शोध अकराव्या दिशेचा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

शोध अकराव्या दिशेचा
लेखक :- प्रा.डॉ. शैला द्वारकादास लोहिया
 'किनारा', विद्याकुंज वसाहत,
 अंबाजोगाई, जि.बीड ४३१५१७
 फोन नं. ०२४४६-२४७०१६


अरुणा प्रकाशन
१०३, ओमकार कॉम्प्लेक्स - अ,
खर्डेकर स्टॉप, औसा रोड, लातूर
मो. ९४२१४८६९३५, ९४२१३७१७५७


© सर्व हक्क डॉ. अरूंधती पाटील मो. नं. ९४२२७४४१६६


: प्रथम आवृत्ती :- ०७ सप्टेंबर २०१३


: मुद्रक : आर्टी ऑफसेट, लातूर

अक्षर जुळवणी : हिंदवी कॉम्प्यूटर, लातूर


मूल्य : १५०.०० रुपये


*'शोध अकराव्या दिशेचा' या पुस्तकातील सर्व मते आणि अभिप्राय संबंधित लेखिकेची
असून त्या संबंधी प्रकाशक, मुद्रकव वितरक सहमत असतीलच असे नव्हे.
चार शब्द

 शैला लोहियांचे हे लेखन जीवनाकडे अंतर्मुखाने पाहण्याचे भान देते. ही अनुराधा आणि श्रीनाथ यांच्या जीवनाचे विविध लयीतले सौंदर्य खऱ्या खुऱ्या अर्थाने या दीर्घ कहाणीत अवतरले आहे. आयुष्याच्या संध्याकाळी क्षितिजावर जे विविध रंग खुलून दिसतात, ज्यात गीत, लोकगीत, सामाजिक-राजकीय जाणिवेचे असे त्यांना प्रथमपासूनच भान आहे व ते उत्तरोत्तर सूक्ष्म होत गेले आहे. शृंगाराच्या हळूवार छटा त्यांनी संयमाने रेखाटलेल्या आहेत. शिवाय या लेखिकेची प्रवृत्ती स्वच्छंदवादाला जवळची आहे, मुळात तिला काव्यात्मकतेची ओढ असल्याने ती पानोपानी अभिजात वादावर पोसली जाते. या लेखिकेची सानेगुरूजी आणि राष्ट्र सेवा दलावर अपरंपार श्रध्दा असल्याने, ती जी जीवनमूल्ये जतन करते, ती तिच्या जीवन वाटचालीत सतत सावली प्रमाणे वाहत असलेली दिसतात. कुसुमाग्रजांचे राष्ट्रवादी काव्य आपल्या जीवनानुभूतीचे बळ असल्यामुळे ही लेखिका आपल्या निवेदनात सतत या कवितेचा उल्लेख करते. आपल्या ध्येय धोरणाची 'अकरावी दिशा' शोधताना नाटयपूर्ण प्रेम गीते, निसर्ग सौंदर्याच्या कविता, लावण्या व संगीतिका आपल्या या वाटचालीतली वळणे दाखवून देतातर्.
 या प्रांजळ निवेदनाला खास अशी स्वतःची गती आहे. कुठल्याही वाङमय प्रकाराची त्याने तडजोड केली नाही. विविध पात्रे चितारताना त्यात परकाया प्रवेश करताना लेखका आपले ताटस्थ सांभाळते. आपले निवेदन मूळ आशयाशी एकरूप करते. ती स्वः सामाजिक किंवा सांस्कृतिक बांधिलकीशी निगडित असली, तरी ज्या अध्ययन-अध्यापन मूल्याशी तिचा वावर झाला त्याचे सुसंस्कारित ठसे या समग्र निवेदनावर स्पष्ट उमटले आहे. या समग्र निवेदनाचे जीवन ध्येय ती "एकाने भाकरीची सोय पहायची आणि दुसऱ्याने सामाजिक परिवर्तनाची बांधिलकी स्वीकारून काम करायचे" हा घेतलेला निर्णय या शब्दात वर्णन करते.
 एकापरी ही वाटचाल अनुराधा व श्रीनाथ या उभयतांची असली तरी स्वः लेखिकेने परस्परांशी समरस होऊन अगदी ती तिची स्वतःची एकटीची अद्वैत वाट म्हणून जोपासली आहे. अशा वाटचालीत माहेरीची आणि सासरची माणसे, मित्र, मैत्रीणी, आपले कुटुंब, गुरू, आदर्श म्हणून समोर ठेवलेले हितचिंतक ही सारी ठिकाणी आपल्या वाटचालीचे वळण बदलणारे विश्रांतीचे ठिकाणे झालेली आहेत. ही जीवनाची वाटचाल भूतकाळातून वर्तमान काळाकडे येते व तितक्याच ओढीने भविष्यकाळ जागविते.
 लेखिकेने अचूक पण थोडया शब्दात आपला आशय स्पष्ट केला आहे. तिच्याच शब्दात सांगायचे तर 'लग्नापूर्वीचे ते निर्णय बेकंनेच्या पाठयासारखे साधे, सोपे, सरळ वाटत. जीवन साथीने व्यवसायाच्या माध्यमातून घरासाठी पैसा मिळवावा असे कधीच वाटले नाही आणि आपल्याला मिळणारा पगार हा दोघांचा आहे हीच भावना दोघांच्याही मनात रूजलेली होती.' ही सूचक वाक्ये बरेच काही सांगून जातात आणि ज्यामुळे बरेच काही सांगायचे राहिले आहे. पण ते वाचकाच्या गळी उतरले आहे याची जाणीव करून देतात. अशा वेळी हे समग्र लेखन लेखिकेला आत्मचरित्रतील सलग कहाणीची आठवण करून देते. मात्र ते आत्ममग्न शैलीची कारागिरी दाखवित नाही. ही कहाणी अनू आणि श्री ची असली तरी त्यात अनेक ध्येयवेडी जोडपी प्रतिबिंबित झालेली दिसतील.
