श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१६ मार्च

विकिस्रोत कडून

१६ मार्च

प्रपंचातील आसक्‍ति कमी कशी होईल ?


आज आमची स्थिती कशी झाली आहे पाहा; प्रपंच आम्हाला सुटत नाही; भगवंताचे प्रेम आम्हाला पाहिजे; या प्रपंचावरचे प्रेम न सोडता आम्हाला भगवंताचे समाधान लाभावे अशी आमची इच्छा आहे. खरोखर, प्रपंचातले आमचे हे प्रेम व्यभिचारी आहे. प्रेम ही वस्तू अशी आहे, की ती एकाच ठिकाणी ठेवता येईल. एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे आमचे प्रेम आम्हाला दोन ठिकाणी ठेवता येणार नाही. आमचे खरे सुख एका भगवंताजवळच आहे; आणि ते मिळविण्यासाठी आम्ही प्रपंच सोडायलाच पाहिजे असे नाही. प्रपंचात आम्हाला वाटणारी आसक्ती ही मुख्यतः नाहीशी झाली पाहिजे. शास्त्रातसुद्धा हेच सांगितले आहे. शास्त्र हे अनुभवाचे बनले आहे. आमचा अनुभव आम्ही शास्त्राबरोबर पडताळून पाहात नाही. प्रपंचाची खरी किंमत आम्हाला कळल्याशिवाय त्याच्याबद्दल वाटणारी आमची आसक्ती कमी होणार नाही. आज प्रपंचात सुख नाही हे अनुभवाला येऊनही त्याची आसक्ती आम्हाला सुटत नाही. ती आसक्ती सुटायला काय मार्ग आहे तो आम्ही पाहणे अगदी जरूर आहे. प्रपंचाची आम्हाला गरज किती आहे? एखादा मनुष्य फिरायला जाताना हातात काठी घेतो. त्याला हातात काठी घेणे हे भूषण आहे असे कोणी म्हणत नाही. त्याप्रमाणे भगवंताकडे जायला प्रपंचाची आम्हाला आधारापुरतीच गरज आहे. हा प्रपंच करीत असताना त्याची आसक्ती कमी होऊन भगवंताचे प्रेम येण्यासाठी, शास्त्रांनी घालून दिलेली बंधने आम्ही पाळली पाहिजेत, आणि त्यासाठी आपले आचारविचार आणि उच्चार आम्ही सांभाळणे जरूर आहे. आपण आपल्या संस्कारांप्रमाणे वागलो तर निवृत्तिमध्येच जाऊ; कारण आपली प्रवृत्ती ही सर्व निवृत्तिपरच आहे यात संशय नाही. आता यापुढे आपण रामाच्या नावाने प्रपंचाचा धंदा करू या, म्हणजे नफातोटा त्याचाच होईल.

प्रपंचात सदाचाराने वागावे. सदाचार हा मूळ पाया आहे. नीतिधर्माचे आचरण असावे. नीतिधर्माची बंधने ही आमचे विकार आवरण्यासाठीच आहेत. विचाराने अत्यंत पवित्र असावे. कोणाचा द्वेष, मत्सर करू नये, आणि दुसऱ्याचे अहित चिंतू नये. उच्चार तर फार सांभाळले पाहिजेत. नेहमी सर्वांशी गोड बोलावे. ज्या जिभेने आपण भगवंताचे नाम घेतो, त्या जिभेने दुसऱ्याचे अंतःकरण कधीही न दुखावेल याची खबरदारी घ्या. अंतःकरण दुखवीत असताना त्याच्या ठिकाणी वास करीत असलेल्या भगवंतालाच आपण दुखवीत असतो हे ध्यानात धरा.



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.