श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ जानेवारी

विकिस्रोत कडून

१४ जानेवारी

नाम घेण्याला काहीही आड येत नाही.


आपण असे पाहू की नामात प्रेम येण्याकरता एक एक सत्कर्म करीत राहणे सुलभ, की ते नामच विचाराने, सर्व संतांनी कळवळ्याने सांगितले आहे म्हणून, जरूर तर बळजबरीनेसुद्धा घेत राहणे हे सुलभ. समजा एक यंत्र आहे त्यात पुष्कळ चक्रे आहेत, आणि ते यंत्र चालू करण्याचा हेतू धरला आहे. आता एखाद्याने त्यातले एखादेच चक्र चालू करू म्हटले तर ते चालू होईलच असा भरवसा नाही. पण त्या सर्व चक्रांचा संबंध असणारी कळ आपण दाबली तर मात्र बिनतक्रार आणि अत्यंत अल्प प्रयासाने ते यंत्र सहज चालू करता येईल. त्याप्रमाणे, नाम ही कळ जर धरली तर सत्कर्मरूपी सर्व चक्रे एकदम फिरू लागून आपले काम निश्चितपणे आणि सुलभपणे होईल. म्हणून, हमखास आणि सहज रीतीने काम व्हावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने कशाही रीतीने का होईना नाम घ्यायला लागावे. नाम घ्यायचे एकदा पक्के ठरविले म्हणजे काहीही आड येत नाही. व्यवहारात आपण पाहतोच की एखादी गोष्ट समर्थनीय नसली तरी करायचा निश्चय केला की मनुष्य ती करतोच. मग नाम घेण्याचा निश्चय केला तर का नाही होणार ? काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही; तर मग ते घेण्यात विलंब किंवा चालढकल करण्यात काय अर्थ आहे ? म्हणून कोणत्याही तऱ्हेच्या शंकाकुशंका न घेता कशाही तऱ्हेने पण नाम घेत राहावे हे उत्तम; म्हणजे विनाकारण काळ फुकट घालविला अशी पश्चात्तापाची वेळ येणार नाही.


जग हे अनेक मोहक वस्तूंनी भरले आहे. त्या वस्तू आपण पाहिल्या किंवा नुसत्या ऐकल्या तरी हव्याशा वाटतात; आणि त्या मिळविण्याचा आपण प्रयत्‍न करतो. म्हणून देवाजवळ आपण अशी प्रार्थना करावी की, 'देवा मोहक वस्तू मला दाखवूच नकोस, कारण माझी इच्छा तिकडे जाईल आणि मी फसेन. देवा, माझे खरे हित आहे तेच मला दिसो, तेच मी ऐको, त्याचेच मला स्मरण होवो, आणि त्याचीच मला गोडी लागो.


प्रल्हाद द्रौपदी यांसारख्या भक्तांनी देवाजवळ काय मागितले ? तेच आपण मागावे, आणि त्यांनी निष्ठा ठेवली तशीच आपणही ठेवावी. त्यांच्या ठिकाणी जसे वैराग्य होते, तसे आपल्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्‍न करावा. प्रयत्‍न करीत असताना प्रथम चुका होतील पण त्या झाल्या तर पश्चाताप व्हावा. 'देवा, मी फार दोषी, अपराधी आहे, मला क्षमा कर आणि तुझ्या कृपेला पात्र कर. पश्चाताप खराच झाला तर राम कृपा करीलच. मुखाने नाम घ्यावे, हाताने प्रपंचाचे काम करावे, आणि अंत:करणात समाधान ठेवावे.



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.