Jump to content

श्रीग्रामायन/भूमिपुत्र

विकिस्रोत कडून

भूमिपुत्र


दिवस ग्रीष्माचे. कडक उन्हाची वेळ. सूर्याने तर जणू मार्शल लॉ पुकारला होता. सगळीकडे शुकशुकाट. रस्ते निर्मनुष्य. कडेकडेला, बांधावर खडे असलेले हिरवे पहारे. आकाश भीतीने पांढरेफटक पडल्यासारख. वातावरण थबकलेले. निश्चल. करडे-पिवळे रसायन उकळत होते. दूरदूर मृगजळे तरळत होती, चमकती होतो.

शेते नांगरून पडलेली. अजगरासारखी सुस्त, लांबच लांब.

अजगरांच्या विळख्यात पुसटशा दिसणाऱ्या दोन-तीन झोपड्या. कुंपणाआड दडलेल्या गावापासून दूर, एका विराण भूमीवर.

झळा अंगावर घेत, झोकांडत, कलंडत, उघड्यासताड शेतातून तिकडे सरपटत चाललेली एक जीप.

जीपमध्ये दोन संपादक. एक पुण्याचा, एक दिल्लीनजिकच्या बिजनौरचा. गावचा एक विद्यार्थी वाट दाखविणारा. कुतुहल म्हणून सामील झालेले आणखी एक-दोन गावकरी.

गेली काही वर्षे एक होमकुंड येथे धगधगत होते. नुकतेच ते अचानक विझले. विझवले गेले. एका भीषण पद्धतीने.

झोपड्या जटायुसारख्या निश्चेष्ट पडल्या होत्या. रक्ताने अभिषिक्त झालेल्या. आसपास चिटपाखरेदेखील फिरकत नव्हती.

आश्रम भकास होता. सुना होते. मंदिराचे स्मशान झाले होते. अंगार भस्म होऊन मातात मिसळला होता.

एका परिव्राजकाची ही जिवंत समाधी होती.

एका शांतिसैनिकाचे हे कुरुक्षेत्र होते.

ग्रा....१० एक संपादक येथे गोळ्या घालून निघृणपणे मारला गेला होता. एखादे जनावर कोंडून टिपावे तसा. असहाय्य, नि:शस्त्र, एकाकी; पाहुणा म्हणून काही दिवसांसाठी आलेल्या एका वृद्ध सहकाऱ्यासह.

दिवसा आसपासच्या गावातून काम करावे. गावकऱ्यात मिसळावे, त्यांच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करावा, माहिती जमवावी. अन्यायाविरुद्ध टकरा घ्याव्यात. लहानमोठ्या सरकारी अधिकाऱ्यांना सतत धारेवर धरावे. लाचखाऊ जाळ्यात पकडावेत. पोलीस अत्याचारांविरुद्ध रान उठवावे. बड्यांना फटकारावे. छोट्यांना, अन्यायपीडितांना धीर देऊन शक्ती एकवटून त्यांच्यासाठी झुंजावे.

दिवसा सायकलवरुन किंवा पायी ही सारी वणवण करावी. रात्री माळावरच्या झोपडीत, एकांतात, अंधारात अदृश्य व्हावे. जवळची मनुष्यवस्ती म्हटली तरी दोन फर्लागापुढची. हाकेच्या अंतरावर कुणीही नाही.

असा हा एक निःसंग. निःस्पृह. कुणाचा मिंधा नाही, कुणाचा बंदा नाही. एकटा मोकळा, निर्भय, स्वतंत्र.

 बहु जनी असो नये । बहु आरण्य सेवू नये ।
 बहु देह पाळू नये । आत्महत्या खोटी ।। ।

मूळ हा पंजाबचा. मोगा-फिरोजपूर भागातला. घरदार सोडून तरुणपणीच बाहेर, पडलेला. गंगाकिनारी याने संन्यासदीक्षा घेतली आणि याचे भारत भ्रमण सुरू झाले. हा महाराष्ट्रात, पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेत होता. गाडगिळांची यावर मर्जी होती. हा आंध्रात विनोबांबरोबर पदयात्रिक म्हणून हिडला. हा ओरिसात, कोरापुट जिल्ह्यात ग्रामदान-नवनिर्माण कार्यासाठी राहिला. केरळवर तर याने पुस्तकच लिहिले आहे- Sarvodaya in a Communist state. नंबुद्रीपादांचे पहिले सरकार असताना हा वर्षभर तेथे अभ्यासासाठी वास्तव्य करून होता. पूर्ववयात पंजाबमध्ये किसानसभेचा एक जहाल कार्यकर्ता म्हणून हा वावरला. काही काळ कम्यनिस्ट पक्षाचा क्रियाशील सदस्यही होता म्हणतात. कुठेच थांबला नाही, टिकला नाही, रुजला नाही. अस्वस्थ, अशांत. क्रांतीची रणक्षेत्रे सतत शोधीत होता. बिजनौरजवळच्या आश्रमात जेव्हा तो स्थिरावला तेव्हा ' विनोबा' हे त्याचे दैवत होते. येथूनच तो सर्वोदय आणि राजकारण यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करीत होता. सर्वोदयी क्रांतीची एक आघाडी झुंजवीत होता.

यासाठी प्रत्यक्ष कार्याच्या जोडीला त्याने एक पाक्षिक सुरू केले
PERSONALITY
An English-cum-Hindi Rural Fortnightly.
News, Views and Research Journal

दिवसा जनसेवक. रात्री संपादक-मुद्रक-प्रकाशक-लेखक-विचारवंत-अभ्यासकसंशोधक-सब कुछ !

कुठून तरी एक सायक्लोस्टाइल मशीन याने पैदा केले. यावर आपला सर्व अंक लिहून, छापून तो दर पंधरा दिवसांनी हा प्रकाशित करीत असे.

बिजनौरला जिल्ह्याच्या ठिकाणी, निदान वस्ती असलेल्या जवळपासच्या एखाद्या खेड्यात पाक्षिकाचे कार्यालय ठेवा असे अनेकांनी सुचविले. पटले नाही. लेखणी आणि नांगर एकत्र जिथे मला नांदवता येतील तिथेच मी रहाणार, काम करणार, मग भले अंकाची शोभा थोडी कमी होवो, व्यवस्था सांभाळणे जिकिरीचे, त्रासाचे ठरो, हा याचा हट्ट.

पहिल्या अंकात संपादकाने आपले मनोगत व्यक्त केले आहे.

'येथे मी ‘व्यक्तित्व विकास केंद्र' सुरू करीत आहे. आपली माहिती थोडक्यात कळवा. निवड झाल्यावर आपण येथे कायम वास्तव्यासाठी येऊ शकता.

प्रत्यक्ष या जीवन विकासाच्या प्रयोगात आपण सहभागी होऊ शकत नसल्यास विविध प्रकारे आपण या प्रयोगाला हातभार लावू शकता.

आपल्या संग्रहातील निवडक चांगली पुस्तके पाठवा. येथे ग्रंथालयाची आवश्यकता आहे.

वीज लवकरच पोचेल. आपण सधन असाल, व्यवसाय-व्यापार यात आपली चांगली भरभराट असेल तर छापखान्यासाठी यंत्रसामग्री हवी आहे. यासाठी कर्जरूपाने काही रक्कम पाठवा. मुदत संपताच रक्कम सव्याज परत करण्याची मी हमी घेतो.

भ्रष्टाचार, लाचलुचपत, याविरूद्ध लोकमत जागृत करून चळवळ उभारणे हे या केंद्राचे एक वेगळेपण आहे. आपण सरकारी नोकरीत असाल तर यासंबंधी महत्त्वाची माहिती आम्हाला पुरवा. आपले नावगाव गुप्त ठेवण्याची सर्व खबरदारी आम्ही घेऊ. आपल्याला यामुळे कोणताही उपसर्ग पोचू देणार नाही. आपण स्वतःच बरबटलेले असाल, भ्रष्ट नोकरशाही, गोरगरिबांवर अन्याय करणारे बडे जमीनदार-सावकार, काळाबाजारवाले व्यापारी, कारखानदार यापैकी कुणाशी आपले लागेबांधे असतील तर आपल्याकडून माझी कसलीही अपेक्षा नाही. आपण लवकरच आपले मार्ग बदला एवढेच मी सुचवू इच्छितो. नाहीतर लोक आता आपल्याला गोळ्या घालून ठार मारल्याशिवाय राहाणार नाहीत. येथे गंगाकिनारी पापक्षालन करावे यासाठी मी काही आलेलो नाही. गंगेत डुबकी घेऊन बुडवावे--धुवून काढावे असे कोणतेही पाप मला आजवर शिवलेले नाही गेली वीस-पंचवीस वर्षे आपल्या समाजाचा तळ गाठण्यासाठी, तेथून क्रांतीचा उठाव करण्यासाठी मी जिवाची कुरवंडी चालवलेली आहे. ग्रामीणतेशी माझे नाते जडलेले आहे. आम्ही विनोबांची माणसं आहोत. ग्रामीण जनतेच्या, सर्वात खालच्या पातळीवर जीवन जगणाच्या मानवतेच्या सुखदुःखाशी समरस होणे, ही पातळी उंचावण्यासाठी जगणे आणि झगडणे हा आमचा धर्म आहे. या रहाणीत अनंत अडचणी आहेत. सुखसोयी नाहीत. पदोपदी सरकारी यंत्रणा व तिचे गावातील भ्रष्ट दलाल छळतात, आडवे येत रहातात. तरीही आम्ही हा खंदक सोडून पळून जात नाही. भारतीय जनक्रांतीची लढाई या खंदकातून लढली जाणार आहे. आम्ही कदाचित ही लढाई पहायला, खेळायला असू किंवा नसू. पण पूर्वतयारीचे, अग्रदूतत्वाचे आमचे भाग्य तरी कुणी हिरावून घेवू शकणार नाही. आमचा अभ्यास, आमचे संशोधन, आमची सेवा ही सारी एका महान क्रांतीची पूर्वतयारी आहे असा आमचा विश्वास आहे.

कोण म्हणतो क्रांती बंदुकीच्या नळीतून जन्म घेते ? विचार ही खरी शक्ती आहे. शहरी सुखासीनतेत लोळत, पडल्यापडल्या, खुर्चीत बसून केलेल्या चितनमननातून किंवा चर्चा परिसंवादातून ही शक्ती जागृत होऊ शकते, यावर मात्र माझा मुळीच विश्वास नाही. यासाठी जनतेबरोबर राहिले पाहिजे. तिच्या सुखदुःखाशी, हालअपेष्टांशी समरसून कार्य केले पाहिजे. यासाठी तर आम्ही येथे आहोत. येथूनच खऱ्या, उदयोन्मुख भारताचे हृदय आम्ही जाणून घेत राहू, आपल्याला याहृदयाचे ठोके ऐकविण्याचा निकराचा प्रयत्न करीत राहू.

आपण कुठे उभे आहात ? आपल्या अंगावरचा भारी कोट विकून आपण नवे विचार, ताजे विचार जाणून घ्यायला उत्सुक आहात काय ? मग हे पाक्षिक आपले आहे. पण अपण डोके गहाण ठेवून, नवे नवे किमती कोट अंगावर चढविण्याच्या तुच्छ स्पर्धेत मश्गुल रहाणारे असाल तर हे बरे, की आपण आताच एकमेकांचा निरोप घेऊ. तुमचा प्रवास वेगळा आहे. आम्ही वेगळ्या मार्गावरचे प्रवासी आहोत. हो, उगाच भीडभाड, गोलमाल सभ्य भाषा आपल्या स्वभावात नाही. आपण स्वच्छ सांगून टाकणार- 'राजा ! तू भिकारी आहेस.' त्या गोष्टीतल्या लहान मुलासारखे आपल्याला एकदम ओरडावेसे वाटणार, Oh! the King is naked.

It might offend those who, sitting at the towns as worshippers of Mammon, meticulously ape the Western ways and misgovern the affairs of the simple folk who sweat and toil in the fields along with me, But I will play best my role as a writer whose honest duty is to expose and expose; dare, dare and still more dare as Dantan has said.'

