श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१२ डिसेंबर

विकिस्रोत कडून

१२ डिसेंबर

योगाने जे साधते ते नामाने साधते.


गृहस्थाश्रमी माणसाने असा नियम ठेवावा की, जो कोणी काही मागायला येईल त्याला 'नाही' म्हणू नये; आपल्याजवळ जे असेल त्यामधले थोडे तरी त्याला द्यावे. अन्न द्यायला कधीही मागेपुढे पाहू नये. पैसे देताना मात्र आपली परिस्थिती पाहून, आणि त्याचा हेतु पाहून, तो मागेल त्याच्यापेक्षा जरा कमीच द्यावे; पण 'नाही' म्हणणे चांगले नाही. भिकार्‍याला कधीही वेडेवाकडे बोलू नये. आपली नोकरी हीही एक प्रकारची भीकच आहे ! भिक्षा मागणे हे वैराग्याला कमीपणाचे नाही, पण भिक्षा ही स्वार्थासाठी नसावी. आपले पोट भरल्यावर राहिलेल्या अन्नाचा प्रत्येक कण दुसर्‍याला द्यावा. वैराग्याचे तेज कधी लपून राहात नाही. अत्तरे लावून तेज आणणे निराळे, आणि वैराग्याचे तेज निराळे. वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे.

जगाचा स्वभाव कळणे ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. जे खोटे आहे ते खरे मानणे, हे अज्ञान, अविद्या होय. खरोखर, मनुष्याची पारमार्थिक योग्यता काय आहे हे साध्या माणसाला कळणे शक्य नसते. साधूंनाच अंतरंग समजते. म्हणून, तशी दृष्टी आल्याशिवाय आपण कुणालाही नावे ठेवू नयेत. अंतकाळी मनुष्य मनाच्या कशा अवस्थेत जातो, यावरून पारमार्थिक अवस्थेची कल्पना येऊ शकते. साधा मनुष्यसुद्धा नामाच्या योगाने मोठ्या योग्यतेला चढतो. अर्थात् ते कळायला आपण स्वतः नामामध्ये मुरले पाहिजे. नामामध्ये फार सामर्थ्य आहे; कुणी त्याचा अनुभव घेऊन पाहात नाही, त्याला काय करावे ? योगाने जे साधते ते नामाने साधते यात संशय नाही. ज्याला नामाची चटक लागली, त्याच्यावर रामाने कृपा केली असे निश्चित समजावे. परंतु नामाची चटक लागण्यासाठी सतत नाम घेणे हाच उपाय आहे. तसे पाहिले तर प्रपंची माणसे अत्यंत स्वार्थी असल्याचे दिसून येते. त्यांचा स्वार्थ यत्किंचित् न बिघडता त्यांना परमार्थ पाहिजे असतो. हे कसे शक्य आहे ? अत्यंत निःस्वार्थी बनणे याचेच नाव परमार्थ. तो साधण्यासाठी थोडातरी स्वार्थ सोडायला आपण तयार व्हावे. साधुसंतांच्याकडे जाऊन हेच शिकायचे असते. प्रपंचावर सर्वस्वी पाणी सोडा असे कुणीच सांगत नाही, आणि असे सांगितले तरी कुणी ऐकत नाही. पण निदान प्रपंच, म्हणजे आपला स्वार्थीपणा, हेच आपले सर्वस्व मानू नका असे संत सांगतात, ते काही गैर नाही. स्वार्थ कमी व्हायला वासना कमी झाली पाहिजे; वासना कमी होण्यासाठी भगवंताची कास धरली पाहिजे; भगवंताची कास धरण्यासाठी त्याचे अनुसंधान ठेवले पाहिजे; आणि त्याचे अनुसंधान टिकविण्यासाठी त्याचे नाम घेतले पाहिजे. म्हणून तुम्ही नाम घेत जावे.



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.