शोध अकराव्या दिशेचा/प्रकरण १

विकिस्रोत कडून
१.





 १९७२ चे दिवस. गेल्या तीन वर्षात आकाशात एकही सावळा ढग फिरकला नव्हता. पंचमीचे झोके आभाळाला साद घालीनासे झाले होते. गाई बैलांचे नांदते गोठे शेणाविना भुंड्याबुच्या गळ्यासारखे उदासपणे उभे होते. पूर्वेकडच्या परळीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर जैसपैस पसरलेले ते महाविद्यालय. महाविद्यालयाच्या गरीब विद्यार्थी वसतीगृहाला लगटून एक नैसर्गिक तळे. तळ्याच्या पल्याड ग्रंथालय. हजारो पुस्तकांनी बहरलेले. वाचनकक्षात विद्यार्थ्याची जा ये. प्राध्यापकांचा वाचनकक्ष संदर्भ ग्रंथांनी ओतप्रोत भरलेला. त्या महाविद्यालयात अनुराधा अध्यापन करते.
 ग्रंथालयासमोरच्या व्हरांड्यात उभी राहून रोजच्या प्रमाणे आजही ती परळीकडे जाणारे गुरांचे कळप पहातेय. हाडांच्या सांगाड्यावर फक्त कातडीचे विसविशित कांबळे पांघरलेय असे वाटावे, अशी हजारो… नव्हे लाखो जनावरे दिवसरात्र या समोरच्या रस्त्यावरून गेली दोन वर्षे लडखडत रस्ता मागे ढकलीत पुढे जात असतात. काही अंतर चालून गेल्यावर त्यांच्या दिशा बदलतील. पण सर्वांचे पोचण्याचे ठिकाण, नशीबाचा थांबा एकच आहे. स्लॉटर हाऊस …. कत्तलखाना.
 ग्रंथालयासमोरच्या व्हरांड्यात उभी राहून रोजच्या प्रमाणे आजही ती गुंराचे कळप पहातेय. तिची नजर आभाळाकडे गेली. निरभ्र, निस्तेज कोरडं फटफटीत आभाळ. कोऱ्या करकरीत कपाळासारखं. उदासवाणं!
 …काळ्याभोर ढगांच्या खिल्लारांचे बलदंड थवे, एकमेकांना ढुशा देत मनमानेल तसे चौखुर धावणारे, गेल्या तीनचार वर्षात कुठे हरवले आहेत देव जाणे! ते धावणारं सावळं आभाळ, ढगांचा गडगडाट… विजांचे भयचकित करणारे तांडवनृत्य आणि मग गंधवती धरतीला सर्वागांनी भेटणारा असोशी पाऊस… कुठे गायब झाला तो मातीचा वेदून टाकणारा गंध?... मेहताब मामूने वाजवलेल्या टोलाने अनू भानावर आली. तिच्या लक्षात आले की तिने मस्टरवर… प्राध्यापकांच्या हजेरी वहीवर सही ठोकलेली नाही. ती वेगाने स्टाफरूमकडे गेली, मस्टरवर सही केली आणि घाईघाईने बी.ए.तृतीय वर्षाच्या वर्गात शिरली. डोळ्यासमोर कवितेच्या ओळी फिरु लागल्या.

घिरघिरत्या घारीच्या
पंखांच्या सावल्या
दुपारच्या पारी
मुक्या ढोरांसभोवार
विक्राळ पंखांची
पंखजड गिधाडं
सुन्नाट दुपारी ....
डोळ्यात उन्हाचे
भयाण कोरडेपण
फाल्गुन काळी
निरभ्र
मातीचे सौभाग्य लोपले
कोरड्या कपाळी.

 "मॅडम, मॅडम".... मुलांच्या कलकलाटाने ती भानावर आली. सात आठ मुलं उठून उभी राहिली होती. त्यांच्या डोळ्यात अस्वस्थ काहूर. सांगायचंय पण कसं सांगावं, असा भाव. क्षणभर तिलाही कळेना काय झालंय ते.
 "कंटाळा आला असेल, मन कवितेत शिरत नसेल तर वर्गाच्या बाहेर जा. 'माझ्या तासाला याच' असं आवतण दिलं नव्हतं मी." ती वैतागाने तट्कन बोलली. एवढ्यात सुनीता धिटाईने म्हणाली,
 "मॅडम तुम्ही वेगळीच कविता शिकवीत आहात.... न पडणाऱ्या पावसाची. भेगाळलेल्या माळरानाची" तिने दचकून पुस्तकात पाहिले. त्यावर ओळी होत्या.

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे....

 त्या ओळी वाचून तिचे डोळे भरून आले. मुलांवर खेकसल्यामुळे मन खजिल झाले.
 "माफ करा, मनात घोळणारी कविताच नकळत मी तुमच्या समोर उलगडू लागले...."
 "मॅडम, तीच कविता शिकवा ना. चालेल आम्हाला. ही कविता उद्या वाचू. प्लीज… नाही तरी ही कविता शिकवलीय." मुलांनी तिला मध्येच अडवित विनंती केली. पण शिकवण्यात मन लागत नव्हतं.
 "नको. आज थांबूया इथेच.... चालेल ना?" असे म्हणत तिने पुस्तक मिटवून ठेवले. आणि ती वर्गाबाहेर आली. बाहेर आल्यावर नेमके कुठे जावे हे तिला कळेना स्टाफरुममध्ये जावेसे वाटेना. आणि घरी तरी कोण होते? महाविद्यालया पल्याडच्या तळ्याकडे ती वळली, तळ्यात पाणी कुठाय पण? अेरवी तळ्यावर घनदाट फांद्यापांनाची ऐसपैस पाखर घालणारे वडाचे रूंदबंद झाड आज एकाकी उभे आहे. तसल्या उन्हाच्या कहरात बेशरमीच्या झुडपांची जांभुळ्या उदास फुलांची गजबज मात्र काठाने उभी आहे. कोरड्या जमिनीवर तगून उभी असलेली झुडपं पाहून तिला हसू आले नि अमीनाची नि तिच्या लाडक्या तत्वज्ञानाची आठवण आली. अमिना, ममदू रिक्षावाल्याची बायको. चार कच्च्या बच्च्यांची अम्मी. अनूला नोकरी लागल्यावर वकील वसाहतीतली ही बरी जागा घेतली. शेजारच्या मोकळ्या जागेत ममदू अमीनाची झोपडी होती. ममदू दारु नि रिक्षा दोन्हीत तरबेज. दर दोन दिवसांनी पैशासाठी भांडणे होत. अमीनाला माराचा रोजगार दोन दिवसाआड मिळेच. मग लेकरं घेऊन ती ही गांधीपुरा झोपडपट्टीत बापाकडे जाई आणि पुन्हा चार दिवसांनी लेकरांची, तिची वर्दळ सुरु होई.
 "कधी आलीस अमीना?" असे अनूने विचारले की तिचे उत्तर ठरलेले असे.
 "हम औरतां जैसे बेशरमी के झाडॉ. कितना भी पीटो, मारो, पेटमें भाकरका टुकडा हो ना हो. फिरभी कस्ट करती है. बच्चो के लिये जीती है. गटरके पानी जैसा
उनका जीना. फिरभी हसती है, रोते रोते खाना पकाती है, आदमीके साथ सोती है, बच्चे पैदा करती है, क्या करे? अल्लाने रखा वैसे रहेना. ये झाडाभी वैसीच. गंदे पानीके बाजूमे उगनेवाली. पानी हो ना हो फिरभी जामुने रंग के फूलोंमे लदी. जैसे की, हम भी रोते रोते सपने सजाती है....
 है ना?...."
 गेल्या वर्षी ममदू गांधीपुरा झोपडपट्टीत रहायला गेला. पण अमीनाने मात्र मनात घर बांधलेय. अनूच्या नजरेसमोर अगदी बारकुडी खोल डोळ्यांची अमीना उभी राहिली.
 ...भवताली दूरवर पसरलेला पिवळट करडा माळ, नजर थके पर्यंत. आणि अनूला एकदम थकल्यासारखे झाले. फक्त कपभर चहा पिऊन ती सकाळच्या सव्वासातच्या तासाला महाविद्यालयात आली होती. श्रीनाथ काल सकाळीच डोंगरातल्या खेड्यात गेलाय. आज दुपारपर्यंत येईल. तो नसला की एकटीसाठी चारीठाव स्वैपाक करायचा कंटाळा येतो. शेजारच्या सुधावहिनींनी संध्याकाळी दोन मेथीची थालिपिठं दिली होती. मनूदादा ऑफिसातून घरी येतात तेव्हा त्यांना रोज वेगवेगळे ताजे खाणे लागते आणि सुधावहिनी हौशीने नवनवे पदार्थ करीत असतात. त्यांच्या हाताला खमंग चव आहे. संध्याकाळी खाल्लेली थालिपिठं केव्हाच पोटात जिरून गेली होती आणि आता मात्र पोटात भुकेचा कडाका उठला होता. अनूचे पाय घराच्या दिशेने वळले. घर तरी कुठे जवळ होते?
 पहाता पहाता जयवंती नदीचा पुल आला. नदीच्या अल्याडच्या कडेला गुलमोहोर उभा आहे. तर पल्याड शिरिष, गुलमोहोर पानगळीने सुस्तावला आहे. निष्पर्ण वृक्षावरची एखादीच लालमपरी डोळे किल्किले करून पाहते आहे. शिरिषावर या दिवसांत पिवळसर बिस्किटी रंगाच्या लांबोड्या शेंगाचे खुळखुळे वाजत असतात. लिंबवृक्षांवरचे चांदणी फुलोर दिसेनासेच झालेत. शिरिषफुलांचा लहरता मधुर गंध संध्याकाळी वाऱ्याच्या झुळकीबरोबर येऊन नाकात हुळहुळायला लागला की समजावं, वसंतऋतु अंगणात उभाय. पण गेल्या तीन-चार वर्षात वसंतही हरवला आहे. ऐन फेब्रुवारी… मार्च मध्येच उन्हाचे गरम चटके जाणवू लागतात. सकाळी सातलाच उन्हें डोळ्यावर येऊ लागतात… अशा उन्हाच्या तडाख्यातही महाविद्यालयातील मुले भरभरून वर्गात येत असतात. परिक्षा अगदी तोंडावर आलेल्या आणि पंधरा मार्च, महाविद्यालयाच्या शेवटचा दिवसही जवळ आलेला. अशा या महत्वाच्या दिवसात
आपण खुळ्यासारखी दुसरीच कविता शिकवायला लागलो याची खंत तिला आरपार बोचून गेली.
 उन्हें बोरीबाभळीच्या काट्यांगत टोचायला लागली होती. मग पावलंही भरभर चालायला लागली. कुलूप उघडून ती आत आली. आईच्या अक्षरातला अंतर्देशीयवरचा पत्ता पाहून थकवा कुठच्या कुठे पळाला. घाईघाईने तिने पत्र फोडले. त्या घाईत पत्राचा एक कोपरा फाटलाच!
 "प्रिय अनू,
 तुझे पत्र मिळाले, त्यातील, एकटेपणाचा कंटाळा येतो हे वाक्य वाचून आश्चर्य वाटले. श्रीचे मित्र, तुझी पुस्तकं, यात कायम बुडालेली असतेस. मी आले तर निवांतपणी गप्पा मारायला वेळ नसतो तुला. आणि आता ही तक्रार? मी तुझ्या वयात होते तेव्हा, तुम्ही आठनऊ वर्षाचे होता. सतराव्या वर्षी लग्न आणि आठराव्यात आईपण. मुलं व्हायला तेव्हा अक्कल कुठे लागायची? नाही चालवायचो आम्ही. आता लग्नच बाविशी नंतर… मग लेकरू व्हावं की नाही याचा विचार. मग एखाद दुसरं मूल. माझे जुने दिवस आठवले. तुझे बाबा पेशन्टस् मध्ये बुडालेले. मग मीही विणकाम भरतकामात स्वतःला गुंतवून घेतलं. घरादाराचे बाळंतविडे, शाली, स्वेटर्स, कर्नाटकी कशिद्याच्या साड्या भरून देणे. यातच गुंतून गेले. माझ्या काळात नववीत गेले की शाळा बंद करीत. मग पुस्तकात तरी मन कसं रमावं !
 तेव्हाचा एकाकीपणा आज तुझ्या पत्रातल्या कुरकुरीमुळे जाणवला. आपण एकाकी आहोत हे कळायला… जाणवयाला सुध्दा जाणीव लागते. डोकं लागतं. ते मला नव्हतं तेव्हा.
 आणि आता तर तुझ्या बछड्यामागे धावतांना दमछाक होते माझी. तोंड चांगलंच फुटलंय आता. यांना आबूज्जा म्हणतो. आणि मला ज्जीज्जी. चटई पसरुन त्यावर कांदे-बटाटे एकत्र करून ठेवायचे. व्यवस्थित वेगवेगळे करून टोपल्यामध्ये भरतो. दातुर्ड्या सात आठ आल्या आहेत. आम्ही मात्र छान गुंतलो आहोत. तुझा पीएच.डी.चा अभ्यास काय म्हणतो? इकडे कधी येते आहेस? सुट्यामध्ये चार दिवस निवांतपणी ये. आम्ही मजेत. ऊन खूप ना? त्यात गेल्या तीन चार वर्षात तुमच्या भागात पाऊस नाही. श्रीनाथ कसा आहे? अधूनमधून तरी कोर्टात जातो की नाही? त्याला आशिर्वाद. अनिल सध्या काश्मिरच्या पुढे लडाख फ्रंटवर आहे. तिथून बंगाल नाहीतर पंजाबला बदली होईल. नंतरच लग्नाचे पाहू असे लिहिले आहे. स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दे. ऑगस्ट पासून मोठी रजा घेतेस ना?
तुझी
आई.
 जनकच्या आठवणीनं अनूला अगदी आतून भरून आलं. वाटलं टेलिफोनच्या ध्वनिलहरीतून थेट जळगावमध्ये पोचावं. अगदी वाड्यात आणि जनकला गच्च मिठीत घ्याव… त्याच्या गुबऱ्या गालांचे खूपखूप पापे घ्यावेत. एवढ्यात श्री दार ढकलून आत आला. भूक लागलीय. झटपट पिठलं नि भाकरी कर. पोटात भुकेचा डोंब उसळलाय. अने दुसरी भूक पण लागलीय. अगदी सपाटून… तेव्हा" अनूच्या केसांचा लांबसडक शेपटा लाडाने ओढत तो म्हणाला. आणि आंघोळीसाठी न्हाणीत शिरला. अनू काहीशी वैतागली. भर दुपारी कसली 'दुसरी भूक?' तिने डबा लावला आणि कणिक मळायला घेतली.
 .............
 रात्र उलटून गेली होती. श्रीनाथच्या तृप्त होऊन शांतपणे झोपलेल्या निरामय चेहेऱ्याकडे अनू एकटक पहात होती. श्री म्हणतो, शरीरसुखातून माणसाला केवळ तृप्ती मिळत नाही तर उर्जा मिळते. काम करण्यात नवा उत्साह येतो… हुरूप येतो. मनाची सहजपणे एकाग्रता होते. पण ही उर्जा दोघांना मिळते का?... हा प्रश्न मनात येताच ती खुदकन स्वतःशीच हसली. हे तत्वज्ञान आजचं, लग्नाच्या आधी? तेव्हा तर लग्न न करण्याचा निश्चय होता. आणि कूस बदलून तिने परत डोळे मिटले.
 श्रीनाथला मधेच जाग आली तेव्हा अनू मंदपणे घोरत होती. "अने किती प्रेम आणि माया करतेस ग माझ्यावर! माझ्यासाठी इतक्या दूर, या वैराण भागात आलीस. माझ्यासारख्या फटींग माणसाशी एकरूप झालीस. माझ्या घरातील जुन्या… पारंपरिक विचाराची माणसं, रितीरिवाज. त्याच्यात सहजपणे स्वतःला मुरवून घेतलंस. घराच्या दोन वेळेची जबाबदारी स्वीकारलीस… हे सारं सहजपणे. कधी तरी खंत वाटते का गं मनाला?... अं?" अनुला जवळ घेत, तिच्या केसांवरून हात फिरवीत श्री बोलत होता. अनू गाढ झोपली होती.
 अनुराधाच्या स्वप्नात पुर्वीचे दिवस उभे राहत होते. ओहोटीचे पाणी मागे मागे जावे आणि समुद्रात बुडून गेलेली जमीन लख्खं दिसावी तसे.
 "मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा कलश भलेही यशवंतराव चव्हाणांनी आणला असल्याच्या घोषणा काँग्रेसवाले करीत असले तरी छातीवर गोळ्या झेलून हुतात्मा होणाऱ्या एकशेपाच जणांना आणि तुमच्या आमच्या सारख्या चळवळीत झोकून देणाऱ्यांना त्याचे श्रेय आहे. कुंपणावर बसलेल्यांचे कौतुक पुरे झाले!!" उदय
फाटक समाजवादी युवजन सभेच्या आठवडे बैठकीत अनेकांच्या मनातली ठुसठुस मोकळी करीत होता.
 "उदयदांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. हैद्राबाद संस्थानाच्या विभाजनाचा प्रश्न संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीशी नाळेने जोडलेला आहे. भाषावार प्रांत रचनेला मराठवाड्यातील नेत्यांनी सुरवातीपासून पाठिंबा दिला. तुमच्यानंतर एक वर्ष एक महिना दोन दिवसांनी आम्ही निजामाच्या दोनशे वर्षाच्या जोखडातून मुक्त झालो. निजामी राज्यात तेलगू, कन्नड, मराठी भाषिक प्रदेश होते. त्या तीनही भाषिकांचे सांस्कृतिक वेगळेपण होते. मराठवाडा महाराष्ट्रात विलीन व्हायला उत्सुक होता. प्रांत पुनर्रचना आयोगाला सादर केलेल्या निवेदनास आमच्या भाईंनी… गोविंदभाई श्रॉफ यांनी तयार केलेली पुरवणी जोडलेली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात, सत्याग्रहात मराठवाड्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. माझ्या खेडेवजा गावातून पंचवीस सत्याग्रही गेले होते. मी भलेही त्यावेळी आठवीत असेन पण लख्खं आठवतेय सारे.
 … तसं पाहिलं तर स्वातंत्र्य मिळाल्यापासून सामान्य माणसांनी ज्यात झोकून दिले असे किती लोकलढे झाले? आणि जेव्हा जनआंदोलन जोर पकडतं तेव्हा सरकारला गुढगे टेकावेच लागतात. मग ते सरकार आपलं असो की परक्या मुलखातलं पोर्तुगीज सरकार असो. गोवा आंदोलन आठवा.
 तेव्हा गुढगे टेकवतांनाही "मीच तुम्हाला हे मोठ्या मनाने दिले" ही राज्यकर्त्यांची भाषा. तर अमृत कलश कोणी आणला? यशवंतरावांनी!!! भंकस! आपली भूमिका मांडून श्रीनाथ खाली बसला.
 "यार, हा विषय संपवा… संयुक्त महाराष्ट्र मिळून वर्ष उलटून गेलयं. डॉ.बाबासाहेबांच्या 'ॲनिहिलेशन ऑफ कास्ट' वर १५ दिवसांनी चर्चा ठेवू. मी आणि श्री टिपण तयार करून आणतो. भाईंना चर्चेच्या समारोपासाठी बोलावू या. पुढच्या गुरुवारी सर्वांनी भजनाला यायचं! न येणाऱ्यांना दंड." कुमारने पुस्ती जोडली. लक्ष्मी रोडवरच्या कार्यालयातून जिना उतरून सगळे खाली आले. श्री ने घड्याळात पाहिले. सात वाजून गेले होते. अनूकडे पहात तो पुटपुटला, 'पळा लवकर, उद्या भेटू' आणि सायकलवर टांग मारून तो पसार झाला. अनूनेही सायकल लकडीपुलाच्या दिशेने वळवली.
 निशा सामंत समाजवादी युवजन सभेत नियमितपणे जाते. ती राज्यशास्त्रात
एम.ए.करते. तिची आई राष्ट्र सेवा दलात जाणारी तर वडील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते, ते गोवा मुक्ती संग्रामातही होते. निशा अनूची खास मैत्रिण… निशुदिदी अनूही तिच्याबरोबर 'सयुस'च्या बैठकींना जाते. पण अशात फारच नियमित जाते.
 …फर्ग्युसनच्या लेडिज् होस्टेलकडे जाणाऱ्या गेट मधून ती आत शिरली. साडेसात वाजून गेले होते. रेक्टर आपटे सर नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे बंगल्याच्या अंगणात खुर्ची टाकून बसले होते. त्यांनी एक फिरता कटाक्ष टाकून घड्याळ पाहिले. आठ वाजायला दहा मिनीटे कमी होती. अनूने समाधानाचा सुस्कारा टाकला.
 अनूच्या डोळ्यासमोर श्रीनाथची उंची, सडसडीत तीक्ष्ण नजरेची सावळी मुर्ती अशात नेहमीच येते. त्याचे दाट कुरुळे केस. ते डोळ्यावर येत म्हणून सतत ते मागे सारण्याची खास लकब. क्षणभर तिच्या मनात आले, आपल्याला साम्यवाद, समाजवाद, जातीविहीन समाज रचना वगैरत खरंच रस… इंटरेस्ट आहे का?... की श्रीला भेटण्यासाठी आपण जातो?.... अनूचे मन तिला विचारत होते. दिवस पळत होते. मैत्री अधिक अस्वस्थ करणारी पण हवीशी आणि घट्ट.
 अनुच्या आग्रहाखातर गेल्या वर्षी श्रीनाथ जळगावला दोन दिवस जाऊन आला होता. अैकलेली माणसं आणि प्रत्यक्ष अनुभवलेली माणसं यात खूपदा अंतर असते. पण इथे ते नव्हते. अनूचे बाबा दिलखुलास हसणारे आणि कोणत्याही विषयावर गप्पा मारणारे… अनूने जळगावला येण्याचा आग्रह करतांना त्यांची खासीयत सांगितली होती.
 'श्री, मी बारावीत होते. इभूना हे माझे नावडते विषय. मी त्यांच नाव 'इथे भुते नाचतात' असं ठेवल होत. इ-इतिहास बारावीला आडवा येईल. तर इ च्या नोटस् द्यायला चंदू होस्टेलवर आला नि तेव्हाच बाबाही मला भेटायला आले. तो गेल्यावर मी बाबांना घाईघाईने सांगून टाकले. बाबा चंद्या ना मला अगदी भावासारखा आहे… तेव्हा बाबा त्यांच्या खास शैलीत मोठ्यांदा हसले आणि मला लगेच म्हणाले, अनू, मित्र म्हणायला संकोचू नकोस. मित्र हा सखा असतो. आवडत्या पती वा प्रियकरापेक्षा समजून घेणारा असतो. ते नातंही खूप वेगळं ह्रदयस्थ असतं. श्रीकृष्ण द्रोपदीला 'सखी' म्हणत असे… तर श्री तू या सुट्टीत जळगावला… आमच्या 'जड़गांवले' येच" अनूने आग्रह केला. तेव्हा श्रीनाथने डोळे मिचकावित विचारले होते
 'सखा म्हणून येऊ की?'
 … ते आठवून अनू झोपेतही दिलखुलास हसली....
 'अने काय झालं? जागी आहेस ना?' श्रीनाथने तिला हलवून उठवले. तिने
क्षणभर डोळे उघडले. भोवताली पाहिले. पुन्हा हसली श्रीनाथचा हात घट्ट धरून पुटपुटली, 'झोपू दे ना रे' असे म्हणून पुन्हा कुस बदलून मंदपणे घोरू लागली.
 श्रीनाथ मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील मोमीनाबाद तालुक्याच्या एका लहानश्या खेड्यातला. मराठवाडा विभाग, त्यातील पाचही जिल्हे, विसाव्या शतकाची साठ वर्षे उलटून गेली तरी सर्वार्थाने मागास आहेत. याची त्याला नेहमी बोच असे आणि रागही. तो बोलतांना नेहमी मनातील खंत व्यक्त करत असे. "यार, आमच्या मराठवाड्यातले पाचही जिल्हे महाराष्ट्रात सामील होऊन बारा वर्षे उलटली तरीही शासन पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आम्हाला सावत्र मुलासारखी वागणूक देते. विकासाच्या नावाने आमच्या भागात कोणतीही कामे होत नाहीत. आमच्या भागातला दिडदोनशे एकराचा मालक असो वा छोटा शेतकरी, बलुतेदार, भुमीहीन मजूर. आम्हाला कोणीही वाली नाही. महाराष्ट्राच्या विकासापासून आम्ही शेकडो कोस दूर आहोत. निजामाने आमच्यावर अडीचशे वर्षे राज्य केले. पण रयतेसाठी त्याने काहीच केले नाही. शेवटच्या काही वर्षात रझाकारांचा धुमाकूळ तर एवढा वाढला की प्रत्येक वाड्यात मागच्या बाजूला एखादा अरूंद आड असे. रझाकारांची धाड आली तर लेकीसुनांना त्यात ढकलून दिले जाई."
 … मराठवाड्यात स्वातंत्र्याची पहाट १९४८ च्या १७ सप्टेंबरला उगवली. रझाकारांची धुमाकूळ घालण्याची क्रूर तऱ्हा, ग्रामीण भागावर असलेली त्यांची दहशत श्रीनाथने तो पाचसहा वर्षाचा असल्यापासून अनुभवली होती. त्याचे मोठे चुलतबंधू वकिलीच्या अभ्यासासाठी हैद्राबादला होते. तेथे नागनाथ परांजपे, राघवेंद्र देशपांडे, अनंत भालेराव, चारठाणकर बंधू यांचे सानिध्य लाभले. शिक्षणासोबतच नव्या पुरोगामी विचारांची पेरणी त्यांच्या मनात झाली. नव्या विचारांबद्दल विश्वासही निर्माण झाला. ते सुट्टयामध्ये गावी येत तेव्हा गावातील मित्रांना नवीनवी माहिती देत असत. त्यांनीच श्रीनाथच्या बाईला… त्यांच्या धाकटया काकीला स्वसंरक्षणासाठी बंदूक चालवायला शिकविले होते. कडक सोवळं ओवळं पाळणाऱ्या त्याच्या घरात बाईच्या पुढाकाराने गावातील गढीवरच्या देशमुखाच्या काकी, माळ्याच्या अन्साबाई अशा चारपाच जणी बंदूक चालवायला शिकल्या होत्या.
 पाचवीमध्ये मोमीनाबादच्या योगेश्वरी विद्यालयात शिकायला आल्यापासून श्रीनाथचे जगच बदलले. सुट्टीत गावाकडे आल्यावर बरोबरच्या अठरा पगड जातीच्या मित्रमंडळींना घेऊन पोहायला जाणं, एखाद्याच्या आमराईत जाऊन अंगतपंगत जमवणं, त्याला नव्याने कळलेली माहिती मित्रांना देण यात सुट्टी कशी जाई हे कळत नसे.
 तो गावातील मित्रांसोबत हिंडून आला की दारातच नानी हटकत असे.
 "शिऱ्या, देवळीतलं गोमुतर अंगावर शिंतडून घ्ये. आन् मंग घरात ये." आणि आंधळ्या नानीसाठी तो तिची आज्ञा पाळित असे.
 घरात श्रीनाथचे ताट तांब्या वाटी वेगळे होते. नववीत असल्यापासून नानीने हा फतवा काढला होता. घरात कडक सोवळ ओवळ नानी … आजी असेपर्यंत होत. मग हळू हळू कमी होत गेलं. तो नववीत असताना साधू गुरुजींनी 'आनंदभुवन' अगदी रंगून शिकवलं होत. तर ग.धों. गुरुजींनी मार्क्सचा सिध्दांत घोटून घोटून डोक्यात भरवला होता. पाटणकर गुरुजी 'बहिष्कृत भारत' या ग्रंथातील धडा शिकवतांना दलित समाजाची दुःखे समोर उभी करीत. किंबहुने गुरुजी साने गुरुजींच्या 'भारतीय संस्कृती' या पुस्तकातील एकेक पाठ मुलांना शाळा सुटल्यावर शिकवीत. या तासाला मात्र मुल दांडी मारीत नसत.
 श्रीनाथ परजातीच्या मुलांबरोबर जेवतो खातो हे सर्वांना माहित होते. वडिल विरोध करीत नसत. मोठा भाऊ श्रीकांत कॉलेजच्या पहिल्या वर्षाला नापास झाला. तो घरी बसला व शेतात गुंतला. पण जमीन कोरडवाहू, आषाढ बरसला तर तीळ, मूग, उडीद, हलकी जवार हाती येईल. घरातच बारकेसे दुकान टाकले होते ते वडिल पहात. श्रीकांत मोठा. धाकटा श्रीनाथ. तो मॅट्रीक नंतर पुण्यातच राहिला. धाकटा आणि हुशार. त्यामुळे घरची मंडळी त्याचा शब्द खाली पडू देत नसत. कॉलेजमध्ये मित्र त्याला चिडवत असत.
 "शिऱ्या लेका तू मड्डुभाई. पै पै जोडणारा, उद्या गावाकडच्या दुकानावर लोडाला टेकून बसणार नि आण्यानाण्यात बुडून जाणार. लेका त्या अनू पाठकवर कशाला रे लाईन मारतोस? तीही तुझ्या मागे मागे. तिला महागात पडेल बेट्या.' चंदू कधी गंभीरपणे छेडी.
 "बेट्या मी कोरड्या ठण्णं दुष्काळी, मागास भागातला. हजामतीला पाणी मिळायची मारामार. यार मी पुण्यात येऊन शिकलो नसतो. 'सयुस' नि सेवादलाची ओळख झाली नसती आणि राज्यशास्त्र व अर्थशास्त्राचा अभ्यास केला नसता, तर नक्कीच लोडाला टेकून पैसा पैसा जोडला असता.
 … हे खरंच की मला अनू खूप आवडते. तिचे खळी पाडित हसणारे गुबरे गाल. लांब सडक केस आणि गोरा रंग खूप मोह घालतो पण… ती कशी येणार माझ्या गावंढ्या गावात. पारंपरिक रिवाजात बुडलेलं माझ घर… त्यात ती कशी सामावणार? चंदू, सध्यातरी मी 'दूरस्थ प्रेमिक आहे'." श्रीनाथचे हे उत्तर चंदू, परागला पाठ झाले होते.
 जुने दिवस आठवीत श्रीनाथचा डोळा लागला होता.
 एल.एल.बी. च्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊन आल्यावर बाई काकाजींनी त्याच्या विवाहाचा विषय छेडला. त्यावेळी त्याने स्वच्छ शब्दांत सांगून टाकले.
 "काकाजी, मला लग्न करण्यात फारसा रस नाही. माझी वकिली अडल्यानडल्यांना न्याय मिळावा म्हणून असेल. मी इकडेच रहाणार आहे. सध्यातरी स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाचे काम करायचे ठरवले आहे. माझ्या विचारांशी जिचे विचार जुळतात. जी माझी आर्थिक बाजूही थोडीफार सांभाळीत अशी मैत्रीण पत्नी म्हणून हवी आहे. अशी मुलगी मिळाली तर ठिक अन्यथा मी सडा फटींग राहीन...."
 कान्तूदा, मला जमीन नको. आपल्या जमिनी नेहमीच तहानलेल्या.. भेगाळलेल्या तिची तहान कशी भागेल याचाच विचार माझ्या मनात सतत असतो. तुम्हीही जमिनीत खूप राबता. मला जमेल ती मदत जरून करीन मी.
 … पण जमीन विकायला मात्र माझा विरोध राहील आणि हा विषय पुन्हा नका छेडू मनासारखी जोडीदार सापडली तर आपणहून तुम्हाला सांगीन.
 त्यानंतर घरात हा विषय निघाला नाही.

 अनू एम.ए. च्या शेवटच्या वर्षाला असताना वडिलांनी स्थळ पाहण्यास सुरुवात केली. अनूच्या डोळ्यासमोर श्रीनाथहून वेगळी व्यक्ती जोडीदार म्हणून उभीच रहात नव्हती. अनूने आईजवळ मन मोकळे केले. अनूचे वडील नव्या वळणाचे. आर्थिक सुबत्तेत वाढलेली अनू या गावंढ्या परिसरात रमेल का, हा प्रश्न वडीलासमोर होता. लाडक्या अनूवर श्रीनाथ कोणतेच दडपण आणणार नाही ही एकच जमेची बाजू होती.
 अनूचा निर्धार पाहून डॉक्टर साहेबांनी लेकीच्या लग्नाला संमती दिली. १९६७ च्या उन्हाळ्यात काही मित्रमंडळी, सेवादल, समाजवादी, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते यांच्या साक्षीने अनुराधा पाठक आणि श्रीनाथ धानोरकर हे विवाहबध्द झाले. मोठा श्रीकांत त्याची पत्नी विमला, बाईने दिलेले गंठन आणि साडी घेऊन लग्नाला आले होते.
 श्रीनाथने वकीलीचा मांड परळी सारख्या खेड्याचा चेहेरा असलेल्या गावात टाकला. परळी हे रेल्वेचे जंक्शन. इथून परभणी परळी मार्गे हैद्राबादला जाणारी ब्रॉडगेजवरून धावणारी मराठवाड्यातील एकमेव मोठी गाडी जाई. मनमाड-औरंगाबाद मार्गे परभणीहून निजामाबाद मार्गे हैद्राबादला जाणारी लहान गाडी असे. अर्थात ही
निजामाची कृपा. परळीहून २२/२४ किलोमिटर्सवर असलेल्या डोंगरावर वसलेल्या आंब्याला निजामाच्या पदरी असलेल्या तैनाती फौजेचे ठाणे होते. योगेश्वरीचे पुरातन मंदिर तिथे आहे. जोगाईच्या आंब्याचे नाव निजामाने मोमिनाबाद असे ठेवले होते. जवळच्या धारूरला निजामाची टाकसाळ होती. तिथला किल्ला खूप जुना. त्यामुळेच परळीत रेल्वे आली. तेवढीच जमेची बाजू. त्यामुळे तिथे व्यापारही चांगला होता. भुईमुगाच्या शेंगाची मोठी बाजारपेठ होती. व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर. परळीत कोर्ट नसले तरी वकिलांची चलती होती. तेथील वकिल जवळच्या आंब्याला जात.
 अनू प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली असल्याने आंब्याच्या विद्यानिकेतन महाविद्यालयात अध्यापिका म्हणून तात्काळ नोकरी मिळाली. मग परळी सोडून आंब्याला बिऱ्हाड मांडले. श्रीनाथ वकिली आणि विद्यार्थी संघटनात थोडा स्थिर झाला. मगच जनकचा जन्म झाला. अनू अध्यापन, भरपूर वाचन, लेखन, आल्या गेल्या कार्यकर्त्यांची आवभगत, जनक यात रमून गेला. सामाजिक प्रश्नांची जाण असलेला एक वकिल म्हणून श्रीनाथचे नाव लोक घेत.
 गेल्या तीन चार वर्षापासून पावसांच पंचांग बिघडलं होत. वेळेवर येण, जाण नाही, पाऊस आला तरी अपुरा. दुष्काळाच्या फेऱ्यामुळे खेड्यातला माणूस गांजलाय. हजारो माणसे हैद्राबाद, पुणे, मुंबई, सुरत या दूरदूरच्या भागात भाकरीसाठी पांगू लागली. त्यात व्यापारी, धान्य, तेल, डाळी, रॉकेल... यासारख्या रोजनरोज लागणाऱ्या वस्तू गायब करू लागले. चोरून.... मागच्या दाराने दाम-दुपटीने विकू लागले. भोवतालची खेडी ओस पडू लागली.
 गेल्या काही वर्षात श्रीनाथच्या भोवती तरूणांचा चांगला गट तयार झाला होता. त्यात खेड्यातून कॉलेजमध्ये शिकायला आलेली मुल होती. नव्यान गावात आलेले काही अध्यापक, शिक्षक होते. त्यात एक मोहनसारखा उत्साही डॉक्टर होता. नव्यानेच पुण्यातील आयुर्वेद महाविद्यालयातून त्याने पदवी घेतली होती. त्याच्या आग्रहामुळे ही तरूण मुले आणि श्रीनाथ भाकऱ्या बांधून डोंगरात जात त्यातूनच दोन तीन खेड्यातील मुलांच्या आरोग्य तपासणीची कल्पना पुढे आली. दर रविवारी सर्वजण डोंगरातल्या खेड्यात जात. नारू सारख्या, पुस्तकातच सापडणाऱ्या रोगाचे रोगी तिथे भेटले. मोहनच्याच डोक्यातून लहान मुलांच्या आरोग्य तपासणीची कल्पना पुढे आली… तीन गावातील मुलांच्या तपासणीतून लक्षात आले की अनेक लहान
मुलांना रात्री दिसत नाही. व्हिटॅमिन 'ए' ची कमतरता त्यांच्यात होती. डोंगरात गाजरं होत पण ती म्हशीला दूध वाढावं म्हणून घातली जात, पण मुलांना मात्र दिली जात नसे.
 नव्या मित्रांमध्ये नव्या नव्या कामामध्ये श्रीनाथ बुडून गेला. घरात आला की अनूचा तनमन भरून सहवास. नवनव्या कादंबऱ्याचे कथानक, लेखकाच्या प्रतिभेची झेप अनू श्रीला सांगत असे. श्रीनाथ खेड्यातील लहान शेतकऱ्याची होणारी गुदमर पाहून हतबुध्द होई. बलुतेदारांपैकी अनेक जणांनी केव्हाच घराला कुलपे ठोकली होती. पाणी, सरपण, धान्य यासाठीही बायांना करावी लागणारी वणवण, बोडके होत जाणारे डोंगर…माळ. हे सारे अनुला सांगतांना त्याचे मन अस्वस्थ होई. पण तरीही आत… अगदी आत कुठे तरी वाटे की, अनूने खोलात जाऊन त्यांच्या बेसहारा जगण्याबद्दल विचारावे…
 "... जनक, ये ना जवळ, मला ओळखलं नाहीस? पिल्लू… बेटा…" असं काही पुटपुटत अनूने कूस बदलली. तिला बहुदा जनकचे स्वप्न पडले असावे. ते झोपेतले अस्फुट शब्द ऐकून श्रीनाथ खूप अस्वस्थ झाला. अनूचा पीएच.डी.च्या अखेरच्या वळणावरचा अभ्यास, श्रीनाथच्या मागची धावपळ त्यामुळे दीड वर्षाच्या जनकला आई जळगावला घेऊन गेल्या होत्या. त्यालाही सहा महिने उलटून गेले होते. श्रीनाथचे डोळे भरून आले. त्याने अनूला अलगद जवळ ओढले. तिच्या माथ्यावर हळूवारपणे थोपटीत तो पुटपुटला…
 अने, उद्याच जनकला भेटायला जाऊ आपण. आणि मीही येणार आहे तुझ्या बरोबर".... अनूला थोपटतांना मनाशी खूणगाठ बांधली. येणाऱ्या बाळाच्या नंतर कुटूंबवाढीला पूर्ण विराम. खरं तर पीएच.डी. नंतरच… पण होतात कधी कधी चुका माणसाच्या हातून. मनातल्या मनात हसत त्याने डोळे मिटून घेतले.



२.





 गावाच्या उत्तरेला सातमाळाच्या बुटक्या डोंगराच्या काही रांगा सुन्नपणे एकाकी उभ्या. डोंगराच्या कपारीत मुकुंदराजाची समाधी आहे. वाणा नदीच्या अल्याड आहे. तिथे जायचे तर सव्वाशे ओबडधोबड पायरी उतरावी लागते. गेल्या चार वर्षात समाधीपाशी रोज दिवा लागतो की नाही ते स्वामीच जाणे. पायऱ्या सुरु होण्याआधी उमाठ्यावर विठोबा रखुमाईचे मंदिर आहे. समोर प्रशस्त बांधीव मंडप. मंदिराच्या तिनही बाजूने ओवऱ्या आहेत. मंदिराच्या बाहेर प्रशस्त जागा त्यालाही फरशी बसवली आहे. तिथेही बंदिस्त ओवऱ्या आहेत. अनेक वर्षापासून त्यांचा उपयोग धर्मशाळेसारखा होतो. चार बांधीव ऐसपैस खोल्यातून बुवांचे पखवाज वादनाचे गुरुकुल आहे. चार भांडीकुंडी बाडबिस्तरा बांधून हा परिसर सोडण्यापूर्वी अंकुशचे पाय समाधी आणि मंदिराकडे वळले, बुवांचे आणि एकतारी पहारा करणाऱ्या धामणेदादाचे दर्शन घेऊन तो दासोपंताच्या समाधीकडे जावू लागला. मनात विचाराचे भिरभिरं अवेळी सुटलेल्या वाऱ्यात जास्तच वेगानं फिरत होत. आता हा आपला परिसर कधी दृष्टीस पडणार, दासोपंतांच्या समाधीचे दर्शन घेऊन तिथल्या तिर्थावर तो टेकला. साखरे गुरुजींच्या जवळ डोंगरातली आठ दहा गावची शिकणारी पोर रहात. पहाटे पाचलाच उठावे लागे. उठायचे आणि तिर्थात अंघोळ करायला निघायचे. वाटेत लिंबाची नाहीतर बाभळीची कोवळी काडी चावून दात घासायचे. समाधीवरून रस्ता मुकुंदराजच्या समाधीकडे जातो. समोरच स्मशान आहे. तिथे गवऱ्याची राख असतेच गवरीचा आकार जळल्या राखेच्या रूपात शोधून खुणेने समाधी अल्याडच्या ओवरीतल्या कोनात ठेवायची. ती घेवून दात लख्खं घासायचे आणि तिर्थात उतरायचे. तिथले काळेशार कोमट पाणी त्यात डुंबताना मनही लख्ख होऊन जाई. पुन्हा
गुरुजींच्या वाड्यात येईस्तो उजाडलेले असे मग अभ्यास…
 … अंकुशला सारे आठवत होते. जसेच्या तसे डोळ्यासमोर ते दिवस येत आणि आतल्या आत जीव गुदमरून जाई. डोळा कधी लागला ते कळलच नाही. मुंबईकडे धावणारी आगगाडी मात्र फुफाटत पुढे धावत होती.
 "उठा उठा दादर मागे पडले. आवरा आत्ता ठेसन येईल. अंकुश आरे तुबी झोपलास का. उठ सहा वाजलेत." शिवादादा सगळ्यांना उठवत होते. "आवला… आवला. हुटा…हुटा. ठेसन जवळ आलंया. आन् बायांना गठुडी बांधाया सांगा आगुदर. त्यांचा लई कालवा असतो. आन गडी मानसाला बी घाई करा. लेकरांचे हात गच धराया सांगा, माईला त्यांच्या ही ममई हाये. लेकरू जरा का हातातून सुटलं… नजरेतून निसटल तर पुन्हा दिसायची खात्री न्हाई, ए संतुबाय, छगू आवला लवकर…" शिवादांदानी मानेवरचा गमछा नेहमीच्या सवयीने दोन्ही हातांनी मानेवर घसाघसा घासला आणि डोक्याला गुंडाळून त्याचे टोक शर्टात खोचीत ते सर्वांच्या अंगावर वसकू लागले. एक गचका देऊन आगीनगाडी स्टेशनवर थांबली.
 'ये ठेसन आलं ग माय. आवला बिगी बिगी.' येसाक्काही सर्वांना घाई करू लागली.
 चांगलच उजाडल होत. तरी ठेसनातल्या लाइटी भगभगत होत्या लांबलचक फलाट. गचागच् गर्दी. आंजा डोळे फाकुफाकू फलाटाकडे बघत होती. ती हलती झुलती गर्दी डोळ्यात मावत नव्हती.
 'दम्मानं उतरा. हांगाश्शी ते गुठूड नीट धरा. आता गाडीला म्होरं पळायची घाई न्हाई. या ठेसनाला व्हीटी म्हंत्यात. अरी टाका की पेट्या.. गठ्ठडी खाली. मंग तुमी उतरा. असे काही म्हागामोलाचे डाग डागीने त्यात भरले हायेत?' शिवादादांनी बडबड सुरुच होती.
 एक मोक्याची जागा हेरून दादांनी सगळ्या बायांना तिथे बसवले. सगळ्याचे सामान मधोमध जमा करून ठेवले. सामानावर नजर ठेवायला सांगून गडी माणसं चहा प्यायला आणि बायासाठी चहा आणायला गेली. छगू, संतू या लेकुरवाळ्या बायांनी निवांतपणी लेकर पदराखाली घेतली. बारक्या पोरांकडून शेजारच्या नळावरून पाणी आणलं. खळाळा गुळणी करून तिथंच फर्रर्र करून उडवली. बाजूने जाणारा एक माणूस रागाने पाहात निघून गेला.
 "आत्ता माय, चुळ भरायची बी चोरी का या ममईत?" छबुच्या मनात आलं. त्यांनी ठेपा दिला होता त्याच्या शेजारीच भला मोठा चौकोन काळ्या चमकणाऱ्या गुळगुळीत दगडांनी बांधला होता. समोर पन्हाळ होती. त्या दगडातून तीन नळ बाहेर आले होते. त्याच नाक दाबल की खळाळा पाणी येई. ते पाणी पाहून सोनूला दूध पाजणाऱ्या आंजाचे डोळे लकाकले आणि शांतही झाले. एवढ पाणी पाहूनही डोळे गारवतात. तिला आठवली दगडवाडी. अंगाखांद्यावर लहान मोठे, मध्यम असे गुळगुळीत दगड गोटे घेऊन नांदणारी दगडवाडी. सोमठ्याहून चढाव सुरु होतो. तिथून वर पाहिलं तर नुस्ता दगडांचा गड दिसतो. वर चढून गेले की दगडवाडी. दगडवाडी उंचसखल भागात जमेल तशी वसली आहे. डोंगरापल्याडच्या उताराखालून निळाई नदी वाहते. निळाई कायम कोरडाईच. सूर्य उताराला लागला की डोंगर उतरून खाली यायचे. वाळू बाजूला सारून झिरपा लागेपर्यंत खड्डा करायचा. तिथे कायतरी खूण ठेवायची. दुसऱ्या दिवशी पहाटे पर्यंत खड्डा पाण्याने भरून जाई. ते पाणी बिंदगीत, घागरीत भरून दरड चढून वर जायचे. चार पाच खेपा केल्या तर पिण्यापुरते पाणी मिळे. दगडवाडीतल्या बाया पाणी भरता भरता गळून जात. गावातली बुढी राणूमाय म्हणे, दगडवाडीत आडल्या नडल्याच्या लेकीच सुना म्हणून येणार. एक तर बापाच्या खिशात दमडा तरी नसणार किंवा पोरगी काळीबेंद्री तरी असणार. आंजाच्या मनात आले मी यापैकी कोणत्या वाणाची?... कोणत्या वाणाची?
 दूध पिता पिता सोनू झोपून गेली होती. आंजानं शेजारीच पडलेल बाळूतं थोड झटकून खाली अंथरल आणि त्यावर सोनूला अलगद टाकलं. पातळ झटकित ती उभी राहिली आणि नळाकडे गेली. तोंडावर सपासपा गार पाण्याचे झपके मारले. कसं छान वाटलं. पौषातली गारेगार पहाट उजाडली की कसं वाटतं, तसंच. तिच्या माहेरच्या अंगणात बुचाचं उंच झाड होतं. त्या पांढऱ्या फुलांचा वास पौषातल्या सकाळला असायचा. तिचे लक्ष शेजारच्या मशिनकडे गेले. त्यालाही तीन नळ जोडलेले नळांना साखळीने बांधलेले इस्टीलचे ग्लास. त्या मशिनीतले पाणी तर खूपच गार होते. त्या मशिनवर लिहिलं होते 'पिण्याचे गार पाणी'.
 कितीतरी दिवसानी अक्षरं वाचायला मिळत होती. भवतालच्या सगळ्या जाहीराती तिने वाचून काढल्या. एवढ्यात तिची नजर रंगीबेरंगी फुलांचा झगा घातलेल्या एका काळ्या ढुस्स बाईवर गेली. तिच्या झग्याला बाह्या नव्हता आणि झगाही जेमतेम
मांड्यापर्यंत पोचेल असा. ओठाला लाल रंग फासलेला. आंजाला आठवीतला जगाची ओळख हा धडा आठवला. त्या आफ्रिकेत राहणाऱ्या निग्रो लोकांची माहिती होती. त्या आफ्रिकेत राहणाऱ्या निग्रो लोकांची माहिती होती. त्या बाईच्या उंचउंच बुडाच्या चपला. चाकं लावलेली लालपिवळी बॅग, ती बॅग बाईमागे घुरुधुरु पळत होती. आणि बरोबर एक गलेगठ्ठ गोरापान, लालबुंद पुरुष. कोण असेल ही बाई? आणि तिच्या मागून जाणारा सुटाबुटातला माणूस? तिला हसू आलं वाटलं त्या बाईसमोर ह्या आंजीला कुणीही गोरी म्हणेल!...
 "आग अे ss आंजे, पोरगी रडाय लागली की, कुठं हाय ग तुजं ध्यान? घ्ये आगोदर तिला नि शांत कर. पाज जरा. आता मरेस्तो ममईच बघायची हाय!" शिवादादा आंजीवर वसकले. गमछा मानेवर खसाखसा घासून डोक्याला गुंडाळला आणि सांगू लागले… हये बघा बायानू हा च्या आनलाय, तो पिऊन टाका. ठेसनाच्या त्या टोकाला दोन दोन जनी जावा. तिथं नळ आहे. दोन दोन तांबे डोकीवर वतून घ्या. कापडबी तिथचं धून टाका. वाळत बी घाला तितंच. कुनी काई इचारलं तर सांगा पुढ जायचं हाय म्हणून. आमी गडी मानसं बाहीर जाऊन येताय. पोलिसवाला आला तर आंजे तु पुढे होऊन बोल. नववी पास हाईस नव्ह तू? त्याच्या म्होरं दाखिव तुंजी बालिस्टरकी. आमी काहितरी खायला घिऊन येतो. सामानाकडं ध्यान द्या. आमी येताव. असं बजावून शिवादादा आणि बरोबरचे पुरुष बाहेर गेले. त्यात सोनूचे पपा पण होते.
 गावातल्या म्हाताऱ्या आयाबाया म्हणत. दगडवाडीत खात्यापित्या घरची लेक सून म्हणून आली तर ती एक काळुंद्रि तरी असणार नाहीतर नकटी, भानगडीची, आंबा रोडवरच्या होळाची, खात्यापित्या घरची पण सात पोरांच्या बापाची आधली मधली चौथी लेक. त्यातही काळीकुळकुळित. नववी पास झाल्या नंतरचा आषाढ आला. माय झाडं पूंजायला कधी नाहि ते खालकडच्या रानात गेली. तिथेच पेरणीला पण हात लावणार होती. पेरणीला मालकिणीचा हात लागला तर धान घमघमूक अंकुरत म्हणे. पेरणी होईतो यायला सांज झाली. पांदितून येताना पान लागलं. ढाण्या नाग असावा म्हाजे पाणी सुध्दा मागू दिल नाही. घरी आणले तर कुडीतून जीव कधीच उडून गेला होता.
 घरातलं मोठ माणूस जात राहिल तर वरिसाच्या आत लग्नाळू पोरापोरीचे लगिन कराव लागते. नाही तर तीन साल घरात हाळद लावली जात नाही असा रिवाज आहे.
त्यानुसार तिच्या आन्नांनी आंजाची शाळा बंद केली. चांगल्या मार्कानी दहावीत गेलेल्या आंजनीचे लगीन दगडवाडीच्या अंकुश देशमुखाबरोबर लावून दिले. अंकुशा बारावीपसवर शिकलेला होता. तीन बहिणीतला एकटा भाऊ, मोप, धा एकर जमिनीचा मालक, पण जमीन दगडगोटयांनी भरलेल्या उतराची पावसाच पाणी दरा दरा वाहून गडप व्हायचं. तसल्या जमीनीत पीक तरी कोणतं येणार? पिवळी जवारी, थोडेफार उडिद, तीळ, आंजाला इतिहासातली पानं आठवली. त्यात लिहिलं आहे, मानवाने नदीचा काठ पाहून वसाहती केल्या. पाण्याला संस्कृत भाषेत 'जीवन' असे म्हणतात. ते आठवून हंसूही आलं. हे 'जीवन' पाणी दगडवाडीत होतं? कदाचीत फार फार पुर्वी निळाई दुथडी भरून वाहतही असेल पण आज?....
 बरोबरच्या बाया दोन दोन तांब्यात न्हाऊन माघारी आल्या होत्या. लेकरांनाही पाणी ओतू ओतू खंगाळून घेतले होते.
 "आंजे, आग जा की, मी बघती सोनू कडे. आत्ता येतील गडी माणसं माघारी. आणि हये बघ. सकाळच्या पारी आंगुळ करणाऱ्या बायाकडे बघाया येळ नसतो हितल्या गडीमाणसांना. उद्या मुक्कामावर गेल्यावर घोटभर पाण्यासाठी कसं तरसावं लागतं ते कळेल. करून घे आंगुळ. हितं लाज डोक्याले गुंडाळावी लागते. ममई आहे ही. जा." शिवादादाची मुंबईतली कारभारिण ठसक्यात सांगत होती. गडी माणसं बाहेर गेल्यावर ही इथं पोचली होती. तिला पाहून आंजाच्या डोक्यावरच ओझ उतरल. पोलिसमामानी हटकल तर ही मुंबईतली बालिस्टरिण घेईन बघून अंजाच्या मनात आलं.
 शिवादादांची थोरली कारभरीण दगडवाडीत रहाते. ती जवळच्या आवशी गावाची. खात्यापित्या घरातली. पण तिरळ्या डोळयाची. बांगी. तिचा काका सरकारी नोकरीतला. खात्यापित्या घरी सणावाराला, पाहुण्यारावळ्याला पुरण पोळ्याचा गोड घास असे. फक्त तुपाच्या वाटी ऐवजी दुधाची वाटी शेजारी ठेवीत. भामावैनी अंगाने खूप थोराड होती. तिच्या काकानं दहा हजाराच्या नोटा शिवादादाच्या खिशात कोंबल्या नि पुतणी त्यांच्या उपरण्याला बांधली. शिवादादांना पाच एकर रान होत. ते ऐकटेच पैका हाती आल्यावर ते लातूरला जाऊन गवंडी काम शिकून आले आणि तिथल्याच ओळखीपाळखीवर दोन वर्षात थेट मुंबई गाठली. पण ते भामा वैनीला पैसे पाठवितात. सालातून एक दोनदा येऊन जातात.
 मुंबईत रोजगार भरपूर मिळतो. त्यात शिवादादा पट्टीचे कारागिर. गवंडी काम छान करतात. पाच सहा वर्षात त्यांनी चांगले बस्तान बसवले. एका झोपडपट्टीत दोन खोल्या बांधल्या. पाच सात झोपड्या उभ्या केल्या आणि खायप्यायच्या सोईसाठी दुसरी बायको पण केली. मिनाबाई लातूरजवळच्या बुधवड्याची लहान असतानाच बापासोबत मुंबईला गेली. सुरुवातीला तिच्या बापाच्या हाताखाली शिवादादा काम करीत. मीनाबाई सात बुक शिकलेली मुंबईकरीण होती. मग लगिनही लावल बापानं तिचं शिवादादाशी. बाप्यानं दोन, तीन बायांशी लगीन वालं तरी चालतं. पन बाईशी एकादा माहेरचा दादाप्पा जरी दोन गोष्टी बोलला तरी बाईचाच सौंशय घेणार. तिलाच वाईट चालीची म्हणनार. काही नवरेतर बायकूला सौंशयावरून मारून टाकतात. अंकुश सारखा माणूसकीचा नवरा, जोडीदार म्हणून लाभला याचा अंजाला मनभरून अभिमान वाटला. त्याच्या आधारावर ती मुंबईच काय इंग्लंडात पण जायला राजी झाली असती.
 … असल्या वेडगळ विचारांच अंजाला हसू आलं. एकदा तिने जिवाचा धडा करून, शिवादादांच्या पहिल्या बायकोला विचारले होते.
 "भामा वयनी, ती मुंबईवाली लक्ष्म्या दिवाळीत हित येती. पांचवारी पातळ, दागिने घालून गावभर चहा पीत हिंडती. तुम्हाले वाईट नाही वाटत? लक्ष्म्या नायतर दिवाळीपूजेत ती शेजारी असतेच तुमी पण असता म्हना! पण, तिचा थाट वेगळाच? कस हो." विचारतांना खरतर आंजालाच कसनुस झाल होत पण भामा वहिनी मात्र लटक हसली आणि म्हणाली,
 "आंजे, पावसानं झोडपल नि नवऱ्यानं मारल तर दाद कुनाजवळ मागायची? कारभारी मारित तर नाहीतच पण सोन्यावानी दोन लेकरं दिलीता. त्यांच्या शिक्षेनाचा, खायाप्याचा खर्चा देतेत. आले की हवं नको पहातेत. ती बाई ममईत हाय म्हणून दोन वेळला चांगल आन्न तरी मिळतंया त्यानला. तीबी तिथं कामधाम करती. बऱ्या जीवाची हाये. ती होती म्हणून तर आपरीसन झालं माझ. मैनाभर हित येऊन हायली होती. दिवाळी लक्ष्म्यांना येताना पोराना, मला कपडे आणते. बाईला आणखिन काय हव ग? आगं आपन भादव्यात लक्षुम्या मांडतो त्या दोन असतात की न्हाई? तशी मी थोरली तर ती धाकली. एक राम सोडले तर समद्या देवांना पन दोन दोन तीन तीन बायका. इठ्ठलावर रूसून रूकमाबाई दिंडीखनात गेली. चिंचच्या झाडाखाली ठाण
मांडल. तरी राही, राधा यांच्या सोबत तुळसही आलीच की शिरीकिस्ना मागं. जाऊ दे नग उगा डोक शिणवून घेऊस."
 आंजाला ते सगळ आठवलं आणि सोनूच्या पप्पांनी जेव्हा शिवादादाबरोबर मुंबईला जाण्याचे नक्की ठरवले. तेव्हा मात्र मनात पक्के ठसवले कि तिने पन सोनूला घेऊन मुंबईला जायचे. तिचा हट्ट अंकुशाने मानला तिचे पाहून दुसऱ्या चौघीपांचजणी पण निघाल्या.
 मीनाबाई तिच्या जवळ आली नि पुटपुटली, 'त्यो पोलिस मला ओळखतो. आंजे तू हो म्होरं, मी बाजूला जाते' आणि निघूनही गेली.
 "ये ss बायांनो काय करता इथे? उठा… उठा हे स्टेशन आहे. गाड्या येतात जातात. आन् तिकिट कुठ आहेत. काढा.. दाखवा तिकिट. पुरुष माणसं नाहीत का सोबतीला उचला उचला तुमची ती बोचकी टाचकी." तो खाकी ड्रेसातला पोलिस ओरडू लागला. तशी, बाया घाबरल्या. मीनावैनीपण कुटे दिसेना. छगुला तर थरथरी सुटली ती येसाक्काच्या मागे जावून तिला गच्च धरून उभी राहिली. "आंजे, आग हो म्होरं बोल त्याच्याशी आमी अडानी बाया. मला तर थरथरी सुटली माय" औताड्याची मनूमाय कुजबुजली. उसन आवसान आणून आंजी पुढे झाली. "हवालदारदादा, आमी लातूर बिडाहून कामधंद्यासाठी हितं आलोत. रोडच्या कामावर घेतलंय आमच्या घरच्यांना. ते लेकरांना खायला आणण्यासाठी बाहेर गेलेत. त्यांचे पाशी तिकिटं आहेत. ते येईपर्यंत आमच्यावर मेहरबानी करा. गडीमानसं येईस्तो हित गुमान बसून रहातो आमी."
 "मराठवाड्यातली माणसं दिसतात रे ही. तिथ लई मोठा दुस्काळ पडलाय. चार सालापासून पाणी बरसलाच नाही. रोजन रोज असे लोंढे येत्यात जाऊ देत. मंग करू आपली भोवनी." दुसरा हवालदार पहिल्याला बोलला आणि ते पुढे चालायला लागले आणि दगडवाडीकरणींना हायसे वाटले.
 शिवादादा खायला वडापाव घेऊन आले. खाण झाल. आणि सगळी मंडळी त्यांच्यामागे चालू लागली. "हं चला माझ्या मागं पलिकडच्या फलाटावरून आपल्या मुक्कामाला जाणारी लोकल पकडायची. मिने तू सगळ्यांच्या मागे रहा समदे नग मोजून घ्ये. हितं ऱ्हाया नको कोणी. राहिलचं तर त्यांना घेऊन तू ये. चार दिवसात सगळे येतील रूळावर. मुंबईकर व्हायला कितीक वेळ लागणार ?" शिवादादा पुढे
चालू लागले. बाकीचे मागेमागे. अंकुशने पेटी डोक्यावर घेतली. गठूड उजव्या खांद्याला बांधून टाकलं. त्याच्या मागे सोनूला कडेवर घेऊन आंजीही चाचरत चालू लागली. ममईकरीन होण्यासाठी.
 एका ठेसनावर शीव की काय नावाचं उतरून सगळे रूळाच्या कडेने चालू लागले रस्त्याच्या... रूळाच्या कडेनी माणसं, बाया, लेकरं रांगेने संडासला बसलेले. क्षणभर नजर फक्क झाली. आणि इकडे तिकडे न पाहता दगडवाडीकरणी खाली मान घालून रस्ता काटायला लागल्या. आंजा टुळूटुळू नजरेने चहूकडे पाहत होती. एकमेकांशी समांतर धावरणारे कितीतरी रूळ त्यावरून धावणाऱ्या आगीनगाड्या तिला गणितातल्या समांतर रेषा आठवल्या. या रेषा कधीच एकमेकीना मिळत नाहीत पण जोडीने धावत असतात. त्या रेषा जर एकमेकींच्या गळ्यात गळे घालू लागल्या तर पुढे काय होईल? अशा खुळचट विचारात रस्ता कसा कटला ते कळले नाही. बरच अंतर चालून गेल्यावर काटकोनात वळण घेऊन मंडळी पुढे चालू लागली. थोडे पुढे गेल्यावर त्यांचे ठिकाण आले. प्रचंड रूंद लांबच लांब पसरलेल्या नालीवर, गटारीवर सिमेंटची झाकण बसवली होती. त्याच्या पलिकडे अर्धवट विटांच्या, पत्र्यांच्या झोपड्या होत्या. खोक्यांच्या फळ्या, अर्धेमुर्धे पत्रे यांनी तयार केलेला आडोसा. जेमतेम चार माणस मावतील असा. त्यातल्या एका झोपडीत अंकुशाने बोचके टेकले. बाकीचेही आजूबाजूलाच टेकले होते. आंजाने झोपडीच्या बाहेर येऊन नजर टाकली. समोर रस्ता आणि मागे नजर जिथवर पोचेल तोवर झोपड्या मनात आले चार दगडवाडीतील सगळी घर नक्कीच या एका झोपडपट्टीत मावतील. शिवादादांच्या हातावर रस्त्याच मोठ कंत्राट होत. आणि दादरला बारा मजली इमारतीच्या बांधकामाच. अंकुशाला गवंडीकाम थोडफार येई. अंकुश शिवादादासोबत काम करणार होता. पुढच्या रांगेतल्या चार झोपड्यांच्या पलिकडे शिवादादाची पक्की झोपडी होती. स्लॅबची होती. वर एक माळाही होता. जायला शिडी होती. घर स्टीलच्या चकचकीत भांड्यानी भरलेले होते. मीनाबाईला एक मुलगा होता. तो शाळेत शिकत होता. मीनाबाई पहाटे चारलाच उठत असे. भायखळ्याला भाजी आणण्यासाठी जाई. तऱ्हेतऱ्हेच्या ताज्या भाज्या घेऊन परत येई. आल्यावर भाज्या निगुतीने निवडून त्यातील काही भाज्या सुरेखपैकी चिरून, शंभर शंभर ग्रॅमच्या पिशव्यात भरून ठेवी. मग त्या पिशव्या फ्रीजमध्ये जात. सायंकाळी रस्त्यावर भाजीचे दुकान थाटून मीनाबाई
बसे. ऑफिसातून येणाऱ्या बाया किंवा बड्यांच्या बाया त्या नीटसपणे ठेवलेल्या भाज्या घेऊन जात. भायखळ्यात चार दोन रूपये किलोनी मिळालेली भाजी मीनाबाईच्या हातगुणामुळे, कष्टामुळे पंधरावीस रूपयापर्यंत विकली जाई. आंजाने तर इतक्या ताज्या नि तऱ्हेतऱ्हेच्या भाज्याच पाहिलेल्या नव्हत्या. आंज्याच्या घरी लक्ष्म्या येत तेव्हा त्यांना भाकरी आणि रानातली भाजी लागे. तेव्हा तांदुळ कुंजराची भाजी न्हाईतर चंदनबटवा शोधताना किती धांदल उडायची. इथल्या मार्केटात तर किती तऱ्हेतऱ्हेच्या पालेभाज्या असतात. तऱ्हेतऱ्हेच्या मिरच्या, वांगी, भेंड्या, शेंगाचे सतरा प्रकार, आणि भाजी विकणारेही लक्ष्म्यापुढे आरास मांडतात तशा त्या भाज्या निटुसपणे मांडून ठेवतात.
 दिवस उलटत होते. मुंबईतली गर्दी आंजाला आता बोचेनाशी झाली. तिथला गोंगाट आणि झगमगाट याचीही सवय झाली. पण दोन गोष्टी मात्र अगदी नकोशा वाटत, आंघोळ… इराकतीला बसण्यासाठी आडोसा नाही आणि संडास म्हणजे उघड्यावर. ती पहाटे उठून आडोसा पाहून येई. घराच्या मागे तरंट लावून फरशी टाकून आंघोळीलाही आडोसा केला होता. घरा जवळच एक पाळणाघर होते. फी बरीक पंचवीस रूपये होती. पण सांभाळणारी बाई शिकलेली, नीटस होती. तिने सोनू झाली तेव्हाच पक्के ठरवून टाकले होते. सोनूला खूप खूप शिकवायचे. कितीही कष्ट करून चार पैसे साठवायची उमेद तिच्यात होती. मीनाबाईच्या ओळखीने जवळच्या इमारतीतल्या नोकरी करणाऱ्या बायांकडे कामही मिळाले. झाडू पोछा नि धुणी भांडी करण्यासाठी दिडशे रूपये मिळत. चार घरचे काम मिळाले होते. तिची टापटिप, झटपट पण नीट काम करण्याची पध्दत सर्वानाच आवडे, सोनूला आठ वाजता पाळणा घरात सोडून ती कामाला जाई. एक वाजता परत येतांना तिला घरी घेऊन येई. पहाता पहाता आंजा, अंकुश दोन महिन्यात मुंबईकर बनले. पण तरीही आंजाला गावाकडचे सण आठवत. ज्येष्ठ आषाढातली झाडाची पूजा, आषाढ तळणे, भाद्रपदातील लक्ष्म्यांची धांदल, पुसातले रविवार, दिवाळीतलं शेणाच गोकूळ मांडण… सार सार आठवे. अंकुशाच्या स्वप्नात भेगाळलेली जमीन… उदास रान येई … लंगड्या काकांचे आशेने वाट पाहणारे डोळे येत.