गोविंदपूर. बिजनौरपासून सहा सात मैलावरचे एक वसती नसलेले गाव. उत्तर प्रदेशात अशी बरीच गावे आहेत. फक्त कागदोपत्री नोंद असलेली. ग्रामपंचायत खारी. केंद्र सुरू झाले. पण क्रांतीसैनिक आणि संस्थाचालक ही जोड प्रथमपासूनच नीट जमेना. लढा संघटित करण्याची भूमिका पत्करावी तर विधायक उभारणीच्या कार्याला खीळ बसू लागली. दहा बारा एकर जमीन एकाने दान दिलेली होती. ही पिकवावी, फुलवावी, आश्रम वाढवावा, टागोरांच्या शांतिनिकेतनसारखे काही भव्य रूप याला प्राप्त करून द्यावे ही सुरुवातीची कल्पना. पण हे साधायचे तर प्रस्थापिताशी उभा दावा धरण्याच्या भूमिकेला अनेक ठिकाणी मुरड घालणे आवश्यक होऊन बसते. अनेक तडजोडी पत्कराव्या लागतात, अन्याय गिळावे लागतात, संघर्षाची धार बोथट होऊ द्यावी लागते. एखादा गांधीच ही दुहेरी किमया साध शकतो. विधायक कार्याचा पसारा सुटसुटीत, लोकाधारित व आटोपशीर ठेवून एकीकडे गांधी संस्था उभारीत होते. चळवळींचा जोर वाढताच संस्था मोडल्या, सरकारी वरवंटा त्यांच्यावरून फिरला तरी गांधींना त्याची फारशी पर्वा वाटत नव्हती. गोविंदपूरला मात्र संघर्षाची धार जसजशी तिखट होत गेली तसतसे केंद्र उभारणीचे कार्य मागे पडत गेले. विहीर झाली तर पंप बसेना ; पंप बसला तर वीज मिळेना. पावलापावलाला अडचणी, अडथळे, विरोध, तंटे आणि तक्रारी. एक पैची लाच देणार नाही ही संपादकाची प्रतिज्ञा. आश्रमाची साधी साधी कामे सरकारी फितीत यामुळे अडखळू लागली. हा हटत नसे. कागद पुढे सरकत नसे. शांतिनिकेतन असे करून कसे उभे राहणार ? महर्षी कर्वे यांनी ही काटेरी वाट टाळली म्हणून तर विद्यापीठ उभे राहू शकले; पण याने ठरवले असावे, काटे तुडवायचे. रक्तबंबाळ व्हायचे. संस्थांचे मजले चढविण्याऐवजी कुरुक्षेत्रावरचा एखादा मोर्चा लढवायचा. हाच आपला स्वधर्म. केंद्र वाढले तर वाढले. नाहीतर गंगार्पण.

अर्थातच केंद्र वाढले नाही. जेमतेम एक विहीर तयार झाली. शिसम आणि आंब्याची थोडी झाडे, डिडोनियाचे कुंपण, बोगनवेली, गुलमोहोर, रातराणीचा सुगंध, उसाचा किरकोळ तुकडा, थोडेफार धान्य यावर समाधान मानून घ्यावे लागले. तीन झोपड्या ही स्थावर मिळकत. एका झोपडीत टेबलखुर्ची, पुस्तकाचे कपाट, कागदपत्रांचे शेल्फ, ते सायक्लोस्टाइल यंत्र. हीच संपादकीय कचेरी, रहाण्याजेवण्याची, झोपण्याची जागा. दुसरी झोपडी आल्यागेलेल्यांसाठी असावी आणि तिसरीचा वापर अवजारघर-कोठारघर म्हणून. पाच दहा वर्षाच्या परिश्रमानंतर आश्रम उभा राहिला तो एवढाच. पाक्षिक कधी मोठ्या छपाई यंत्रावर चढेलच नाही. संपादक अधूनमधून दिलगिरी व्यक्त करतोच आहे- पावसाळी हवेमुळे शाई वाळली नाही. सबब छपाई थोडी बिघडली आहे. अंकालाही उशीर. क्षमस्व. व्यक्तित्व विकासासाठी केंद्राकडे कुणी फारसे फिरकले नाही. हा एकटाच ताडामाडासारखा तेथे वाढत राहिला. दूरवरून दिसायचा. नजरेत भरायचा. लोक स्तिमित व्हायचे. श्रद्धा, आदर बाळगून असायचे. पण जवळ जाऊन सावलीला उभे रहावेसे कुणाला कधी वाटले नसावे.

आश्रम वाढला नाही; पण दबदबा, दरारा वाढतच गेला. गोविंदपूरच्या आसपासच्या ५-६ गावातील बारीकसारीक घटनांवर शिकारी कुत्र्यासारखा जागता पहारा ठेवण्याची संपादकाची धडपड मात्र यशस्वी होत राहिली. सर्वसामान्य खेडुतावर नोकरशाही अंमल कसा गाजविते, गावातील बडे शेठ-सावकार, जमीनदार नोकरशाहीचा वापर आपल्या स्वार्थसाधनासाठी कसा करून घेतात, लाचलुचपत कुठे चालू आहे, पोलिसी ससेमिऱ्यात कोण विनाकारण गुंतवला जातो आहे, शेतकरी नवे शेतकीतंत्र कसे आत्मसात करतो आहे, या तंत्राचे दुष्परिणाम कोणते, कोर्टात कुठली प्रकरणे का व कशी तुंबून आहेत, गावातील जातीय तेढ वाढण्याची कारणे, हरिजनांना मिळणारी वागणूक, पूर्वीपासून चालू असलेल्या शेजारच्या साखरकारखान्यातील काळेबेरे, धार्मिक उत्सव-गावाला स्पर्श करणारे बहुतेक विषय टिपण्याची संपादकाची पहिल्या अंकापासून धडपड सुरू आहे. यातून नवी प्रकरणे सारखी उद्भवत आहेत, शत्रू वाढत आहे. मित्र म्हणवणारे हळूहळू दूर सरकत आहेत. सौम्य व्हा, जपून लिहा असे प्रेमाचे, आपुलकीचे सल्ले चहात्यांकडूनवाचकांकडून वरचेवर दिले जात आहेत. तरी लेखणी लाठीसारखी चालविण्याचा हट्ट, खुमखुमी, जिद्द कमी न होता वाढतेच आहे. कुठे कुठे ती फिरेल याचा नेम नव्हता.

□ २८-८-१९६८: एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर-ट्युबवेल्स व यांच्या हाताखालील इतर अधिकारी यांची रामपूर व मौजीपूर या गावांना भेट. रामपूरचा नलिका कूप हे अधिकारी आले तेव्हाच सुरू होऊ शकला. तोवर शेतातील भात व उस पाण्याअभावी जळून गेलेला होता. तक्रार अर्जाचे ढीग टेबलावर पडून होते. अधिकाऱ्यांनी एकाही अर्जाकडे लक्ष दिले नाही. शेतकऱ्यांना कुणी भेटलेदेखील नाही. मग हे। महाशय येथे कशासाठी आले असावेत ? भत्ता उकळण्यासाठी.

□ १-९-१९६८ : एका हरिजन स्त्रीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून खारी गावातील मुस्लिम समाजातील एका व्यक्तीवर खटला भरण्यात आल। होता. पुराव्या अभावी आरोपीची निर्दोष म्हणून सुटका झाली. अत्याचाराची घटना घडल्यानंतर खारी गावातील हरिजन तक्रार गुदरण्यास शेजारच्या हल्दौर पोलीस ठाण्यावर गेले. ठाणेदाराने दुर्लक्ष केले. हरिजनांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन गावातील बहुसंख्य मुस्लिम समाजाकडून होणाऱ्या उपद्रवांची त्यांना जाणीव दिली. वरून हुकूम आल्यावरच हल्दौर ठाणे जागे झाले व तक्रार रीतसर नोंदवली गेली.

आरोपीने खटला चालविण्यासाठी चांगले वकील दिले. हरिजनांजवळ पैशाची कमतरता होती. तरी उदेकुमार नावाच्या वकिलाला त्यांनी शंभर रुपये जमवून दिले. पण या वकिलाने काहीच काम केले नाही. म्हणून चेतन स्वरूप नावाचा दुसरा वकील हरिजनांनी गाठला. त्याला दोनशे रुपये दक्षिणा म्हणून दिली. पण याही वकिलाने शेवटपर्यंत तोंड उघडले नाही. निकाल लागल्यावर या दोनशे रुपयांपैकी पन्नास रुपये हरिजनांना परत करण्याचे सौजन्य या चेतन स्वरुप महाशयांनी का दाखवावे हे मात्र एक गूढ आहे.

□ ३-९-१९६८ : जिल्हा कोर्टात, खारी गावातील गोहत्येसंबंधीचा खटला आज पुढे आला. कामकाज न होता पुढची तारीख पडली.

२४ एप्रिल १९६८- या दिवशी रात्री खारीतील हिंदूंना गावात मजीद या मुसलमानाच्या घरात गाय कापली जात असल्याचा संशय जाला. सात मैलावर असलेल्या हल्दौर पोलीस ठाण्याकडे हिंदू धावले. पोलीस चौकशीसाठी दाखल झाले तेव्हा मध्यरात्र उलटली होती. मजीद व त्याचा एक साथीदार पुराव्यानिशी सापडले. काही क्विटल गोमांस गाडीत भरून पोलीस ठाण्यावर नेले गेले असे कळते.

□३ सप्टेंबर १९६८ : करौंडीच्या पूरणसिंगांनी नलिका कूप खात्यातील एका कर्मचाऱ्याविरुद्ध नुकसानभरपाईसाठी गुदरलेल्या फिर्यादीची आज सुनावणी झाली या खात्यातील बरेच अधिकारी-कर्मचारी आज कोर्टात गोळा झालेले होते. आपल्या उसाला नियमाप्रमाणे पाणी देण्यास सदर कर्मचाऱ्याने नकार दिल्यामुळे आपले नुकसान झाले असा पूरणसिंगाचा दावा आहे. माझी साक्ष निघाली. तीन तास साक्षीचे काम चालू होते.

या प्रकरणाची फाईल नलिका कूप खात्याने दडवून ठेवली, कोटसमोर ये ऊच दिली नाही असे कळते.

अशा स्थानिक, किरकोळ नोंदी करता करता संपादकांची लेखणी मध्येच एकदम हरिद्वार-हृषीकेशला फेरफटका मारून येई. आपला पदव्युत्तर अभ्यासक्रम अर्धवट सोडून लाहोरहून संपादक सत्तावीस वर्षांपूर्वी येथे संन्यास घेण्यासाठी आलेला होता. आपण सहा महिने राहिलो तो स्वर्गाश्रम त्यावेळी कसा शांत--निवांत होता! आता काळ्या पैशातून येथे कशा टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत! गंगाकाठाचे रम्य तपोवन जाऊन नदीकाठची उतारवयस्कांची ही वसतीस्थाने होऊ लागली आहेत-संपादक या स्थित्यंतरामुळे फार व्यथित आहे.

सध्या महेश योगी यांची चलती आहे.

संपादक डिव्हाईन लाईफ सोसायटीच्याआवारात प्रवेश करतो. गांधी जन्म शताब्दीदोन ऑक्टोबरचा तो दिवस. हरिजन कुटुंबांच्या सत्काराचा खास कार्यक्रम आयोजित केलेला असतो. सत्कार म्हणजे केवळ मिठाईचे वाटप! हारतुरे नाहीत. पंचारती, धूपदीप, घंटानाद सगळे नाटक उभे केले गेले होते. कॅमेरे सज्ज होते. वेगवेगळ्या कोनातून टिपलेली दृश्य आता मासिकाद्वारे जगभर पोचवली जाणार होती. भारतात हरिजनांना केवढी सन्मानाची वागणूक दिली जाते याचा हा केवढा चोख, रंगीत--संगीत पुरावा ! गांधीजींचा भारत ! आध्यात्मिक भारत ! तुफान प्रसिद्धी. साधकांच्या नव्या झुंडी. संपादक लेखणी खुपसतो : ' ही जाहीरातबाजी कशासाठी ? आश्रमात यांना कायमचे काम द्या. विशेषतः स्वयंपाक घरातले. एक तरी साजुक-सोवळा साधक येथे टिकून रहातो का ते पहा; It was vanity writ large on the walls of the Divine Life Society. दिव्य जीवन संस्था -एक प्रचंड पोकळ ढोंग.'

