Jump to content

श्यामची आई/रात्र चौदावी

विकिस्रोत कडून

श्रीखंडाच्या वड्या

आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत. आईचा पाक कधी बिघडत नसे. वड्या खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या. त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारीपाजारी बोलावीत असत व आईही आनंदाने जात असे. दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद.

पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती. पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती. वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणावयास लावी. एक दिवस आई मला रागे भरली होती. त्या वेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते. वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे.

त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या, "श्यामची आई! वेणू परवा सासरी जाणार. तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणत्ये. तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी? तुम्ही कशा छान करता! तिच्या सासरी पाठवावयाच्या आहेत, तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे आपले." माझी आई म्हणाली, "येईन हो. वेणू परवाच का जाणार? मला वाटले होते की, राहील संक्रांतीपर्यंत. मलासुद्धा तिची करमणूक होती. यायची, गाणी म्हणून दाखवायची." पार्वतीबाई म्हणाल्या, "तिच्या सासरचे पत्र आले आहे, पाठवून द्या म्हणून. मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे! आली चार दिवस, पुष्कळ झाले. त्या कृष्णीला सासरची माणसे दोन वर्षे झाली, तरी माहेरी पाठवीत नाहीत. तिची आई त्या दिवशी रडली हो. त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना? मग या हं उद्या. वेणूला तुम्हांला बोलवायला पाठवीन. जात्ये मी." आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या. दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे झाली, परंतु आईला बरे वाटत नव्हते. उष्टी-खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली. मी आईला विचारले, "आई, निजलीसशी?" "श्याम! अंग दुखते आहे. जरा चेपतोस का?" आई म्हणाली. मी आईचे अंग चेपू लागलो. आईचे अंग कढत झाले होते. तिचे कपाळ मनस्वी दुखत होते. मी मग बाहेर खेळावयास गेलो. इकडे वेणू आईला बोलवायला आली. आई निजली होती. "येता ना श्यामची आई, आई तुमची वाट पाहते आहे." वेणू गोड वाणीने म्हणाली. आई उठली. आई तिला म्हणाली, "जरा पडले, तो डोळा लागला. मी विसरल्ये नव्हत्ये. आता येणारच होत्ये. चल." आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली. निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या. मी खेळून घरी आलो तो आई नाही. मी आईला शोधू लागलो. शेवटी वेणूताईकडे गेलो. मला अंगणात पाहताच, "काय, रे श्याम! आईला पाहावयास आलास वाटते? ये, तुझी आई माझ्यासाठी वड्या करिते आहे. मी उद्या सासरी जाणार आहे, श्याम." वेणू मला बोलली. मी म्हटले, "जाणार? मग माझे डोळे कोण पुसणार? आई रागावली, तर माझी बाजू कोण घेणार?" मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले. "ये श्याम! आपण केशराची पूड करू. तू ते वेलदोडे नीस व त्याचे दाणे काढ." वेणूच्या कामात मी मदत करू लागलो. वेणूने केशर खलले व मी सहाणेवर वेलदोड्याची पूड केली. "श्याम! कशाला रे आलास?" आईने मला विचारले. आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले, "मी काही वड्यांसाठी नाही आलो. वेणूताई! मी हावरा आहे का ग? त्या दिवशी तू मला खाऊ दिलास. मी मागितला होता का?" वेणू म्हणाली, "श्याम! तू चांगला आहेस. श्यामची आई! श्यामला रागे भरत जाऊ नका." आई म्हणाली, "वेण्ये! अगं, मला का माया नाही? एखादे वेळेस रागावते. पण त्याच्या बऱ्यासाठीच. श्यामला जगाने नावे ठेवू नयेत, म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला. तो चांगला आहे. परंतु आणखी चांगला व्हावा, असे मला वाटते. पार्वतीबाई, पाक झाला हो. पाहा, गोळी झाली." ताटात वड्या थापण्यात आल्या. आई केळीच्या पानाने भराभर थापीत होती. पाच मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली, "पार्वतीबाई, थोड्या वेळाने वड्या काढून घ्या, मी आता जाते." वेणू म्हणाली, "थांबा ना थोडा वेळ. तुमच्या हाताने सारे करून जा." आईला नाही म्हणवेना. थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढल्या. कशा सुंदर झाल्या होत्या! पार्वतीकाकूंनी त्या डब्यात भरल्या. वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली. वेणूची आई म्हणाली, "श्याम, हे ताट खरवडून खा. घे." मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरवडून खाल्ले. पार्वतीबाईंनी आईच्या हातात चार वड्या ठेविल्या व आई कुंकू लावून घरी गेली. मी वेणूकडेच बसलो होतो. "श्याम! तुझे सद्र्याचे