३.





 मध्यरात्रीचा दुसरा प्रहर उलटून गेला तरी अण्णाने दिलेली बातमी समोर येत नव्हती. समोर उभं राहत नव्हती. शेख्या, पक्या, अशक्या गप्पा मारतांना आता पेंगुळले होते. शेंदाडअप्पाच्या दुकानात परवा रात्री साडे आठ वाजता एक बैलगाडी उभी राहिली. पाचवं साखरेच पोत उचलणार तेवढयात अण्णा, अशक्यानी माल थेट पकडला होता. अशक्या तो प्रसंग खुलवून सांगत होता.
 "अरे, त्या शेंदाड्याने शंभरा शंभराच्या एका नोटे पासून दाखवायला सुरुवात केली. धा नोटांच मखर समूर नाचवत होता पण आपण हाललो नाय. त्याला वाटलं शिवे बाहिर राहणाऱ्याचं लेकरू. दुसरं खेड्यातल्या सुताराच. नोटा पाहून इरघळतील, भाळतील… अण्णानं थेट सायकल मारली आणि रातच्याला पोलीस हवालदाराला पुढे घालून आनलं आन् पंचनामा केला. लई शिव्या देत होता. आई माई वरून." अशक्या थाटात सांगत होता.
 "अरे पन् लेका, दुसऱ्या दिशी पुन्हा छाती काढून मोंढ्यात फिरत व्हताच की. पोलिसांना चारला मलिदा नि केली सावडा सावड. धूऽऽ त्यांच्या जिंदगानीवर" मझर शेख पचकन थुकला नि मनातला राग गिळून टाकला.
 "शेख्या हे व्यापारी लई डांबरट. त्यांना जर का आपला प्लॅन कळला असंल तर? सगळा डाव ओमफस… ओ लई पेंग याय लागलीरे" असे म्हणत अशक्या बाजेवर आडवा झाला नि काही मिनिटांच्या आत घोरायला लागला.
 मोंढ्यात व्यापाऱ्यांच्या आडतीवर काम करणाऱ्या हमालापैकी काही विश्वासातले हमाल आडती समोर बाज टाकून झोपतात. राखण म्हणून. अशोकच्या घरातली बाज रेवणआप्पांच्या आडती समोर टाकून, डोक्यावर पांघरूण घेऊन आण्णाच्या बातमीची
वाट पहात ते दोघे बसले. पण बातमी आलीच नाही.
 एप्रिल-मे महिन्यात सूर्यालाही झोप येत नसावी बहुदा. सातच्या आधीच उन्हाचे झोत डोळयावर येऊ लागतात. साडेपाचलाच फटफटून कोनफळी प्रकाश पसरतो. अशक्या पहाटे कधी घरी पळाला हे कळलेच नाही. मझर शेखला जाग आली तेव्हा रेवणअप्पाचा गडी अंगणात पाणी मारीत होता.
 "उठा… उठा.. दिवस कवाच उघडलाय. आन हित कशापायी बाज टाकली? मालक काय म्हणतील मला. हुटा अंगूदर. शेणाचा सडा टाकूद्या मला अं? आज मंगळवार बाजाराचा दिस हाय. खेड्यातून उरलं सुरलं धान शेतकरी घेऊन येतील. माल घेणाऱ्या आणि विकणाऱ्यांचा लोंढा आत्ता सुरु होईल. हुटा..हुटा.." गड्याच बोलण पूर्ण होण्याच्या आतच पक्या सायकल जोरात मारीत येताना दिसला.
 "शेख्या, अशक्याची बाज त्याच्या घरी टाकून तू लगी लगी मंडीच्या मागच्या गल्लीत ये. मी अशक्याला घेऊन होतो पुढ. बातमी रेड हँड पकडलीये. श्री भैय्या, बाप्पा देशमुख… समद्यांना सांगून हित आलो मी. आण्णा, सच्या, सद्या, पाप्या समद्यांनी ट्रक आडवून धरलाय..."
 पक्या अशोकला घेऊन आला नि डबलसीट घेऊन नजरेआड गेलाही. गरिबाच्या घरात चिमणी पेटवायला, चूल पेटवितांना गवरीवर घालायला उलीसक सुध्दा रॉकेल मिळत नाही. रूपया सव्वा रूपयाला बाटली भरून मिळणार रॉकेल थेट आठन् दहा रूपयावर पोचलेल. खेड्यात तर ती बाटली पंधरा रूपयाला मिळे. मजूरी मिळणार बारा रूपये गड्याला आणि आठ रूपये बाईला. रॉकेल नाही तर रात्री दिवाबत्ती कशी पेटणार? इस्टू कसा पेटवावा? लाकड तरी स्वस्त होती का? या दुष्काळात महागाईचा तेरावा महिना. व्यापारी मालममाल व्हायला लागले होते... शेखच्या मनात विचार येत होते.
 मंडई मागच्या अरूंद गल्लीत गर्दी जमा झाली होती. श्री भैय्या, बाप्पा देशमुख रॉकेलचा टँकर असलेल्या ट्रकमध्ये घुसले होते. ज्याने ट्रक मागवला तो व्यापारी पुढे येणार तरी कसा? ड्रायव्हर बिचारा गोंधळून गेला होता.
 "ड्रायव्हरदादा दोष तुमचा नाही. आम्हाला कळतंय. तुम्ही टँकर घेऊन तहसीलमध्ये चला. तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही." श्रीभैय्या ड्रायव्हरला शांतपणे विनंती करीत होते.
 "शिऱ्या, लेका बामणी भाषेत समजूत घालून कुठ कळत का रे यानला? ये ऽऽऽ येतो का नाय आमच्या बरुबर? की बसू चाकावर? मला बी येती गाडी चालवाया." बप्पांनी दम भरला आणि ट्रक सुरु झाली. ट्रक मागे अनेक बघे नागरिक. 'बदलावं' युवा संघटनेची पोर गाडी तहसील कचेरीच्या कंपाऊंड मध्ये उभी केली. एकाच्या घरून खुर्च्या टेबल आणले. लिटर अर्धा-लिटरची माप आणली. कोरे कागद आणले असं सामान मुलांनी भराभरा जमा केल. पक्या आणि अशक्या बसले लिहायला. शेख्या आणि आण्ण्या रॉकेल मोजून द्यायला, श्रीभैय्यानी जाहीर केले की प्रत्येक घरागणिक दोन लिटर रॉकेल मिळेल. आणि भाव सरकारी एक रूपया वीस पैसे लिटर. हा हा म्हणता रांग लागली. दुपारी दोन अडीचपर्यंत टँकर रिकामा झाला. गिऱ्हाईकांची यादी सही व अंगठ्यासह करून ठेवली हाती. यादी करण्यापूर्वीच कार्बन पेपर आणून ठेवले होते श्रीभैय्याने, हे त्यालाच सुचणार ! मनी, उषापण सामिल झालया. त्यांनी बायांची वेगळी रांग लावली. रॉकेल घेणान्यांची नावे, किती रॉकेल विकले त्याचा आकडा तहसीलदारांच्या हवाली करून पैसे व रेकॉर्ड मिळाल्याची त्याची सही घेतली. सही घेताना श्रीभैय्यांनी काशही कडक आणि कोरड्या शब्दात तहसीलदाराला बजावले. "साहेब तुमच्या डोळयावर नोटाची पट्टी बांधलीय हे कळतय आम्हाला जी बातमी आम्हाला कळते ती तुम्हाला पोलिसखात्याला कशी कळत नाही? पुन्हा असं झाल तर रॉकेलचे पैसेही भरणार नाही. फुकट वाटून टाकू लबाडीचा माल…" हे सारे संपूवन सगळे जण श्रीभैय्याकडे थकवा घालवायला गेले. सगळे जण जमेस्तो संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. एवढ्यात आंद्या आला नि टेबलावर ठेका धरित गाऊ लागला.

भुंगड़ा ऽऽ ओ ऽऽभुंगडा
ओ ऽऽ भुंगडा ऽऽ
कांद्यासाठी, तेलासाठी
दुकान आप्पाचं फोडा ऽऽ
ओ ऽऽ भुंगडा खाऊ भुंगडा ऽऽ
मंगळवारातल्या ग्यानबाचा
उजवा डोळा लंगडा ऽऽ
हो लंगडा

डावीकडच्या दुकानवाल्याला
गुदगुल्या करून झोडा
चुरमुऱ्याच पोतं दणकावून फोडा ऽऽ
खाऊ भुंगडा ऽऽ ओ भुंगडा ऽऽ

 मग अशक्या, शेख्या, सद्या, पद्या सगळयांनी ताल धरला. काहीनी फळीवरच लोखंडी घमेल काढल काहींनी बुकीने कांदे चेचून वाटी… थाळयाच्या कडा, विळी, चाकू घेऊन कांदे चिरायला घेतले. श्रीनाथने तेलाची बरणी, लाल तिखटाचा आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा डबा समोर ठेवला.
 "अनूवैनी चला ना भुंगडा खायला. सकाळपासनं पोटात भाकर तुकडा नाय. लई भूक लागलीय चला ना." सदानंद वैनीला आग्रह करू लागला.
 "अनुवैनी आम्ही किती किती गोंधळ घालताव हो घरात कंदी तरी रागवत जा ना आम्हाला." प्रकाशने पुस्ती जोडली.
 "ताई या गोंधळात, पुस्तकात मन शिरत का हो?" निक्याने विचारले
 "तर… तर! ह्या गोंधळातून तर तुमचा श्रीभैय्या आणि मी एकत्र आलो उलट या गोंधळात मस्त मन लागतं माझ पुस्तकात, अरे हे पीएच.डी. चं भूत माझ्या मानगुटीवर नसतं ना तर मीही तुमच्यात आले असते. शिवाय तुम्ही आहात म्हणून तर आयता भुंगडा मिळतोय मला." अनुने हसत पुस्तक मिटवले. आणि ती बाहेरच्या खोलीत आली.

 सकाळचे सात वाजून गेले होते. श्री अजून झोपलेला होता. १६ मार्च पासून महाविद्यालय बंद झालयं. पण ग्रंथालयात बसायला हव. लागणारी नवी पुस्तक ग्रंथपाल जोशींनी, प्राचार्यांनी परवानगी घेऊन मागवून दिलीत. या छोट्या गावात एक स्त्री घर सांभाळून पीएच.डी. करतेय याचंही कौतुक आणि मदतीचा प्रेमळ हात. सहा-सात वर्षात अनू या गावाशी एकरूप झालीय. आई जनकला घेऊन गेलीय. या दुसऱ्याच्या आगमनाची संभाव्य तारीख दसऱ्याच्या आसपास म्हणजे अभ्यासाला ऑगस्टपासून चार महिने मस्त मोकळे. माहेरपणाचे. त्याचाच उपयोग करायचा. येणाऱ्या जूनपूर्वी प्रबंध सादर करायचाच. मनात विचारच विचार. तिने घड्याळात पाहिले आठ वाजले होते. तिने स्वतःसाठी डबा भरला. ग्रंथालय साडेसातला उघडते. आता निघायलाच हवे असा विचार करून अनूने श्रीला हलवले.
 "श्री मी निघते रे कॉलेजात, तुझ्यासाठी दशम्या आणि ठेचा बांधून ठेवलाय. आणि आत्ताच्या न्याहरी साठी दीड दशमी, तुझी स्पेशल चटणी आहे. कपाटात दही पण आहे. पोटभर खाऊन जा. आज रात्री येणार आहेस का? किती वणवणतोस रे राजा? इतकी धावपळ, काही हाती लागणार आहे का पण? आणि हे बघ एकटा नको बाबा डोंगरात जाऊस. आनंद, प्रकाश, कोणाला तरी घेऊन जा…" असे म्हणत अनूने श्रीनाथच्या कपाळावर अलेले दाट केस कुरवाळले. आणि त्यावर अलगद ओठ टेकवून, येते रे, असे म्हणून बाहेर निघाली.
 तिचा घनदाट लांब शेपटा ओढून श्रीने तिला जवळ घेतले, 'हा ऽऽ य' असा सित्कार काढीत तिने शेपटा त्याच्या हातातून सोडवला.
 "तुझ्या या असल्या लाडामुळे माझे केस कमी होतील." ती खोटया खोट्या रागाने बडबडली. तिचा हात धरून तिला कॉटवर बसवीत अन तिच्या मांडीवर डोक ठेवीत श्री पुटपुटला,
 "अने, मी झोपलो असलो की तुला प्रेमाच भरत येत. तुला काय वाटत, मी खरच झोपलेला असतो?"
.....
 "अे, मी जागा असताना कर ना प्यार… व्यार. प्लीज." श्रीच्या मिठीतून स्वतःला सोडवून घेत अनू बाहेर आली आणि जिना उतरू लागली आणि श्री घोरू लागला.
 श्रीनाथच्या स्वप्नात नुसते पाणीच पाणी घोंगावत पुढे येते होते. घुसळत उड्या मारीत होते. पण ते ओंजळी घेण्यासाठी पुढे जावे तसे ते मागे मागे जाई. पाण्यात ओंजळ बुडवली तरी ओंजळ कोरडीच. त्याचा जीव तहानेने व्याकून झालेला. घशाला कोरड सुटलेली. बदबदून सुटलेला घाम त्याने ओंजळीत धरला नि गटागटा पिऊन टाकला. त्याची तुरट चव. कुबट वास...
 श्रीनाथला एकदम जाग आली, त्याने बावरून इकडे तिकडे पाहिले घड्याळातला छोटा काटा आठ वरून पुढे सरकला होता. तो तटकन उठला. हौदातलं तळाशी गेलेलं वरवरच पाणी अलगदपणे वाकून काढलं. तोंडावर शिपके मारले. अनूसाठी दोन बादल्या भरून न्हाणीत ठेवल्या आणि तोंड धुवुन, झटपट आंघोळ करून तो दशमी खायला बसला.
 … काल तो आणि बाप्पा देशमुख सहा खेड्यांतून जाऊन आले. धानवट्याचे लामतुरे डॉक्टर, डॉक्टर मोहन त्या भागातही काही खेडी कव्हर करणार आहेत. डोंगरातल्या दगडवाडी, देवठाण, लमाण तांडा अशा अगदी मध्यातल्या भागात त्यांना जायचे आहे. गरज पडली तर देवठाणच्या खरातला निरोप केलाय, की मुक्कामाला थांबू म्हणून. अवघ्या चार दिवसावर मोर्चा येऊन ठेपला आहे. त्याचं नियोजन सोपी बात नस्से. नीट आखणी तर केलीय. पण जसजसा दिवस जवळ येऊ लागला तशी थोडी अस्वस्थताही वाढतेय. खेड्यातले माणसे भाकरी बांधून आणणार आहेत. पिठलं… झुणका मात्र 'बदलाव' संघटना करणार आहेत. त्याची जबाबदारी कोण घेणार? शिवाय भोंग्याचा खर्च… असे अनेक विचार दशमी खातांना मनातून वहात होते. एवढ्यात मोटर सायकलचा हॉर्न वाजला. दशम्यांची शिदोरी आणि पाण्याची बाटली त्याने शबनम मध्ये टाकली. घराला कुलूप घातले. किल्ली सुधा वहिनींच्या खिडकीतून आत टाकित तो पायऱ्या उतरणार इतक्यात.
 ओ, श्रीनाथ, घरात या. बायकोने केलेला फर्मास चहा प्या आणि मग कामाला लागा. तुमच्या मित्रालाही बोलवा. गुड न्यूज देतो तुम्हाला. या…या…" मोहिते काकांनी अडवले. चहा प्यावासा वाटतच होता. श्रीनाथने प्रकाशला वर येण्याची खूण केली आणि तो घरात शिरला. काकांनी त्याच्यासमोर पेपर टाकला आणि म्हणाले वाचा.
 मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील सततच्या दुष्काळावर कायम स्वरूपी तोडगा. येत्या सोळा एप्रिलला मुख्यमंत्र्यां समवेत पाचही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. केंद्र सरकार या जिल्ह्यांमध्ये रोजगाराची हमी देणारी कामे सुरु करणार आहे. तातडीच्या नियोजनाची आखणी होऊन एक मे, महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आष्टी, पाटोदा, केज, अंबाजोगाई, कळंब, निलंगा आदि तालुक्यात कामे सुरु होणार.' दैनिक मराठवाड्यात पुढच्या पानावर बातमी होती. श्रीनाथने बातमीवरून नजर फिरवली.
 "काका, ही कामे म्हणजे रस्ते आणि जोडरस्ते बांधणे, पुल रूंद करणे किंवा नवा बांधणे अशीच असणार. दुष्काळालाच बांध घालणारी काम का नाही शासन काढीत?"
 "श्रीभैय्या, आम्हां अधिकाऱ्यांची जात सर्वात बेरकी, लबाड आणि बदमाश. वसंतराव नाईकांनी सामुदायिक विहिरींची योजना इंट्रोडयूस केली होती आठवतं? अत्यंत चांगली योजना. आपल्याकडे २५ एकरापेक्षा अधिक एकर जमिनीच्या
मालकाची संख्या त्या मानाने कमी आणि दीड दोन एकरवाले छोटे शेतकरी जास्त. इकडच्या जमिनी कोरडवाहूच. छोट्या शेतकऱ्याला बारा चौदा हजाराची विहीर परवडणार नाही. म्हणून तीन, चार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विहिरीचा खर्च करावा. शासन त्याला मदत करील. पाण्याचे समान वाटप करावे. पाळीपाळीने पाणी घ्यावे. अर्थात न भांडता तंडता… अशी ही योजना."
 "न भांडता? हे कस व्हावं? भाऊ सख्खे आणि दाईद पक्के, ही म्हण काय आभाळातून पडली? सामाईक विहिरीवरून वाद वाढले नसते तर माझे शेतीतील डबल पदवी घेतलेले पतीराज, सातारा सोडून या मुरमाड माळावर आले असते का?... म्हणे अधिकारी बेरकी असतात!" सुधा वहिनी मध्येच खर बोलल्या "गप्पेऽऽऽ अधिकाऱ्याची बायको म्हणून श्यान नग मारूस. तर ही योजना आपल्या भागात फक्त कागदावर राहिली. आम्ही अधिकारी आणि आमचे पिट्टू कारकुंडे कागदी घोडे नाचविण्यात लई तरबेज असतोत. तस्सच झालं. घ्या शोध हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या सामुदायकि विहिरी दाखवा आणि हज्जार रूपये मिळवा. माझ्याकडून. मात्र आमचं नाव न सांगता हं. आम्ही आपले झाडं लावणारे अधिकारी. पाणीच नाही तिथे झाड कशी लावणार?..."
 'चला चला उठा, तुमचा लई वेळ खाल्ला आमी.' अस म्हणत पोटावर हात फिरवीत नि मिशांना पीळ भरीत मोहिते काका गदगदून हसले.

 दगडवाडीचा चढाव चढतांना मोटार सायकल हातात धरूनच चढावे लागते. प्रचंड दमछाक. अवघा चढाव दगड गोट्यांनी लदबदलेला. भर बाराचं ऊन डोक्याला गमछा बांधला तरी झळा कानाला वाफाळत होत्या. चढाव चढून आल्यावर प्रकाशने गाडी सुरु केली. ते गावात आले. गाव कस सुनसान, वडाच्या पारावर दोन जख्खं म्हातारी माणसे बसली होती. पारावरच्या देवळीत मुंजाबाचा लाल सेंदूर फासून ठेवलेला दगड होता. तो पहाताच पक्याने माथा टेकून दर्शन घेतले. ते क्षणभर पारावर टेकले. बाटलीतल कोमट झालेलं पाणी घशात ओतलं. पण श्रीनाथच्या मनात सामुदायिक विहिरीचं पाणी झिरपत होतं.
 "बाबा, गाव लईच सुनसान दिसतंय. मानसं ऱ्हातात की नाय? कुठ गेली समदी?"
 म्हातारबाबा ठार बहिरे होते. एकाने क्षणभर डोळे उघडले आणि पुन्हा मिटून घेतले. इतक्यात समोरच्या बाजून एक वयस्क बाई आणि दोन तरूण महिला
डोक्यावर, कमरेवर पाण्याच्या घागरी घेऊन येतांना दिसल्या. प्रकाश त्यांना काही विचारणार इतक्यात श्रीनाथने त्याला गप्प राहण्याची खूण केली.
 "पक्या, आपणच पुढ होऊन बघूया पाणी कुठून आणतात ते." असं म्हणत ते चालायला लागले. अवघ्या दहा मिनीटात ते एका खोल दरीपाशी येऊन उभे राहिले. डोंगराच्या उतारावरून चिंचोळी पायवाट खाली उतरत होती. खोल पायरी सारखे दगड नीट रचून ठेवलेले. एकेक पायरी उतरून मध्यात यायचे. तिथे मात्र जरा मोकळी जागा होती. दोन मोठया धोंडयावर चपटे दगड टाकून टेका तयार केला होता. घळीतून उतरून गेले की निळाई नदी. उतरण्यासाठी समोर प्रचंड रूंद असा वाळूचा पट्टा. नदीची खूण सांगणारा. त्या पात्रातही काही बाया दिसल्या. डोक्यावरून, अंगभर पदर घेऊन साड्या कसून बांधलेल्या. पात्रात खड्डे खणलेले. ते आदल्या दिवशी सांजच्याला करून ठेवायचे नि सकाळी त्यात साठलेले नितळ झालेले पाणी घागरीत भरायचे. बारकी पोरं मग नारळाची करवंटी किंवा लहान वाटीतून घागरीत पाणी भरत होती.
 "ओऽऽ भाऊ, येक तर वरी तरी चढून जावा, नायतर खाली उतरा. आमचा रस्ता मोकळा करा." एक प्रौढ बाई अंगावर मऊपणे खेकसली. दोही पटकन खाली उतरून आले.
 दोन्ही बाजूंनी बुटक्या डोंगराच्या रांगा. बोडक्या डोक्यांसारखे दिसणारे भकास पिवळे डोंगर व तुळतुळीत दगडांची टेंगळं. मधून लांबच लांब वाळूचा पट्टा. त्या वाळूच्या पट्याची रूंदी चांगली चौडी आहे. फार वर्षापूर्वी निळाईचे पात्र मोठे असावे. श्रीभैय्या, प्रकाशने वर चढायला सुरुवात केली. चढतांना दमछाक झाली. मनात आलं, गावातील बाया कशा आणित असतील खेपेला दोन-दोन घागरी भरून? आणि मध्यावर चापट दगड, मोठ्या दोन दगडांवर ठेवून जो ठेपा केला होता, त्याची महतीही लक्षात आली. तिथे घागर टेकायची. क्षणभर दम घ्यायचा आणि परत चढण चढायची. गरज आणि अडचणी माणसाला शहाणं करतात हे खरं.
 पारावर आता एक लंगडा माणूस येऊन बसलेला दिसला. त्याला पाहून दोघांनी रामराम घातला.
 "बाबा, गावात माणसं दिसत न्हाईत. किती वस्तीचं गाव हाय? बायाच दिसतात काम करताना." श्रीनाथने विचारले.
 "व्हय, व्हय कस्सं. तुज्या कापडांवरून सरकारी मानुस दिसत न्हाईस. मंग तुज्यापाशी बोलून काय उपेग? कस्सं? सरकारी असतास तर आमचं गऱ्हाणं तिकडं जाऊन गायलं असतंस, कस्सं?" त्या लंगड्या म्हाताऱ्याने उत्तर दिले.
 "बाबा आमी शेरातून आलाव. परळी अंब्याकडचे हाव म्हणा की. आमी बी बोंबलू की तुमच गाऱ्हाणं. आंब्याच्या तहसिलीत जाऊन." प्रकाश बाबांच्या जरा जवळ सरकत बोलला.
 लंगडा बाबा सांगू लागला.
 "अरं या दगडवाडीत शंभरावर घरं हाईत. हितं धनगर, हटकर, वंजारी लोकांची वस्ती लई. दोन बामनाची, दोन मारवाड्याची कामापुरती घरं कस्सं. आन् पाचसात आमा देशमुखाची आन् मराठ्याची. पाऽऽर पल्याड दोन कोसावर लमाणतांडा हाय. तांडा नि वाडी मिळून हजार बाराशे माणसांची वस्ती होती. पन आता मातूर पन्नासेक घरांना कायमचं कुलूप लागलया. बामन, मारवाडी शेरात हालले आहेत. थोडे देसमुख, हटकर पुन्या, ममईकडे गेलेत कायमचे. सकरांत झाली की धनगरं सांगली साताऱ्याकड मेंढरं घेऊन जातात. ती दोन पाऊस झाल्यावरी येतात पन गेल्या दोन वरसात कोनी फिरकलं नाय. तांड्यात असतील दोन चार घर, आन वाडीत धाईस. त्यांतही आमच्यासारखी लंगडी, लुळी, पांगळी, म्हातारी माणसं आणि लेकुरवाळ्या नायतर वयस्क बाया बापड्या, गावात कोनी खरचलं तर खांदा द्याया चार माणसं शोधावी लागत्याल.
.....
 बाकी तुमाले सांगून काय उपेग? आमचा अंकुश बी ग्येला की म्हाताऱ्या लंगड्या चुलत्याला मागं टाकून. वाडा आन् रान सांबाळाया बसवून. शंभर रूपये मातर दरमहा न चुकता पाठवतो. ...जरा हात देता का राजे हो. वाड्यात जाऊन बसतो. कस्सं?" श्रीनाथने हात देऊन उठवले कुबडी दिली.
 "बाबा नाव सांगा ना. विचारू ना?" प्रकाशने उदास आवाजात विचारले. "नावात काय आहे राजा? कस्सं? … मी रामराव देशमुख. देसमुखी कवाच बुडाली. पडक्या गढयांची माती बी इकून खाल्ली. नावाचं 'देसमुख' कस्सं?" असं म्हणत बाबा हसले आणि कुबडीवर भार देत, लोंबता लुळा… लटका पाय सावरीत घराकडे निघाले.
 'श्रीभैय्या पुढचं देवठाण, बांगरी करू नि माघारी फिरू. हे उजाड माळ, इथली बेसहारा… निराधार मानसं पाहून डोकं गरगराया लागलंय.' पक्याच्या शब्दात हताश उदासी होती. "पक्या उदासून कसं चालेल? देवठाण, भावठाण, यल्डा, साकूड, सोनवळा, ममदापूर.... डोंगरपिंपळा, सोमनवाडी… नाही नाही म्हटल तरी डोंगरातली तीसपस्तीस खेडी गाठायचीत चार दिवसात. अशक्या, डॉक्टर मोहन, शेख्या, ग्यानू
.... आपण सारेच आज रात्री एकत्र जमणार आहोत. एक टीक साकुडाकडे गेलीय तर दुसरी यल्डा भागात आणि चंदू, नारायण डोंगरमध्यातल्या ममदापूर, टोकवाडीत जाऊन येणारेत. आपण आज सोनवळा, डोंगरपिंगळा करून देवठाणला जाऊ आज रात्री मिटींगला पोचायचंय. ध्यानात धर. चल दसम्या खाऊन घेऊ. भुकेजलाहेस. श्रीभैय्याने दशम्यांची शिदोरी उघडली. लसणीच्या चटणीचा वास नाकातून थेट पोटात पोचला. बारके कांदे, भाजलेले शेंगदाणे, कैरीचा तक्कू. अनू गुळ तुप घालून केलेल्या दशम्या फार चांगल्या बनवते. सहाही दशम्या कधी संपल्या पत्ता लगला नाही. पक्याने मोटरसायकल सुरु केली. दगडगोटे, खाचखळग्यांनी भरलेला वाकडा तिकडा रस्ता पार करून ते दोघे सोनवळ्याच्या रस्त्याला लागले. रस्ता असा नाहीच. पांदीतून वाट होती. भवताली वैराण शेतं. नाही म्हणायला अधून मधून वेड्या बाभळी आपले पिंजारलेले काटेरी केस झुलवीत उभ्या होत्या. गेल्यासाली पंधार जून उलटला तरी पावसाचा टिपूस नाही नुसतं भरारा धावणारं वारं होते. यंदा काय होतं ते देव जाणे. सोनवळ्यात बैठक घेतली. एक जख्ख म्हातारी दोन बायांचा आधार घेत थरथरत आली.
 "लेकरा, आमा बुढ्यांची कायतरी सोय बघा. दोन्ही पोरं लेकरंबाळ घेऊन ममईला भाकरतुकडा शोधाया गेलीत. मला म्हातारीला कसे नेणार? या शेजारच्या बायांनी सांगितलं दोन दिसाला मोरचा की काई हाय म्हनं आंब्याला. लेकरा, आम्हा बुढ्यांना एकखट्या इख तरी घेऊन टाकाची सोय करा रं. आमच औक्ष तुमाले लागू द्ये बाबा पन काय तरी कर रे…" म्हातारीचं बोलणे ऐकूण क्षणभर सगळेच स्तब्ध झाले.
 "अे, सुभे वडीमायला न्ये तिकडं. हित लई महत्वाच्या गोष्टी बोलायच्यात." सोनवळ्याचे नरहर अप्पांनी गावच्या लेकीला सांगितले.
 बैठक संपली. डोंगरपिंपळयाला जायला श्रीचे मन तयार होईना. ते देवठाणला पोचले, तेव्हा सूर्य माथ्यावरून कलला होता. सहा साडेसहा वाजून गेले असावेत. मांगवाड्यातल्या विहिरीवर हंड्यांची रांग लागलेली होती. श्रीनाथ, प्रकाश खराताच्या वाड्याकडे वळले आणि गाडी थांबवली. फटफटीचा आवाज ऐकताच खरातभाऊ बाहेर आला.
 "वाटत पहात होतो, श्रीभैय्या तुमची. समद्यांना सांगावा दिलाया. तुम्ही साळंकडे जावा. म्या एक फेरी मारून पोचतोच तिकडं. आबा मालकांनी बत्ती, सतरंजी पाठिवलिया. आन् पल्याडच्या बांगरीत बी सांगावा धाडलाय. तितली मानसे बी हितंच येनार हाईत…?" किसनला मध्येच अडवित प्रकाशने सवाल केला.
 "दादा, ही एवढी लांबलचक हांड्यांची रांग? तुमच्या वस्तीत तर जेमतेम दहा घरची न्हाईत."
 'अरं' ही त्याची' करनी.' आकाशाकडे बघत खरातभाऊ बोलले. "गावातल्या समद्या हिरी आटल्या. फक्त साळं समुरची हिर आन् आमची हिर जित्या हाईत. पण साळंच्या हिरीतले झरे बी आटत चाललेत. आमच्या हिरीचं पानी मातर पार आटत न्हाई. बामणाची मारवाड्याची नि देसमुखाची पाचदहा घरं सोडली तर आख्खं गाव हितं येत पानी भराया. किसनने आभाळाकडे पाहात श्रद्धेने हात जोडले… आणि धावत्या चालीने गावाकडे वळला.
 शाळे समोरच्या विहिरीजवळी बायांची तुफान गर्दी होती. दोन चार गडी मानसं होती. सारीजण विहिरीत वाक्-वाकून पहात होती. श्रीभैय्याही विहिरीजवळ गेला त्या खोल…खोल विहिरीत पाहून त्याला धक्का बसला त्या खोल खोल विहिरीत एका चिमुकल्या सात आठ वर्षाच्या मुलीच्या कमरेला दोर बांधून, बादलीत बसवून विहिरीत सोडले होते. लहान वाटीने ती पाणी घागरीत भरून देत होती. पाणी असेल जेमतेम पाऊल भर. श्रीनाथ माघारी फिरला. शाळेच्या ओसरीत टाकलेल्या जाजमावर जाऊन बसला. गावकरी त्या भागातल्या तक्रारी सांगत होते.
 "दादा, देवठाण्याहून आडलेली बाई आंब्याच्या दवाखान्यात बाजेवर घालून नेतांना उशीर झाला, तर तिरडीवर ठिवावी लागली ती बाज. कंदी व्हावा रोड? खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी गत. कंदी व्हावा रोड? किंतीन दिस तंगडीतोड करावी.
...
 "कंदी यावी यष्टी?"
 "कंदी याव्या लाईटी?"
 "आमच्या घरची पोरं चौथी झाली की बसनार घरी. मास्तर बरा हाय, गावतलाच हाय म्हणून बरं. पन सातवी, मॅट्रिक काढायची तर पळा परळीला नायतर केज, आंब्याला जावं लागतं. तिथं खोली करायची. भाकर करून खाऊ घालण्यासाठी बाईमाणूस ठेवा. हा दाम दुप्पट खर्चा आमाले कसा परवडावा?"
 "चौधरी मास्तरानी, आजवर गावकऱ्यांचे धा अर्ज दिले… असतील तालुक्याला पण गेले असतील कचरा कुंडीत!" लोक अडचणींचा पाढा वाचत होते. काही बाया दूरवर उभ्या राहून पहात होत्या. त्यांना किसनदादांनी हाक घातली.
 "या…या. शेवंतामावशी याना. तुमची बी फिरयाद घाला शिरीभैय्यांच्या कानावर."
 डोईवरचा पदर आदबीने पुढे ओढून, अंगभर पदर घेऊन शेवंतबाई आणि सहा सात जणी पायऱ्या चढून ओसरीवर आल्या. थोड्या बाजूला बसल्या.
 "दादा पाण्याचे हाल तर हायेतच, पन पोरी कमी शिकलेल्या म्हणून चांगली पोरंबी मिळनात लगिन करायसाठी. आजकाल शेरातल्या पोरी शिकाया लागल्याता. सातवीपसवर तरी साळा हवी बगा." एक जण बोलली.
 "दादा पाण्याचे हाल हाईतच, पण दारूचा लई ऊत माजलाय. आज तुमी आलाव, म्हणून समदे शुध्दीवर हाईत. नायतर एव्हाना तर्रऽऽ होऊन बसणार. मंग पैशासाठी… तिखट भाजीसाठी बायकूला बदड. पोरांना मार. घरातली भांडी बासनं ईक …"दुसरीने पुस्ती जोडली.
 "व्हय माय. त्याचा बी कायतरी बंदोबस्त करा दादा." तिसरी.
 श्रीनाथने सगळे ऐकून घेतले. चोविस एप्रिलच्या मोर्चात गावातील झाडून सर्वांनी सामिल होण्याचे आवाहन केले. भाकऱ्या बांधून आणायला सांगितले. रात्री 'बदलाव' चे कार्यकर्ते मंगळावारातल्या शिवाप्पांच्या घरात जमले. सर्वच खेड्यातल्या अडचणी सारख्याच होत्या. पिण्याच्या पाण्यासाठी दोन दोन कोस चालून पाणी आणायचे. खेडी ओस पडत चाललेली. मोर्चातील मागण्याचे निवेदन तयार केले आणि काहीशी लांबलेली बैठक संपली.
 श्रीनाथ घरी पोचला तेव्हा रात्रीचे दोन वाजून गेले होते. तो आत आला आणि घड्याळात दोनचे टोल पडले. आजची बैठक खूप लांबली. तहसील मोमिनाबादला असल्याने मोर्चा मोमीनाबाद ऊर्फ अंबाजोगाईत… आंब्यातच निघणार होता. तेथील कार्यकर्त्यानी झुणका, चटणीची जबाबदारी घेतली होती. महाविद्यालयातले प्राध्यापक, विद्यार्थी जोमाने कामाला लागले होते. गेल्या चार पाच वर्षात श्रीनाथने चांगला गट तयार केला होता. पाच पंचवीस पोरं हां हां म्हणता जमा होत. शासनाला जाब विचारणाऱ्यांची, अभ्यास करणाऱ्यांची आणि संघर्षाला तयार असणाऱ्यांची फळी निर्माण व्हायला हवी असे श्रीनाथला नेहमी वाटे. त्याची ही सुरूवातच जणु.

 अनू गाढ झोपली होती. श्री ने तिच्या डोळ्यावरचा चष्मा काढून खिडकीत ठेवला. हातातलं पुस्तक काढून शेल्फमध्ये ठेवलं. आणि त्याने दिवा मालवला. पण डोळ्यासमोर डोक्यावर दोन दोन घागरी घेऊन चढ चढून येणाऱ्या बाया, खोल विहिरीत बारक्या पोरीला उतरवून, वाटी वाटीने पाणी भरून वर ओढल्या जाणाऱ्या घागरी आणि मरण मागणारी ती म्हातारी माय… आलटून पालटून येत होते.

४.





 गोविंद दादांचा आवाज ऐकून आंजा झोपडीच्या बाहेर आली. देवठाणचे गोविंद दादाच होते ते. 'अंकुशा…अंकुशा' अशी हाक देत होते. पदराला हात पुशित आंजा झोपडी बाहेर आली.
 "दादा, या ना. कवा आलात? सोनूचे पप्पा दादरला कामागवर गेलेत. सांजच्याला येतील. दमा, मी खुर्ची टाकते." असे म्हणत ती आत गेली. खुर्ची आणून अरूंदशा अंगणात ठेवली. डोक्यावर आदबीने पदर घेऊन दादांच्या पायाचे दर्शन घेतले. लगबगीनी झोपडीत जाऊन स्टीलचा पाण्याचा तांब्या आणला. ग्लासमध्ये पाणी ओतून दादांना दिले. गिलास नगं तांब्याच दे असे म्हणत दादांनी तांब्या हातात घेतला आणि ते गटागटा पाणी प्यायले. त्यांच्या हातातला तांब्या घेत "दमा म्या च्या टाकून येते" असे म्हणत आंज्या परत आत गेली.
 "कशी आहेत गावाकडची सगळी जण? दगडवाडीला कंदी गेला होता? लई आठवण येते समद्यांची. तुमचं कसं येणं झालं इकडे?" दादांच्या हातात चहाचा कप देत तिने अनेक प्रश्न समोर टाकले. दादा हसले, "हाईत समदी बरी. तुमी कसे हाव ते सांग. रूळलीस का या ममईत? झोपडी किरायाची का? आन् शिवा जवळच राहतू का?" चहाचा कप खाली ठेवत गोविंद दादांनी विचारले.
 "व्हय, पोटाला कालवणा संगट दोन कोर भाकर मिळतेय. दोन पैसे बरे मिळताहेत. मग रूळावलाच हवं की हितं. शिवादादांनीच दिलीया ही झोपडी. इथून दोन ठेसनं गेली की दादर लागतं. तिथल्या बिल्डींगीच्या ईटकामाचं कंत्राट शिवादादांनी घेतलय. सोनूचे पप्पा त्यांच्या हाताखाली काम करतात. आपल्या तिकडचे पंधरा-एक घरांतले बाप्ये आलेत इकडे. माझ्या सारख्या सातजणी बायापण आहेत. आमी
लेकरंबाळं घेऊन आलेल्यांना झोपड्या दिल्याता. इथून जवळच रस्त्याच्या पल्याड बिल्डिंगा दिसतात नव्हं? तिथ मी बी काम करत्ये. आज सुट्टी घेतलीय. म्हणून भेट तरी झाली. सोनूला जवळच्याच सरकारी पाळणा-घरात सोडते. तिथे महिन्याला पंचवीस रूपये भरावे लागतात. चार घरी मी झाडू पोछा आणि पोळ्या करते. महिन्याला आठशे रूपये मिळतात. समदी घर जवळच हायती…"
 "... पण, दादा गावाकडची लई आठवण येते वं. माझंच पुराण सांगत बसले मी! तुमी हितं कसं येण केलंत? ते सांगा." खालचा कप उचलत आंजाने विचारले.
 "रातच्याला येतो की. अंकुशाला सांग. समदेच भेटतील. मंग सांगतो का आलो ते. हितंच टाकीन पथारी. जवळच यष्टीचा थांबा हाय वाटतं?" असं म्हणत खांद्यावर पिशवी अडकवून दादा बाहेरच्या गर्दीत दिसेनासे झाले.
 सायन जवळच्या या झोपडपट्टी येऊन वरीस उलटून गेलंय. सुरवातीला लई जड गेलं. पाण्यासाठी रांगेत उभं राहणं एक वेळ परवडलं. पण संडासला जायचं म्हणजे नरकात जायचं. गावकडे पांद होती. मोठमोठ गोटे होते. इथे काय? रस्त्याच्या कडेची गटार नाही तर रेल्वेच्या कडेची गटार पाहायची नि बसायचे. डोक्यावरचा पदर तोंडावर ओढून घ्यायचा. आंजाच्या झोपडपट्टीतल्या बाया रात्री निजानीज झाली की बाहेर जाऊन उरकून येत. आंजाला आता त्याची सवय झालीये.
 तिने खाली काढलेला स्टोव्ह निटपणे ठेवला. शेजारी दुधाचं भगोनं ठेवलं. त्यावर मोठं भगोनं पालथं घातलं. मांजरीची भीती. भाजीच्या टोपल्यावर फडकं ओलं करून चहुबाजूंनी झाकून टाकलं. पैशाची बारकी पिशवी कमेरला खोचून ती झोपडीच्या बाहेर आली. आणि तिने झोपडीला कुलूप घातले. शेजारच्या छगूला सांगून ती दादरला निघाली. गेल्या दीडदोन सालात रोजचे पेपर वाचायची सवय झालीय. परवाच्या लोकसत्तेत जाहिरात आलीय. तीन वृध्द व्यक्तींची देखभाल करण्यासाठी महिला हवी. तिच्या कुटुंबातील पुरुषास रोजगार मिळेल. मात्र, कुटुंब निर्व्यसनी हवे. कुटूंबात पाहूण्यांची ये जा नको. आणि पत्ता शिवाजीनगर, दादर असा होता. दादरचौपाटीच्या अलिकडच्या रस्त्याच्या मधल्या बोळात एक टुमदार बंगला होता. बंगल्यावर बोर्ड होता. अंदाज घेत तिने बंगल्याच्या फाटकावरची बेल दाबली.