बिजनौर जिल्ह्याचा इतिहास अंकामागून अंकात सादर होत होता. कुठून कुठून संपादकाने माहिती जमा केलेली होती. जनगणनेचे अहवाल, डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स, ऐतिहासिक दफ्तरे, पुराणकथा, दंतकथा सगळ्यांचा आधार घेतला गेला होता. महाभारत काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंत इतिहासाचा धागा आणून पोचवला होता. ऋषीमुनींच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही भूमी. शिष्टाई असफल झाल्यावर दुर्योधनाचे प्रासादीय आगतस्वागत नाकारून कृष्ण भगवान तडक विदुराघरी आले. कण्या खाऊन त्यांनी ती रात्र मित्रासमवेत संभाषणसुखात घालवली-ती विदुरकुटी येथून जवळच पाच-सहा मैलावर यात्रेचे ठिकाण म्हणून आजही प्रसिद्ध आहे. कण्वाने शकुंतलेचे लालन-पालन या परिसरातच केले. शुकमुनींची तपोभूमी हीचयासाठी तर हा संन्यस्त संपादक उभ्या भारताची परिक्रमा करून शेवटी येथे स्थिरावला नसेल ? ऋषी आणि कृषी-आज तुटलेला हा संबंध त्याला पुन्हा जोडायचा होता. ही जोड जेव्हा जेव्हा जमली तेव्हा भारत वैभवात नांदला असा त्याचा अभ्यासांती निश्चित झालेला विचार होता. या विचारालाच कृतीचे रूप देण्याचा गोविंदपूरचा आश्रम हा एक प्रयत्न होता. पाश्चात्यांकडून आपण उचललेल्या व्यापारी संस्कृतीच्या सर्व आविष्कारांचा त्याला उबग होता–तिटकारा वाटत होता. मग ती संसदीय लोकशाही असो की शहरातून फोफावणारी औद्यो गिक समृद्धी असो. साम्यवादी संस्कृती त्याला यापेक्षा अधिक जवळची वाटत असावी. सभोवतालच्या भ्रष्टाचाराला, अंदाधुंदीला कंटाळून, वैतागून कधीकधी तो हुकुमशाहीची स्वप्नेही रंगवीत असे. ही हुकुमशाही अर्थातच उजवी नसे. कारण हिटलर, त्याचा वंशवाद, नाझींचे अत्याचार याविषयी त्याने फार तुच्छतेने लिहिलेले आहे. पण आपल्याकडील राजकीय पंडितांची, पक्षनेत्यांची ठोकळेबाज डावीउजवी वर्गीकरणेही त्याला मान्य होत नव्हती. जातींचे प्राबल्य, जमातवादी राजकारण यामुळे या सरधोपट वर्गीकरणाला अनेक छेद जातात, ध्रुवीकरण स्पष्ट होत नाही, डावे-उजवे यांची सतत सरमिसळ होत रहाते असा काहीसा याचा विचार असावा. उत्तर प्रदेशातील आयाराम-गयारामांचा गोंधळ पाहून एकदा याने चिडून लिहिले होते की, सर्व राजकीय पक्षांच्या कचेन्यांना कुलपे ठोका. उत्तर प्रदेशातील सर्व सामाजिक-सांस्कृतिक संघटनांच्या कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन सत्ता राबवा. या संघटनांच्या यादीतून त्याने रा. स्व. संघालाही वगळलेले नव्हते.

भा. क्रां. द. बाबत याचा असाच वेगळा दृष्टिकोन. उत्तर प्रदेशातील काँग्रेस समाजवादाचे नाव घेत असली तरी प्रत्यक्षात खेड्यातील जुनाट जमीनदार वर्गाची व शहरातील व्यापारी कारखानदारांची तिच्यावर पूर्ण पकड आहे. जमातवादी मुस्लिम संघटना आपले फुटीरतेचे, संकुचित राजकारण काँग्रेसच्या आधारानेच खेळत रहातात. याउलट चरणसिंगांच्या रूपाने हरितक्रांतीतून जन्मास आलेले नवे शेतकरी नेतृत्व पुढे येत आहे. तुलनेने ते पुरोगामी आहे. उत्तर प्रदेशातील काँग्रेसी सत्तेची मक्तेदारी मोडायची, तर या उदयोन्मुख शक्तीला पाठिंबा दिला पाहिजे - अशी याची भूमिका होती व यासाठीच पहिल्या मध्यावधी निवडणुकात याने भा. क्रां. द. कडे आपल्या अंकातून थोडे अधिक सहानुभूतीने पाहिले होते. उत्तर प्रदेशचे पश्चिमेकडील काही जिल्हे हे भा. क्रां. द. चे किल्ले. जाठांची बहुसंख्या असलेला हा भाग. सत्तावनच्या उठावणीतील पहिली गोळी या विभागातील मिरत शहरात मंगल पांडे याने उडविली. या इतिहासाचा संदर्भ देऊन संपादक एका अंकात भाकित करतो : चरणसिंगही याच विभागातून पुढे येत आहेत. गेल्या शंभरदीडशे वर्षात शेतीचे शोषण करणाऱ्या वर्गाच्या हातात सतत सत्ता राहिली आहे. पूर्वी सत्ताधारी परकीय होते. स्वातंत्र्यानंतर ते स्वकीय झाले एवढाच फरक. या सत्ताधाऱ्यांना उचलून फेकून दिल्याशिवाय शेतीचे, ग्रामीण जनतेचे, भारताचे पुनरुत्थान होणार नाही. केव्हातरी कसणारा, श्रम करणारा किसान विरुद्ध त्याच्या श्रमावर जगणारे इतर सर्व असा सामना येथे खडा रहाणार आहे. जागृत होणाऱ्या किसानशक्तीचे चरणसिंग हे एक प्रतीक आहे. मंगल पांडे जसा स्वातंत्र्य युद्धातला पहिला मानकरी ठरला तसा, कोण जाणे, उद्या अटळपणे होणाऱ्या किसानक्रांती युद्धातला एक आघाडीचा मानकरी ठरण्याचा योग चरणसिंगांच्या बाबतीत घडूनही येईल! हा आशावाद पुढे चुकीचा ठरला हे वेगळे. पण भा. क्रां. द. कडे सुरुवातीच्या काळात या दृष्टिकोनातून पहाणारे इकडच्या भागात अनेकजण होते, हेही खरे. 'बिजनौर टाईम्स'चे संपादक श्री. बाबुसिंह चौहान हे अशा अनेकांपैकी मला भेटलेले एक जाणकार. आर्चाय नरेंद्र देव, लोहिया यांच्या तालमीत तयार झालेले हे समाजवादी पक्षाचे एक जुने कार्यकर्ते. काही काळ कम्युनिस्ट पक्षातही हे होते. गेली काही वर्षे मात्र केवळ पत्रकारिता. उत्तर प्रदेश, काँग्रेस राजवटीच्या कोंडीतून सुटण्याचा एक मार्ग म्हणून भाक्रांदकडे यांनी प्रथम प्रथम मोठ्या आशेने पाहिले. पहिल्या मध्यावधी निवडणुकीत भाक्रांद उमेदवारांचा जोरदार प्रचारही केला. अपेक्षित कोंडी फुटली असे यांचे मत. गुप्ता-त्रिपाठी टोळीपेक्षा चरणसिंग यांना परवडले होते. चालू लोकसभा निवडणुकीत मात्र उजव्या कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणानुसार यांनी इंदिरा काँग्रेसचा पाठपुरावा केला. गंमत अशी की, यांचे जोडीदार श्री. कश्यप स्वतंत्र पक्षाचे हितचिंतक. ' बिजनौर टाईम्स ' हे दैनिक दोघे मिळून मोठ्या हिरीरीने, गुण्यागोविंदाने चालवीत असतात. मी म्हटलेसुद्धा विनोदाने, अजब आहे तुमची ही युती. स्वतंत्र आणि कम्युनिस्ट वृत्तपत्रक्षेत्रात सहकारी म्हणून वावरताना मला प्रथमच येथे आढळले. हा काय या मातीचाच गुण समजायचा की काय ? खैर, जिस देश मे गंगा बहती है......

'जमीनदारी असताना जमीनदाराव्यतिरिक्त पूर्वी गरीब शेतक-याला पटवारी आणि पोलीस लोकच फक्त लुबाडत असत. पण अलीकडे ग्रामसेवक, कामदारसहकार आणि पाणीवाटप खात्यातील कर्मचारी-हीही मंडळी या टोळीत सामील झालेली आहेत. ही एक नवीच टोळधाड ग्रामीण भागावर कोसळत आहे...'

एका गाजलेल्या लेखाची ही सुरुवात. लेखाचे शीर्षक आहे 'लुटारू'- Bandits एका सरकारी खात्यातील भ्रष्टाचारावर संपादक तुटून पडलेला आहे. लेखणी बंदुकीसारखी रोखली गेलेली आहे.

बिजनौर जिल्ह्यात नलिका कूप खात्याची वाढ बेसुमार झालेली आहे. खाजगी नलिकाकूपांव्यतिरिक्त जवळजवळ चारशे सरकारी नलिकाकूप या जिल्ह्यात आहेत. म्हणजे चारशे नोकरांना चरण्यासाठी ही चारशे सरकारी कुरणे जिल्ह्यात नव्याने तयार झालेली आहेत. सरकारी नलिका कूप ही जणू काय आपल्या बापाची मालमत्ता आहे असे समजून हे चारशे लुटारू तिचा मुक्तपणाने उपभोग घेत आहेत. सर्वसामान्य शेतकरी या लुटमारीच्या सुळसुळाटामुळे भयंकर हैराण झालेला आहे. वरपर्यंत लटीचे हिस्से बरोबर पोचवले जात असल्याने कितीही तक्रारी केल्या तरी त्यांच्या काही दाद फिर्यादच लागत नाहीत. जो अधिक लाच देतो त्यालाच खात्रीचा व भरपूर पाणीपुरवठा केला जातो. यामुळे कूप सार्वजनिक असेल तरी त्यांचे सर्व फायदे मूठभर श्रीमंत शेतकरीच फक्त उपटत आहेत. लहान गरीब शेतकरी हवालदिल होण्यापलिकडे फारसे काही करू शकत नाही.

पण असे मोघमात लिहिणे कशाला ? नलिका कूप क्रमांक ३८१ व ३८२ या ठिकणी समक्षच जाऊन परिस्थिती आपण थोडी जवळून पाहू.

मौजीपूर आणि रामपूर या आपल्या गोविंदपूर केंद्राजवळच्या दोन गावातील हे दोन सरकारी नलिका कूप. या दोन्ही कूपांचे काम पहाणारा एक ऑपरेटर-यंत्रचारी व त्यांच्या हाताखालील एक मदतनीस-कूपरक्षक.

रामपूरला पाणी देणारा कूप सारखा नादुरुस्तच होता. यंत्रचाऱ्याचे हात ओले केल्याशिवाय कूपातून पाणी वर येऊ शकत नाही. हे ज्ञान रामपूरच्या शेतक-यांना सुरुवातीला नसल्याने ते वरपर्यंत फक्त तक्रारी करीत बसले. शेवटी शेतातली उभी पिके वाळून चालली तेव्हा शेतकऱ्यांना अवश्य ती ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर लगेच काही तासातच कूप दुरुस्त झाला. यंत्रचारी स्वतःच म्हणे खांबावर चढला होता व त्याने तारा जोडून दिल्या.

कूप ३८१ ची कथा थोडी निराळी आहे. सहा गावातील सुमारे चारशे एकर जमिनीला या कूपातून सरकरी वाटपपत्रकाप्रमाणे पाणी मिळायला हवे. पण सगळे पाणी मौजीपूरचे बडे शेतकरी हडप करीत असतात. या शेतकऱ्यांची एकूण जमीन फक्त ११६ एकर. इतर पाच गावातील सुमारे तीनशे एकर जमिनीला पाण्याचा एक थेंबही हे शेतकरी पोचू देत नाहीत. यावरून गावागावात तंटे-मारामाच्या झाल्या. पोलिसांपर्यत तक्रारी गेल्या. पण परिस्थिती जैसे थे.

यंत्रचारी या शेतकऱ्यांना आतून सामील असल्याशिवाय हे कसे घडू शकते ? आतूनच काय, यंत्रचारी काही प्रसंगी बाहेरूनही प्रत्यक्ष हातभार लावतो असे कळते. इतर ठिकाणी पाणी नेणारे चरच मोडून काढ, विद्युत उपकरणे बिघडवून ठेव, शेतक-याशेतकऱ्यातच लठ्ठालठ्ठी लावून दे , अशा यांच्या कारवाया सुरू असतात.

गोविंदपूर क्षेत्राला सरकारी वाटपपत्रकाप्रमाणे २७ एप्रिल १९६८ ते ८ जून १९६८ या कालावधीत पाण्याचे चार हप्ते - एकूण ६६ तास पाणी मिळायला हवे होते. पण जेमतेम एक हप्ता पदरात पडला-इकडे कडक उन्हाने पिके वाळून चालली होती तरी हा हप्ता पदरात पाडून घेण्यासाठी थोडी दंगामस्ती करावीच लागली. यंत्रचाऱ्याने नेहमीप्रमाणे कूप नादुरुस्त ठेवला होता. थोक दाराने-शेतक-यांचा लोकनियुक्त प्रतिनिधी स्वतः थोडी खटपट करून तो चालू केला. गोविंदपूरचे पाणीवाटप पूर्ण होईपर्यंत यंत्रचाऱ्याला पुन्हा डॅबिसगिरी करण्यास वाव राहू नये म्हणून थोकदाराने कूपाला आपले कुलूप ठोकले. केवढा भयंकर गुन्हा ! ' थोकदाराला हातकड्याच पडायच्या. पोलीस दयाळू निघाले. नशिब समजा'- एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या संपादकांना आपला अभिप्राय नंतर ऐकवून गप्प केले होते.

एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ट्यूब वेल्स, बिजनौर यांचेकडे या वशिष्ट यंत्रचारी-कूप रक्षक जोडीविरूद्ध अनेक तक्रारी नोंदवून झालेल्या आहेत. या जोडीची तात्काळ बदली करावी अशी येथील शेतकरी प्रतिनिधींनी लेखी मागणी त्यांचेजवळ केलेली आहे. एक्झि. महाशय तरीही टोलवाटोलवी करीत आहेत, ती खासच आता संशय उत्पन्न करणारी आहे. ही परिस्थिती फार काळ सहन करणे अशक्य आहे. एक्झि. महाशयांनी सावध रहावे. एखादा लुटला जात असलेला शेतकऱ्यांचा प्रतिनिधी त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय रहाणार नाही हे त्यांनी खूप समजून असावे. चीफ इंजिनियर, पाटबंधारे, लखनौ यांनाही आम्ही या लेखाद्वारे अशी प्रकट विनंती करतो की, त्यांनी या भागाला ताबडतोब भेट द्यावी व नलिका कूप खात्यात राजरोस, दिवसाढवळ्या चालू असलेल्या या लुटमारीला व चोरबाजाराला आळा घालावा. भ्रष्ट राजवटी असंतोषाच्या वणव्यात जगभर धडाधड कोसळत आहेत हे या मख्ख नोकरशहांच्या ध्यानात कसे येत नाही ?वणव्याने अशी काही शपथ घेतलेली नाही की, तो हिंदुस्थानात भडकणारच नाही. व्हॉल्टेरचे सामर्थ्य असलेली लेखणी या भूमीत अस्तित्वात नाही असे कोणी समजू नये.

व्हॉल्टेरने इतका भडिमार केल्यावर शासनयंत्रणा स्वस्थ कशी रहाणार?

□ अब्रू नुकसानीची फिर्याद संपादकावर गुदरली गेली.

□ दहा-पाच वकील संपादकासाठी फी न घेता काम पहायला आपणहून पुढे आले.

□ आसपासच्या गावचे शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांनी संपादकाच्या बाजूने साक्षी दिल्या. फिर्यादी पक्षाने आणलेल्या साक्षीदारांपैकी काही तर तुरुंगातली खडी फोडून नुकतेच बाहेर पडलेले सरकारी पाहुणेच निघाले.

□ संपादकाने कोर्टासमोर आपली भूमिका आणखीनच ठणठणीतपणे मांडली-

'नोकरशाहीने गोरगरीब जनतेची लूटमार चालविली असता डोळ्यावर कातडे पांघरून स्वस्थ रहाणे हे माझ्या परंपरेत नाही, स्वभावात नाही. 'लुटारू' हा लेख मी काही कुणा व्यक्तीच्या आकसापोटी लिहिलेला नाही. मला या देशात स्वच्छ शासन हवे आहे आणि त्यासाठी मी अहर्निश चालवलेल्या झगड्याचाच हा एक भाग आहे. वेळ पडलीच तर लेख लिहिण्यापलीकडेही मी याबाबत जात असतो. सहाच महिन्यापूर्वी येथील जिल्हा न्यायाधीश व पोलीस अधीक्षक यांचे सहकार्य मिळवून, पूर्वनियोजनपूर्वक एका जलविद्युत खात्यातील पर्यवेक्षकाला, तो लाच स्वीकारीत असता मी जाळ्यात पकडून दिलेले आहे. खारी गावच्या विणकर सहाकारी संस्थेचा मी अध्यक्ष आहे. माझ्या पूर्वीच्या अध्यक्षांनी तीन हजार रुपयांची अफरातफर केलेली होती. मलाच ते प्रकरण कोर्टात न्यावे लागले. गुन्हा शाबीत झाला. ते सद्गृहस्थ सध्या तुरुंगाची हवा खात आहेत. असे करण्याशिवाय आज खऱ्या लोकसेवकाला गत्यंतर उरलेले नाही आणि मी स्वतःला गांधी-विनोबा परंपरेतला लोकसेवक मानतो हे मी सन्माननीय न्यायमूर्तीसमोर सुरुवातीलाच स्पष्ट केलेले आहे.'

न्यायमूर्तीनी शेवटी निकाल दिला... I, therefore, acquit the accused. आरोपी निर्दोष आहे.

संपादकाने या प्रकरणाचा समारोप करताना अंकात आणखी एक टोला लगावलाचः

'लखनौचे मोगल राज्यकर्ते न्यायमूर्तीच्या या निकालपत्रावरून काही बोध घेतील काय ? यंत्रचारी आणि एक्झि. महाशय यांच्याविरुद्ध आता भरपूर पुरावा पुढे आलेला आहे. नलिका कूप खात्याच्या जंगलात दडून लहान शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या या दरोडेखोरांचा सरकारने आता निकालच लावला पाहिजे. पण शासन असे काही न करण्याचीच शक्यता अधिक. त्यामुळे प्रस्तुत लेखकासारख्या इतर अनेकांना आपल्या हातातील नांगरांचे आणि लेखण्यांचे तोफा–बंदुकात रूपांतर करण्याशिवाय मात्र पर्याय उरणार नाही, हे शासनकर्त्यांनी ध्यानात घ्यावे.'


लखनौच्या मोगलांची झोप काही यामुळे उडाली नाही हे खरे. पण त्यांनी डोळ थोडेसे किलकिले करून पाहिले मात्र. या एक्झि. + यंत्रचारी जोडीच्या दोन-तीन महिन्यातच बदल्या करण्यात आल्या. किमान एवढेही न करून कसे चालले असते ? कारण संपादक दरम्यानचा काळातही स्वस्थ बसलेला नव्हता. त्याने या जोडीच्या नवीन काही लीला उघडकीस आणल्या. विशेषतः एक्झि. महाशयांच्या कारण हो मोठी शिकार होती. ही साधण्यात संपादकांचा गौरव होता. अखेर ती साधलीही. पण अर्धवट. फक्त बदली ! जनावर जखमी झाले. ठार मरून पडले नाही. संपादकांचा लोकशाहीवरचा विश्वास थोडा अधिकच डळमळीत झाला असावा.

खारी गावातील शिवमंदिरात हा संपादक-सुधारक हरिजनांना घेऊन प्रवेश करता ज्ञालाऱ्याचा स्वतःचा देवळातील देवावर विश्वास होता की नाही देवच जाणे.

गावातील सनातनी हिंदू डिवचले गेले, खवळले. चक्क याच्यावर लाठ्याकाठ्या घऊन धावले. हा समरप्रसंग नेमका केव्हा, कसा व कुठे घडला याची मात्र अंकात नोंद नाही. संपादक येथील ‘बिजनौर टाईम्स' कचेरीत एकदा गप्पा मारीत बसला होता. विषयावरून विषय निघाला तेव्हा याने हा प्रसंग सहज सांगून टाकला. बाबुसिंह चौहान यांना (संपादक, बिजनौर टाईम्स) त्यावेळी झालेले संभाषण आठवते ते साधारणतः असे-

‘बाबुसिंह ! सध्या तुम्हा मंडळींचे आमच्याकडे मुळीच लक्ष दिसत नाही. अहो ! परवा आम्ही मरता मरता वाचलो !'

'अं ! काय झाले काय !'

‘चांगले आठ-दहा लोक आले होते. ती आमची हरिजन मंदिर प्रवेशाची भानगड! पण एकटा पुरून उरलो सगळ्यांना. ठोकून काढले एकेकाला. शेवटी पळून गेले लेकाचे.'

'अहो मग काही फिर्याद बिर्याद ?'
'समजेल त्यांना आपली चूक, आज नाही उद्या. मामला किरकोळ, म्हणून सोडून दिला.'

मंदिराप्रमाणे संपादक मशिदींकडेही वळला.

विणकर, तेली, घुमार, धोबी, धुनस, फकीर, नैस, सक्का व मणिहार-सुमारे तेविसशे लोकवस्तीच्या खारी गावातील चौदाशे मुसलमानातील या नऊ पोटजाती. एकट्या विणकरांची संख्या सुमारे एक हजार. म्हणून या समाजाचा अभ्यास अधिक बारकाईने करावा असे ठरले. अभ्यास सुरू झाला.

१९२८ पर्यंत हे विणकर आपापल्या मागांवर काम करून रीतसर मार्गाने पोट भरणारे साधेभोळे कारागीर होते. यानंतर रेल्वे या भागात आली व या विणकरांपैकी काही दूरदूरच्या अहमदाबाद-मुंबई शहरात किंवा जवळच्या लुधियानात कामधंद्यासाठी जाऊ लागले. कुणी विणकर म्हणून, कुणी पावांच्या भट्टयांवर, कुणी गोऱ्या साहेबांचे पट्टेवाले-चपराशी म्हणून. यामुळे या समाजाच्या हातात नवा पैसा खेळू लागला. कच्च्या झोपड्या जाऊन पक्की घरे आली. खारी गावातील एकूण पक्क्या घरांच्या संख्येपैकी पंचाहत्तर टक्के पक्की घरे या विणकर समाजाची आहेत.

घरे सुधारली, पण शिक्षणात सुधारणा नाही. उलट धर्मवेडेपणा वाढला, धार्मिक भावना अधिक नाजूक बनल्या. काही चलाख मंडळी परगावी हिडन येथील मशिदीसाठी देणग्याही गोळा करून आणू लागली. परिणामतः लहानशा जागेत केवळ हजार एक विणकर मुसलमानांसाठी दोन मशिदी व एक अरेबिक पाठशाळा येथे आहे. जातीपोटजातीचे किडे मुस्लिम समाजातही वळवळत असल्याने तेली व धोबी मुसलमानांसाठी प्रत्येकी एकेक मशीद गावात वेगळी आहेच. तेली मुसलमान कुटुंबे फक्त ३२, लोकसंख्या १५०. धोबी मुसलमान कुटुंबे फक्त २३, लोकसंख्या ९५.

गावातील मुसलमानांचे नेतृत्व सहाजिकच एका विणकराकडे आहे. या विणकराचा बाप एका ब्रिटिश अधिकाऱ्याकडे खानसामा म्हणून नोकरीला होता. त्यामुळे तुटक्या फुटक्या इंग्रजीचा याला गंध आहे व त्या जोरावर तो आपले पुढारीपणाचे वजन टिकवून आहे.

गावातील एकही मुसलमान कधी राष्ट्रीय चळवळीत सहभागी झालेला नाही ब्राह्मण जमीनदारांचे पूर्वी गावावर वर्चस्व असल्याने बहुतेकदा तो काँग्रेस विरोधात जमीनदारांच्या बाजूने उभा राहिला. जमीनदारांचे दडपण नव्हते तेव्हा मात्र मुस्लिम लीगकडे तो ओढला जात होता.

फाळणीच्या काळात उत्तर प्रदेशचा हा भाग जातीय दंगलीच्या वावटळीत सापडला नाही किंवा लोकांनी स्थलांतरेही केली नाहीत. बोटावर मोजावे इतकेच उत्साही पीर पाकिस्तानकडे निघून गेले. बहुतेक इथेच राहिले. इतकेच नव्हे, देशाच्या इतर भागात कामधंद्यानिमित्त विखुरलेले खारीचे अनेक मुसलमानही त्या काळात सुरक्षिततेसाठी खारीतच येऊन राहिलेले होते. पंजाबमधील शहरातून असलेल्या खारीकर मुसलमानांची मात्र धडगत राहिली नाही. एक तर ते मारले गेले किंवा सरहद्दीपलीकडे त्यांना फेकून देण्यात आले. परंतु जे पाकिस्तानात तेव्हा स्वखुशीने गेले किंवा बळजबरीने ढकलले गेले त्यांपैकी बऱ्याचजणांचे खारीत येणे-जाणे, मुक्त परवानापद्धतीमुळे, चालूच राहिले.

गावात हाजला जाऊन आलेले ५० यात्रिक आहेत. बहुतेक सर्व विणकरच. 'हाजीजी' असे यांना बहुमानाने इतर धर्मबांधवांकडून संबोधले जाते. असे संबोधले नाही तर या सभ्य गृहस्थांना तो आपला अपमान वाटतो. हाजला जाताना-येताना हे सभ्य हस्थ चोरट्या मालाची ने-आण करीत असतात ही गोष्ट वेगळी !

