Jump to content

श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ ऑगस्ट

विकिस्रोत कडून


१४ ऑगस्ट

शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच.


जगात प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडतो आहे. किंबहुना, आनंद नको असे म्हणणारा मनुष्य मिळणारच नाही. म्हणजे मनुष्याला आनंद हवाच असतो. मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद, समाधान, का बरे न मिळावे ? याला कारण असे की, हा शाश्वत आनंद एका भगवंतावाचून दुसर्‍या कुठेही मिळणे शक्य नसल्याकारणाने त्याचे प्रयत्‍न व्यर्थ आहेत. त्या आनंदासाठी, मला भगवंत पाहिजे असे मनापासून वाटले पाहिजे; आणि त्यासाठीच, आपण सर्वांनी नाम घेणे आवश्यक आहे. आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावे, आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील; कधी तो बरेच दिवस सरळ जाईल, तर कधी मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल; पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील. तुम्ही सर्व माणसे फार चांगली आहात, भगवंताचे नाम घेता, हे मला माहीत आहे. परंतु नामाचे प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला फार वाईट वाटते. तुमच्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करून ठरवा, की मला नामाचे प्रेम येण्याच्या आड काय येत असेल बरे ? तुमची परिस्थिती आड येते का ? इथे मंदिरात राहणार्‍या माणसांनी तरी नामाचे प्रेम यायला परिस्थिती आडवी येते असे म्हणणे बरोबर नाही. तुम्ही इथे आनंदाने राहा, मंदिरात जेवा, आणि 'राम, राम' म्हणा असे मी सांगतो. पण या लोकांनीसुद्धा नामाचे प्रेम यायला परिस्थिती आड येते असे म्हटले तर बाहेरून येणार्‍या लोकांना मी काय सांगू ?

खरोखर मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो असेच म्हणावे लागते. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. आपण भगवंताजवळ आनंद मागावा. त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरे. मात्र चिरकाल टिकणारा आनंद हा नेहमी वस्तूरहितच असतो. एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एकजण गाडीतून खाली उतरला; तो पेरू घेण्याच्या नादी किती लागेल, तर आपली गाडी न चुकण्याइतका ! हे जसे खरे, त्याप्रमाणे आनंदाच्या आड येणार्‍या वस्तूंच्या मागे लागणे बरे नाही. आनंद जोडणार्‍या गोष्टींचा आपण विचार करू या, आणि नामस्मरणात राहू या. काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये; उद्या काय होणार याची काळजी करू नये; आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.