 आंजा अंकुशाची कधीची वाट पहातेय. पण त्याचा पत्ता नाही. अंधार पडलाय. दोन आनंदाच्या बातम्या त्याला द्यायच्या आहेत. पहिली बातमी देवठाणचे गोविंद
दादा आल्याची आणि दुसरी तिच्या नव्या नोकरीची. दादरच्या त्या बंगल्यात दोन म्हाताऱ्या बाया आणि एक म्हातारे दादा राहतात. एक म्हातारी पासष्टीची तर दुसरी नव्वदीच्या पल्याड पोचलेली. आणि म्हातारे बाबा सत्तरीचे. वझे साहेब आणि वैनींचे दोन्ही मुलगे परदेशात असतात. इथे ही तीन म्हातारी माणसे. नव्वदीच्या आईचे सारे जिथल्या तिथे करावे लागते. त्यासाठी मजूरीण हवी होती....
 … वांगी शिजली, वरण भात शिजला. पण अजून सोनूच्या पप्पांचा पत्ता न्हाई. आंजा वैतागली आणि चपात्या टाकाया बसली. सोनू भात खाऊन झोपली आहे. चपात्या डब्यात भरून ठेवल्या नि काटवट धुवायला ती बाहेर आली. अंकुश, शिवादादा, गोविंददादा आणि एक दोघे अनोळखी गडी रस्ता ओलांडताना दिसले. पुन्हा चपात्या टाकाव्या लागणार आणि भाजीला वाढवा द्यावा लागणार. अंजाच्या मनात आलं. तिने लगेच डेचक्यातल पाणी भाजीत ओतलं. भाकरीच्या पिठाचा डबा बाहेर काढला.
 "अंजा कॉट खालच्या घडीच्या खुर्च्या काढ नि दे बाहेर. शिवादादा बी इथंच जेवतील…" अंकुशाने झोपडी जवळ जाऊन मोठ्याने सांगितले.
 "ताटं तयार करून भाईरच देते. यावा आत." आंजाने अंकुशाला हाक दिली. जेवण झाली. आजांनेही दोन घास खाऊन घेतले. बाहेर प्लॅस्टिकच्या पट्टयाच्या घडीचा कॉट टाकला आणि तीही बाहेर येऊन बसली.
 "अंकुशा, 'बदलाव तरूण इकास' मंडळाशी पवार साहेब बोलणार हाईत उद्या. आपल्या गावातले चाळिस-पन्नास लोक आलाव आमी. गेल्या साली रोजगाराची काम सरकानं काढली पण पोटं फुगली मधल्या मुकदमांची. केज - धारूर रस्ता पयल्यापासून हाय. पण आता केज- आडस - देवठाण असा मधला रस्ता बांधाया घेतलाय. पण रस्ता कागदावरच. तो काळाढुस्स मोपलवार आठवतो का? त्याच्या मायानं लोकांची भांडी घासून पोराला शिकिवलं. तो झालाय मुकादम. त्याची मजूरांची यादी बी आणलीय बाप्पा देसमुखानं. पवार सायबांना दाखवायला. अव जी माणसं जलमीच न्हाईत त्यांची नाव हाईत यादीत. नितीन गडदे, शैलेश सोनर, संगीता पाटील… अशा फेसनबाज नावाच्या पोरांनी कंदी खंदाव्या बराशी? कसे फोडावे दगड? गवाच्या कवा सर्गात पोचल्याली म्हातारी मानसं बी दावलीत त्या यादीत. तुझा आजा पांडवा किसन देसमुख, माजा बाप तुकाराम इठोबा गुंजाळे…समदे बराशी खंदाया हजर
होते." गोविंद दादा सांगत होते. ऐकणाऱ्यांची हसाव की रडाव अशी गत.
 "अंकुशा, ल्येका तू गेला संकरातीनंतर त्या नंतरच्या सालीच बाबासाबाची जयंती झाल्यावर २४ एप्रिलला लई मोठा मोर्चा काढला आमी बदलाव तरूण इकास मंडळानी. पाच-दहा हजार माणसं असतील, तीन हजारावर बाया असतील मोर्च्यात. मिरग आला नि न बरसता ग्येला. आर्द्रा आल्या नि गेल्या. या साली हस्ताचा पाऊस आला. पण तो लोखंड्या हस्त. समदी जिमिन गच होऊन बसली. शेतकऱ्याला आशा असते वो. तशा दुष्काळात जमीन नीट नेटकी कराया झटला. मंग बदलाव तरून इकास मंडळानी ठरिवलं की मोर्चा काढायचा आन् डेपूटी कलिक्टराच्या हापिसावर हल्ला बोल बोंबलायचं. येक टोक हापिसात होतं तवा दुसरं टोक भर बाजारात होतं. समदे लोक भाकऱ्या बांधून आलेवते. बदलावच्या पोरांनी झुनका नि मिर्चुचा ठेसा दिला. म्हाताऱ्यांसाठी खिचडी केली होती. आपल्या देवठाणच्या शेवंतामावशी, दगडवाडीची राणूमाय, भामरीची उषा मास्तरीण यांनी ऐन वेळी भासणं ठोकली. शेवंता मावशीनं तर गानं जुळवून म्हटलं."

हाताला न्हाई काम, कनवटीला न्हाई दाम
पोटात न्हाई भाकर, च्यात न्हाई साकर
अन सरकारा, नकोस मारू गमज्या,
आंदी खाली उतर...

 मंग राणूमाय कशी व्हावी मागं.

जिमनीचा घसा कोरडा, घरात पोरांचा उताडा
मालक ओढतो कोरडा, दारू पायी इकला वाडा
अरं सरकारा, दारूचा माठ तुमी फोडा
नायतर खाली उतरा...

 लई झ्याक झाला मोर्चा.
 "अरं गोईंदा खेड्यातल्या बायांना काय अक्कल नसती? लई हुशार नि बेरकी असतात बरका, भाकर तव्यावर टाकली तर त्याचीच पचते अन् फिरते. कालवण बी त्यांनीच करावं. अरं म्हणून तर हा रेसमी शालू बांदून ठिवावा लागतो बासनात. येगवेगळ्या पक्षांची माणसं बी आली असतील मंग." शिवादादांनी विचारले.
 "आले की समदेच. जनसांघ, काही कांग्रीसची मानसं, सोसालिस्ट आंबेडकरवाले
समदेच आलेत. पण म्होरक्या शिरीभैय्याच. आरं आपल्या भागातील लई माणसं पुन्या ममईकडे येतात. का तर जमिनी कोरडवाहू. गेल्या चार सालापासून दुसकाळाचा फेरा. आपल्या मुलखात शंभरातली ऐंशी हिस्सा जिमीन मोठ्या तालेवार शेतकऱ्यांकडं असती. आन् त्यांची संख्या शंभरात जेमतेम पंधरा. ते हिरी पाडू शकतात. पैसा असतो त्यांच्याकडं. आन् शंभरातली वीस हिस्सा जमीन आपल्यासारख्या दीड दोन एकरवाल्या शेतकऱ्याकडं. आपन छोटे शेतकरी सत्तरटक्के. बिगर शेतीवाले शंभरात. जेमतेम पंधरा." गोविंददादांनी ठेक्यात सांगितले.
 "व्हय, व्हय, घरी लेकीचं लगीन काढलं, नाय तर बुढ्या माणसांची मौत झाली तर पैसा लागणार. धा-वीस हजाराच्या आसपास. अशा वेळी जवळ विकाया काय असतया? मग काढा जमीन. घाला सावकाराच्या घशात. अवं अशा वेळी कालचा लहान काश्तकार रस्त्यावर येऊन उघडा व्हतो." अंकुशाला गोविंद दादाच बोलण पटलं. अन् त्याने आपले मन मोकळे केले.
 "अंकुशा अरं तुझ्याच तोंडचे शब्द श्री भैय्या बोलतात. ते म्हणतात, आजचा लहान शेतकरी उद्याचा भुमिहीन मजूर बनून देशोधडीला लागतो. ममई पुण्याच्या झोपडपट्टीतील कुटुंबाची माहिती काढली तर लक्षात येतं की हजारो मजूर बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातून आले हायेत. मराठवाड्यावर अडिचशे वर्ष निजामाने सत्ता गाजविली. सामान्य शेतकऱ्यांसाठी, बलुतेदारांसाठी कोणत्याही योजना आणल्या नाहीत. रझाकाराच्या धामधुमीत माणसं भरडली गेली. बायांना सूर्यदर्शन व्हत नव्हतं. आपला भाग भारतीय स्वातंत्र्यानंतर तेरा महिन्यांनी निझामाच्या जोखडातून बाहेर आला. महाराष्ट्रात आमचे पाच जिल्हे घालण्यासाठी आमी हट्ट धरला. त्याला बी आज वीस वर्षे होऊन गेली तर काय मिळालं आपल्याला?...अं.." बोलताना गोविंददादांना धाप लागली.
 "दादा शांत व्हा. तुमचा प्रत्येक शब्द खरा आहे. पण आता बाप्पा श्रीभैय्या आणि अनेक तरूण या प्रश्नाला भिडले आहेत ना? अशा वेळी आपण खेड्यातल्या लोकांनी त्यांच्या बरोबर व्हायला हवं." दादांना शांत करीत अंकुश बोलला.
 "व्हय व्हय.... अरं तुझ्यासारखी थोडंफार शिकल्याली पोरं ममई, पुण्याकडं बराशी खंदाया येऊन बसली तर त्या शेरातल्या जाणत्या पुढारी पोरामागं काय आम्ही खेड्यातल्या बुढ्यांनी जायच?" अंकुशाचा हात झटकीत गोविंद दादा बोलले. पुन्हा
कोणीच बोलेना. जो तो उठून मुकाट झोपडीकडे गेला.
 अंकुशच्या हातात दोन उशा आणि चादरी देत आंज्याने गोविंददादांना हटकले, "दादा तुमची समदी चर्चा राजकारणाची. गावाकडचं सांगानं काही. आमचे काका कसे हायीत. शिवादादाची थोरली कारभारीन कशी हाय. त्यांचं मोठं पोरगं आंब्याच्या योगेसरी शाळत घातलं म्हणं. भोसल्याची गया मावशी गडदेमामाची राणूमाय…सगळ्यांची लई आठवन येती हो…"
 "हाईत समदी बरी… आंज्ये एकांदी चक्कर करा दिवाळीच्या टाईमाला. परत्यक्ष भेटा. लई झोप याला लागली. घे लावून दार." असं म्हणत त्यांनी रस्ता पार केला.
 दादरच्या बंगल्यातल्या नोकरीची चांगली बातमी सोनूच्या पप्पांना सांगणार कधी? उद्या सकाळी सांगू असं मनाशी म्हणत आंजाने दोन चटया बाहेर दिल्या आणि ती आडवी झाली.
 .... निळाईतून एक घागर नि एक बारकी बिंदगी पाणी आणताना तिची दमछाक होई. चार खेपात ती पार गळून जाई. तरी अंकुशा माणुसकीचा नवरा. चढाव चढून आली की तो बाकीचा रस्ता काटून पाणी घरात नेऊन टाकी. यंदाही पाऊस नेटका झाला नाही. भेगाळलेलं उजाड, चारदोन बाभळीची झाडं उभी असलेलं त्याचं शेत,... रान डोळ्यासमोर आलं. जिमीन किती तहानली असंल. तिच्या अंगावरून गेल्या दोन बरसांत कुणाचा हात फिरला असेल…? विचार करता करता केव्हा तरी आंजाचा डोळा लागला.
 'आंजे मी आज कामावर जाणार न्हाई. शिवादादांना सांगितलंय. गोविंददादा बरोबर शिरी भैय्यांना भेटून येतो.' अंकुश बाहेर जाताना आंजाला सांगत होता.
 "आवऽऽ मिनिटभर थांबा. दादर चौपाटी समूर वझे सायबांचा बांगला आहे. त्यात तीन म्हातारी माणसं राहतात. त्यात एक नव्वदीची जख्ख आजी आहे. जिचं सगळंच जिथल्या तिथे कारावं लागतं. चोविस तास माणूस पायजे. राहायला खोली त्ये देणार. नि वर पाचशे रूपये. मी छान सेवा करीन म्हातारीची. दादरहून तुम्हाला पण जवळ ऱ्हाईल कामाची जागा. मी काल बोलून आले. आज दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना फोन करून काय ते सांगावं लागेल. सोनूला पण वळण बरं लागेल. होय? सांगा काय ते…" आंजाने विचारले.
 "तुला जे पटेल ते कर. पण उद्या तुझं काम त्यांच्या मनाला आलं नाही तर… विचार करून सांग माझी ना नाही".... अंकुश निघून गेला.
 मुख्यमंत्री वसंतदादा यांना वेळ नव्हता म्हणून पवार साहेबांनी श्रीभैय्या, बाप्पा देशमुख, आण्णा, अशोका, कौसडीकर पाटील आदि शिष्टमंडळाचं निवेदन मुख्यमंत्र्यांच्या वतीने स्विकारलं. आणि मोजक्या आठ दहा जणांना चर्चेसाठी बोलावलं. बाप्पांनी अंकुशालाही येण्याचा आग्रह केला आणि तो गेला. एक गाव एक पाणवठ्याच्या दौऱ्यात श्रीनाथ आणि पवार साहेबांची ओळख झाली होती. त्यांच्या मनात पवार साहेबांबद्दल विश्वास होता.
 श्रीभैय्या आणि बाप्पा देशमुख सर्वाच्या मनातले दुःख पवार साहेबांच्या समोर मांडत होते. दहावी बारावी पास झालेल्या डोंगरातल्या तरूणांच्या शेताला पाणी नाही. उच्चशिक्षणासाठी शहरात ठेवायला बापाजवळ पैसा नाही. धोब्याच्या कुत्र्यासारखी गत. न घरका न घाटका. याचं जित्तं उदाहरण म्हणजे अंकुश. त्यातून तो विचार करणारा. वर्तमानपत्र वाचणारा आहे. गोविंददादांनी साहेबा समोर जितं उदाहरण ठेवलं अंकुशाचं. मुंबईत आल्यापासून तो बोलतोही नेमकं आणि बिनतोड. म्हणूनच त्याला सोबत घेणे गोविंददादांना महत्वाचे वाटले होते.
 'दादा मी डोंगरातल्या दगडवाडीचा. धा एकराचा मालक. पण जमीन उताराची, दगडांनी भरलेली. ते दगड वेचून पौळ भरून पाणी आडवावं अस दहांदा मनात येई. पन त्यालाही पैसा हवं. बहिनींना उजवतांना घरातली भांडीकुंडी, बैल, औत इकले. हीर हाय पन पानी नाही. चार साल पानी पडलं नाही. खानार काय? शेवटी उचललं गठूड आन् आलो हितं. बारावी सायन्सला बावन टक्के घेऊन पास झालो. पन पुढे शिकाया पैसा हवा. आता करतो गवंडी काम. पन दादा आमची नाळ… आमचं मन गावाच्या मातीत पुरलंय. कंदीतरी गावाकडे जायचं सपन रोज उराशी घेऊन झोपतो. माज्या सारखे अनेक हाईत.' अंकुशचा आवाज बोलतांना जड झाला. रोजगार हमीच्या कामातही कसा भ्रष्टाचार चालतो याचे पुरावे बाप्पांनी समोर ठेवले. रस्ता केला तर तो दोन दिवसात परत होत्याचा नव्हता होतो. रोजगारासाठी काम गावापासून दोन किलोमिटरच्या पेक्षाही लांब असेल तर बायांना फार त्रास होतो. बायामध्ये नव्वद पंच्च्यानव्व टक्के अंगठा उठवणाऱ्या, त्यांचा अंगठा आठ रूपयावर घेतात पण हातात सहा रूपयेच पडतात. या कामावर साठ ते पासष्ट टक्के बायाच असतात.
त्यांच्या लेकरांचे पण कसे हाल होतात. साऱ्या अडचणी पवार साहेबांनी शांतपणे लक्षपूर्वक ऐकूण घेतल्या आणि त्या दूर करण्याचे विशेषतः पाळणाघर, अंगणवाडी कामाच्या जागी सुरु करण्याचे व काम दोन किलोमिटर पेक्षा दूर न ठेवण्याची शिफारस करण्याचे आश्वासन दिले. जाताना अंकुशाच्या पाठीवर दिलाशाची थाप दिली.
 अंकुशाला त्याच्या दादांनी चौथीनंतर बनसारोळ्याच्या शाळेत शिकायला ठेवले होते. महिना पंधरा रूपयात जेवण आणि शाळेची फी. त्यामुळे अंकुश दहावीपर्यंत तिथे शिकला. दहावीत चांगले गुण मिळाले. परळीच्या सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला खरा. पण तिथे वसतीगृहाची सोय नव्हती. खोली करून चौघे राहत. घरून येताना जवारीच पीठ, तांदुळ, दाळ घेऊन येत. हाताने रांधून खात. सकाळी सातलाच कॉलेजला जावं लागे. प्रयोगशाळेतील तास आटोपून घरी यायला संध्याकाळ होई. भाकरी नि तेल तिखट कांदा, नाही तर तव्याररचा झुणका असा दुपारचा डबाबरोबर घ्यावा लागे. रात्री मात्र डाळ भात नाहीतर भाजीची संगत लागे. पोटात भूक ठेऊन पुस्तकातही मन बसत नसे. त्यात संक्राती अगोदर दादांना बुळकी लागली. डॉक्टरच औषध मिळण्याआधीच अंगातलं पाणी कमी झाल्याने होत्याचे नव्हते झाले. तो दुःखाचा तडाखा जबरदस्त होता. आई तर आठवतच नाही. अंकुश नंतरच्या बाळंतपणात बाळबाळंतिण दोघेही दगावले होते. मूल आडवं आलं की बाईचं जगणंच संपलं. गावातली मन्नादाई तिला जमेल ते उपचार करी. पण अशी अडलेली एखांदीच वाचायची. अंकुशची आई मूल आडवे आल्यामुळेच मरण पावली. माय गेल्यावर त्याच्या दादांनी दुसरे लग्न केले नव्हते. अंकुशाने परीक्षा दिली पासही झाला. पण जुन्या रितीरिवाजानुसार चुलत्यांनी वर्षाच्या आत अंकुशचे लग्न करून दिले. अंजनी काळी सावळी पण नववी पास झालेली. लगीन झाल्यावर आडीच वर्षांनी सोनूचा जन्म झाला. एकोनसत्तर पासून पाऊस वेळेवर झालाच नाही. जुलै उजाडला तरी पावसाला सुरवात नसे. आगाताचे डोंगरात येणारे पीक म्हणजे पिवळा आणि उडीद. त्याच्या दहा एकरात धोंडे गोटेच जास्त. जेमतेम दीड एकर बरे रान होते. बाकी सगळे चढ उताराचे. पाऊसकाळ संपायला आला की हस्त दणदणा बरसून जाई. लोखंड्या हस्त पडला की जमीन गच्च होऊन जाते. लागोपाठ दोन वर्षे फार जिकरीची, कठिणाईची गेली. शेवटी लंगड्या रामकाकाला गावी सोडून तो
मुंबईला आला. रामूकाकाच्या खर्चासाठी दरमहा शंभर रूपयाच्या हिशोबाने तो येत्या जात्या सोबत पैसे पाठवी. तरीही काकाची आणि जमीनीची आठवण त्याला सतावित राही.
 … मुंबई - परळी गाडी यायला अवकाश होता. संध्याकाळचे सात वाजून गेलेले होते. निवेदन घेऊन आलेल्या बहुतेक लोकांना मनमाड पॅसेंजर मध्ये बसवून पाच सात लोक एस.टी.ने जाणार होते. मनमाडहून पुढे काचिगुडा पॅसेंजर ने परभणी गाठायची. पुन्हा पूर्णा परळी या रूकुटूकू ब्रॉडगेज गाडीने परळीला जायचे. मग पुन्हा एस.टी. चा घंट्याचा प्रवास. ही माणसं परवा सकाळपर्यंत गावाकडे पोचली असती. उद्या महत्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे चौदा तासांचा एस.टी. चा खडतर प्रवार करून श्रीभैय्या, बाप्पा, गोविंददादा यांना परळी गाठायचे होते.
 शिवादादांनी सर्वाना हॉटेलात पुरीभाजी खायला नेले. तिथेही गप्पा त्याच.
 "भैय्या, माज्या शेतातली दीड दोन एकर जमीन जरी भिजली असती, तरी मी गाव सोडलं नसतं. इथेही कष्टच करावे लागतात. बिना कष्टाची भाकरी फक्त सावकार, सरकारी नोकर आन पुढाऱ्यांच्याच ताटात पडते. पाण्याची कायतरी युगत शोधा. पन् … हे समदं लवकर व्हाया हवं दादा." अंकुश क्षणभर थांबला आणि दूरवर पहात पुन्हा बोलू लागला.
 "...ही मुंबई.... इथलं राहणं, इथला झगझगाट एकदा का डोक्यात भिनला की तो उतरणं कठीण. इथे आल्यावर खूप नवे इंग्रजी शब्द शिकलो मी, माणसं दारूशी जशी 'ॲडिक्ट' होतात तशी ही मुंबईच्या 'हवे' शी पण ॲडिक्ट होतात. हितलं बरंमाळं जगणंच गोड वाटू लागतं.
 येत्या काही वर्षात जर पाऊस पाणी बक्कळ झालं, माज्या शेताला पाणी लागलं तर मी सगळं सोडून दगडवाडीला येईन. हिरीसाठी पैसे पण साठवीन." अंकुशने मनातली बात बप्पा, भैय्याजवळ मोकळी केली. बप्पा हसले. अंकुशला पाठीवर प्रेमाने थोपटत म्हणाले, "बेटा, 'देर है, अंधेर नहीं' एक दिवस आपल्याला नक्कीच सूर्य दिसेल."
 घरी परततांना अंकुशच्या डोळ्यासमोर कितीतरी प्रसंग, माणसे तरळून गेली. मुंबईत आल्यापासून पेपर हाती पडला की तो वाचून काढी. त्यांच्या झोपडपट्टीत टाटा कॉलेजातली पोरं पोरी गेल्या वर्षापासून दर मंगळवार, शुक्रवारी येतात. घराघरात
जाऊन तेथील बाया, लेकरं यांच्याशी गप्पा मारतात. त्यांना मदत करतात. पाळणाघर सरकारला काढायला लावलंय. त्या जागेत सायंकाळी वर्तमानपत्रं वाचायला सोय केली आहे. अंकुश घरी येण्यापूर्वी तिथे जातोच. मुंबईत आल्याने जग किती प्रचंड मोठे आहे हे पेपर मधून कळते. मुंबईचीही आता सवय व्हायला लागलीय, हेच खरं. आंजा सोनूला आणायला बालवाडीत गेली की शेजारच्या खोलीतली वर्तमान पत्रे वाचायला चुकत नसे. आसपासच्या बायांना जमवून तिने भिशी सुरु केली होती. महीन्याला दहा रूपये प्रत्येक जण जमा करी. महिन्यातल्या पहिल्या रविवारी सायंकाळी सगळ्या जमत. गप्पा मारीत. बाराजणींच्या नावाच्या चिठ्ठया आंजाने केल्या होत्या. एखाद्या लहान लेकराकडून चिठ्ठी काढली जाई. तिला एकेशवीस रूपये मिळत. मग तिच्या नावाची चिठ्ठी फाडली जाई. या निमित्ताने गावाकडची खबरबात पण कळे. कुणी ना कुणी गावाकडे जावून येई.
 आंजा कामाला जाई त्या कमला दिदी खूप प्रेमळ होत्या. अजमेरजवळ त्यांचे माहेर होते. दादांची नोकरी मुंबईतली ते रोज चर्चगेटला जात. दिदी महिन्यातून चार दिवस स्वयंपाक करीत नसत. मग त्यांनी आंजाला चपात्या नि फलके करायला शिकवले. त्यांना बाळ येण्याची चाहूल लागल्यावर आंजाला चपात्या करायला सांगितले. शंभर रूपये पगार पण वाढला.
 गेल्या सालची पहिली पंचमीतर सुनीच गेली. यंदा पंचमीला भिशीतल्या बायांनी रात्री भुलईचा फेर धरला.

पंचमीचा सण नागोबा वेगीला
मुऱ्हाळी यावा मला, पाठी भाऊ ग मागीला…
वेडा बागडा भाईराया बहिणाला असावा
चार आण्याची चोळी, एका रातीचा विसावा…

 भवतालच्या बायापण जमल्या. त्याही फेरात आल्या. एकीने सासुरवाशी भारजाचे भुलईचे गाणे म्हटले. एक तेलंगणातली प्रौढ अम्मा पुढे आली. तिनेही पंचमीचे वेळी फेरात म्हटले जाणारे गाणे म्हटले. सासू ऐवजी भावजय नणदेला कसे छळते, ठार मारून पुरते त्याची कथा सांगितली. त्या पुरलेल्या ढिगाऱ्यावर रंगीबेरंगी सुंगधी फुले फुलतात. त्या बाईची धाकटी बहिण ती फुले तोडायला जाते तर तिला बहिणीचे गाणे ऐकू येते.

मुट्टकु मुट्टकुओ येल्ले । मुहिनी चेत्रकु यलाले
पद्दीना चेतिकी पवडालू। पाकरी मा अत्ता
पामु ओंडी पेट्टींदी....

गाण्यातून भावजय आणि सासूही कसा त्रास देते ते ती बहीणीला सांगते.
 …ते गाणे आंजाला खूप लागून राहिले. तिच्या मनात आले. मला तर सासू नाही की सासराही. नणदांनी कधी वाकडा बोल लावला नाही. केलं कौतुकच. मग बाकीच्या सया आपापल्या कहाण्या सांगू लागल्या. बारा वाजून गेले. सगळ्याजणी आपापल्या झोपड्यांत परतल्या. पण नवा मैत्रीचा धागा गुंफून.
 आंजा मुंबईत चांगलीच रूळली. तरी घरची, बहिणीची, बाप्पांची याद येईच…
 अंकुशाला जेवायला वाढतांना आंजाने सांगून टाकलं की दादरच्या साहेबांच्या घरातलं इस्त्रीच्या सारखं कडक बंद वातावरणात आपला जीव घुसमटेल असं तिला सारखं वाटतं. इथे वस्तीत बायामाणसांची कचाकचा भांडणं झाली तरी त्यांत मनातला ओलावा आहे. एकमेकांना सांभाळून घ्यायचा रिवाज आहे. तिने फोन करण्याचे टाळले होते.
 अंकुशला तिचा निर्णय ऐकून हसू आले.
 "बरं…बरं… मुंबईत आल्यापासून माझी काळी राणी खूपच शहाणी व्हाया लागलीय. झोप आता." तरी पण सोनूचा विचार करून कायते ठरव असं म्हणत त्याने झोपडीतला बारका दिवा विझवून टाकला.

५.





 ३० जून १९७५ ची रात्र दारावरची घंटा वाजली. श्रीनाथ दार उघडायला पुढे झाला. दारात पोलीस सब इनस्पेक्टर चाटे उभे होते.
 'श्री भैय्या, तुम्हाला पाहुणचारासाठी न्यायला आलो आहे. पाहुणचार घ्यावाच लागेल. आठ पंधरा दिवसाच्या तयारीने चला.'
 श्रीने अनुला उठवले. अनूला क्षणभर काहीच कळेना. 'अने, २६ तारखेला बाईने आणीबाणी जाहीर केली तेव्हाच मनाने संकेत दिला होता. काहीतरी अघटीत घडणार. तेव्हा बाईसाहेब उठा पंधरा वीस दिवस आम्ही माहेरपणाला निघालोत. तेव्हा तयारीसाठी मदत करा. 'माहेरपण' काय तुम्हालाच असतं?' अनूला हलवून भानावर आणित श्रीनाथ चेष्टेच्या सुरात बोलला.
 जनक आणि इराला अनू उठवतेय असे पाहून श्रीने तिला थांबवले.
 "अने, पिल्लांना उठवू नकोस मुलं घाबरून जातील. पोलिस स्टेशन मधून मी तुम्हाला फोन करीन. मुलं घाबरून जातील. अंदाज घेऊन त्यांना नीट समजावून सांगुया…"
 अनुने दोन नेहरू शर्टस, पायजामे, अंथरायची चादर, पांघरायची सोलापूरी चादर, दाढीचे सामान, टुथपेस्ट, ब्रश, साबण.... असे जमेल ते सामान तिने घाईघाईने एका बॅगमध्ये भरले. आठवणीने लवंगा आणि भाजलेली बडीशेप, तीळ, ओव्याचे मिश्रण एक मोठ्याशा डबीत भरून दिले. बॅग श्रीच्या हातात देतांना भरून आलेले डोळे वाहू लागले.
 "अरे वेडी की काय तू?..." अनुच्या कपाळावर अलगद ओठ टेकीत तिच्या पाठीवर हात फिरवून तो मुलांच्याकडे वळला. इरा आणि जनकला डोळाभर साठवून तो बाहेरच्या खोलीत आला. मोहिते काका, काकू, खालचे जोशीदादा कोणालाही न
उठवता तो जिना उतरून खाली आला आणि पोलिसांच्या गाडीत बसला.
 मध्यवर्ती पोलिस चौकीमध्ये जनसंघ, समाजवादी, कम्युनिष्ट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, युक्रांद, एस.एफ.आय. इत्यादि काँग्रेस विरोधी पक्षांच्या व संघटनांच्या कार्यकर्त्यांचा जणू अड्डा जमला होता. प्राध्यापक, वकील, डॉक्टर्स, विद्यार्थी, कार्यकर्ते सुमारे बावन्न जणांच्या गप्पाना ऊत आला होता. तरूण कार्यकत्यांना गट हाहा हुहु करीत घोळका करून एका बाजूला बसला होता. अशक्याने ओरडा करायला सुरवात केली.

खुडबुडती... खुडबुडती
पोटातले उंदीर खुडबुडती
मामांचं घर धांडोळली
धांडोळती बाबा धांडोळती
पोलिस मामा या लवकर
झपट आणा पिठलं न् भाकर
झन्नक झूँ चटणी नि तेल
चविला आणा गुळ नि साखर
तरच इथलं जेवण रूचेल, तर मामांचं जेवण पचेल...

बाकीच्यांनीही त्यात सूर मिळवला. टाळ्यांचा ताल सुरू झाला.
 "थांबा, काही सिरियसनेस आहे की नाही तुम्हाला? आणीबाणीचा अर्थ कळतो? श्रीनाथराव तुमच्या मुलांना जरा समज द्या?" देशकर काका जोरात सर्वांच्या अंगावर ओरडले. खिशातल्या पाकिटातली शंभर रूपयाची नोट काढून हवालदाराला देत जरब देऊन सांगितले.
 "जवळच्या 'समाधान' हॉटेल मधून शंभर चपात्या, भाजी नि चटणी घेऊन या. पोरं भुकेली आहेत. तुमची 'बावनपत्तेकी' साग खाण्या आगेदर बरं जेवण जेवणार आहोत. आमच्या पैशांनी." श्रीनाथ, बप्पा देशमुख यांनीही त्यात भर टाकली. तासाभरात शंभर सव्वाशे पोळ्या, मिरचूचा खर्डा पिठलं हॉटेलचे नाथा महाराज घेऊन आले. स्वतःची म्हणून किलोभर जिलबी आणली.
 पंधरा मिनीटात चपत्या नि पिठलं होत्याचे नव्हते झाले. एवढ्यात बीडहून बिनतारी निरोप आला, की सर्वाना जेलमध्ये कोंडा आणि तासाभरात रिपोर्टिंग करा... काय कृती केलीत ते कळवा. चाटे साहेबांनी वायरलेस केला.
 "सर इथल्या तुरुंगात दोनच खोल्या आहेत. तिथं चार आधीचे कैदी आहेत.
एका खोलीत कोपऱ्यात मोरी आहे. तिला आडोसा नाही. सर, सर्व कैदी, वकील, डॉक्टर, प्राध्या...” पी.एस.आय.चे वाक्य तोडीत बीडहून कडक शब्दात बजावले गेले.
 "हा आदेश दिल्लीचा व्हाया मुंबई आला आहे. तात्काळ पाळा."
 तुरूंगातल्या त्या खोल्या म्हणजे साक्षात नरक, कित्येक वर्षात झाडू लागलेला नसावा. कोपऱ्यात भिंतीवर जाळ्यांचे साम्राज्य पसरलेले. आणि भेसूर डोळयांचे, केस दाढी वाढलेले कैदी. ते घाबरून आणि बावरून एका बाजूला जाऊन बसलेले.
 "पक्या माझ्या अंगाला तर हे सारे पाहूनच खाज सुटलीय."अशक्या तोंडातल्या तोंडात कुणकुणला. ती रात्र युगासारखी दीर्घ. लघुशंकेसाठी ठेवलेला पत्र्याचा डबा. तो बाहेर नेऊन दरवेळी रिकामा करणारे ते कैदी. गप्पांनाही नशा चढत नव्हती. श्रीनाथच्या मनात कोळीष्टकांचे काहूर. काही तासात आम्ही हादरलो. मग स्वातंत्र्य लढ्यातील तरूणांनी आणि सक्तमजुरी भोगणाऱ्या कैद्यांनीही कसे सोसले असेल. डोळ्यात रात्र जागी होती. पण प्रत्येक जण शेवटी तिला शरण गेला. सकाळची उन्ह बोचू लागली. अमन हरून सैयंदला हिटलरच्या कॉन्सेट्रेशन कॅप्समध्ये आपण आहोत असे वाटले. त्या भयानक दुर्गंधीने तो घामेजून जागा झाला. संघाचे दादाराव मात्र सर्वांना उत्साह देत होते.
 "सावकरांचा तुरुंगवास आठवा आणि पुढच्या संघर्षासाठी सज्ज व्हा तरूणांनो, सज्ज व्हा. या राष्ट्रासाठी क्रांतीवीर भगतसिंग, राजगुरु..." दादाराव अहिरवाडाकरांच वाक्य तोडीत, त्याच घनगंभीर आवाजात अशोकने टेप सुरु केला....
 "पंडित जवाहरलाजी, राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांना सहा सहा तास बर्फाच्या लादीवर बसवून ठेवले. लहानग्या शिरिषकुमारला गोळ्या घालून पाणी मागणाऱ्या शिरीषला म्हणून रॉकेल प्यायला दिले. पण राष्ट्रातल्या सामान्य माणसाला..."
 "अशोकजी तुम्ही माझी चेष्टा करण्याच्या हेतूने बोलत असाल तर..."
 "नाही...नाही... दादाराव. बेचाळीसच्या चळवळीचा फक्त आढावा घेतला हो... दादाराव शेवटी आम्ही भारतीयच." अशोक काहीशा खवचट आदबीने म्हणाला. एवढ्यात पी.एस.आय.चाटे आले आणि त्यांनी तुरुंगाचे कुलूप काढून सर्वाना बाहेर काढले. समोरच्या कार्यालयात येण्यास सांगितले.
.....
 "अने, पाणी कडकडीत गरम कर. मी बाहेरच थांबलोय, माझ्या अंगावर किती लिखा नि किती उवा असतील ते त्याच जाणे. शिवाय गोचिडा वेगळ्या. गॅसवर दोन्ही
बाजूला पाणी ठेव. आणि मी पलिकडच्या अरूंद गॅलरीतून मागच्या न्हाणीत जाऊन बसतो. एक लाईफबॉय टाक आणि लायसिल नसेल तर पलिकडच्या दुकानातून जनकला आणायला सांग." श्रीनाथने दरवाजा खटखटावून अनूला बाहेर बोलावून विनंतीवजा आदेश दिला आणि तो न्हाणीकडे गेला. दुपारचे दोन वाजून गेले होते. एक रात्र एका युगासारखी.
 श्रीनाथला आलेला पाहून अनूने सुखचा श्वास घेतला आणि गॅसवर गरम पाण्यासाठी पातेली चढवून तांदळाची बरणी खाली काढली.
 २६ जून पासून हवाच बदलली होती. खरं तर हे दिवस पावसाचे. १९७० ते ७२ सतत तीन वर्षे पावसाने तोंड दाखवले नाही. ७३,७४ चा जूनही मनसोक्त आणि धरतीला आतपर्यंत ओलवून टाकणाऱ्या पावसाशिवायच गेला आणि या वर्षी जरा बरसतोय तोच हे नवे संकट. आणीबाणीचे. श्रीनाथ अंतर्बाह्य अस्वस्थ आहे. आणीबाणी यापूर्वीही दोनवेळा घोषित करण्यात आली होती. १९६२ च्या चिनी आक्रमणाचे वेळी आणि १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संग्रामाचे वेळी. पण त्या दोनही वेळी बाह्य आणीबाणी घोषीत करण्यात आली होती. परंतु २५ जूनच्या रात्री पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुचनेनुसार राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी "अंतर्गत उपद्रवामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याने आपण आणीबाणी लागू करीत आहोत." असे नमूद केले आहे. चार ओळींच्या त्या वटहुकूमाने कोणाही भारतीयाला विना वॉरंट अटक करण्याचा, नागरी हक्क व स्वातंत्र्य स्थगित करण्याचा अधिकार भारत सरकारला मिळाला. म्हणजे इंदिराबाईना...पंतप्रधान इंदिराजींना मिळाला.
 "अने, तुला २६ जूनचे इंदिराजींचे भाषण आठवते? ते ऐकतानाच तू म्हणाली होतीस बाईच्या आवाजात किती दूरस्थ थंडपणा आहे. मी तुझं म्हणणं चेष्टेवारी नेलं होतं पण हवेतील संवेदनशीलता.. आर्द्रताच हरवली आहे. जो तो संशयाने पाहणारा. बोलू की नको असं घोकत ओठ बांधून बसलेला. आम्ही आज सुटलो तरी उद्याचा भरवसा नाही. तेव्हा मनाची तयारी करून ठेव. आता लढा पुन्हा एकदा दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी द्यायचाय. आणि सर्वांनी एकत्र येऊन.
 ... १२ जूनला इंदिराजीविरूध्द निकाल लागला. त्यांची निवडणूक रद्द ठरवली गेली. खरं तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. पण ते तसं घडलं नाही तेव्हाच लोकशाही, स्वातंत्र्य, समता या तत्वांची मृत्युघंटा वाजली. अने मी सतत बाहेर
असेन. खेड्यातून फिरायचे ठरवलेय आम्ही. तू निर्भयपणे रहा. वाटल्यास जनक, इराला आईबाबांकडे पाठवलेस तरी चालेल. पण मग तू फार एकटी पडशील...."
 एक मुकी शांतता.
....
 "अनू, आज खूप अस्वस्थ आहे मी. वाटतंय तुझ्यावर नि मुलांवर मी अन्याय करत नाही ना? सामाजिक न्यायासाठीचा संघर्ष हे आपलं दोघांचं स्वप्न होतं आणि आहे. पण ते स्वतंत्र भारतातलं स्वप्न होतं पण आज वाटतंय दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागणार. अनूऽऽऽ.."
 बोलतानाही त्याचा स्वर रूद्ध झाला.
 'श्री माझी नको काळजी करूस. मी नोकरी करतेय. ही फार मोठी जमेची बाजू तुझ्या माझ्या पोतडीत आहे. फक्त एकच. घराबाहेर पडतांना दशम्याचटणीची शिदोरी तुझ्या पोतडीत ठेवायची, ओके?'..... श्रीनाथच्या कुशीत शिरत अनू गुणगुणली.
..........  ............   .....
 दुसऱ्या दिवसापासून आण्ण्या, प्रकाश, अशोक, डॉक्टर असे अनेक कार्यकर्ते खेड्यापाड्यातून हिंडू लागले. आणीबाणीचा पट्टा आवळत जाणारा. रोजन् रोज कानगोष्टी सारखी कुजबूज कानावर येई. मधु दंडवते, अटलबिहारी वाजपेयी, मोरारजीभाईंना अटक झाल्याचे कानोकानी इथवर पोचले. वर्तमान पत्रातल्या बातम्यांचा तर प्राणच हरवला होता. नुसती शब्दांची भेंडोळी. एक जुलैला भारताच्या एकानुवर्ती शासन करणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधीनी २० कलमी कार्यक्रम जाहिर केला. रेडिओवर 'मां तेरे बीसों सपने साकार करेंगे हम' सारखी गाणी सतत येऊ लागली. श्रीनाथ, डॉक्टर साहेब, आण्ण्या, बाप्पा देशमुख, अशक्या यांसारखी मंडळी खेड्यापाड्यातून आणीबाणी म्हणजे काय हे सांगत फिरू लागली. उषा, लल्ली, सुशा, सारख्या मुलीही त्यात सामील झाल्या. व्यापारी क्षेत्रातली काही मुलं दूर गेली. 'माझ्या बाबूजींच्या दुकानात आज रात्री सिमेंटची गाडी उतरणार आहे.' असं गुपचूप येऊन सांगणारा, रोज श्रीभैय्या भोवती असणारा जुगल गेल्या आठ दिवसात श्रीनाथ व पक्याकडे फिरकलाही नाही. सायकल मारण्यात पटाईत असलेला शेख्या दिसेनासा झाला. प्रत्येक दिवस खूप उंच न मावळणारा. तरीही अंधारलेला.
 त्या दिवशी रात्री एक वाजून गेला तरी श्री परतला नव्हता. डोळे चुरचुरायला लागले होते. दीडचा टोल शेजारच्या शाळेतील जागल्याने दिला. अनूला कधी झोप
लागली ते कळले नाही. श्री घरी आला तेंव्हा दोन वाजून गेले होते. बरोबर डॉक्टर आणि अण्ण्या होते. अण्ण्या, डॉक्टर आतल्या खोलीत झोपले आणि श्रीनाथ बैठकीत कॉटवर लवंडला. जून संपला, दमदमादम पाऊस पडला तरी उकाडा होता. अनूने पंख्याखाली चटई टाकली आणि बाहेरच्या खोलित ती आडवी झाली.
 पहाटेचा गार वारा खिडकीतून आत येत होता. सोबत पावसाचा ओला गंध घेवून. त्या मृदगंधा सोबत थेट वरच्या मणक्यावर पोचलेल्या सायलीचा काहींसा मत्त मधुर गंध. अनूच्या गाढ झोपेत फक्त तो गंधच झुळझुळत होता.
 दारावरची बेल वाजली. एकदा. दोनदा. तिसऱ्यांदा कानांना भेदून टाकणारी किरकिर्र घंटा. अनूने उठून श्रीनाथला जागे केले. त्याला आत पाठवले. इथवर सारे ठरवल्यासारखे. आणि तिने दिवा लावून दरवाजा उघडला. डी.वाय.एस.पी.चव्हाण समोर उभे होते.
 "वैनी, श्रीभैय्यांना न्यायला आलो आहोत, असे बैठकिच्या खोलीत येत ते बोलले. "अहो, श्रीनाथ मुळी...." असे म्हणणाऱ्या अनूला अडवित खाली घडी घालून ठेवलेल्या चटईकडे पाहत ते म्हणाले वैनी श्रीभैय्या दीड एक तासापूर्वी आले आहेत. ते घरात आहेत. आताच आम्ही बालकमंदिरातून आलो. तिथे अमन, ग्यानेश होते त्यांच्यावरही वॉरंट आहे. आप्पा, फणसे, विनोद, धर्माधिकारी, प्राध्यापक देशपांडे, प्रा.देशकर, बप्पा देशमुख, सुधीर, बन्सीधर, क्षिरसागर यांच्यावरही वॉरंट आहे. सगळ्यांना घेऊन आमची व्हॅन नऊ वाजता इथून बीडला या मंडळीसह जाणार आहे." एका दमात श्री. चव्हाण बोलले. खूर्चीवरून उठत काहीसे विशादाने हसत अनुला म्हणाले, "श्रीभैय्यांना जे काही आवडतेय ते ताजे करून खाऊ घाला आणि निरोप द्या."
 चार पावलं पुढे गेलेले पोलिस अधिकारी दोन पावलं माघारी आले आणि मऊ स्वरात म्हणाले,
 "वैनी आम्हीही माणसं आहोत. तुम्ही काळजी करू नका. श्रीभैय्यांना घ्यायला मी सर्वात शेवटी इथे येतो तयार रहा."
 एवढ्यात श्रीनाथने डॉक्टरला न्हाणीत लपवले होते. आण्ण्या कॉटच्या मागे निवान्त भिंतीला टेकून बसला होता.
 अनू डोळ्यातल्या धारा पुसत कांदा कापत होती. श्रीनाथला खमंग कांदा पोहे खूप आवडतात. आणि भरपूर तूप घालून केलेला कणकेचा शिरा.
 "अने, पोह्यात थोडे शेंगदाणे नि डाळवं टाक बरका आणि शिरा पिठाचा कर. तूप घालताना हात आखडू नकोस. बामणी शिरा नको." श्रीनाथ न्हाणीतून सूचना देत डोक्यावरून पाणी ओतत होता. डॉक्टरही खूप अस्वस्थ. आण्ण्याला तर त्या कोपऱ्यात सुरक्षित वाटत असावे. बसल्या बसल्या साहेब घोरत होते. एवढ्यात श्रीनाथच्या गटात आजवर कधीही न आलेला, खालमान्या म्हणून सगळी गँग ज्याची टर उडवीत असे तो जाड चष्मेवाला गंगणे दबकत आत आला.
 "मॅडम, मी गंगणे. मी काही मदत करू शकतो का? मी खालमान्या आहे. जे होतंय ते बरं नाही हे मलाही कळतंय. प्लीज." अनू काही बोलण्याआधी श्रीनाथने त्याच्या पाठीवर प्रेमाने थोपटले, "तू खूप अबोल आहेस दोस्त. पण तू आमच्या आण्ण्या, पक्याचाच दोस्त आहेस. गड्या एक काम तूच करू शकशील." लगेच डॉक्टर कडे वळून श्रीनाथने सांगितले.
 "आज पावसाचा अंदाज नाही. डॉक्टर, तुमची खादीची पँट नि शर्ट काढा. हे काकाजींचं धोतर आहे माझ्यापाशी. नि हा मळका सदरा. डोक्याला पंचा बांधा आणि मधल्या रस्त्याने पांदीतून गंगणे तुम्हाला थेट धानुऱ्याला सोडून येईल. जमल का गंगणे? समजा गडबड झाली तर मग तुलाही उद्या बीडला यावं लागेल. आहे तय्यारी दोस्त?"
 "श्रीभैय्या काळजी नको. मी ठिकठाक काम करून टाकीन." गंगणेने आश्वासन दिले.
 "ऐच्यू पोलिश बाबाला त्यांच्या गालीतून कुते नेताहेत गं? आई, पोलिश चोलांनाच पकलतात ना?" इरा अनूला विचारीत होती.
 "इरे, बोबडाबाई चुप बस. त्या इंदिरा बाईनं आपल्या बाबालाच नाही तर, खूप जणांच्या बाबांना पकडून नेलंय. ते काही चोर आहेत म्हणून नाही. ती डाकीण आहे डाकीण. माणसं पकडणारी....." जनक गंभीर आवाजात तिला दापत होता. श्रीनाथला पकडून नेण्यापेक्षाही जनकला अवघ्या आठव्या वर्षी आलेलं शहाणपण अनुभवून अनू क्षणभर हादरून गेली. एक न दिसणारं ओझं तिच्याही डोक्यावर कोणीतरी टाकलंय असं तिला जाणवलं. पोलिस व्हॅन केव्हाच निघून गेली होती. दोन्ही पिल्लांना घेऊन ती जिना चढून वर आली.
 "अनू आधी इकडे ये. मी आलं घालून चहा केलाय तो पी आणि मग कॉलेजात जा मुलांकडे बघते मी. नंदा मावशी येतीलच कामाला." सुधा वहिनीनी तिला घरात बोलावले.
 "वैनी, काळजी करायची नाही. गांधी खून खटल्याच्या वेळी माझ्या मित्रांच्या वडिलांना ते केवळ ब्राम्हण म्हणून अडकवलं. त्यांचं नाव एम.जी.बर्वे आणि दुसऱ्या संघाच्या शाखेत जाणाऱ्या बर्व्यांचं नावही एम.जी.बर्वे पण तो बर्वे राहिला मोकळा. नि आमच्या मध्याचे बाबात मात्र आठ महिने तुरूंगात होते. राजकीय तुरुंगवास आहे हा. आणि तोही स्वातंत्र्यानंतरचा. काळजी करू नका. निवान्त ऱ्हावा. आणि काही अडचण आलीच तर आम्ही कशासाठी आहोत?" मोहिते काकांनी दिलासा दिला.
 एक दिवस सकाळी सकाळी बीडहून उपेन्द्र आणि त्याची छोटी जुईली आले. "अनू, मुद्दाम आलोय मी. चार दिवसापूर्वी संध्याकाळी श्रीनाथचा फोन होता. गेल्या सात आठ वर्षात वकिलीत एक व्यवसाय म्हणून इतकं गाडून घेतलंय मी, स्वतःला. नाहीतर... पूर्वीचे पाढे गात ऱ्हाईलो असतो तर मीही श्रीनाथच्या जोडीला असतो. एनी वे. डोन्ट गेट नव्हर्स. पण श्री थोड्या दिवसात परत येईल ही आशा मात्र मनातून काढून टाक. बाईतली संवेदनशिलताच हरवली आहे. शिवातली शक्ती आणि पावित्र्य हारवले तर ते 'शवा' समान होते. आणि शक्तीतले शिवत्व… पावित्र्य हरवले तर ती अघोरी बनते. बाई अघोरी बनत चालल्या आहेत. तू कमावती आहेस. सुजाण आणि धाडसी आहेस. एकच सांगतो, मी तुझ्या पाठीशी आहे. अर्ध्यारात्री, अर्धा घास सोडून धावत येईन. श्रीला दोनदा भेटून बोलून आलोय. बहुदा दोन दिवसात त्यांना नाशिक वा येरवाड्यात पाठवतील." उपेन्द्रने दिलासा दिला.
 अनू जुईली आणि इराला जेवायला बोलावयाला गेली. जिन्याच्या खालच्या पायरीवर बसून दोघी बप्पा मारीत होत्या.
 "इरे, तुझ्या पप्पांनी चोरी केलीय का ग? की कुणाला खूप ठोक दिलाय? पण तुझे पपा तरी नसतीलच. ते पण माझ्या बाबांसारखे वकील आहेत ना? मग त्यांना माहिताय की गुन्हा केला की जजसाहेब शिक्षा ठोठावतात नि पोलिस पकडून नेतात म्हणून! मग का ग त्यांना तुरूंगात ठेवलंय? माझा बाबा किनई, त्यांना नक्की सोडवून आणील. तो वकील आहे. आणि तो मोठ्ठा वकील आहे. तू मुळीच घाबरू नकोस." जुईली इराला धीर देत होती.
 "नाय ग, माझा बाबा मोलचे कालायचा ना. आणि शांगायचा गलिबांना काम द्या. भाकल द्या. पन ती इंदिला बाई फाल वाईट हाये. माझ्या बाबाला पकलून नेलं. बाबाच नाही. अशा खूप जनांना पकलुन नेलंय. मी नाय घाबलत. मी शूल आहे." ईरा आणि जुईली, या तीन नि पाच वर्षाच्या मुलींचा संवाद ऐकूण अनूला मजा
वाटली. अनुभवातून चिमुकलं मूलही कसं शहाण होतं हे अनुभवून आत कुठेतरी थर्र झालं.
 असे एकाकी किती दिवस?... किती महिने?... कि किती वर्षे?... राज्यशास्त्राचे अत्यंत अभ्यासू म्हणून लौकीक असलेले तिचे प्राचार्य राजगुरु काहिसे खवचट पणे हसत काल म्हणाले होते.
 "मॅडम, किती वर्षे लागतील ते सांगता येत नाही. ही आणीबाणी मंत्रीमंडळाची बैठक न घेता, थेटपणाने लादली आहे. आणि केवळ बाह्य आणीबाणी नाही तर अंतर्गत आणीबाणी आहे....
 जपून रहा. फक्त महाविद्यालय आणि घर एवढच पहा. कला पथक, राष्ट्रसेवादल... वगैरे सारे कुलूप बंद ठेवा...."
 अनूच्या डोळ्यासमोर विवाहानंतरची आठ वर्षे, त्या आधीचे प्रियाराधन आठवले, विवाह करण्यापूर्वी, एकाने भाकरीची सोय पहायची आणि दुसऱ्याने सामाजिक परिवर्तनाची बांधीलकी स्विकारून काम करायचे हा घेतलेला निर्णय… त्या दिशेने केलेली वाटचाल… सारे काही क्षणभरात वेगाने गागरून चक्रीवादळासारखे समोर येऊन गेले. लग्नापूर्वीचे ते निर्णय बेकंबेच्या पाढ्यासारखे साधे, सोपे, सरळ वाटत. जीवनसाथीने व्यवसायाच्या माध्यमातून घरासाठी पैसा मिळवावा असे कधीच वाटले नाही, आणि आपल्याला मिळणारा पगार हा दोघांचा आहे, हीच भावना दोघांच्याही मनात रूजलेली होती. स्वतंत्र भारतात, स्वंय निर्णयाच्या .... विचार करण्याच्या, ते व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येईल असे कधीच… नव्हे स्वप्नातही वाटले नव्हते. आणि आज?...?...?
 भोवतालचे सारेच लोक बजावत होते, जपून रहा. मोजकं बोला. कुणाचं काहीही ऐकू नका. न पाहावलं तर स्वतःचे डोळे मिटून घ्या. हे असं जगणं मान्य करायचं? मनातले कढ सतत उसळ्या मारीत असत. पण समोर होते जनक आणि इराचे मासूम चेहरे. उपेन्द्र जातांना बजावून गेले होते.
 "अनू, तुमचे रिकामी घागर मोर्चा, महागाई हटाओ मोर्चा… सारेच, काही दिवस बंद ठेवा. श्रीनाथचा डाव तुला सांभाळून खेळायचा आहे. लातूरच्या अनिताला काल लहानग्या मुलोसह येरवाड्याला पाठवल्याचा निरोप आलाय. म्हणूनच मी धावत पळत तुला सांगण्यासाठी इथवर आलो." उपेन्द्र धीर देऊन बीडला गेले. तिला लातूरची अनिता खोब्रागडे आठवली. युवक क्रांतीदलाची कार्यकर्ती. मंगेश देशपांडे
या कार्यकर्त्याशी तिने चार वर्षापूर्वी केलेले लग्न गाजले. मंगेशला सरकारी रूग्णालयात लॅब टेक्निशियनची प्रयोगशाळेत रूग्णांचे रक्त, लघवी वगैरेची तपासणी करणाऱ्या टेक्निशियनची नोकरी होती. मंगेश ब्राम्हण समाजाचा तर अनीता दलित... चर्मकार समाजाची. घरून विरोध झाला. तो होतच असतो. अनिताला दोन वर्षांनी जुळे मुलगे झाले. त्यांना सांभाळून युक्रान्दचे काम ती धडाडीने करी. मुलींचा 'स्वयंवादिनी' गट तिने जमा केला होता. त्याच्या वतीने विविध विषयांवर चर्चा, 'भूमी' हे हस्तलिखीत दर महिन्याला काढणे, ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण देण्यासाठी पालकांशी बोलणे अशी कामे ती करी. शिवाय मुलामुलींसाठी वाचनालय, अभ्यासमंडळे चालवले जात. या सर्व कामांचे संयोजन अनीता करीत असे. अनीताला जुळी मुले झाली तेव्हा ती खूप निराश झाली. तिला लेकी हव्या होत्या. अनीता जन्मली तेव्हा तिच्या वडिलांनी तिला मुलगी म्हणून शेतात पुरले होते. कारण ही पाचवी कन्या. पण सुनेचे दुःख पाहून आजोबांनी पुरलेल्या नातीला, अनीताला बाहेर काढले. तिची जबाबदारी घेतली. ती बी.एस्सी. झाली. दयानंद कॉलेजात प्रयोगशाळा सहाय्यक - डेमॉस्ट्रेटर म्हणून नोकरीही मिळाली. ती युक्रान्दची सह कार्यवाह म्हणून तिला पकडून नेल्याचा निरोप आला होता.
 अनूला गेल्या पाच सहा वर्षातले भूईनळ्यातून उडणाऱ्या अग्निफुलासारखे पेटलेले, तरीही मनाला ताजवा देणारे, तृप्ती देणारे तळपते दिवस…प्रसंग आठवले. त्यावेळी तिला क्षणभर वाटे, की फेकून द्यावे नोकरीचे लोढणे. श्रीनाथच्या जोडीने, सामान्य माणसांना फसवणाऱ्या, लुबाडणाऱ्यां विरूध्दच्या लढ्यात आपणही बेभानपणे सामील व्हावे. पण अशावेळी रोजच्या भाकरीची आपणहून घेतलेली जबाबदारी, जनक....इरा यांचे मासूम हसरे डोळे आठवत. आणि मग अवकाशात उडणारा पतंग वेगाने जमिनीवर येई.
 ....गोपाळ नायडू या जंगल खात्याच्या दुय्यम अधिकाऱ्याला श्रीनाथ, अशोक, अण्णा सेवादल युक्रांदच्या कार्यकत्यांनी गाढवावर बसवले होते. तोंडाला काळे फासून धिंड काढली होती. कारणच तसे होते. त्यांत अखिलभारतीय विद्यार्थी परिषदेचे सुधीर, बन्सीधर, विनोद ही मुलेही सहभागी झाली होती. झाले ते असे. समाधीजवळचा बुट्टेनाथ डोंगर दगडगोट्यांनी भरलेला. झाडेही परिसरात तुरळकच. तिथल्या डोंगरात गावातील वडार समाज दगड फोडायला जात असे. गोपाल नायडू पोलिसात कळवीन अशी भिती घालून त्यांच्याकडून कायम पैसे उकळीत असे. एक
दिवस त्याने या वडार समाजाच्या लोकांना सांगितले की जंगलखाते जमीन विकणार आहे. या वडारांनी आवश्यक तेवढे पैसे जमवले तर जमीनीचा बैनामा करून देण्याची जिम्मेदारी नायडू घेईल. वडार / पाथरवट लोक खूप खुश झाले. हे लोक दगडातून पाटा, वरवंटा, दगडी खलबत्ता अशा विविध वस्तु, इमारतीसाठी लागणारे वेगवेगळ्या आकरातले कातीव दगड तयार करतात. त्यावरच त्यांची उपजिवीका चालते. जमिन विकत घेण्यासाठी घरातल्या बायांनी गळ्यातले मणीमंगळसूत्र विकून पितळी वाट्या गळ्यात अडकवल्या. किडुकमिडूक विकून पैसे जमा केले. मनात एकच आशा बांधली. दगडाचा कायमचा साठा मिळेल. दोन घास पोटभर खाता येतील. गोपाळ नायडून कागदोपत्री नोंद करून दिली. जो तो आपापल्या मालकीच्या तुकड्यावर हिरीरीने काम करू लागला. एक दिवस नवा अधिकारी आला. त्याने सर्वांना तिथून हाकलून लावले. जंगलखात्याला जमीन विकताच येत नसल्याचे आणि विकायचीच झाली तर शासनाला बरेच कंथे करावे लागतात असे सांगितले. हे कळल्यावर वडर लोक हवालदिल झाले. दाद कोणाकडे मागायची? झोपडीत रहाणारी, उन्हातान्हाची पर्वा न करता डोक्यावर सूर्य घेऊन दगड फोडणारी माणसं ही. दुपारच्याला भाकर खाऊन तांब्या दोन तांबे गटागटा पाणी पिऊन, दोन्ही वेळची ढेकर एकदाच देणारा हा, तळकुटातला समाज. त्याने जावे कोणाकडे?....?
 समाजातल्या रामू वडार या पाचवीपर्यंत शिकलेल्या पोराने गावात पानपट्टी टाकली होती. पान जमवतांना, पान खायला येणाऱ्यांच्या गप्पा तो चवीने ऐकत असे. ओळखीही होत. श्रीनाथ, बाप्पा देशमुख हे पान खाण्यात दर्दी. त्यांना रामूच्या हातचे पान लागे. समाधीच्या डोंगरात रामूच्या बापानेही एक तुकडा पैसे देऊन घेतला होता. तो आपल्या बापाला घेऊन बदलाव संघटनेच्या कार्यालयात गेला. आणि श्रीनाथशी गाठ घालून दिली.
 गोपाल नायडूची बदली झाली होती. पण सामान मात्र अद्याप नेले नव्हते. रामूने सर्व समाजाची रात्री बैठक घेतली. सर्वांचे कागद गोळा केले. गोपाळ नायडूच्या पत्त्यावर अशोकला सोडले होतेच. कारण त्याचे घर नायडूच्या खोली पासून जवळ होते. आणि ठरल्याप्रमाणे सारे पार पडले. अचानकपणे भरारा सगळी पोरं जमली. मंगळवारातल्या पटलू धोब्याचे गाढव शेरव्याने हेरून ठेवले होतेच. कुणाला काही अंदाज येण्यापूर्वीच सर्वांनी मिळून गोपाल नायडूला गाढवावर बसवले, कपडे उकळायच्या डेचकीच्या बुडाचे काळे त्याच्या तोंडाला फासले आणि बोंबा ठोकीत
धिंड सुरु झाली. एक खुंटभर जेमतेम धिंड निघाली असेल, एवढ्यात पोलिसांनी नायडूची सुटका केली. अर्थात् कोर्टात केस सुरु आहेच. फोटोग्राफर मानेने मिरवणूकीचा तेवढ्यात फोटोही घेतला. त्यात सुधीर, बन्सीधर, अशोक, राम… सारेच विजयी मुद्रेने दिसत होते. दैनिक मराठवाड्यात पहिल्या पानावर बातमी सकट फोटो झळकला. कोर्टात तारीख लागली की सर्वाची बाजू मांडणारा श्रीनाथ आणि नंबर दोनचा आरोपीही श्रीनाथच.
 अंबेजोगाईतील सेवादल गट नेहमीच गावात… लोकांच्या मनात नवी नवी आव्हाने उभी करीत असे. गाव तालुक्याचे. जिल्ह्याचे गाव शंभर किलो मिटर्सवर. गावात उपजिल्हाधिकाऱ्यांची. रेलचेल मग तो पोलिस खात्याचा उपनिरीक्षक असो कि उपजिल्हाधिकारी. किंवा पाणी, रस्ते खात्याचा उपअभियंता असो. हे शासकिय अधिकारी सरकारी गाड्यांचा वापर खाजगी कामासाठी सर्रास आणि हक्काने करीत. अशोकचा मित्र मोहन. त्याच्या बंगल्यात पाणी विभागाचे उपअभियंता रहात असे. वरच्या मजल्यावर ते, तर खाली गावातल्या सरकारी दवाखान्यातले डॉक्टर राहत.
 "हाणहाण पैसा हाणतात लेकाचे आणि धारूरला सरकारी गाडीतून जाऊ धा धा तोळे सोनं घेऊन येतात. धारूरचं सोनं लई अस्सल असतं म्हणे! आमची आजीमाय सांगती." अशोक नेहमी सांगत असे. "अरं, दवाखान्यातला डॉक्टर तर लेकराबाळासकट लातूरला गेला होता. पिक्चर पाहायला. हम तुम एक कमरे में बंद होऽऽ तो ऋषी कपूर नि डिंपल कपाडियाचा त्यो शिनेमा रे 'बॉबी' श्री भैय्या यांच्या विरूध्द कायतरी करायलाच हवं." आबाने पुस्ती जोडली. अंब्याचं वेगळेपण खास. राजकीय विचार वेगळे असले तरी चांगल्या कामासाठी सर्व विरोधी पक्षातील मंडळी एकदिलाने एकत्र येत. एका विचाराने वागत. अर्थात त्या विशिष्ट कामासाठी. मग सगळ्यांनी एक बेत आखला.
 शिवरात्र जवळ येऊ लागली की कमी कमी होणारी थंडी क्षणभर थबकते. आणि लिंबोणीच्या झाडांशी फुगड्या खेळू लागते. निंबोणीच्या झाडावर नाजुक फुले फुलू लागले.आंब्यावर मोहर थरथरू लागतो. अशाच एका पहाटे सगळे मित्र श्रीनाथच्या घराखाली जमा झाले. त्यांना प्रश्न पडला होता श्रीभैय्यांना उठवायचे कसे? तेवढ्यात अनूवैनींनी वरच्या सज्जातून हाक घातली.
 "मंडळी पेट्रोल पोटात घालायला जिना चढून वर या. आद्रक आणि गवतीचहा घालून कडक चहा बनवलाय मी." ही पहाट शिवरात्रीची होती.
 सगळी फैय्यर जयवंतीच्या पुलावरच्या दोन्ही कठड्यांवर बसली होती. मनी, रेखा यांच्या सोबत आज अनूही आली होती. इरा, जनकची आजी आल्याने अनूलाही येणे जमवता आले होते. सोबत दोन लाल झेंडे लावलेली निशाणे घेतली होती. काही खाजगी मोटारी, दोन एस.टी. बसेस पुढे सरकल्या आणि पाठोपाठ पहिला मासा गळाला लागला. लातूरच्या डेप्युटी इंजिनिअरची गाडी होती. आत दोन तीन स्त्रिया, चार मुले. गाडी अडवताच साहेब रूबाबात आतून उतरले. सुधीर, श्रीनाथ सारख्यांना पाहून इंग्रजीतून रूबाब दाखवू लागले. मग सुधीर आणि श्रीनाथनेही गावरान नाटकी आवाजात विंग्रजी खर्डा मारायला सुरुवात केली. बाप्पा देशमुख पुढे झाले आणि झूकून नमस्कार करीत विनंती केली.
 "साहेब, वैनी ताई… मुलांना आमचे सैनिक एसटीत जागा मिळवून बसवून देतील. तुमच्या गाडीचं लॉगबुकही आम्ही पाहणार आहोत. त्यात तुमचा जिल्हा पार करून परळीला जात आहात त्याची आणि जाण्याचे कारण याची नोंद केली आहे का? साहेब नाराज होऊ नका. एका भारतीय नागरिकाची नम्र विनती आहे ही."
 साहेब खजील झाला. 'सॉरी' म्हणत त्याने ड्रायव्हरला गाडी मागे फिरवायला लावली. संध्याकाळपर्यंत बेचाळीस गाड्या माघारी पाठवल्या गेल्या. दुसऱ्या दिवशी दैनिक मराठवाड्याच्या पहिल्या पानावर बातमी झळकली. "महाशिवरात्रीच्या दिवशी परळी येथे वैद्यनाथच्या दर्शनासाठी शासकीय गाड्यांतून सहकुटुंब निघालेल्या शासकीय अधिकाऱ्यांना अंबाजोगाईतील झुंजार तरूणांनी माघारी पिटाळले…"
 १९७२ ते १९७५ चे ते मंतरलेले दिवस. प्रत्येक क्षणी बहरत जाणारे, संघर्षासाठी उर्जा देणारे. २४ एप्रिल १९७४ चा दुष्काळ विरोधी मोर्चा, गावातल्याचे नव्हे परसिरातील अनेकांच्या मनात नेहमीच ताजा राहील असा. हजारो स्त्री पुरुष भाकऱ्या बांधून मोर्चात सामिल होण्यासाठी आले होते. बदलाव संघटनेने पिठलं नि मिरचीचा ठेसा पुरवला होता.