जमीनदारी निर्मूलन कायद्यापूर्वी मुस्लिम समाज रहात असलेल्या जमिनीची मालकी सहा हिंदू जमीनदारांकडे होती. यापैकी तीन खारीत राहणारे होते व तीन बिजनौरचे. कायदा झाल्यावर या जमिनींची मालकी ओघानेच मुसलमान घरमालकांकडे आली.

खारी गावात एकूण शेतजमीन १२२३ एकर. यापैकी १२५ एकर जमीन जमीनपारी नाहिशी झाल्यावर विणकर कुळांकडे आली. तेली, धुनस व धोबी जातीतील 3ळांना अनुक्रमे १४, ४८ व ५६ एकर जमीन मिळाली. पंचायती राज्य सुरू झाल्यावर गावातील जमीनदारांचे वर्चस्व जवळ जवळ संपुष्टात आले व मुस्लिम समाज बहुसंख्य असल्याने ग्रामपंचायत सहाजिकच या समाजाच्या ताब्यात आली. परंतु या समाजातील बहुसंख्य लोक बिगर शेतकरी असल्याने पुढील शेतीसुधारणा किंवा गावच्या सुखसोयी (हरिजनांची घरे, खतांचे खड्डे, गावातील रस्ते इत्यादी) या बाबींकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले. उलट पंचायतीच्या ताब्यातील रहात्या घरांसाठी असलेल्या जमिनी आपल्याच धर्मबांधवांना देण्याचे, जातीयवादाची खोच असलेले धोरण अंमलात आले. हिंदुला हितकारक ते मारकवाईट अशी एक नवीच नीती-प्रवृत्ती गावात उदयास आली. ( A new ethics emerged by which anything benefiting a Hindu was bad.)

नियंत्रणाच्या काळात खानसामा-चिरंजिवांनी एक विणकर सहकारी संस्था काढली आणि सुताचा काळाबाजार करून, अफरातफर करून, हजारो रुपये उकळले. भाईबंदांनी थोडी कुजबुज केली. खानसामाचिरंजिवांनी गावातील मशिदीला एक छोटीशी देणगी जाहीर करून टाकली. तरी कुजबुज थांबत नाही असे पाहून या इसमाने आपल्या घरावर डाका घालवून कागदपत्र चोरीला गेल्याची बोंब ठोकली. पोलीस, सरकारी अधिकारी, पुढारी-सगळेच याला सामील. प्रकरण भिजत पडले, मिटवल जात होते.

खानसामा चिरंजिवांकडे गावचे धार्मिक पुढारीपणही होते. जोडीला थोडी डॉक्टरकी. वरपर्यंत लागेबांधे-त्यामुळे गावावरची या माणसाची दुष्ट पकड उठविणे मोठ नाजुक व अवघड काम होते.

व्यक्तित्व विकास केंद्राने गाव स्वच्छता मोहीम प्रथम हाती घेतली. हिंदूवस्तीत काही अडचण आली नाही. पण मुस्लिम मोहल्ल्यात बंदी. स्वयंसेवकांना दमदाटी. विनोबा त्या सुमारास आसामात होते. केंद्राने याबाबत त्यांचा सल्ला घेण्याचे ठरविले. शिवसागरहून विनोबांचे पत्र आले :

आपण आपली सेवा दुसऱ्यावर लादू नये. सेवा लादली तर तो एक जुलमाचाच प्रकार ठरतो. सेवा सहजभावाने घडावी.

संपादकाचा खोडकरपणा जागा झाला. तो लिहितो : विनोबांना बहुधा आपल्या शिष्याच्या शरीराची काळजी वाटत असावी. (बिचान्यावर लाठीहल्ला झाल्याचा बातमी एव्हाना त्यांच्यापर्यंत पोचलेली होती.) नाहीतर बनारसला पदयात्रा पोचला असता, मुक्काम वाढवून, विनोबांनी बनारस स्वच्छ करण्याची सेवा तथाले लोकांवर स्वतः लादलीच होती नं ?

तेव्हा विनोबा आता काहीही म्हणोत. आपण पुढे जायचे. धर्मवेडाचा या किल्ल्यावर आणखी एक धडक मारायची. गांधी जयंती आली. गावात केंद्राने एक मिरवणूक काढली. चाळीस मुले आणि दहा-पाच प्रौढ. मिरवणुकीत घोषणा एकच : म. गांधी की जय ! जोडीला गांधीप्रार्थना-

  ईश्वर अल्ला तेरे नाम । सबको सन्मति दे भगवान् ।
 मंदिर मस्जिद तेरे धाम । सबको सन्मति दे भगवान् ।

पण या भगवानाने सर्वांना सन्मती काही दिली नाही. मुस्लिम मोहल्ल्यात मिरवणूक अडवली गेली. धर्मपिसाट बरळले : गांधी-बिधी येथे नकोत. आमच्या नमाजात व्यत्यय येतो. आमचे कान अपवित्र होतात.

मिरवणूकवालेही हट्टाला पेटले.

पोलिसांनी रस्ता साफ करून मिरवणूक व्यवस्थित पार पाडू दिली.

पुढे पंधरा दिवस मिरवणुकीचा हा कार्यक्रम सर्व मोहल्ल्यातून निर्वेधपणे पार पडतराहिला.

बंदिस्त समाजाच्या भिंतीला केंद्राने यशस्वी धडक मारलेली होती. गावातील हिंदुकडून याचे खूप कौतुक झाले. वास्तविक केंद्राने हिंदू आणि मुस्लिम असा भेद केलेलाच नव्हता. दोन्ही समाजातील धर्मवेडावर सारखाच हल्ला चढविण्याचे सुरुवातीपासूनचेच केंद्राचे धोरण होते.

विणकार धंद्याविषयी माहिती गोळा करण्याचे एक काम केंद्रासमोर होते. यासाठी विणकर समाजातीलच काही तरुण मुले केंद्राने हाताशी धरलेली होती. पण दोन ऑक्टोबरच्या वरील प्रसंगानंतर या मुलांवर पालकांकडून दडपणे येऊ लागली. बहुतेकजण गळाले. माहिती गोळा करण्याचे काम अडून राहिले.

जे अशक्य ते शक्य करून दाखविण्याची आवड व खुमखुमी असलेल्या संपादकाने आपला एक पूर्वीचा मुसलमान विद्यार्थी या कामासाठी मुद्दाम बोलावून घेतला. हरियानातल्या गुरगाव जिल्ह्यातल्या एका मेओ-मुस्लिम सैन्याधिकाऱ्याचा हा मुलगा-सब्दल-खान. पोरगं मोठ चलाख व या कामाची आवड असलेलं होतं. याला आल्याआल्याच 'जासूद' (spy) ठरविले गेले. शुक्रवारच्या प्रार्थनेसाठीसुद्धा याला मशिपात प्रवेश करण्याची बंदी. मुलाने हसतखेळत हे सर्व पचविले. काही दिवसांनी बंदी उठली, मशीद त्याला खुली झाली-संपादकाबरोबर तो आश्रमात रहात होता तरी !


ग्रा...११ सब्दलला एक सहकारी मिळाला. मोदीनगरच्या कापड गिरणी कामगार संघटनेत काही काळ काम केलेल्या एका अर्ध्यामुर्ध्या कम्युनिस्ट कार्यकर्त्याचा हा मुलगा नझाकत हुसेन. वडिलांनी याला मुलांच्या पाठशाळेत न पाठविता सरळ इंग्रजी शिक्षणाकडे वळविल्यामुळे हा इतरांपेक्षा एकदम वेगळा वाढला. त्याने केंद्राला हवी होती ती माहिती झटपट गोळा करून दिली. काही मोहल्ले त्यालाही बंद होते. पण अशा ठिकाणी या दोघांनी मिळून एक वेगळीच शक्कल लढविली. भंगीकाम करणाच्या बायकांशी यांनी संधान जुळविले. या बायका संडास सफाईसाठी मुस्लिम घराघरातून जात होत्याच. त्यांनी केंद्राला हवी होती ती हातमाग वगैरेंची माहिती तर आणलीच. शिवाय नको त्या बातम्याही त्या पुरवू लागल्या-कोणा बाईला किती दिवस गेलेले आहेत, कोण मुस्लिम कुमारिका गर्भपाताच्या जाम खटपटीत आहे...

सब्दलचे काम आटोपल्यावर तो परत गेला. नझाकतला केंद्रातच अर्धवेळ कार्यकर्ता म्हणून घेतले गेले. इथे तो टायपिंग शिकला. त्याचे इंग्रजी खूप सुधारले. या भांडवलावर पुढे त्याने, मिरतला, नोकरी करीत करीत आपले एम् ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

एकीकडे मुस्लिम धर्मांधतेचा हा दैनंदिन अनुभव.

देशभर काँग्रेसने याच सुमारास चालवलेले मुस्लिम लीगचे पुनरुज्जीवन.

संपादकाने या भस्मासुराकडे डोळे वटारून पाहिले.

या अपवित्र युतीवर लेखणीचे प्रहार सुरू केले.

मुस्लिम समाजातील धर्मवेडाला खतपाणी घालण्याचे खिलाफती राजकारण खेळल्याबद्दल थेट म. गांधींनाही धारेवर धरले गेले.

पं. नेहरू तर संपादकाच्या दृष्टीने केवळ एक सत्तालोभी राजकारणी पुरुष होते. एखाद्या तत्त्वासाठी, अप्रियता पत्करून कडवी झुंज घेणे, सत्तेवर तिलांजली ठेवायलाही प्रसंगी सिद्ध होणे, हे नेहरूंच्या राजनीतीत बसूच शकत नव्हते. ते मुस्लिम समाजातील धर्माध-असहिष्णू प्रवृतींशी कशी काय टक्कर घेऊ शकणार ? नतर आली नई रोशनी ! बापसेही बेटी सवाई !

मुस्लिम प्रतिगामित्वाशी तडजोड करण्यात मुलगी वडिलांच्याही पुढे गेली. नेहरूंनी लीगशी राजकीय पातळीवरून तरी थोडाफार सामना दिला. इंदिरेने तर सत्ता संपादनासाठी लीगशी चक्क हातमिळवणीच करून टाकली.

बिजनौर, दिनांक ३ फेब्रुवारी १९७० : पंतप्रधानांचा निवडणूक दौ-यातील एक मुक्काम. प्रचारसभा. संपादक सभा ऐकतो, अंकात लिहितो− तेहतीस टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेला हा जिल्हा. सभेला मुस्लिम स्त्री-पुरुष श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित. पण कुटुंब नियोजनाविषयीसुद्धा पंतप्रधान एक शब्द बोलल्या नाहीत. मग बुरखा टाकून द्या, अनेक-पत्नीत्वाला विरोध करा, तुर्कस्थानच्या महिलांप्रमाणे आधुनिकतेचा, कष्टपूर्वक का असेना, स्वीकार करा असे आवाहन स्त्रियांना उद्देशून करणे तर दूरच राहिले ! मुल्ला, मौलवी, धर्मगुरू पंडित यांच्या जुनाट संस्कारातून मुस्लिम समाजाने मुक्त व्हावे असा आवाज बाईंनी एकदाही का नाही उठवू ? येताजाता आगपाखड काय ती जनसंघावर. याने फार तर मतांचे गठ्ठे पक्के बांधले गेले. प्रश्न सुटला काय ? उलट या मुस्लिम अनुनयामुळे बहुसंख्य हिंदू समाज काँग्रेसला दुरावेल व जनसंघासारख्या धोकादायक जातीय पक्षांना अधिकच प्रोत्साहन मिळत राहिल...

संपादकमित्रा ! थोडे वेगळे मत येथे नोंदवून ठेवतो. तू नाहीस; पण तुझी अनुमती गृहीत धरतो.

तू गेली दहा वर्षे उत्तर प्रदेशात वास्तव्य करून होतास. एवढा इतिहास धांडोळलास. चालू काळाकडे इतक्या अभ्यासपूर्ण व चिकित्सक नजरेने पाहिलेस. असे नाही का तू ध्यानात घेतलेस की, (१) उत्तर प्रदेशचे राजकारण हे हिंदू-मुस्लिम तडजोडवादाचे राजकारण असते आणि (२) उत्तर प्रदेशचे राजकारण हेच हिंदुस्थानचे राजकारण ठरते ?

