श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ ऑक्टोबर

विकिस्रोत कडून

१४ ऑक्टोबर

परमात्म्याचे प्रियत्व आले की जनप्रियत्व येते.


परमात्म्याने आपल्याला लोककल्याणार्थ सर्व काही शक्ति द्याव्यात, असे काही माणसांना वाटते, पण अमुक एका देहामार्फत लोककल्याण व्हावे अशी इच्छा का असावी ? देहबुद्धी सुटली नाही असाच याचा अर्थ नव्हे का ? शक्ति वापरण्याचे सामर्थ्य आपल्याला आले तर परमात्मा कदाचित् ती देईलही. लहानाच्या हातात तरवार देऊन काय उपयोग ? लोकांनी आपले ऐकावे असे तुम्हाला वाटते; पण अजून क्रोध अनावर आहे, मन ताब्यात नाही, असेही म्हणता ! तर आधी आपल्या विकारांवर, मनावर छाप बसवा आणि मग लोकांबद्दल विचार करा ! तुम्हाला जनप्रियत्व पाहिजे ना ? मग जनांचा राजा परमात्मा, त्याचे प्रियत्व संपादन करा, म्हणजे जनप्रियत्व आपोआपच येईल. तुम्हाला लोक वाईट दिसतात, पण त्यांना सुधारायला जाऊ नका. तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात. स्वतःला आधी सुधारा म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही.

लहान मुली बाहुलीबरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, निजवतात. त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात. तुम्हीही अशी भावना का करीत नाही की, परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो ? ही भावना जो जो जास्त दृढ होईल, तो तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल. मनातून आपले नाते भगवंताशी ठेवावे. आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हाती आहे, तर जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात असणार.

आपण सात्त्विक कृत्ये करतो, पण त्यांचा अभिमान बाळगतो. सात्त्विक कृत्ये चांगली खरी, पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट. एक वेळ वाईट कृत्ये परवडली; केव्हा तरी त्यांचा पश्चात्ताप होऊन मुक्तता तरी होईल. पण सात्त्विक कृत्यातला अभिमान कसा निघणार ? मी आप्त‍इष्टांना मदत केली, आणि आप्त‍इष्ट म्हणू लागले, 'यात याने काय केले ? परमात्म्याने त्याला दिले म्हणून त्याने मदत केली !' हे ऐकून मला वाईट वाटते ! इथे वास्तविक पाहता परमात्मा त्यांना आठवला, आणि मी मात्र 'मी दिले' असा अभिमान धरून वाईट वाटून घेतो ! परमात्म्याने त्यांना माझ्या हाताने दिले, हीच सत्य स्थिती असताना मला वाईट वाटण्याचे काय कारण ? म्हणून, परमात्म्याच्या इच्छेने सर्व काही घडते आहे ही भावना ठेवावी. आपण परमात्म्याजवळ मागावे की, "तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस, माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे."



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.