'हाताला काम द्या, पोटाला भाकर द्या
जनावरांना चारा द्या, तहानलेल्या माणसांना
तहानलेल्या जमिनीला पाणी द्या पाणी द्या.'

ही त्यांची मागणी होती. गेल्या वर्षात डोंगरातल्या गावाची लोकसंख्या अर्ध्यावर आली होती. हजारो कुटूंबे पुणे, मुंबई, सुरत वगैरे भागात चंबुगबाळ बांधून घर...शेत वाऱ्यावर टाकून निघून गेली होती. दहाबारा हजारांच्या मोर्चात महिला तीन चार हजार
असतील. मोर्चा अत्यंत शांतपणे संपूर्ण गावातून, मंडईतून फिरुन पोलिस स्टेशन जवळ पोचला. मोर्च्याच्या पुढ्यात श्रीनाथ, अशोक, डॉक्टर, आण्ण्या, बाप्पा देमशुख यांसारख्या तरूणांसोबत शिवाप्पा शेटे होते. गेल्या तीस पस्तीस वर्षापासून साम्यवादी विचारांचा वसा थेट खेड्यापर्यंत, तळागाळतल्या माणसांपर्यंत पोचवणारे वृध्द कार्यकर्ते होते. या माणसाला कधी कोणी रिक्षा वा मोटारीत बसलेले पाहिले नाही. ही वामनमुर्ती कायम पायी भिरभिरतांना दिसे. काखोटीला एक शबनम बॅग. त्यात चटणी भाकरी. या खेड्यातून त्या खेड्यावर. अखंड वणवण. खेड्यातील सामान्य माणसांपर्यंत, तरूणांपर्यंत त्यांनी मार्क्स आणि माओ नेऊन पोचवला होता. अनेक तरूण या मोर्चात उत्साहाने आले होते. तरूणांचा जोश काय विचारता? तीसपस्तिस तरूणांचे टोळके घोषणा देत, टाळ्या पिटत, तालात नाचत होते.

हाताला काम द्या हाताला काम
कष्ट करू गाळू घाम
काम करून, मागू दाम
पोटाला हवी भाकर,
पाणी पिऊन देऊ ढेकर
जनावरांना चारा
खाटकाला देऊ नका थारा
पोटाला पाणी, शेताला पाणी
गाऊ नका विकासाची
झटपट खोटी गाणी
खूप खूप केलं सहन
आता नको आम्हाला
बोलाची कढी अन् बोलाचं जेवण
.....
एक धक्का और दो
भ्रष्टाचार को मिटा दो
एक धक्का और दो
इस शासन को फेक दो...

तरूणांच्या घोषणांचे वादळ चढत होते. एवढ्यात जिल्ह्याचे प्रमुख पोलिस अधिक्षक,
एस.पी. पोलिस स्टेशनमधून तरारा बाहेर आले. मैदानाचे गेट उघडून रस्त्यावर पोचले आणि काही कळायच्या आत हुकूम दिला.
 'लाठी चार्ज करो'
 त्यांना रोकण्यासाठी शिवाप्पा शेटे पुढे सरकले. नेहमीच्या शांत, थंड परंतु कणखर शब्दात एसपीला विनंती केली.
 "मी मुलांना शांत करतो. तुम्ही हत्याराची भाषा बोलू नका. तरूणाई पुढे हत्यारे बोथट ठरतात. शांततामय मोर्चाला हिंसक वळण तुमच्या मुळे लागेल. हजारो बाया मोर्चात आहेत. बुध्दी शुध्दीवर ठेवून ऑर्डर द्या. थांबा...."
 "ये थेरड्या, तुझ्या शब्दांनी काय हे गुंड गप्प बसणार आहेत? त्यांना दंडुक्याचाच बडगा हवा. तु मागे फिर, नाहीतर पहिली लाठी...." अधिकाऱ्याचे वाक्यपूर्ण होण्याआधीच श्रीनाथने एसपीच्या ड्रेसची कॉलर पकडली आणि तो गंभीर... तार स्वरात ओरडला.
 " अे अधिकाऱ्या, या हाडाच्या वृध्द कार्यकर्त्याला लाठी घालण्याची हिंमत तर करून बघ. अरे, तू भलेही शासनाचा अधिकारी असशील पण जनतेचा नोकर आहेस तू नोकर. आमचा नोकर आहेस. आधी माफी माग आप्पांची...."
 बाप्पा देशमुख, इतर अधिकारी, अशोक वगैरेनी श्रीनाथला बाजूला नेले. नव्याने आलेला तो एसपी ही गांगरून गेला. पाठ फिरवून निघून गेला.
 संध्याकाळी बैठकीत श्रीनाथने सगळ्यांना बजावले की, "कोणीही झाल्या प्रकाराची खंत करायची नाही. आपल्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान आपणच जपला पाहिजे. ही लोकशाही आहे. लोकशाहीत 'लोक' सर्वश्रेष्ठ असतो. लोक म्हणजे आपण... समाज. शासन हे समाजाचे सेवक असते. उद्या माझ्यावर खटला भरला तरी डरू नका. मी डरत नाही. समाजात परिवर्तन करायचे असेल, नवी रचना करायची असेल तर संघर्ष करावाच लागतो. संघर्षाशिवाय रचना उभीच राहू शकत नाही."
 ... असे मंतरलेले दिवस आठवण्यात अनू हे एकाकी दिवस सहजपणे पुढे ढकलीत होती. लग्न होऊन ती इथे आली तेव्हा सामाजिक न्यायासाठी श्रीने दिलेल्या संघर्षाची सुंदर स्वप्ने पडत. तिच्यातल्या कवीने तेंव्हा लिहिले होते.

रेशमी पदरात या अग्नीफुले मी वेचिली
धुंद होऊन चालतांना वेदना ओलांडली...

आज तो संघर्ष प्रत्यक्षपणे समोर उभा आहे. बळ देणारी धुंदी आता प्रत्यक्षात गोळा
करायची आहे. ७३ला बरा पाऊस झाला. पण पाणी डोंगरातून दरारा वाहून गेले. निळाई चार दिवस जागी राहिली पण पुन्हा कोरडाईच. डोंगरात लहान दीड दोन एकरवाले शेतकरी भरपूर. वीस पंचवीस एकरवाल्याकडेही विहीर एकांदीच. या भागात दर पाचसहा वर्षानी दुष्काळाची सावली पडणारच. त्यामुळे झाड झाडोरा नाही. मग पाण्याने ठुमकत, थांबल्या चालीने चालावे कसे? पंचवीस एकरवाला दोन वेळेस कोरड्यास लावून भाकर खाई एवढेच. याही वेळी आषाढ तोंडावर आला. पाऊस बरा पडतोय. पण…पण पुढे काय? या प्रश्नामुळे श्रीनाथ अस्वस्थ आणि अनूला कलापथकाच्या कार्यक्रमाची स्वप्ने पडताहेत.
 अने तुला कलापथकात गाणी कोणती, नृत्ये कोणती बसवायची याचे सुचतेय. मी या दुष्काळाने उध्वस्त झालेल्या मनांचा… गावांचा शोध घेतांना, समोरच्या न दिसणाऱ्या… अंधारात हरवलेल्या रस्त्याचा शोध घेतोय… प्लीज तू ठरवना काय नि कसा कार्यक्रम करायचा ते! दुष्काळाची लागोपाठची तिन वर्षे. गेल्या वर्षाचा पाऊस वाहून गेला. यावर्षीचे काय? तू आपल्या गुरुजींची मदत घे ना… वाटल्यास सुधाताईना बोलाव इथे. त्या छान बसवनू देतिल नृत्ये.....
 मी थोडं लिहावं म्हणतोय. प्लीज… श्रीनाथचे काहीसे अजीजीने बोलणे मध्येच अडवून अनूने मनात अगदी त्याच क्षणी सुचलेली कल्पना मांडली.
 "श्री, प्लीज बीज कशाला रे ! हे बघ आषाढ संपतोय. आपण चार दिवसांचं नृत्य शिबीर घेऊ या. सुधाताई नि बापू पुण्याहून आले तर… शिवाय श्री, या वेळी 'अन्नदाता'र नृत्यनाट्य बसवून घेते. त्यातला दुष्काळ अधिक प्रभावीपणे सादर करू. काय? ठरलं मग?"
 आणि सुधाताई वरदे, ढोलगी वाजवणारा बापू दोघेही आले. सुधाताई ठेणग्या ठुसक्या बांध्याची. तिच्या नृत्यातली सायलीच्या वेलीसारखी वेटोळीदार लय. आणि जुईच्या फुलासारखं गोड हसणं. अनूने तिला न राहवून विचारले होते. "सुधाताई तू थकत नाहीस? नि वय किती ग तुझं?" नेहमीप्रमाणे दिलखुलास हसत अनूच्या पाठीवर थाप देत सुधाताई म्हणाली होती, ओळखना तू. अग माझा अनय वीस वर्षाचा आहे. चार वर्षापूर्वीच मी चाळिशी ओलांडली. नि तू मात्र अजून पस्तीशीही गाठली नाहीस तर… मास्तरणीसारखी वागायला लागलीस. चल नाच माझ्या सोबत. महाराष्ट्र दर्शनमध्ये उत्साहाने नाचणारी अनू हरवू देऊ नकोस हं!
 त्या वर्षांचा कार्यक्रम अतिशय देखणा झाला. अनूने महाराष्ट्र दर्शनमधले
पंचनद्यांचे नृत्य भरतनाट्यम शैलीत बसवून घेतले होते. अनूचे जेष्ठ सहकारी प्राध्यापक अण्णा अणदुरे यांचा हात लिहिता होता. 'गल्ली ते दिल्ली' हे राजकारणाची खिल्ली उडविणारे खुसखुसीत वगनाट्य त्यांनी लिहिले होते. ते वाचून श्रीलही उर्मी आली. आणि त्यानेही वगनाट्यात भोळ्या संभ्याची भूमिका केली. नाठाळ नि भांडखोर मंगलीची भूमिका अनूने छोट्या ईराला सांभाळत टेचात रंगवली. अन्नदाता या नृत्यनाट्याच्या सुरवातीला अनूतल्या कवयित्रीने एक तुकडा जोडला होता.

सधन सावळे मेघ भरारा वाऱ्यावर वाहती
पाण्याच्या पांगळ्या पखाली दूर दूर नेती
काळी आई तहानलेली सुकलेल्या ओठांनी
ग्रीष्माच्या तलखीत आळविते पाण्याची गाणी..

नृत्य करणारे शेतकरी… शेतकरणी लयबध्द अभिनयातून पावसाची वाट पहाणे, मातीला स्पर्श करून तिचे कोरडेपण, तिचे पावसासाठी आसुलेले मन साकार करीत. ते पाहतांना मराठवाड्यातील प्रेक्षकांना दुष्काळ आठवे.
 त्या वर्षी थेट हिंगोली पासून ते उदगीर औरंगाबादपर्यंत कला पथकाचे कार्यक्रम झाले. खुर्दा बराच जमला. बक्षीस समारंभासाठी या वेळी सुधाताई, बापूसोबत एसेम् अण्णांना बोलावण्याचा घाट घातला. एसेम् अण्णा आले नेहमीप्रमाणे शेवटच्या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत अर्जुनराव सरांनी हिशेब सादर केला. त्यात यावर्षीचा बारा प्रयोगातून खर्च वजा जाता सात हजार रूपये उरले होते. त्यातील पुढील वर्षाच्या तयारीसाठी हजार रूपये ठेवून, छोट्या कलाकारांना बक्षीसे देऊन डोंगर विकासासाठी काम करणाऱ्या बदलाव संघटनेस पाच हजार रूपयांची मदत जाहीर करून एस्सेम अण्णांच्या हाताने ती रक्कम श्रीनाथला दिली होती. अण्णांनी बदलाव संघटनेने केलेल्या विविध आंदोलनाची माहिती घेतली होती. रात्रीच्या जाहीर सभेत बदलावंच्या युवाशक्तीचे अभिनंदन करताना ते म्हणाले होते,
 "लोकशाही अर्थपूर्ण करायची असेल तर केवळ कायदा करून भागत नाही. लोक शिक्षणावर भर दिला पाहिजे. कलापथक हे लोकरंजनातून लोकशिक्षण देणारे प्रभावी माध्यम आहे. समाजात जो अगदी शेवटच्या पायरीवर आहे त्याच्या हिताचा विचार सतत मनात ठेवला पाहिजे. त्याच्या विकासाशी आपली बांधिलकी आहे. आज राज्यकर्ते नैतिक मूल्याबद्दल बेपर्वा झालेत. अशा वेळी आपला संघर्ष रचनात्मक हवा. तुम्ही विधायक काम करीत आहात. ते लोकशिक्षणाचे प्रभावी साधन आहे.
परंतु विधायक कार्य करणाऱ्यांच्या मनात समताधिष्ठीत समाजाच्या ध्येयाची स्पष्ट कल्पना नसेल तर मग ते 'दिखावू कर्मकांड' बनते. बदलावने आपल्या तरूण मित्रांच्या मनात समताधिष्ठित समाजाची संकल्पना स्पष्टपणे गोंदवावी. राष्ट्र सेवा दल, समाजवादी पक्ष नेहमीच तुम्हाला मदत करील."
 त्यानंतरच्या बदलावचे तरूण डोंगर भागात नियमितपणे जाऊ लागले होते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक यांनी लहान शेतकऱ्यास सहाय्यक ठरणारी सामुदायिक विहिरीची योजना जाहीर केली. पण प्रत्यक्षात विहिरी कागदावरच राहिल्या. काही अर्धवट तर काहींचे नुसते खड्डे खोदलेले. चांगल्या योजनांचा खेळखंडोबा करून स्वत:च्या तुंबड्या भरणारी शासकीय यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांच्या या कारवायांवर श्रीनाथ, अण्ण्या प्रकाश, बप्पा आदींनी डोंगरात व अलिकडच्या भागात फिरून शोध घेतला. श्रीनाथने त्यावर प्रत्यक्ष माहिती व आकडेवारीचा आधार घेऊन लेख लिहिले. ते 'माणूस' या पाक्षिकातून प्रसिध्द झाले. लेखांनी अधिकाऱ्यांची झोप उडवली होती. आणि पुढाऱ्यांचीही. ते दिवस आठवून अनूचे मन आतल्या आत गुदमरून जाई. वाटे, मी मात्र संसार आणि नोकरीचं एकसुरी गाणे गात वाटेतल्या विसाव्याच्या दगडासारखी एकजागी उभी आहे. अस्वस्थता मनात घेऊन आली की ती राम मनोहर लोहियांचे 'ललितलेणी' किंवा विनोबाजींचे 'गीता प्रवचने' समोर घेऊन बसत असे. ललितलेणी मधील शेवटचा लेख 'अथ योगानुशासनम्' बळ देणारा होता. बेचाळिसच्या काळातल्या राजकीय कैद्यांचा छळ इंग्रजांनी टोकाला जाऊन केला. त्यात संयमाने रहाणारे कैदी... डॉ. राम मनोहर नोंदवतात, 'एक शिपाई सगळ्या राष्ट्रीय पुढाऱ्यांच्या नावाने शिव्या घालू लागला. माझे पित्त खवळले तरीही मी गप्प बसलो. मग त्याने गांधीजींचेही नाव घ्यायला सुरवात केली. 'चूप बस' असे मी बेंबीच्या देठापासून किंचाळलो. त्या किल्ल्यात बाजूबाजूला कोणी मित्र नव्हते माझ्या ओरडण्याला अर्थ नव्हता. अशावेळी माणूस विचार करून थोडाच वागतो? अविवेकाने शरीराचा ताबा घेणे हेही निकोपपणाचे लक्षण आहे....'



शोध अकराव्या दिशेचा / ७१
६.





अनू जिना चढून वर घरात आली. भाजी टोपलीत भरतांना कालनिर्णयाकडे लक्ष गेलं. आज मंगळवार उद्या पोस्टात पत्र पडायला हवं.
 कनक ईरा झोपले होते. अनू पत्र लिहायला बसली. गेल्या सहा महिन्यानंतरचे हे पहिले पत्र.
 "....इथे सगळंच कसं शान्त आहे. अर्थात समाजातला वरचा थर, …सर्वच अर्थाने. अधिकारी, प्राध्यापक, बडे व्यापारी वगैरे. खालच्या… तळागाळातल्या लोकांना तर दोन वेळेची भूक भागवितांना जीव मेटाकुटीला येतो. शिक्षक मात्र वैतागले आहेत. कुटुंबनियोजनाच्या केसेस मिळविण्यासाठी घराघरांना चाचपीत गल्लीबोळांतून हिंडताहेत. कोटा पूर्ण केला नाही तर पगार बंद. बिच्चारे ! आणि खेड्यात तर धसका घेतलाय लोकांनी. लाल फुलीची गाडी, नाही तर लाल दिव्याची गाडी पाहिली की खेड्यातील माणसे आडोसा शोधीत पळतात.
 कॉलेज मधल्या चहाच्या वेळेतल्या गप्पासुध्दा थंडावल्या आहेत. आपल्या घरापुढे कायम साध्या वेशातले दोन सी.आय.डी.पोलिस बसलेले असतात. पाणी प्यायचं झालं तरी आपलंच दार ठोठावतात. त्यांची डयुटी बजावतात बिचारे!
 या वर्षी गणेशोत्सवात कलापथक नेहमीप्रमाणे बसवलं होतं. बापटकाकांचं 'अन्नदाता' नृत्य, 'बिनबियाचं झाड' हा व्यंकटेश मागडगूळकरांचा वग आणि काही समूह गीतं. शेवटी कुसमाग्रजांची 'किनारा' कविता सादर केली होती. पहिला कार्यक्रम गणेशचतुर्थीला केजला केला. आणि दुसरा आपल्या आंब्याला. देवीच्या देवळातल्या पटांगणात. नेहमीप्रमाणे खच्चाटून प्रचंड गर्दी जमली होती. योगेश्वरी मंदिराच्या उजवीकडच्या चौथऱ्यावर ताडपत्री टाकून रंगमंच तयार केला होता. 'राष्ट्रसेवादल कलापथक : गणेशोत्सव १९७५: अंबेजोगाई' ही अक्षरं आपल्या
ड्राईंग मास्तरांनी, अशोक डुमरेनी सोनेरी रंगाचा कागद आणून, गर्द निळ्या रंगाच्या पडद्यावर चिटकावून दिली होती. तो पडदा रंगमंचाच्या मागे लावला होता. पडद्याचं कापड चक्क सारडाजींनी दिलं. ठाण आणून टाकलं समोर. म्हणाले, लागेल तेवढे वापरा. काम झालं की धून, इत्री करून, विकून टाकू.
 तुला ललितमोहन आठवतो? राजासाबांचे धाकटे चिरंजीव आणि दिन्या चाटे. दोघेही तसे आगाऊच. पण यंदा कलापथकाचे कार्यक्रम झालेय पाहिजेत, हा आग्रह त्यांचा. आणि पुढकारही. तालमींच्या काळात बालकमंदिरा जवळच्या अश्रफमामूच्या हॉटेलातून चहा येई अगदी रोज. रंगीत तालमींच्या दिवशी जगूभाऊ पैसे द्यायला लागले तर घेतले नाहीत. उलट म्हणाले, 'अरे हम तो कायर है। हमारे मोहल्लेमे रहनेवाले सय्यदसाब का लडका अमन भी श्रीभैय्याके साथ जेलमे है। अपने गांव के पाससे जादा आदमी....बुढे, जवान, पढ़ेलिखे सबको बाईने 'मिसा' में डाला है। मन बहुत जलता है। लेकिन क्या करे? इतना तो करने दो हमे। भाभी को बोलो...' समाधान हॉटेलचे द्वारकाभाऊ अधूनमधून येत. येतांना सगळ्यांसाठी गरम पोहे आणित. जेठा न्हाव्याचं काम करतो. आणि नंदा न्हाविणीचं. अगदी तुझी आठवण यावी असा अभिनय. उस्मान पानवाला, वकीलसाहेब, (यंदा नक्की पास होणार आहेत, म्हणे!) सगळेच मदत करतात. परवा सुभानराव येऊन गेले. जातांना आग्रहाने सांगून गेले की काही मदत लागली तर संकोच करू नका. त्यांना तरी ही आणीबाणी कितपत बरी वाटते देव जाणे! भलेही काँग्रेसचे असतील.
 अरे, जनक काठीवरच्या पायट्यांवर पाय ठेऊन तालात नाचतो. अगदी सराइतपणे मोठ्यामुलांच्या घोळक्यात हे चिंचेचं बुटूक. भरपूर टाळ्या घेतल्या....
 तर कार्यक्रम चढत चढत कळसाला पोचला. शेवटी सगळे रंगमंचावरचे, मागचे कलाकार रंगमंचावर आले आणि गीत सुरु झाले.

"उद्दाम दर्यामध्ये वादळी
जहाजे शिडावून ही घातली
जुमानीत ना पामरांचा हाकारा
आलाऽऽ किनाराऽऽ"
आणि मग टाळ्यांचा कडकडाट

 ... दुसऱ्या दिवशी मलाही पोलिस स्टेशनवर बोलावणे. कार्यक्रमातील काही
गाण्यांवर आक्षेप. काही शब्द म्हणे समाजात अशांती पसरवणारे उदा. 'उद्दाम'. वीर सावकरांचे 'ने मजसी ने परत मातृभूमीला' हे गाणे गाळा. आणि पुन्हा नम्र विनंती. "माँ तेरे बीसी सपने, साकार करेंगे' अशी राष्ट्रप्रेमाची गाणी म्हणा, वगैरे. अर्थात् हे सारे चर्चेत. लेखीबिखी नस्से. नवा पी.एस.आय. तरूण आहे. शेवटी त्यानेही प्रामाणिकपणे सल्ला दिला.
 "मॅडम, तुम्ही फक्त महाविद्यालयात शिकवा. मुलांचे वडील नाशिक जेलमध्ये 'मिसा' खाली आहेत. मुलं लहान, कलापथकही बंदच ठेवा…" क्षणभर थांबून त्याने विनंती केली, "धाकटा भाऊ म्हणून माझे एवढे ऐकाच". मी बी.ए.ला विंदांचा 'मृदगंध' शिकवतेय. "माझ्या मना बन दगड हा संदेशच खरा का?"
 श्रीनाथने एक हलकासा निश्वास टाकीत अनूच्या पत्राची घडी केली. ती बॅगेत नीट ठेऊन, तो परत पुस्तकात शिरला, 'रेड चायना टुडे' हे अेडगर स्नोचं पुस्तक हाती आल्या पासून आलीबाबाच्या गुहेत शिरल्यासारखं झालंय. जेलमध्ये आल्यापासून वाचन मात्र खूप चाललंय. बाकी उद्योग काय दुसरा? माओची वाक्य मनात घुमतच राहतात. त्याला माओचे वाक्य आठवले.
 … We should not feel ashamed to ask and learn from people below. Be a pupil before you become a teacher. Listen to the mistaken views from below, it is wrong not to listen to them.'
 "तळातल्या सामान्य माणसाने विचारलेल्या भोळ्या भाबड्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका. त्यातूनही खूप शिकता येते. मास्तर… शिक्षक होण्याआधी विद्यार्थी व्हा. त्यांचे चुकीचे वाटणारे विचार लक्षपूर्वक ऐका. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांचे म्हणणे न ऐकणे ही सर्वात मोठी चूक आहे." पुन्हा एकदा श्रीनाथने आपली नजर पुस्तकात खोचली. डोंगरातील लहान कोरडवाहू शेतकरी, बलुतेदार, भूमिहीन यांच्या सोबत पुढे काम करायचे तर हे वाक्य खोलात जाऊन समजून घ्यायला हवे असा विचार त्याच्या मनात आला.
 एक दिवस सकाळच्या भत्त्याच्या वेळी बातमी आली. आमदार धोंडग्यांनी उपोषण करण्याचा सज्जड दम भरल्यामुळे, व्यक्तीला ट्रांझिस्टर बाळगण्याची संमती दिली नाही तरी प्रत्येक बराकीत कार्यालयातील रेडीओचा कर्णा बसवणार आहेत. आणि मग बातम्यांची वेळ झाली की कर्ण्याभोवती सगळे जमत. सगळ्यांनाच जेलचीही बऱ्यापैकी सवय झाली आहे.
 जेलच्या मध्यभागी ग्रंथालय होते. त्यात काही दैनिके येत. पुस्तके मात्र या मिसावाल्यांना फारशी न आवडणारी. पहिली दुसरीत आहोत असे वाटावे, अशी. पण गेल्या काही दिवसांपासून भेटायला येणाऱ्यांना लाडू चिवड्या बरोबर पुस्तके आणण्याचीही परवागनी मिळाली होती. आणि म्हणूनच श्रीभैय्या दिवसभर 'रेड चायना टुडे' या ग्रंथात डुबकी मारून बसत.
 सेपरेट मध्ये गजाच्या दारातून थंडी, वारे आत येई. सर्वांनी ओरडा केल्यावर चवाळ्याचा… पोत्याच्या जाळीदार कापडाचा पडदा लावण्यात आला. तरीही फरशीवर टाकलेली सहा फुट लांब नि दोन फुट रूंदीची सतरंजी आणि काथ्या भरलेली टुचटुचणारी उशी यांचा सहवास असह्य होई.
 "सेवादल हा माझा प्राण आहे" असे म्हणणारे मातृहृदयी पू. साने गुरुजी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात "वॉरंटाईन" विभागात होते. काही अति महत्वाच्या राजबंद्यांना या विभागात ठेवित. माजी खासदार मोहन धारीया, माजी आमदार डॉ.बापू काळदाते यांना त्या विभागात ठेवले होते. या दोघांनी आग्रह केल्यामुळे दैनिक मराठवाडाचे संपादक श्री.अनंत भालेराव यांना तिथे ठेवले.
 इंदिरा गांधींची राजनिती त्यांच्या मनाचा थांग हाती लागू नये अशी. तसेच शासनाचे धोरण, एसेम जोशी, ना.ग.गोरे, उत्तमराव पाटील व बिनीच्या वृध्द पुढारी मंडळींना मात्र मोकळे ठेवले होते. अर्थात ही मंडळी स्वस्थ बसलेली नव्हतीच. यदुनाथ थत्ते इसापनितीच्या कथा मुलांना कथा-मालेतून सांगत. त्या कथा ऐकण्यासाठी मुलांएवढीच मोठ्यांची गर्दी असे. एसेम जोशी-आण्णा सतत फिरत होते. दीडशे वर्षानंतर मुक्त झालेल्या स्वातंत्र्य देवतेचे हातपाय कसे बांधून टाकले आहेत, हे गावोगाव जाऊन ते आपल्या धारदार साध्या भाषेत लोकांना सांगत. अण्णांनी जणू पायाला चाकेच बांधली होती. एक दिवस त्यांनी जाहीर केले मिसातील सर्व राजकीय कैद्यांना राजबंदी हा दर्जा आणि अ वर्ग मिळाला पाहिजे असे केले नाही तर अण्णा आमरण उपोषण करणार होते. एका जागी न बसता आणीबाणी विरूध्दचा प्रचार न थांबवता सत्तरी ओलांडलेला हा नेता. त्याच्या शब्दांना विलक्षण वजन आणि धार होती. शब्दात कणखर निग्रह होता. उत्तरेकडून घोंघावरणाऱ्या वादळांनाही सह्याद्रीच्या उंच दगडी माथ्यापुढे मान झुकवावी लागली. एक दिवस अचानक जेलर साहेब आले. सर्व मिसा राजबंद्यांना अ वर्ग मिळाल्याचे त्यांनी सांगितले. बावनपत्तेकी… साग
तरकारीचा भत्ता संपला. पोळी भाजी मिळू लागली. पाहता पाहता सात महिने उलटून गेले होते. एका खोलीत दोन जणांना ठेवत.
 या निर्णयामुळे जेलच्या अधिकाऱ्यांची धांदल उडाली. नाशिक मध्यवर्ती कारागृहात सुमारे पंधराशे मिसा राजबंदी होते. एवढ्यांना कॉट्स, टेबल, टेबल लॅम्प, गाद्या, ऊशा… एवढ्या मोठ्या प्रमाणावर या वस्तू अवघ्या काही दिवसात तयार करण्याची धांदल उडाली. काथ्याच्या उशीचा सहवास संपला. गादी मिळाली. कॉट आला. मऊ गादी, दोन उशा, एक तकिया, पांढरी चादर, दोन कॉटस च्या मध्ये टेबल आणि त्यावर चक्क वाचण्यासाठी टेबललॅम्प. रात्रभर वाचायला परवानगी. सायंकाळी लावले जाणारे कुलूप काढले गेले. रात्री पूर्ण बराकीलाच कुलूप घालीत. त्यात भर अशी मुंबईकर मंडळीनी ट्रकभरून पुरणपोळ्या आणि ट्रकभरून पुस्तके पाठविली.
 मिसा राजबंद्यांची आवक मात्र थांबली नव्हती. एक दिवस मराठवाड्यात आदराचे स्थान असलेले त्र्याऐंशी वर्षाचे शर्माजीही यासर्वात दाखल झाले. सगळे मिसा कैदी शर्माजींना नानाजी म्हणून हाक मारतात. महात्मा गांधीजी आणि विनोबाजी यांच्या आचार विचारांच्या अत्यंत निरोगी… निरामय मिश्रणातून साकारलेली मूर्ती म्हणजे नानाजी. महात्माजींनी १९३० साली मिठाच्या सत्याग्रहासाठी तीस जणांची निवड केली होती त्यातले एक नानाजी होते. नानाजींच्या डोळयातून नेहमी अपार माया, आत्मीयता पाझरत असते. आणीबाणी जाहीर झाली तेव्हा नानाजींनी त्र्याऐंशीव्या वर्षात नुकतेच पाऊल टाकले होते. पण चालणे मात्र ताठ. खादीचे धोतर. पांढरा धुवट नेहरू शर्ट. अर्थात् तोही पांढराच. खांद्यावर गमछा. कपाळ आणि डोके यांच्यातली सीमारेषा पार पसलेली. चकचकित टक्कल असलेल्या डोक्याला पांढऱ्या तुरळक केसांची झालर. डोक्याच्या डाव्या बाजूला काळा तीळ. असे हे नानाजी पहाटे पाचला उठून प्राणायाम करतात. थंड पाण्याने स्नान करतात. नंतर दोन तास चरख्यावर सूत काततात. त्यांच्या चरख्याच्या आवाजालाही एक पवित्र लय होती. त्या आवाजनेच पहाट उजाडते. नानाजींच्या भत्त्यावर अमन, अशक्या, बन्सी यांच्या उड्या असतात. जेलरनाही नानाजीबद्दल नितांत आदर आहे. ते त्यांच्यासाठी घरून गुळ आणून देतात. नानाजींचा भत्ता म्हणजे गुळाचा खडा आणि तांब्याभर पाणी. असे हे नानाजी सत्याग्रह करून नासिक कारागृहात आले आहेत. नानाजी इंदिरा गांधीचा उल्लेख नेहमीच 'इंदू बिटिया' असा करतात. पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात एकूण सात वर्षे तुरुंगात काढलेल्या नानाजींनी दुसरे स्वातंत्र्य मिळविण्यासाठीही
सतत सत्याग्रह केला. खरे तर नानाजीचे मोठे चिरंजीव दोनवेळा खासदार म्हणून निवडून आलेले, काँग्रेसचे लोकप्रिय आणि सद्भावी कार्यकर्ते. पक्षापेक्षाही लोकनीती आणि सामाजिक न्याय श्रेष्ठ असे नानाजींचे ठाम मत आहे. सुरवातीला पोलिस नानाजींना पकडत आणि लगेच सोडून देत. नानाजींना सोडून दिले की लगेच चार दिवसांनी ते शहराच्या मध्यवर्ती चौकात आणीबाणीचा निषेध करणारा फलक घेऊन सत्याग्रह करीत. शेवटी नाइलाजाने त्यांची रवानगी नासिकच्या मध्यवर्ती कारागृहात झाली आहे. पूर्ण मराठवाडयात या सात्विक स्वांतत्र्य सैनिकाबद्दल नितांत प्रेम आहे.
 अशात अस्वस्थ करणाऱ्या बातम्या येत आहेत. वसंत ऋतु संपला आहे. जेलमध्ये येऊन वर्ष झाले आहे. जेवण बरे असते, तुप, गुळ सारे मिळते. पण दिवस जाता जात नाहीत. जमात ए इस्लामीच्या विदर्भातल्या कार्यकर्त्याचे वडील अल्लाला प्यारे झाले. पण त्यांचा जनाजा उचलण्यासाठी, पित्याला शेवटचा खांदा देण्यासाठी मझर भाईना पॅरोल मंजूर झाला नाही. दातार काकांच्या पत्नी दोन वर्षापासून कॅन्सरने आजारी होत्या. त्यांच्या मृत्यूची बातमी आली. पण काकांना नाशकातल्या नाशकात जाण्यासाठी दगडी भिंत ओलांडता आली नाही. अशा बातम्या आल्या की वाटे दहा दिशांना फक्त अंधाराच भरलाय. उजेडाचे स्वप्न पाहण्याचे धाडस हरवू लागलेय. परंतु जाती धर्माच्या वैचारिक मतभेदांच्या भिंती मात्र ढासळू लागल्या होत्या. अगदी सहजपणे, नकळतपणे, दातारकाकांचा हात मायेने घट्ट धरून मुक्याने अश्रू गाळीत सांतवन करणारे रमजानभाई, दुःखाच्या आवेगाने कोसळलेल्या तरूण मझरभाईला कुशीत घेऊन त्याच्या डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवणारे कुलकर्णी काका…
 अशोक, अण्ण्या, अमन अलिकडे अबोल झाले होते. सतत सलणारं, कुणाला सांगायलाही संकोच वाटावे असं एकटेपण सगळ्यांनाच अबोल करणारे. औशाच्या सहदेव सोळुंके या तरूण वकिलाच्या पत्नीने एकटेपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची वार्ता आल्यापासून जो तो आतून हादरला होता.
 श्रीनाथ कोऱ्या करकरीत मनाने व्हरांड्यातून वेगाने फेऱ्या मारू लागला. मध्यरात्र उलटली होती.
 नरहरी अण्णा पायाची जुडी करून भोवती हात बांधून डोळे मिटून कॉटवर बसले आहेत. त्यांनाही झोप येत नाहीय. त्यांना मुल ना बाळ, देवाघरी गेलेल्या धाकट्या बहिणीची मुलं आपलीच म्हणून सांभाळणारे नरहरी अण्णा. त्यांची साधी
सुधी अडाणी पत्नी. कशी सांभाळत असेल ती मुलांना? कसे भागवीत असतील दोन वेळेची भूक? त्याचाच तर विचार करीत असतील का अण्णा? त्यांच्याच खोलीतले प्रशादजी उशा जवळ डायरी आणि चष्मा ठेवून शांतपणे झोपले आहेत. काय लिहिलं असेल त्यांनी दैनंदिनीत? गांधीजींच्या विचारांवर अपार निष्ठा आणि श्रद्धा असलेला हा मराठवाड्यातील सर्वोदयी संत. ओठांवर नेहमी मंद, तृप्त हसण्याची लहर. सहा फुटी उंची आरपार ठाव घेणारे नम्र डोळे. त्यात करूणा. खादीचे धोतर, फिकट रंगाचा नेहरू शर्ट आणि गमछा असा साधा वेश. आचार्य विनोबाजींनी आणीबाणीला 'अनुशासनपर्व' असे संबोधले. प्रशादजींना त्याबद्दल काही प्रश्न केला की ते काहीसे मिस्कीलपणे हसत. त्या हसण्यातही सहजता. त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दैनंदिनीत नक्कीच नोंदवल्या असतील. काय असतील त्या? श्रीनाथच्या मनात आले.
 त्या खोलीत पलिकडची खोली अमन आणि सुधीरची. त्याच्या नंतर अशोक आणि बन्सीधरची. कसे निवांत आणि मस्त झोपलेत.
 पत्नीच्या मुलाबाळांच्या सहवासाची किती सवय होत असते ना? जनक आणि इराच्या आठवणीनी श्रीनाथ बैचेन झाला. आता पहाटवारे वाहू लागलेत. हा चन्दप्रकाश अंब्याच्या घराच्या खिडकीतून अनू, इरा व जनकच्या अंगावरही पडला असेल. हा पहाटवारा त्यांनाही झोंबत असेल. मुलांना दुलईत घेऊन, त्यांच्या अंगावर हात टाकून अनू एकटीच झोपली असेल. त्यांचे श्वास... मिसा कैद्यांचे श्वास ह्या वाऱ्या सोबत एकमेकांकडे मनाची स्पंदनं घेऊन जात असतील का? कुसुमाग्रजांच्या गर्जा जयजयकार मधल्या त्या ओळी सहजपणे श्रीला आठवल्या.

श्वासानो जा वायूसंगे ओलांडून भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी तुझी मुलेही या अंधारात
बध्द करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात....

 निंबोणीवरची चांदणफुलं आता दिसेनाशी झाली. बारीक बारीक हिरव्याकंच निंबोण्यांचे झुपके पिवळे होऊन गुळचट कडू निंबोण्यांचा सडा पडेल. पहाता पहाता वैशाख संपेल. ग्रीष्माचा दाह सुरु होईल... नि मग येणारा वर्षा ऋतु.
 ..... पण सर्वांच्या ... मिसावाल्यांच्या मनात कोणता ऋतू असेल? अंधार ऋतू? की न संपणारं 'अंधायुग?'

७.