अगदी इतिहासकाळापासून हे चालत आलेले आहे. आम्ही मराठे, हिंदवी स्वराज्य संस्थापकाचे वंशज. पण नर्मदा ओलांडताना मराठी समशेरीला इस्लामच्या कडव्या प्रतिकाराची जी धार होती ती चंबळ ओलांडल्यावर थोडी कमीच झाली. आणि यमुनेच्या तीरावर जेव्हा आमची सैन्ये विसावली तेव्हा तर ' पातशाही कायम राखून राज्यविस्तार करणे.' हे मराठ्यांचे धोरण पक्केच ठरून गेले–महादजी शिंद्यांनी जे पुढे अंतापर्यंत चालविले. तूच जुना इतिहास सांगितला आहेस, की मराठ्यांनी पानपतचा सूड उगविण्यासाठी, या भीषण नाट्याचा मूळ खलनायक नजिबखान रोहिला याची बिजनौरजवळच असलेली कबरदेखील खणून काढली, उध्वस्त केली. तूच मग विचार कर की, संधी अनेकदा आली असताना देखील, मराठ्यांनी पातशहाचे सिंहासनच कधी का उखडून टाकले नाही ? यमुनाकाठच्या त्या सूरजमल जाठाचा कानमंत्रच याला कारणीभूत होता ना की, येथल्या प्रजेला दुखवू नका -आहिस्ता-आहिस्ता ! हाच कानमंत्र पुढच्या सर्व यशस्वी राजकारणनिपुणांनी ऐकला, त्याप्रमाणे आपली धोरणे त्यांनी आखली, त्यांना आखावी लागली, यात चूक कुणाची ? परिस्थितीची की व्यक्तीची ? गणपती उत्सवात दंगल माजल्याबद्दल येवल्याच्या मुसलमानांची कडक हजेरी घेणारे टिळक लखनौला पोचल्यावर देवाण-घेवाणीचा करार करण्यास प्रवृत्त का व्हावेत ? नेहरूंचे आणखी एक पाऊल पुढे पडले हे खरे.घेवाण कमी, देवाण जास्त झाली. पण सूत्र लखनौ कराराचे होते! फार तर एवढे म्हणता येईल की, गंगेची मातीच थोडी मऊ ! गंगेचे खोरे अधिक दार, अधिक सहिष्णू !

पण उपाय काय ? हेच तर हिंदुस्थानच्या राजकारणाचे मर्मक्षेत्र आहे. जी विचारसरणी, जो नेता हे खोरे काबीज करू शकतो तोच सर्व भारतावरही प्रभुत्व गाजवत रहातो. या हिंदी भाषिक प्रदेशाचा प्रचंड दबाव उर्वरित हिंदुस्थानावर पडलेला आहे. जसेजसे दक्षिणेकडे, पूर्वेकडे जावे तसतसे हे अधिक ध्यानात येते. आपण ज्यांना सरसकट फुटीरतेच्या चळवळी म्हणून संबोधतो, तो अनेकदा या दबावाविरुद्ध प्रकट झालेला असंतोष असतो. परंतु असंतोष असला आणि तो वाढला तरी हे सत्य आपण ओळखले पाहिजे की, हा दबाव पुढील काही दशके तरी कमी होण्याची मुळीच शक्यता नाही. कारण आपण लोकशाही पत्करलेली आहे, बहुसंख्याक हिंदी प्रदेशांचे वर्चस्व हा या लोकशाहीचाच एक अटळ परिणाम आहे. म्हणून पुढचा पेच येतो : लोकशाही हि तोवर दबाव आहे. दबाव आहे तोवर मुस्लिम तडजोडवाद आहे. मुस्लिम तडजोडवाद आहे तोवर नेहरूच काय, कुठलाही राजकीय नेता, पक्ष, तुला अभिप्रेत असलेली आधुनिकता मुस्लिम समाजावर लादू धजणार नाही. ही एक कोंडी आहे आणि जनसंघासारखा पक्षही--तो लोकशाहीवादी आहे. तोवर--या कोंडीत सापल्याशिवाय राहणार नाही. तुला भीती वाटते तसा 'जातीय' राहू शकणार नाही. खारीचे तुझे मुसलमान बांधव तुला फारच छळू लागले तेव्हा तूच नाही का चिडून एकदा लिहिलेस : And mind you, this is happening in a state wherein the Jan Sangh is a member of the coalition. जनसंघ संविद सरकारात सामील असतानाही मुसलमानांचा माजोरीपणा चालू होता हे तूच म्हणतोसः कसा कमी होईल हा माजोरीपणा ! मुसलमानांची वट्ट मते जनसंघाला नको आहेत असे थोडेच आहे!

मित्रा, तुलाही ही कोंडी जाणवलेली असावी. म्हणून वैतागून अनेकदा एखाद्या लष्करशहाला तू हाका मारल्यास. त्याने यावे आणि ही सगळीच जुनी घाण साफ करून निघून जावे असे तुला वाटत होते. पण एकदा आल्यावर कुणी परत सहजासहजी जात नसतो आणि आलेला केमालपाशाच असेल याची शाश्वती नसते, हे तू कसे विसरलास ? एक खरे की, या तुझ्या हाकांमुळे तुझे अनेक सहकारी, हित चिंतक तुझ्यावर नाराज झाले, काही तर बिथरले. तुला त्यांनी रागारागाची पत्र पाठविली. तू कोणाला उत्तरे दिली नाहीस, पण आपले मत मात्र पुनः पुन्हा मांडत राहिलास : ही राजवट उलथली पाहिजे. हा समाज बदलला पाहिजे. Some drastic step is necessary.

प्रिय X X X भाई

सेवाग्राम आश्रमातील अंतर्गत मतभेदांविषयी मी मौन पाळण्याचे ठरविले होते. पण मित्रांनी आग्रह करून मला लिहायला प्रवृत्त केले. शिवाय काम अर्धवट सोडून मीच आश्रमाच्या शेतीचे हजारो रूपयांचे नुकसान केले, असा माझ्यासंबंधी गैरसमज निर्माण करणारा प्रचारही कानी आला. म्हणून स्पष्टीकरण आपल्या समोर ठेवीत आहे.

माझा सर्व रोख गिरीधर भाईंनी आश्रमात राहून सुरू केलेल्या खाजगी सावकारीविरूद्ध होता. बावीस वर्षे विनोबांच्या सान्निध्यात पवनार आश्रमात राहिलेला हा माणूस. यासाठी पवनारहून त्याला हाकलण्यात आले. मग सेवाग्रामने त्याला स्थान का द्यावे ? येथे आल्यावर तर त्याने आपला सावकारी धंदा उघडपणेच सुरू केला. वारशाने मिळालेले अडीच लाख रुपये भरमसाठ दराने व्याजी लावून पाच वर्षात दामदुप्पट करावेत अशी आश्रमीय जीवनाशी पूर्ण विसंगत असलेली लालसा त्याने बाळगली व वैयक्तिक स्वार्थापोटी तो अनेक खोटेनाटे इतर व्यवहारही करू लागला.

गेले वर्षभर मी या प्रकाराचा निषेध करीत आहे. परंतु कोणी या निषेधाची विशेष दखल घेतली नाही. उलट या अपप्रकारांना आतून प्रोत्साहनच मिळत गेले. विशेषतः निर्मलाबेन यांनी अशा व्यक्तीच्या समर्थनासाठी, संरक्षणासाठी पुढे यावे याचे मला अतोनात दुःख झाले. निर्मलाबेन यांच्या अनेक गुणांचा मी चहाता होतो व आहेही. परंतु त्यांची ही वागणुक पाहून मला फारच क्लेश झाले. ( निर्मला बेन-रामदास गांधींच्या विधवा पत्नी, म. गांधींच्या स्नुषा)

आश्रमात मी नोकर म्हणून कामाला राहिलेला नव्हतो. एक सहकारी म्हणून मला येथे बोलावले गेलेले होते. असे असताना आश्रम चालविण्याबाबत एकतर्फी निर्णय घेतले जात होते. हे मला खटकत होते व याची स्पष्ट जाणीव मी आपल्याला करून दिली होती. तरी परिस्थितीत काही सुधारणा दिसेना म्हणून आश्रम सोडल्याशिवाय मला गत्यंतर उरले नाही.

माझ्या शेतीज्ञानाविषयी व प्रत्यक्ष कार्याविषयी अनेकजणांनी गौरवोद्गार काढले. या सर्वांचा मी आभारी आहे. परंतु एकच गोष्ट मला मुद्दाम स्पष्ट करावीशी वाटते : शेती वगैरे या सर्व गोष्टी आश्रमाची बाह्यांगे आहेत. आपला मुख्य आग्रह एकादश व्रतांचे परिपालन करणे हा असला पाहिजे.

सेवाग्राम आश्रमाचे व्यवस्थापक श्री. चमनलाल भाई यांना पाठविलेल्या आपल्या या वरील पत्राची एक प्रत गोविंद रेड्डी यांनी गोविंदपूरला स्वामिजींकडे पाठविली आणि थोड्याच दिवसात ते स्वतःही आश्रमात येऊन दाखल झाले. दोन गांधीवादी कार्यकर्ते एका वेगळ्याच मनःस्थितीत पुन्हा एकत्र झाले होते.

दोघांनी पंचवीस वर्षांपूर्वी सेवाग्राममध्ये मोठ्या उमेदीने प्रवेश केलेला होता. गोविंद रेड्डी म्हैसूरहून तुरुंगातून सुटून आलेले-बेचाळीसच्या अंदोलनात त्यांनी भाग घेतलेला होता. स्वामिजी---लाहोर कॉर्पोरेशनमधील झाडूवाल्याची नोकरी संपवून आलेले : सेवाग्रामला गांधीजींकडे जायचे, अध्यात्म साधनेबरोबरच श्रमसाधनेची काही जोड हवी, म्हणून ऋषिकेशचा ‘स्वर्गाश्रम' सोडल्यावर लाहोर कॉर्पोरेशनमध्ये स्वामिजींनी सुरुवातीला ही नोकरी ‘साधना' म्हणून धरलेली होती.

रेड्डी गांधीजींजवळ शेतकामासाठी राहिले. स्वामिजी विनोबांबरोबर गोपुरीपवनारकडे वळाले.

पुढे कोरापुटमध्ये ( ओरिसा ) ग्रामदान कार्यासाठी हे दोघे पुनः एकत्रित आले. रेड्डींनी गरांडा येथे केंद्र चालवले. आदिवासींना शेतीचे नवे तंत्र त्यांनी शिकवले. स्वामिजींकडे Gramdan Monthly या इंग्रजी मासिकाचे संपादन करण्याचे काम आले.

गरांडा केंद्राहून रेड्डी सेवाग्रामाला परत आले. बारा-चौदा वर्षानंतर. पण सेवाग्राम बदलले होते. रेड्डी बाहेर पडले. ओरिसा-बंगाल-बनारस असे फिरत फिरत नुकतेच ते गोविंदपूरला येऊन पोचले होते.

आणि स्वामिजी गोविंदपूर सोडू पहात होते.

दहा वर्षांपुरते त्यांनी आपले हे कार्यक्षेत्र निवडलेले होते. नुकतेच ते भेटायला गेले तेव्हा विनोबांनी त्यांना या कालमर्यादेचे स्मरण करून दिले होते. यानंतर स्वामिजींनी दक्षिणेकडे कुठेतरी जावे असे विनोबांच्या मनात होते.

दहा वर्षांपूर्वी या कार्यक्षेत्राकडे जाताना विनोबांनी स्वामिजींना सांगितले होते : जातो आहेस. पण एक लक्षात ठेव. उत्तर प्रदेश हा पुढाऱ्यांचा प्रदेश आहे. विधायक कार्यकत्र्याला या प्रदेशात फारसा वाव मिळत नाही.

स्वामिजींनी हे आव्हान स्वीकारले. कारण केवळ विधायक कार्यकर्ता म्हणून सेवेची कामे करीत रहाणे एवढेच त्यांचे उद्दिष्ट नव्हते. सर्वोदयाला नसलेली राजनीतीची धार त्यांना प्राप्त करून द्यायची होती. यासाठी त्यांनी केवळ अध्यात्मात रमलेल्या हरिद्वारच्या स्वर्गाश्रमाचा त्याग करून अध्यात्म आणि राजकारण यांची यशस्वी सांगड जेथे घातली गेली त्या सेवाग्रामला पंचवीस वर्षांपूर्वी धाव घेतलेली होती. पण गांधीजी त्यानंतर एक-दोन वर्षातच गेले. नेहरूंनी फक्त सत्ता-राजकारण पाहिले. विनोबा अध्यात्मातून, भदानामुळे थोडे बाहेर पडल्यासारखे वाटले; पण ही प्रत्यक्ष क्रांतीची भूमिका त्यांना न मानवणारी-पेलणारी ठरली. पुन्हा देशभरच्या सर्वोदयी कार्यकर्त्यांमध्ये नवी पोकळी निर्माण झाली. जयप्रकाश या पोकळीतून वाट दाखवू शकतील अशी आशा वाटत होती, तीही फोल ठरली. तेच स्वतः एका पोकळीत चाचपडणारे. इतरांना काय वाट दाखविणार ?