 लेखिकेने इ.स. १९७२ ते १९७५ चे मंतरलेले दिवस चितारताना तो ध्येयवादी काळ अगदी हुबेहुब चित्रित केला आहे. १९७४ चा दुष्काळ, विरोधी मोर्चा, हजारो स्त्री-पुरूष भाकऱ्या बांधून मोर्चात सामिल झालेले सत्याग्रही, पुढे १९७५ मध्ये आलेली आणीबाणी, त्यात श्रीला झालेली अटक, त्याची नाशिकच्या जेलमध्ये झालेली रवानगी, त्याला घरातून दिलेला निरोप, त्यावेळची समग्र कालवाकालव व पुढे तो पॅरोलवर सुटल्यानंतरचे त्याचे घरी स्वागत, पुन्हा जेलकडे प्रयाण हे सारे प्रसंग एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे लेखिका रंगविते. त्यातले सारे गहिरे रंग आपलेसे करण्यास वाचक रंगून जातो. मोर्चामध्ये ज्या कविता गाइल्या जातात, त्याचे ओघवते ध्रुपद आपल्या
ध्येयाशी एकरूप होऊन समाजातील विविध असे अन्याय ते खुलवून देतात किंबहुना या समग्र निवेदन शैलीत विविध अशी कवितेची आलेली अवतरणे मूळ आशयाला अधिक अर्थगर्भ करणारी झाली आहेत. लेखिकेचा याबाबतचा गद्य-पद्य विवेक कौतुकास्पद झाला आहे.
 पू.साने गुरूजी, डॉ.बापू काळदाते, एस.एम. जोशी, अनंत भालेराव, ना.ग. गोरे या मंडळींनी आपल्या कैदेच्या अनुभवतात जे भरीव व्यक्तिमत्व संपादन केले, त्याचा नवा अर्थपूर्ण आदर्श लेखिका श्रीच्या निवेदनातून अधिक गहिरा करते. तो आदर्श श्रीचा अनुभव असतो व अनूची ती अनूभूती असते. या साऱ्या मागे 'सेवा दल हा माझा प्राण आहे' असा साने गुरूजींचा ओढा व ओघ असतो. लेखिकेने उन्हाळे, पावसाळे व हिवाळे हे तिन्ही ऋतू आपलेसे करताना अवंडबर किंवा फुशरकी न दाखविता उघडया डोळयांनी पाहिले. आपल्या अध्यापनातले शाळेतील किंवा महाविद्यालयातील विद्यार्थी वातावरण चित्रीत करताना लेखिका आपल्या या कार्याशी एकरूप होते व ध्येयवादी जीवन पुन्हा पुन्हा संस्कारित करते. हे सारे प्रसंग मुळात वाचण्यासारखे लक्षणीय झाले आहेत. ते कोरडे नसून त्यात जिवंतपणा मुळातला आला आहे. इथे लेखिकेची शैली साधी, सोपी व हृदयस्पर्शी झालेली दिसेल.
 या समग्र कहाणीत जी विविध अशी निसर्ग वर्णने आली आहेत ती पात्र, प्रसंग, घटना यांना प्रेरित करणारी आहेत. ती आपल्या घटकांचे सौंदर्य खुलवितात. त्यातली अंतःकरणे उजळून देतात. या निसर्ग वर्णनाने आपण कुठे सुरूवात करायची व कुठे थांबायचे याचे कलात्मक भान वाचकापुढे ठेवले आहे. या निसर्ग वर्णनाला काव्यात्म शैलीची जोड मिळाल्याने या समग्र निवेदनाला कलेचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यात वाचक विरंगुळा घेतो व लेखिकेबरोबर वाचकांनाही पुनः प्रत्ययाचा आनंद देवून जातो. बीड जिल्हयातीला परळी-अंबाजोगाई परिसर हा ध्येयधुंदीने चित्रीत करण्यापेक्षा तो आपल्या निसर्गवेडया लयीत दाखविल्याने त्याचे बाहयरंग व अंतरंग वाचकासाठी आगळे वेगळे झाले आहे. त्यातली ओघवती लहान मोठी पाने आपलेपणाने तुमच्या आमच्या जीवाचे मैत्र सांभाळून जातात.
 शैला लोहिया यांचे हे सारे लेखन केवळ कुठल्याच वाङमय प्रसाराच्या आहारी न जाता, या शब्दमोहापलीकडे जावून ते जेव्हा सरळ साध्या सोप्या भाषेत अवतरते तेव्हा ते अधिक परिणामकारक होते. ते वाचकाच्या जाणिवेच्या क्षेत्रात पुरेसे अस्वस्थ करते. एका ध्येयवेड्या रसील्या पण प्रगल्भ जीवननिष्ठा व कलात्म व्यक्तिमत्वाचा परिचय त्यातून घडतो. लेखिका सौंदर्यलक्षी आहे. पण जीवनापासून पलायनवादी नाही. तिने प्रेम शृंगाराच्या गहिऱ्या छटा आणि निसर्गसौंदर्याच्या रंग छटा भरताना, दुसरीकडे सामाजिक जाणीव आणि जीवनमूल्ये उदात्त भावाने विनासंकोच व्यक्त केले आहेत. लेखिकेचे हे सारे अनुभव प्रामाणिक असल्याने तिचे कवि मन जागरूक आहे. या 'अकराव्या दिशेचा' शोध पुढील प्रमाणे देता येईल