 रोज सकाळी वझे आजोबांना 'नवाकाळ' दैनिक अथ पासून इति पर्यंत वाचून दाखवण्याचे काम अंकुशचे असे. आंजाने केलेला चाहा पीत आजोबा सातच्या मराठी बातम्या ऐकत. त्यावर त्यांची स्वतःची मतं ऐकवत. पणजीबाईची..जाणकाक्कांची चाकाची खुर्चीही पावणेसातला जेवणाच्या टेबलाजवळ आंजा आणित असे. मगच गॅसच्या शेगडीवर चहाचे भांडे चढे. आजीबाई… वसुधाताई चहाचे घुटके घेत भाजी निवडत बातम्या ऐकत. सकाळी सहाच्या दिल्लीवरील बातम्यापासून घरात आंजाचा वावर सुरु होई. साडेसहाला अंकुश कोपऱ्यावरून दैनिक नवाकाळ घेवून येई. अंकुशचा चहा वझे कुटुंबातच होत असे.
 खरे तर वझे साहेबांच्या घरचे काम न करण्याचे आंजा-अंकुशने ठरवले होते. पण शिवादादांनी हा निर्णय समजुतीने बदलायला लावला. आंजा हुशार आहे. लिहिण्यावाचण्याचा नाद आहे. नव्या घरात गेल्यास तिच्या भविष्याला चांगली दिशा मिळेल. अंकुशलाही दादरच्या कामावर देखरेख करणे सोयीचे होईल. हा शिवादादांचा विचार. आंजा, अंकुश सोनूसह या बंगलीच्या आऊट आऊस मध्ये राहयाला येऊनही आता तीन वर्ष झाली आहेत. आणि अकुंश, आंजा, सोनू या कुटूंबात चांगली रूळली आहेत. वझे साहेबांची मुले वर्षातून एकदा भारतात येऊन जातात. आपल्या घरातील जेष्ठांची… म्हाताऱ्यांची काळजी अगदी घरगुती पध्दतीने घेतली जातेय हे पाहून ती समाधानी आहेत. सोनू या आजी आजोबांच्यात रमली आहे. आंजाने रात्रशाळेत जाऊन दहावीची परीक्षा दिली. त्यात बासष्ट टक्के गुण घेऊन पासही झाली. आजींनी पत्ते खेळायला येणाऱ्या मैत्रिणींना छानपैकी पार्टी देऊन आपला आनंद व्यक्त केला. पणजीबाईंनी आंजाला सुरेखशी साडी आणि सोनूला फ्रॉक आणला. त्यांनी दिलेलं प्रेम आंजाच्या डोळयात मावेनासं होतं. डोळे भरून येतात.
आभाळाकडे पाहत ती हात जोडते नि म्हणते देवाची करणी माणसा माणसांची जोडणी.
 सुरुवातीला आजींनी तिला स्वयंपाक घरातील नवनव्या साधनांची माहिती दिली. स्वच्छता, टापटीप यांचे धडे दिले. पणजीबाई मात्र आंजा अंकुशवर नाराजच होत्या. "माधवा, कोण कुठली माणसं, कोणत्या जातीची हे तरी विचारलंयस का? माझं अर्ध आयुक्ष कोकणातल्या गावात, सोवळं ओवळं पाळण्यात गेलं. मला कळतंय रे माझ्या पांगळीचं करायला माणूस हवंच. सूनबाईची साठी उलटून दोन वरीसं झाली. ती तरी कुठे धावपळ करणार? पण निदान माझ्यापुरती एखादी पोळी करीत जा म्हणावं. नि वरणा भाजीला फोडण्याही घालत जा. त्या पोरी कडून बाकी सगळी उस्तवारी करून घ्यावी. पण गॅस पाशी कशाला ती?..." पणजीबाईंनी काहीशा कडक शब्दांत आपल्या मुलाला… माधवरावांना-आजोबांना फर्माविले. आईचे बोलणे ऐकूण आजोबा हसले.
 "आई, माझी सत्तरी जवळ आलीय. या बंगलीत येऊन पस्तिस वर्ष झाली. गेली पंचेचाळीस पन्नासहून अधिक वर्ष मुंबईत वाढलीस तू. तरी अजून सोवळ्या ओवळ्यातच बुडालेली? वसुधा तुझ्यासाठी नक्की चार पोळ्या करील. तू काळजी नको करूस.
 आई, सतत तीन वर्षाचा दुष्काळ. शेताला पाणी नाही. हाताला खेड्यातून काम नाही. मागास भाग म्हणून जवळच्या शहरातून काम नाही म्हणून ही माणसं मुंबईत आलीयेत. आठव ना तू जुने दिवस. माझे आजोबा कोकणातले. कोकणातील चार गुठ्यांच्या दोन तुकड्यात भात तो किती पिकणार? ते कोकणातून इथे का आले? माझे तात्याही चाकरमाने बनून इथेच राहिले ना? तुही आमच्या शिक्षणासाठी पावसचा चौसोपी वाडा सोडून गायवाडीच्या दोन खोल्यांच्या चाळीत रमलीस की नाही?
 उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरमानी अस तूच शिकवलंस ना आम्हाला? पण गरजेनं आलोना इथं आपण! झालो ना चाकारमान्या मी? तुझी नातवंड भरपूर पैसा पाठवतात. मला पेन्शन मिळतं. पण खायला भात भाजी नि भाकरीच हवी ना?
 अंकुश शेतकरी आहे. जातीला काय पाहाचयं? हे बघ चारपैसे जमले की तोही जाईल त्याच्या गावाकडे. शेतात पुरलेलं मन मुंबईत कसं रमेल. दहा एकराचा मालक आहे तो. आणि आपलं म्हणातारपण या पोरांमुळे गार सावलीत निवांतपणे घालवतोय
आपण. दोन चार वर्ष राहतील. नि जातील माघारी. शेत विकलं नाहीये त्यांनी…!" आजोबांनी आपल्या आईची-पणजीबाईची समजूत घातली. त्यानंतर मात्र या विषयाला कधीच आडवाटा फुटल्या नाहीत.
 त्या दिवशी सकाळच्या बातम्यांत इंदिराजींनी देशात आणीबाणी जाहीर केल्याचे कळले. आणि आजोबा काळजीत पडले. त्यांनी अंकुशला इंग्रजी… मराठी, सर्व वर्तमानपत्रे आणायला कोपऱ्यावर पाठवले. गेल्या पन्नास वर्षातल्या विविध आठवणी मनात उसळू लागल्या. जुने दिवस आठवले. वझे कुटूंबाची पावसला चार गुंठे जमीन आहे त्यात भात शेती होती. जुनं कौलारू ऐसपैस घर. अंगणात बारव. गोड्या पाण्याची. आणि भवताली वीस नारळाची, वीस, सुपारीच, चार हापूस नि दहा पायरी आंब्याची झाडं. कोकम, बदाम, केळी, फणस, चिकू यांची चार दोन झाडं. पण घरात दोन भावांचं खटलं. मोठे सावळाराम. म्हणजे आजोबांचे वडिल. त्यांना अरविंद आणि माधव अशी दोन मुले. धाकटे शिवराम त्यांना चार मुली आणि एक मुलगा. घरात माघारी आलेली सोवळी बहिण भागिरथी. दहापंधरा जणाचं कुटूंब, दोहो वेळेला भाजी भाताची सोय होणे अवघड जाई. खाडी ओलांडून रत्नागिरीस जावे लागे. कधी कधी तर घरात आंबे सडून जात. पण रत्नागिरीस पाठवण्याची सोय होत नसे. एक दिवस सावळारामाने मुंबईचा रस्ता धरला. रत्नागिरीस मामाच्या घरी राहून तो चार बुकं शिकला होता. गणितात तरबेज होता. मुंबईत कापड गिरणीत कारकुनाची नोकरी मिळाली. त्याची पत्नी जानकी शेतीकामात हुशार होती. भाताची लावणी पध्दतशीर करी. पोहे करण्याचे कसब तिला होते. कोकमाची अमसुले तर तिनेच करावीत. सावळाराम मुंबईत गेला तेव्हा तिने निक्षून सांगितले होते की ती मुंबईस यायची नाही. तिचा जीव नारळी पोफळीच्या बागेतच पुरलाय. धाकटी जाऊ यशोदा आणि तिचे चांगले मेतकुट जमले होते. घरातील उस्तवारी विधवा नणंद भागीरथी बघे. मग त्या दोघी आंबे, फणस, कोकम यांची उस्तवारी करीत. मुंबईचे चाकरमाने गौरीगणपतीला गावी आले की त्यांचेपाशी आंब्या फणसाच्या पोळ्या, अमसुले, नारळीपाकाच्या वड्या असा सुकामेवा देत. त्यातून मिळणाऱ्या पैशातून पोरांची पुस्तके, कपडे, शाळेची फी थोडीफार निघे. जानकीचा मोठा अरविंद सातवीला गेला. धाकटा माधव आणि यशोदेचा चिंतामणी पाचवीला गेले. मग मात्र सावळारामांनी निक्षून सांगितले की शिक्षणासाठी मुलांना मुंबईस न्यायचे. आणि जानकीने सर्वाच्या
जेवनखाण्याच्या सोयीसाठी मुंबईत रहायचे. तशीच तीन वर्षे पुढे ढकलली. माधव व चिंतामणी सातवी फायनल पास झाले.
 .... आणि मग पणजीबाई, तेंव्हाची जानकी मुंबईत आली. माधव म्हणजे आताचे आजोबा सत्तरीला आले आहेत. मोठा अरविंदा चार वर्षांपूर्वी देवाघरी गेला. त्याचा बारदाणा पुण्यात असतो.
 त्या दिवशी अंकुश संध्याकाळी कामावरून आला, तो थेट आजोबांच्या बैठकीत.
 "आजोबा, वातावरण लईच बेक्कार झालंय. आमचं काम चालू असलेल्या बिल्डींगीच्या समोर मधू दंडवते राहतात. तिथे आज पोलिसांची गाडी उभी होती. ताई आणि नाना, दोघेही श्रम करणाऱ्यांच्या हक्कासाठी भांडणारे. बायाबापड्यांच्या अडचणी सोडविणारे. पण पहाना, पकडून नेले त्यांना. खूप गर्दी जमली होती. पण गर्दी न बोलणारी. का त्यांना पकडून नेताय? त्यांचा गुन्हा सांगा मग अंगाला हात लावा... हा विचार प्रत्येकाच्या मनात होता. पण डोक्याच्या बरणीचं झाकण गच्च बंद केलंय बाईनं. अलिकडे नुस्ता संशय आला, एखादा शब्द वावगा बोलला तरी पकडून नेत आहेत, असे आमचे शिवादादा सांगत होते... हे सारं नवीनच. पण हे ऐकुणही मन उदास होतं" अंकुशने आजोबांजवळ मन मोकळं केलं.
 बाहेरच्या व्हरांड्यातील बंगईवर बसून आजोबा झोका घेऊ लागले. आणि त्यांचे मन मागे मागे जाऊ लागले. १९४८-४९ चा काळ, आजोबांना... माधवला एका व्यापारी कंपनीत अकाऊंटटची उत्तम नोकरी होती. 'बे एक बे' च्या पाढ्यासारखे सारे कसे सुरळीत चालले होते. ३० जानेवारी १९४८ ला सायंकाळी महात्मा गांधीजींची प्रार्थना सुरु असतांना, नथुराम गोडसेनी महात्मा गांधीचा निर्घणपणे खून केला. त्याचे पडसाद भारतभर उमटले, विशेषतः महाराष्ट्रात. सर्वात जास्त परिणाम भोगावे लागले महाराष्ट्रातील ब्राम्हण समाजाला. त्यातही कोकणस्थ ब्राम्हण समाजाला. ती काळ लाट माधवलाही धडक देऊन गेली.
 माधव लहानपणी संघाच्या शाखेत जात असे. त्यावेळी गायवाडीतल्या चाळीत त्यांचे बिऱ्हाड होते. दसऱ्याच्या दिवशी गिरगावातून भल्या सकाळी प्रभात मिरवणूक प्रमुख रस्त्यावरून निघे. सुरवातीच्या बँड पथकात ड्रम वाजवण्याचे काम माधव हौसेने करी. महाविद्यालयात गेल्यावर त्याचा मित्र परिवार रूंदावला. विविध जाती
जमातीच्या, विविध प्रांतातून आलेल्या विद्यार्थ्यांशी दोस्ती जमली. बेचाळीसच्या 'भारत छोडो' चळवळीत त्याचे अनेक मित्र सहभागी झाले. परंतु चळवळीत उतरण्याचे धाडस माधवमध्ये नव्हते. चार वर्षापूर्वी वसुधाशी त्याचा विवाह झाला होता. तरीही महत्वाचे निरोप पोचवणे, वेष बदलून भूमीगतपणे काम करणाऱ्यांना काका, मामा बनवून घरी सुरक्षित ठेवणे, अशी कामे तो बिनबोभाट करी. १९४८ च्या फेब्रुवारीत अचानक पोलिस आले आणि माधवला घेऊन गेले. परंतु काँग्रेसमध्ये असलेले गणेश श्रीवास्तव, यशवंत गायकवाड या पुढारी मित्रांना कळताच त्यांनी भरारा चक्रे फिरवली. आठ दिवसाचा तुरुंगवास भोगून तो घरी परतला. तेव्हा मोठा विवेक चार वर्षांचा होता तर धाकट्या नरेंद्राच्या वेळी वसुधा गर्भवती होती.
 २७ वर्षापूर्वीचा तुरूंगवास आठवून आजोबा अस्वस्थ झाले. 'वसुधा १९४८ ची आठवण आहे ना? डॉ.राम मनोहर लोहिया बाईला गूंगी गुडिया म्हणत असत. पण हाती सत्ता आल्यावर 'ही मुकी बाहुली' भलतीच दौडायला लागलीये. ती काय पावलं उचलील याचा अंदाज बांधणं कठीण आहे... 'हरी ओम तत्-सत्' असे म्हणत ते आतल्या खोलीत गेले.
 सोनूला शाळेत सोडण्यासाठी आंजा गेली तेव्हा लाऊडस्पीकर 'माँ तेरे बीसों सपने साकार करेंगे हम' हे गाणे कर्कश आवाजात गात होता. अलिकडे सोनू हेच गाणे बडबडत असते. अशात प्रश्नही खूप विचारते. परवाच आजोबांना विचारत होती की माँ म्हणजे आईच ना? त्यांनी हो, म्हणताच सोनु आंजा जवळ आली आणि प्रश्न केला "मम्मी तुझी वीस स्वप्नं कोणती? आणि स्वप्नं म्हणजे काय गं?" अंकुश, आजोबा, आजी सगळेच तिच्या प्रश्नावर खूप हसले. लगेच दुसऱ्या दिवशी नवी माहिती तिने पुरवली होती.
 'माँ म्हणजे आपल्या भारत देशाची आई. पंतप्रधान इंदिरा गांधी, त्यांची वीस स्वप्ने आम्ही मुलांनी साकार करायचीत. असं मीना दिदी म्हणतात.'
 आजकाल जिकडे तिकडे हेच गाणं वाजतं. मग समारंभ सार्वजनिक सत्यनारायणाचा असो वा मौंज. बँडवालेही हेच गाणं दणादण वाजवणार. आंजा सोनूला शाळेत सोडून येतांना तिथल्या पालकांना थांबायला केलेल्या खोलीतील वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके चाळत असे. अशात, वर्तमान पत्रांतून येणाऱ्या मोर्चे, घेराव, उपोषण, सत्याग्रह इत्यादींच्या बातम्या येईनाशा झाल्यात. नजर खेचून घेईल असा मजकूरच
नसतो. जिकडे तिकडे स्वयंशासनाचा घोष. आणि, 'इंदिरा इज इंडीया' नारा. सायनच्या झोपडपट्टीत शारदाताई नेहमी येत. त्यांच्या संघटनेचे कार्यालय रेल्वेचा पूल ओलांडून पूर्वेकडे गेले की लागते. त्यांना भेटावसं वाटतं. पण वेळ कसा काढावा? घरात काम नसले तरी आंजा सतत समोर असणे आवश्यक झाले आहे.
 एका सकाळी एक गृहस्थ लाल दिव्याच्या गाडीतून अचानकपणे आजोबांची... माधवराव वझेंची चौकशी करीत आले. त्यांच्यासाठी चहा करतांना त्यांचे बोलणेही अंधुकपणे ऐकू येत होते. संघाच्या कार्यक्रमांना आजोबा जातात का? गुरुदक्षिणा निधी किती देतात? अशा चौकशा करीत होते. घराबाहेर पडतांना त्यांनी आजोबांना निक्षून सांगितले, "आबा, तुम्ही मला ओळखले नाही मी विवेकचा जिगरी दोस्त. मोहन जाधव. गुप्तहेर खात्यात अधिकारी आहे. गांधी खून खटल्याचे काळात तुम्हाला अटक झाल्याचे रेकॉर्ड आहे. सर्व जुनी रेकॉर्डस धूळ झटकून उघडली जात आहेत. काळजी करू नका. मी आहेच. पण कोणत्याही सार्वजनिक सभांना जात जाऊ नका. येतो मी." आणि ते गृहस्थ निघून गेले.
 ते बोलणे ऐकून आंजाला प्रश्न पडला संघ म्हणजे काय? इतिहासात तिने 'बुध्दं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघ शरण गच्छामि' ही प्रार्थना ऐकली आहे. तो संघ महात्मा गौतम बुध्दाचा संघ जगात शांती यावी, दुःख समाजापासून दूर रहावे यासाठी प्रयत्न करणान्यांचा समुदाय होता. मग हा संघ कोणता... हा समुदाय कोणता? मराठवाड्यातील खेड्यात वाढलेल्या आंज्याला हा नवा 'संघ' माहित नव्हता... तिने मनातले विचार दूर ढकलले. आणि कणिक तिंबू लागली.
 अंकुश रात्री उशीरानेच घरी आला. गावाकडून गोविंददादा आले होते. त्यांनी श्रीभैय्यांनाही अटक झाल्याची खबरआणली होती. त्यांना नाशिकच्या जेलमध्ये ठेवलंय. बीड जिल्ह्यातले ऐंशी-ब्याऐंशी लोक तिथे आहेत. पंधरावीस जण येरोड्यात... पुण्याजवळ आहेत. हे ऐकून आंज्याला गोंविददादांना भेटावेसे वाटले. त्यांना भेटायचे तर सोनूचे पप्पा काम करतात तिथे जायला हवे. उद्या तिला शाळेतून सोडून येतांना शारदाताईंच्या कार्यालयात जाऊन यायचे असे तिच्या मनाने ठरवले. सकाळी आजीची परवानगी काढायचे लक्षात ठेवले अंकुशला तिने जतावून सांगितले की ती येईपर्यंत दादांना थांबवून घ्यायचे. गेल्या चार वर्षात गावाकडे जाणे जमले नव्हते. आंज्याला सगळ्यांना खूप-खूप भेटावेसे वाटत होते पण....
 ..... निळावंतीचा डोह आता तुडुंब भरून वाहत असेल का? दगडवाडीतल्या तरूण सुनांना अजूनही डोंगर उतारावरून उतरूण पाणी भरावे लागत असेल? मध्यात असलेला तो घागर टेकून दम घ्यायला देणारा टेकाचा दगड तसाच असेल? लाकुडफाटा बायांनीच गोळा करायचा. गवऱ्यासाठी शेण साठवायचं. गवऱ्या थापून त्यांची चवड रचायची. पाऊस जवळ आला की पांढरी माती, शेण कालवून त्या उतरंडीवर दाट लेप द्यायचा. मग भर पावसातही एका बाजूने गवऱ्या अलगदपणे खालून काढता येतात. त्या कोरड्या पण रहातात. भाकरी भाजणार बायाच. झाडझूड करणार त्याच. पहाटे शुक्राची चांदणी लुकलुकायला लागली की बाईचा दिवस सुरु व्हायचा तो थेट अंधार गुडूप होई पर्यंत. अंजाच्या डोळ्यासमोर कोरडी ठण्णं निळाई, दगड गोट्यांनी भरलेला दगडवाडीचा वैराण माळ, त्यांचे उतारावरचे भरड रान आले. एखादा एकराला जरी पाणी मिळाले असते तर कशाला जावे लागले असते इथे? पण पाच सालांपूर्वी इथे आलो म्हणून आज, पायाने अधू असलेल्या काकांना अंकुश वेळेवर पैसे पाठवू शकतो. जमीन पडिक राहिली तरी जागेवरच आहे. माणसांच्या अडचणी केवळ पैशानेच दूर व्हायच्या का? आणि सुखसोयी सुध्दा पैशानेच मिळवायच्या?.... आंजाच्या मनात विचारांचं जाळं झालं होतं ते झटकून ती अंकुशच्या कामाच्या ठिकाणी निघाली. पण आंजा कामाच्या जागी पोचण्याआधीच अंकुश तिला वाटेत भेटला त्याने तिला माघारी फिरवले. तो आणि शिवादादा श्रीभैय्यांना भेटायला गोविंददादासोबत नाशिकला जाणार होते. अंकुश गोविंददादांबरोबर पुढे चार दिवस गांवी जाऊन येणार होता.
......
 नाशिक रोडवरचा ऐसपैस पसरलेला तो निर्विकार तुरुंग. कित्येक वर्षांपासून मख्खपणे उभा आहे. भारतातील मध्यवर्ती तुरुंगापैकी हा एक. आत मुख्य लोखंडी दरवाजातून शिरले की लिंबोणी, वड यांची काही डेरेदार झाडं दिसतात. मग क्षणभर हायसे वाटते. मध्यात दगडी इमारत. व्हरांड्याला गजाळ्यांची भक्कम उभी जाळी. बाहेर तासभर थांबल्यावर मधल्या आवाराच्या पायऱ्या चढून, मधल्या कॅरीडोर मधून श्रीभैय्या येतांना दिसले. मागे अमन, अशोक, अण्ण्याही होते. भेटणाऱ्यांच्या यादीत अंकुशचेही नाव होते. तो आंब्याला थांबेलच असा विचार करून सगळ्यांनी घरी द्यायला चिठ्ठया आणल्या होत्या.
 ".... मात्र गोविंददादा आमच्यासाठी भरपूर पुस्तकं पाठवा. आणि पुढच्यावेळी याल तेव्हा ठाणवाईच्या डोंगरातला मेवा आणा. हापुस पायरीपेक्षा आपल्या भागातले आंबे नक्कीच चवदार आहेत. श्रीनाथने गोविंददादाना हसत सांगितले आणि तो उठला. तासभर कसा आणि कुठे गेला कळले नाही. निघतांना मन कसनुसं झालं. सर्वांना डोळयात भरून घेवून अंकुश, गोविंददादा बाहेर पडले. नासिक भेटीत गोदावरीत दोन बुचकळ्या माराव्यात. काळा राम-गोरा राम मंदिरे पाहावीत. नारोशंकराच्या प्रचंड घंटेला हात लावावा असे मनात होते. गोविंद दादांनीही हाच बेत केला होता. तिघांनी गंगेजवळच्या धर्मशाळेत मुक्काम ठोकला.
 "अंकुशा आपन खेड्यातली मानसं. द्येवाला हात जोडणारी. ज्ञानीसर, तुकाराम यांनी सांगितलं, तसं वागनारी. भजन, पोथ्यात रमनारी. अव द्येव हाय की नाय ह्ये त्योच जानं. पण दुष्काळ पडला तवा आठवलं कोन? द्येवच ना? हितवर आलाव तसं नासिक पाहू आन् तिरबंकेसरलापन जाऊन येऊ व्हय?" शिवादादा गोविंददादांच्या मनातलंच बोलले. "आरं आमच्या शिरीभैय्याच्या घरात द्येव वगैरे न्हाई. ते देवाला जात नसले तरी द्येवाला मानणाऱ्यानांबी मान देतात. वैनी तर तुकाराम ज्ञानेसरांच्या पोथ्यांचा अभ्यास करतात. पोरांना शिकिवतात. त्यांच येकच म्हणनं. की बामण आन् पुजारी द्येवाच्या नावावर पैका उकळतात. अडानी साध्या लोकाले फशिवतात ते चांगलं नाही." गोविंददादांनी त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. दुसऱ्या दिवशी शिवादादा मुंबईला परतले. अंकुश आणि गोविंददादा सकाळच्या नासिक लातूर एस.टी.बसने आंब्याला जायला निघाले.
 फेब्रुवारी संपला आहे. वसंत ऋतुची चाहूल यंदा अनेक वर्षांनी लागली आहे. सुगंधी हवा जोगाई मुकुंदराजाच्या डोंगरात घुमू लागलीच गेल्या साली बऱ्याच वर्षांनी पाऊस बरा झालाय. घोडदऱ्यातून पडणाऱ्या पाण्याची धार आता रोडावली असली तरी पाणी पडते आहे. निळी पिवळी फुलं कडेनं उगवली आहेत. ठाणवाईच्या डोंगरातल्या आंब्यावरचा मोहोर चहूअंगानी बहरला आहे. अंकुशने आंब्याला उरतांनाच ठरवले होते की गावाकडे ...दगडवाडीला चालत जायचे. सर्वांना भेटत जायचे. अंकुश अनूवहिनींना प्रथमच भेटत होता. जातांना त्याने जनक ईरासाठी दोन बिस्किटांचे पुडे घेतले. वहिनीजवळ सर्वांनी नातलगांना दिलेली पत्रे दिली. काकास शर्ट, पायजम्याची जोडी, पांघरायला सोलापुरी चादर या लागणाऱ्या वस्तू घेतल्या.
काकांना भाकऱ्या करून खाऊ घालणाऱ्या गंगूमावशीच्या नातीसाठी बिस्किट पुडा घेतला. योगेश्वरीचे दर्शन घेऊन तो वाट चालू लागला. माथ्यावर उभ्या असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात तो शिरला. दगडवाडी अल्याडच्या वाघाळपिंपळ्यांचे बुधाजीअण्णा गळ्यात विणा अडकवून भजन गात होते. पहारा देत होते. मंदिरापलिकडच्या भागातून पखवाज घुमवल्याचा आवाज आला आणि त्याचे पाय थबकले. तो आठवित होता. तेव्हा त्याच्या बाप्पांची इच्छा होती त्याला कीर्तन शाळेत घालण्याची. अंकुशचा गळा मधुर होता. तो भजन सुरेखपणे गाई. पण खूप खूप शिकण्याची ओढ असलेल्या अंकुशने त्यांची इच्छा दूर ठेवली. आज मात्र क्षणभर त्याला वाटून गेले की, बाप्पांचे ऐकले असते तर पोट भरण्यासाठी घर, जमीन, म्हातारे.... लंगडे काका यांना सोडून मुंबई गाठावी लागली नसती. त्याचे पाय आपोआप मंदिराकडे वळले. दर्शन घेतांना आपल्या परिसरात आल्याची निवांत तृप्ती त्याला सुखावून गेली. आणि तो पायऱ्या उतरून खालच्या पटांगणात आला. तिथे पखवाज शिकणारी मुले, मुक्कामाला आलेले वारकरी रहातात. मधोमध मोठे खुले सभागृह होते. तिथे शंकरअण्णा सारोळकर मुलांना घेऊन पखवाज वाजवीत होते. ते सारे दृश्य त्याने मनभरून पाहून घेतले आणि अण्णांना दंडवत घालून तो बाहेर आला. व डोंगर उतरू लागला. डोंगराचा उतार उतरून तो जयवंती, वैनगंगेच्या संगमाजवळ आला. पल्याड जाणारा पुल पार उखडून गेलाय. चपला हातात घेवून त्याने पाण्यात पाय बुडविले. वाळूतून चालायला सुरुवात केली. मन लंगड्या काकांना, गावातल्या संवगड्यांना भेटायला खूप आतुर झाले होते. दादरचे वझे कुटुंब मुंबईतल्या गोष्टी सारे मागे-मागे पडत गेले. त्याने मनात पक्के ठरविले. पैसे साठवायचे. विहिर खणायची आणि आंज्या, सोनूला घेऊन परत आपल्या गावात यायचे. बेत रंगवित तो डोंगरातल्या रस्त्याचा चढ चढू लागला.

८.





 "अशात बाई नि काकाजींना खूप खूप पहावसं वाटतं. कसे आहेत ते? मोठ्या घरी गेली होतीस? नि गावाकडे? त्यांनाही माझी आठवण येतच असेल. विचारतात? मी मात्र घर, गाव आठवलं की 'माओ' च्या क्रांतीची पुस्तकं काढून बसतो. तोच घुसलाय मनात. अर्थात् त्याची बेदरकार हुकुमशाही कधीच न पटणारी. पण त्याच्या कवितेतील त्या ओळी. मनाच्या तारा सतत झणकारीत फिरतात.

Go to the people
live with them, love them
learn from them what they know
& build on what they have..."

 लोकांच्यात जाऊन मिसळा. त्यांच्यातले होऊन रहा. त्यांच्यावर प्रेम करा. त्यांच्या अनुभवातून साचलेले शहाणपण वेचून घ्या. आणि त्यांच्याजवळ जे आहे त्यातूनच त्यांच्या सुखाची वाट शोधा... नवनिर्माण करा.
 आपण आजवर अनेक मोर्चे काढले. पण कोणाच्या जीवावर? आमच्या विश्वासावर हजारो माणसे... स्त्रीपुरुष... डोंगर तुडवित, पायी, उपासपोटी मोर्चात सामिल झाली, घसा फुटेस्तो घोषणा दिल्या. पण आम्ही... आपण काय दिलं त्यांना? न पेरता येणारी, न उगवणारी वांझोटी स्वप्नं? ...? फाटलेल्या, उजाड जमीनीचे, थेंबभर पाण्यावाचून तरसण्याचे वास्तव? हे कधी नि कसे बदलणार? कोण बदलणार? कधी?... केव्हा?....
 अनू, ही अंधारयात्रा संपली ना तर त्या उजाड डोंगरभागात जायचा, नि गाडून घ्यायचा विचार आहे. तेथील दीडदोन एकरावाल्या शेतकन्यांची कोरडीठण्ण तहानलेली जमीन त्यावर उगवलेली पांढुरक्या निःसत्व झुडपांची गर्दी जमीन अधीकच बंजर
करणारी या तहानलेल्या मातीचे उजाड कोरडे डोळे आणि उत्तरेतल्या नद्यांचे पूर ...वाहून जाणारी माणसे, जमीन सतत स्वप्नात येतात. ते पाणी तर आपल्या भागात येणे अशक्यच पण आपल्या भागातल्या कोरड्या विहिरी कधी भरणार? जीवघेणा दुष्काळ आमच्या पाचवीलाच पुजलाय का? पण हे 'अंधारयुग' संपणार आहे ना? ते बाईच जाणे आणि नियती जाणे!
 आता सारचे मिसा कैदी कंटाळले आहेत. शासनाने एक नवा रेशमी फास टाकला आहे. अनेक जण त्यांत अडकत आहेत. मिसाकैद्याने लिहून द्यायचे की, 'मी गैरसमजुतीने आणीबाणीला विरोध केला. मला अनुशासन मान्य आहे.' लिहा आणि सुटा. कधीतरी केव्हातरी लहानपणी शाखेत गेलेली माणसं. कधी मोर्चात वा मिरवणुकीत मिरवली असतील वा दसऱ्याच्या बँडपथकात ढोल बडवला असेल. पण मुळात सारीच माणसे साधीसुधी आणि संसारमग्न. ती या फतव्यात अडकली. युक्रांद, समाजवादी यात फारसे अडकणार नाहीत याची शासनाला कल्पना होतीच. म्हणून त्यांच्या गटावर सुरवातीला फासा टाकला तो काडी पैलवान वैजनाथ आणि आपल्या नरहरी अण्णांवर. स्वभावाने आणि परिस्थितीने गरीब. न शिकलेले. पण ते काय बधतात? खरे वीर तेच. त्या दिवशीच्या सायंकाळच्या बौद्धिकात बापूंनी कणखर पण गदगदलेल्या आवाजात आम्हा सर्वांच्याच मनातली कृतज्ञता नोंदवली. 'एके काळी मला एस्सेमकडून प्रेरणा मिळाली होती. पण वैजनाथ, नरहरीअण्णा, आज मात्र माझ्या निराशेने पिचलेल्या मनाला तुमच्याकडून प्रेरणा मिळाली आहे.'
 गेल्या चार दिवसात बारा जणांना चारचार दिवसांचा पॅरोल मिळालाय. मीही अर्ज केलाय. बघू. पण आजकाल बाहेरची बसंती हवा इथवर पोचू लागलीय. तुम्ही सगळे मला भेटता. बकील भाईंच्या पत्नी - भाभीजी, श्रीकांत दादा येतात. भेटून जातात. पण गांव, त्यातले रस्ते, माणसं, ओळखीची घरं... गल्ल्या... परिसर. यांनाही पहावेसे वाटते. 'माणदेशी माणसं' शिकवतांना साधुगुरुजी सांगत की गावालाही चेहेरा असतो. आज पटतंय ते...बाई नि काकाजींची खूप खूप आठवण येते. त्यांना प्रणाम. ईरा जनकला आशिर्वाद.
 खूप खरडतोय मी. कंटाळलीस? थांबतो इथेच."
 श्रीनाथने पत्र बंद केले. आणि अमनकडे टाकायला देण्यासाठी तो खोलीच्या बाहेर आला.
 आज अमन, बन्सीधर, अशोक यांच्या पोटात आणि छातीत दुखणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून दगडीभिंतीही जरा सैलावल्या आहेत. जुने कैदी, अधिकारी, हापपोलिस यांच्याशी मैत्र जुळू लागलेय. ज्यांची प्रकृती बिघडलीय अशांना पोलिस व्हॅन मधून नाशकातल्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेतात. अर्थात आजकाल सगळेच अधूनमधून आजारी पडतात, मग पोस्टात पत्रं टाकणं, चिठ्याचपाट्यांची देवाण घेवाण, भेटीगाठीसुध्दा सारे काही जमके घडते. जणु ते काही तास वसंतवर्षा ऋतुचे. वाट पाहायला लावणारे. आणि पहाता पहाता संपणारे. गजाआडच्या दिवसारात्रीचीही सवय झालीय सर्वांना. श्रीनाथ ग्रंथालयाजवळच्या लिंबाच्या झाडाखाली येऊन बसला. मनात विचारांचे भुईचक्र दहा दिशांनी फिरत होते.
 जेलमध्ये येऊन साडेतेरा महिने झालेत. अनूच्या पत्रात तिच्या मराठवाड्याच्या रविवार पुरवणीत प्रकाशित झालेल्या लेखाचे कात्रण आहे, 'जा रे बदरा बैरी जा...' ढगांबरोबर पाठवलेला निरोप. प्रेम...विरह...संताप... द्वेष या साऱ्या भावना काळ पुढे वाहत गेला तरी ताज्या टवटवीत राहणाऱ्या असतात. परवा उदगीरचा रघुवीर पाटील सांगत होता त्याच्या धाकट्या अनिकेतने आईजवळ हट्टच धरला. कॅलेंडर मधल्या त्या बाबांना पकडून नेणाऱ्या बाईला गोळ्या घालायला बंदूक आणून दे म्हणून. "माँ तेरे बीसो सपने साकार करेंगे" हे गाणे लागले की ते पाचवर्षाचे पिल्लू कानात बोटे घालते. आरडाओरडा करते.
 जेलमध्ये आल्यापासून खूप वाचन झाले. ज्या तत्त्वांसाठी संघर्ष केला त्यांची खोलात जाऊन पुनर्मांडणी करायला लागणारा निवांत एकांत इथे आपतः मिळाला. आपल्या प्रमाणे शेकडो तरूण वेगवेगळ्या गांवातून शासनाच्या चुकीच्या धोरणांविरूध्द संघर्ष करीत आहेत. याची जाणीव खूप बळ देणारी. ती इथेच मिळाली.
 पहाता पहाता उन्हें कलली आहेत. आभाळात चारदोन काळे ढग गोळा होऊ लागलेत. वेगवेगळ्या कोपऱ्यात गट जमू लागले आहेत. एका कोपऱ्यात नमाज पडण्याची जागा आहे. तर दुसऱ्या कोपऱ्यात रामरक्षा, हनुमान चालिसा यांचा जप सुरु होई. समाजवादी साम्यवादी मंडळी एका कोपऱ्यात वादविवादांची मैफल जमवीत असतात. सारे कसे अगदी सहजपणे. एका लयीत. एकमेकांना न टोचता न बोचता. एकमेकांच्या वैचारिक भूमिका जाणून घेण्याची उत्सुकताही आपोआप जागी झाली होती. अमन, सुनील यांनी गोळवलकर गुरूजींचा 'बंच ऑफ थॉट्स' वाचण्याचा घाट घालताय. श्रीनाथने माओ, ची गव्हेरा हातवेगळे करून नव्या वैचारिक दिशेचा शोध घेण्याचे ठरवले होते. विवेकानंद, अरबिंदो खुणावत होते.
 अभाविपचा खंदा कार्यकर्ता प्रवीण, मानवेन्द्रनाथ रॉय यांच्या Reason, Romanticism & Revolution 'कारण क्रांती आणि प्रेरणा' या तीन 'R' मध्ये डुबक्या घेण्याचा प्रयत्न करीत होता. अर्थात आरएसएस, जनसंघ, विहिंप यांच्या वेटोळ्यात अडकलेला सुधीर प्रस्तावनेच्या पल्याड फारसा जाऊ शकला नाही. पण उत्कृष्ट वक्तृत्व, शब्दांवरची पकड आणि भावनांना हात घालणारा ठाम... काहीसा कोरडा आवाज, यांच्या आधारावर तो त्याला न कळलेल्या विषयालाही निर्भिडपणे हात घाली. आणि अशी खुमासदारपणे मांडणी करी की श्रोत्यांनी भारावून जावे. अमनने हे पुस्तक पूर्णपणे पचवले होते. सुधीर त्या दिवशी या डाव्या विचारांची मांडणी करणार होता हीच आगळी बात होती. म्हणून या विषयावर बोलण्याची संधी त्याला एकमताने दिली होती. रोज रात्री एकेकजण अभ्यास विषय मांडीत असे. नंतर प्रश्न विचारले जात. प्रश्न विचारण्याच्या उद्देशाने अमन पुढ्यात जाऊन बसला होता. पण प्रविणने कटाक्षाने त्याला टाळले. अमन जाम वैतागला. पण त्याच्या मांडणीमुळे श्रीनाथच्या मनात मानवेन्द्र नाथांचे साहित्य वाचण्याची ओढ मात्र निर्माण झाली.
 मार्क्सच्या साम्यवादाच्या मांडणीपेक्षा माओची मांडणी सामान्य आणि मोठ्या संख्येने असणाऱ्या छोटया शेतकऱ्यांना न्याय देणारी, नवी उभारी देणारी ठरेल असे त्याला वाटे. मानवेन्द्र नाथांच्या मांडणीत व्यक्ती आणि तिचे स्वातंत्र्य यांना मध्यवर्ती स्थान होते. समाजविकास साधतांना जर स्वातंत्र्य आणि स्वास्थ्य यांचा प्रत्यक्ष अनुभव सर्वसामान्य व्यक्तीला येत नसेल तर ती प्रगती, ते स्वातंत्र्य भासमय होय. ही त्यांची ठाम आणि मध्यवर्ती भूमिका. त्यांच्या मते आर्थिक लोकशाही आली नाही तर राजकीय लोकशाही खऱ्या अर्थाने प्रस्थापितच होऊच शकत नाही. श्रीनाथने मानवेन्द्रनाथांच्या विचारांकडे वळण्याचे श्रेय मनोमनी सुधीरलाच देऊन टाकले. मानवेन्द्रनाथांची काही पुस्तके अनूला घेऊन येण्यास लिहिण्याचे ठरवले. पत्रही पोस्टात पडले. आणि दुसऱ्या दिवशी जेलर साहेब त्याला चार दिवसांची पॅरोल मिळाल्याची खबर घेऊन आले. ही बातमी ऐकून श्रीनाथ गोंधळून गेला. गेल्या चौदा महिन्यात एस्टीचे दर्शनही झालेले नव्हते. शिवाय इथून निघायचे म्हणजे उद्या सकाळी? त्याने भिंतीवरच्या घड्याळात पाहिले सकाळचे नऊ वाजलेले. नाशिकडून अंब्याला जाणारी एस्टी एकच. ती सकाळी सहालाच निघून गेली असणार. क्षणभर वाटले इथेच फतकल मारून बसावे. लोळावे. त्या एस्ट्या बदला.. बारा तासांचा प्रवास... जीव टोकदार सुईवर तोलावा तसेच काहीसे. एवढ्यात अमन दिसला. त्याच्यापर्यंत बातमी पोचली होती. त्याची बडबड सुरु झाली.
 "श्रीभैय्या, उठा. करा तयारी. इथून भत्ता खाऊन सरळ नगरची एसटी पकडा. तिथून पुणे-अंबाजोगाई, नगर-अंबाजोगाई गाडी मिळेल नाही तर जामखेड, पाटोदा असं टल्ले मारीत जायचं. गावाकडे जायला मिळतंय राव! आटपा लवकर... आमच्या सर्वांच्या घरी जाऊन या बरका. लई याद येते राव अम्मी-अब्बांची नि आंब्याची. नरहरी आण्णा पत्र लिहायला बसलेत सुध्दा!
 नागपूर, अमरावती, नगर, महाडच्या सहाजणांना चार दिवसाचा पॅरोल मंजूर झाला होता. दुपारी दोन वाजता नगरकडे जाणारी एसटी पकडण्यासाठी दीडलाच सगळे पोलिसव्हॅन मधून एसटीस्टँडकडे रवाना झाले. निघतांना श्रीनाथने कैद्यांनी तयार केलेली एक शबनम विकत घेतली. त्यात भरण्यासारखे सामान तरी कुठे होते? होती पुस्तकं. ती नीट ठेवून तो निघाला इतक्यात मालेगावच्या युनूसभाईचा ॲटेंडट... कैदीसेवक जवळ आला. आणि न चुकता तंबाखूची पुडी व चुन्याची डबी शबनममध्ये टाकली.
 "दादा, आजवर मी बोललू नाय. मी केजा जवळच्या उंदरीचा हाय, भीमा पांचाळ माजं नाव. पांच सालापूर्वी बायकूच्या डोस्क्यात दगुड घालून मारलं म्हणून जलमठेप भोगतुया. तवा लेकरं न्हान होती. आठ वरसाचा ग्यानू आन् सहा वरसाची चंदरभागा. अंगावर पिती भीमा खरचली म्हणं मायच्या दुदुविना. लेकरं बगून या. जमल का? डोस्कीत लई राग व्हता. जेऊ खाऊ घालणारनीला मारून टाकलं. लई पच्चाताप हुतो. पण काय उपेग? लेकरं मामा संबाळतो. तो आंब्या लगटच्या चनईत ऱ्हातो. त्याला बी माजी माफी सांगा. लेकराचे फोटू बी जमलं तर आना." दादाराव बोलता बोलता रडू लागला. त्याला मुलांना भेटण्याचे आश्वासन देऊन श्रीनाथ मेन गेटमधून बाहेर पडला. व्हॅन स्टँडमध्ये पोचली तर समोर नगरगाडी लागलेली. श्रीनाथ, नगरचा विजय पाथरे घाईने बसमध्ये चढले. गाडी खचाखच भरलेली होती. कुण्या एका सुजाण माणसाने, बरोबरचे पोलिस या दोघांच्या चेहऱ्यावरचा, शिक्षण, निर्भयता, ठामपणा यांच्या मिश्रणातून झळकणार करारी भाव पाहून त्याचे राजकीय मिसापण ओळखले. 'आओ बंधू आओ. यहा बैठ जाईये. मुझे अगले स्टॉपपेही उतरना है'. असे म्हणत बसायला जागा दिली. शेजारच्या माणसाच्या कानात सांगितले,
 'अरे, ये तो नासिक जेल से पॅरोलपर घर जानेवाले मिसाबंदी लगते है. पढ़े लिखे दिखते है, हम इमर्जन्सी के खिलाफ लड तो नही सकते, जो लड रहे है उनकी इज्जत
तो करेंगे. बैठने दो भैय्या इनको. दोघांना जागा तर मिळालीच पण पावसाळी थंड हवेत आद्रक घातलेला चहा पण त्या अनामिकाने पाजवला.
 एसटी नगरला पोचली तेव्हा संध्याकाळचे सात वाजून गेले होते. विजयने घरी चलण्याचा आग्रह केला. पण जाण्याचा मूड नव्हता. श्रीनाथने बाहेर चक्कर मारली. एखादे केशकर्तनालय सापडते का याचा शोध घेतला. पण दुकान सापडलं नाही. पोटात इडली सांबर ढकलून तो पुणे अंबाजोगाई बसची वाट पाहू लागला. पुण्याहून रात्री नऊ वाजता निघणारी बस पाऊस पाण्यामुळे उशीरा आली. तो गाडीत शिरला तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते. पण बस रिकामी होती. तीन सीटच्या बाकावर तो एकटा. श्रीनाथने सुखावून डोळे मिटले......
 एक गचका देऊन 'यश्टीमाय'... एस.टी. थांबली. त्या गचक्याने श्रीनाथ जागा झाला. जामखेड आले होते. श्रीने घड्याळात पाहिले. लहानकाटा चारच्या थोडापुढे सरकला होता. तोंडावर पाण्याचा शिपका मारावा या हेतूने तो सीटवरून उतरण्यासाठी उठला. हात वर ताणून गेल्या चौदा महिन्यांतला आळस झडझडून झटकून टाकला. इतक्यात त्याच्या कानावर हाक आली, "श्रीभैय्या, चला च्या प्यायला. ओळखलंत का? मी पिंपळ्याच्या दिनकर कऱ्हाडचा धाकटा भाऊ. तो तुमच्या सोबत काही दिवस होता. 'बदलाव' संघटनेत. माझ नाव अनंता. गेल्या साली ही नोकरी लागली. कंडक्टरची दिनू दादांनी दोन एकर इकून सायबांना 'च्यापानी' केल तेव्हा कुठ नंबर लागला. हिस्ट्री घेऊन एम.ए. झालो आता मारतोय घंटी आणि फडतोय तिकिटं.
 भैय्या सुटलात का तुम्ही?" चहाची ऑर्डर देत देत अनंताने प्रश्न केला.
 "भैय्या, माफीनामा लिहून दिला की सुटतात म्हणे मिसावाले. बरं झालं लिहून दिलेत ते. अनूवैनींनी तरी लेकरं सांभाळित संसाराचा गाडा किती दिस एकटीनंच ढकलायचा?" अंतूचे बोलणे ऐकूण श्रीनाथ हसला.
 'तुला वाटतं अंतू, की तुझा श्रीभैय्या माफीनामा लिहून सुटेल म्हणून? तुरूंगाला घाबरतो होय आपण? शिवाय तुझ्या सारख्या अनेकांची साथ आहे की ! चार दिवस पॅरोलवर सुटलोय. पाचव्या दिवशी पुन्हा नाशिकला मध्यवर्ती कारागृहात जाऊन 'हाजीर है' म्हणायचे!
 .... चला, आज आंब्याच्या मित्राचा चहा पिऊन सकाळ उजाडतेय...' अनंताच्या पाठीवर प्रेमाने थाप मारित श्रीनाथ उठला.
 गाडी सुरु झाली. श्रीनाथच्या मनात पुढच्या पन्नास पंचावन्न तासांत कुणाकुणाला
भेटायचे, अनू, जनक, इरासाठी जास्तित जास्त वेळ कसा काढायचा याचे चक्र फिरू लागले. अशक्या, अमन, नरहरी अण्णा... अशी अनेक नावं समोर येऊ लागली. विचार करता करता कधी डोळा लागला ते लक्षात आलं नाही. पुणे-परळी रातराणी अंबाजोगाईला स्टँडवर पोचली तेंव्हा आठ वाजून गेले होते. श्रीनाथ एसटीतून उतरून स्टँडच्या बाहेर आला. कितीतरी दिवसांनी ओळखीचा रस्ता, दुकानं, गर्दी पाहत होता. एक दीर्घ श्वास त्याने उरात भरून घेतला आणि उत्साहाने घराच्या दिशेने चालू लागला. एवढ्यात नरहरी अण्णांच्या भाच्याने, पांडबाने त्याला पाहिले.
 'अरे! शिरीभैय्या? उस्मान शिरीभैय्या दिसायलेत' असे म्हणत पांडबाने श्रीनाथला गाठलेच. पाठोपाठ उस्मानही आला. 'भैय्या, कैसे हो?' उस्मानने श्री चा हात गच्च दाबत विचारले. "शिरीभैय्या, मामा कसे हायती?' विचारतांनाच पांडबाचे डोळे भरून आले. त्याला जवळ घेत श्रीनाथने त्याला दिलासा दिला.
 पांडबा, घरी जाऊन येतोच मी. येताना नरहरी अण्णाचं पत्र आणतो. मामी घरीच आहेत ना? शिवाय दाढी करायलाही येतो. उस्मान माझं पान लावून ठेव हं. आणि आत चिमुटभर जर्दा टाक. चुना एक बोट जास्त... अरे, असे डोळे विस्फारून पाहू नकोस. ही नवी चव, तुझ्या श्रीभैय्यांना 'मिसा' ने लावलीय.' असे म्हणत श्रीनाथ झपझप पावले टाकू लागला.
 जिना चढतांनाच मोहितेकाकांनी त्याला पाहिले. आणि ते आंनदाने ओरडले.
 'अनू वैनी आधी निरांजनाचं ताट ओवाळायला आणा. सुधे, पैले फसक्लास चहा टाक. नि पुरण चढव गॅसवर, बघा कोण आलंय ते!!!'
 अत्यंत प्रेमाने काकांनी श्रीनाथला मिठी मारली.
 'माँ, बाबा आले. माँ बाबा....' जनकला, बाबाला पाहून काय बोलावे ते सुचेना. अनू आंघोळीला बसली होती. क्षणभर तीही सैरभैर झाली. चार तांबे अंगावर ओतून ती बाहेर आली. इराने बाबाचा पूर्णपणे ताबा घेतला होता. जनक बाबाला अगदी चिटकून बसला होता.
 'श्री? अचानक? तार नाही. रेडीओवरही काही... एकटाच आलास?...' अनूला मध्ये अडवून सुधाताईंनी निरजनाचे ताट अनूच्या समोर धरले. आणि हुकूम केला.
 'भावजी आधी दाराबाहेर उभे रहा. मी पायावर पाणी घालते. अनू ओवाळील आणि मग घरात या.'
 श्रीनाथ आज्ञाधारकपणे बाहेर जाऊन उभा राहिला. अनूने ओवाळले. पाण्याने डबडबलेले डोळे पुसताना तिची त्रेधा उडाली.
 'अने, एखादं खराब फडक टाक खाली. आज या भ्रमणसंगिनीची फार दिवसांनी सेवा करतो आहे.' सायकल बाहेर काढीत श्रीनाथने अनूला सांगितले. सायकल पुसुन त्याने सायकल स्टँडच्या दिशेने वळवली. नरहरीअण्णांनी दिलेले पत्र पांडबाला देऊन वहिनींना अण्णांची खुशाली सांगितली. पांडवाने ते पत्र मामीच्या...वैनींच्या हातात दिले. वैनीना वाचता कुठे येतेय. त्यांनी ते पत्र परत श्रीनाथच्या हातात दिले. पत्र पांडबाला लिहिलेले होते. शेवटच्या दोन ओळी वैनींसाठी होत्या. नरहरीअण्णांनी लिहिले होते, "पांडबा, तुज्या मामीला निगुतीने सांभाळ. तिला दमा आहे. आद्रक घातलेला च्या तिला लगतो. लई भोळी आहे तुझी मामी. तिची काळजी घे. तिला रडू देऊ नको. सांभाळा.." हे ऐकतांना वैनी मुक्याने मान खाली घालून आसवं ढाळू लागल्या. श्रीनाथ मुकाट्याने घराबाहेर पडला. आणि सायकल अशक्याच्या घराकडे मारली. अशोकची उंचीपुरी, रूंद हाडाची आई खूप खंगली आहे. गळ्याची हाडं दिसायला लागली आहेत. श्रीनाथला पाहातच तिने त्याचा हात घट्ट धरून हंबर्डा फोडला.
 'माझं लेकरू सोबत न आणताच कसा आला रे बाबा एकटा? कसा हाय माजा आशक्या? तुच्या मुळंच आडकलं रे माज लेकरू...' अशोकच्या आईला शांत करताना त्याच्या वडलांचा दम निघाल. अशोकचे पत्र त्याच्या आईला देऊन, त्याची खुशाली सांगून, श्रीनाथने साकयल अमनच्या घराच्या दिशेने पळवली.
 अमनच्या अम्मींना खूप कमी दिसतं. गाजियाबादच्या रईसघरात वाढलेली पंधरासोळा वर्षाची मुलगी पन्नास वर्षापूर्वी मराठवाड्यातल्या आडवळणाच्या गावाला, निजाम स्टेट मध्ये रस्ते बांधण्याची गुत्तेदारी करणाऱ्या तरूणसोबत आली. अमनचे अब्बा दिल्लीचे. मामा सोबत ते गुत्तेदारी व्यवसायासाठी निजाम स्टेट मध्ये आले. मोमिनाबादला... अंबाजोगाईला बिऱ्हाड मांडले. अम्मीनी आब्यांचा संसार खूप कष्टाने, समाधानाने केला. अमन सगळ्यात धाकटा म्हणून लाडका.
 'आओ, बेटा. आओ. पॅरोलपे आये हो? कितने दिनका पॅरोल मिला है?' श्रीनाथला आलिंगन देत आब्बांनी विचारले. पांढऱ्याशुभ्र दाढीला कुरवाळत आतल्या दिशेने आवाज देत सांगितले,
 'अमनकी अम्मीजान, देखो बाहर कौन आया है. गाजियाबादी टेस्टकी बढिया
चाय बनाओ. रेहाना को बुलावा भेजो.'
 आब्बा, अम्मी, रेहानाआपा यांना अमनची खुशाली सांगितली. घट्टदुधाचा, विलायची घातलेला स्पेशल चहा घेऊन तो घरी परतल मोहितेकाका आणि मंडळी श्रीची जेवणासाठी वाटच पाहत होती. इरा आणि जनक श्रीनाथला क्षणभरही सोडायला तयार नव्हते. आणि भेटायला येणाऱ्यांची रीघ.
 'माँ, बघ ना ग. लोक सारखे बाबाला भेटायला येताहेत. मला बाबाला खूप प्रश्न विचारायचेत. तुरुंग कसा असतो? तिथे जेवायला काय मिळतं? तुरुगांचं कुलूप खूप मोठं असतं का? नी माँ, बाबा थोडे गोरे झालेत. होना ग?' जनकची तक्रार. इरा बाबाला सोडायलाच तयार नव्हती. श्रीनाथला तंबाखूची तल्लफ आली. त्याने ईराला शबनम पिशवी आणायला पाठवले. त्यातले बिस्किटांचे पुडे सकाळीच जनक ईराला दिले होते. शबनमध्ये हात घालून त्याने तंबाखूची पुडी आणि चुन्याची चपटी डबी काढली. ते ईराने पाहिले नि ओरडली.
 'बाबा काय घाण खातोस रे ! शेजारचे काका पण खातात. तर मी त्यांना माझी पपी घेऊ देत नाही. तुझ्याशी कट्टी करून टाकीन हं मी! फेक ते.' असे म्हणत श्रीनाथच्या हातातली पुडी ओढून घेऊन ती ईराने बाहेर फेकून दिली.
 संध्याकाळ वाढत चालली होती. श्रीनाथच्या आवडीचं शेंगादाण्याचं कुट घालून केलेले हिरव्या मिरचीचं चटकदार पातळ पिठलं. कुकरमध्ये न लावता खरपुडी लागेल असा पितळेच्या पातेल्यात केलेला भात, शेंगदाण्याची चटणी, ज्वारीची भाकर, असा खास बेत अनुराधाने रांधला होता. दिवसभराच्या ट्रे सर्व्हिसने मनसोक्त आनंद दिला तरी अनूला थकवाही आला होता. इरा न जेवताच बाबाला लगटून पेंगू लागली होती. जेवतानाच जनकने जाहीर करून टाकले.
 'माँ, आज झोपतांना बाबांशी खूप गप्पा मारणारेय मी. सांगून ठेवतो'
 'येस बेटा. रात्रभर गप्पा मारू आपण. पोटभर जेवूया. मग गप्पाच गप्पा.' अनूकडे एक चोरटा कटाक्ष टाकित श्रीनाथ ओठातल्या ओठात हसला. नि जनकची समजूत घातली.
 श्रीनाथ सोबत काय काय द्यायचे याचे चक्र अनूच्या मनात जेवतांना फिरत होते. परवा संध्याकाळी किंवा तेरवा निघावे लागणार. दर महिन्याला नाशकाला जाताना अनू, अशक्या, अमन, अण्ण्या यांना आवडणारे पदार्थ भरपूर प्रमाणात घेऊन जाई. श्रीला आवडणारे मेथीचे तीळ घालून केलेले धपाटे तर कधी पालकपुऱ्या. कधी
गोडदशम्या. दिवाळीत अनूची आई आणि तिच्या मैत्रीणींनी दोन टोपल्या भरून अनारसे पाठवले होते. श्रीला अनारसे खूप आवडतात. विचार करता करता तिने किलोभर शेंगदाण्याची चटणी मिक्सर मधून काढली. शेवटचा हात फिरवतांना मिक्सरमध्ये थेंबभर तेल घातले. तसे केले की चटणी खलबत्त्यात कुठल्यासारखी गुळचिट् होते. स्वयंपाकघर आवरून ती मधल्या खोलीत आली. श्रीनाथने दोनही मुलांना गाद्या टाकून झोपवले होते. सायलीचा दाट गरजा स्टूलवर. हे काम नक्कीच सुधावहिनींचे. संध्याकाळ पासून गजरा वेणीत माळ म्हणून मागे लागल्या होत्या. पण येणाऱ्या जाणाऱ्यांच्या गर्दीत हे कुठले जमायला? ती जवळ आली आणि श्रीनाथने दिवा मालवून टाकला. अनूचा हात आणि शेपटा ओढून तिला जवळ ओढले....
 .... अनू दरवाजा उघडून पलिकडच्या व्हरांड्यात आली. घराशेजारच्या पारिजातकाखाली शुभ्र केशरी फुलांचा सडा सांडलाय. उजवीकडच्या अरूंद गॅलरीत ती उभी राहिली. आजची पहाट खूप सुंदर आहे. अंधार मावळायचाय.... कितीतरी दिवसानंतरही काल रात्रीची निवांत भेट शब्द संपलेले होते. मराठी शिकवणारे फाटकसर भाषाशास्त्र शिकवितांना सांगत की शरीराचीही एक समृध्द भाषा आहे. मानवी मनातील भावानांचे गडद... फिके रंग समोरच्या व्यक्तीच्या मनापर्यंत पोचविण्याची ताकद त्या बॉडी लँग्वेजमध्ये असते. स्वरयुक्त भाषेच्या विकासासोबत ती, शरीरभाषा माणूस विसरत गेला... काल रात्रभर त्या विसरलेल्या भाषेचा साक्षात प्रत्यय. संताप, दुःख, विरह, आत्मीयता, उदासी, उद्विानता... अनेक भावना स्पर्शातून, हालचालीतून व्यक्त होणाऱ्या... पंधरा वर्षांपूर्वी ऐकलेल्या, शिकलेल्या शब्दांना अचानक फुटलेली कोवळी पालवी अनुभवून अनू तृप्त आणि अस्वस्थ झाली. खुदकन हसूही आले आणि ती घरात शिरली.
 'अनू, बप्पा देशमुख नऊला जीप पाठवताहेत. मुलांना शाळेत पाठवू नकोस. गावातल्या वकीलभाऊंना भेटून धानोऱ्याला जाऊ. सायंकाळी आंब्याला परतू. मला थोडे पैसे दे. श्रीदादांच्या मुलासाठी सेप घेऊन येतो.' अनूने दिलेले पैसे घेऊन श्रीनाथ त्याला आवडणान्या कांदेपोह्याचा नाश्ता घेऊन घराबाहेर पडला. अनू गावाकडे जायच्या तयारीला लागली. गेल्या चार महिन्यात तिचीही गावाकडे फेरी झाली नाही. श्रीच्या आईला... बाईला अशात खूपच कमी दिसतं. अनू या घरात आल्यापासून बाईंना वाकलेल्या पाठीचेच पाहिले आहे. खूप उंच असाव्यात त्या. श्री आणि दादा त्यांची उंची घेऊन आले आहेत. आणि जनकही. बाईंना पाठीचा विकार होता.
श्रीनाथचीही पाठ गेल्या तीनचार वर्षापासून खूप दुखते. बाईंची तेरा बाळंतपण झाली. त्यातली वानीकिनीची दोन जगली. श्रीनाथचे काकाजी आणि त्यांचे धाकटे भाऊ छोटा काकाजी पूर्वी एकत्रच राहत. त्यांना लग्नांनतर चौदा वर्षे मूलबाळ झाले नाही. त्यांचा मोठा मुलगा बदरीनाथ आंब्याला वकील आहे. श्रीनाथच्या बाईची पहिली आठही मुलं मातीत लोटावी लागली. त्यांच्या आठवणींनी आजही बाई आसू गाळतात. नववे श्रीकांतदादा. तेरावा श्रीनाथ. दादा आणि श्रीमध्ये सहा वर्षांचे अंतर आहे. धाकटे छोटा काकाजी व काकी वकील भाऊंकडे आंब्याला राहतात. चुलतमालत असे कधीच जाणवत नाही. श्रीदादा दुकान, शेती सांभाळतात. पूर्वी बाईला... घरातल्या बाईला शेणसडा करावाच लागे मग ती गर्भारशी असो वा अंगावर दुधपित्या बाळाची आई असो. शुक्राची चांदणी उगवल्यावर जातं घरघरू लागे. मग शेतातल्या गड्यांचा व घरचा स्वैपाक, धुणं... भांडी... झाडझुड सारं काही बाईनेच करायचे. न कुरकुरता. न थकता. श्रीच्या बाईला नस-तपकीर ओढण्याची तल्लफ येते. त्यांचा मुड असला की त्यांनी केलेल्या कष्टाच्या, सोसल्या यातनांच्या, छोट्या घटनांतून मिळणाऱ्या आनंदाच्या कहाण्या उत्साहाने सांगत. ऐकतांना मन विस्फारून जाई. वाटे, यांच्या जगण्यातलं संचित कोणतं?
 'अगं, शिऱ्याच्या बापानं कंदी बाजार केला न्हाई. बसल्याजागी हिसेब ठेवणं, वह्या लिवणं त्याच काम. बाजारहाट लालजी... धाकटे काकाजी करीत. वरसातून दोन येळ लुगडी घेतली जात. नाट्या आनल्या की पयले माज्या समूर ठेवत. म्हणत, भाबी, उचला तुमच्या मनाची. पण म्या धाकलीला बलावून तिला पैला मान देई. मग उरलेलं मला. धाकली पण खुश असे. मला माहेरचं कुनी नवतं. पिलेगच्या बिमारीत आख्खं घर खर्चल. येक रंडकी भोजाई आन् मी. मी असेन पंधरासोळाची. पयला मुलगा तवा पोटात व्हता. तो मरून बी झाली तीन इसा वरसं. मोहरून हौस कोन पुरविणार? सासरी मी वडिल. पण धाकलीची हौस करण्याचीच मला हौस वाट.' असे म्हणत त्या खुशित निर्मळपणे हासत. तपकिरीची चिमुट नाकासमोर घेऊन हुंगत जमिनीला हात टेकून उठताना म्हणत, 'निभलं माय आमचं. तुमचं बी निभल. तुलसी माय हाय पाठीशी. हीच परमेसराजवळ इच्छा.' आणि तुलसीकडे पाहून हात जोडीत.
 वीस एक वर्षापूर्वी धानोऱ्याच्या वाड्यात दरोडा पडला होता. त्यात बाईचे, धाकट्या काकीचे सगळे दागिने चोरीला गेले होते. पुसातला.. पौंषातला रविवार होता. डोक्यावरून न्हातांना भांगातलं बोर, सोन्याच्या पाती आणि काळ्या मण्यांचे
गंठन काढून ठेवले होते. धाकट्या काकींनी पूजापातीच्या वेळी बोर गंठन घातले. पण बाईनी स्वैपाकाच्या धांदलीत एका वाटीत काळी पोत गळ्यात ठेवली. तेवढीच जवळ राहिली. धाकटया काकींचे माहेर खाऊन पिऊन टंच. भाई पांच, दिवाळीच्या निमित्ताने भावांनी त्यांना पाटल्या, बांगड्या, आंगठ्या, कमेचा पट्टा सर्व दागिने घडवून दिले. श्रीनाथच्या बाईला माहेरच नव्हते. तिला कोण काही देणार? श्री तुरुंगात जाण्यापूर्वी चार दिवसांसाठी घरी राहिल्या. एरवी काकाजी, बाई आंब्याला आले की वकीलभाऊंच्या घरी रहात. अनूकडे आल्या असतांना तिचा हात हातात घेऊन बाईनी हलक्या आवाजात सांगितले होते,
 "बिनणी, मला सोन्याचा पत्रा चढवलेले लाखेचे तीन मनी आणून देशील? दोनशे रूपये तरी लागतील ग. माय, तू पगारदार हाईस. लई दिसांपासून मनात हाय. पन सांगणार कुनाला? मी सालभरात धा-ईस करून फेडून टाकीन. निस्त्या काळ्यामन्यांनी गळा बुच्चा दिसतू ग. आन् हये शिऱ्याला सांगू नगस बर का!'
 अनूला सासूबाईची ही साधीशी मागणी ऐकतांनाही कसेसे झाले होते. नंतर लागलेली आणीबाणी, दरमहा नाशिकला दोन लेकरांना घेऊन जाणं. या धांदलीतही दरमहा मिळणाऱ्या चारशेऐंशी रूपयातले पन्नास रूपये ती मागे टाकी. त्यातून तिने सोन्याचे चाळीस मणी, पंचवीस पाट्या, मधोमध लालखडा बसवलेली वाटी, असे ओवून सुरेखसे गंठन तयार करून घेतले होते. गंठनची डबी तिने पर्समध्ये नीट ठेवली. दशम्याधपाट्यांचा डबा बांधून घेतला. आणि ती श्री व जीपची वाट पाहू लागली. सुरवातीस बप्पा देशमुखांना अटक झाली होती. पण नंतर ते गळाले. पण पैसे जमवणे, अशोक, पक्या, अण्ण्या यांच्या घरी आर्थिक मदत करणे, ही कामे ते करीत. पाटोद्याच्या जगन मस्केच्या घरी दर महिन्याचा किराणा स्वतः पोचवत. बप्पा नासिकलाही दोनदा जाऊन आले होते. न सांगता जीप पाठवून देतो असा निरोप पाठवला होता त्यांनीच.
 श्रीनाथची जीप धानोऱ्यात पोचताच आख्खे गांव भरारा वाड्यात जमा झाले. सगळे जुने मित्र, जुनी जाणती माणसे, बाईच्या मैत्रीणी सगळे येत जात होते. पण वरच्या आळीतला यादवकाकांचा गणू कुठं दिसेना. माळ्याच्या आळीतला शिवा, धाकट्या गढीतला बिभीषण... बरोबरचे अनेक मित्र दिसेनात... श्रीने सगळ्यांची आठवण काढली. गणू त्याचा जिगरी दोस्त. तो सहा महिन्यांपूर्वीच पुण्यात सहाव्या मजल्याला बाहेरून सिमेंटचा थर चढवतांना खाली पडून खर्चला होता. गावातले चार
दोन देशमुख, दोन तीन मारवाडी, तीन मेहमनी यलम, एखाद दुसरा ब्राम्हण अशी दहाबारा घरे सोडली तर सगळे शेतकरी दोनचार एकर वाले. त्यातही बहुतेकांची जमीन कोरडवाहू. बलुतेदारांकडचे काम कमी झालेले. गावातील बरीचशी तरूण मंडळी पुण्यामुंबईकडे भाकरीसाठी पांगली आहेत. मजलेगाव धरणाचा एक कालवा धानोरा, कुंबेफळ, सातेफळाकडून जाणार आहे असा लोकांत बोलवा आहे. समज आहे. त्या आशेवर काहीजण गावात थांबले आहेत. गावाची कळाच हरवली आहे भर श्रावणातही गाव उदास वाटतेय. श्रीनाथ गणूच्या वडलांना भेटायला गेला. त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी दोन एकर जमीन शेजारगावच्या पाटलाला विकली. उरलेल्या तीन एकरात घर कसे चालणार? हे सारे ऐकून श्रीनाथची अस्वस्थता अधिकच गहिरी झाली.
 श्रीनाथ, अनू धानोऱ्याला पोचण्यापूर्वीच विमलाभाबींनी भावकीतल्या बाया, त्यांच्या मैत्रिणी यांना बोलावून तीळशेंगदणाच्या गोड तेलच्या करून ठेवल्या होत्या. श्रीदादांनी माळ्यावरून प्लास्टिकचा मोठा डबा काढून दिला होता. तेलच्या गार होण्याची वाट पहात दोघीतिघी थांबल्या होत्या. बाईच्या सांगण्यावरून जवसाची चटणी कुटून तयार होती. उन्हं उताराला लागली. बाई काकाजी, गावातील मंडळी... सगळ्यांचा निरोप घेऊन जडशीळ पावलांचे ओझे सावरीत श्रीनाथ आंब्याकडे निघाला. बाईच्या गळ्यातले सोन्याच्या मण्यात ओवलेले गंठन खूप चमचमत होते. त्यावर झळाळी होती बाईच्या तृप्त मनाची.
 'घराचा जिना चढतानाच सुधा वहिनींनी स्वागत केले. या. बघा कोण पाहूणे आलेत ते!'
 अनूची आई चहा पीत होती. आईला पाहून अनू चकित झाली. खुश झाली.
 'जावई पॅरोलवर आलाय हे कसं कळलं ग तुला? तुला पाहून श्री खुश होईल. तो वाटेतच उतरलाय. बाबा नाही आले?' आईला अनूने विचारले, 'आधी चहा पी' असे म्हणत सुधाताईंनी अनू समोर चहाचा कप धरला. जळगावच्या सुनिल दिघेला श्रीनाथच्या दुसऱ्या दिवशी पॅरोल मिळाला. त्याने सांगितल्यामुळे आई सकाळच्या गाडीने अंबाजोगाईला निघाल्या. बाबांना मात्र वेळ नव्हता. श्रीनाथने बप्पांची गाडी त्यांच्या घरी सोडली. चहा घेऊन बप्पांच्या मोटार सायकल वरून तो चनईला निघाला. भीमा पांचाळच्या लेकरांना भेटायला. चनईच्या शेवरे मामांकडे चौकशी केली. एवढ्यात दोन पोरं प्लास्टिकच्या बॅगचा फुगा फुगवून, त्याला दोरी बांधून तो फुगा
उंच उडवीत पळत होती. त्यातल्या एकाला बोलावून शेवरेमामांनी बुधाजी पांचाळाला बोलावून घेतले. भीमाप्पाचा थोरला दहावी नापास होऊन एका गॅरेजमध्ये काम करीत होता. तो आंब्याहून रात्रीच येतो. चंद्रभागा हुशार आहे. सातवीत शिकतेय. बुधाजीच्या घरी जाऊन श्रीनाथने लेकरांसाठी शंभर रूपये दिले. चंद्रभागाला पुढच्या साली आंब्याला आठवीत घाला असे बजावून लेकरांचे फोटो घेऊन तो आंब्याकडं निघाला. आईने ही मंडळी येण्यापूर्वीच श्रीनाथला आवडणारी खास मारवाडी 'घोटेडी खिचडी' केली होती. घी, दही, पापड, आचार... लोणचे हे खिचडीचे चार यारही हजर होते.
 रात्री देवठाण, दगडवाडीचे दहाबारा लोक आले. त्यात शिवादादा, अंकुश, आंजा, शेवंता मावशी, खरातकाका, राणू आणी ही मंडळी होती.
 'श्रीभैय्या, लई खराब झालात.' श्रीनाथला कडकडून भेटतांना अंकुशा म्हणाला, 'श्रीभैय्या तुम्ही आमच्यासाठी मोर्चे काढलेत, सरकारशी भांडण घेतलेत आमच्यासाठी. आणि शिक्षा मात्र तुम्ही भोगता आहात.' गोविंददादा, खरात यांनी खंत व्यक्त केली
 'आंजे, दादांच्या पाया पड. दादा, आंजी चांगलीच मुंबईकरीण झालीय. नाशकाला मिसावाल्यांसाठी पुस्तके गोळा करून पाठवणाऱ्यांत तीपण होती. दर शनिवारी गोरेगावला जाते. लोकाधार संस्थेत काम करते. यंदा बारावीला पास झाली. पण मला मात्र मुंबईत करमत नाय. डोळ्यासमोर सारखं गावाकडचं शेत दिसतं. काकानी, येऊन जा... येऊन जा असा लईच नाद घेतला व्हता. आंजाही चार वर्षात इकडे आली नव्हती. म्हणून काल हितं आलो. आन् तुम्ही आल्याचं कळलं.' अंकुशला किती बोलू नी किती नाही असे झाले होते.
 रात्रीचे अकरा वाजायला आले तरी घरातली गर्दी कमी होत नव्हती.
 दरवाजा बंद करण्यासाठी अनू गेली तर दारात, रोज खाली थांबणारे सीआयडीचे शिपाई भुरेवार भाऊ आणि साखरे काका उभे होते. 'श्रीभैय्या, आज वायरलेस आला व्हता. आमी कळवलंय तुमी हितंच आहात म्हणून. आमी खालीच बसतो. पाणी प्यायचं झालं तरी वैनीचं दार ठोठावायला लागतं. तुमी वैनीची काळजी करू नका. आमी माणसंच हाऊत. पण पोटाला भाकर देणारी चाकरी, करायलाच हवी. येतो आमी!' ते दोघे जिना उतरून गेले आणि अनूने दार लावून घेतले.