बटण तुटले आहे वाटते. सदरा काढून दे म्हणजे नीट लावून देत्ये." वेणू म्हणाली. मी वेणूताईला सदरा काढून दिला. तिने फणेरे काढले. बायका सुईदोरा वगैरे ज्या चंचीसारख्या पिशवीत ठेवतात, त्याला कोकणात फणेरे म्हणतात. वेणूताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते, तेथेही शिवले. मी सदरा अंगात घातला. वेणूताई म्हणाली, "श्याम! चल, गुलबाक्षीची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ." आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो. माझ्याबरोबर वेणूही आली होती. "श्यामची आई!" वेणूने हाक मारली. परंतु आई कोठे होती? ती विहिरीवर गेली होती, का गोठ्यात होती? ती अंथरुणावर होती. आम्ही एकदम आईजवळ आलो. वेणू म्हणाली, "निजल्यातशा? बरे नाही वाटत का? चुलीजवळ बसून त्रास झाला का?" वेणूने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तो चटका बसला. "श्यामची आई! बराच आला आहे हो ताप!" ती खिन्नपणे म्हणाली. मी म्हटले, "वेणूताई! आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते. ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपीत होतो." वेणूने विचारले, "मी तुम्हांस बोलावण्यास आले होते तेव्हा तुम्हांला बरे नव्हते वाटत का? म्हणून का तुम्ही पडला होतात? मला काय माहीत? तुम्ही बोललासुद्धा नाही. श्यामची आई! अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात?" आई म्हणाली, "वेणू! अगं, त्या वेळेस काही फार ताप नव्हता हो. अंग जरा कणकण करीत होते एवढेच. श्याम! जा, बाळ, दिवा लाव, तिन्हीसांजा झाल्या." मी दिवा लावला व देवातुळशीला दाखविला आणि आईजवळ येऊन बसलो. वेणूला वाईट वाटत होते. ती गहिवरून म्हणाली, "श्यामची आई! तुम्ही अंगात ताप असता वड्या करावयास आलात म्हणून हा ताप वाढला. नसत्या वड्या झाल्या तर नसत्या. आईने कशा तरी केल्या असत्या. प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत?" माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली, "अगं, अशा एवढ्याशा तापाने काय होते? वेणू, आम्हां बायकांना त्याचे काही वाटत नाही. अंगात ताप फणफणत असावा, कपाळ दुखत असावे, तरी धुण्याची मोट घेऊन ती आम्ही धुऊन आणतो. दहा माणसांचा स्वयंपाक करितो. असे मनाला लावून नको घेऊ. अमळशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईन. जा आता तू घरी. आई तुझी वाट पाहत असेल." वेणू आईजवळ बसली. ती जाईना. मी वेणूस म्हटले, "वेणूताई! त्या फुलांची माळ करतेस? आईला ताप आला आहे. तूच कर." वेणूताईने माळ केली. वेणू आईला म्हणाली, "श्यामची आई! माझ्यासाठी हा तुम्हांला त्रास. हा ताप." आई म्हणाली, "वेण्ये, वेड्यासारखे काय बोलतेस? तू मला परकी का आहेस? जशी माझी चंद्रा, तशीच तू. वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेविली असती, तर तुला किती वाईट वाटले असते? माहेरच्या माणसांस नावे ठेविलेली ऐकून तुझ्या डोळ्यांना पाणी आले असते. वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत, म्हणून मी आल्ये. पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी. त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोसली, म्हणून काय झाले? तुला श्याम परका वाटत नाही, तशीच मला तू वाटत नाहीस. मला त्रास का झाला? केवढे समाधान वाटते आहे मला! वड्या करायला आल्ये नसते, तर मनाला सारखी रुखरुख लागली असती. जा हो आता घरी. मी सकाळी येईन. रात्री घाम येऊन ताप निघेल. सकाळी मोकळी होईन." वेणूने मला जवळ घेतले व ती म्हणाली, "श्याम! चल तू आमच्याकडे. आईने भाजून चवळ्या केल्या आहेत त्या पडघुलीभर तुझ्याजवळ देत्ये. मग तुझ्या आईने नुसता भात केला, म्हणजे झाले. नाही तर मी भात ठेवूनच जाते." माझी आई म्हणाली, "वेण्ये! अग श्याम ठेवील भात, तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले." परंतु वेणूने ऐकले नाही. तिने विस्तव पेटविला, तांदूळ घेऊन ओवरा धुतला व आधण येताच भात ठेवून निघाली. तिच्याबरोबर मीही गेलो. मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली. माझे डोळे भरून आले होते. आई म्हणाली, "श्याम! काय झाले?" मी म्हटले, "वेणू म्हणाली, 'श्याम! तुझी आई फार थोर आहे. तू तिचे ऐकत जा. तुझे भाग्य मोठे, म्हणून अशी आई तुला मिळाली." असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरविला व मला एकदम रडू आले ते मला अजून आवरत नाही." "जा बाळ! भात झाला असेल, तर उतरून ठेव; नाही तर खालून ओढेल." आईने हळूच सांगितले व मी भात उतरून ठेवला. दुसऱ्या दिवशी वेणूताई सासरी गेली. आम्हां सर्वांना वाईट वाटले. त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप आठवतात. वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या. वेणूसुद्धा जगली नाही; परंतु ते प्रेम अजून आहे. ते प्रेम अमर आहे. माणसे मरतात; परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.