श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ नोव्हेंबर

विकिस्रोत कडून

१४ नोव्हेंबर

प्रपंच भगवंताचा आहे असे जाणून करावा.

हे जे सर्व जग दिसते, त्याला कुणी तरी नियंता आहे असे तुम्हाला वाटते का ? एखाद्या नास्तिकाला विचारले की 'हे जग कुणी निर्माण केले ? ' तर तो काय सांगेल, तर पांचभौतिक तत्त्वांपासूनच याची उत्पत्ती झाली आहे. पण ही तत्त्वे कुणी निर्माण केली ? त्यावर तो सांगेल, 'ते मात्र काही कळत नाही'. पण जे कळत नाही त्यालासुद्धा कुणीतरी असलाच पाहिजे. म्हणून, देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही. जिथे सध्या वस्ती नाही तिथेही मंदिरे बांधलेली आपण पाहितो; आणि ती कुणी बांधली याचा तपास करू लागलो असताना बांधणारा कोण हे जरी समजले नाही तरी, ज्याअर्थी ती आहेत, त्या अर्थी त्यांना कुणीतरी बांधणारा आहेच. म्हणून काय की, जगाचा कुणी तरी कर्ता हा असलाच पाहिजे. तो कोण हे आपल्याला समजत नाही इतकेच.

आपण संसारात वागतो त्याप्रमाणे मुले खेळात खेळ थाटतात, खेळात लग्न लावतात, त्यांचा सर्व सोहळा करतात; बाहुलीचे सर्व संस्कार ती करतात. त्यांच्या खेळात बाळंतपण होते, मुले होतात, सर्व काही करतात; पण त्यांना कुणी घरात हाक मारली म्हणजे खेळ टाकून तशीच धावत जातात. त्या वेळेस मूल तिथे रडेल वगैरेची काळजी त्यांना राहात नाही. असेच आपण संसारात वागावे. जर सर्वच देवाने केले आहे तर त्याचे पालनही तोच करतो आणि संहारही करणारा तोच असतो; तर मग आपल्याला तरी त्याने दिलेल्या संसारात काही बरे-वाईट झाले म्हणून सुखदुःख मानण्याचा काय अधिकार आहे ? समजा, आपण एक घर भाड्याने घेतले आहे. त्याचे आपण बरीच वर्षे भाडे भरतो आहोत. पुढे जर आपण ते घर माझेच आहे असे म्हणू लागलो, तर तो मालक ऐकेल का ? तो काहीही उपायाने आपल्याला घरातून काढून लावील की नाही ? तसेच आपले प्रपंचात झाले आहे. जो प्रपंच आपल्याला त्याने भाड्याने दिला आहे, तो आपण आपलाच म्हणून धरून बसलो. परंतु त्याला वाटेल तेव्हा आपल्याला काढून लावता येणे शक्य असताना आपण तो आपला म्हणून कसे म्हणावे ? तर तो त्याचा आहे असे समजून वागावे आणि जेव्हा तो आपल्याला न्यायला येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी, म्हणजे संसारात सुखदुःखे बाधत नाहीत.

आपण भजनाला लागलो तर प्रपंच कसा चालेल याची काळजी करू नये. भजनाला लागल्यावर तुकाराम महाराजांसारखे झालो तर वाईट काय ? बरे, तसे न झाले तर प्रपंच चालूच आहे ! प्रपंचात नुसते रडत बसण्यापेक्षा, आनंदाने रामनामात राहू या. सर्व हवाला रामावर ठेवून थोडे दिवस तरी राहून पहा, मन खास चिंतारहित होईल, पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल.



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.