९.





 शहाण्णव तास.. पुरे चार दिवस मोकळ्या हवेत भरभरून घेतलेला श्वास उरात साठवून, श्रीनाथने पुन्हा एकदा नासिकच्या मध्यवर्ती कारागृहातच्या दगडी भिंतीच्या आत प्रवेश केला. आतल्या गेटवरच्या हापपोलिस साहेबांनी त्याची तपासणी केली. चाकू, सुरे, पिस्तूल, .... असल्या खास वस्तू बाहेरच्या हवेतून आत घुसल्या तर? पॅरोलच्या कागदावर सही करतांना त्या हापपोलिसाच्या वरच्या साहेबालाही हसू आलं.
 "वेलकम श्रीनाथ. तुमचा छोटा दोस्त अमनचा, पॅरोलही मंजूर झालाय. हा पिवळा डगलेवाला रामसिंह जन्मठेपवाला कैदी. थेट बिहार-नेपाळच्या बॉर्डरवरचा. शस्त्रास्त्रांची ने आण करण्यात मशहूर. दोन खून याच्या नावावर जमा, तुम्ही ज्याचं नाव हाप पोलिस ठेवलंय तो तुमची झडती घेतोय, शस्त्र बाहेरून आणली नाहीत ना हे पाहण्यासाठी! तेही पोलिस खात्याचा सहाय्यक म्हणून...!" गेटवरचे अधिकारी मांजरमकरांनी आपलं मन मोकळ केलं. त्यांना निवृत्त वहायला अवघे आठ महिने उरले आहेत. गप्पा मारणे, गेल्या तीस वर्षातल्या अनुभवांची सरबत्ती नव्याने आलेल्या, लेखक... प्राध्यापक ... वकील..अशा मिसा कैद्यांवर फवारणे, ही त्यांना मिळालेली सुवर्ण संधी. ती ते पुरेपूर घेतात.
 'दादा, तुम्ही झक्कास पैकी पुस्तक लिहा, तुमच्या या स्पेशल अनुभवांवर...' असे म्हणून त्यांना थोपवत श्रीनाथ त्याच्या बरॅककडे जाण्यासाठी वळला.
 अमन, नरहरी अण्णा, अशोक, प्रविण, बन्सीधर... सगळेच त्याची वाट पाहात होते. जादुगाराच्या पोतडीसारख्या एका सुरेख शबनममधून त्याने सगळ्यांच्या घरून आणलेली पत्रं, पुस्तकं ज्याच्या त्याच्या स्वाधीन केली. देशपांडे काकूनी सरांसाठी मेतकूट आणि पूडचटणी दिली होती. मेतकूट म्हणजे श्रीनाथचा 'वीकपॉईंट'.
 "सर, आणण्याची 'आणणावळ' मिळाली पाहिजे हं" असे बाजावत त्याच्यासाठी आणलेल्या वस्तू त्यांना दिल्या. आंघोळीला जातांना अमनच्या कानात हळूच सांगितले
 "लेका, तुझ्या वैनीनी खमंग तेलच्या दिल्यात. संध्याकाळचा भत्ता एकत्र बसून खाऊ. तू सांग सगळ्यांना"
 पुन्हा एकदा 'तेच ते तेच ते' पाढा सुरु झाला. आंब्याहून येतांना त्याने देवीप्रसाद चटोपाध्यायांचा 'लोकायत' हा ग्रंथ आणला होता. गेल्या कित्येक दिवसांपासून त्याला तो हवा होता. अनूच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात तो नुकताच आणला होता. ग्रंथपाल प्रभाकर जोशी भेटायला आले तेव्हा येताना काही नवी, चांगली, दुर्मिळ पुस्तके घेऊन आले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, बहिष्कृत भारत, शरद पाटलांचं 'दास शुद्रांची गुलामगिरी' ही हवी असलेली पुस्तके त्यात होती. एक नवं बेट हाती आलं होतं. श्रीनाथ खुश होता. राजबंदींना मिळणाऱ्या सवलती मिळाल्यापासून कॉट्स, स्वच्छ चादरी, तकिया.. उशा, टेबललँप, या सोयी मिळाल्या होत्याच. त्याचा पुरेपुर उपयोग श्रीनाथ घेत होता. अनेकजण रोज मिळणाऱ्या फलाहारावर... सफरचंद, केळी, चिकू, नाकिशची द्राक्षं याच्या स्वादामुळे, तसेच रोज मिळणाऱ्या पंचवीस ग्रॅम साजुकतुपावर खुश होते. श्रीनाथ रात्रंदिवस त्या भल्यामोठ्या तक्क्याला टेकून वाचण्यात गुंग होई. 'लोकायत' म्हणजे एक महासागरच, सर्व सामान्य माणसाच्या जगण्याच्या अनुभवातून एक जीवनरीती निर्माण झाली. या जीवनरीतीवर आधालेले अत्यंत प्राचीन असे तत्वज्ञान म्हणजे 'लोकायत'. 'लोकेषु आयतः' ते लोकायत या शब्दाची विलक्षण मोहिनी श्रीनाथच्या मनावर पडली होती. ग्रामीण परिसरातील मारवाडी... राजस्थानी कुटुंबांत वाढतांना समाजातील जातीयतेचे थैमान, त्याने अगदी आठवते तेव्हापासून अनुभवले होते. त्या छोटाशा गावात भटगल्ली, पाटील गल्ली, देशमुखांची गढी, माळवाडा अशा वस्त्यातून त्या त्या जातीचे लोक रहात. त्याच्या गावात चौथीपर्यंत शाळा होती. वर्गात सगळ्या जातीजमातीची मुले असत. पण बसतांना मात्र अगदी आपोआप त्यांच्यात एक न दिसणारी भिंत असे. पाटील देशमुखाच्या जवळ ब्राम्हणाची चार दोन पोरं बसत. नंतर मारवाडयाची. माळी, शिंपी, सोनार मुलांची एक रांग, मग लोहार, सुतार, मुसलमानाची मुलं. गावकुसाबाहेर रहाणाऱ्यांच्या मुलांची रांग वेगळी असे. चार दोन मुली असत. त्या मास्तरांच्या खुर्ची शेजारी बसत. नाना माळी, लखू यादव, शिवा पन्हाळे श्रीनाथचे खास दोस्त. तो कधी त्यांच्या शेजारी जाऊन बसला तर घरी लगेच बाईला कळत असे. भवतालच्या भावकीच्या घरातील शिवनारायण, भगवानदास ही मुलं घरी कळ लावून जात.
 "माळ्या मराठ्या का छोरां साथं क्यूं खेलं रे?....अपणा अपणा जात का छोरां साथं खेलणो... बिरामणाका छोरां साथं खेलनो...!!" हे ऐकत तो दहावर्षांचा झाला.
पाचवीला अंबाजोगाईच्या योगेश्वरी शाळेत आल्यापासून मात्र त्याच्या मित्रांचा परिघ खूप... खूप रूंदावला. वर्गातील मुलींची संख्याही वाढली. गावचे मित्रही तिथे आले. वसतीगृहात सर्व जातीजमातीची मुले एकत्र राहत. पण जेवणासाठी मात्र नंदूलाल शर्माच्या 'समाधान' मध्ये ब्राम्हण मारवाडी मुलं जात. तर डोंगऱ्यांच्या खानावळीत देशमुख, मराठा, वंजारी, सोनार, सुतार आदि बहुजन समाजातील मुलांचा भरणा असे. एक एक वर्ग श्री पुढे जात होता. पण अगदी लहानपणापासून मनात साचलेला जातीजमातीच्या प्रश्नांचा गुंता मात्र सुटत नव्हता. सुट्टीला गावाकडे आल्यावर घरात आल्या आल्या नानी ओरडून सांगे.
 "झुमके, देवळीतलं गोमुतर शिऱ्याच्या अंगावर शिंपड, आणि मगच रसोईपर्यंत घे त्याला!"
 आठवीत गेल्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरचा धडा त्याच्या वाचण्यात आला. आणि एक बारिकसा किरण अंधारात चमकावा तसे वाटले. आणि त्याच वर्षी बाबासाहेबांचे निधन झाले. शाळेला सुट्टी मिळाली म्हणून सगळी मुले नाचत घरी गेली. श्रीनाथ मात्र खूप अस्वस्थ होता. त्याने तो धडा तीनतीनदा वाचून काढला. बुध्दी, शहाणपण, हुशारी हे गुण जातीनुसार मिळत नाहीत. ते निसर्गतः, जन्मतः असतात. संधी मिळाली की ते चहुअंगानी बहरतात. पण जातीच्या दडपणाखाली अनेकांना संधीच मिळत नाही. या जाती कोणी निर्माण केल्या? ...का निर्माण केल्या? की निर्माण झाल्या? या प्रश्नांची उत्तर मात्र कोणाला विचारायची? हे प्रश्न नेहमीच पडत.
 तो नववीत गेला आणि आकाश मोकळं व्हायला लागलं. साधू, किंबहूने, एकनाथराव, ग.धो. देशपांडे, बेथुजी, बर्वे.... यांसारखे गुरुजी मराठी, इंग्रजी, इतिहास, शास्त्र हे विषय शिकवत. यातील बरेच गुरुजी निजामशाहीत रझाकारांविरूध्दच्या लढ्यात सामील झालेले होते. तुरुंगातले बंदिस्त जीवन, अज्ञातवास यांना झेललेले हे शिक्षक मुलांना जगाच्या उंबरठ्यावर नेऊन बसवीत. त्याच वर्षी गणेशलालजींनी राष्ट्रसेवादलाची सायंकाळची शाखा सुरु केली. डॉ.बापूराव पाटील वैद्यकिय व्यवसाय ठोकरून सेवादलाचे पूर्णवेळ सेवक म्हणून मराठवाड्याच्या पाचही जिल्ह्यात फिरत. त्यांचा मुक्काम वसतीगृहात असे. त्यांनी डॉ.बाबासाहेबांच्या 'ॲनिहिलेशन ऑफकास्ट' या ग्रंथाचा सारांश त्यांच्या ओघवत्या, जोशिल्या भाषेत नववी दहावीच्या मुलांसमोर मांडला होता. आणि श्रीनाथच्या विचारांना, आचारांना एक वेगळी आणि नवी दिशा मिळाली होती. यावेळी येतांना 'लोकायत' बरोबरच डॉ. राम मनोहर लोहियांची ग्रंथ
संपदा त्याने आणली होती. ग.धो. गुरुजींच्या तोंडून त्याने अनेकदा ऐकले होते की डॉ. राम मनोहर लोहियांचे विचार महात्मा गाधींच्या विचारांच्या पुढचे, त्याच दिशेने पडलेले क्रांतीकारी पाऊल आहे. लोहियांनी लिहिलेले निबंध वाचतांना त्या शब्दांचा नेमका अर्थ, क्षणोक्षणी जाणवत होता. पॅरोलवरून आल्यावर त्याचं बोलणं खूप कमी झालं होतं. सतत दोन तकिये घेऊन, अर्धवट पहुडल्या अवस्थेत तो तासंतास वाचत राही. टिपणवहीं सतत जवळ असेच. डॉ. लोहियांची काही वचने जणु त्याच्या मनात... नव्हे जगण्याच्या स्वप्नांत कोरली गेली.
 त्या दिवशी संध्याकाळी बौध्दिकाच्या वर्गात त्याने डॉ. लोहियांच्या जाणीवेतील शिव, कृष्ण, राम आणि द्रोपदी यांच्या प्रतिमांचे श्रीनाथने नेमकेपण सांगितले...
 O India, Mother, give us the mind of Shiva the heart of Krishna and work deed of Rama, create us with non-dimentional mind and an exuberant heart but a life of limits.
 हे भारतमाते, आम्हा भारतीयांना या मर्यादित आयुष्यात कृतार्थ जीवन जगण्यासाठी शिवाचे सर्वसमावेशक उदार मन दे, श्रीकृष्णासारखे सतत सर्वांना समजून घेणारे 'देते' अंतःकरण दे आणि श्री रामचंद्रासारखे कृतीशील कर्तृत्व आणि विशाल हृदय दे.
 त्याचे विवेचन संपले. दहा...वीस...पंचवीस क्षण नितांत शांत. आणि स्तब्ध. एक आगळीच निरामय शांती. दादाराव करमळकर... मिसा बंदीमधील सर्वात वृध्द स्वयंसेवक उठले आणि त्यांनी श्रीनाथला भरभरून मिठीत घेतले व म्हणाले...
 'श्रीनाथ, राम मनोहर लोहियांविषयी आम्ही नेहमीच अत्यंत कुत्सितपणे बोलत आलो. पण त्यांच्या मनातील या प्रतिमा सर्वसामान्य हिंदूंच्या मनात पोचल्या पाहिजेत. त्यांचे भारतीय संस्कृतीमधील लेख मलाही वाचलेच पाहिजेत. वाः श्रीनाथः ! फार सुरेख विवेचन मांडलेस.'
.....
 ... श्रीनाथने पत्राला सुरुवात केली.
 "... अनू, या तुरुंगवासामुळे मी खूप खूप वाचू शकलो. लिहिण्यासाठी लागणारी प्रतिभा आजतरी माझ्याजवळ नाही. पण या नितांत वाचण्यातून ती माझ्याही मनात केव्हातरी प्रकट होईल अशी आशा मी जरूर करीन. सध्या मी डॉ.राम मनोहर लोहिया यांच्यात आकंठ बुडलोय. त्यांचे स्त्रियांबद्दलचे विचार, सप्तक्रांतीचे स्वप्न अक्षरशः भारावून टाकणारे ! तू आपल्या संसाराच्या भाकरीची जबाबदारी घेऊन मला आवडणाऱ्या कामासाठी मुक्त ठेवलंस. अनू, ग्रामीण भागातील स्त्रियांचे दुःख या
डॉक्टरलाच कळले. स्त्रीवादी भूमिकेला उचलून धरताना शहरातील स्त्रीवादी कार्यकर्त्यांना ते ठामणे सांगत. स्त्रियांचे, सर्वसामान्य स्त्रियांचे, ज्या बहुतांशी ग्रामीण भागात राहातात वा झोपडपट्टीत राहतात, अशांचे प्रश्न प्यायलाही न मिळणाऱ्या पाण्याचे आहेत. उघड्यावर करावे लागणारे स्नान, शौच, वणवण फिरून शोधवे लागणारे सरपण आणि पाणी यांचे आहेत. इस्टेटीतील अधिकार, विवाह, यासारखे प्रश्न ऐरणीवरचे नाहीत.
 अनू, ग्रामीण स्त्रियांचे प्रश्न तुझ्यासारख्या लेखणीची किमया बोटात असलेल्या उच्चशिक्षित शिक्षिकेने समजून घ्यायला हवेत. तू 'लोकायत' वाचले आहेस. देवीप्रसाद चटोपाध्यांच्या 'गौरी' चे नेमकेपण डॉक्टरांच्या पार्वती आणि द्रोपदीतून पहायला मिळते. तू त्यांची पुस्तके जरूर वाच. नव्हे वाचच!"
 ... हा हा.... म्हणता दिवस पुढे पळतील. मुलं मोठी होतील. तुलाही मग नवी दिशा शोधावीच लागणार. खरंय ना?
 तुम्हा सर्वांना आठवण."
 श्री ने पत्र पाकिटात घालुन बंद केलं. थोडी झोप काढून पत्र अमनजवळ नेऊन देऊ असा विचार करून तो उठला. झडझडून आळस देण्यासाठी हात वर करून जांभई दिली नि एक जीवघेणी कळ पाठीच्या मणक्यातून सळसळत थेट मानेपर्यंत पोचली. तो कॉटवर बसला नि दुसरी कळ परत सळसळत धावू लागली. लाटांवर लाटा आदळाव्यात, तशा या जीवघेण्या कळा. क्षणभर काय करावे समजेना. इतक्यात अशोक खोलीत आला. पिळवटलेला चेहरा, न सोसवणारी वेदना डोळ्यातून ओघळणारी. श्रीनाथचं हे वेगळं रूप पाहून अशोक घाबरला.
 “भैय्या काय होतंय? काय दुखतंय? जरा आडवे व्हा. मी डॉक्टरांना कॉल द्यायला सांगतो. असे म्हणत अशोकने श्रीनाथला कॉटवर झोपवले आणि तो ऑफिसकडे पळाला. तेवढयात जातांना अमनलाही त्याने सांगितले.
 दुसऱ्या दिवशी नाशिकच्या जिल्हा रूग्णालयात श्रीनाथची तपासणी झाली होती. तेथील प्रमुख डॉक्टरानी मुंबईच्या दवाखान्यात नेण्याचे सुचवले आणि अवघ्या दोन दिवसात मुंबईच्या सेंट जॉर्ज रूग्णालयाच्या खास बंदिस्त वॉर्डात श्रीनाथ दाखल झाला.
 या बंदिस्त रूग्णालय- वॉर्डात मिसा- राजबंद्यापेक्षा जास्त संख्येने वर्तमान पत्रातून ज्यांची नेहमी नावे झळकत, असे स्मगलर्स... खऱ्या अर्थाने मिसाकैदी - कॅफेपोसाचे कैदी होते. पुकुर साँखिया, युसूफ हैपतुल्ला, नरेंद्र सारंग इत्यादी.
 त्यांचा थाट काही वेगळाच. आठही बोटातून झगमगणाऱ्या रत्नजडीत अंगठ्या, अत्तराचा घमघमाट, जमादारापासून ते अधिकाऱ्या पर्यंत सारे त्यांच्यापुढे लवलवून
झुकणारे. दिवसभर ही मंडळी पत्ते खेळण्यात, सिगारेटी फुकण्यात दंग असे. दुपारी त्यांच्यासाठी घरून डबा येई. डब्याचं झाकण उघडलं तरी मस्सालेदार घमघमाट मिसा राजबंद्यांच्या खोल्यांत जाऊन पोचे. या खास कैद्यांनी राजबंद्यांनीही त्या अन्नाची चव घ्यावी म्हणून आग्रह केला. परंतु तो आग्रह सर्वानीच टाळला. राघव पै सोडले तर बाकीचे चौघेही शाकाहारी होते. ते खास कारण पुढे करणे सोयीचे झाले. हळू हळू श्रीनाथच्या आणि इतरांच्याही त्यांच्याशी गप्पा झडू लागल्या. पुकूर साँखिया जेमतेम पन्नाशीचा असेल. भरपूर वाचन. उत्तम इंग्रजी. त्याचे शिक्षण 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' या जगन्मान्य शिक्षणसंस्थेतून झाले होते. नरेंद्र सारंग जेमतेम सातवी शिकलेला असेल. पण त्याच्या वागण्यातली, इंग्रजी बोलण्यातील इंग्रजी ऐट थक्क करणरी होती. या स्पेशल कॅफेपोसा कैद्यांसाठी सकाळी सहा वाजताच इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराथी दैनिके, साप्ताहिके, पाक्षीके, मासिके येत. संध्याकाळी सायं दैनिकांचा रतिब असे. व्हरांड्यात खुर्च्या टाकून दारू पीत पेपर वाचत बसण्याचा राजेशाही शौक या मंडळींना होता. व्हरांड्याला लगटून उभ्या आडव्या गजांची भक्कम जाळी होती ही बात वेगळी ! पण त्यातून सूर्य किरणे, चंद्रप्रकाश आरामात आत येई. तितक्याच सहजतेने कधी कधी कुजबूज ऐकू येई. 'काल रात्री दीड ते पहाटे पाच पर्यंत सारंग बाहेर होता'. आणि महिन्यातून दोन चारदा हे सारे सहाजण फेरफटका मारून येत. अर्थात पुरावा काय? मग गुपचूप... चुपचुप!!
 दर रविवारी सायंकाळी व्हरांड्यात चौपाटी मांडली जाई. स्पेशल भेळ, पाणीपुरी, रगडा पॅटिस, तऱ्हेतऱ्हेची आईस्क्रीम आणि स्पेशल फालूदा कुल्फी. या चौपाटीत मात्र मिसावाल्यांनी आग्रहाने पाचही राजबंद्यांना सामिल करून घेतले होते.
 श्रीनाथला स्पाँडीलायटिसचा त्रास सुरु झाला होता. पाठीच्या पाचव्या आणि सहाव्या मणक्यातले अंतर वाढले होते. शिवाय डाव्या पायाला सायटिक पेन... जीवघेणी कळ सुरु झाली की वेदना सहन करणे अवघड जाई. दोन तकिये उशाला घेऊन दिवस रात्रभर पुस्तके चावून चावून खाण्याचे हे परिणाम होते. पण त्या पुस्तकांनी दिलेल्या प्रचंड माहितीच्या साठ्यापुढे हा शारीरिक त्रास सहन होई. ट्रॅक्शन, फिजिओथेरेपी सुरु होतेच.
 मुंबईतल्या सेंटजॉर्ज मध्ये आल्यापासून अनेक मित्रांच्या, नातलगांच्या भेटी होऊ लागल्या. अनूचे आजोळ मुंबईचे. मामा, मावशी, आत्या असे अनेकजण मुंबईकर होते. दिवाळीच्या सुट्या सुरु होताच जनक, इराला घेवून अनू गोरेगावाला आली. ती पोचण्याआधी तिची आईही माहेरी आली होती. इथल्या भेटी खूप निवांतपणे होत. बाबाला खूपवेळ भेटायला मिळते म्हणून जनक, ईरा खुश होते.
 श्रीनाथची खास दोस्त सीमा साने मुंबईच्या बँक ऑफ इंडियात होती. रोज सकाळी ४/५ जणांसाठी पोहे, उपीट, साबुदाण्याची खिचडी असा खास नाष्ता ती आणत असे. दुपारी, संध्याकाळी कोणी ना कोणी भेटायला येत येतांना नवनवी पुस्तके आणीत. महिना झटपट निघून गेला. पाठीचे दुखणे थोडे कमी झाले. गळ्याला सतत कॉलर लावल्याने स्पाँडीलायटिसचा त्रास थोडा कमी वाटत होता. एक दिवस रात्री दोन मिसा बंदी अचानकपणे त्यांच्यात आले.
 लोणावळ्याच्या योगा सेंटरचे प्रमुख वरद स्वामीच्या आश्रमात मायकेल डिसूझा, स्वामी आनंदन् या नावाने संन्यासी म्हणून राही. ध्यान, योगा यांच्या बरोबर आसपासच्या परिसरात, विशेष करून पुणे, हडपसर, खडकी येथे तो योगा क्लासेस घेण्यासाठी जाई. एक दिवस अचानक पोलिसांची धाड आश्रमावर पडली. मायकेलला तर उचललेच. परंतु वरद स्वामींची रवानगी येरोड्याला झाली. तेथील डॉक्टरांच्या कृपेने दोन दिवसात त्यांची रवानगी सेंट जॉर्जच्या खास वॉर्डात झाली. वरद स्वामी केवळ योगाचार्यच नव्हते तर त्यांचा भारतीय इतिहास, तत्वज्ञान यांचा गाढा अभ्यास होता. त्यांच्या मते भारतीय संस्कृती आणि इतिहास यांची नेमकी जाण डॉ.राम मनोहर लोहियांना जेवढी होती तेवढी कोणाही भारतीय इतिहास वा तत्वज्ञानाच्या अभ्यासकाला नाही. डॉक्टरसाहेबांचा प्रत्यक्ष सहवास वरदस्वामींना लाभला होता. इतिहास या विषयाची उच्च पदवी दिल्ली विद्यापीठातून घेतल्यावर, त्यांनी दोन वर्ष डॉक्टरांचे सहाय्यक म्हणून काम केले होते. वरदस्वामीचे रेखाचित्रे रेखाटण्याचे कसब थक्क करणारे होते. त्यांचे मायकेलवरही नितांत प्रेम होते. जीवनाकडे पाहण्याची निरामय... निःस्पृह... निकोप दृष्टी मायकेलजवळ आहे. असे त्यांचे ठाम मत होते. घरात लेकरांची संख्या जास्त झाल्याने तीन नंबरच्या मायकेलला केरळातल्या ख्रिश्चन धर्माचे गुरु... पाद्री होण्याच्या शाळेत, त्याच्या वडीलांनी तो दहावर्षांचा असतांनाचा घातले होते. मायकेलने ख्रिस्ती तत्वज्ञानाचा अभ्यास मनःपूर्वक केला. एकीकडे त्याचे शालेय महाविद्यालयीन शिक्षणही सुरु होते. त्या काळात त्याने हिंदू षट्दर्शने, तीन अवैदिक दर्शने, कुराण, महाभारत, रामायण, चार्वाक, चाणक्य या सर्वांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाची खोलवर शिरून भूमिका अभ्यासली. आणि घरी वडिलांना अत्यंत नम्र निग्रही शब्दात, ख्रिस्ती धर्मगुरु होण्याची दीक्षा घेण्यास संमती नसल्याचे कळविले. आणि एक दिवस मायकेल मुंबईत आला. रेल्वेस्टेशनवर हमाली करणारे हमाल, चतुर्थवर्गाचे कर्मचारी, मापाडीकामगार यांच्यात त्याची उठबस असे. त्यांच्यासोबत फुटपाथवर पेपर अंथरून मस्तपणे झोपही तो घेत असे. पहाता पहाता तो कामगारांचा
नेता झाला. अमोघ वकृत्व. इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड भाषेवरचे प्रभुत्व. संस्कृतभाषेचे ज्ञान. यामुळे तो सत्ताधारी पक्षाच्या बड्या पुढाऱ्याचा पराभव करून लोकसभेतही पोचला. परंतु त्याने बिनइस्त्रीचे स्वतः धुतलेले स्वच्छ कपडे... पायजामा आणि नेहरूशर्ट..., एका खोलीचे घर, कार्यकर्त्यासोबत मिसळ नाहीतर वडापावाची न्याहारी यात फरक पडलेला नव्हता. मायकेल आणि वरदस्वामीची मैत्री लोहियाप्रेमातूनच जमलेली. आणीबाणीचा पुकारा हाताच मायकेल संन्याशाच्या वेशात थेट लोणावळ्याला पोचला. वषर्भर निर्वेधपणे त्याने पिंपरी, पुणे, हडपसर येथे जाणे, तेथून निरोप देणे घेणे महत्वाच्या निर्णयाबाबत विशिष्ट भाषेत संवाद करणे सुरू होते. परंतु एक दिवस गोंधळाचा आला. हडपसरहून दिल्लीला फोन लावला असता पलिकडून 'यस आनंदन्' म्हणण्याऐवजी चुकून 'मायकेल डियर' असे अनिता म्हणाली. अनिता त्याची बंगाली पत्नी. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रशियनभाषा शिकवणारी अध्यापिका. एका शब्दाचा काडीचा आधार घेऊन पोलिसांनी मायकेलला शोधून काढले. अर्थातच त्याला आश्रय देणाऱ्या वरदस्वामींची रवानगी मिसा राजबंदी म्हणून येरवडा जेलमध्ये केली गेली. वरदस्वामींविषयी आदर आणि आस्था असल्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्यांना हार्ट पेशंट म्हणून सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये ठेवण्यास सांगितले. सेंट जॉर्जच्या बंदीस्त वॉर्डात वरदस्वामी दाखल झाल्यावर अवघ्या दोन दिवसात त्यांची आणि श्रीनाथची छान दोस्ती जमली. मायकेल डिसूझा विषयी ऐकले खूप होते. पण आता तर त्याला पाहिले... भेटले नाही तरी तो खूप जवळचा वाटू लागला. वरदस्वामी बसल्या बसल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया व मायकेल यांची वेगवेगळ्या भावमुद्रा रेखाटणारी, रेखाचित्रे सहजपणे काढीत. त्यांच्या मनाची एकाग्रता, त्यांची खोलवर जाऊन वेध...छेद घेणारी नजर, हे पाहणे हा एक चिरंतन अनुभवच, तो घेणे हा सुंदर योगायोग आहे असे, श्रीनाथला मनोमन वाटे.
 वरदस्वामीनी पाँडीलायटिसची तीव्रता कमी करणारी काही योगासने त्याला शिकवली होती. स्वामीजींच्या सहवासात एक महिना कसा नि कुठे गेला कळले नाही. आणि एक दिवस परत नाशिक जेलमध्ये पाठविण्याचा खलिता मुंबईत आला. आणि श्रीनाथ नाशिकच्या मध्यवर्ती दगडीतुरुंगात दाखल झाला.
 मुंबईत न जाणवलेली थंडी नाशिकामध्ये शिरताच जाणवू लागली. स्टेशनवर उतरतांना श्रीनाथला पुकुर सांखियाचे शब्द आठवले, 'भैय्या, आपके साथ बहुतही अच्छे तरीकेसे दिन कटे. याद रखना... भैय्या हम भी इन्सान है. और आनेवाली छब्बिस जनवरीके पहले आप आपने घर... अपने गाव चोक्कस पहुंच जायेंग. माताजीकी 'रॉ'
संघटनासे भी हमारा नेटवर्क जादा सेन्सेटिव, करक्ट और लॉयल है।'
 नोव्हेंबर संपत आला होता. २६ जानेवारी म्हणजे किती दिवस? ...? असा हिशेब श्रीनाथचे मन नकळत मांडू लागले होते.