गेल्या दोन ऑक्टोबरला असे बरेचसे अस्वस्थ, नवी वाट हुडकू पहाणारे कार्यकर्ते सेवाग्रामला जमले होते. स्वामिजीही गेले होते. खूप मनमोकळी चर्चा झाली. स्वामिजींनी आपल्या नेहमीच्या फटकळ पद्धतीने आपले मत धाडकन् सांगून टाकलो

मित्रहो, आपली बस चुकलेली आहे. नक्षलवाद्यांनी आपल्याला हवा होता तो क्षण अचूक पकडलेला आहे. यश त्यांचेकडे गेलेले आहे. त्यांची आणि आपली ध्येयसृष्टीयात बरेच साम्य आहे. त्यांचा हिंसेवर विश्वास, आपण अहिंसेचे पूजक. अहिंसात्मक क्रांतीचा पर्याय आपण जनतेसमोर ठेवू शकलो नाही. यामुळे जनता, विशेषत. तरुणवर्ग नक्षलवादाकडे आकर्षित झाला-अधिकाधिक होतही आहे. आपले विनोबफक्त पन्नास टक्के गांधी आहेत आणि जयप्रकाशांना काही कणाच उरलेला नाहीः आपल्यातील तरुणांनी समग्र क्रांतीसाठी अहिंसक उठावाचा एखादा नवीन कार्यक्रम पुढे आणला तर आपला विनाश टळू शकणार आहे... नाहीतर तो अटळ आहे.

देवेंद्रकुमार गुप्ता हे गांधी स्मारक निधीचे चिटणीस या चर्चेत सहभागी झालेले होते. त्यांनी स्वामिजींच्या परखड विचारांचे खूप स्वागत केले. विशेषतः स्वामिजींच्या पक्षिकाची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. ते म्हणाले : आपल्या विचाराची एकूण २३ नियतकालिके देशातील निरनिराळ्या भाषेत प्रसिद्ध होत असतात. पण स्वामिजींचे ‘पर्सनॅलिटी' हे एकच नियतकालिक काही वेगळे कार्य करीत आहे. बाकीची सर्व तोच तो जुना, आध्यात्मिक मजकूर छापीत असतात. १९६० सालचे या सर्व नियतकालिकांचे अंक १९७० साली वाचले तरी काही फरक पडत नाही.

'Personality-this is perhaps the only journal coming from Sarvodaya writer which reacts sharply to the situation at almost all levels. I mainly agree with the trend it represents although I differ strongly at times with most of its wordings. But that is a minor thing which could be discussed later.'

‘भोवतालच्या परिस्थितीची सर्व पातळ्यांवरून दखल घेणारे, त्याबाबत आपल्या प्रतिक्रिया तीव्रतेने व्यक्त करणारे ‘पर्सनॅलिटी' हे एकमेव सर्वोदयी पाक्षिक आहे. अंकातील शब्दयोजना मला अनेक ठिकाणी खटकत असली तरी हा विचारप्रवाह मला बहुतांशी मान्य आहे. शब्दयोजना हा गौण भाग आहे. त्याबाबत आपण सावकाश बोलू शकतो.' या मान्यतेमुळे स्वामिजी सुखावले असतील तर त्यात नवल नाही. कुणाही संपादकाला अभिमान वाटावा असेच हे प्रशस्तीपत्रक होते.

पाक्षिकाचे वय किती ? ६८ च्या सप्टेंबरात ते सुरू झाले आणि आता स्वामिजींबरोबरच त्याचाही अवतार संपलाच म्हणायचा. जेमतेम दोन-अडीच वर्षे. पण जन्मतःच मारुतीने सूर्यबिंब गिळायला झेप घ्यावी तसे हे पाक्षिक पहिल्या अंकापासूनच प्रचंड विरोधी शक्तींशी झुंज घेण्यास सरसावून उठले. बेफिकीर नोकरशाहीला सतत धारेवर धरले गेले. लाचलुचपतीविरुद्ध सतत आवाज उठवला गेला. पोलिसी दडपशाहीचा तीव्र धिक्कार, पुढाऱ्यांच्या भोंदूगिरीचा समाचार, चुकीच्या धोरणांचा कडकडून निषेध-जिल्हा परिषदेने जवळच्या एका रस्त्यावरची झाडे तोडण्याचा सपाटा चालवला होता. हा जो खवळलाय म्हणता ! जिल्हा परिषद अध्यक्षाला पार गुन्हेगार ठरवून मोकळा-The chairman of the Dist. Board Shri Magan Singh of Bharera will go down as the biggest criminal in the arboreal world for signing away the felling of thousands of trees of mammoth girth and imposing heights. डेरेदार आणि प्रचंड उंचीच्या हजारो झाडांची कत्तल करण्याच्या हुकुमावर सही करणारे भरेराचे जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. मगनसिंग हे वृक्षजगतातील एक भयंकर गुन्हेगार म्हणून ओळखले जातील.

बिजनौर हा ऊस उत्पादकांचा जिल्हा. छोट्या ऊस उत्पादकांचे लाखो रुपये हडप करणाऱ्या बिजनौर साखर कारखान्याच्या मालकावर हा केवढ्या आवेशाने तुटून पडला. शेठ बनारसी दास. संपादकाच्या भाषेत-बनारसी ठग. दर अंकात या कारखान्याच्या भानगडी संपादक उपसून बाहेर काढीत होता. अगदी खोटी वजन दाखविणाऱ्या कारखान्याच्या वजन काट्यापासून ते गिरणी मालकाने न्यायमूर्तीच्या ड्रायव्हरला दिलेल्या चिरीमिरीपर्यंत. कारण पैशाच्या जोरावर कोर्टाचे खेळ खेळूनच मालक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत राहिला होता. हायकोर्टसुप्रीम कोर्टापर्यंत याचे लागेबांधे. याला तुरुंगात डांबण्यासाठी संपादक जिवाचे रान करीत होता. यश येत नव्हते. कायद्यातील नव्या नव्या फटीतून हा बनारसी ठग सारखा निसटत होता. शेवटी परवा एकदा यश आले. पण संपादक मात्र हे यश पहायला या जगात उरला नव्हता. मी बिजनौरला पोचलो त्याच दिवशी या शेठला अटक झालेली होती. रस्त्यात एक नवशिक्षित किसान मला दुसऱ्या दिवशी सहज भेटला, म्हणाला, स्वामिजी आज हवे होते. त्यांना केवढा आनंद झाला असता?

तसाच तो बिजनौर-झालू- हल्दौर या लहानशा रस्त्याचा प्रश्न ! थेट गव्हर्नर गोपाल रेडी यांच्यापर्यंत नेऊन भिडवला याने. गव्हर्नरांना लिहितो : विनोबांबरोबर पदयात्रेत असताना तुंगभद्रेच्या काठावर आपली बारा वर्षांपूर्वी एकदा गाठ पडलेली होती. आपण शांतिनिकेतनचे विद्यार्थी. ग्रामीण जनतेविषयी आपल्याला सहानुभूती असणार, गुरुदेवांच्या संस्कारांचा काही भाग आपल्यात अद्यापी शिल्लक असेल अशी मी आशा करतो. या लहानशा रस्त्यात किती राजकारण आडवे येत आहे ! लोक आता आश्वासनांना कंटाळले आहेत. रस्ते नाहीत म्हणून हा भाग चोरदरोडेखोरांचे लपण्याचे एक हमखास ठिकाण होऊन बसलेला आहे. पोलिसांना बंदोबस्ताचे काम नोट करता येत नाही. परवाच आपल्या शेतात चोरांना लपण्यास मज्जाव केला म्हणून येथे भरदिवसा एका शेतकऱ्याचा गोळी घालून खून करण्यात आला.

स्थानिक आमदार श्री. सत्यवीर (म्हैसूरचे राज्यपाल श्री. धर्मवीर यांचे बंधू ) याची संभावना अशी करण्यात आली : महाशय, तुमचे काळे तोंड घेऊन इकडे मत मागायला पुन्हा फिरकूसुद्धा नका. चिडलेले लोक दगडधोंडे मारून ते अधिकच कुरूप करून टाकतील.

हा रस्ता मात्र पूर्ण झाल्याचे पहाणे संपादकाच्या भाग्यात लिहिले होते. त्याची ती जुनी, मोडकी तोडकी सायकल या रस्त्यावरून थोडी अधिक वेगाने, थोडी कमी त्रासात आता पळू शकत होती. गरज पडली तर रात्री बेरात्री बिजनौर-हल्दौरपर्यंत चकरा मारणे त्याला आता थोडे सुलभ झाले होते.

पण किती काळ ही यातायात, ही तडफड चालू शकत होती ? मूळ शरीरप्रकृती दणकट असली तरी पन्नाशी जवळ आली होती. पायात कधी याने वहाण चढवली नाही. कमरेला फक्त एक पंचा. सुरुवातीला भगवा, नंतर पांढरा. खांद्यावर वस्त्र आहे आहे, नाही नाही.

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, उघड्या माळावर हा असा उघड्या अंगाने, अनवाणी पायाने वावरत होता, राबत होता.

कदाचित यामुळे असेल, याच्या डोळ्याला थोडी इजा पोचली. एक डोळा लहानपणापासूनच अधू होता. दुसराही त्रास देऊ लागला. पत्रव्यवहातून स्नेह जमलेल्या एका स्त्री डॉक्टरने लुधियानाला याला बळेबळे हालविले आणि तेथील सुसज्ज मिशन हस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरकडून याच्या डोक्यावर तिने इलाज करवून घेतला. या हस्पिटलमध्ये हा फक्त दोन की तीनच दिवस होता. पण तेथील मुख्य परिचारिका नीट शाम करीत नाही, रुग्णांशी उर्मटपणे वागते म्हणून हा तडकला. परतल्यावर अंकातून ने या नर्सचा उद्धार सुरू केला. शेवटी हॉस्पिटलच्या चालकांना याला कळवावे गिल की बाबारे, या नर्सला मुदतपूर्व पेन्शनीत काढण्याचा आमचा विचार चालू झाला आहे.

असे घाव घालीत, वार झेलीत गोविंदपूरच्या कुग्रामातून स्वामिजी दिल्लीची सत्ताबदलण्याची स्वप्ने पहात होते. जेथे महाभारत घडले ती कुरुक्षेत्राची भूमी जवळच होती. पण ‘दोन सैन्यांमध्ये, अच्युता, माझा रथ नेऊन उभा कर' ही स्वामिजींची प्रार्थना एकणारा भगवान श्रीकृष्ण मात्र दृष्टीपथातही येत नव्हता. किरकोळ लढाया खूप जिंकल्या, लोकप्रियता नाही तरी थोडीफार लोकमान्यता लाभली. पण ते समोरासमोर ससैन्य प्रतिपक्षावर तुटून पडण्याचे वीरभाग्य ! स्वामिजींना हे मनापासून हवे होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ती मागणी होती. ते वीरपुरुषही होते. विरक्त साधूही होते. क्षात्र आणि ब्राह्मतेज त्यांच्या ठायी एकत्रित विलसत होते. हे तेज त्या कुग्रामनिवासामुळे झाकोळले तर जात नव्हते ? त्यांच्या मित्रांना ही शंका येत होती. स्वामिजीही क्वचित, निदान एकांतात तरी, या शंकेने व्याकुळ होत असावेत. चुकून, न कळत एखादा निराशेचा शब्द लिखाणातून बाहेर डोकावे; पण अगदी एखादाच; कारण स्वामिजी पुढच्याच शब्दात स्वतःला सावरूनही घेत: आपली शिकार झाली तरी चालेल, कुणी आपल्यावर दंया मात्र दाखवू नये ही आपली धार ते जराही कमी होऊ देत नसत.

दिल्लीच्या एका ज्येष्ठ पत्रकार मित्राने जरा शिष्टपणाचा आव आणून एकदा लिहिले : अंकाची छपाई केव्हा सुधारणार? त्या खेड्यात कुजण्याऐवजी दिल्लीला या. येथे फार मोठे क्षेत्र आपल्यासाठी खुले होईल.

स्वामिजींनी त्याला तडकावले : कसले क्षेत्र ? पैशाच्या तालावर नाचणाऱ्या गुलामांचेच ना ? शहरातला पत्रव्यवसाय ही पोटभरूंची निव्वळ दुकानदारी आहे. स्वतंत्र विचार तेथे पिकत नाहीत. ताजी पुष्पे तेथे उमलत नाहीत. येथे अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते हे खरे आहे. आमच्या जागी दुसरा कुणीही असता तर वेडा झाला असता, हातात बंदुक घेऊन दिसेल त्याच्यावर गोळ्या घालतच सुटला असता आम्ही आजवर टिकून आहोत याचे कारण ध्येयवादाच्या प्रखर भट्टीत आम्ही आमची जीवने तापवून आटवून पोलादाचा घट्टपणा प्रयत्नपूर्वक त्यांना प्राप्त करून दिलेला आहे. आता ही जागा आम्ही कधीकाळी सोडलीच तर आमच चित्त जेथे रमेल अशा एक-दोनच जागा आहेत-टॉलस्टॉयने जेथे कालक्रमण केली ते यास्नाया पोल्याना जेथून जवळ असेल असे एखादे रशियातील ठिकाण किंवा अमेरिकेत, थोरो जेथे एकांत चितनात रंगून जात असे त्या वॉल्डनच्या सरोवराकाठी कुठेतरी. नाहीतर 'आम्ही येथले तुम्ही तेथले- '

नवे वर्ष उजाडले. धार कमी नव्हती; पण धारा जरा वेगळी वाहू लागली स्वामिजी कवी होते. दर अंकात निसर्गवर्णनपर एखादी कविता हमखास प्रसिद्ध होऊ लागली. हिमालयीन वास्तव्याच्या आठवणी निघू लागल्या. कांग्रा खोऱ्यातील वन. मीने दिलेला आनंद दाटून काव्यरूपाने वर उसळू लागला. ग्रहनक्षत्रांचे वेड लागले. आश्रमातील हिरवी लवलव कोवळे कोवळे भाव जागृत करू लागली. नांगरावरचा मजबूत हात मोरपंखांशी खेळू लागला. अध्यात्माचा राजहंस मानससरोवरी कमलदलांच्या आस्वादासाठी उत्सुक झाला. तासन् तास आकाशाचा वेध घ्यावा, धरित्रीच्या मऊ मुलायम स्पर्शासाठी अधीर व्हावे, असे घडू लागले. नवे विषय, नवे चितन, नव्या कल्पना, नवी झेप-

सुरुवातीला अंकावर फक्त एकच बिरुद असे- A Rural Fortnightly. दोन-चार अंक उलटल्यावर बिरुदे वाढली--

A Bombshell Over Drowsy Intelligentsia A Crusader Against Corruption Pioneer In Socio-Political Research A Debut In Rural Journalism

झोपलेल्या बुद्धिमंतावरचा बाँबवर्षाव, भ्रष्टाचारविरोधी झुंजार आघाडी, सामाजिक राजकीय संशोधनाचा नवा प्रयत्न, ग्रामीण पत्रकारितेचा शुभारंभ...

आणखीएक बिरुद होते, थोडेसे कोप-यात लपलेले. कुणी त्याकडे विशेषसे लक्ष दिलेले नव्हते-A Forum For Research in 'Ideo' Physics. हे शेवटचे प्रकरण इतकी वर्षे फारसे डोकवत नव्हते. यावर्षी मात्र ते एकदम उफाळून वर आले. बहुधा हा शब्दही स्वामिजींनीच हुडकून काढलेला असावा ! प्रत्येक व्यक्तीभोवती त्याच्या जन्मापासूनच एक प्रकाशवलय असते, या वलयाचा शोध घेतला गेला तर व्यक्तिजीवनाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते, असे काहीसे है प्रकरण होते. मग सुरू झाला हा प्रकाशवलयाचा शोध. एक विज्ञानक्षेत्राला अती बुद्धिमान तरुण विद्यार्थीही त्यांना सहकारी म्हणून मिळाला. दोघांनी या ‘Ideo Physics वर जी काही धमाल उडवून दिली आहे म्हणता ! वाचता वाचता पुरेवाट! सगळे प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्र बाहेर पडले. पाश्चात्य ज्योतिषाचा तौलनिक अभ्यास सुरू झाला. तिबेटी लामांच्या साक्षी निघाल्या. अध्यात्माला जागा जास्त मिळू लागली. खगोलशास्त्रात मंडळी घुसली. वाचक स्तिमित होऊन विचारू लागले, स्वामिजी कुठून निघाले, चालले आहेत कुठे ?

स्वामिजी चालले होते तिथेच, जिथे सर्वांनीच जायचे असते; पण कुणीच सहसा फिरकत नसते तिकडे. जीवनाच्या भौतिकतेची सीमा ओलांडल्यावरच दिसू शकणा-या आत्मज्ञानाच्या धवल शिखरांकडे, परंधामाकडे. या परंधामाचा शोध आपल्या बुद्धिप्रधान व्यक्तिमत्वाला साजेशा मार्गाने स्वामिजी घेत होते इतकेच. यात बुवाबाजी, मंत्रतंत्रगिरी वगैरे काही नव्हती. होती ती अनिवार ज्ञानतृष्णा, नव्या नव्या अनुभवांसाठी सदा भुकेलेले असलेले एक विलक्षण समृद्ध मन. पाच एप्रिलची रात्र.

दिवसभराची कामे संपवून झोपडीच्या बाहेरच्या मोकळ्या पडवीवर स्वामिजी कंदिलाच्या प्रकाशात काहीतरी लिहीत बसले असावेत.

शेजारच्या झोपडीत गोविंद रेड्डी निजण्याच्या तयारीत होते. येथे बहुधा आश्रमात कायम वास्तव्य करण्याच्या विचाराने ते आलेले असावेत. स्वामिजीही कदाचित रेड्डींवर सर्व जबाबदारी सोपवून मोकळे होण्याच्या विचारात असतील. काय उभयतांचे ठरले होते, ठरत होते याची इतरांना काहीच कल्पना नव्हती.

रेड्डींच्या झोपडीजवळ अचानक पिस्तुलाचे काही आवाज झाले.

स्वामिजी उठत उठत विचारताहेत-रेड्डी, रेड्डी, क्या बात है !

इतक्यात हल्लेखोर समोर दिसलेच.

स्वामिजी चटकन् झोपडीत शिरले. त्यांनी आतून कडी लावून घेतली व म्हणतात की, त्यांनी झोपडीत असलेली एक जुनी तलवार हातात उचलली होती. झोपडीच दार बंद झाल्याचे पाहून हल्लेखोर बाजूच्या खिडकीकडे वळले.

लहानशा झोपडीत अडकलेला माणूस उघड्या खिडकीतून टिपायला कितीसा वेळ लागणार ! देहाची अक्षरशः चाळण झाली.

तो बलदंड पुरुष रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. झोपडीच्या भिंती उडालेल्या रक्त चिळकांड्यांनी माखून निघाल्या. कितीतरी वेळ तो निष्प्राण देह तसाच पडून होता.

–कारण तास-दोन तासांनी खारीचे गावकरी जमले. त्यानंतर पोलीस दोन-चार तासांनी अवतरले. पहाट उजाडली सगळे होईस्तोवर.

दुसऱ्या दिवशी सकाळी देह मरणोत्तर तपासणीसाठी बिजनौरला आणला गेला.

स्वामिजींच्या शवावर गोळ्यांच्या आणि छऱ्यांच्या अनेक खुणा आढळल्या.

कुणीच घटना प्रत्यक्ष पाहिलेली नाही. त्यामुळे अनेक अफवा, तर्कवितर्क.

पोलिसांनी वृत्तपत्रांसमोर ठेवलेली कथा अशी : स्वामिजी दोन-चार गावकऱ्यांबरोबर पडवीत बोलत बसले होते. काही पिस्तुलधारी इसम आले. त्यांनी या गावक यांना निघून जायला सांगितले. गावकरी भीतीने दूर गेले; पण फार दूर नाही. ते आश्रमात काय घडते आहे ते थोडेफार पाहू शकत होते. हल्लेखोरांनी स्वामिजींना प्रथम ठार केले. नंतर ते रेडींच्या झोपडीकडे वळले. एकूण तीनजण होते. आश्रमाजवळून लपून हा सर्व प्रकार पहात असलेल्या गावकऱ्यांपैकी एकाने तिघांनाही ओळखले. दोघांना ताबडतोब अटकही झाली आहे. तिसराही हातात आहे...वगैरे खारी गावाच्या लोकांनी सांगितलेली कथा अशी : बंदुकीचे आवाज आले म्हणून आम्ही दहा-पाच जण धावलो. प्रथम वाटले की, आसपास दरोडा पडला असावा; कारण गोपालपूरला २-४ दिवसांपूर्वी एक दरोडा पडलेला होता; पण आवाज आश्रमाच्या बाजूने आला. म्हणून काहीजण तिकडे धावले. भीतीमुळे फार पुढे कुणीच गेले नाही. तासादोनतासांनंतर भीड थोडी चेपली, एक-दोन पुढे गेले. आश्रमात जाऊन पहातात तो स्वामिजींचा खून झालेला होता. गोविंद रेड्डी अर्धवट मृतावस्थेत आढळले. त्यानंतर थोड्या वेळाने रेड्डींचा प्राण गेला.

निकटवर्तीय जाणकारांनी नंतर एकेक दुवा जुळवत जुळवत तयार केलेले चित्र असे : हल्लेखोरे भाडोत्री होते. स्वामिजींना त्यांनी पाहिलेलेही नव्हते. चुकून त्यांनी प्रथम रेड्डीवरच हल्ला केला. नंतर स्वामिजी जेव्हा रेड्डी, रेड्डी म्हणून ओरडले तेव्हा त्यांनी आपला मोर्चा स्वामिजींकडे वळवला. रेड्डींना तसेच अर्धवट जखमी स्थितीत त्यांनी सोडून दिले. कारण त्यांना फक्त स्वामिजींचा बळी घ्यायचा होता.

यातले काय खरे, काय खोटे, सत्य कोणते, कल्पित किती हे ठरविणे कठीण आहे. भलतेच दोन-चार लोक गुन्हेगार म्हणून अडकवून मूळ कट दडपण्याचा पोलिसांचा कावा आहे असा संशय बिजनौरमध्ये उघडपणे व्यक्त केला जात आहे, हे मात्र खरे. पोलिसांनी हे प्रकरण घिसाडघाईने मिटवून सत्य दडव नये यासाठी स्वामिजींचे चहाते येथे प्रयत्नशील आहेत. राज्यपांलापर्यंत मंडळी पोचली आहेत, पोलिसांकडून चौकशीचे काम काढन घेऊन गप्तचर विभागाकडे हे प्रकरण सोपविले गेले आहे. कट असावा, मारेकरी भाडोत्री असावेत ही शक्यता अधिक दिसते. पण कटाच सूत्रधार तरी कोण असावेत ?

एक प्रवाद असा : एका सरकारी अधिकाऱ्याला लाच घेताना स्वामिजींनी नुकताच पुराव्यानिशी अडकवला होता. लवकरच हे प्रकरण कोर्टासमोर उपस्थित होणार होते. त्याआधी स्वामिजींचा काटा दूर करणे त्याला अवश्य वाटले असावे.

आणखी एक स्थानिक तर्क : स्वामिजींनी खारीतील धर्माध मुसलमानांविरुद्ध पुन्हा नवी उचल घेतलेली होती. चिडलेल्या या गोटाचे हे कृत्य.

स्वामिजी शेतमजुरांच्या हक्कांसाठी, त्यांना किमान वेतन दिले जावे, कामावर असताना इजा-दुखापत-अपघात झाल्यास त्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी झगडत होते. हिंदू-मुस्लिम या दोन्ही वर्तुळातील जमीनदार-श्रीमंत शेतकरी गटाचा याला तीव्र विरोध होता. या गटाने स्वामिजींना दूर केले-असाही एक उलगडा !

पोलीस खातेही स्वामिजींना पाण्यात पहात होतेच. या खात्याचेच हे कृत्य कशावरून नसावे ? - हाही एक व्यक्त केला जात असलेला संशय. चौकशी नीट झाली तरच सत्य काय आहे ते बाहेर येणार. तोवर सगळाच तर्कवितर्क, सगळाच कल्पनाविलास.

पण चौकशी तरी नीट होईल का ? तेथील थंडपणा, बेफिकिरी, विरोधी शक्तींची दडपणे, परस्पर संगनमते पहाता याची तरी शाश्वती कशी देणार ?

दिल्लीच्या स्टेट बँकेतील साठ लाखाच्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास, गुन्हेगाराला शिक्षा आणि चौकशी अधिकाऱ्यांना बढती, हे सर्व या देशात अठ्ठेचाळीस तासाच्या आत घडू शकते.

पण विद्युत्गतीचे हे न्यायदान दिल्लीच्या शहेनशहांसाठी, नबाबांसाठी !

स्वामी सच्चिदानंद आणि गोविंद रेड्डी हे कोण यःकश्चित कार्यकर्ते ?

असतील लोकसेवक, क्रांतिकारक, समतेच्या यज्ञकुंडात आपल्या अस्थिअस्थि, तंतूतंतू समर्पित करणारे कुणी दधिची !

पण त्यांची आज गरजच काय ?


*


५ जून १९७१