"माझा मार्ग दुसरा आहे
चंद्र किरणांच्या लक्ष्मण झुल्यावर भोवळ आल्याशिवाय
कशी सापडणार आकाशगंगा
तुम्हाला माहित आहे ना?
को हच्या हाकेला सो हचा प्रतिसाद मिळतो
ते अनादि देठांचे ओंकार-कमळ मी शोधीत आहे
किरणातून येणाऱ्या त्याच्या परागांना वाट द्या, अरे त्यांना वाट द्या,
तीच अकराव्या दिशेची धूळ आहे." (वसंत बापट)

प्रा. मधु जामकर
'दिलासा', स्नेहनगर,
परळी वैजनाथ, जि. बीड

ऋणनिर्देश


 'शोध अकराव्या दिशेचा' ही कादंबरी प्रकाशित करीत असतांना मनामध्ये ही खंत आहेच की आई असतांना तिची ही शेवटची कलाकृती प्रसिध्द होऊ शकली नाही... पण समाधान याचे आहे की नियोजित दिवशी म्हणजे बाबुजींची (वडील) पंचाहत्तरी पूर्ण होतांना ती प्रकाशित होतीये. आदरणीय प्रा. मधु जामकर यांनी त्यांच्या व्यस्ततेतून वेळ काढून अतिशय कमी वेळेत बाईंच्या (आईच्या) कादंबरीस प्रस्तावना दिली.
 आईचा लिहिता हात जसा थांबला तशी तिची प्रकृती अधिकच खालावू लागली होती. कादंबरी हा वाड्.मय प्रकार यापूर्वी तिने कधी लिहिला नव्हता. २००९-१० या कालावधीत तिने ही कादंबरी लिहीली. आई गेल्यानंतर मुद्रणातील चुका दुरूस्त करण्यासाची जबाबदारी तिची मानसकन्या अंजली इंगळेने घेतली. डीटीपी करण्यासाठी बिभीषण घाडगे, तसेच योगेश गुजर व आझाद यांनी सहकार्य केले.
 माझा मोठा भाऊ श्री. बजरंगदास लोहिया यांच्या रेटयामुळे आणि माझे पती सूर्यकांत यांच्या मानसिक पाठिंब्यामुळे व दादा अभिजित व भैय्या अनिकेत यांच्या साथीमुळे आज हे पुस्तक हातात येऊ शकले.
 या सर्वांची मी ऋणी आहे.

- अरूंधती पाटील