 सेंट जॉर्जेस पासून व्हिक्टोरिया टर्मिनस- व्ही.टी. जेमतेम दहा मिनिटांच्या अंतरावर असेल. परंतु राजकीय कैद्याची पाठवणी पोलिस व्हॅन मधूनच होणार. दक्षिण, उत्तर, पूर्व.... भारताच्या तीनही दिशांनी पश्चिमेच्या अरबी समुद्रावर दिमाखात उभ्या असलेल्या भारताच्या प्रवेशद्वाराकडे धावणाऱ्या - गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने सुसाटणाऱ्या आगिनगाड्या व्ही.टी च्या भव्य, टर्मिनसवर येतात. लाखो माणसांना त्यांच्या फाटक्या तुटक्या गठुड्यात बांधलेल्या झगमगित स्वप्नांसकट घेऊन येतात.
 त्या लखलखित दगडी भव्य परिसरात उतरतांना श्रीनाथने घड्याळात पाहिले रात्रीचा दीड वाजला होता. इलाहाबाद एक्सप्रेस दोन वाजता सुटणार होती. दहाही फलाटदादा माणसांच्या गर्दीने गजबजून गेले होते. श्रीनाथच्या दिमतीला साध्या वेशातले दोन हवालदार, एक पिस्तुलधारी पी.एस.आय. होता. गाडी फुफाटत आत आणि उभी राहिली. इतक्यात पुष्पा, सीमा, गजाभाऊ घाईघाईने त्याच्याजवळ आले. पुस्तके आणि खाऊने भरलेली एक शबनम श्रीजवळ दिली. तेवढ्यात राम सफरचंद आणि केळी घेऊन आला. पी.एस.आय. च्या नजरेतले प्रश्नचिन्ह पाहून गजाभाऊ नेहमीसारखे हो... हहो करून हसले आणि श्रीच्या पाठीवर हात ठेवित म्हणाले,
 'साहेब आमचं गुप्तहेर खात तुमच्या 'रॉ' इतकं नसलं तरी बऱ्यापैकी चतुर आहे. आमच्या दोस्ताला सांभाळून न्या. आणि शिऱ्या, या आपल्या दोस्तांनाही कोल्हापुरी चिवडा आणि अनारशांची चव चाखव. आणि तोंडी लावणं म्हणून ची गव्हेराची क्रांतीगाथाही ऐकव.'
 गाडी वेगाने पळत होती. डोळा कधी लागला ते श्रीनाथला कळलंच नाही. त्याला जाग आली तेव्हा गाडी घाटातून चालली होती. हिरव्याधुंद झाडांनी लपेटलेले डोंगर जागे होत होते. दवथेंबाचा झिरझिरित आरपार पडदा अंगभरून पांघरला होता. पूर्वेच्या कोवळ्या प्रकाश लाटांना भरती येऊ लागली नि तो अदृश्य झाला. कोवळ्या उन्हात हिरवे डोंगर पोपटपंखी झाले. प्रत्येक क्षणी नवे रूप घेणारा निसर्ग. ओंजळ भरभरून घेणार डोळे. श्रीनाथला अनूची आठवण झाली.
 घाट पार झाला होता. उतारावर छोटे छोटे बांध... पौळ घालून जमिनीचे छोटे छोटे तुकडे मशागत केलेले दिसत होते. त्यात पाणी तुडुंब भरून ठेवलेलं होतं.
बांधावर भाताच्या लावणीसाठी रोपांचे जुगडे तयार करून ठेवले होते. अधुनमधुन जुलैच्या भर पावसात लावलेली भाताची शेते आता सोनसळी होऊन झुलायला लागली आहेत. डिसेंबर अगदी अंगणात उभा आहे. ओचा पदर खच्चाटून खोचून आंबड्यात चवेणी अबोलीची फुले माळलेल्या शेतकरणी बांधाकडे लगालगा चाललेल्या होत्या.
 ... शेतकऱ्याचे जीवन किती कष्टाचे असते. एवढे कष्ट करून हाती काय येते. शेतमालाचा भाव ठरवणार दलाल आणि व्यापारी! या भागात पाणी तरी विपुल आहे. पण बीड जिल्हा?....एकूणच मराठवाडा? आमच्या नद्या कायमच तहानलेल्या. कोरड्या ठण्णं. त्याला नानीची आठवण झाली. नव्वदी ओलांडलेली नानी. तिचे आजोळ डोंगरातल्या साकुडाचे होते. लहानपणच्या आठवणी सांगतांना नानी रंगात यायची. अैंशी वर्षांपूर्वी ..."अरं म्हे घ्यावणी छोटी हाँ. थारा नानाजी का साथ म्हारा ब्याह हुयो, जरा म्हे सात आठ साल की ही..." नानीचं मराठवाडी मारवाडी ऐकायला खूप छान वाटायचं. त्यावेळी बुट्टेनाथाच्या डोंगरदरीत घनदाट झाडी होती. भर दिवसा जयवंती-वाणाच्या संगमावरून पल्याड जायचे म्हटले तर घाम फुटे जरा पाऊस बदबदून पडला की वाणा.... जयवंती भरभरून वेगाने वाहत. अल्याडली माणसं अल्याड नि पल्याडली माणसं पल्याड रहात. मात्र तासा दोन तासात पाणी वाहून जाई. पुन्हा वाळू खडकांचे राज्य. तिथे बिबटे राहत. हरणे बागडतांना दिसत. आज त्या डोंगरात तहानलेल्या वाळूच्या नद्या आणि बोडखे वैराण डोंगर उभे आहेत.
 "चहा घ्या वकीलसाहेब. कुठे तंद्री लागली? लेकराबाळांची याद येत असेल नाही का?... संपतील हेही दिवस. श्रीनाथच्या हातात चहा देत पी.एस.आय. बोलले. चहा पितांनाही तेच विचार... एक दिवस पानात भात वरण नसेल तर उपास पडतो आम्हाला. पण पिकवणाऱ्याच्या लेकराबाळांना तरी पुरेसं अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य मिळत असेल? ...?"
 इगतपुरी स्टेशन मागे पडले. श्रीनाथ फ्रेश होऊन... तोंड धुवून आला. अंगावर अनूने विणलेला लांब बाह्यांचा स्वेटर चढवला आणि नासिकची वाट पाहू लागला.
 नासिक आता चांगलेच गारठले आहे. खरे तर नासिकहून गांवी परतण्यापूर्वी गंगेचे सुंदर घाट पहायचे आहेत. काळ्या रामाचे देऊळ, नारो शंकराची प्रचंड घंटा, दक्षिण गंगेचा शांत झुळझुळता प्रवाह, त्र्यंबकेश्वरचे पुरातन शिवमंदिर.... 'गर्जा जय जयकार क्रांतीचा' सारखे, तरूणांच्या अंगात उर्मी.... उर्जा फुलवणारे गीत लिहिणाऱ्या कवी कुसुमाग्रजांची भेट, या साऱ्यांना डोळेभरून पहायचे आहे. पण नासिकहून परतण्याची आहे का शक्यता?
 श्रीनाथने मनातले विचार झटकून टाकले आणि तो अमनच्या बरॅकमध्ये
शिरला. अमन ताजातवाना दिसत होता. अर्थात तो मरगळलेला दिसतो कधी? अमन आंब्याच्या समाजावादी गटातला सर्वात तरूण कार्यकर्ता. त्याच्या मनाचं अवकाश नेहमीच नवनव्या प्रश्नांनी, प्रतिक्रियांनी, कल्पनांनी झगमगलेलं असायचं. त्याचा प्रत्येक प्रश्न नवी दिशा शोधण्याचा ध्यास घेणारा असायचा. श्रीभैय्यांना पहाताच अमन उठला. भैय्याला शेजारी बसवीत म्हणाला.
 "भैय्या, तुम्ही आला नसता तर मग मीच आलो असतो तिकडे....
 भैय्या या बंद कारागृहाच्या दगडी भींतीतूनही आता वारे वाहू लागलेत. आहात कुठे तुम्ही? सुधिऱ्या पॅरोलवर चार दिवस जाऊन आला. त्यात दोन दिवस महाबळेश्वरला मधुचंद्रही साजरा करून आला. तो नंदा बरोबर लग्न करणार आहे, हे तर गावरगन्ना माहितच होतं. हा म्हणे सकाळी अंब्यात पोचला की दुपारी २ वाजता देवीमायच्या देवळात जाऊन लग्न लावल नि रात्रीच्या यष्टीने थेट पुणे नि महाबळेश्वर. आता त्याच्या पावलावर पाऊल टाकायला बन्सीधरही उतावळा झालाय. पण मध्ये धोंडा टाकलाय त्याचा खास दोस्तानीच!..." अमनची अपेक्षा होती श्रीभैय्या काही कॉमेंट... प्रतिक्रिया हाणतील. पण श्रीभैय्यांचं अमनच्या बोलण्याकडेही लक्ष नव्हतं. खिडकीतून बाहेर बघत कुठे तंद्री लागली होती कुणास ठाऊक. अमनने श्रीनाथला हलवून भानावर आणले.
 "भैय्या कुठे गेलं मन? थेट आंब्याला की"

मनऽऽ वढाय वढाय
जसं पिकातलं ढोरऽऽ

 अमन गाऊ लागला. आणि श्रीनाथ वैतागला. पण स्वतःच्या वैतागाचाही राग आला. आणि अजीजीने अमनला म्हणाला, "अमन प्लीज गाऊ नकोस बाबा. दगडी भिंतीतून वारे वाहू लागलेत म्हणजे नेमकं काय? बाईच्या मनाचा दगड पिघळायला लागलाय का? बेट्या, त्या सुधिर बन्शाचं 'शाकुन्तल' मला नको सांगूस. तू नि अशक्या आजारी पडा नि सिव्हील हॉस्पीटलला एक फेरा मारून या बरं. म्हणजे खरी माहिती कळेल"
 इथे आल्यापासून गेल्या चारपांच दिवसात त्याच्या लक्षात आलंय की या सतरा महिन्यांच्या बंदिवासाला प्रत्येकजण कंटाळलाय. गेल्या वर्षीच्या थंडीत अंगात रंग होती. बेडरवृत्ती होती. आणीबाणीला टक्कर देण्याची उर्जा होती. पण ह्या वर्षीची थंडी मात्र सहन करणे अवघड चाललेय. अशक्या सांगत होता की एक दिवस नरहरी अण्णा मध्यरात्रीच उठले. आणि तुरुगांच्या दरवाजापाशी जाउन उभे राहिले. त्यांना
स्वप्नं पडले होते की सर्वांची सुटका झालीय आणि तेच गाढ झोपेमुळे एकटेच तुरुंगात अडकले आहेत.
 श्रीनाथच्या लक्षात आले की शर्मा नानाजींच्या चरख्याचा आवाज ऐकू येत नाही तसेच गीतेच्या श्लोकांचे हलक्या आवाजातले गुणगुणणे ऐकू येत नाही. गेल्या सहा सात महिन्यात शर्मा नानाजींच्या सहवासाची सवय झाली होती. १९४२ च्या चळवळीतले, १९३० सालच्या मिठाच्या सत्याग्रहातले अनुभव ऐकण्यात कारागृहातील तरूण मुले रंगून जात. त्यांच्याकडून महात्माजींच्या, विनोबाजींच्या सहवासातल्या आठवणी ऐकणे हा खास अनुभव असे. सांगता सांगता ते मध्येच थांबत. अमन बेटाला पाणी आणायला सांगत. आणि मग ऐकणाराला गुळाचा प्रसाद मिळे. त्यांना भेटायला त्यांची बहुरानी किंवा छुटकी बिटीया येऊन गेली की साखरेऐवजी चुरम्याच्या गुळ घालून केलेल्या लाडवांचा आणि खजुर बियांचा प्रसाद मिळे. अशा नानाजींची उणीव बरॅकमधील सर्वानाच भासत असे. शर्माजींना पाच दिवसा पूर्वीच सुटका झाली होती.
 ठरल्यानुसार अशक्या, अमनचे पोट नि डोके दुखले. चांगला चार तासांचा मुक्काम जिल्हा रूग्णालयात ठोकून येतांना अनेक बातम्या, वर्तमानपत्रे, पुस्तके खाऊ घेऊन आले. तसे तर रूग्णालयात दहाबाराजण रोज जात. जो तो आपापल्या विचारांच्या दिशेने बातम्या गोळा करून येई. आज एक बातमी मात्र सर्वांनी सारखीच आणली होती. ती बातमी अनेकांना उल्हासीत करणारी होती तर अनेकांना अस्वस्थ करणारी. अमनच्या डोक्यात जुन्या आठवणींचे शोभादर्शक यंत्र वेगाने फिरू लागले. जयबाबूच्या सहवासातील ते दिवस.
 १९७४ साली ६ मार्चला बिहारमधे जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा निघाला होता. त्यासाठी अमन आणि प्रकाश बिहारामध्ये गेले होते. जयप्रकाशजी त्यावेळी मुसहरी भागात लोकजागृतीच्या कामाची दिशा, कृतीकार्यक्रम यांवर विचार करण्यात गुंतले होते. मुख्यमंत्री गफूरच्या सत्तेखाली सामान्य माणूस दबला जात होता. सप्तस्वातंत्र्याचा ध्यास घेतलेले जयप्रकाशजी हाच एकमेव आशेचा दिवा होता. त्या अभूतपूर्व शिबीर व मोर्चात सामिल होऊन नवी उर्जा, नवे कार्यक्रम घेऊन अमन, प्रकाश परतले. अत्यंत लहरी, पात्र बदलून हजारो जीवने गिळणारी कासी नदी, अत्यंत सुपीक अशी बिहारची भूमि तिथल्या जमीनदारांच्या उद्दाम वृत्तीच्या सत्यकथा, तिथले अंतहीन...अपार दारिद्रय यांचे जवळून दर्शन झाले होते. परततांना ओरिसा पहायचे ऐनवेळी ठरले. तिथले दारिद्रय, आदिवासींची उपासमार, विलक्षण सुंदर हिरवाई, झाडांनी थबथबलेले डोंगर, उड्यामारणारे झरे, विस्तीर्ण समुद्र किनारा या
रंगीबेरंगी चित्रांत करूणाईची भीक मागणारे, खोल गेलेले चिमणे डोळे, गुरांची राखण करतांना त्यांच्या शेणातून धुवुन काढलेल्या साळी वाळवून, त्या कांडून त्याची पेज खाऊन घर जगवणाऱ्या आदीवासी बाया यांची चित्रे मात्र विसरता विसरत नव्हती. नासिकचा तिन्ही त्रिकाळाचा भत्ता खातांना अमन ती चित्रे आठवी आणि भत्त्याचा पहिल्या घास खाई. मगच तो खाणेबल होत असे.
 ...अमनच्या मनात जुन्या आठवणी अलिकडे ताज्या होत चालल्या होत्या. १९७४ च्या बिहार ओरिसा दौऱ्यानंतर ते १८ मार्चला ते अंब्यात पोचले आणि १९ मार्चच्या सकाळच्या बातम्यांत ठळक बातमी होती अठरा मार्चच्या तरूणांच्या मोर्चावर केलेल्या गोळीबाराची आणि त्यांत तेवीस तरूण विद्यार्थी हुतात्मा झाल्याची बातमी होती.
 ..... हे सारे आठवताच अमन मनोमनी खूप शरमिंदा झाला. आपल्या तेवीस तरूण बिहारी भावांनी सप्तस्वातंत्र्यासाठी गोळ्या झेलल्या. आणि आपण मात्र अवघ्या १७-१८ महिन्यांच्या तुरुंगवासातून सुटण्यासाठी किती अधीर झालो!!
 विचारात हरवलेला अमन परत जागेवर आला आणि नरहरी व भैय्यांच्या खोलीकडे जाऊ लागला.
 साठेबाबांचे पोट बिघडलेय. तेही आज जिल्हा रूग्णालयात आले होते. पहाता पहाता तिथेही त्यांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या परीवारातील बड्यांनी... तरूणांनी तिथे धूम गर्दी केली. ती पाहता अशक्या अमनच्या कानात कुजबुजला होता.
 'यार, तू काय बी म्हन या हापचड्डीवाल्यांची शिस्त किमान दहा टक्केतरी आपल्यात याया हवी. भैय्यांचं म्हणणं पटतं. निर्णय घेतांना समद्यांनी मिळून घ्यायचा पन राबवतांना हुकूमशाहीच हवी. बघ ना कसे पाया पडतात समदे.'
 साठे बाबांनी साठी ओलांडलीय. पुणे मुंबईत त्यांच्या वकिलीचा प्रचंड दबदबा आहे. दहा खून केलेल्या गुंडाला सहीसलामत सोडवण्याची बौध्दिक कुवत बाबांच्यात आहे. पण खोऱ्याने येणाऱ्या पैशातील अर्धी रक्कम दरवर्षी गुरुपोर्णिमेच्या दिवशी अर्धी खाकी पैंट, पांढरा शर्ट, काळी टोपी घालून, शाखेत जाऊन पेटीत टाकतात. बाबांबद्दल परिवारात खूप आदर आहे. शौचाला जायला ते निघाले की एक स्वयंसेवक स्वतः त्यांचा डबा पाण्याने भरून आत ठेवणार. बाहेर पाण्याची बादली व साबन घेऊन उभा राहणार. बाबांचे कपडे धुण्यासाठी एक स्वयंसेवक... अशी सेवा परिवारातील जेष्ठांना की विशिष्ठ ज्येष्ठांना? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असे. पण उत्तर कोण देणार.
 आज सकाळी श्रीभैय्या, पन्नलाल भाऊ, बापू, अनंतराव या साऱ्यांच्याच नवाने पत्रं आली आहेत. तीही न सेन्सॉर होता... न पाकीट फोडता..
 लोकनायक जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली सर्वजण एकत्र आल्याशिवाय हिटलरी नकाब घातलेल्या काँग्रेसची क्रूरशक्ती चीत होणार नाही याची जाणीव जयप्रकाशींच्या पत्रांतून होती आणि त्यातच पक्षाचे व दलाचे पत्र होते. दोन भिन्न भूमिका आणि विचारानीती असणाऱ्या धारा एकमेकीत संपूर्णपणे मिसळून नवा संघटित समर्थ पक्ष म्हणून उभा राहू शकेल का, यावर मते मागवली होती.
 गेल्या चौदा महिन्यापासून बापू, अनंतराव यांच्या गटात धारियांची भर पडली आहे. धारिया, चंद्रशेखर ही बाईंच्या 'किचन कॅबिनेट' मधली तरूणतुर्क मंडळी... म्हणजे पन्नाशीतली. अत्यंत साधे, सतत हसतमुख असलेले धारियाजी आपली वैचारिक भूमिका अत्यंत मधुर पण ठाम शब्दांत समोरच्यांच्या मनी उतरवीत असत. श्रीकृष्णाचा जन्म जसा कारागृहात झाला तसाच नव्या जनतादलाचा जन्म कारागृहात होण्याचे वातावरण तुरुंगात होत होते. तुरुंगाच्या बाहेरही वातावरण उत्साहाने बहरले होते. प्रत्येकाच्या डोळ्यात नव्या आशा, आकांक्षा तरळू लागल्या होत्या. तुरुंगातील परिवर्तनवादी आणि लोकशाही समाजावादावर निष्ठा व श्रद्धा असणाऱ्या नेत्यांनी बौद्धिकातून मांडलेले विचार श्रीनाथच्या मनात सतत पिंगा घालित होते.
 "...आपण नव्या पक्षाचे सभासद होणार आहोत. सभासदांची भूमिका कोणत्याही पक्षात अत्यंत महत्वाची असते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. सभासदांनी आपले नेते निवडायला हवेत. जेव्हा नेतेच सभासदांची निवड करून, पक्ष प्रवेश करवून घेतात तेव्हा खूपदा धोका संभवतो. एकात्मता (मोनोलिथझम्) शिस्त, उतरंड, कर्तव्य तत्परता, जबाबदारी व नेमणूकपध्दती यावर अत्यंतीक भर दिल्यामुळे विविधता, पुढाकारवृत्ती, लोकशाही, हक्क व निवडस्वांतत्र्य यांचा बळी जाण्याची निःसंशय शक्यता असते. सर्वसामान्य, दीनदलीत समाज घटकांच्या प्रश्नांची उत्तरे शोधून ती मिळवून देण्याचे 'पक्ष' हे एक ऐतिहासिक साधन आहे.
 हे साधन वापरतांना सभासदांनी सतत सजग रहायला हवे." हे विचार श्रीनाथच्या मनात घुमत होते.
 श्रीनाथ खूप अस्वस्थ हाता. शिस्त, उतरंड, कर्तव्य तत्परता, धर्म व जाती याबद्दल आस्था, जबाबदारी व नेमणूक पध्दतीवर अत्यंतिक भर देणाऱ्या विचारसरणीच्या निष्ठावंतांचे आणि विविधता, सर्वधर्मसमभाव, लोकशाही, विज्ञाननिष्ठा, हक्कांची जाणीव, स्त्रीपुरुष समता, साधनसशुचिता यांवर श्रद्धा असणाऱ्या निष्ठावंतांचे, दोन भिन्न प्रकृतीच्या समुदायांचे मनोमिलन होईल का? ह्या प्रश्नाने त्याच्या मनात थैमान मांडले होते. पुढचा रस्ता दिसत नव्हता. फक्त धुके होते.
 त्याने हातात कागद घेतला. त्यावर तो एकाग्रपणे लिहित होता. हे पत्र त्याने काळजीपूर्वक पाकिटात बंद केले आण एसेम् अण्णांच्या नावाने पोस्टात टाकण्यासाठी अशोक अमन जवळ दिले.
 प्रत्येक दिवस लवकर उजाडणारा आणि रात्र ही उजेडासारखी प्रकाशणारी. त्यात डिसेंबरच्या अखेरीस इंदिराजींनी आणीबाणी रद्द करून निवडणूका घेण्याचा मनसुबा जाहीर केला. अर्थात, लोकनायक जयप्रकाशजींनी निवडणूकीत सहभागी होण्याचे आश्वासन दिले तरच! हजारो तरूण, स्त्रिया, पुरुष कार्यकर्ते अनेक महिन्यांपासून गजाआड डांबलेले. त्याची सुटका व्हावी या सदहेतूने जयपक्राशजींनी इंदिराजींना संमती दिली. मात्र दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी वाट्टेल ते समर्पण करायची तयारी असलेले काही तरूण मात्र जयप्रकाशजींवर काहीसे नाराज झाले. या निवडणूका दबावाखाली पार पाडल्या जातील. आणि मग, 'लोकशाही' च्या जगजाहीर मुखवट्या आडून बाई निरंकुश हुकूमशाहीचे सूत्र हाती घेईल ही तरूणांना भीती होती. अशातऱ्हेची हुकूमशाही अधिक घातक ठरेल असे या तरूणांना वाटत होते. १५ जानेवारीपासून राजकीय मिसाबंदीना सोडण्यास सुरुवात झाली. नाराज तरूणांचे मनोबल वाढवून निवडणूकीचे आव्हान एकत्रितपणे स्वीकारण्याची तयारी तुरुंगातील विचारवंतांनी केली.
 अमन, अशोक, नरहरी अण्णा, डॉक्टर, श्रीनाथ यांचा नंबर तसा उशीराच लागला. २५ ला सायंकाळी ते सुटले. पण त्याआधी सुटलेल्यांनी ही मंडळी २५ तारखेला सुटणार असल्याची खबर घरच्यांना... गावांना दिली होती. सुधीर, बन्सीबरोबर अमन मुंबईला गेला. तेथे मायकेलने एक बैठक बोलविली होती. तसेच परतांना तो पुण्याला जाणार होता. शनिवारावाड्यासमोरची भव्यसभा त्याला ऐकायची होती. आंतरभारती परिसरात जाऊन अनेकांना भेटायचे होते.
 श्रीनाथ, अशोक, नरहरीअण्णा आदींनी सकाळची नासिक लातूर एसटी गाठली. केजची मंडळी केजला उतरली. जिंदाबादच्या घोषणांनी एसटी स्टँड गजबजून गेला होता. आता मात्र अंबाजोगाई कधी येईल असे प्रत्येकाला वाटत होते लोखंडीसावरगाव मागे पडले आणि एस्टी अंबाजोगाईच्या बसस्थानकात शिरली. लोकूने हात हालवला आणि तो गाडीकडे धावला.
 जनक चांगलचा उंच झालाय. पांढऱ्या शुभ्र नेहरूशर्ट पायाजम्यात किती छान दिसतोय! इराने झालीरी झालरीचा पांढरा शुभ्र झगा घातलाय. आईला...अनूला चिटकून बाईसाहेब उभ्या आहेत. फिकट निळ्यासुती साडीतली अनू. नरहरीअण्णांची पत्नी लक्ष्मीवहीनी, त्यांचा भाचा, मेहुणा, अमनचे आब्बा, अशोकची आई, वडील भाऊ.... प्रकाश, देवठाणचे गोविंददादा खरातभाऊ अशी अनेकजण आणि शेकडो नगरवासी. प्रत्येकाच्या डोळयात उत्सुकतेचा महासागर. पण जवळच्यांच्या डोळयात
मात्र जीवघेणी प्रतिक्षा. श्रीनाथने इराला उचलून घेतले. एकमेकांचा निरोप घेऊन प्रत्येक मुक्त राजबंदी घराच्या दिशेने नातलगांच्या घेऱ्यात चालू लागला. तेवढयातही श्रीनाथच्या लक्षात आले की अनूचे केस खूप कमी झाले आहेत. अधून मधून पांढऱ्या रेषाही डोकावायला लागल्या आहेत. आम्ही विवाहित पुरुषांच्या बंदिवासापेक्षा आमच्या पत्नीचा बंदीवास किती जीवघेणा असेल !!
 ... लांबचा वळसा घेऊन ठरलेल्या जागेवर एसटी उभी राहिली. श्री गाडीतून उतरला आणि त्याने ईराला उचलून घेतले आणि जनकला जवळ ओढून घेतले. जनकही बापासारखा उंच होणारेय. नरहरी अण्णांची लहानखोर चणीची पत्नी आपल्या भाच्याला, शंकऱ्याला घेऊन आली होती. शंकऱ्याला जवळ घेत नरहरी अण्णा वहिनीकडे पहात अतीव सहानुभूतीने म्हणाले 'शंकऱ्या संपली बरका तुमची शिक्षा.' अब्बा व रेहानाला अमन पुण्याला गेल्याचे व दोन दिवसांनी येणार असल्याचे सांगून श्रीनाथ, मुले व अनू घराकडे निघाले. पक्या, लोकू, खेड्यातील मंडळींनी श्रीनाथला आणि इतर सगळ्यांना हार घातले, पेढे दिले आणि स्टँड रिकामा झाला.
 जिन्यातच मोहिते काकांनी अडवले,
 "अनू, श्री भैय्या उभे रहा. आमची बायको भाकरतुकडा ओवाळून टाकणारेय. आमी सांगली सातारची माणस थोडी जुन्या वळणाची म्हणा की, अन हातपाय धून थेट इकडे घरी यायचं. तुमच्या वहिनींनी फर्मास पोहे बनवलेत." काकांनी फर्मान सोडले होते.
 ईरा आणि जनकला झोपवून श्री अनूजवळ आला. अनूच्या मांडीवर डोके ठेवले. अनू त्याच्या केसातून हात फिरवतेय. दोघांना कधी झोप लागली कळलंही नाही. श्री जागा झाला. अनू भिंतीला टेकून गाढ झोपली होती. त्याने अलगदपणे तिला गादीवर नीट झोपवले. आज मन तृप्त झालं होतं. लग्नापूर्वीचे दिवस श्रीनाथला आठवले. अनू कवितांच्या ओळीतून मन मोकळं करत असे.

"डोळ्यात वाच माझ्या, तू गीत भावनांचे
शब्दांविना कळावे संगीत लोचनांचे"...

 स्त्री स्पर्शातून मिळणाऱ्या तृप्तीपेक्षाही नजरेतून मिळणाऱ्या अपार विश्वासाचा स्पर्श अधिक परिपूर्ण करणारा असतो.
 आज त्या परिपूर्ण तृप्तीचा आनंद मनभर रूमझुमत होता. प्रौढत्वाकडे झुकणारे शहाणपण आता केसातही चमकू लागलेय. अनूच्या घनदाट केसात अधूनमधून चमकणारे पांढरे केस पाहून त्याला हसू आले.


१०.





 निवडणूका जाहीर झाल्या आणि ऋतूच बदलला. एक दिवस आंब्याच्या झाडाखाली कॉलेजमधल्या मुलींचा घोळका अनूची वाट पहात उभा होता. या झाडाला डिसेंबर अखेरीच मोहोर येतो. जणु थंडीच्या हुडहूडी स्पर्शाने अंग रेशमी काट्यांनी बहरून जावे. आणि आता तर ही पानेही झाडे बाळकैऱ्यांचे चिमणे डूल फांद्यावर झुलवीत उभी आहेत. जानेवारी संपत आला की अनूची नजर या बाळकैन्यांना शोधू लागते. ती त्या नादातच तिची सायकल घ्यायला सायकल स्टँडकडे आली आणि मुलींनी तिला घेरल.
 "मॅम, आम्हाला काहीतरी काम सांगा ना. कोणतंही काम, अगदी प्रचारासाठी सुध्दा येऊ आम्ही. नाही का ग? या निवडणूकीत बाई हरायलाच हवी.' एक कन्या
 "मॅडम आई म्हणत होती, की निवडणुकीत मतदारांची नावे नि नंबर लिहून चिट्टया तयार कराव्या लागतात. नि त्या वाटाव्या लागतात. लोकसभेची निवडणूक म्हणजे तर चिठ्यांचा ढीगच घालावा लागेल. आम्ही ते काम नक्कीच करू होय ग मिनू?' दुसरी कन्या. अनूने हसून हो... हो म्हणत सायकल काढली. फाटकात मुलांच्या गटाने अडवले. कुरळ्या केसांचा, उंच बांध्याचा यशवंत पुढे आला.
 "मॅडम आम्ही मुलांनी ठरवलयं. आगदी परीक्षा पणाला लावून इलेक्शचं काम करायचं. दोन अडिचशे मुलं सायकली घेऊन आणि भाकऱ्या बांधून तालुका पिंजून काढू. प्रचाराला, पोस्टर्स लावायला, भिंती रंगावायला...'
 'आणि भाषणासाठी घसा साफ करून ध्यायालाही आमी तयार हाव. हो रे जन्या?' यशवंताचे वाक्य अंगदाने पर्ण केले.
 'मॅडम, तुम्ही श्री भैय्यांना सांगून कॉलेज स्टुडंटसची मिटींग घ्यायला लावा ना.
अभाविप, एसेफाय, राष्ट्रसेवादल, समाजावादी युवजन... अगदी सगळ्या संघटनांचे विद्यार्थी एकत्र येऊन युवक काँग्रेसच्या नावाने हल्ला बोल करू. मॅम, तुम्ही पुढाकार घेतलात ना तर पोरी सुध्दा आपोआप सामील होतील.'
 आणि विद्यार्थ्यांच्या मनासारखे झाले. अनुराधाने गावातील सर्व स्तरातील महिलांना प्रचारासाठी रस्त्यावर उतरवले होते. पन्नाशीतल्या निर्मलाताई, साठी पार केलेल्या माई सगळ्याजणी आपापल्या गल्लीत, मोहल्ल्यात फिरत. संक्रातीच्या वाणासाठी बायकांनी पत्रकांबरोबर वस्तू वाटल्या अनकीनी ते पैसे आप्पांच्या निवडणूक फंडासाठी दिले.
 सत्तर बहात्तरच्या दुष्काळात श्रीनाथने पालथी घातलेली खेडी अनूला निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने पहाता आली. डोंगर पिंपळ्याचा उभा दगडी चढाव. त्या वरून जातांना जीपही अडली. सगळेजण खाली उतरून चढाव चढून वर आले. सातवर्षांपूर्वी श्रीनाथ, अशक्या, अण्णा सायकलवरून कसे जात असतील याचा अनुभव तिने कल्पनेनेच घेतला. त्याच्या पुढची दगडवाडी, पहावे तिथे दगड. फक्त दगडच. पुढचा उतार उतरून आल्यावर दहावीस झोपड्यांचं चिंचाळं. डाव्या हाताला वळून निळाईचं वाळूचं रूंदपात्र ओलांडून पुढचा चढाव चढून गेलं की देवठाण. या कोरड्या ठण्णं निळाईने देवठाण्याला जणु कवेत घेतलेय. पुन्हा चढाव उतरून निळाईचं वाळूने भरलेलं कोरडं पात्र पार केलं की येल्डा खेडे लागते. इथून तिथून उजाड उदास डोंगर. झाडी झाडोरा शोधून सापडणार नाही. नाही म्हणायला चार दोन वेड्या बाभळी दिसंत.
 ... येत्या पंधरा ऑगस्टला स्वातंत्र मिळून तीसवर्षे होतील. पण स्वातंत्र्याचा अंधुकसा प्रकाश किरण पोचल्याची एकही खूण या गावांमधून दिसत नाही. हे तिला जाणवले. चढ चढून ते देवठाण्यास आले. गावातल्या मांगवाड्यातल्या विहिरीलाच पाणी होते. एका लहान मुलीला बादलीत बसवून विहिरीत उतरवून ती वाटी वाटीने घागरीत पाणी भरीत होते. श्रीने सातवर्षांपूर्वी जे अनुभवले तेच आजही. राजकारणी बदलले तर हे सारे बदलेल का? की मागच्या पानावरुन पुढे चालू...?... अनुराधाच्या मनात विचार येत होते. खरातकाकांनी चहा घ्यायला घरात बोलावले. गावात फेरी मारून येतो, असे सांगून अनू आणि मंडळी पुढे सरकली.
 'आक्का मत कोणाला देणार?' असे घरातल्या बाईला विचारले की ती तोंडाला
पदर लावून हसे नि झोपडीत गडप होई. बायांशी बोलयाचे तर गल्ल्या बोळातून जायचे. या गल्ल्याही जातीच्या नावाने ओळखल्या जाणार ! भटवाडा, हटकर तिठा, देशमुखाची आळी वगैरे हिंडून खरातकाकांनी बुध्द वस्तीत नेले. तिथे बाया भरारा जमल्या. मत कोणाला देणार असे विचारल्यावर उत्तर एकच असे, 'मालकाला इचारून सांगू' 'कंच्या चित्रावर ठसा मारायचा ते आमचं लेकरू सांगल.' मांगोड्यात शिरतांना एका धिटुकलीने दिलेले उत्तर अनूला चक्रावून टाकणारे होते.
 'ताई, तुमी शिकलेल्या हाय. मत कुनाला द्याच हे इच्चारू नये नि सांगू बी नये. एवढ पन कळत नाव तुमाला? दिलकी खुसी मन का राज आमी मनाला येईल ते करू' तिचे ठसक्यातले बोलणे पुरे हातेय तोच खरात काकांनी तिच्या पाठीत धपाटा घातला.
 'सुभे कुनासंग वादतीस? ताई मोठया हाईत एवढं बी कळत नाही. आंदी पाया पड त्यांच्या.'
 सुभा खरातकाकांची भाची. तिचे वडिल लातूरला रहातात. ती आठवी पर्यंत शिकलेली होती. जरा उशीरा शहाणी झाली म्हणून एवढे शिक्षण झाले. तिला पाळी आली नि शिक्षण बंद झाले. शिक्षण झाल्यामुळे मॅट्रीक झालेला केजच्या तहसिलमध्ये चपराशी असलेला नवरा मिळाला. नवरा नोकरदार म्हणून घरात तिची वट होती. चार दिवस मामाकडे माहेरपणाला आली होती. अजून लेकरूबाळ नाही. सडी आहे. अनूने तिचा ठसका, पाणीदार डोळे आणि धिटाई मनात नोंदवून घेतली आणि ठरवून टाकले खरातकाकांना सांगून तिला प्रचारात सामील करून घ्यायचे.
 मतदाराचे नांव, पत्ता, यादीतील क्रमांक आणि मतदान केंद्राचा पत्ता लिहून चिठ्ठयांचे ढीग घाल्याचे काम विद्यार्थीनी करीत होत्या. उषा देशमुख ही बी.ए.व्दितीय वर्गात शिकणारी विद्यार्थीनी. तिच्या वडिलांचा बंगला अंब्यात आहे. जमीन जुमला, बैल बारदाना, गायी गुरे राडी या लहान खेड्यात. चार भावांचे खटलं. सगळे भाऊ एकत्र राहत. ते गावचे जमीनदार सगळे भाऊशेती पाहत. घरातील मुलामुलींचे शिक्षण व्हावे या हेतूने उषाच्या आई आंब्याला रहात. विद्यार्थ्यांनीने काम कसे चालले आहे, हे पाहण्यासाठी आणि चिठ्यांचे गठ्ठे कार्यालयात पोचविण्याच्या निमित्ताने अनू उषाच्या घरी येत असे. उषाच्या आईशी तिची चांगली ओळख झाली. उषाच्या आईच्या बोलण्यातला हेल, लकब खूप ओळखीची वाटत असे. तिचे राहाणेही या
भागातल्या ग्रामीण महिलांपेक्षा वेगळे होते. गढीवर राहणाऱ्या देशमुखांची आर्थिक स्थिती संपन्न असते. एक आगळी खानदानी अभिजात छटा महिलांच्या वागण्या बोलण्यातून जाणवते. याचा अनुभव अनूला आला होता. एक दिवस सहज बोलतांना कळले की हंसाबाईंचे माहेर चाळीसगांवचे म्हणजे जळगांव जवळचेच आहे. आणि दोघींमधली जवळीक अधिकच वाढली.
 खानदेशची कन्या बावीसतेविस वर्षांपूर्वी मराठवाड्यातल्या खेड्यात कशी आली हे कळल्यावर अनूच्या लक्षात आले. बाई कोणत्याही जातीची असो वा परिस्थितीतली तिला स्वतःचे मन न उमलू देता जगावे लागते. अगदी बाळपणापासून न उमलता जगण्याची कला तिच्या आई आजीकडून तिच्या रक्तात... मनात भिनवली जाते.
 हंसाक्काचे वडील पुण्यात राहून शिकलेले. चाळीसगांव जवळच्या बोरखेडीचे जमीनदार. मिरची, कपाशी, केळीचे पैसा देणारे पीक काढणाऱ्या शंभर एकर जमिनीचे मालक. त्यांनी चाळीसगावात अडत दुकान टाकले होते. मुलांच्या शिक्षणासाठी तिथेच वाडा बांधला होता. त्यांना पहिल्या सहा लेकीच झाल्या. चाळीसगावात शिक्षणाची सोय असल्याने त्या मॅट्रीकपर्यत... ११ वी पर्यंत शिकल्या. खात्यापित्या मालदारांच्या घरात नांदू लागल्या. हंसा मात्र इंटरला गेली तरी लगीन जमेना. काळी मुलगी पतकरणार कोण? हुशारी असली तरी ती दिसावी कशी? हंसा विशीत पोचली तरी लग्नाच्या बाजारात ती डावी ठरली.
 नासिक, नगर, कोल्हापूर, सांगली, अमरावती सगळीकडे पदराला पदर जुळणारी घराणी सापडायची पण रंग आडवा यायचा. हंसाची एक आत्या तापीबाई औरंगाबाद जवळच्या कन्नडला दिली होती. ती माहेरपणाला आली तेव्हा तिने नात्यातली काही स्थळे आणली. तापीबाईंची नणंद बीड जिल्ह्यातल्या पेडगावची. तिच्या मावसनणदेचा मुलगा लग्नाचा होता. हंसाक्काच्या पिताजींनी लगेच धावाधाव केली. पदराला पदर लागत होता. मुलगा मालदार. त्याला शिकेलली बायको हवी होती. भरपूर करणीधरणी त्यांनी केली. हंसाक्का चाळीसगांवच्या बंगल्यातून राडीच्या चिरबंदी चौसोपी वाड्यात, तिसऱ्या नंबरची सून म्हणून आली. उषाचे पिताजी लालासाहेब शिकलेले. पण वकिलीपेक्षा शेताभातात रमणारे. नव्या घरी हंसाक्काचा सावळेपणा कोणाला खुपत नसे.
 पण हंसाक्कालाही पहिल्या तीन मुलीच झाल्या. मग मात्र सासूबाई भामाजिजी सुनेला घालून पाडून बोलत.
 "माई परमानं हिला बी पैल्या पाच पोरी होनार. खाण तशी माती... आडातलं पोहोऱ्यात येनारच!!" असे बोलणे ऐकावे लागे. 'ज्याच्या पदरी पाप त्याला पोरी होती आपोआप'. ही म्हण तर उठता बसता ऐकावी लागे. पण उषाच्या पाठीवर प्रभात झाला, भामाजीजींनी नातीची पाठ कुंकवाने माखली. तिचं कावेरी नाव बदलून उषा म्हणायला सुरुवात केली.
 मुलांच्या शिक्षणासाठी राडीकर देखमुखांनी आंब्यात बंगला बांधला. लेकरांना भाकरी घालण्यासाठी, त्यांचा अभ्यास घेण्यासाठी हंसाक्का आंब्याच्या बंगल्यात राही. दीरांच्या चारही लेकीचे लग्न बरावी पास झाल्यावर केले. पण हंसाक्काची रेवती औरंगाबादेत डॉक्टर होतेय. मधली मोहिनी लातूरात वकिलीचा अभ्यास करतेय. हंसाक्काच्या शिस्तीत मुले शिकली. दीरांचे दोन मुलगे पुण्यात सी.ए.करीत आहेत, एक इंजिनिअर होतोय. तिने मुलांच्या शिक्षणासाठी, चांगले वळण लागावे म्हणून घेतलेले कष्ट घर जाणते. प्रभात बारावीला आहे आणि रजत दहावीला. ते एकदा शिक्षणासाठी पुणे औरंगाबादला भरारले की झाले.
 हंसाक्काशी ओळख झाल्यामुळे अनूला मोठी मैत्रिण मिळाली.
 निवडणूका संपल्यावर अनू राडीला जाऊन आली. हंसाक्काच्या आग्रहाखातर धरमबहिणीचे नातेही जोडून आली.
 निवडणुकीच्या रणधुमाळीत अनुराधाच्या अमोघ वक्तृत्वाचे खूप कौतुक झाले. नांदेड, लातूर, उस्मानाबाद भागातील उमेदवार तिच्या सभांसाठी आग्रह धरीत. खरे तर अनू उत्तम व्यक्ती होतीच. महाविद्यालयीन जीवनात मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा तिने गाजवल्या होत्या. गेल्या १० वर्षांत त्यावर गंज चढला होता. निवडणूकीच्या निमित्ताने तो ही साफ झाला... हे सारे आठवतांना तिला हंसाक्काचे शब्द आठवले.
 "अनू आपण खानदेशच्या लेकी. मी काळी म्हणून आणि तू श्रीभैय्यांच्या प्रेमात पडलीस म्हणून इथे आलो. सुरवातीला मला खूप अवघड गेलं. सायकलवरून कॉलेजला जाणारी मी. इथे आल्यावर अंगभर अलवण पांघरून चेहेराही दिसू न देता मी वाड्यात आले. तुळशीचं रोप एकांमातीतून उचलून दुसऱ्या मातीत रोवलं जातं. न कुरकरता ते तिथे रूजतं,... फुलतं... तसंच आपल्या पोरींच्या जातीचं. पहाता पहाता माहेर दूर जातं अन् सासर चहुअंगांनी बहरु लागतं. खरंय ना?...." जोड
दिलदार आणि समजुतदार लाभली तर बाईचं भाग्य खुलतं.
 २० मार्च १९७७ रात्र. निवडणूकीचे निकाल धडाक्याने बाहेर येत होते. उण्यापुऱ्या एकोणतीस वर्षांनंतर काँग्रेसची दयनीय पीछेहाट झाली होती. इंदिराजी निवडणुकीत पडल्या आणि रेडीओने गाणे लावले, 'सबेरे वाली गाडीसे चले जाओंगे' निकाल लागत होते. घराघरातील रेडीओंचे आवाज वाढत होते. 'पंछी बनू उडके फिरू मस्त गगनमे... मेरा रंग दे बसंती चोला' या सारखी अर्थपूर्ण गाणी रेडिओवर वाजत होती. घर... रस्ते... माणसे सारीच नाचू लागली होती. गांवातील लोक मुक्तपणे एकमेकांकडे गप्पा मारायला जात होती. झोपलेल्यांना उठवून चहा करायला, तेलतिखट लावून भुंगडा करायला, भजी तळायला लावण्यातली मजा अनेकजण अनुभवत होते. इतके दिवस कोडलेला संताप, उद्विग्नता शब्दांतून उफाळत होती. पण त्याच बरोबर मुक्तीचा, दुसऱ्या स्वातंत्र्याचा आनंद कडकडून मारलेल्या मिठीतून, शब्दांतून ओसंडत होता.
 श्रीनाथने निकालाचा अंदाज येताच पाच किलो पेढे, कांदे, दोन किलो चुरमुरे, शेंगदाणे, चार लिटर दुध आणून दिले.
 'अने, उषा, मनी, लली, हंसाक्कांना बोलावून घे. जिवंत फोडणीचा झक्कास भुंगडा नि केशरी दुध करा. पोरं येतीलच.'
 अवघी उत्तररात्र पहाट होऊन लहरत होती.
 दुसऱ्या दिवशी रेडीओवर बातमी आली, की २४ मार्चला नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होणार आहे. अशोक, अमन, नरहरी अण्णा, डॉक्टर यांना दिल्लाला जाण्याचे वेध लागले. श्रीनाथ मात्र फारसा उत्सुक नव्हता. अनूला मात्र मनोमन वाटत होते की त्याने जावे. तिला आठवले.
 ...लोकसभा निवडणूकीत श्रीनाथने उभे रहावे यासाठी बन्सीधरने आग्रह धरला होता. अनेकांनी पाठिंबाही दिली होता. श्रीनाथने मात्र शांतपणे ठाम नकार दिला होता. जिल्ह्यातील सर्वात जेष्ठ, तळागाळातल्या माणसांसाठी सतत खपणारे, वैयक्तिक लाभाची अपेक्षा न करता ग्रामीण परिसरातील भोवऱ्यासारखे हिंडणारे, सामान्य माणसांचे प्रश्न धसास लावणारे अप्पाच योग्य उमेदवार आहेत. हे त्याने आग्रहपूर्वक श्रेष्ठींना पटवून दिले होते. आणि ती जागा जनता दलाने मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या आप्पांसाठी सोडली होती. सर्वांनीच भरपूर कष्ट घेतले. प्रचार केला आणि आप्पा भरघोस मतांनी निवडून आले.
 अनूची त्या काळातली भाषणे अथांग समुदयायाला प्रभावित करीत. तिच्या
बोलण्यात एक लय होती. शब्दात तिखटा गोडवा होता. तिचे होणारे कौतुक ऐकतांना श्रीनाथ अस्वस्थ होई. या लाटेत अनू राजकारणात वाहून तर जाणार नाही ना अशी भीती त्याच्या मनात कोरीत राही.
 "अने, या कौतुकात वाहून जाऊ नकोस हं. आपली वाट वेगळी आहे. दिशाही वेगळी आहे." या शब्दात तो अनूला बजावीत राही. खरे तर अनूलाही वाटत होते की श्रीनेच उभे राहावे. १९७१ च्या बांगलादेश विजयाच्या इंदिरा लाटेने भल्याभल्यांना लोळवले होते. अनेक कागदी भावली निवडून आली होती. त्या लाटेपेक्षा ही लाट अधिक उंच आणि प्रलयंकारी होती. काँग्रेस होत्याची नव्हती झाली. जनसंघाची माणसे कधी नव्हे ती मोठ्या प्रमाणात निवडून आली. समाजवादी लोकही निवडून आले. आपले मन श्रीपुढे मोकळे करण्याचे धाडस अनूत नव्हते. श्रीनाथची विचार करण्याची तार्किक पध्दत आणि अनूची भावात्मक रीत, यांत श्रीनाथ चोख ठरत असे.
 निवडणूका, पंतप्रधानांचा व मंत्रीमंडळाचा शपथविधी, नव्या राजवटीचे कौतुक यांत महिना गेला. ताबूत थंड झाल्यावर येणारी निर्हेतुक शांतता सर्वत्र... आंब्यावरही पसरली होती. परीक्षा जवळ आलेल्या. उन्हाळ्याची चाहून हवेतून जाणवणारी.
 काळाकोट चढवून श्रीनाथ कोर्टात जात होता. पण काही तरी हरवल्याची बोच मनाला खात असे. अनूला त्याची ही उदासी अस्वस्थ करी. मग अचानक मनात येई, श्रीनाथाने ही संधी घालवायला नको होती.
 जनक पाचवीत गेलाय. ईरा तिसरीत. मुले आता सहा तास शाळेत आणि नंतर मित्रमैत्रिणांत दंग. गेली सहावर्षे प्रबंध लिहिण्यात... नवनवे संदर्भ शोधण्यात गेली. सर्व लक्ष त्यावरच केंद्रीत झालेले. नवे पदार्थ करावेत घराची सजावट करण्यासाठी भरतकाम... विणकाम करावे, साड्या... दागिने यांत मन रमले नाही. त्यासाठी निदान निवांत वेळही मिळाला नाही.
 एक दिवस सकाळी सकाळी येल्डा, दगडवाडी, सोमठाण, देवठाण वगैरे भागातील मंडळी श्रीनाथला भेटायला आली. आल्या आल्या सगळ्यांनी रूंद गॅलरीत बसकण मारली. आणि देवठाणच्या गोविंददादांनी श्रीनाथला हाक दिली.
 "श्रीभैय्या आंदी बाहीर या. आमी डोंगरातली मानसं भेटाया आलाव. आन् अन्नूभाबी तुमीबी घागरभर पानी नि चार प्याले आणा. फाटे चालाया सुरवात केली. सूर्य बाप्पा डोंगरा बाहीर याया लागले तवा आमी संगमावर हुतो. तिथे थोडा भाकरतुकडा खाल्ला. मुकिंदराजाचं दर्शन घेतलं आन थेट हितंच आलो."
 श्रीनाथने बाहेरच्या खोलीतील टेबल, खुर्च्या मधल्या खोलीत ठेवल्या. मोठी
सतरंजी खोलीत अंथरली. आणि सगळ्यांना आत बोलावले. अनूने चार पेले, पाण्याचा हंडा आणून ठेवला होताच.
 'अने चहा टाक आदी. आणि नंतर भलभक्कं कांदे पोहे कर. तंवर आमचं बोलणं होतंय...' स्वयंपाकघरात नजर टाकीत श्रीनाथने सांगितले अन् 'हं. दादा बोला.' अशी सुरवात केली.
 "भैय्या, विलेक्शनचे दिवस कसे भिंगरीवानी भराभरा फिरत व्हते. आता मोरारजी देसाई पंतप्रधान होऊनबी लई दिस झाले. अप्पांच्या कमीनिष्टांनी तुम्ही जंतावाल्यांनी लई आसवासनं दिलीवती. खेड्यांना रोड, डोंगरातल दवाखाना, बॅंक, दहावी पसवर एकांदी साळा, भरघोस वायदे केले. पन एकाची बी सुरवात न्हाई. लोकांनी भरभरून मतं टाकली. आप्पा निवडून बी आले. विलेक्शन होऊन जनता सरकार गादीवर बसून म्हाईना उलटून गेला. आमला बी कळतंया. की पी हळद आन् हो गोरी असं होत नसतं. पन तुमी, आप्पांनी एकादा तरी येवून जायाचं की!
 भैय्या, तुमी अशोकभाऊ, मोहनदादा चव्हाणदादा बप्पा देशमुख दुस्काळात येत होता. तवा पेक्षा एक आना बी परिस्थिती बदलल्याली न्हाई. तवा तुम्ही म्हनाला होता की डोंगराच्या इकासासाठी 'डोंगर इकास समिती' स्थापन करूया, आमचं म्हणणं हाय की त्ये काम आता पुन्ना सुरु करा. कसं?"
 "व्हय ... व्हय. परकासदादा सांगत होते की तुमाले राजकारनात विन्टरेस्ट न्हाई. आप्पां ऐवजी तुमी हुंबं रहावं म्हणून समद्यांनी लई आग्रेव केला. पन तुमाले ती लाईन नकोच हाय असं कळलं."
 "भाऊ, खेड्याकडचं ध्यान दूर करू नका होच सांगाया आलो आमी हितवर" खरात भाऊंनी गोंविददादांच्या बोलण्यात भर घातली. इतक्यात श्रीनाथचे लक्ष अंकुशकडे गेले.
 "अरेव्वा, अंकुश, तु कधी आलास मुंबईहून? कसे आहात सगळे? आंजा, सोनू सगळे मजेत?" श्रीनाथने विचारले.
 "भैय्या आंजा पण आलीय. काका सिरियस असल्याचा फोन आला नि लगेच निघालो इकडे यायला. आंब्याच्या दवाखान्यात आणलं होतं. पण उपेग झाला नाही. शिवादादांच्या कारभारणीकडे सोनूला ठेवलं नि निघालो इथं यायला. तिची परीक्षा जवळ आलीय. काकांना जाऊन पंधरा दिवस झालेत. तुमच्याशी थोडं बोलायचंय" नि तो बोलू लागला.
 "भैय्या, जमीनीत पुरलेलं मन अजूनही बाहीर निघत नाही बघा. जमीन विकायला पन मन तयार होत नाही. भैय्या जमीनीचं काय करावं यासाठी तुमचा सल्ला हवा आहे. भैय्या जिमिनीच्या दुरूस्तीसाठी थोडेफार पैसे पन मागे टाकलेत. उन्हाळा सरायच्या आंधी मी तुम्हाला भेटायला येतो. तवर काय तरी विचार करून ठेवा. आंजाही आता मोकळी झालीय. गेल्या साली वझे काकांच्या आई पन खरचल्या. पावसाळयापूर्वी वझेकाकू आणि काका अमेरिकेला जाऊन येणार आहेत. तेव्हा आंजाही निचिंतीने येऊ शकेल इथे"
 नंतरच्या रविवारी देवठाण येल्डा भागात येण्याचे आश्वासन दिल्यानंतर मंडळी उठली. अनू कपबशा आवरीत होती. श्रीनाथ मदत करीत होता, 'श्री बारा वाजून गेलेत. इतक्या दुरुन ही मंडळी तुला भेटायला चालत आली. काही आशा...अपेक्षा मनात घेऊन आली. जेवायच्या वेळेला चहापोहयांवर कटवणं बरं नाही वाटलं मला. निदान भात पिठलं भाकरी तरी करायला हवे होते. पण माझ्या टिपिकल शहरी मध्यम वर्गीय मनाला ते सुध्दा ओझं वाटलं. कष्टाचं वाटलं. श्री मी या परिसरात वाढले असते ना तर कदाचित अशी वागले नसते. नाही का श्री...." बोलता बोलता अनूचा स्वर कापरा झाला. डोळे भरून आले.
 "अने, वेडी की काय तू? अगं पाणी जरी हसतमुखानं दिलंस तरी आपल्या इथल्या माणसांचं पोट भरतं. तू तर स्वतः पोहे करून आग्रहाने खाऊ घातलेस... चल. काहीतरी नको विचार करूस... पण अने आज खूप हल्लकं वाटतंय मला. गेले दोन महिने डोक्यावर नकळत वागवलेला बोजा आज फेकला गेलाय. एक वाट धुक्यातून, डोंगराकडे जाणारी. दिसल्यागत वाटतेय मला.. अरे तुला तर पोहेही उरले नाहीत. चल मी कांदा चिरून देतो. तू भात टाक. मस्त तिखट पिठलं भात खाऊ. इरा जनकलाही भूक लागली असेल..."
 श्रीनाथने अनूच्या हातातला कुंचा काढून घेतला आणि प्रेमाने तिचा शेपटा ओढून तिला स्वयंपाक घराकडे नेले.


११.





 मृग नक्षत्र लागून आठ दिवस झाले तरी आभाळ निरभ्रच होते. गेले सालही पाऊस बेताचाच झाला होता. हस्त मात्र रपाकवून बरसला होता. त्यामुळे रबीची सुगी थोडीफार हाती आली होती. डोंगर भागातले प्रमुख पीक म्हणजे पिवळी ज्वारी, हायब्रीड बाजरी, थोडफार तीळ, मूग, उडिद. ही पिके आगातात-आषाढ सुगीत येतात. पण आगाताची सुगी बहरलीच नाही. डोंगरात गहू, मोठी जवार लावण्यासारखी सपाट राने कमीच. त्यातून विहिरी गेल्या बारा तेरा सालापासून कोरड्या ठण्ण पडल्या आहेत. पाण्याचे फुटवे मोकळे व्हावेत असा पाऊस नाहीच. हजारो कुटुंबे गेल्या बारा तेरा वर्षांपासून मुंबई पुण्याकडे, कोकणात, गुजरातेत जात आहेत. तो ओघ सुरुच आहे. त्यातील काही कुटुंबे काही काळापुरती, उसतोडीच्या हंगामात सांगली साताऱ्याकडे जात तर काही मुंबईकडे बांधकामासाठी जात. पण उन्हाळा सुरु झाला की गावाकडे येत. पण गेल्या सात आठ वर्षात अनेक जण तिकडचेच झाले आहेत.
 पुलावरून बरेच पाणी वाहून गेलेय. १९८० मध्ये श्रीनाथ, डॉक्टर मोहन, अण्ण्या, पक्या... अशक्या... अमन्या, बप्पा यांनी मिळून डोंगर विकास समितीला आणि बदलाव संघटनेला पुन्हा ताजवा दीला होता. प्रकाश आणि श्रीनाथ यांनी देवठाण, दगडवाडी, यल्डा, साकूड, भावठाण, ममदापूर इत्यादी तीन खेडयातून भेटी दिल्या होत्या. डोंगरातलं ममदापूर, खापरठाण, आरळ इत्यादी गावात जायचे तर देवठाणात नाही तर यलड्यात गाड्या लावून चार कोस पायी जावे लागे. सातमाळाचे बुटके डोंगर. नुस्त्या दगडांनी भरलेले मधून वाहणाऱ्या दोन नद्या. एक जयवंती आणि दुसरी वाणा म्हणजेच वैनगंगा. जयवंती बुटेनाथाच्या डोंगराच्या पायथ्याशी मिळत असे. वाणाचा ओघ गेल्या दहा बारा वर्षांत रोडवला आहे. पण जुनी जाणती
खोडं सांगतात की पूर्वी ही वैनगंगा घोडदऱ्यावरून उडी घेत मुकुंराजाच्या दरीत कोसळायची आणि स्वतःच्या नादात फुंफाटात बुट्टेनाथाच्या पायाशी लोळण घ्यायची. तिथे जयवंतीशी गट्टी झाली की दोघी डोंगरातून हातात हात घालून निघत. मग वाटे निळाई भेटे. डोंगरातले अनेक नाले येऊन मिळत. नागापूरच्या भागात तिला तिनही बाजूंनी डोंगरानी वेढले होते. त्याचा फायदा घेऊन तिथे शासनाने बंधारा घातला होता. नागापूरच्या या धरणाचे पाणी परळी वैजनाथ गावाला पिण्यासाठी दिले जाई. परळी हे वैद्यनाथाचे... शिवाचे महत्त्वाचे ठाणे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक. योगेश्वरीचे आंबे म्हणजे अंबाजोगाई हे डोंगरावर तर वैद्यनाथाचे ठाणे डोंगराच्या पायथ्याशी. परळी येथे. डोंगरातील गांवाना भेटी देतांना अनूच्या महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख पद्माकर कुलकर्णी यांच्या सोबत श्रीनाथ आणि दोस्तांनी मुकुंदराजाचा डोंगर उतरून थेट परळीपर्यंतचा पायी प्रवास केला होता. सरांना डोंगर चढण्या उतरण्याचा, नवे काही शोधण्याचा अपार छंद. आंब्याची योगेश्वरी ही योगिनी आहे. कुमारी आहे. जगन्माता आहे. तिने शिवशंकराशी विवाह करण्यास नकार दिला होता. बुट्टेनाथाचा डोंगर पार करतांना श्रीनाथला नानीची आठवण येई. श्रीनाथने अनूशी विवाह केला तेव्हा आडून मागून विचारणाऱ्यांना नाहीतर टोमणे मारणाऱ्यांना ती ठणकावून सांगे.
 'अरं आपल्या योगसरी मायने तरी काय केलं वो? तवाच्या बाया लई हुशार. सोवताचं खरं करनाऱ्या. संकरबापानी मागल्या जलम भिल्लीणीसंग संग क्येला. मंग हिनं बी फुडच्या जलमात लगणाचा मूर्त टाळला. बसली येणीफणी करीत. सावकास. अन् मंग काय? सूर्व्याचं पैल किरन धरणीवर पोचलं नि मूरत टळला. ती ऱ्हाइली हितं आंब्यात. नि शिवाबाब ऱ्हाइले वाट पहात परलीत. आन ती दमयंती. तिने बी तिच्या मनाला पटलेल्या नळालाच माळ घातली. पन हे कलीयुग हाय. या युगात ज्यानं त्यानं जाती परमान व्हावं. जाऊंद्या. आपलं झालं नि पवितर झालं...' हे म्हणत नानी नाकात नस... तपकिरीची चिमुट कोंबून गप्प बसत असे. श्रीनाथला नासिकला नेण्याआधीच नानी गेली. ते एक बरेच म्हणायचे.
 पंधरा दिवस डोंगरात फिरून तेथील लोकांशी चर्चा करून 'बदलाव' संघटनेला कायमस्वरूपी स्थिरता कशी द्यावी याचाही विचार सुरु होता.
 कोणतेही काम सुरु करायचे तर प्रवेश करण्याची, लोकांच्या प्रश्नाला हात घालणारी 'कळ'... किल्ली शोधावी लागते. त्या दृष्टीने सर्वेक्षण करायचे ठरले.
अण्णाची मैत्रिण सुलक्षणाने मुंबईच्या निर्मला निकेतून मधूने 'समाज विज्ञान... सामाजिक कार्य' या विषयाची पदवी घेतली होती. ती दोन दिवस येऊन राहिली. सर्वेक्षणाच्या पत्रिकेचा नमुना तयार करून दिला. तो प्रत्येक घरापर्यंत पोचून. माहिती घेऊन भरायचा होता.
 सत्याहत्तरच्या निवडणूकीतून तयार झालेला तरूणांचा गट. त्यातील अनेक जण विविध क्षेत्रात काम करीत आहेत. मनोहर, सविता, उषा वकील झाले आहेत. अण्ण्या, यशंवत, दिनेश काँग्रेस व भाजपात हिरीरीने काम करीत आहेत. वैचारिक मतभेदांनी कौटूंबिक आत्मीयतेवर किंवा मैत्रीवर हल्लाबोल केलेला नव्हता. विज्ञान निष्ठा, स्त्रीपुरुष समता, सर्वधर्म समभाव, जाती विहीन समाज व राष्ट्रप्रेम ही सेवादलाची मूलभूत तत्वे असली तरी 'ग्रामीण भागाचा सर्वागीण विकास' हेच या तरूणांचे लक्ष्य होते. प्रत्यक्ष राजकारण करण्याऐवजी विकासाच्या राजकारणासाठी रचनात्मक संघर्षाची तयारी ठेवण्याचे त्या साठी विविध मार्ग शोधण्याचे लोकार्थने ठरवले आहे. त्यासाठी प्रकाश, अशोक, श्रीनाथ वेळ देत.
 देवठाण, येल्डा, दगडवाडी, सोनवळा, मोरफळी ही पाच गावे निवडून सुरवात म्हणून लहान मुलांच्या आरोग्य तपासणीचे काम डॉ. मोहनच्या सहकार्याने सुरू केले. अनेक मुलांच्या गालावर पांढरे डाग, रातांधळेपणा, नारू, मुडदूस हे आजार हजरच होते. वैनगंगा जयवंतीच्या संगमावर बुट्टेनाथापाशी पूल बांधायला मंजूरी आणीबाणी पूर्वीच आली होती. पण अद्यापही मुहूर्त लाभलेला नव्हता. मंजूरीचे घोंगडे भिजत पडले होते. आंब्याच्या मोठ्या क्षयरोग दवाखान्याचे रूपांतर आता आशियातल्या पहिल्या ग्रामीण वैद्यकिय महाविद्यालयात झाले होते. माध्यमिक शाळांची संख्या विसावर आली होती. प्रत्येक जातीचे, धर्माचे त्यावर शिक्के होते. बी.एड., डी.एड. महाविद्यालये आली होती. एका ऐवजी पाच महाविद्यालये झाली होती, पण अनूजही भावठाण देवठाणच्या बाइचे मूल आडवे आले नि रूकमा दाईच्यानी सुटका झाली नाही तर बाई बाजेवर घालून आंब्याच्या मोठया देवाखान्यात आणावी लागते आणि कधी कधी ती बाज चितेवर चढवावी लागते. यात काही बदल नाही. डोंगरातले जीवन अनूजही अंधारलेले. गेल्या तीन चार वर्षात लेकरांना डॉक्टराकडून गोळा केलेल्या व्हिटॅमिन च्या गोळया, दूध दर रविवारी शिजवलेल्या कडधान्याची उसळ, दर गुरुवारी शेंगदाणे, डाळवं नि गूळ यांचा खुराक देण्याची सोय लोकार्थाने केली
होती. देवठाण, दगडवाडी, सोनवळा, मोरफळी वगैर पाच गावातील पोरांच्या तोंडावरचे पांढरे डाग मावळू तर लागलेच होते. रोज सायंकाळी मुले शाळेच्या पटांगणात खेळायला जमा होत. मटकी मुगाची उसळ शिजवून प्रेमाने लेकरांना खाऊ घालणाऱ्या शेवंता मावशीचा मलुगा गणू पोरांना खो खो, कबड्डी शिकवत असे. पाचही गावात सातवी आठवी झलेल्या मुलांना खेळ, गाणी, कवायत शिकवून सायंकाळचे खेळ वर्ग सुरु केले होते. 'लोकार्थ' पहाता पहाता ग्रामीण भागातल्या सामान्य माणसांचा दिलासा बनली. अलिकडे राजकारण्यांनाही 'लोकार्थ' आणि डोंगर विकास समितीची भिती वाटू लागली होती. त्या दिवशी अनू साडेदहा वाजता घरी परतली तर धुण्याभांड्याचा ढीग बाथरूम बाहेर तसाच लोळत होता.
 'अने, सखुबाईच्या पोरी सांगून गेल्यात की आज ती खरकण्याला जाणारेय. नासिकनगरकडच्या भागात. काल मुकादमाने दोन हजार रूपये तिच्या नवऱ्याला इसार म्हणून दिलेत... माझा नाश्ता झालाय. पण साडेबाराला अण्ण्या डोंगरात जायला येणारेय त्यांच्या सोबत जरा चौदा पंधरा दमदार पोळ्या पाठव. जमलं तर झुणका. पण खर्डा पाठवच!... असे सांगत श्रीनाथ घराबाहेर पडला. फटफटी सुरु केल्याचा... नंतर दूरदूर जाणारा आवाज. अनूने वैतागून बैठकितल्या कोचावर बैठक मारली.
 ... पहाटे साडेपाचपासून दिवस सुरू होतो. तरी ती रात्रीच डाळभाताच्या कुकरची तयारी करून ठवेते. भाजी चिरून ठेवते. कणीकही भिजवून ठेवते. तेव्हा कुठे श्री मुलांचा नाश्ता तयार करून, शाळेचे डबे भरून तिला सात वाजता घराच्या बाहेर पडता येते. धापा टाकीत वर्गात शिरून मुलांना शिकवणे जमत नाही. स्टाफरुममध्ये क्षणभर टेकायचे. पेपरचे मथळे नजरेने चाळायचे नि मग ताज्यामनाने विद्यार्थ्यांना 'शुभप्रभात' च्या शुभेच्छा द्यायला वर्गात जायचे.
 कपडे धूवून तिने झटकून फटकून दोरीवर वाळायला टाकले. त्याची टोके नीट करून ठेवली नि तिला हसू आले.
 "अने तू कपडे धून वाळत टाकलेस ना की इस्त्रीची पण गरज भासत नाही' श्रीचे बोलणे आठवले. भांडी घासून जुन्या साडीवर पालथी घातली नि तिने मिर्च्या भाजायला घेतल्या. मन कुठेतरी मलूल झाले होते. मरगळ आली होती. पोळ्या. खुडा.. मिरचीची लसणीचा जाडसर ठेचा आणि झुणक्याची शिदोरी फडक्यात बांधली.
पाच सात कांदे त्यात टाकले नि तिने स्वतःचे ताट वाढून घेतले. पहिला घास तोंडात घालणार तेवढ्यात खालून तीन वेळा खुणेची बेल वाजली. ती घास ताटात ठेवून उठली नि अण्ण्याला पोळी खर्ड्याची शिदोरी देवून वर आली.
 वर्षापूर्वी ठरल्याप्रमाणे अंकुश येऊन गेला. दगडवाडीचा दहा एकराचा तुकडा 'लोकार्थ' ला शेती व पाण्यासंबंधी प्रयोग करण्यासाठी दोन वर्षांसाठी श्रीभैय्या आणि बाप्पांच्या हवाली करून गेला. गेल्या साली सोलापूरचे शहाकाका अचानक आले. आणि श्रीनाथ सोबत दोन दिवस डोंगर भागातच मुक्काम ठोकून राहिले. डोंगरमाथ्यावरच्या ठाणबाई मंदिराचा परिसर अक्षरशः पायाखाली घातला. श्रीनाथ, पक्या, अण्ण्या हा सर्व मंडळी डोंगर विकासाला भिडलेली पाहून त्यांना खूप समाधान वाटले.
 "श्री, तुम्हा मंडळीचे हे काम म्हणजे एक छोटासा 'लाँग मार्च' च आहे. आपल्याकडची माणसं त्याला घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजणं म्हणतील. पण आगे बढो. माझ्या एका मित्राने मला दहा हजार रूपये दिलेत. सामान्य माणसाच्या विकासाठी अशा 'नाहिरे' ना आर्थिक, सामाजिक दृष्ट्या सुदृढ करण्यासाठी झटणाऱ्या संस्थेला ते पैसे द्यावेत असे सुचवलेय. सुधाताई, भाई, सदानंद या कार्यकर्त्यांकडून तुझ्या कामाबद्दल ऐकले आणि इथे आलो. ठणवाईचा परिसर, डोंगर आज जरी बोडखा... उदास दिसला तरी खूप वेगळा वाटला मला. खालून निळाई वाहतेय. आज जरी वाळूचा रूंदपट्टा दिसला तरी नदीचे पात्र केव्हातरी नक्कीच विशाल असणारेय. देवठाण्याच्या देशमुखाच्या मालकीचा आहे म्हणे तो डोंगर नि वरची दोन एकर सखल जमीन. आज थांबातो मी. उद्या त्यांना जाऊन भेटू. तयार झाले तर इसार देऊन टाकू." शहाकाकांचे म्हणणे सर्वानाच भावले. अंकुशाच्या जमिनीपासून जेमतेम कोसावर ठाणवाईचा डोंगर होता.
 ठाणवाईच्या मंदिरा अलिकडचा आणि डोंगराच्या उताराचा बारा एकराचा पट्टा देवठाणच्या सर्जेराव देशमुखाने दहा हजारात लोकार्थच्या नावाने करून दिला. आणि उत्साहाची एक तरूण लाट सर्वांच्या तनामनात लहरू लागली.
 "अने, येत्या पाडव्यापासून मी ठरवतोय की दर शुक्रवारी सकाळी दशम्या धपाट्यांची शिदोरी घेऊन मुक्कामाला डोंगरात जायचे. तीन दिवस तिथेच मुक्काम ठोकायचा नि सोमवारी परत आंब्याला यायचे. पण तुझी संमती हवीय आणि तीही बाय हार्ट."
 'गो टु द पीपल, लीव विथ देम... लोकांपर्यंत म्हणजे त्यांच्या जगण्या, घडण्या वा उमलण्याच्या रीतीपर्यंत पोचा. मग त्यांच्यातले होऊन राहायला हवे.'
 श्रीनाथ काहीशा आजीजीच्या सुरात अनूशी बोलत होता. त्याचा हा काहीसा अपराधी... निम्नसूर अनूला बोचला. उभयतांमधली विश्वासार्हता तर गढूळ तर नाही? असा भास तिला अलिकडे होई.
 'श्री, अरे लग्न करतांनाच आपण सर्व ठरवलेय ना? पहाता पहाता आपल्या लग्नाला पंधरावर्षे झालीय. जनक आठवीत गेलायं. इरा सहावीत गेलीयं. आणीबाणी संपून पाचवर्षे झालीत. तू घरात अडकावस असं कसं वाटेल मला? तुझ्या नि लोकार्थच्या प्रत्येक निर्णयात मी आहेच. वण वण केल्याशिवाय जे हवे आहे त्याची दिशा कशी गवसणार? फक्त एकच लक्षात ठेव. आता स्वैपाकालाही यमुना मावशी आहेत. शिदोरी मात्र भरपूर घेऊन जात जा. पोटाचे हाल नको करूस... आणि अशा अजीजीच्या स्वरात पुन्हा मला आळवायचे नाहीस. बी.ए गुड फ्रेंड"... श्रीनाथच्या पाठीवर एक बुक्का घालून अनू जिना उतरून खाली आली... पुन्हा खालून तिने जनकला हाक घातली. श्री व्हरांड्यात आला.
 "श्री, आज प्लॉटकडे चक्कर मारून मग डोंगरात जा. चार दिवसांनी घरावर स्लॅब पडणारेय... येते मी." असे म्हणत तीने स्कूटर सुरू केली.
 गेल्या सहा महिन्यांपासून श्रीनाथ आठवड्यातून तीन दिवस डोंगरात जातोय, बरोबर कधी पक्या तर कधी अशक्या. अधून मधून आण्ण्या. या चाळीस गावांतली पांढरी आणि काळी श्रीनाथच्या घनदाट परिचयाची झाली आहे. अंकुशाने हाती सोपवलेला दगडवाडीचा दहा एकराचा तुकडा आणि देवठाणचा ठाणाबाई डोंगरात शहा काकांच्या मदतीने घेतलेला दहा एकराचा तुकडा. प्रयोगासाठी आता हाती जमीन आहे. पण.. पाणी...? ...? श्रीनाथ आणि खरातभाऊ ठाणवाईच्या उंचवट्यावर उभे राहून खालचा पट्टा न्याहाळत होते. मनासमोर नेमके काहीच उभे राहत नव्हते. खरातभाऊंना जुने दिवस आठवले.
 ... रान सिताफळाच्या झुडपांनी झुबरलेलं असायचं. भाद्रपदात ते इवलाल्या सुंगधी फुलांनी असामंत गंधित करीत असे. पळस होते. निंबाची झाडे होती. निंबारा होता. निबाऱ्याची पाने निंबासारखीच पण फुलांचा मोहर जांभुळ पिवळा. उन्हाच्या कहारात शहरात येणाऱ्यांना झाडाची सावली गारवा देई. देवठाणात शाळा नव्हती.
जवळच्या यलड्याला चौथी पर्यंत शाळा होती. अर्धा डोंगर उतरून आलं की यलड्याची शाळा लागे. मग गांव. पण शाळेत जायचं तर अंगातली कापड धडूती हवीत. खराताचा सुभान्या आदितवारी डोंगरातील सिताफळं गोळा करायला जाणारच. दिवाळीच्या तोंडाला झाडे सीताफळाच्या झुंबरांनी लखडून जात. सीताफळ पकू लागले की त्याचे डोळे उघडू लागते. सीताफळावर कोवळ्या उनाचा रंग चढे. अशी चेंडूगत मोठी मोठी सीताफळं पोत्यात गोळा करून सुभान्या झोपडीत घेऊन येई. त्यावर पाटलाच्या गाडीतून पडलेला कडबा पांघरी नि वरून एक पोतं अंथरी. मंगळवारी आंब्याचा बाजार असे. आंबं असेल पाच कोस तेवढा डोंगर उतरला की वाणा जयवंताचा संगम लागे. पुन्हा डोंगर चढून गेलं की मुकुंदराज बाप्पांची समाधी. तिथं दर्शन घ्यावं. वरच्या इठोबारखुमाईच्या देवळासमोरच्या वडाच्या झाडाखाली शिदोरी उघडावी. अर्धी चतकोर भाकर खाऊन नामदेव विहीरीचं पाणी पिऊन आंब्याचा रस्ता धरावा. एक डाल सीताफळं विकली की पाच रूपये मिळंत.
 सुभान्याने सिताफळाच्या मोसमात साठ रूपये मिळवले. मडक्यांच्या उतरंडीच्या तळात मडक्यात दडवून ठेवले. मायला पण पत्ता लागू दिला नाही. जून सुरु झाला. उन्हाळ्याच्या अखेरीस अवेळीचा पाऊस गारवा देऊन गेला. सुभान्याच्या मनाला नवे कोंभ फुटले. मंगळवारच्या बाजारातून एक शर्ट, टोपी आणि विजार खरेदी करून आला. आणि यलड्याच्या शाळेत गावातल्या पवार कुलकर्णी, माळ्याच्या पोरांबरोबर गेला. नाव दाखल केलं. चार वर्षे पाखराच्या पंखावर बसल्यागत उडून गेली. पाचवीत जायचं म्हणजे आंब्याला नायतर परळीला जायला हवं. महिन्याला शंभर रूपये खर्चायची ताकद बप्पाजवळ नव्हती. मेल्या जनावराची कातडी काढणं, त्याची वासलात लावणं, गावात दवंडी देणं, बड्या धरचे परगावचे सांगावे... निरोप थेट दहा कोसांवरच्या गांवात पोचवणं अशी कामं तो करी. मांगोड्यात झोपडी घालून ते रहात. माय झाडलोट, घाण काढण्याची कामे ओल्या कोरड्या भाकरतुकड्यावर करी. झोपडीच्या कुडाच्या छपरावर चिंध्या घालून त्यावर शिळया भाकऱ्या चपात्या वाळवण्याचे काम रूंदा, कळी या बहिणी करीत. ते भाकर तुकडे माय पत्र्याच्या डब्यात धरून ठेवी. महिन्यातले अर्धे दिवस थेबंभर तेलाची फोडणी करून उकळलेल्या पाण्यात उकडलेले तुकडे मीठ कांद्याशी खाऊन ढेकर देण्याचा रिवाज म्हारोड्या मांगोड्यात होता, पण शाळेत गेल्याने सुभान्याला गावात पत आली होती. कुणाकडे कागुद
आला की खराताकडे येत. शिवेबाहेर असला तरी शिकलेला म्हणून सगळे इज्जत देत. पण श्रीभैय्या डोंगरात यायला लागल्यापासून सुभान्याला सर्व जण खरात भाऊ म्हणत. श्रीभैय्यांनी खरात वहिनीला पिठाची गिरणी टाकायला मदत केली. स्वतःचे हजार रूपये घातले. बँकेतून कर्ज मिळावे म्हणून जामिनदार राहिले. मात्र गिरणी सुरु झाल्यावर दर महिन्याला परतफेडीची आठवण करून देत. कर्ज केव्हाच फिटले. अण्ण्यादादा, पक्याभाऊ, श्रीभैय्या खराताच्या घरी चहा पितात हे पाहून गावातल्या तरूणांची भीड चेपली. तेही शेळीचा दुधाचा चहा पिऊ लागले.
 "ओ कुशाक्का अगं धान कोरडं असतंया. त्याला कसलाग बाट? आन् धान पिकवणारा माळी द्येवच की. जा खरात वैनीच्या गिरणीवरून आण दळूण जवारी." "वैनी, वीस पैशाला किलोभर दळण देती. आंब्याला त्येच दळण आठ आने किलोनी देतात. तितं कोनी जात इचारीत न्हाई. अग कष्ट कमी कर. जातीला काय बघायचं?" अशी बायांत चर्चा चाले. गांव वाढत गेलं. दुसरी गिरणी आली. पण खरातवैनीचा स्वभाव, स्वच्छ राहणी, नेकी यामुळे तिची गिरणी जोरात चाले....
 .... खरात भाऊंना सारे आठवले. त्यांची नजर उघड्या बोडक्या डोंगरावरून फिरली ते विषादाने श्रीनाथला म्हणाले, भैय्या, झाडाला बी मन असतं. दगडाला बी मन असते असं मानणारी मानस आपन. पन दुकाळाच्या फेऱ्यात खाटका सारखी झाडं कापून काढली आमी. भाकर भाजायची तरी लाकडं हवी नि मानसाला शेवटची वाट दावायची तरी लाकडच हवी..
 "चला खरातभाऊ दिशा सापडली की वाटही सापडत असते." श्रीनाथने खरातच्या पाठीवर आश्वासक थाप दिली आणि ते डोंगर उतरू लागले. उतरता उतरता श्री मध्येच थांबला आणि त्याने उजवीकडे वळून पाहिले. उंचच उंच चढाव होता. ते उभे होते ती थोडी सखल जागा होती. डावीकडे परत खोल उतार. तो उतार थांबत थांबत थेट निळाईच्या किनाऱ्याला टेकला होता. श्रीनाथच्या लक्षात आले की ते थांबले आहेत त्या जागेवरची माती कमी झाली आहे आणि खालच्या कातळाचा चेहेरा उघडा पडू लागलाय. त्याने घाईने परत देवठाणचा रस्ता धरला आणि मुक्काम न करताच दोनच्या बसने तो आंब्याकडे परतला.


१२.





 .... आज मन खारं झालंय. वाचण्यासाठी लक्ष लागेना. बाहेरच्या आरामखुर्चीवर अंग सैलावून ती बसली आणि डोळे मिटून घेतले. लोकार्थ सुरु होऊन चार वर्ष झाली आहेत. गावतला माणूस गावात रहावा, शेतातले पाणी शेतात मुरावे, शेतकऱ्यांनी दीडदोन एकर जमिनीतले दगडवेचून कडेनी पौळ घालावी, गावात प्रौढ साक्षरतेचे वर्ग चालावेत या साठी बदलावची तरूण मंडळी लोकार्थ चे सेवक म्हणून त्या पंधरा खेड्यांतून भिरभिरत होते. दवाखानाही आता रोज दुपारी तीन ते सहा सुरु ठेवतात. या सर्वांच्या उभारीत मी नेमकी कुठे आहे?... माझी भूमिका कोणती? श्रीनाथचे उपांग किंवा पूरक म्हणून? मनी, उषा... अशा अनेकजणी सासरी नांदताहेत. संसारात रमल्या आहेत. आणि मी?...? अनूचे मन तिला विचारात होते. प्रश्नाचे उत्तर...? अशा वेळी उलटून गेलेले लाडके दिवस आठवतात.
 १९७४ च्या युवकमहोत्सवात तिने बसवलेले नागानृत्य विद्यार्थी विद्यार्थीनींनी सादर केले आणि नृत्य संपताच हजारो विद्यार्थ्यांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. सांस्कृतिक विभागाने सादर केलेले पु.ल. चे सदू आणि दादू व कुसुमाग्रजाचे अनूने स्वरबध्द केलेले 'किनारा' हे समूह गीत विद्यापीठात श्रेष्ठ ठरले. त्यावर्षी समूहनृत्य, समूहगीत, एकांकीका, सुगमसंगीत, सोलो तबला, भारूड अशा अनेक स्पर्धात विवेक वर्धिनीचा गट श्रेष्ठ ठरला. औरंगाबादहून येताना अनूला स्वतःची बॅग मोकळी करून तिच्यात मुलाची मेडल्स भरावी लागली. शिल्डस साठी वेगळी पिशवी घेतली. प्राचार्यांनी अनूसह सर्वाचे अभिनंदन 'थ्री हॅटस ऑफ' म्हणत व्यक्त केले होते. तिच्या कथा, कविता, स्त्री, किर्लोस्कर, मराठवाडा, मेनकातून प्रकाशित होत असत. मनात नेहमी उगवती स्वप्नं असत. तिच्या वर्गात इतर महाविद्यालयातील विद्यार्थीही खास तिचे धुंद होऊन शिकवणे ऐकण्यासाठी भरभरून येत. पण घरात मात्र हक्काची आई, पतीचा शब्द झेलणारी पतीला सर्वार्थाने पूरक असलेली अनू
होती. पण आता मात्र त्या पलिकडे मला स्वतंत्र अस्तित्व नाही.
 अनूच्या मनात आज प्रश्नांच्या छटा उगवत होत्या.
 १९७४ च्या दिवाळी सुट्टीत विद्यार्थ्यांना घेऊन अनू बाबा आमटयांच्याकडे सोमनाथच्या शिबीरासाठी गेली होती. तिथला प्रत्येक दिवस काही नवे देणारा. ते सारे पाहून मुलांनाही प्रश्न पडे. सतत काम करणारे, काही ना काही निर्मितीत मग्न असणारे हे झिजणारे हात... पाय. या हसतमुख माणसांना महारोगी म्हणून का हिणवायचे?
 "अगं अनू, इथे आम्ही ना फक्त चहा आणि कॉफी पावडर विकत घेतो. आणि कधीमधी साखर. सकाळची कांजी, चहा सुध्दा गुळाचा. त्याची चव अधिक टेस्टी." भाजी निवडताना साधनाताई सांगत.
 संपूर्ण भारतातून अगदी काश्मिर पासून सहाशे तरूणतरूणी शिबीरात आले होते. भवताली घनदाट जंगल. पण सहाच्या आधीच सूर्य पानांच्या दाटीवाटीतून वाट काढून सर्वांगाला बोचायला लागे. साडेसहाच्या कुदळ फावडी टोपल्या घेऊन मुले श्रमदानासाठी बाहेर पडत. युदकाका, शहाकाका, पंडित काका यांच्या सारखी बुजुर्ग मंडळीही तेवढ्याच उत्साहात कुदळ फावडं घेवून पुढे असत.
 साडेआठला उन्हाचा कहर सुरु झाला की सगळे छावणीत परतत. थंडगार पाण्याने हातपाय तोंड धूवून गर्रम खिचडी नाहीतर सांजाच्या नाश्त्यावर ताव मारीत. हे अन्नही जे महारोगी आता बरे झाले आहेत, जखमा भरून रोगाच्या मर्यादा ओलांडून अलिकडे आलेल्यांनी तयार केलेले असे. पहिल्या दिवशी काही मुलामुलींच्या तोंडात घास घुटमळला. पण त्या अन्नाच्या संपन्न सुगंध, देखणं रूप, आणि भूक वाढवणारी चव अनुभवताच मुले जेवणावर ताव मारू लागली. सकाळी श्रमाने शरीर थके तर जेवणापूर्वी बौध्दिकांनी डोक्यात निर्माण झालेल्या वादळांनीही दमायला होई. मग जेवण म्हणजे साक्षात अमृतानुभव. एक दिवस महाविद्यालयातला अत्यंत व्रात्य, टोमणे मारून मुलींना... प्राध्यापकांना सतत छेडणारा अरविंद जेवता जेवता उभा राहिला नि भरल्या डोळ्यांनी जड आवाजात बोलू लागला.
 "मॅडम आत पाय झिजवत अपंग करणारा महारोग ज्यांना देवाने दिला त्यांना बाबांनी... एका माणसाने संकटाशी लढून जगण्याला समर्थ करणारे निरोगी हात पाय दिले आणि मन दिले. भलेही ते आम्हाला दिसत नसेल पण ते समर्थ हात... शेती करणारे, अन्न निर्माण करणारे हात आमच्या पोटात गेले आहेत. त्यांनी आम्हाला शक्ती दिलीय...'
 ...मॅडम आज माझ्या या हातांची मला लाज वाटते.' वाक्य पूर्ण करताच तो स्फुंदून रडू लागला. मग फक्त अस्वस्थ शांतता.
 शिबीरात रात्री तरूण मुले गाणी, नृत्य कला सादर करीत. विद्यावर्धिनीच्या तरूणांनी युवकमहोत्सवातले नागा नृत्य सादर केले व कुसुमाग्रजांचे 'कोलंबसाचे गर्वगीत' सादर केले.
 'किनारा तुला पामराला'... या उंच टीपेतल्या ओळी. काही जण तीच ओळ वेगळ्या स्वरात खर्जात म्हणणारे तर काही द्रुत लयीत तीच ओळ आळवणारे... समुद्राचा आभास निर्माण करणारे स्वर. बाबांनी त्याच्या बौध्दीकातून गीताचे खास कौतुक केले.
...
 अनूला सारे आठवत होते. बौध्दिकाला सुरवात करतांना बाबा 'प्रिय साधना आणि तरूण मित्रांनो' अशीच सुरवात करतात. तेही तिला स्मरले. बाबांच्या प्रत्येक शब्दात, श्वासात, विचारात साधनाताई आहेत. संपूर्ण दैनंदिन उपक्रमांची व्यवस्था, विशेषतः अन्नाचे नियोजन त्या करतात. मग भाजी निवडण्यापासून ते फोडणी घालण्यापर्यत. शिबीरात लेकुरवाळे कार्यकर्ते येत. त्यांच्या लेकरांना सकाळी नऊ वाजता मऊ मेतकुट भातही त्याच जातीने वाढीत. मग त्यांचे तिथे असणे 'दुय्यम' म्हणायचे का? त्यांना उपांग किंवा पूरक म्हणायच का?...? अग्नीला झेलणारी समर्थ समिधा नसेल तर अग्नी अस्तित्वातच कसा येईल...?...?
 येत्या दहा वर्षात जनक ईराला त्यांच्या भविष्याची क्षितीजे निश्चित करायला मदत मला, त्याची आणि माझी म्हणून करावी लागणार. त्यातून श्री लोकार्थमध्ये गुंतलेला. म्हणजे आता ईरा जनकच्या भवितव्याची जबाबदारी श्री आणि माझी म्हणून मला बघावी लागणार! आणि मग काही वर्षानंतर मलाही श्रीच्या जोडीने काम करता येईल...
 आणि उत्तर हाती आल्यागत वाटून अनू समाधानाने हसली.
 मध्यरात्र उलटून गेली होती. झोप तर चोहोबाजूनी आली होती. पण श्रीच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता श्रीनाथ बाहेरच्या गॅलरीत येऊन उभा राहिला समोर फक्त अंधार तो अस्वस्थपणे परत आत आला आणि आरामखुर्चीवर सैलावून बसला. डोळे मिटले की वाहून गेलेली शेते, कुजलेली बाळपिके, पडक्या.. कोसळत्या भिंती आणि माणसाचे उध्वस्त... हरवलेले चेहेरे समोर येतात.
 इकडेच पावसाचे सरासरी प्रमाण २२ ते २४ इंच पण यंदा १९८३ मध्ये जुलै पर्यंत मान्सूनने ओढ दिली. आणि नंतर जे कोसळणे सुरु झाले कधी नाही ते जयवंती
दुथडी भरून वाहायली ती वहायलीच, पण दोन्ही बाजूची घरे, झोपड्या गिळत बेतालपणे डोंगर उतरून, वैनगंगेच्या तांडवात सामील झाली. पाच सहा दिवस डोंगरातली माणसे पल्याड. मुकुंदराजाची समाधी हादरून गेली. डोंगरातले हजारो लिटर दूध नासून गेले. सुरवातीचे दोन दिवस लोकांनी दुधाचा खवा केला पण पाऊस हटण्याची लक्षणे दिसेनात. स्वयंपाकाला सुकी लाकडे लागणार. त्यांची साठवणूक संपली तर पुढे काय. घराबाहेर, गोठ्यात साठवलेली लाकडे भिजून गेली होती.
 आठ दिवसांनंतर पूर ओसरला. देवठाणतून यल्डयाला जाणारा रस्ता मोकळा झाला. पंधरा दिवसांनी उन पडू लागले. आणि ऑगस्टातल्या ओल्या उन्हानेही मातीच्या भिंती फुगू लागल्या... कोसळू लागल्या, डोंगर उतारावर शेते बांधासकट वाहून गेली होती. धूळपेरणी केलेली तान्हुली पिके माना मोडून मातीत मिसळून गेली. रस्ता मोकळा झाल्यापासून रोज कुठल्या ना कुठल्या खेड्यातली माणसे श्रीनाथकडे येत. दोन तीन वर्षांपासून सुरु केलेल्या 'लोकार्थ' संस्थेने काही मदत करावी अशी सुप्त अपेक्षा त्यांच्या डोळयात असे.
 पण या बेनामी पावसाने उडवलेल्या कहारात चेंगरलेल्या लोकांची शेतं नीट करणे, घरांची बांधबंदिस्ती करणे यासाठी हजारोंनी नव्हे लाखोंनी मदत गोळा करावी लागणार. ती कोण देणार?
 समोरचा अंधार अधिकच गर्द होत चालला होता. एक मिणमिणता उजेड म्हणजे मधु सावंतचे वाक्य. पण त्या वाक्यापर्यंत पोहचण्यात येणारे, घेतलेल्या भूमिकेचे, आधारभूत विचारांचे अडथळे. श्रीनाथ हतबुध्द होऊन विचारात बुडालेला. त्याला कालची दुपार आठवली.
 जीप वाणा-जयवंती संगमाच्या अलिकडे सोडून विजारी मांडीपर्यत वर घेउन पायातल्या चपला हातात घेऊन प्रकाश, डॉक्टर आणि श्री चिखलातून वाट काढीत अर्धा डोंगर चढून आले. डावीकडे थोड्या उतारावर कुरणवाडी होती. गावात असतील जेमतेम एकवीस घरं. गावाच्या डावीकडे खडा उतार आणि खालून निळाईचा खडकाळ पट्टा. निळाई नदीचा रूंद वाळूचा पटटा इथे थोडा अरूंद झालाय. फलांगभर पात्रात मोठमोठे काळेभोर कातळ वाळूच्या मध्येमध्ये उभे आहेत. दसरा जवळ आला की अख्खं कुरणवाडी गंगथडीला... गोदावरीच्या परिसरात शेतीकामासाठी जाई. आगातातल्या पिकांची कापणी, खळी करून मातरं साफ करण्याचं आणि रबीसाठी रानांची मशागत करून पेरणी करण्याचे काम आंब्या केजाचे काही मुकादम एकरी बोली लावून घेत. दसरा उलटला की डोंगरातल्या लोकांचे ताफे
घेऊन गंगथडीला जात. हा रिवाज गेली वर्षानुवर्षे सुरु आहे असे गावातली चिंगा म्हातारी सांगते.
 ...लोकार्थने सुरवातीला सर्वेक्षण केले तेव्हा अनू, लली, सुलू शनवार रविवारी तिकडे मदतीला जात. दसऱ्यानंतर एकपण माणूस गावात राहत नाही यावर विश्वास कसा बसावा ललीने एका पोटुशा माहेरवाशिणीला विचारले होते.
 'तू तर बाळातपणाला म्हायरी आलीयस ना मग दसरा तर जवळ आलाय. तुजी माय, काकी, म्हातारी आजी, बाप, भाऊ, काका यापैकी तुज्याजवळ एकांदा पुरूष अन् बाई ऱ्हातील की!'
 ताई हितं कुन्नीसुध्दा ऱ्हात न्हाई. अवं हे दिसदोन पैसे कमवायचे... मागे टाकायचे मग कायमचा उन्हाळा. माजं सासर परळी जवळच्या लुणगावात हाय. सातवा लागून पंधरा दिस झाले नि मला हितं मायनं आनलं. ढवाळजेवनावर हजार रूपये, सासू सासऱ्याला कापडं, यानले डिरेस, मला साडीचोळी, बुंदीचे लाडू असा साजाबाजा घिऊन लुणगावात आले. चार दिसांनी नेऊन घालतील मला. शिवाय हजार रूपये बाळतंपणासाठी सासऱ्या समूर ठिवावे लागतील. म्हायेरी कुठलं आलं माय बाळातपण? आन माय च्या हातचा शिरा नि पथपानी?" मला लुणगावला सोडलं की माय बी जाईल पुण्याला इमारतीच्या बांधकामाला. बोलतांना तिचे डोळे भरून आले होते. बाजूलाच उभे राहून ऐकणाऱ्या पक्याच्या अंगावर काटा आला. श्रीने त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला दुसरीकडे नेले. गावातून कळले की म्हातारी माणसं सपाटीवर बसलेल्या वडजाईला एखाद्या घरात नायतर नातलगाकडे ठेवतीत. त्यांच्या खाण्यासाठी जवारी नायतर पिवळे भरून ठेवतात. चिंगा म्हातारी अैंशीचा पार चढून आलीय. पण पोरा नातवडासोबत सुगीसाठी गंगथडीला जात असते भाकऱ्या भाजायला. तिनेच ही माहिती दिली.
 ... श्रीनाथ प्रकाश आधी कुरणवाडीकडे वळले. दगडी कातळांनी वेढलेल्या जमीनीवर कुरणवाडी खडी आहे. श्रीनाथला पाहताच कुरणे, गोजरे मंडळी पुढे आली.
 "भैय्या वाईच गुळपानी घ्या अन मग निळाईकडं जाऊ... बघा काय केलंय या कालच्या पावसानं." गोजम्याचा सोमनाथ पाण्याचा तांब्या नि गुळ समोर ठेवीत बोलला.
 '...सातपदरी कापडानं गाळलय पानी. तरी किती गढून हाय बघा. उतारावरच्या भिंगाऱ्याच्या कोरड्या हिरीत पावसाच पाणी साठलय. अशा पावसात कोसावरच्या वडजाईला तरी कशा जातील बाया पानी आनाया? द्येवाचं नाव घ्या नि प्या पोटभर पानी!'
 श्रीनाथने शबनम मधून उकळलेल्या पाण्याची मोठी बाटली काढून त्यातल घोटभर घशात ओतल आणि बाटली तिथेच ठेवली. हे पानी घरातल्या तान्ह्या लेकराला पाजा. असे सांगून ते निळाईच्या पहाडाकडे गेले. निळाई चिखलाने भरून वाहत होती. कुणी सांगाव असाच पाऊस कोसळत राहिला तर निळाई चिखलाई होऊन जाईल. पक्याच्या मनात विचार आला.
 'भैय्या, समदा विस्कोट झालाय बघा डोंगरात. देवठाण, सोमठाण, यल्डा, साकूड... डोंगरातली समदी गावं भकास झालीत. आंदी पाऊ न्हाई म्हणून आणि यंदा पावसाने हाबाडा दावला म्हणून... काय बी करा.. घरागणिक जेमतेम एकर दोन एकर रान हाये. ते कष्टानं पेरलं होतं पन बी रूजून वर डोकावतंय तोच वाहून बी ग्येलं. बाळपिक खर्चली हो.. काय तरी बघ आमच्याकडं...' सोमनाथ सांगत होता. वडजाई, साकूड, सोमठाण... सगळया डोंगर गांवातल्या कहाण्या त्याच. आधीच बोडखे असणाऱ्या डोंगरावरची थोडीफार मातीही वाहून गेली होती. ते आणखीच केविलवाणे दिसत होते..
 अनू जागी झाली. शेजारी श्री नव्हता. श्रीनाथ विमनस्कपणे व्हरांड्यात उभा असल्याचे लक्षात येऊन तीही त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली.
 'श्री, गेल्या सात आठ दिवसांपासून अस्वस्थ आहेस तू. मोकळेपणी बोलत नाही. सांग ना काय प्राब्लेम आहे आता?' अनूने विचारले.
 'अने कस सांगू? गेल्या शंभर वर्षात कोसळला नव्हता असा पाऊस कोसळलाय आणि डोंगरातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या. पिकं गढून गेली. डोंगरातले लोक मोठ्या आशे अपेक्षेने लोकार्थ च्या कार्यकर्त्यांना साकडं घालतात. पाच दहा हजार एका शेतकऱ्याला पुरणे मुश्किल. पाच गांवच्या लोकांना काय सांगायचं आपण? तशीतर आत्तापर्यंत बारा पंधरा खेडयातली माणस येऊन गेलीत.
 तुला मधू सांवत आवठतो ना? ऑक्सफॉम चा तो मला नेहमी टोकतो परदेशी पैसा हा परदेशी म्हणून का झिडकारायचा? पैसा हा पैसा असतो त्याचा उपयोग तुम्ही कसा करता, कोणासाठी करता आणि कोणत्या उद्देशाने करता ते महत्वाचे. परवा भेटला होता ऑक्सफॉम लोकार्थला दोन लाख रूपये मदत देईल. पांच गावातल्या गरजूपर्यंत ते जाऊ द्या. त्यांच्या हातामनात बळ येईल. ते कोणाला द्यायचे. किती द्यायचे त्याचे हिशेब व्यवस्थीत लिहून ऑडिट करणे हे काम तुमचे तुमच्या गटावर विश्वास म्हणून पैसे द्यायला तयार आहोत. अैऱ्यागैऱ्याला कसे देऊ आम्ही?
 अने परदेशी पैसा अपवित्र मानणारे आपण मधू म्हणत होता पूर्व ख्रिश्चन लोक
वर्षाच्या मिळकतीचा दहवा नाहीतर आठवा हिस्सा चर्चला देत. पण चर्च तो पैसा गरजूंना निरपेक्ष भावनेने मदत करण्याऐवजी धर्मांतर, धार्मिक बडेजाव वाढविण्यासाठी गरीब देशातील लोकांना मदत करत असे. आज डाव्या ... मानवतावादी विचारांचा प्रभाव स्कॅडेनेव्हियन देशात पडू लागलाय. त्यामुळे ॲक्शन ओड, ऑक्सफाम, तेरे देस होम्य या सारख्या आर्थिक कदत करणाऱ्या संस्था योग्य स्वयंसेवी वा अशा सक्रिय संस्थाच्या शोधत असतात. मुस्लिमही वर्षभराच्या मिळकतीचा सहावा हिस्सा गरीबांना कपडे, धान्याच्या रूपाने ईदच्या निमिताने वाटतात. आणि आपण..... हिंदू? धर्माने भेद शिकवले. दान फक्त जन्माने ब्राम्हण असलेल्याणांच का? असे का? गरीबाला का नाही हिंदुनीही .... सर्व जातीजमातीच्या हिंदूनी नव बौधांनी, भारतात रहाणाऱ्या प्रत्येक खाऊन पिऊन बऱ्या असणाऱ्या भारतीयांने मिळतीचा १२ वा हिस्सा जरी एकत्र केला तरी इतर देशांकडे भीक मागावी लागणार नाही.
 ..अनू मी, अशोक, प्रकाश, अण्णा, अमन, डॉक्टर या सगळ्यांशी बोललो, सगळ्यांना सारं पटतंय पण...
 'श्री आता झोप आधी. कधी कधी झोपेतच हरवलेल्या वाटा सापडत असतात. चल घरात उद्या विचार करू.'
 झोपेतही दोघे नवी वाट... दिशा शोधत होते. श्रीनाथच्या डोळ्यासमोर गेल्या पाच सहा वर्षातल्या घटना, प्रसंग उभे रहात होते.
 ... आणीबाणीच्या अखेरीस श्रीनाथनी व काही बिनीच्या समाजावादी नेत्यांनी आपली मत निर्भिडपणे लिहून कळवली होती. आणि तसेच झाले.
 संघप्रणित जनसंघ आणि समाजवादी यांचे समरस-मनोमिलन शब्दांतच राहिले. दोन वर्षात इंदिराबाई परत निवडून आल्या. समाजवादी नेत्यांची लक्तरं सजवून वेशीला टांगली गेली. ह्यात जनसंघ आणि काँग्रेस दोघेही पुढे होते. द्विसदस्यत्वाच्या वादावरून वर्षभरातच कुरबूरी सुरु झाल्या. जनसंघातून जनता दलात आलेल्या प्रत्येक सदस्याने संघाचे सदस्यत्व स्वीकारायचेच असा अंतर्गत दबाव आणणे सुरु झाले. जनसंघाला कडकडून गळा मिठी मारून नवे समरसतेचे राजकारण जन्माला घालून राजकारणाची दिशा बदलण्याचे स्वप्न पहाणऱ्या समाजवाद्यांना याचा प्रत्यय येऊ लागला. दुहेरी निष्ठेचा वाद वाढत होता. जनता दलाच्या दहा लाकडी ओंडक्याच्या पडावाचे दोर ढिले पडू लागले अखेर. अणि आवळ्या कोहळयाच गाठोडं सुटलं. मग पुन्हा निवडणूका. भरपूर संख्येने काँग्रेस सरकार सत्तेत आले. संघ, हिंदुमहासभा, वगैरे उजवे पक्ष एकत्र राहिले. भारतीय जनता दल अस्तित्वात आले. समाजवाद्यांची
मात्र अनेक शकले झाली. चंद्रशेखर, दंडवते याची फळी जनतादल म्हणून एकत्र राहिली पण फर्नाडीस, लालूप्रसाद, मुलायमसिंग यादव यांचे वेगवेगळे प्रांतवार आखाडे उभे राहिले पिछडेवाल्यांच्या वेगवेगळ्या आघाड्या वेगळ्याच....
 श्रीनाथ सारख्या स्वप्निल संघर्षाची तरूणाई पार करून चाळीशीत झुकलेल्या प्रौढ तरूणाचे मन राजकारणात रमेना. त्यातही डॉ. मोहनच्या नगराध्यक्षाच्या निवडणूकीतला अनुभव. त्यातून आलेली निराशा... राजकीय भ्रष्टाचाराचा, विश्वासघाताचा विदारक प्रत्यय. बन्सीला जिल्हा परिषदेसाठी कुंबेफळ विभागातून उभे केले होते. पंचायत समितीसाठी दूिन रेड्डी आणि लखू जाधव. या पूर्ण सर्कलची जबाबदारी श्रीनाथवर टाकली होती. त्यानं अत्यंत नेमकी आखणी करून प्रचारात आणले. अनूही केवळ श्रीसाठी खेड्यातून हिंडली. बन्सी, दिनू, लखू निवडून आले आणि अनूने दहाटे चप्पले मार्ट मध्ये जाऊन श्रीनाथसाठी नव्या कोल्हापूरी वहाना खरेदी केल्या. आधीच्या अक्षरशः झिजल्या होत्या चपला.
 पुढच्याच वर्षी नगराध्यपदाची निवडणूक होती. मतदान संपूर्ण गावातील मतदारांनी थेट करायचे होते. मोहन जाधव जनता पक्षातर्फे उभा होता. काँग्रेस तर्फे सदानंद गायकवाड आणि अपक्ष म्हणून काँग्रेसमध्येच आजवर असलेला मुजीबोद्दीन बुहारी उभा होता. सर्वानाच एकशे एक टक्के खात्री होती. डॉ.मोहन नगराध्यक्ष होणार बीडचा उपेन्द्र श्रीनाथच्या खास मदतीसाठी गेले चार दिवस अब्यात ठाण मांडून बसला होता. शेवटची सभा बन्सीधर, बापू, भैय्या हजारी यांनी घेतली. पण आदल्या रात्री उपेन्द्रने रिपोर्ट आणला मोहन निवडून येत नाही. भट गल्ली, कुलकर्णी गल्ली शनिवार पेठ पूर्ण फुटली. इथे दुहेरी निष्ठावाल्यांनी सुरु केलेल्या भारतीय संस्कृती विश्वभारतीय शैक्षणिक संस्थेसाठी पन्नास हजाराची देणगी देऊन मते काँग्रेसच्या पारड्यात टाकण्याचा निर्णय घेतला होता. सत्तेत मुजीबोद्दीन तर नकोच होता. पण समाजवादी तर त्याहून नको, अशी अगदी आतल्या खास केडरनी भूमिका घेतली. उपेन्द्रने आदल्यारात्री कल्पना दिल्याने श्रीनाथ मतमोजणीच्या वेळी सतत मोहन बरोबर होता. मोहन चार हजार आठरा मतांनी पडला. उजव्यांच्या या अघोरी फसवणूकीमुळे श्रीनाथ, मोहन, बप्पा सर्वाच्याच मनाला सुरकुती पडली. पण त्याचक्षणी खऱ्या अर्थाने हातांना आणि मनाला बळ देणार आगळ वेगळ राजकारण शोधण्याचा ध्यास सर्वानी घेतला. लोकासाठी, लोकांच्या प्रश्नांसाठी लोकसहभागातून रचनेसाठी संघर्ष करण्याची भूमिका घेणारी लोकज्ञानाचा शोध घेऊन त्या .. त्या परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांच्या उपयोगातून नवनिर्माणाची दिशा शोभणारी
'लोकार्थ' ही संस्था आकाराला आली नि आता हा जीवघेणा पाऊस....
 .... अनू छान घोरत होती. स्वप्नांचे अवकाश रंगीबेरंगी आठवणीनी झगमगून गेले होते. त्या विदर्भातल्या जनतादलाच्या मंत्रिणबाई अंब्याला भेट देणार होत्या. भेट अचानक ठरली. रात्री राजाभाऊ देशकरांचा फोन आला की सुरेखा वहिनी घाटपांडे रात्रीची सेलूची सभा आटोपून डाकबंगल्यावर उशीरा पोचतील. अनूने सकाळी जाऊन त्यांचे स्वागत करावे. न्याहारी घेऊन त्या रेणापुराकडे जातील. रात्रीची सभा परळीत ठरली होती. अनू ठीक आठला सरकारी विश्रामधामावर पोचली. पंधरा मिनीटांनी सुरेखा वहिनी तयार होऊन बाहेर आल्या. अनूने स्वतःची जुजबी ओळख करून दिली.
 'हं. मग आपले मेंबर्स भरपूर वाढवा. महिला सदस्य आहेत की नाही? समितीची शाखा भरत असेल ना इथे?...' सुरेखा वहिनी बातचीत करीत होत्या. अनूची टयूब थोडी उशीराच पेटली.
 'हो हो महिला सदस्या आहेत ना? आज काल शाखा कुठे भरताहेत?' वगैरे वगैरे बोलून वेळ मारून नेत असतांनाच राजाभाऊ धापा टाकीत आत आले. "आज चतुर्थी. वहिनीना चतुर्थी असेलच. हिने फ्रुटसॅलड आणि साबुदाण्याची उसळ करून दिलीय. म्हणून उशीर झाला. हं. वहिनीसाहेब रात्री झोप वगैरे निवांत झाली ना? या अनुराधा श्रीनाथ माहेश्वरी म्हणजे धानोरकर, आडनाव न लावण्याची सध्याची टूम. या राष्ट्र सेवा दल.. युक्रान्दच्या कार्यकर्त्या. आता जनता दल प्राध्यापिका आहेत इथल्या महाविद्यालयात." राजाभाऊ सांगत असतांना सुरेखा वहिनींनी एक तीक्ष्ण नजर अनूवरून फिरविली. अनूनेही ओठातल्या ओठात हसून उत्तर दिले होते...
 स्वप्नातही अनू हसत होती. एवढ्यात पाण्याचा भला मोठा लोंढा अंगावरून वाहत गेला. नाकातोंडात पाणी.... जीवाची गुदमर. त्यातून जरा सावरतेय तोवर तो लोंढा पार नजरेआड. मग उन्हाच्या बोचऱ्या काट्यांचे घनदाट जंगल. कितीही अंगचोरून चुकवायचे म्हटले तरी टोचणारे घायाळी काटे न सापडणारी वाट... मग पुन्हा तोच पाण्याचा लोंढा माघारी फिरून अंगावर आलेला...
 नाकातोंडात शिरलेले गढूळ पाणी. श्वास घेता येईना...
 आणि अनूला जाग आली. श्रीनाथ तिला गदगदा हलवून उठवीत होता. "अने उठ. माझ्या ओंजळीत एक चिमुकला निळापक्षी येऊन बसला होता. भोर निळे पंख आणि आरपार जाणारी तीक्ष्ण पण रेशमी नजर..."
 'अने, मी ठरवलंय. ते ऑक्सफासचे पैसे येताहेत ना? घेऊ या. पडलेली घरे,
वाहून गेलेली शेते तर दुरुस्त होतील? त्यांना गरजेनुसार इन काईंडस् प्रत्यक्ष वस्तूच्या स्वरूपात मदत करू म्हणजे सिमेंटची पोती... विटा...ट्रॅक्टरचे भाडे वगैरे. मात्र एक अट घालायची. केवळ मजूर लावून बंदिस्ती करायची नाय, तर घरातील लोकानीही पतीपत्नी, मोठी मुले यांनीही काम करायचं. शिवाय सल्ला देण्यासाठी आपले कार्यकर्ते आहेतच. मन्या शेतीचा डिप्लोमावाला आहे. तर मनीचा नवरा बांधकामाची कॉन्ट्रक्टस घेतो... काय? बोल ना! आणि दुसरी अट... आता जर दहा हजाराची मदत दिली असेल तर वर्षभरात ते पैसे परत फेडायचे. व्यवस्थापन खर्च म्हणून पाचशे रूपये घ्यायचे. पण एक महिना उशीर झाला तरी महिन्याला शेकडा दोन रूपये दंड... काय? शिवाय ज्यांची शेत वाहून गेली त्यांना दगडांची पौळ... बांध बंदिस्तीसाठी बी-बियाणे, खते यासाठी मदत, म्हणजे उत्तम बियाणे व खतच द्यायचे. आपल्या मित्र मंडळीत ॲग्रोचे पदवीधरही आहेत. त्यांची मदत घेऊ काय? ऐकते आहेस ना तू?
 'अने, तू बघच. पहात पहाता उसनवारीने दिलेला पैसा परत आल्यावर हा परत केलेल्या रकमेचा आकडा एवढा वर जाईल की कोणाकडे पैशांची मदत मागायचीही गरज पडणार नाही. या रिव्हाल्हींग फंडातून फिरत्या रकमेतून आगाताच्या आणि रबीच्यासाठी लहान शेतकऱ्यांला खतबियाणांची मदत करता येईल. लोहार... सुतार... कुंभार... चांभाराला त्यांचा व्यवसाय करण्यासाठी उसनवार देता येईल....'
 आजवर केवढं प्रेम केलं.. किती विश्वास टाकला डोंगरातल्या माणसांनी! त्यांच्या कोरडवाहू जमिनीला पाणी, हातांना काम... हिरवा डोंगर....
......
 अने तुला आठवतं, वसंतराव नाईकांनी सामुदायिक विहिरीचं स्वप्न महाराष्ट्रात पेरण्याचा प्रयत्न केला. पण शासनाचे कागदी घोडेच नाचले नि योजनेचा कचरा झाला. एक नि दीड एकरवाल्याची जमीन भिजायची. तर तेच स्वप्न आपण नव्या उमेदिने शेतकऱ्यांच्या सहभागातून पुन्हा पेरू या... ते नक्कीच जोमाने ... उगवेल. त्याला स्वार्थाची, भ्रष्टाचाराची कीड लागेल. सगळेच कार्यकर्ते लोकसेवक असतील. अल्पशा गरजेनुसार मानधन घेणार....'
 अने, ऐकते आहेस ना तू?" श्रीनाथ धूनमध्ये बोलत होता. स्वप्नात हरवलेल्या श्रीला अनू शोधत होती. हालवून हालवून हाक मारीत होती. पण तो खूप दूर नव्या अकराव्या दिशेने वेगाने वाहून जात होता...