव्हा केव्हा चमत्कार झाल्याचे साधूंच्या चरित्रात दिसते.


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg